Wednesday, 28 October 2020

Marathi Essay on "Secularism in India", "धर्मनिरपेक्षता आणि भारतीय राज्यघटना मराठी निबंध" Dharmnirpekshta Marathi Nibandh for Students

Essay on Secularism in India in Marathi Language: In this article "धर्मनिरपेक्षता आणि भारतीय राज्यघटना मराठी निबंध", "Dharmnirpekshta Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Secularism in India", "धर्मनिरपेक्षता आणि भारतीय राज्यघटना मराठी निबंध" Dharmnirpekshta Marathi Nibandh for Students

प्रत्येक देशाला कोणता ना कोणता धर्म असतो. आज जगाचे चित्र पाहिले तर काही देश मुस्लिम धर्माचा स्वीकार करणारे तर काही ख्रिश्चन धर्माचा अंगीकार करणारे आहेत. आपल्यावर दीडशे वर्षे सत्ता गाजविणारे ब्रिटनसारखे राज्यही याला अपवाद नाही. त्याचा राजा नामधारी असतो; पण तो प्रॉटेस्टंट पंथाचाच असला पाहिजे, हा त्याचा नियम आहे आणि प्रॉटेस्टंट पंथाचा धर्मगुरू व त्याला राजाने मानणे ही त्यांची धर्मनिष्ठा त्यांनी जतन केली आहे, असे म्हणायला हरकत नाही. इटलीमध्ये कॅथॉलिक पंथाला मान्यता आहे. तुलनेने पाहता प्रॉटेस्टंट पंथ सुधारणावादी आहे; पण कसेही असले तरी त्यांच्या राजसत्तेचे अधिष्ठान धर्माधिष्ठित आहे. स्वतंत्र भारताबरोबर निर्माण झालेल्या स्वतंत्र पाकिस्तानचेही धर्माधिष्ठित स्वरूप स्पष्ट आहे; पण भारताने मात्र धर्मनिरपेक्षतेचा अंगीकार जाणीवपूर्वक व भारतीय संस्कृतीचा व जनतेच्या प्रवृत्तीचा वारसा लक्षात घेऊन केला. भारतासारख्या देशात अनेक धर्मीय, पंथीय, सांप्रदायिक, उपसांप्रदायिक नागरिक असल्याने त्यांच्या त्यांच्या जीवनसरणीला व व्यक्तिस्वातंत्र्याला योग्य ती संधी देण्याचा उद्देश या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणामागे आहे.

धर्मनिरपेक्षता किंवा धर्म या शब्दाचा या ठिकाणचा अर्थ हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा केला जातो. जीवनधारणा करणारा तो धर्म म्हणजेच 'धारयति इति धर्मः।'हा धर्म या शब्दाचा व्यापक अर्थ निधर्मी/धर्मनिरपेक्षता यांमध्ये अध्याहृत नाही. 'धारयति इति धर्मः।' हा व्यापक अर्थ मानवी जीवनाला व्यापून राहिलेला आहे; आणि हा व्यापक पातळीवरचा अर्थ भारतीय नागरिकाला त्याच्या जीवनव्यवहारात अनुसरता यावा यासाठी हिंद, मुस्लिम, ख्रिश्चन, यहुदी, पारशी अशा एक प्रकारे मर्यादित क्षेत्राच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी भारताच्या धर्मनिरपेक्षतेमध्ये सामावलेली आहे. तसेच पाहिले तर अमेरिकाही धर्मनिरपेक्षतेचा अंगीकार करते. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावल्यानंतर त्या प्रदेशात युरोपातील फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, हॉलंड, पोर्तुगाल, स्कॉटलंड अशा अनेक देशांतील अनेक नागरिकांनी वसाहती उभ्या केल्या. त्यांमधूनच अमेरिकेसारखे एक बलाढ्य राष्ट्र उभे राहिले. या अमेरिकेचे ते सर्व नागरिक आहेत. 'एकी' हे त्यांचे बळ आहे; पण तरीही 'आपण मुळात कोणत्या देशातून आलेलो आहोत.' हे त्यांनी स्वतःला विसरू दिलेले नाही; म्हणूनच अमेरिकेचे नागरिक हे धर्मनिरपेक्षता मानतात; पण स्वत:चा मूळचा धर्म त्यांनी सोडलेला नाही. एक प्रकारे मूळ निष्ठा न सोडता त्यांनी अमेरिकत्व स्वीकारलेले असल्याने त्यांची धर्मनिरपेक्षता म्हणजे द्विधर्मनिष्ठा ठरते. त्यांना अमेरिकेचे नागरिक म्हणून सर्वांमध्ये ‘एकी' हवी आहे; पण आपले मूळ धर्म विसरून येणारी 'एकता' संमत नाही. अमेरिकेच्या धर्मनिरपेक्षतेमागे ही वेगळी विचारसरणी आहे.

भारताच्या धर्मनिरपेक्षतेमागील भूमिका यापेक्षा नुसती वेगळी आहे एवढेच म्हणून भागणार नाही, तर तिची जडणघडण भारताच्या प्रचंड व प्राचीनतम इतिहासाच्या संस्कारांतून झालेली आहे. भारताला फार पुरातन परंपरा आहे. अनेक तपांची जतन केलेली संस्कृती आहे. भौगोलिक दृष्टीने फार संपन्न आहे. फार पूर्वीपासून भारताचा अनेक देशांशी व्यापार चालू होता. ग्रीस, इटली यांसारख्या देशांतील व्यापारी व त्यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून भारताने अनेक गोष्टी आपल्या कलेच्या क्षेत्रात स्वीकारलेल्या दिसतात. नालंदा, तक्षशीला ही विद्यापीठे जगभराच्या ज्ञानक्षेत्राची आगारे होती. अनेक पर्यटकांनी येथील परंपरा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविली आहे; हे तेथील देवदेवतांच्या मूर्ती, आचारविचारसरणी यांमधून स्पष्ट होत आहे. बौद्ध धर्मासारखा धर्म इथूनच जगभर प्रसारित झाला. हे सांस्कृतिक धन जतन करणाऱ्या भारतासारख्या देशावर शक, हूण, अहिर इत्यादी अनेक टोळ्यांनी हल्ले केले. आर्य, अनार्य, यक्ष, किन्नर यांसारख्या प्रथम आलेल्या किंवा असलेल्या संस्कृतींशी प्रथमतः संघर्ष करूनही ते येथील संस्कृतीशी मिसळून गेले. भारतीय धर्मकल्पनेतील सहिष्णुतेमुळे हे शक्य झाले. जाती, वर्ण, उपजाती, जमाती असे वर्गीकरण करीत ते भारताचेच होऊन गेले. भारतीयांनीही त्यांना त्यांच्या विशेषत्वासकट भारतीय म्हणून स्वीकारले. भारतीय संस्कृतीची बैठक अशी सहिष्णुतेमुळे आलेल्या मानवतावादी शांततेच्या तत्त्वावर भर देणारी आहे. 'सर्वे ऽ पि सुखिनः सन्तु। ...सर्वे भद्राणि पश्यन्तु।' अशी मूळ धारणा असलेल्या भारतीयांनी विविध पंथीयांच्या व धर्मीयांच्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करीत आपली संस्कृती सतत कात टाकत नित्यनूतन रूपात जतन केली. रोटी-बेटी व्यवहार, एकमेकांचा सहवास, भूमीची सुपीकता यांमुळे विविधतेतून समन्वयाच्या ताकदीवर एकतेचा धागा गुंफला गेला. अनेक वंशांचे लोक इथे आले; कुणी व्यापाराच्या, कोणी संघर्षाच्या, कोणी वसाहतीच्या; पण मूळचे कुठले आणि परके कुठचे हा भेदभाव काळाच्या ओघात लुप्त झाला. (उदाहरणार्थ- भारतातील महार ही जमात सेमिटिक वंशाची आहे, उच्च आहे, व्यापारी आहे असे म्हटले जाते; पण दक्षिण भारतातील जातिव्यवस्थेत ती पूर्णपणे सामावून गेली.) जैन, बौद्ध, यहुदी, पारशी यांसारखे अनेक धर्मांचे निष्ठावंत उपासक आपले आचार-विचारांचे वेगळेपण ठेवूनही भारतीय बनले आणि त्यातूनच भारतीय संस्कृतीचे एक वेगळे, एकात्म स्वरूप आज साकारले गेले. आजच्या हिंदू धर्मामध्ये याचे दर्शन घडू शकते. भारतामधील धर्मभावनांत संघर्ष झालेले असूनही ही समन्वयाची, सहिष्णुतेची वृत्ती देशात खचितच प्रभावी आहे.

बेचाळिसावी घटनादुरुस्ती १९७६ अन्वये भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये 'धर्मनिरपेक्ष' व 'समाजवादी' हे दोन शब्द नव्याने अंतर्भूत केले गेले असले तरी, धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व हा प्रारंभापासूनच भारतीय घटनेचा व भारतीय राज्याचा मूलाधार होता. धर्मनिरपेक्षता हा भारतीय घटनेचा आत्माच असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही सन १९७३ मध्ये एका संदर्भात नमूद केले होते. खरे तर, भारतीय राज्यातील धर्मनिरपेक्षतेला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लाभला होता.

भारतीय ऐक्याची कल्पना पुरातन असली तरी आर्य-चाणक्यासारख्या राजनीतिज्ञाने त्याचा प्रभावीपणे पुरस्कार केला म्हणून तर चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे साम्राज्य झाले. “आपण कोणत्याही धर्माचे असलो, कोणत्याही धर्मामध्ये आपला जन्म झालेला असला, तरी आपण भारताचे नागरिक आहोत, भारत हा आपला देश आहे" ही जाणीव प्रभावी झालेली असल्याने म्हणजेच धर्मापेक्षा जन्मभूमीला महत्त्व देण्याची प्रवृत्ती प्रभावी असल्याने धर्मनिरपेक्षतेचे बाळकडू भारतीयांच्या वृत्तीमध्ये अंगभूतपणे आहे असे म्हणावे लागते. आमच्यामध्ये धर्माची विविधता आहे; देवांची विविधता आहे; पंथांची व संप्रदायांची विविधता आहे; आचारांची व विचारांचीही विविधता तर आहेच; पण विविधतेमुळे फुटीरता बळावू न देण्याचे संस्कार वेळोवेळी उदयास आलेल्या विचारवंतांनी व समाजचिंतकांनी भारतीयांच्या मनावर रुजविले असल्याने ही विविधता एकतेचे बळ देऊ शकली.

धर्मनिरपेक्षतेमध्ये सर्व धर्मांना समान मानण्याची आदरभावना आहे. एक धर्म श्रेष्ठ किंवा दुसरा कनिष्ठ किंवा त्याज्य ही वृत्ती धर्मनिरपेक्षतेला संमत नाही. सर्वधर्मसमभाव या कल्पनेमध्ये सर्वधर्मीयांना भारताचे नागरिक म्हणून समान हक्क असण्यावर, समान समजण्यावर भर आहे. लोकशाहीवर विश्वास असलेल्या व लोकसत्ताक राज्यपद्धतीचा अवलंब करणाऱ्या या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व प्रत्यक्ष कार्यवाहीत उतरलेले दिसून आल्याशिवाय राहत नाही. साध्या सरकारी सुट्यांकडे पाहिले तरी दिवाळी, गणपती या हिंदू सणांच्या जोडीला पतेती, ईद, मोहरम, गुडफ्रायडे, नाताळ या विविध धर्मांतील सणांचाही समावेश केलेला आहे; त्यामुळे कोणत्या ना कोणत्या सणाच्या स्वागतामध्ये भारतातील शहरे-खेडी रंगलेली असतात. भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे, असे म्हटले जाते; पण अशा विविध धर्मांच्या सणा-व्रतांच्या समारंभांमुळे समाज एकत्र येतो व विविध धर्मांमध्ये एकसंधता येण्याला साहाय्य होते हे विसरता येत नाही. अशी एकसंधता सातत्याने साधण्याची गरज ब्रिटनसारख्या एकधर्मीय देशांना नाही; म्हणून त्यांना भारतीयांची उत्सवप्रियता दोषास्पद वाटते; पण सांस्कृतिक सहजीवनासाठी व परस्परांतील ऐक्यभाव वृद्धिंगत होण्यासाठी त्याची भारतासारख्या बहुधर्मी व बहुव्यापी देशाला गरज असते. भारतासारख्या राष्ट्रामध्ये चर्च, मशिदी व मंदिरे शेजारी शेजारी असतात, हे याच सामंजस्याचे दर्शन घडविणारे आहे. खेडेगावात तर एखाद्या घरातल्या, लग्नासारख्या कार्यात सर्व गाव आपला धर्म-जातीचा भाग विसरून सामील झालेला असतो.

ही समानता सर्व क्षेत्रांत कार्यवाहीत आणण्यामध्ये भारताने माघार घेतलेली नाही हे भारताच्या राष्ट्र पतिपदावरील, राज्यपालपदावरील, न्यायाधीशांच्या नेमणुकीमधील नुसती यादी पाहिली तरी कळून येण्यासारखे आहे. क्रीडाक्षेत्र, नाट्य-चित्रपट क्षेत्र, साहित्य दालन, चित्रकला इत्यादी सर्व क्षेत्रांतील समानता व सर्व प्रकारच्या कलांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. तुमचा धर्म कोणताही असो, समान संधी देण्यात ही धर्मनिरपेक्षता आघाडीवर राहिलेली आहे. पुराणवस्तू जतन करण्यामध्येही अजिंठा, वेरूळ, देवालये यांच्याबरोबरच ताजमहाल, कुतुबमिनार यांचेही जतन केले जाते. रोजच्या जीवन-व्यवहारामध्ये तुमच्या-तुमच्या उपासना, पूजा-अर्चा, श्रद्धा यांबाबतचे पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. या दृष्टीने प्रत्येकाला एकमेकांच्या विरोधात जाण्याचे कारण राहू नये म्हणून ‘समान नागरी कायदा' आणण्याचा प्रयत्न झाला. सर्वांना समान वागणूक, समान कायदा लागू करण्यामागे हीच सर्वधर्मसमभावाची जाणीव प्रभावी होती; पण मुस्लिमांकडून याच तत्त्वाला विरोध झाल्याने डॉ. आंबेडकरांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुस्लिमांचा या समान नागरी कायद्याला विरोध आहे. विशेषतः लग्न, घटस्फोट, पोटगी यांसारख्या संघर्षांमध्ये समता असणे हे समाजव्यवहाराच्या दृष्टीने योग्य आहे; पण अशा वेळी अनेक प्रकरणांत राजकारणी खेळीमधून प्रत्यक्ष घटनादुरुस्ती केली जाते. घटनासंमती बहुसंख्यांच्या मतांवर अवलंबून असते; म्हणूनच १९५० ते १९७२ या बावीस वर्षांच्या कालखंडात फक्त अठरा घटनादुरुस्त्या केल्या गेल्या. याउलट, सन १९७२ ते १९७७ या अवघ्या पाच वर्षांच्या कालखंडात जवळजवळ पन्नास वेळा घटनादुरुस्त्या करण्यात आल्या. घटनेत लवचिकता पाहिजे; पण या लवचिकतेचा कधी कधी गैरफायदा घेतला जातो, त्याचे हे प्रतीक होय!

आज धर्मनिरपेक्षता म्हणजे अल्पसंख्याकांचे कुरण होत चालले आहे, असे म्हटले जाते. एकीकडे धर्मनिरपेक्षता म्हणायची व व्यवहारात मात्र अल्पसंख्यांच्या मतासाठी मूळ तत्त्वाशी तडजोड करायची. यामुळे बहुसंख्यांवर होणारा अन्याय प्रक्षोभाचा विषय होऊ शकतो; पण हा दोष कार्यवाहीचा आहे; मूळ तत्त्वाचा नव्हे. मूळ तत्त्व कार्यवाहीत आणताना त्याचा उद्देश विसरला जात नाही ना, याची पुरेशी काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला पाहिजे व त्यावर अंकुश ठेवण्याचे काम मतदारांचे व विरोधी राजकीय पक्षांचे असते. त्यासाठी समाजात वैचारिक जागृती असणे आवश्यक असते. घडणाऱ्या राजकीय वातावरणाचा अन्वयार्थ त्याला कळला पाहिजे; उलगडता आला पाहिजे. त्यासाठी विचलित न होता निर्भयपणे आपले मत जाहीर करणे, मतदानाचा अधिकार बजावणे यासाठी समाजातच निर्भय वातावरण असायला पाहिजे; पण भारतासारख्या अवाढव्य देशात अज्ञान व दारिद्र्य यांसारख्या मूलभूत समस्यांनी जागतीला सतत ग्रहण लागत असते. हे अज्ञान नसत्या शिक्षणसविधांनी व शिक्षण घेतल्याने दर होणारे नसते तर त्यासाठी सांस्कृतिक जागरणाची गरज असते. असे जागरण करणारी संस्था समाजाला लोकशाही व तिची बैठक ज्या धर्मनिरपेक्षतेवर आधारलेली आहे ती धर्माची अस्सल बैठक समजून देण्यासाठी आवश्यक असते. थोडक्यात, भारताची धर्मनिरपेक्षता व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही यांच्याशी संबंधित आहे आणि तिच्या योग्य कार्यवाहीसाठी समाजजागृती सातत्याने होणे आवश्यक आहे.

