Tuesday, 3 November 2020

Marathi Essay on "Neighbourhood", "शेजार धर्म मराठी निबंध for Students

Essay on Neighbourhood in Marathi Language: In this article "शेजार धर्म मराठी निबंध", "शेजार धर्माचे महत्त्व मराठी माहिती" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Neighbourhood", "शेजार धर्म मराठी निबंध for Students

प्रथितयश साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांच्या एका कादंबरीतील एक व्यक्तिरेखा प्रश्न विचारते, “देव तारी त्याला कोण मारी?" त्याचे उत्तर त्याला मिळते, 'शेजारी!' बरोबरच आहे. आपण शहरांतील माणसे ! नातेवाइकांपेक्षाही आपल्या घराला लागून असलेल्या शेजारच्या कुटुंबावर आपण अधिक अवलंबून असतो; म्हणून तर चांगला शेजार मिळण्यासाठी देवाची व दैवाची कृपा असावी लागते, असे म्हणतात. यातला थट्टेचा भाग वगळला तरी शेजारधर्म पाळणारा, माणूसधर्माची जाणीव ठेवणारा आणि आपण चुकलो तरी वेळप्रसंगी मदतीचा हात पुढे करणारा शेजारी ज्याला मिळाला आहे, त्याचे पूर्वजन्मीचे भाग्यच उदयाला आले असे म्हणायला हरकत नाही. आयुष्यात खरा मित्र मिळायला भाग्य लागते. तसेच भाग्य किंबहुना त्यापेक्षा अधिक भाग्य उजळते. ते असा सच्चा मित्र आपला शेजारी म्हणून आपल्या घराला लागून असलेल्या घरात राहायला येतो तेव्हा. चांगली माणसेसुद्धा अतिपरिचयाने एकमेकांशी शत्रुत्वाने वागू लागतात. एकमेकांच्या जवळ येणारी माणसेसुद्धा पुष्कळदा दुसऱ्यांचे दोषच प्रथम लक्षात घेतात आणि या दोषांचा फायदा घेऊन त्यांना आपल्या मताप्रमाणे वागायला लावतात. पण सगळीच माणसे अशी नसतात. 'एकमेकां साह्य करू । अवघे धरू सुपंथ।' अशी सुवर्तनी माणसेही जगात कमी नसतात. अशा माणसांचा शेजार लाभला तर ती आपल्या सुखामध्ये सहभागी होऊन आपल्या सुखाने सुखावतात आणि आपल्या दुःखामध्ये किंवा संकटामध्ये मदत करून धीर देतात; जगण्याचे बळ देतात; निदान आपल्यावरच्या दुःखाने आनंदित होत नाहीत; आपल्या दुःखामध्ये आणखी भर कशी पडेल याची खटपट करीत नाहीत किंवा आपल्या घराच्या चार भिंतींमधील आपले खासगी आयुष्य भिंतीला कान लावून ऐकून चार लोकांत आपले हसे कसे करता येईल, यामध्ये रंगून जात नाहीत; कारण घराला लागून घरे असतात. भिंतीचा पातळ पडदा मध्ये असला तरी त्यामधून अनेक वैयक्तिक जीवनांचे धागेदोरे एकमेकांना न बोलता परिचित असतात. कुणाचे लग्न कुणाशी ठरले आहे, कुणाच्या लग्नाची बोलणी करण्यात हुंडा, पत्रिका, श्रीमंती व गैरवर्तन आड येत आहे, कुणाला वरचे अधिकारपद थोड्याच काळामध्ये मिळणार आहे, कुणाची मुले कोणत्या परीक्षांचा अभ्यास किती व कसा करीत आहेत, एकमेकांशी गॅलरीतल्या गप्पांमधून या गोष्टी कळत असतात. पण त्यांचे भांडवल करून चाळभर किंवा आजूबाजूच्या घरांना, त्याची कुचेष्टा करण्याच्या उद्देशाने माहिती पुरविणारे शेजारी ज्याला मिळतात, त्याच्या मनस्तापाला पारावार राहत नाही. 

एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या मित्रावरून करता येते, असे म्हणतात. त्या धर्तीवर असेही म्हणता येईल की, एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या सभोवतालच्या माणसांशी ती कशी वागते व ती त्याच्याशी कशी वागतात, यावरून करता येते. 'निंदकाचे घर असावे शेजारी ।' अशी मागणी तुकाराममहाराजांसारख्या संतकोटीला पोहोचलेल्या साधुपुरुषाला परवडणारी आहे. तुमच्या-आमच्यासारख्या संसारी, कुटुंबवत्सल, नोकरदार पेशाच्या माणसांना परवडणारी नाही; कारण आपली वागण्याची पद्धती चांगल्याशी चांगुलपणाची व वाईटांशी घाबरून वागण्याची असते. शेजाऱ्यांनी आपली निंदा केली तर आपल्याला ती खरी असूनही राग येतो. म्हणूनच आपल्या गुणदोषांसकट, आपले गुणदोष लक्षात घेऊनही जो आपल्याशी मैत्रीचे संबंध ठेवतो, आपल्याशी कमीत कमी, शेजारधर्म पाळण्यासाठी तरी प्रयत्न करतो, तो आपल्याला चांगला शेजारी वाटतो. नातेसंबंध, मैत्रीचे बंधन, आतिथ्यधर्म, तसाच आजच्या काळातील महत्त्वाचा संबंध 'शेजारधर्म' या शब्दातून व्यक्त होतो.

प्राण्यांचे कळप असतात. प्राणीसुद्धा कळप करून राहतात. पण माणसांचा मात्र समाज असतो. कदाचित कळप करून राहण्याने प्राण्याला संरक्षण मिळत असेल. समाजात राहण्याने माणसाला संरक्षण तर मिळतेच, तो हेतू तर असतोच; पण केवळ संरक्षण एवढाच हेतू नसतो. समाजात राहण्याने कामाची विभागणी झालेली असते. स्वतः कापड न विणता, कुणीतरी विणलेले कापड, त्याचे कुणीतरी तयार केलेले कपडे आपण वापरू शकतो. शेती करणारा एक समुदाय आपली अन्नाची गरज भागवीत असतो. ही कामाची विभागणी समाजात होत असते. आपल्या अंगच्या अनेक गुणांचे कौतुक समाजात होत असते. शेजारी हा अशा विभागणीने कामे करणारा घटक असतो, प्रतिनिधी असतो. आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांवरून आपण समाजाबद्दल चांगलेवाईट मत बनवीत असतो. आपली त्यांच्याशी सतत देवाणघेवाण चालत असते. केवळ वस्तूंचीच नाही तर विचारांची, कल्पनांची, जगण्याबद्दलच्या समजांची देवाणघेवाण आपण शेजारच्या व्यक्तींशी करीत असतो. त्यामधून आपली मते व विचार यांची जडणघडण व्हायला मदत होत असते. आजच्या वाढत्या शहरीकरणाने, गतिमान असलेल्या, धावपळीच्या जीवनव्यवहारांमध्ये अनेक छोट्यामोठ्या बाबींमध्ये आपण शेजाऱ्यावर, शेजारी आपल्यावर, अवलंबून असतात. कॉलनीत असलेली गाडी ठेवण्याची जागा, कचरा टाकण्याची सोय, पाणी, वीज, विजेवरचे पाळणे, सगळ्यांमध्ये एकमेकांची व सगळ्यांचीच सोय पाहिली जावी, अशी बि-हाडकरूंची व राहणाऱ्यांची अपेक्षा असते. एखाद्या नव्या सोयीसाठी सगळेजण पैसे द्यायला तयार असणे आवश्यक असते. एकमेकांच्या घरातील पाण्याचे आवाजसुद्धा एकमेकांना ऐकायला यावेत एवढी जवळीक असलेल्या घरांमध्ये आकाशवाणी किंवा दरदर्शन यांचे कार्यक्रम एकमेकांना त्रासदायक व्हायला कारणीभूत होऊ शकतात; म्हणूनच व्यक्तिस्वातंत्र्य व समाजहित यांचे भान सांभाळून वागणारे शेजारी आपले मित्र होऊ शकतात. याची जाणीव नसलेले, जाणीव असूनही पर्वा न करणारे किंवा शेजाऱ्यांना त्रास कसा होईल, त्याच त-हेने वागणारे शेजारी म्हणजे आपल्या आयुष्यातील सुखाच्या क्षणांवर विरजणच होय.

अगदी साध्या-साध्या प्रसंगांमध्ये तुम्ही शेजारच्या कुटुंबाची मदत घेत असता. तुमच्या घरातला दूरध्वनी बिघडला असेल तर तुम्ही शेजारच्या माणसाच्या दूरध्वनीचा वापर करता. एखाद्या ठिकाणी तुम्ही नव्याने राहायला गेलात तर शेजाऱ्यांचा दूधवाला, भाजीवाला यांच्याकडून तुम्ही त्या वस्तू दररोजसाठी ठरवून रतीब लावून घेऊ शकता. अशा साध्या प्रसंगापेक्षाही एखादा फेरीवाला, फेरीच्या निमित्ताने तुमच्या घरात घुसू पाहत असेल तर शेजारच्या माणसांचे साहाय्य तुम्हाला संरक्षण देऊ शकते. मुंबईसारख्या ठिकाणी दंगलीच्या वेळी, चाळीमध्ये घराघरांतील व्यक्ती आळीपाळीने रात्री पहारा करीत असत. एकमेकांना आपुलकीने, जिव्हाळ्याने तर कधी गरज म्हणून हक्काने मदतीची हाक मारण्याचे स्थान म्हणून शेजारी उपयोगी पडत असतात. जेव्हा आपल्याला काही दिवसांसाठी परगावी जायचे असेल तेव्हा घराकडे लक्ष ठेवायची जबाबदारी आपण शेजाऱ्यावर सोपवू शकतो; घराची किल्लीही त्याच्या हवाली करू शकतो. आपल्या घरातील वस्तूंचा तो गैरवाजवी वापर करणार नाही याची आपल्याला खात्री असते. घरातल्या अडीअडचणीला धावून येण्याची वृत्ती शेजारधर्मामध्ये गृहीत असते. अर्थातच, असे चांगले शेजारी आपल्याशी चांगलेपणाने वागतात की नाही, हे आपल्याही वागण्यावर अवलंबून असते. आपल्यालाही वेळप्रसंगी आपल्या हातातील कामे बाजूला ठेवून त्यांच्या साहाय्याला धावून जाता आले पाहिजे. एक प्रकारे यामध्ये आपल्या वागण्याची प्रतिक्रिया व देवाणघेवाणीची जाणीव जास्त प्रमाणात असते.

कधी कधी अशा काही भावना असतात, घटना असतात की घरातल्या माणसांशी आपण त्या मोकळेपणाने बोलू शकत नाही; पण मनाची होणारी ही घुसमट, शेजाऱ्याशी बोलून दूर करता येते. असे शेजारी ती गोष्ट ऐकून घेतात; त्याला योग्य तो प्रतिसादही देतात आणि ती गोष्ट षट्कर्णी न करता आपला विश्वास संपादन करतात. असे खासगीपण वयानुसार असते. दोन समान वयाच्या व्यक्ती मग त्या प्रौढ असतील, तरुण असतील, सुना असतील किंवा सासवा असतील, त्यांच्या समान पातळीवरच्या व्यथा व कथा त्या एकमेकींशी बोलून मने मोकळी करीत असतात. शेजारधर्म अशा वेळी उपयोगी पडतो. पण आपले महत्त्व वाढविण्याची ही संधी समजणारे संधिसाधू शेजारी याचा उपयोग जेव्हा कागाळ्या करून घरामध्ये दुही पसरवू पाहतात, तेव्हा ते शेजारधर्म पाळत नाहीत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. 

घराघरांतील वादावादी, विसंवाद, मतभेद हे चांगल्या शेजारामुळे नाहीसे होऊ शकतात. त्यांना अटकाव बसू शकतो. शेजाऱ्यांसह साजरे होणारे अनेक सणांचे प्रसंग, सहली, एकत्रितपणे होणारी स्नेहभोजने, कुणाच्या तरी दिवाणखान्यात बसून एकत्रितपणे पाहिलेले दूरदर्शनवरील खास चांगले चित्रपट, अशा सहवासाने हे मैत्रीचे स्नेहसंबंध नातलगांच्या स्नेहबंधनापेक्षाही अधिक बळकट होऊ शकतातमक. आपल्या जीवनातील पोकळी भरून काढण्याचे कार्य अशा शेजाऱ्यांमुळे होऊ शकते.

आजच्या विभक्त कुटुंबांमध्ये ही गरज आणखी एका गोष्टीसाठी आवश्यक ठरते. आपल्या घरातली मुले शेजारच्या घरातल्या मुलांबरोबर त्यांच्या लहानपणापासून एकत्र वावरत असतात. त्यांच्यामध्ये निर्माण जैं शकते. पुढची पिढी सुसंस्कारित करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे; पण त्यासाठी आर्थिक स्थिती व संस्कार यांच्या दृष्टीने समान असलेल्या कुटुंबाच्या शेजाराची अपेक्षा असते. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये लहान मुलांना एकटेपण जाणवण्याचा प्रश्नच उद्भवत नसे. आज ती गरज शेजारचे कुटुंब भरून काढू शकते.

नोकरीच्या निमित्ताने सतत बदली होणाऱ्या नोकरदारांचा शेजार तर सारखा बदलता असू शकतो. पुष्कळदा त्यांना मिळेल त्या वस्तीमध्ये जमवून घ्यावे लागते. अशा वेळी, पुरुषमंडळी आपापल्या व्यवसायामध्ये गुंतलेली असतात. घरातल्या महिलांना एकमेकींच्या मदतीची गरज असते. अशा वेळी आपल्या स्वभावाने शेजारच्या महिलांना आपलेसे करण्याची चतुराई महिलांजवळ हवी. शिवाय केवळ आपल्या आर्थिक सुबत्तेची मिजास न बाळगता किंवा आपल्या अधिकाराचा गर्व न करता, सगळ्यांशी गोडीने व साहचर्याच्या भावनेने वागण्याने शेजाऱ्यांना चांगले वागायला प्रवृत्त करता येते. 'टाळी एका हाताने वाजत नसते' हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपले त्यांच्याशी वर्तन कसे आहे, कसे ठेवावे म्हणजे ते आपल्याशी नीट वागतील हे पुष्कळदा आपण विसरतो. काही वेळा आपण आपल्या कामामध्ये व व्यवसायामध्ये इतके गुंतलेले असतो की, आपल्या शेजारी राहणारे कोण आहेत, त्यांचे व्यवसाय काय, त्यांची मुलेबाळे काय करतात याची काडीइतकी माहिती आपल्याला नसते. ती करून घ्यावी हे भानही आपल्याला येत नाही. अशा वेळी आपण घमेंडखोर, स्वत:मध्येच रमलेले व शेजाऱ्यांना तुच्छ मानणारे आहोत, असा शेजाऱ्यांचा समज झाला तर त्याला जबाबदार आपणच असतो; आणि मग आपल्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा त्यांची मदत त्यांनी दिली नाही तर आपण त्यांना दोष देणे चूक आहे.

शेजाऱ्यांमध्ये मिसळणे, त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे, त्यांच्या आवडीनिवडी समजून घेणे, आपल्या आवडीनिवडी त्यांना माहिती करून देणे यातूनच सामूहिक जीवनाचा आनंद मिळत असतो. एकमेकांना आवडत असलेल्या बौद्धिक पातळीवरच्या चर्चा, राजकारणावरचे विचारप्रदर्शन, संगीत, नाट्य, साहित्य यांचे सादरीकरण यांमुळे एकमेकांच्या जवळ येण्याला मदतच होत असते. सर्वस्वी चांगला कुणीच नसतो आणि कुणाचीही कधीच मदत लागत नाही असाही कुणी नसतो. हे लक्षात घेऊन वागणारे समजूतदार शेजारी, स्वत:ही आनंद मिळवितात आणि आपल्या वागण्याने इतरांनाही आनंदी ठेवतात. एकमेकांच्या कलांचे कौतुक करणे, त्यांना उत्तेजन देणे, स्पर्धात्मक चढाओढी ठेवून त्यांचा विकास साधणे या गोष्टी शेजारीच करू शकतात.

पूर्वीच्या काळी सामान्यतः समान जातींचे लोक एकमेकांच्या शेजारी राहत असत. ब्राह्मण आळी, सोनार आळी, सुतार आळी अशा समान जातिबांधवांचा व एकाच प्रकारच्या व्यावसायिकांचा शेजार प्रत्येक घराला मिळत असे. तेव्हा शेजारापेक्षाही नातलगांची मदत अधिक मिळू शकत होती; पण शहरीकरण झाले आणि वेगवेगळ्या प्रदेशांतील, विविध प्रांतीय लोक नोकरी-व्यवसायामुळे शहरात आले. आर्थिक दृष्टीने परवडणारी व नोकरी, शाळा इत्यादींसाठी सोयीची ठरणारी जागा त्यांना राहण्यासाठी निवडावी लागे; त्यामुळे चाळ संस्कृती विकसित झाली. विविध धर्माचे व विविध व्यवसाय करणारे पण आर्थिक पातळीवर फारसा फरक नसलेले शेजारी एकमेकांच्या जवळ राहायला लागले; त्यामुळे सामूहिक दृष्टीने या चाळ-संस्कृतीला व नंतरच्या सदनिका-संस्कृतीला आंतरभारतीय स्वरूप प्राप्त झाले. पुष्कळदा त्यामधून एकमेकांचे सणवार साजरे करण्याची वृत्ती वाढली व प्रत्येक चाळ-गट, सदनिका-गट हा एक सामूहिक एकात्म समाज तयार होऊ लागला. मुंबईसारख्या शहरामध्ये तर गणेशोत्सव, नवरात्री, गोकुळाष्टमी, दीपावली असे अनेक सण सहकार्याने अतिशय उत्साहाने साजरे होऊ लागले; आणि त्यांमधून एकमेकांच्या गुणदोषांची ओळखही होऊ लागली. एकत्र राहण्याची ‘सहनौभुनक्तु ।' गरज लक्षात घेतली गेली. शेजारधर्माला पोषक असे वातावरण यातून निर्माण होऊ लागले.

चाळसंस्कृतीतला मोकळेपणा व एकमेकांच्या साहचर्याची घनिष्ठता सदनिका-संस्कृतीत थोडी रोडावली, कमी झाली. सदनिकेची दारे माणसाच्या शेजारधर्माच्या मोकळेपणाला थोडीफार बंधने घालू लागली. घराघरांतील दूरध्वनीवरचा संपर्क वाढला. चार सदनिका सोडून असलेल्या व्यक्तीशीही संपर्क ठेवताना दूरध्वनी जवळ केला जाऊ लागला. पण तरीही माणसांचे शेजारधर्म म्हणून असलेले संबंध व नाते त्या पातळीवरही जोपासले गेले; कारण ती परिस्थितीने निर्माण केलेली गरज होती.

शेजारधर्माची आवश्यकता बंगलेवाल्यांनाही आहे आणि झोपडपट्टीतील गोरगरिबांनाही आहे. केवळ संरक्षणाच्या दृष्टीनेच नाही, केवळ मदतीच्या हेतूनेच नव्हे, तर त्यांची त्यांची सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक पातळीवरची देवाणघेवाण शेजारधर्माने भागविली जाते. म्हणून त्यांच्यामध्ये मतभेद झाले तरी कोणीतरी म्होरक्या, कोणीतरी वयस्कर व्यक्ती सामंजस्याचे वातावरण निर्माण करीत हा शेजारधर्म जागता ठेवीत असते. आजही अनेक ठिकाणी आर्थिक दृष्टीने समपातळीवर असलेल्या व्यक्तीच एकमेकांचा शेजार स्वीकारतात. तसेच समान व्यावसायिकांच्या वसाहती उभ्या राहताना दिसतात. प्राध्यापक, शिक्षक, एखाद्या संस्थेतील नोकरदार मंडळी यांच्या वसाहतीही उभ्या राहत आहेत. त्यांच्या शेजारधर्मामध्ये तर व्यावसायिक निष्ठाही जपण्याची वृत्ती व्यक्त होत असते. मुंबईसारख्या अवाढव्य वाढत चाललेल्या शहरात तर सदनिकांच्या पायथ्याशी झोपडपट्टीचा विकास झालेला असतो. या झोपडपट्टीतील पुरुष-स्त्रिया-मुले सदनिकांमध्ये धुणीभांडी इत्यादी घरकामे करण्यासाठी जात असतात. त्या दृष्टीने आर्थिक पातळीवरच्या दोन थरांमध्येही असलेली ही नाती जपणे दोघांनाही गरजेचे ठरत आहे. 

व्यक्तीचा विकास कुटुंबामध्ये होत असतो. कुटुंबाचा विकास तो जिथे राहतो त्या परिसराशी संबंधित असतो. अशा परिसरांमधूनच समाज व विविध समाजिक संस्था कार्यरत होत असतात. या परिसराचा विकास शेजारधर्माशी संबंधित आहे, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. 

सारांश

शहरी वातावरणात नातेवाइकांपेक्षा शेजारी अधिक उपयुक्त असतो व महत्त्वाचा ठरतो. जीवनातील सर्व प्रकारच्या सुखदुःखांमध्ये 'शेजारधर्म' हा आज महत्त्वाचा ठरतो. आंतरभारतीय पातळी शेजारधर्माने साधली जाते. मात्र आपणही शेजारधर्माचे अनुसरण करणे आवश्यक असते. शेजारधर्म पाळणे हे सामूहिक जीवनघडणीला पोषक असते.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: