Essay on Science and Literature in Marathi Language : In this article " शास्त्र आणि साहित्य : आंतरिक संबंध मराठी निबंध ", " S...
Essay on Science and Literature in Marathi Language: In this article "शास्त्र आणि साहित्य : आंतरिक संबंध मराठी निबंध", "Science and Literature Marathi Essay" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Science and Literature", "शास्त्र आणि साहित्य आंतरिक संबंध मराठी निबंध" for Students
शास्त्र व साहित्य यांचा संबंध काय? तर्कशास्त्राला अनुसरून बुद्धिनिष्ठ पद्धतीने विश्लेषण करीत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रांमध्ये होत असतो. गणित, शरीरशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र, इंजिनियरिंग, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशी अनेक शास्त्रे ज्ञानाच्या मार्गाने सत्याचा शोध घेत असतात; तर साहित्यासारख्या शब्दनिष्ठ कला प्रतिभाशक्तीच्या जोरावर, भावना-संवेदनांच्या मनाच्या शक्तीच्या वाटेने सत्याचे सौंदर्यात्मक स्वरूप अनुभवण्याचा प्रयत्न करीत असतात. शास्त्राचा मार्ग बुद्धिनिष्ठ आहे; तर साहित्यादी कलांचा मार्ग मनाला काय जाणवते ते समजून घेण्याचा व साकार करण्याचा आहे. शास्त्राच्या नजरेला 'कळते' आणि कलेच्या दृष्टीला 'वळते'. 'कळणे' जितके महत्त्वाचे आहे तितकेच 'वळणे' (अनुभवणे, अनुसरणे) हेही महत्त्वाचे आहे. साहित्यकलेचे प्रयोजन सांगतानाच मम्मटासारख्या संस्कृत समीक्षकाने ‘कान्ता संमित तयोपदेश युजे।' 'पत्नी व सहचरीप्रमाणे गोड भाषेत उपदेश करणारे।' असे सांगितले आहे. साहित्यात काय सांगितले आहे, त्याच्याइतकेच ते कसे सांगितले आहे, यालाही महत्त्व येते. कुठे किती इंच पाऊस पडतो, गवताळ व घनदाट झाडीचा प्रदेश कुठे आहे, हे भूगोलशास्त्र सकारण सांगते; पण पावसाचा व घनदाट झाडीचा निसर्गातील अनुभव बालकवींच्या कवितेमधून प्रत्यक्ष जाणवतो, अनुभवाला येतो. म्हणजे सहचरीच्या शब्दांतील लाडिक आग्रह, लडिवाळपणा, नजाकत, सौंदर्य हे तर साहित्यामध्ये असतेच; पण त्यापेक्षाही प्रत्यक्षानुभव आणून देणे हा साहित्याचा विशेष शास्त्राच्या पुढे जाणारा व जीवनाला अगदी जवळ जाऊन भिडणारा आहे. .
शास्त्र काय किंवा साहित्य काय, शब्दांमधून व शब्दांनी घडविलेल्या भाषेमधून आपल्यापर्यंत येत असते. भाषेचा शोध लागला नसता तर शास्त्र, साहित्य, व्यवहार इत्यादी विविध क्षेत्रांतील विकासाची द्वारे उघडणे अवघडच होते. परमेश्वराने विविध ध्वनी काढण्याची यंत्रणा माणसाला दिली; पण त्याच्या आधारे भाषानिर्मिती मात्र माणसाने केली. भाषेचा शोध हा चाकाच्या व अग्नीच्या शोधाइतकाच क्रांतिकारक आहे. भाषेमुळेच माणसाच्या व्यवहारात सुलभता आली. शास्त्रीय ज्ञान व कला यांचा विकास भाषेशिवाय कसा होऊ शकला असता? आज माणसाला भाषा ही आपल्या एखाद्या अवयवाइतकीच सवयीची झालेली आहे; पण ती माणसाच्या बुद्धीने लावलेला शोध आहे, हे विसरून चालणार नाही.
शास्त्र व साहित्य या दोन्हींचा भाषा हा आधार आहे. मात्र शास्त्रज्ञानाचे ते साधन आहे तर साहित्यनिर्मितीचे ते माध्यम आहे. साधन साध्यापर्यंत, उद्दिष्टापर्यंतच घेऊन जाते. फक्त माध्यम मात्र उद्दिष्ट गाठले तरी उपयुक्तच ठरते. पाच गुणिले पाच बरोबर किती हे एकदा कळल्यावर त्यासाठी कुणी गणिताचे पुस्तक हातात धरीत नाही; पण 'नटसम्राट'सारखे नाटक मात्र परत परत पाहावेसे वाटते. रामायणाच्या किंवा महाभारताच्या कथा माहिती असूनही त्याच्या प्रत्येक वाचनाने नवा अर्थ उलगडू लागतो. भाषा हे साहित्याचे माध्यम असल्याने साहित्यामध्ये शब्द व अर्थ हे एकरूपच होऊन आलेले असतात, ही वस्तुस्थिती कोणत्याही कलेच्या माध्यमासंदर्भात असते. चित्रकलेचे रंगरेषा हे माध्यम, नाट्यकलेचे अभिनय हे माध्यम, संगीतकलेचे सूर हे माध्यम, तसेच साहित्यकलेचे शब्द हे माध्यम आहे. रंगरेषांशिवाय जसे चित्र असू शकत नाही तसेच शब्दांशिवाय साहित्यकला असू शकत नाही. म्हणूनच साहित्यामधील शब्दार्थाच्या एकरूपतेला कालिदासाने शिवशक्तीच्या एकरूपतेचे उदाहरण दिले आहे. शिवाशिवाय शक्ती (पार्वती) किंवा शक्तीशिवाय शिव (शंकर) असूच शकत नाहीत. तीच एकरूपता कथा-कादंबरी, विशेषतः कविता यांसारख्या साहित्यकृतींमध्ये साधलेली असते.
शास्त्राला शब्दाच्या अशा एकरूपतेची गरज नसते. ज्ञानाचे लक्ष्य गाठले की शब्दांचे कामच संपले! साहित्याचे माध्यम असलेला हा शब्द शास्त्रामध्ये अर्थ काटेकोरपणे सांगण्याकडे वळतो. एकच एक निश्चित अर्थकथन, निःसंदिग्ध अर्थ हा शास्त्राचा नियम शब्द पाळतो. शब्दापेक्षा व त्यातून सूचित होणाऱ्या अर्थापेक्षा शास्त्रात प्रत्यक्ष वाच्यार्थ महत्त्वाचा असतो. अर्थाबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम शास्त्रातील भाषेमध्ये येणे शास्त्राला परवडणारे नसते. म्हणून अर्थाची एकच एक वाट पकडून चालणारी ही भाषा ज्ञानाचे क्षेत्र नेमकेपणाने सांगू शकते.
शब्द तोच पण तो जेव्हा साहित्यकलेमध्ये योजला जातो तेव्हा त्याला अर्थ सांगायचा नसतो तर भावार्थ सांगायचा असतो. भावार्थ सांगणे हे कार्य सोपे नसते. वर्तमानपत्रातील एखादी बातमी जशी नुसते घटनेचे तपशील देत वर्णन करते, तसे साहित्यातील घटनेचे स्वरूप नसते. घटनेइतकीच घटनेचे वातावरण, माणसांवर होणारा तिचा परिणाम, हे सगळे सांगता येणे कठीण असते. अशा वेळी साहित्यातले शब्द सूचकतेचा आश्रय घेतात. 'विठू माझा लेकुरवाळा' या ओळीमध्ये असेच संतांना जाणवलेले विठ्ठलभाव सूचकतेने प्रकटले आहेत; कारण शास्त्रीय सत्य शब्दांच्या चिमटीत पकडता येते; पण साहित्यातील भावभावना शब्दांतून निसटतात म्हणून साहित्य त्या फक्त सूचित करू शकते.
सत्यशोधनाचा शास्त्राचा मार्ग निरीक्षणावर, घटकश: विभाग करण्यावर, त्यांचे विश्लेषण करण्यावर अवलंबून असतो. सत्यशोधही सोपा नसतो; पण तो बुद्धीने पटवून देता येतो; पण साहित्याला जाणवलेले सत्य हे त्या वस्तूचे रूप, ती विशिष्ट घटना एवढ्यापुरते मर्यादित राहू शकत नाही. त्या घटनेचे अंतरंग त्याला जसे जाणवले असेल तसेच ते साहित्यातून व्यक्त होत असते; म्हणून एखाद्या साहित्यिकाला रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या तारका पाहन पारतंत्र्याच्या काळातील गुप्तपणे लपत छपत जमणा भूमिगतांची आठवण येईल; तर कुणा कवीला 'कुणी नाही गं, कुणी नाही, आम्हाला पाहत बाई।' असे म्हणत जमणाऱ्या लपंडाव खेळणाऱ्या लहान बालिकांची आठवण होईल. कुसुमाग्रजांसारख्या एखाद्याला त्यांच्याकडे पाहून ती ‘परमेश्वरांची पदचिन्हें' वाटतील. तारका त्याच, रात्री काळोख असल्याने त्या चर्मचडूंनी दिसतात, एवढ्याच शास्त्रीय सत्यकथेच्या आधारावर साहित्याला किती जीवनस्पर्शी भावार्थ उलगडता आला हे या एकाच उदाहरणावरून कळून येते. साहित्याचा जीवनसत्याचा शोध जितका जमेल तितका वस्तुनिष्ठ असतो. दोघांनाही जीवनाचाच शोध घ्यायचा असतो; कारण या अफाट जीवनविश्वामध्ये त्याला जगण्याच्या सुखसोयी करून घ्यायच्या असतात; मानसिक सुखसमाधान मिळवावयाचे असते; त्यासाठी शास्त्राच्या क्षेत्रात त्याला बुद्धिमत्ता/प्रज्ञा मदत करते आणि साहित्यादी सर्वच कलानंदांच्या दालनात मनाची, प्रतिभेची भरारी साहाय्यभूत होत असते.
व्यक्तिनिष्ठता आणि वस्तुनिष्ठता या पूर्णपणे विरोधी नाहीत, हे आज जाणवायला लागले आहे. एवढेच नव्हे तर, व्यक्तिनिष्ठतेने जगातील प्रत्येक कृती घटनाव्याप्त असते; पण ती आकलन करणे व त्यासाठी प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचे स्वतंत्रपण लक्षात घेणे शक्य नसते, याची जाणीव व्हायला लागली आहे. उदाहरणार्थ, 'बंड' आणि 'युद्ध' यांमधील फरक कोशामध्ये सांगितलेला असतो. बंडखोर वेगळे आणि स्वातंत्र्यसंग्रामातील रणवीर वेगळे; पण एखादी घटना एकाच्या दृष्टीला 'बंड'स्वरूपी वाटते; तर दुसऱ्याच्या नजरेत तिचे स्वरूप 'स्वातंत्र्यसंग्रामा'चे असते. खरे कोणते मानायचे? कारण सत्याकडे बघणाऱ्या व्यक्तीच्या भावनांचे रंग सत्यामध्ये कमीजास्त प्रमाणात येतात; म्हणून इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, न्यायशास्त्र, समाजशास्त्र यांसारख्या काही शास्त्रांमध्ये निरीक्षणे महत्त्वाची असूनही निरीक्षकाच्या वृत्ति-प्रवृत्ती उतरल्याशिवाय राहत नाहीत.
व्यक्तिनिष्ठ म्हटल्या जाणाऱ्या साहित्याच्या संदर्भातही वस्तुनिष्ठता डावललेली नसते, डावलता येतही नाही. सूर्यप्रकाशात तारे दिसत नाहीत, हे सत्य त्याने स्वीकारलेले असते. पाण्याची ओढ उताराकडे असते, हे सत्य त्याला विसरता येत नाही. त्याचा उपयोग करून साहित्य मनोदर्शन करू शकते. फ्रॉइडने शोधलेले सिद्धान्त आधाराला घेऊनच मनोविश्लेषणाचे सुरेख चित्रण साहित्यात येत असते. पाण्याचे प्रवाहीपण व दगडाची जडशीलता मान्य करून त्याची उलथापालथ साहित्याच्या मयसभेला दाखविता येते. व्यक्तिनिष्ठतेकडे साहित्य अधिक झुकलेले असते; फार तर वस्तुनिष्ठतेकडे शास्त्राचा कल व भर असतो, असे म्हणता येईल. याचे कारण सत्याला एक निश्चित स्वरूप नसते. त्याचे कदाचित बुद्धीला झालेले आकलन 'सात आंधळे आणि हत्ती' या गोष्टीतील आंधळ्यांना गवसलेल्या सत्यासारखेही असू शकेल! एका आंधळ्याला तो खांबासारखा वाटला; आणखी एकाला दोरखंडासारखा वाटला; कुणाला सुपासारखा वाटला; सत्याचे स्वरूपही संपूर्णपणे आकलन होणे अवघड असते.
जसे हवेतील सूक्ष्मातिसूक्ष्म कण चर्मचडूंना दिसत नाहीत; त्याचप्रमाणे बुद्धीची, नजरेची झेपही मर्यादित असू शकते. अशा वेळी मनाच्या कवाडातून त्याचे अंधुक स्वरूप जाणवू लागते. मनाला काही स्वप्नवत भास होऊन त्या सत्याचे अंतरंग उलगडू लागते. हे भास असत्य किंवा खोटे नसतात. त्यांनाही तर्काची मदत असते. उदाहरणार्थ- राम-कृष्ण-शिव इत्यादी देवदेवतांच्या मूर्ती आपण कल्पनेनेच रेखाटतो. आपल्या भाविक मनात प्रतिबिंबित झालेली देवीरूपे किती विविध असतात; त्यांना अनुसरून त्यांचे साहित्यात चित्रण होत असते. इतिहासातील शिवाजी-संभाजीसारख्या राजांची दुर्मिळ रेखाचित्रे, ज्ञानेश्वरादी संतांची चित्रे ही तर चित्रकाराच्या कल्पनेचा विलास असतात; पण ती असत्य नसतात. आपल्या भावमनातील प्रतिबिंब ती पकडू शकतात. नाटकादी साहित्यात त्यावरून तेच चित्रण येते. कल्पनेचा आधार घेऊन आपण वास्तवाचे दर्शन घडवीत असतो.
पुष्कळदा शास्त्राला प्रेरणा देण्याचे कार्य साहित्य करीत असते. विज्ञानकथांमधील विज्ञान किंवा अद्भुतता अनेकदा शास्त्रीय दृष्टीला कुतूहलविषय पुरवितात. वाल्मिकीने आधी रामायण पाहिले, सांगितले आणि नंतर राम घडला; ही भारतीयांची श्रद्धा हेच सुचविते. पुष्पक विमान, उडते राक्षस, अंगठ्याएवढे मानवप्राणी प्रथम कल्पनेने पाहिले. ग्रहगोलांवरची माणसे प्रथम साहित्यात रंगवली गेली; आणि नंतर ग्रहगोलांच्या संशोधनप्रेरणेला गती मिळाली. माणसाच्या बुद्धीपेक्षा त्याचे मन अधिक जागृत असते. मनाला अनेक गोष्टींबद्दलचे कुतूहल असते. हे कुतूहल साहित्यामधून व्यक्त होत असते व डॉ. जयंत नारळीकरांसारख्या संशोधकाच्या विज्ञानकथा, या दृष्टीने, मार्गदर्शक ठरतात. येथे त्यांच्या 'धूमकेतू' नावाच्या कथेचा उदाहरण म्हणून उल्लेख करता येईल. या कथेत ‘एक धूमकेतू पृथ्वीवर आदळणार' अशी कल्पना करून ही धडक वाचविण्यासाठी शास्त्रज्ञ काय करतात, याचे चित्रण आहे. या कथेनंतर पंधरा-वीस वर्षांनंतर 'नासा'ने धूमकेतूची धडक टाळण्यासाठी कथेत असलेल्या पद्धतीसारखीच पद्धत मांडली. साहित्याच्या दष्टीने विज्ञान आधी मनाच्या पडद्यावर पाहिले जाते; त्याच्या भल्या-बुऱ्या परिणामांचे चित्रण केले जाते आणि त्याचा फायदा विज्ञानाला होत असतो.
याचा अर्थ मात्र असा नव्हे की, साहित्याच्या पाठोपाठच शास्त्राची किंवा विज्ञानाची वाटचाल होत असते. शास्त्राला साहित्याच्या मार्गदर्शनाशिवायही अनेक शोध लागले आहेत; आणि शास्त्राला लागलेल्या शोधांचा फायदा साहित्याच्या विकासालाही झालेला आहे. आकाशवाणीसारखे वेगळे माध्यम आले आणि त्यासाठी साहित्याच्या स्वरूपामध्ये बदल होऊ लागला. दरदर्शन आले आणि दरदर्शनवरच्या चित्रणासाठी साहित्य वेगळे रूप धारण करू लागले. कथेची चित्रपटकथा कशी करावी हे चित्रपटासारख्या शोधाने सुचविले. 'स्वामी' सारखी कथा जेव्हा दूरदर्शनवरून सादर होते, रामायण किंवा महाभारत यांच्या कथा जेव्हा दूरदर्शनवरून घरोघरी पाहिल्या जातात, तेव्हा त्या सादरीकरणासाठी कशा बदलाव्या लागतात; याचे तंत्रच बनून गेले. यंत्राने गतिमान केलेल्या दळणवळण व संदेशवहनामुळे प्रसारमाध्यमांच्या सुविधा आल्या. खेडोपाडींचा लेखक जाणीवपूर्वक तंत्र-मंत्र समजून घेऊन लिहू लागला. शास्त्र व कला यांचा संबंध हा असा एकमेकांत गुंतलेला आहे.
इतिहास व ऐतिहासिक कादंबरी यांच्या स्वरूपावरून शास्त्राची व साहित्याची कल्पना स्पष्ट होऊ शकते. जसे घडले तसेच्या तसेच सांगण्याची प्रतिज्ञा इतिहासशास्त्राची असते. विरोधी पक्षाचा वकील जसे प्रश्न विचारून एखादी माहिती अशिलाच्या तोंडूनच वदवीत असतो; तसेच इतिहासकारही त्या घटनांच्या विश्लेषणातून सत्य टिपत असतो; आणि ऐतिहासिक कादंबरीत हे घटनेच्या पातळीवरचे सत्य/वास्तव नाकारलेले नसते; पण तिचा भर त्या घटना घडविणाऱ्या माणसाच्या मनाचे संभ्रम, कवडसे, भलेबुरेपण पकडण्यावर असतो. शिवाजीच्या आयुष्यातील घटनांच्या पायऱ्यांवरून ऐतिहासिक कादंबरीला शिवाजी नावाच्या जिवंत हाडामासाच्या माणसाचे व डोंगराएवढे कर्तृत्व करणाऱ्या त्याच्या मनाचे चित्रण करायचे असते. टिळकांचा पुतळा किती वजनाचा, लांबीरुंदीचा आहे, हे शास्त्र सांगते; पण 'टिळकांच्या पुतळ्यापाशी' ही कुसुमाग्रजांची कविता ‘ते होते जीवित अन् हा जीवितभास।' असे जीवनभाष्य त्या आधारे मनावर ठसविण्याचा यत्न करीत असते.
रामायणकालीन शास्त्रीय शोध कोणते होते, कोणत्या प्रकारचे राज्यशास्त्र, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र होते, याची माहिती आज नाही; पण रामायण मात्र लोककथांतूनही भारतीयांनी जतन केले आहे आणि त्या महाकाव्याच्या आधारे, व्यक्तिचित्रांच्या आधारे तत्कालीन शास्त्राची- वैज्ञानिक प्रगतीची- कल्पना येऊ शकते. एका क्षुल्लक प्रजाजनाने घेतलेल्या शंकेवरून राजा राणीला वनात सोडून येतो, यावरून प्रजेचे राज्यातील स्थान कळू शकते. लीळाचरित, पंडिती वाङ्मय इत्यादी मध्ययुगीन साहित्यावरून तत्कालीन समाजशास्त्राचे आकलन होऊ शकते. एवढेच नव्हे तर, वेद, उपनिषदे इत्यादींमधील तत्त्वज्ञानाच्या विचारापेक्षा गीतेसारख्या महाभारत-महाकाव्यातील विचार अधिक प्रसारित होतो. यावरून शास्त्राचे ज्ञान टिकवून धरण्याची साहित्याची क्षमता कळू शकते. शास्त्र व शास्त्राने लावलेले शोध प्राचीन काळात तरी लोकसाहित्याद्वारा जनसामान्यांच्या तोंडी रुळलेले व अंगवळणी पडलेले होते; कारण शास्त्रीय वाङ्मयापेक्षा विदग्ध साहित्य आणि विदग्ध साहित्यापेक्षा लोकसाहित्य जनतेच्या अधिक जवळ पोहोचलेले असते. विश्वनाथ खैरेंच्या मते तर रामायणातील 'रामचंद्र' कथेमध्ये 'रामा'पेक्षा 'चंद्रा'ला अधिक महत्त्व आहे. चंद्र-सूर्य-तारे-ग्रहगोल यांचा परिचय रामायणात कथेचे आवरण घेऊन आलेला आहे. राम हा सूर्यवंशीय, सीता ही भूमिकन्या. रावणाच्या वनवासात ही भूमिकन्या सहा महिने होती, याचा उत्तर ध्रुवावर असलेल्या सहा महिने दिवस व सहा महिने रात्र याच्याशी संबंध आहे. जातिवर्णव्यवस्थेचे प्राबल्य असले तरी व्यास व वाल्मिकी या कोळ्याच्या कुळातील लेखकाचे लेखनच भारतीयांनी महाकाव्य म्हणून शिरोधार्य मानले. ज्या काळी शास्त्राला स्थिरत्व व शाश्वतत्व देणारी मुद्रण, संगणक, टेप यांसारखी साधने नव्हती, त्या काळी लोकसाहित्याच्या जनमुखातून कथांची रूपे घेऊन अनेक शास्त्रे शाश्वततेचा प्रवास करीत आलेली आहेत. जगभर पसरलेल्या नागकहाण्या, लोकगीते, व्रतकथा इत्यादींच्या अभ्यासातूनच आदिबंधात्मक समीक्षाशास्त्र निर्माण झाले आहे. भाषा-विज्ञान, साहित्यशास्त्र व समीक्षाशास्त्र ही शास्त्रे तर साहित्यालाच प्रयोगवस्तू मानून विकसित झालेली आहेत.
भारतीयांना वंदनीय असलेल्या महाभारतासारख्या ग्रंथामध्ये तर तत्कालीन जीवनातील अनेक शास्त्रीय शोधांचे स्वरूप व्यक्त झालेले दिसते. गांधारीने एकाच वेळी अनेक बालकांना जन्म देणे, रणभूमीवरील दृक्श्राव्याचे चित्रण राजवाड्यात बसून संजयला पाहता येणे किंवा युद्धातील विविध प्रकारची शस्त्रे व मायावी शक्ती, मयाने बांधलेली अद्भुत मयसभा इत्यादींतून कदाचित तत्कालीन शास्त्रीय प्रगत जीवनाचा आलेख रेखाटलेला असेल. तसे नसेल तर व त्या केवळ कविकल्पना असतील तर आजच्या शास्त्रसंशोधनाला साहित्याने दिलेल्या प्रेरणेचे ते प्रतीक असू शकेल. महाकाव्यासारख्या साहित्यामधून शास्त्राला केवळ शोधाची दिशा कोणती असावी याचीच प्रेरणा मिळते असे नाही; तर शास्त्राने मनाच्या विकसनाला वाव दिला नाही तर 'महाभारतीय युद्धा'च्या रूपाने काय घडू शकते, याचाही दाखला रेखाटला आहे. बुद्धीने शोध लावताना त्याचा उपयोग माणसाच्या विनाशासाठी होणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे. साहित्यामधून हा संदेश परिणामकारकपणे सांगितला जातो.
साहित्यकला ही शब्दकला आहे. कलेचे उद्दिष्ट असते सौंदर्यनिर्मिती करणे व सौंदर्यानुभव आणून देणे. 'सत्य, शिव, सौंदर्य' हे साहित्याचे त्रिपदी स्वरूप असते. या त्रिपेडी विणीमुळे साहित्य विश्वात्मक पातळी गाठू शकते. शास्त्राची दृष्टी फक्त सत्यदर्शनाकडे असते; सौंदर्यदर्शनाकडे नसते. त्यापेक्षाही शिवत्वाकडे लक्ष देऊन 'सत्यदर्शन' घडविणे तिला मान्य नसते. आजचे विज्ञान असे केवळ सत्याची दृष्टी ठेवून संशोधन करीत सुटल्यामुळे त्याचा विनाशकारी, केवळ अर्थजन्य, केवळ स्वार्थांध उपयोग करायलाही मानव घाबरेनासा झाला आहे. त्याला मनाच्या सुसंस्कृतीची जोड म्हणजेच शिवाची मदत असली पाहिजे. ती मदत सौंदर्याला प्रमुख मानूनही सत्य-शिवाची उपासना जपणारे साहित्य करीत असते. कोणत्याही देशाची संस्कृती साहित्यकलेमुळे जतन केली जात असते. मानवाच्या मनातील सद्भावना जागृत करण्याचे व त्या टिकविण्याचे कार्य साहित्याइतके प्रामाणिकपणे कोणतेच क्षेत्र करू शकत नाही. म्हणूनच शास्त्राला 'दुरिताचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सर्ये पाहो ।' हे सांगणे जमले नाही. ते साहित्याच्या शिवतत्त्वाला जमते. जातककथा, जैनकथा इत्यादी धार्मिक म्हटले जाणारे साहित्य अशा मानवी मूल्यांचे उद्बोधन करीत आलेले आहे. आजच्या एकविसाव्या शतकात शिरताना माणसाच्या हातातील विज्ञानाने लावलेल्या शोधांना असे विधायक कार्य करण्याची प्रेरणा अंगभूतपणे असणे अत्यंत आवश्यक आहे. विज्ञान हे विनाशक न ठरता, स्वत:च्याच मस्तकावर हात ठेवून अखिल मानवजातीचे भस्म करणारा भस्मासुर ठरण्याचे टाळायचे असेल तर त्याला 'शिवा' ची जोड हवी आणि ती साहित्यसंस्कृतीने व साहित्यसहवासाने मिळविता येईल.
साहित्य ही कला, चित्र, शिल्प, नृत्य इत्यादी कलांपेक्षा भिन्न आहे. शब्द हे तिचे माध्यम असल्याने ती माणसाच्या नित्य परिचयाची आहे. शब्दांचा उपयोग आपण व्यवहारासाठीही करतो. साहित्यात सौंदर्यदर्शन घडविणारा शब्द चित्रकलेतील रंगरेषांपेक्षा व नृत्यकलेतील पदन्यासांपेक्षा आपल्याला अधिक जवळचा वाटतो. त्याच्या आधारे येणारे प्रबोधन व उद्बोधन आपल्यावर लवकर परिणाम साधू शकते. नाटक व साहित्य या शब्दांशी संबंधित असलेल्या कलांचे स्वरूप इतर कलांपेक्षा वेगळे आहे. शब्दांच्या आधाराने त्या सत्याच्या जवळ येऊ शकतात; नैतिक, धार्मिक, सामाजिक, तात्त्विक पातळीवर चांगले काय, वाईट काय याची जाणीव देऊ शकतात; रामासारखे वागावे, रावणासारखे नव्हे, हा गर्भित अर्थ मनावर ठसवू शकतात. साहित्याचा विचार करताना श्रेष्ठ साहित्याचा निकष साहित्याच्या आशयाशी जोडलेला असतो. साहित्यकृतीमध्ये काय चित्रित केले आहे; यापेक्षा जे चित्रित केले आहे त्यामधून जीवनाला शिवत्वाची जाणीव करून देण्याची सूचना किती अंगभूतपणे व्यक्त झालेली आहे, हे तत्त्व महत्त्वाचे समजले जाते. भारतीय नाटकांचा आत्मा जीवनाचे सर्वांगीण स्वरूप व्यक्त करीत असल्याने शोकात्म अनुभव नाटकांतून अभिव्यक्त होतो; पण अशा वेळी नाटकाची अखेर मात्र शोकान्त नसावी हा दंडक घालणारे भारतीय नाट्यशास्त्र हे जीवनाचा, जीवनातील सत्याचा स्वीकार करतानाही मानवी मनाला विधायक वळण लागावे हे विसरत नाही. नाटकाचा परिणाम घेऊन घरोघरी जाणारा प्रेक्षक समजूतदारपणे व विश्वासाने जीवनाला जवळ करू शकला पाहिजे, ही धारणा त्याच्या पाठीशी आहे. माणसाच्या हातून चुका घडणारच; पण त्याचे शासन भोगताना देव ‘कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।' तो भक्तीला धावून येणारच, ही विश्वासाची भावना प्रेक्षकांच्या मनात जे साहित्य निर्माण करते ते अशा सुखान्त शेवटाने. इतर कलांप्रमाणे केवळ उच्च दर्जाची करमणूक करणे हे ध्येय साहित्यकलेने जसे प्रथमपासूनच ठेवलेले आहे, तसेच 'जीवनासाठी कला' हे ध्येयही साहित्यकृतीजवळ प्रथमपासूनच असते. मात्र ते कलादर्शन दुय्यम व साधनभूत होऊ न देण्याची खबरदारी व जबाबदारी लेखकावर असते. साहित्यकला ही कला असते; म्हणून तिने सौंदर्यानुभव आणून दिला पाहिजे. शब्दांचे सामर्थ्य तिच्या पाठीशी असल्याने सौंदर्यदर्शनाबरोबर सत्यशोधनाची वाटही तिने सोडता कामा नये; आणि या सत्याला दिशा शिवत्वामुळे मिळत असते; म्हणून 'सौंदर्य, सत्य, शिव' हा मंत्र साहित्याच्या ओठी असावा लागतो.
सारांश
शास्त्र व साहित्य शब्दांमधून प्रकटत असते; म्हणून भाषेचा शोध व भाषेची विकसनक्षमता दोन्ही क्षेत्रांच्या कक्षा रुंदावण्यास मदत करते. शास्त्राचे भाषा हे साधन आहे तर साहित्यकलेचे ते माध्यम आहे. शास्त्राची दृष्टी यथार्थ-दर्शनाकडे तर साहित्याची भावार्थ-चित्रणाकडे असते. शास्त्राची परीक्षा तर्कशास्त्राच्या आधारे करता येते; पण साहित्याचे परीक्षण बहुतांशाने साहित्यकृतींशी संबंधित असते. अशा साहित्यकृतींच्या परिशीलनाने साहित्यशास्त्र, समीक्षाशास्त्र इत्यादी शास्त्रांचा-विकास होत असतो. शास्त्राजवळ वस्तुनिष्ठता असते; पण साहित्यात व्यक्तिनिष्ठ दृष्टी महत्त्वाची ठरते. शास्त्राला प्रेरणा देण्याचे कार्य साहित्यकृती करू शकते; आणि शास्त्रीय प्रगतीचा आधार साहित्यकृतीद्वारा विश्वात्मक होतो. 'सत्य, शिव, सौंदर्य दर्शन घडविण्याचा साहित्यकलेचा ध्यास शास्त्रीय दृष्टीतील सत्यदर्शनाला शिवत्वाची जोड देऊ शकतो. विज्ञानाने शोधलेल्या सत्याला अशी विश्वात्मकतेची दृष्टी असेल तरच ते मानवजातीच्या प्रगतीला हातभार लावू शकते.
COMMENTS