धर्मनिरपेक्षता किती प्रमाणात व कोणत्या प्रकारच्या समाजात व्यवहार्य ठरू शकते? भारतात हा विशेष किती प्रमाणात यशस्वी ठरला याचा विचार करताना एखाद्या धर्माधिष्ठित राष्ट्रापेक्षा धर्मनिरपेक्ष राष्ट्रासमोरची आव्हाने कोणत्या प्रकारची असतात त्याची कल्पना करता येते. त्यासाठी केवळ सुशिक्षितांची संख्या अधिक असून भागणार नाही; पण सुसंस्कारित शिक्षणाने ही मानसिकता समाजात निर्माण करता येते, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. एखाद्या विशिष्ट धर्मप्रणालीला महत्त्व नसले तरी त्याला धर्मातील सत्य, अहिंसा, मानवता, राष्ट्रनिष्ठा, सच्चाई, आध्यात्मिक उन्नती या गुणांवर राष्ट्राची उभारणी करायची असते; पण धर्मनिरपेक्षतेतील धर्मातीत वृत्तीने तो कदाचित कोणत्याच धर्माला जवळचा न वाटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. धर्मनिरपेक्षतेचा फायदा घेऊन स्वधर्माला अधिकाधिक प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्नही केला जात नाही असे नाही. राजकीय पदांवरती असलेल्या व्यक्तींच्या आधारे अशी उच्चनीचता प्रसारात येताना दिसते. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी धर्माची असते. तिला स्वत:चा धर्म प्रिय वाटतो व त्याबरोबरच इतरांचा धर्म सदोष वाटतो. जगातील अनेक संघर्षांचे मूळ केवळ आपला धर्मच श्रेष्ठ या भावनेत आहे. अशा प्रकारची प्रवृत्ती मूलभूत प्रवृत्तीसारखी वाटावी अशी जोपासलेल्या मानवी मनाला धर्मनिरपेक्षतेच्या निर्मळ आचरणाची जाणीव होणे सोपे नाही. शिवाय ही धर्मातीत असलेली सर्व धर्मांमधील पायाभूत जाणीव एखाद-दुसऱ्या व्यक्तीला किंवा एखाददुसऱ्या समाजगटाला पटून भागण्यासारखे नाही. तिचा बहुसंख्याकांमध्ये सातत्याने प्रसार होत राहण्याची गरज असते.

कोणताही धर्म टिकतो तो त्याच्या आचारधर्मामुळे. नमाज पढणे, रविवारी चर्चमध्ये जाणे, नाताळादी सण साजरे करणे, दसऱ्याला सोने म्हणून पाने लुटणे, एकादशीला देवळात जाणे, पंढरपूरची वारी करणे इत्यादींमधून नित्यनैमित्तिक आचारधर्म आचरणात आणला जातो. असा विशिष्ट आचारधर्म धर्मनिरपेक्षतेमध्ये असू शकत नाही; म्हणून धर्मनिरपेक्षतेमधील विचार सातत्याने समाजासमोर ठेवण्याचा निश्चित मार्ग नसतो. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, लोकोत्तरांची स्मरणे, जयंती यांच्यामधून या धर्मनिरपेक्षतेचा प्रसार करता येणे शक्य आहे. कोणत्या ना कोणत्या आचारधर्माची जोड असल्याशिवाय विचाराचे प्रसारण होऊ शकत नाही. विचार हा गाभा आहे, आत्मा आहे. त्याला देहाचे बाह्य रूप असावे लागते. या दृष्टीने धर्मनिरपेक्षतेचा प्रवाह वाहता ठेवण्याचे निश्चितस्वरूपी साधन शोधले गेले पाहिजे; तर सर्वसामान्यांपर्यंत धर्मनिरपेक्षतेचे मानवतेवर आधारलेले व भारताच्या एकसंधतेच्या दृष्टीने उचित असलेले सत्य स्वरूप पोहोचू शकेल.

या सर्व पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्षतेचा हा प्रयोग किती अवघड व धाडसी प्रयोग आहे याची कल्पना येऊ शकेल. एक प्रकारे भारताची एकात्मता जपायची असेल तर त्याशिवाय भारताजवळ दुसरा पर्याय नव्हता, असे कुणी म्हटले तर ते फारसे चुकीचे नाही; पण असा प्रयोग भारतासारख्या पूर्वपरंपरा असलेल्या देशातच यशस्वी होऊ शकेल, हा समाजविचारवंतांचा विश्वासही अनाठायी नाही. भारतामध्ये सर्व प्रकारची विविधता आहे. राहणीमान, पोशाख, चालीरीती, देवधर्म, लग्न, बारसे इत्यादी सर्व प्रकारचे संस्कारविधी, प्रत्येक प्रांताची वेगवेगळी भाषा, वंश, घराणी, इतिहास-भूगोल अशा सर्वच बाबतींत विविधतेचा उच्चांक आहे. या विविधतेला दोषास्पद ठरवून एकच एक धर्म, भाषा, वंश, राहणीमान, संस्कार याला उच्च मानणाऱ्या ब्रिटनसारख्या राष्ट्रांनी विविधतेचा आधार समाजमनात फूट पाडून संघर्ष उभा करण्यासाठी घेतला; म्हणून विविधतेमध्ये असलेली एकता जागृत करण्याचे कार्य धर्मनिरपेक्षतेमध्ये महत्त्वाचे आहे. प्रत्येक धर्मामधील पददलितांच्या थरापर्यंत हा विचार जागविला गेला पाहिजे. 'भारत माझा देश आहे' हे फक्त शाळेत म्हणण्यापुरते राहता कामा नये. एकाच वेळी धर्मनिरपेक्षता आणि तरीही शिक्षण, नोकरी, व्यवसाय, इत्यादी अर्जामध्ये तुमच्या धर्माचा उल्लेख हा वरवर दिसणारा विरोधाभास केवळ व्यवहारापुरता व तुमचे व्यक्तिगत धर्मजीवन सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे याची जाणीव व्हायला पाहिजे.

भारताची लोकशाही, एकात्मता व धर्मनिरपेक्षता यांचा एकमेकांशी अंतर्गत संबंध आहे. एकात्मता टिकविण्यासाठी धर्मनिरपेक्षता आहे; पण एकात्मता व निधर्मीपणा यांचा संबंध भारताच्या विकासाशी व सुरक्षिततेशी आहे. जर भारताला एक सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून ठामपणे आपले स्थान निर्माण करायचे असेल तर या पायाभूत घटकांकडे लक्ष पुरवायला पाहिजे.

सारांश

प्रत्येक देशाला धर्म असतो. फक्त अमेरिका व भारत यांसारख्या काही थोड्या देशांनीच 'धर्मनिरपेक्षता' हाच धर्म मानला. अमेरिकेपेक्षा भारताची धर्मनिरपेक्षतेची कल्पना वेगळी व भारतीय संस्कृतीमधील धर्माच्या सहिष्णुतेवर भर देणारी आहे. भारतामध्ये अनेक धर्म सुखाने नांदत आलेले आहेत. त्यामागे एकमेकांशी सहकार्याची व समन्वयाची असलेली भावना 'धर्मनिरपेक्षते'मध्ये गृहीत धरलेली आहे. सर्वधर्मीयांना समान वागणूक, समान संधी व त्यांचे धार्मिक आचरण करायची परवानगी ही दृष्टी भारताच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे. धर्मनिरपेक्षतेसाठी आवश्यक असलेला 'समान नागरी कायदा' ही भारताची गरज आहे; पण विविध धर्मांचे आग्रही धोरण त्याला अडथळा आणीत आहे. भारताची एकात्मता धर्मनिरपेक्षतेशी संबंधित आहे; म्हणून धर्मनिरपेक्षतेचा विचार सातत्याने जनतेसमोर ठेवला पाहिजे.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: