Monday, 27 April 2020

मराठी निबंध दूरदर्शन आणि मुलांमधील वाढती हिंसक वृत्ती Disadvantages of Television Essay in Marathi

Disadvantages of Television Essay in Marathi Language : Today, we are providing मराठी निबंध दूरदर्शन आणि मुलांमधील वाढती हिंसक वृत्ती For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Disadvantages of Television Essay in Marathi Language to complete their homework.

मराठी निबंध दूरदर्शन आणि मुलांमधील वाढती हिंसक वृत्ती Disadvantages of Television Essay in Marathi

सध्याच्या युगात आकाशवाणी व दूरदर्शन ही फार मोठी आणि तितकीच संवेदनशील प्रसारमाध्यमे आहेत. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक इत्यादी सर्व पातळ्यांवरचा प्रसार करताना त्यांमध्ये करमणूकप्रधानता येणे स्वाभाविकच असते; पण करमणुकीची पातळी कलात्मक असावी; ती नैतिकतेला बाधक नसावी, समाजहिताचा विचार करणारी असावी; ही भूमिका तर केव्हाच मागे पडली. समाजाचे वास्तव चित्रण करताना त्याला नैतिकतेचे मार्गदर्शन असावे, ही भूमिकाही संपुष्टात आली व आर्थिक स्पर्धेसाठी ते जास्तीत जास्त हिंसक व लैंगिक होऊ लागले. जेव्हा दूरदर्शन नव्हते तेव्हा चित्रपट होते आणि त्यांचा कुमारवयावर होणारा घातक परिणाम कसा टाळावा हा समाजासमोरचा प्रश्न होताच. नाटक तर त्याच्याही पूर्वीचे. या नाटकांचाही कुमारवयातील कोवळ्या मनावर विपरीत परिणाम होत होता, असे तेव्हाच्या समाजाला वाटत होते. अर्थातच, हे दुष्परिणाम टाळण्याचा उपाय तेव्हाच्या समाजहितचिंतकांनी समाजासमोर मांडला होताच आणि जागरूक पालकांनी त्याचे अनुसरणही केले असेल; पण नाटक व चित्रपट यांच्यापेक्षाही दूरदर्शनचा कुमारवयाच्या मुलामुलींवर होणारा परिणाम अधिक व्यापक, अधिक घातक आणि अधिक प्रभावी स्वरूप धारण करणारा आहे. नाटकांमध्ये हिंसक दृश्ये असण्याची शक्यता नसते; त्यामुळे त्यांचा परिणाम या कोवळ्या वयात नाटके बघण्याचे वेड लागणे, त्यांतील संगीत किंवा प्रेमदृश्ये यांचा प्रभाव पडणे, यापेक्षा अधिक होण्याची शक्यता नव्हती. चित्रपटांमध्ये हिंसक दृश्ये, प्रणयदृश्ये असली तरी त्याला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावे लागण्याच्या काळात आजच्याइतके घातक प्रभावीपण प्राप्त झालेले नव्हते; पण तरीही ते समाजाच्या स्वास्थ्याला धोकादायक आहे, हे जाणवायला लागले होते. मात्र दूरदर्शन आले आणि या परिणामाने बघता बघता एकदम प्रचंड उग्र रूप धारण केले. लहानपणी बाटलीतील राक्षसाची गोष्ट लोककथेत परिचित होती. हाच राक्षस आता घरोघरी दूरदर्शनच्या पेटीत जन्माला आला आहे की काय, असे वाटावे इतके त्याचे भयानक परिणाम समाजाला, समाजातील सुशिक्षित व मुलांच्या भवितव्याची काळजी असलेल्या पालकांना भेडसावू लागलेत. हा प्रश्न एखाद-दुसऱ्या व्यक्तीचा व स्वतःच्या घरापुरता मर्यादित राहिला नाही. स्वत:च्या घरात दूरदर्शन न घेण्याने हा प्रश्न सुटत नाही. शिवाय सुरुवातीच्या काळामधील दूरदर्शनचे स्वरूपही इतके हिंसक दृश्ये दाखविणारे नव्हते. दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर किंवा दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर आलेली हिंसकता व प्रणयदृश्यांमधील मादकता ही वाहिन्यांची एकमेकांशी व प्रायोजक पातळीवर चाललेली स्पर्धा यांमधून वाढत चाललेली आहे; आणि आज वाढता वाढता तिने कुमारवयाच्याच नव्हे, तर सर्व थरांतील लहानमोठ्यांच्या मनाचा कब्जा घेतलेला आहे. अनेक दृश्यांतून मारामाऱ्यांचे जे विविध नमुने दाखविले जातात त्यांत मारामारीपेक्षा त्यांचे विविध प्रकार दाखविण्यावर भर असतो. जमिनीवरच्या, आकाशातल्या, पाण्यातल्या, वाहनातल्या अशा अनेक प्रकारच्या मारामाऱ्या हेच काही कार्यक्रमांचे आकर्षण असते. ही दृश्ये खोटी आहेत हे कळायलाही .. आवश्यक ती प्रगल्भता नसलेल्या मुलांमध्ये याच वृत्ती बळावतात. शिवाय याची कारणे कुठल्यातरी प्रेमभावनेशी जोडून घेतलेली असल्याने त्यांचा प्रभाव अधिक परिणामकारक होतो. या अशा खालच्या पातळीवरच्या संघर्षाला कदाचित वास्तव जीवनात थोडेफार स्थान असेल; पण कथानकाची व चित्रपटाची प्रसिद्धी व गल्ला यांच्या वाढीसाठी त्यामध्ये अधिक हिंसकता दाखविण्यावर भर आला; त्यामुळे हा परिणाम केवळ कथानकाची गरज म्हणून आला नसल्याने तोच अधिक ठळकपणे कुमारवयावर परिणाम साधून राहिला.

चित्रपट आणि दूरदर्शन नसतानाही कुमारवयाची मुले गुन्हे करीत नव्हती, असे नाही. बालसुधार केंद्रे (रिमांड होम्स्) पूर्वीही होती. बालगुन्हेगारी ही दूरदर्शन व चित्रपट नव्हते तेव्हा नव्हती असे नाही; पण ती समाजाच्या व कायद्याच्या आटोक्यात राहणारी होती. दूरदर्शन व दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांची त्यामध्ये भर पडत चालली. माणसातला राक्षस जागा करण्याच्या कामालाच जणू हा 'पेटीतला राक्षस' जुंपला गेला. सन १९९७ मध्ये बारा कुमारांना खुनाच्या, सोळा जणांना बलात्काराच्या, अकरा जणांना पळवापळवीच्या, पंचाऐंशी जणांना साध्या चोरीच्या तर एकशे पंच्याहत्तर जणांना जबरी चोरीच्या गुन्ह्याखाली पकडले गेले होते. बलात्काराचे गुन्हे करणाऱ्यांचा आकडा पाचशे चव्वेचाळीसवर पोहोचला होता. न पकडलेले गुन्हेगार वेगळेच. गुन्हेगारांचा विशेषतः बलात्कारांचे गुन्हे करणाऱ्यांचा हा आकडा काय सुचवितो? यांपैकी पुष्कळसे गुन्हे अल्पवयीन मुलींच्या संदर्भात घडलेले होते; आणि ते त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या वा परिचयातील तरुणांनी केलेले होते. हे वाढते प्रमाण काय सुचविते? सुचविण्याचा प्रश्नच उरत नाही. दूरदर्शनचे वाढते आकर्षण त्यांच्यातील केवळ हिंसकता वाढवूनच थांबते असे नाही, तर त्यांच्या सगळ्याच कोवळेपणाला, निरागसतेला, उमलत्या जीवनप्रवृत्तीला चुकीच्या वळणावर आणून सोडते. त्यांच्यातील हिंसकता दूर करण्यासाठी उपाय कोणते? दूरदर्शन दूर करणे हा तर उपाय नाही; आणि ते करणे शक्यही नाही. यंत्रयुगाच्या प्रगतीने आणलेले हे दूरदर्शन अनेक दृष्टींनी आपल्याला, सगळ्या मानवजातीला एका प्रगतीच्या टप्प्यावर घेऊन आलेले आहे. दूरदर्शनने माणसालाच केवळ जवळ आणले आहे असे नाही, तर ज्या गोष्टी माणसाच्या बौद्धिक कक्षेबाहेरच्या होत्या, त्याही त्याच्या हाताशी आणून देण्याचे कार्य दूरदर्शनने व दूरदर्शनमधील संशोधनाने साधले गेले आहे. दूरदर्शनमुळे शिक्षणसुलभता आली; शिक्षणपद्धतीत रंजकता आली. चित्रमयतेमुळे हे शिक्षण अधिक परिणामकारक झाले. शिक्षणातून मिळणारे ज्ञान केवळ पुस्तकामध्ये अडकून न राहता दूरदर्शनच्या पडद्यावरून ते मिळू लागले. घरातल्या घरात ज्ञान मिळविणे आणि आपल्याला हवे त्या वेळी ज्ञानग्रहण करता येणे या सुविधा दूरदर्शनने उपलब्ध करून दिल्या. दूरचे प्रवास न करता प्रवासाचा आनंद माहितीसह देणे हे दूरदर्शनमुळे शक्य होते. अशा प्रकारे सगळ्यांबरोबरच कुमारांनासुद्धा हे दूरदर्शन अनेक दृष्टींनी नवी जीवनजाणीव जागृत करून देणारे आहे; परंतु मूलत:च अपरिपक्व व कोवळ्या वयात दरदर्शनच्या या गोष्टींकडे लक्ष वेधले जाणे अशी परिस्थिती त्यांच्याभोवती नसते. त्यांना आकर्षित करणाऱ्या भडक गोष्टी, त्यांना चेतविणाऱ्या व त्यांच्या भावना उद्दीपित करणाऱ्या गोष्टी दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर इतक्या व्यापक प्रमाणात आणि इतक्या भडकपणे, परिणामकारकपणे आणि इतक्या भावनिकतेने रंगवून त्यांच्या नजरेसमोर सातत्याने येत आहेत की, त्याच्या तुलनेमध्ये दूरदर्शनवरच्या विधायक जीवनदृष्टी देणाऱ्या विशेषांची दखल घेण्याची जाणीवही मुलांच्या व पालकांच्याही मनात ठसली जात नाही. 

या वयाच्या मुलांमधील वाढत्या गुन्हेगारीला अनेक घटक जबाबदार आहेत. शहरीकरण, स्थलांतर, जीवनमूल्यांची होत असलेली घसरण, मुलांकडे पुरेसे लक्ष द्यायला पालकांना वेळ व समज नसणे आणि त्याच्या जोडीलाच चित्रपट व दूरदर्शन यांच्यासारखी प्रसारमाध्यमे! यामुळे 'एकेकम् अपि अनर्थाय किमुयत्र चतुष्टयम्।' अशी मुलांची परिस्थिती व्हावयास लागली तर नवल नाही. 'शक्तिमान' पाहून तो आपल्याला वाचवायला येईल अशा कल्पनेने स्वत:ला जाळून घेणारी मुलगी हे त्याचेच उदाहरण आहे. याचे पडसाद राज्यसभेमध्येही उमटले. छोट्या पडद्यावरच्या या मोठ्या प्रमाणावरच्या घातक परिणामांचा विचार कुणी करायचा? तो कसा करायचा? त्यासाठी नेमके कोणते उपाय आहेत? आणि त्यांची अंमलबजावणी किती निष्ठेने, काटेकोरपणे, कडकपणे होणे आवश्यक आहे? हे दाराशी आलेले संकट नसून घरात घुसलेले संकट आहे. कुमारांच्या माध्यमातून 'उद्याच्या राष्ट्राच्या जीवनाचाच हा प्रश्न आहे.

आजच्या जीवनाचे सगळे स्वरूप पुष्कळसे सार्वजनिक बनलेले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रभावाखाली आपण जीवनाचे आडाखे बांधत आहोत. दूरदर्शनमधील जाहिराती पाहून आपण वस्तू विकत घेतो. दूरदर्शनवरची आई घरच्या आईपेक्षा आपल्याला अधिक आवडते. पूर्वी- म्हणजे दूरदर्शन येण्याच्या पूर्वी- घर माणसांचे होते. आई-वडील, काका-मामा, मुलेबाळे, नातेवाईक, पैपाहुणे, आले-गेले यांच्या आपुलकीने, रागद्वेषाने त्या घराचे चिरेबंदी वाडे गजबजलेले असत. त्या घरांना समज होती, तिथे नांदतेपण पिढ्यान्पिढ्या वंशपरंपरेने बाळसे धरीत होते; पण दूरदर्शन आले आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी जाऊन केव्हा बसले, ते माणसांना आणि घरांना कळलेसुद्धा नाही. आज तर ही स्थिती फक्त शहरांतून दिसते असे नसून खेडोपाडीही दूरदर्शनच्या अँटिनांचा पसारा अवकाशाची पोकळी व्यापून राहू लागला आहे. शहरांमध्ये तर अनेक घरांमध्ये एकापेक्षा अधिक दूरदर्शन संच दिसू लागले आहेत. दूरदर्शन कंपन्या व विक्रेते लोकांच्या गरजा कृत्रिमरीत्या वाढवीत आहेत. अधिकाधिक 'कमर्शियल' बनत आहेत- केवळ आपला आर्थिक स्वार्थच साधत आहेत. साधारणपणे ५५ लक्ष दूरदर्शनचे संच २५० लक्ष लोक पाहतात, असे गणित दिसून आले आहे. दिवसाचे चोवीस प्रहर या विविध वाहिन्यांवरून सातत्याने कार्यक्रम सुरू असतात आणि या पाहणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या अधिक आहे; यामुळे मुलांच्या मनावर किती विकृत परिणाम होत असतो याचा विचार काही विचारवंतांना अस्वस्थ करू लागला आहे. ते त्याविरुद्ध आवाज उठवू लागले आहेत; पण तो अतिशय क्षीण आहे. कारण नुसती मुलेच नव्हेत तर घरातील लहानथोर सर्वच याच्या प्रभावाखाली असल्याने पाल्याला 'दूरदर्शन पाहू नको' हे सांगण्याचे धैर्य स्वतः पालकांनाच फारसे राहिलेले नाही. त्यांनाच या वाहिन्या पाहण्याची प्रचंड ओढ लागलेली असते. त्यामुळे घरातील नोकरीधंदा न करणाऱ्या गृहिणी असोत किंवा नोकरीधंदा करून दमूनभागून आलेले पालक, नागरिक असोत, करमणूक-मनोरंजन यासाठी दरदर्शनला ते जवळ करतात. त्यांना “दरदर्शन पाहू नको" हे मुलांना सांगण्याचे भान नसते किंवा अधिकारही नसतो. आपल्या मुलांवर त्यांचा लैंगिक दृष्टीने होणारा परिणाम त्यांना अस्वस्थ करीत नसेल असे नाही; पण ते अशी दृश्ये पाहण्याचा मोह स्वतः आवरू शकत नाहीत, तिथे मुलांना आवरण्याचे भान कसे रहाणार? 

आजच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेमुळे पुष्कळशा घरांमधील मुले दुपारच्या वेळी नोकरांच्या सहवासात असतात. आई-वडील दोघेही नोकरीच्या व्यापात गुंतलेले असल्याने नोकरांच्या सहवासात समोर येईल ते काहीही पाहण्याची सवय मुलांना लागलेली असते. काही घरांमध्ये तर मुलेमुलेच असतात. त्यांची तर दुपारची करमणूक दूरदर्शनच भागवीत असते; यामुळे अपरिपक्व मनाला अशा कार्यक्रमांचे वेड व नंतर व्यसन लागते. यावर पालकांना तरी कोणता उपाय सुचणार? समाज तरी यातून कसा मार्ग काढणार? मुलांमधील वाढती हट्टी, आक्रमक वृत्ती, संस्कृतीचा व संस्कारांचा अभाव, बेशिस्त, व्यसनांकडे व दुर्गुणांकडे झुकलेला कल यांवर उपाय शोधण्यात पालक अपुरे पडू लागले आहेत. पालकांचे प्रेमळ मार्गदर्शन आणि आश्वासक सहवास मुलांना हवा असतो; पण त्याऐवजी शाळेमधून घरी आल्यावर त्यांच्या सोबतीला दूरदर्शन असते. काय पाहावे, यावर बंधन घालणारे कुणीही नसते. जे पाहिले जाते त्याचा अन्वयार्थ लावणे, त्यामधील खोटेपणा व अवास्तवताअसंभवनीयता लक्षात आणून देणे, त्याचे काय वाईट परिणाम होतात याची समज आणून देणे या गोष्टी करणारे कुणीच नसते. यासाठी आजच्या कुटुंबव्यवस्थेत काही उपाय शोधता येतील काय? मुलांचे एकटेपण टाळणे व त्यांना मोठ्यांचा व आवडत्या माणसांचा सहवास मिळणे आणि त्यांच्या सहवासात दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहणे हे शक्य झाले तर मुलांमधील हिंसक वृत्तीमध्ये व व्यसनाधीनतेच्या आहारी जाण्यामध्ये कितीतरी फरक पडू शकेल. पण मुख्य म्हणजे दूरदर्शनला व त्याच्या विविध वाहिन्यांना केवळ पैसा, लोकप्रियता यांची अतोनात असलेली हाव व ओढ कमी व्हायला पाहिजे. समाजाचे हित, सामाजिक नीतिमत्ता, संस्कार यांच्याबद्दल निदान प्राथमिक पातळीवरचे बंधन जरी त्यांनी स्वतःहोऊन पाळण्याचे ठरविले तरी मुलांवरचे हे घातक परिणाम आटोक्यात राहू शकतील असे वाटायला खूप जागा आहे. अनेक चित्रपट व मालिका यांचे दिग्दर्शक, त्यांतील कलावंत व त्यांच्यासाठी आवश्यक असलेला सगळा पडद्यामागचा व पडद्यावरचा ताफा यांना परिणामांची पर्वाच वाटत नाही. ते फक्त स्वत:च्या आर्थिक स्वास्थ्याची काळजी घेत आहेत. ज्या समाजात ते वावरतात, जो समाज त्यांचा 'उदोउदो' करतो, त्यांच्या व त्यांच्या घरातील कुमारांच्या, मुलांच्या मनावर होणाऱ्या भीषण संस्कारांचे त्यांना काहीच देणेघेणे नाही. ही वृत्ती बदलली पाहिजे. ती बदलण्यासाठी वेळप्रसंगी कायद्याचा दंडुका वापरला पाहिजे; कारण कलावंतांच्या चांगल्या अभिनय गुणांपेक्षाही त्यांच्या आलिशान बंगल्यांचे आणि व्यसनांचे, व्यसनी जीवनाचे आकर्षण या मुलांना वेड लावीत असल्याने, व्यसने व हिंसकता, बेकायदेशीर वर्तन या गोष्टी लहानपणापासूनच त्यांना जीवनाचा एक अविभाज्य घटक वाटू लागल्या आहेत.

चित्रपटातील आणि दूरदर्शनच्या पडद्यावरील हिंसक दृश्यांचा मुलांच्या आक्रमक वृत्तीवर आणि हिंसक वर्तनावर होणारा परिणाम अभ्यासिला गेला आहे. मात्र भारतामध्ये हे प्रमाण किती आहे याची आकडेवारी काढलेली नाही. सन १९५० मध्ये दूरदर्शन जेव्हा नुकतेच आलेले होते तेव्हा त्याचा मुलांच्या वृत्तीवर परिणाम होऊन ती अधिक आक्रमक बनतील' असे भाकितही काही जणांनी वर्तविले होते. विविध दृष्टिकोनांतून नंतर त्याचा अभ्यासही केला गेला. छोट्या-मोठ्या प्रकारची हिंसक व वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती दूरदर्शन पाहणाऱ्यांमध्ये दिसून येत होती. अधिक संशोधनांती असे जाणवले की, तसे करण्यामागे दूरदर्शनवरील कलावंतांसारखे वागण्याची व तसाच अभिनय करण्याची प्रवृत्ती होती. त्याचा गंभीरपणे विचार करण्याची किंवा घातपात करण्याची प्रवृत्ती मूलतः नव्हती. दूरदर्शनचे फक्त अनुकरण करणे, त्यामुळे इतरांचे लक्ष वेधले जाणे यावरच जास्त भर होता. जाहिराती व प्रसिद्ध अभिनेते यांचे या वयात फॅड असतेच. थंड पेयाच्या जाहिरातीची नक्कल करण्यामध्ये एका मुलाने आपला जीव गमावल्याचे उदाहरण सर्वांच्या परिचयाचे आहेच. ही उदाहरणे वगळली तरी, मुलांनी केलेल्या खुनाच्या पद्धतीही दूरदर्शनच्या पडद्यावरच्या व प्रसिद्ध-अप्रसिद्ध चित्रपटांतील खुनांच्या पद्धतींशी तंतोतंत जुळणाऱ्या निघाल्या.

अशा तपशीलवार खुनांच्या व हिंसेच्या पडद्यावरच्या साक्षात दर्शनाने अनेक मुलांचे मानसिक संतुलनही ढासळलेले आढळले. त्यांना अचानकच भयगंडाने ग्रासले असेही दिसून आले. वास्तवातील अशी दृश्येही पडद्यावर किती, कशा त-हेने व किती वेळ दाखवावीत यालाही मर्यादा घातली गेली पाहिजे. किंबहुना आज तर वास्तव जगात 'अंडरवर्ल्ड' आहे, दहशतवादी प्रवृत्ती आहे; पण त्याचे चित्रण पडद्यावर किती व कसे करावे याला बंधने आली पाहिजेत. मुलांनाही वास्तवाची जाणीव व्हावी एवढा व असाच हेतू असेल तर या उमलत्या वयात त्यांना ती देण्याने त्यांचे सगळे आयुष्य भयग्रस्त होऊन जाईल; ते कोणत्या तरी दडपणाखाली वावरत राहतील; म्हणूनच कोणत्याही दृष्टीने अशी दृश्ये मुलांसमोर येता कामा नयेत. अशी हिंसक घातपाती कृत्ये करणाऱ्यांचे चैनीचे आयुष्यही चित्रपटामध्ये रेखाटलेले असते. त्याचा या मुलांवर, मग ती झोपडपट्टीमधील असोत किंवा श्रीमंतांची असोत, वाईट परिणाम होतो व या चैनी जीवनाचा व हिंसकतेचा अतूट संबंध त्यांच्या मनात पक्का होतो आणि म्हणून अभ्यास, मेहनत, कष्ट या मार्गाकडे वळण्यापेक्षा ती मुले झटपट श्रीमंतीच्या मार्गाकडे आपोआप वळतात. आजच्या वाढत्या बेकारीमुळे तर असे अनेक तरुण दहशतवादी टोळ्यांत सहभागी होऊन अर्थार्जन करीत असलेले दिसतात; म्हणून धाकदपटशाही, गुंडगिरी ही अर्थार्जनाची साधने बनू पाहत आहेत आणि त्याला जबाबदार असलेल्या अनेक घटकांपैकी एक प्रमुख घटक म्हणून हे दूरदर्शनवरचे चित्रण फार मोठ्या प्रमाणात जबाबदार धरावे लागेल.

या सगळ्याचा मानसशास्त्रीय दृष्टीनेही विचार करण्याची गरज आहे. दरदर्शनच्या पडद्यावरची हिंसक दृश्ये व चंगळवादी प्रवृत्तीवर पोसलेले चैनी व व्यसनाधीन जीवन हे रुक्ष वास्तवाचा क्षणार्धात विसर पाडणारे औषध ठरू लागले आहे. वास्तवामध्ये जे हातात येऊ शकत नाही, आयुष्यभर ढोरमेहनत करूनही जसे जीवन स्वप्नातही वाट्याला येणार नाही, अशा थरातील गरीब जनतेच्या वासना चाळविण्याचे कार्य हा पडदा करताना दिसतो. जे तासन्तास या अशा स्वप्ननगरीचा भास दाखविणाऱ्या दूरदर्शनच्या पडद्याला डोळा लावून बसतात, त्यांना वास्तव जग दुष्ट, क्रूर व सहानुभूतिशून्य वाटू लागते. त्यांचे मन निराशेने ग्रस्त होते. ते एकटे व जीवनापासून तुटून वेगळे राहू लागतात. 'आपल्याला कुणीच समजून घेणारे नाही' अशा टोकाच्या भावनेने ते ग्रासले जातात आणि आयुष्यात काहीतरी करीत राहायचे म्हणून हिंसक कृत्यांनी आपल्या जीवनात .चेतना आणू पाहतात. सर्व करमणूक कार्यक्रमांमध्ये, जाहिरातींमध्ये 'थ्रिल'च्या नावाखाली येणारा हिंसक धांगडधिंगा हा जगभर पसरलेला असल्याने त्याला कसा आळा घालावा, हा सगळ्याच विचारवंतांसमोरचा प्रश्न आहे.

चित्रपट किंवा दूरदर्शन यांच्या पडद्यावरचे हे हिंसकतेचे चित्रण कसे मर्यादित करता येईल, निदान लोकांवरची, विशेषतः तरुण पिढी व कुमारवयीन मुले यांच्यावरची त्याची जबरदस्त पकड कशी सैल होऊ शकेल यावर चर्चा घडवून, विचारमंथन करून काही उपाययोजना सुचविल्या गेल्या आहेत. त्यांपैकी- (१) व्ही-चिप म्हणजे तांत्रिक उपाय योजून क्रूरतेचा, हिंसकतेचा भाग काळा करून अदृश्य करणे. (२) अशी दृश्ये कमी करणे, त्यांबद्दल जाब विचारणे किंवा त्यांसाठी होणारा खर्च लोकांसमोर मांडणे. (३) अशी दृश्ये असलेले भाग केवळ प्रौढांसाठीच मर्यादित करणे. हे उपाय कार्यवाहीत आणण्याचा विचार केला गेला आहे. त्यांची कार्यवाही काही विकसित पाश्चात्त्य देशांमध्ये अमलातही आणली गेली.

पहिले दोन तर यू.एस्.ए. (U.S.A.) मध्ये १९९६ च्या टेलिकम्युनिकेशन कॉम्पिटिशन व डिरेग्युलेशन अॅक्टचा भाग म्हणून स्वीकारलेही आहेत. भारतातही त्याची कार्यवाही व्हावी असे म्हटले तर काही लोकांना त्यांच्या परिणामकारकतेबद्दलच शंका वाटते. पुष्कळदा असेही जाणवते की, मुलांनी जी दृश्ये पाहू नयेत म्हणून प्रौढ पालक-मंडळी धडपडत असतात, तीच पाहण्याकडे मुलांचा ओढा, केवळ पालकांनी विरोध केल्याने अधिक वळतो आणि कायद्यातील व व्यवहारातील पळवाटा शोधून ते ती दृश्ये चवीने पाहतात. विरोध जितका अधिक तितके त्याबद्दलचे कुतूहल अधिक उसळून वर येत असते. हा या वयाचाच नव्हे तर निसर्गाचा न्यायच आहे. प्रौढ माणसेही मुलांनी काय पाहू नये याची काळजी घेतात; पण त्या जागी, मुलांनी काय पाहावे ते सांगत नाहीत. त्यांना पाहायला आवडेल, त्यांचा कल चांगल्या गोष्टींकडे कसा वळेल अशी दृश्ये, चित्रणे विपुलतेने त्यांच्यासमोर आल्याशिवाय हिंसक-मादक दृश्ये टाळण्याकडे त्यांचा कल होणार नाही. प्रौढ माणसे नेहमीच मुलांना काय पाहू नये व काय करू नये याचा प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे उपदेश करीत असतात; पण काय पाहावे व काय करावे याचा बोध मात्र त्यांना कसा होईल याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. जसे पोट भरलेले असेल तर अवांतर चटकमटक खाणे फार खाल्ले जात नाही; तसेच चांगल्या गोष्टी अनुसरण्याची सवय लावली असेल तर व पालकांचे प्रेमळ मार्गदर्शन असेल तर वाईट गोष्टी प्रभाव गाजविण्यात उणावतील. दूरदर्शनच्या पडद्यावर जे कार्यक्रम मुलांच्या वयोगटाच्या दृष्टीने उपयुक्त व पोषक असतील त्यांकडे त्यांचा कल वळविण्याचा पालकांनी प्रयत्न तरी करायला पाहिजे; आणि मुख्यतः दूरदर्शननेच अशा कार्यक्रमांकडे ते अधिक आकर्षक करण्याकडे लक्ष पुरवायला पाहिजे. दूरदर्शन जेवढी मेहनत हिंसक व मादक चित्रपटांवर घेते, त्याच्या एकशतांश मेहनत जरी त्यांनी या प्रकारचे चित्रण संस्कारपूर्ण पण कलादृष्टीने श्रेष्ठ होण्यावर घेतली तरी हा प्रश्न निम्म्याने सोडविला जाईल...

सन १९९७ च्या जूनमध्ये कॅनडाने त्यांच्या दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची कॅनेडियन रेडिओटेलिव्हिजन अँड टेलिकम्युनिकेशन कमिशनतर्फे (C.R.T.C.) सहा प्रकारच्या पातळ्यांवरून परीक्षा घेतली. ‘v-Chip' (व्ही-चिप) च्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या पद्धतीने त्यांना कथानकातील भडक व लोकांनी पाहू नये असा वाटणारा भाग कसा काढून टाकायचा ते साध्य करता येते. 'v-Chip' चा मूळ अर्थ काय? 'V' म्हणजे Viewer- ‘पाहणारा'- प्रेक्षक आणि Chip म्हणजे त्याचा Choice- त्याची निवड. पण कॅनडामध्ये घेतला गेलेला हा अर्थ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये वेगळा घेतला गेला. संयुक्त संस्थानांमध्ये 'V' म्हणजे 'Violence' हा अर्थ रूढ झाला. प्रेक्षकाची आवडनिवड फक्त हिंसक दृश्यांपुरतीच नसते. अनेक कारणांनी त्याला काही दृश्ये अश्लील, भडक, कलाबाधक, संस्कारहीन वाटतात; आणि ती दृश्ये प्रसारित न होऊ देणे, कथानकात ती चित्रित झालेली असतील तर तेवढीच काढून टाकणे असा ‘v-Chip' चा अर्थ होता. भारताच्या दृष्टीने संस्कृतीला बाधक ठरणारी दृश्ये वा चित्रणे काढून टाकण्यासाठी या पद्धतीचा वापर उपयुक्त ठरणारा आहे. त्यासाठी तयार झालेली चित्रफीत, समाजातील मान्यवरांच्या कमिटीने पाहून, त्यामध्ये असे घातक, बाधक असलेले चित्रण बाद करून मग ती चित्रफीत लोकांसमोर आणणे (सेन्सॉरची पद्धती) ही पद्धती उपाय म्हणून योजली गेली. चित्रपटाच्या किंवा छोट्या पडद्यावरची दृश्ये सेन्सॉर करणे ही पद्धती, भारतासारख्या देशामध्ये तर संस्कृतिबाधक, संस्कारहीन किंवा संस्कृतीची, देवाधर्माची टिंगलटवाळी करणारी दृश्येही वगळण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारी पद्धती आहे. मात्र ज्यांच्या हातामध्ये ही दृश्ये सेन्सॉर करण्याची शक्ती कायद्याने दिली जाते ती माणसे जबाबदार, संस्कृतीचे व कलेचे भान असणारी आणि कोणत्याही मोहामध्ये अडकली जाणारी नसावीत.

अशा प्रकारची हिंसक व समाजस्वास्थ्यविरोधी दृश्ये टाळण्याचा मार्ग म्हणजे मुलांच्या निवडीला समजपूर्वक वाव देणे, हा होय. त्यासाठी मुलांच्या बरोबरच पालकांनी ते चित्रपट किंवा प्रायोजित कार्यक्रम एकत्रित बसून पाहणे, त्याबद्दल चर्चा करणे, त्यांतील चांगल्या-वाईटाबद्दल त्यांना आकलन होईल अशी मते मांडणे, त्यांचा त्याबद्दलचा विचार समजून घेणे व त्यांच्या ठिकाणीच सारासार विवेक कसा निर्माण करता येईल, यावर लक्ष केंद्रित करणे. हे घरोघरी घडले तर या समाजघातक प्रवृत्तीला काही प्रमाणात तरी आळा बसू शकेल; यामुळे कुठेही, कुणाच्या घरी किंवा चित्रपटगृहांत अशी दृश्ये पाहूनही मुलांच्या मनावर ती प्रभाव पाडू शकणार नाहीत. प्रामुख्याने मध्यमवर्गीय पालकांजवळ एवढी समज व पुरेसा सुसंस्कृतपणा आहे आणि मुलांसाठी आपण पुरेसा वेळ दिला पाहिजे, याची जाणीव आहे. या उपायांमुळे पालक-पाल्य संबंधांमध्ये जिव्हाळा वाढू लागेल आणि आजच्या या कुमारांना मानसिक दृष्टीने जो आधार आवश्यक असतो तो घरातच मिळू शकेल. लहानपण आणि तरुणाई यांच्यामधल्या असलेल्या या अपरिपक्व वयामध्ये त्यांना योग्य असा आधार हवा असतो. त्यांचा उत्साह व त्यांच्या आवडीनिवडी समजून घेण्याची व त्यांच्याकडून घडणाऱ्या चुकांनाही कधी कधी सांभाळून घेण्याची त्यांची अपेक्षा पालकांच्या अशा समजूतदार साहचर्याने भागविली जाईल. हिंसक दृश्यांचा परिणाम ज्या मनांवर होतो, त्या मनांची जडणघडण समजून घेतल्यास, त्यांना वास्तवाचे भान आणून दिल्यास अशा चित्रणांचा त्यांच्यावरचा परिणाम समाजघातक होणार नाही; कारण सरकारने कितीही प्रयत्न केले तरी अशी दृश्ये टाळणे शक्य होत नाही. पालकांनी घरात अशी दृश्ये बघण्यावर बंदी घातली तरी मुले दुसऱ्यांकडे जाऊन ही दृश्ये पाहू शकतात. म्हणून मुलांच्या मनावर संस्कार करणे आणि अशी दृश्ये त्यांनी पाहिली तरी त्यांचा मनावर परिणाम करून घेऊ नये, अशी शिकवण त्यांच्या मनात रुजविणे हे कार्य पालक करू शकतात. दूरदर्शनवर दिसणारे सगळे चित्रण कसे असते, त्यांतले कोणते स्वीकारावे, कोणते टाळावे याचे भान पालकांनी वेळोवेळी मुलांच्या संपर्कात राहून त्यांना देणे-हा मार्ग अवघड असला तरी वास्तव व परिणाम साधणारा आहे.

निर्मात्यांनीही समाजहिताचे भान ठेवले तर हा प्रश्न सोडविणे सुलभ होईल. आपल्या कार्यक्रमातील दृश्यांचा मुलांवर काय परिणाम होईल, हे लक्षात घेऊन त्यांनी अशी भडक, लैंगिक व मारामारी असलेली दृश्ये कमी करावीत. कमीत कमी त्यातून दिला जाणारा अनावश्यक बारीकसारीक तपशील टाळावा. तिकीटविक्रीवर (गल्ल्यावर) लक्ष ठेवून चित्रपट तयार होत असतात आणि हिंसा व लैंगिकता यांच्या एकापेक्षा एक वरचढ दृश्यांमुळे त्यांचे चित्रपट 'हिट' होतात, हे व्यावहारिक सत्य कुणीच नाकारू शकत नाही; पण ज्या समाजात आपण वावरतो, त्या समाजाच्या हितामध्ये आपलाही काही वाटा आहे, हे त्यांनी थोडे तरी लक्षात ठेवावे. केवळ धंदेवाईक दृष्टी ठेवू नये. सामाजिक अन्यायाचे चित्रण करताना उदाहरणार्थ- हुंडा, सासू-सून संघर्ष, कौटुंबिक संघर्ष, मजूर-मालक संघर्ष, पिता-पुत्र संघर्ष इत्यादी पुष्कळदा आवश्यक तपशीलवार चित्रण केले जाते, तर कधी निखळ कलेच्या नावाखालीही लैंगिक चित्रण व त्यामागोमाग मारामारी दाखविली जाते. अशा वेळी ते चित्रण कदाचित कथानकाच्या दृष्टीने उचित असेलही; पण कलेची पुरेशी जाण नसणाऱ्या मुलांना व प्रेक्षकांना त्यातील भडकपणा प्रभावीत करतो. ही समाजाची वृत्ती लक्षात घेऊन अशा चित्रणांना मुरड घालण्याचे धोरण निर्मात्यांनी अनुसरावे.

पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावे, निर्मात्यांनी चित्रपटनिर्मिती करताना मुलांच्या व समाजाच्या मनाचा विचार करावा. या उपायांबरोबर मुलांच्या शालेय पातळीवरच्या शिक्षणामध्येच 'प्रसारमाध्यमे', त्यांचे कार्य, स्वरूप, त्यांच्या मर्यादा इत्यादी माहिती देणारा विषय नेमला जावा. दिवसेंदिवस प्रसारमाध्यमांचे विशेषतः संगणक, दूरदर्शन इत्यादींचे महत्त्व वाढतेच राहणार आहे. त्यांचा सहवास टाळणे कुणालाच शक्य नाही आणि इष्टही नाही. एक प्रकारे ते या मुलांच्या पालकांचे स्थानच घेऊ लागले आहेत. या नव्या पालकांचे सान्निध्य, त्यांना विकासाकडे नेणारे कसे होऊ शकेल, त्यांना नवे विचारविश्व देणारे कसे होऊ शकेल; हे या विषयाद्वारे मुलांच्या मनावर बिंबविता येईल. विशेषत: हे दूरदर्शनवरचे जग व वास्तव जग यांमधील संबंध व अंतर त्यांच्या लक्षात आणून देण्याचे कार्य कुणीतरी करायला पाहिजे. ते जग कल्पनारंजित असते; पुष्कळसे अवास्तव, नकली व फसवे असते; त्यातले सगळेच्या सगळे खरे मानून चालायचे नसते; त्यात खरेखोटेपणाची असलेली भेसळ ओळखून सारतत्त्व समजून घ्यायचे असते; ही समज या वयात कुणीतरी व कोणत्या तरी मार्गाने करून देणे हाच यावरचा उपाय आहे. 
सारांश
नाटक व चित्रपट यांच्यातील हिंसकतेपेक्षा दूरदर्शनमधील हिंसकता घराघरांत पोहोचल्याने दूरदर्शन हे माध्यम अधिक उग्र व वाढत्या वयाच्या संस्कारक्षम पिढीवर विकृत परिणाम करणारे ठरले आहे. प्रेमचित्रणाची शारीरिक दृश्ये, लैंगिकता व त्याच्या पाठोपाठ मारामाऱ्यांची, गुंडगिरीची, वास्तव-अवास्तव वाटणारी क्रूर दृश्येही मुलांच्या कोवळ्या व निरागस मनाला करपवून टाकणारी आहेत. त्यांचे कल्पनात्मक, निरागस बालपण तर संपतेच; परंतु बाह्य जगात वावरताना ती भेकड किंवा गुंड प्रवृत्तीची बनतात. शारीरिक शक्ती हीच सर्वश्रेष्ठ असते, ही शिकवण त्यांच्या मनावर ठसते. शिवाय गुंडगिरीचे प्रात्यक्षिकच त्यांच्या अशा दूरदर्शन दृश्यांमधून मिळते. याला आळा कसा बसेल याचा विचार तातडीने व्हायला पाहिजे. आज दूरदर्शनने माणसाचे जीवनच व्यापून टाकले आहे. त्याचे विधायक स्वरूपाच्या कार्यक्रमांकडे लक्ष वेधले जाण्याचा प्रयत्न व्हावा. पालकांचा कमी सहवास, विभक्त कुटुंबव्यवस्था यामुळे मुलांचे एकटेपण अशा हिंसक दृश्यांकडे अधिक वळते; म्हणून पालकांनी मुलांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा व त्यांच्याबरोबर दूरदर्शन पाहण्याचा प्रघात ठेवावा. तसेच वाहिन्यांनीही आर्थिक स्पर्धेची अतोनात हाव थोडी कमी करून समाजहिताचा विचार करावा व नैतिकतेचे बंधन, आपण एक सामाजिक संस्था आहोत हे लक्षात ठेवून पाळावे. अर्थात ही सामाजिक, नैतिक बंधन पाळण्याची दृष्टी सर्वच सामाजिक संस्थांनी बाळगायला पाहिजे. तिचा तर सर्वच ठिकाणी अभाव दिसून येतो. त्यासाठी वाहिन्यांवर कायद्याची काही बंधने घालता आली तर त्यामुळे हिंसकतेला व लैंगिकतेला थोडा तरी आळा बसेल. तसेच कलावंतांच्या कलेपेक्षा त्यांच्या व्यसनांच्या चित्रणाकडे दिले जाणारे लक्षही कमी व्हायला पाहिजे. अध:पतनाकडे वळण्याची समाजाची प्रवृत्ती त्यामुळे व्यसनाधीनतेकडे खेचली जाते. तिथे कुमारवयाचा काय पाड लागणार! चंगळवादी प्रवृत्तींची वाढ त्यामुळेच होते. मेहनत करण्याची प्रवृत्ती नाहीशी होऊन थोड्याशा विरोधाने ही मुले निराश होतात. त्यांचे हे बिघडलेले मानसिक संतुलन सावरायचे असेल तर अशा दृश्यांवर बंदी घालणे, चित्रपटांतून ती दृश्ये बाद करणे, तशी दृश्ये कथानकाशी. निगडित असली तरी त्यावर सगळ्यांसाठीच बंदी घालणे, त्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या आधारे समाजातील विचारवंतांच्या मनाला कार्यप्रवण करणे इत्यादी काही उपाय केले जातात. पण मुख्य म्हणजे समाजालाच याची तीव्रतेने जाणीव व्हायला पाहिजे व वाहिन्या, चित्रपटवितरक इत्यादींची केवळ आर्थिकतेवर असलेली ही दृष्टी बदलायला पाहिजे. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. संपूर्ण सामाजिक जागृतीशिवाय यावर प्रभावी व निदान परिणामाची तीव्रता कमी करणारा उपाय नाही; आणि सध्या तरी समाज केवळ प्रवाहपतितासारखा वागताना दिसत आहे.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: