Friday, 2 August 2019

वर्तमानपत्रे बंद झाली तर निबंध मराठी - Vartaman Patra Band Zali Tar Marathi Nibandh

वर्तमानपत्रे बंद झाली तर निबंध मराठी - Vartaman Patra Band Zali Tar Marathi Nibandh

रोज सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्र सर्वात आधी वाचण्यावरून माझी आणि ताईची नेहमीच भांडणे होतात. आज सकाळी हीच भांडणे ऐकून आई रागानेच उद्गारली. “घरात शांतता राहील का?, सकाळची ही वर्तमानपत्रे कायमची बंद झाली तर बरेच होईल !

आईने म्हटल्याप्रमाणे, वर्तमानपत्रे खरेच बंद पडली तर?  तर काय होईल? बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र सुरू केले, त्याचे अगदी रास्त नाव ठेवले होते दर्पण 'दपर्ण' म्हणजे 'आरसा'. वर्तमानपत्र हा समाजजीवनाचा आरसा असतो. समाजात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शासकीय अशा विविध पातळीवर जे जे घडते, त्याचे पडसाद वर्तमानपत्रात उमटतात. वर्तमानपत्रे नसती तर हे कसे शक्य झाले असते?
वर्तमानपत्रे बंद पडली, तर सामान्य माणसाची सगळी सकाळच निरसवाणी जाईल. कारण सकाळी गरम गरम चहाच्या घोटासोबत वर्तमानपत्रातील विविध सदरातील बातम्या वाचण्याची मौज काही वेगळीच असते. वर्तमानपत्राच्या अभावी वाचकांना देशविदेशातील चांगल्या-वाईट घटना, घडामोडी कशा कळतील? सरकारी योजना लोकांपर्यंत कशा पोहचतील? एकाच घटना प्रसंगावर आपल्या विविध समाजबांधवांचे वेगवेगळे विचार वर्तमानपत्रातून समजून घेता येतात.
वर्तमानपत्रांनी मानवाच्या सर्वच अंगाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. वृत्तपत्र हे प्रबोधनाचे एक प्रभावी साधन आहे, हे आपल्याकडील विचारवंतांनी सिद्ध केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या 'मराठा', 'केसरी' वर्तमानपत्रांनी सामान्य लोकांत राष्ट्रीय एकात्मतेची भावना जोपासण्यास मदत केली. समाजात नव्या-चांगल्या विचारांची पेरणी करण्यास किंवा जुन्या रुढीवर टिका करण्यास राजाराम मोहनरॉय, जोतीराव फुले यांसारख्या समाजसुधारकांनी वर्तमानपत्रांचा आधार घेतला.

वर्तमानपत्रे वैयक्तिक आयुष्य सुखकर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. नवे ज्ञान, विज्ञान, शोध, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शासकीय स्तरावरील घडमोडी, चित्रपटसृष्टीतील बातम्या, नव्या ग्रंथांची ओळख आपणास वर्तमानपत्रातूनच होते. जागा विकणे-खरेदी करण्याचा व्यवहार कळतो. नोकरीसाठी रिकाम्या पदांची माहिती कळते. क्रीडाप्रेमींसाठीही भरपूर माहिती यात असते, तसेच नाटक-सिनेमा व इतर कार्यक्रमांच्या जाहिरातीही वर्तमानपत्रातून कळतात. वर्तमानपत्रे बंद झाली, तर या सर्व गोष्टी सामान्य माणसांपर्यंत कशा पोहोचणार?
थोडक्यात, वर्तमानपत्र हे करमणुकीबरोबर लोकशिक्षणाचेही माध्यम आहे. या वर्तमानपत्रांमुळे जग लहान झाले आहे. अशी ही मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणारी वर्तमानपत्रे बंद झाली तर शिक्षणाचे एक मोठे साधनच नाहीसे होईल व समाजाची प्रगतीच खुंटेल.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: