Monday, 26 October 2020

Marathi Essay on "Importance of Newspaper", "वर्तमान पत्राचे महत्व मराठी निबंध", "वर्तमानपत्र माहिती मराठी" for Students

Essay on Importance of Newspaper in Marathi Language: In this article "वर्तमान पत्राचे महत्व मराठी निबंध", "वर्तमानपत्र माहिती मराठी", "vruttapatra che mahatva in marathi" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Importance of Newspaper", "वर्तमान पत्राचे महत्व मराठी निबंध", "वर्तमानपत्र माहिती मराठी" for Students

वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रमुख प्रसारमाध्यमांमधील वर्तमानपत्र हे प्रसारमाध्यम काळाच्या दृष्टीने अगोदरचे आहे. आकाशवाणीसारख्या व त्यापेक्षाही प्रभावी अशा दूरदर्शनसारख्या समाजजीवनव्यापी प्रसारमाध्यमांच्या काळातही वर्तमानपत्रासारखे माध्यम आपले स्थान टिकवून आहे. याचा अर्थच हा की, त्याचे क्षेत्र नंतरच्या दोन्ही प्रसारमाध्यमांपेक्षा भिन्न आहे. त्याचा असा खास वाचकवर्ग आहे. आकाशवाणी ऐकणारा श्रोता आणि दूरदर्शन व त्याच्या वाहिन्या पाहणारा-ऐकणारा श्रोता वर्तमानपत्राचाही वाचक असू शकतो; पण मूलतःच वर्तमानपत्र वाचणारा वाचकवर्ग ज्या दृष्टीने वर्तनापत्राकडे वळतो त्याची वर्तमानपत्राकडे बघण्याची भूमिका वेगळी असते. वर्तमानपत्राकडे बघण्याची वाचकांची कालची भूमिका वेगळी होती. आकाशवाणी आल्यानंतर ती बदलली आणि दूरदर्शनच्या आगमनानंतर तर तिचे स्वरूप नुसते बदलले एवढेच नव्हे तर, ते मर्यादितही झाले; पण तरीही वर्तमानपत्राची गरज कायमच राहिली. मध्ययुगीन काळातील प्रसारमाध्यमे जशी जवळजवळ कालबाह्य झाली तशी स्थिती वर्तमानपत्रावर आली नाही; आणि वर्तमानपत्राने कात टाकून नवे रूप धारण करून ती येऊ दिली नाही. कालानुरूप आपली सामाजिक गरज लक्षात घेऊन (आपली सामाजिक गरज निर्माण करून!) वर्तमानपत्राने आपले स्वरूप बदलून टाकले. इंग्लंड-अमेरिकेमध्येही आजच्या काळात वर्तमानपत्राने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. दररोज तीस-बत्तीस पृष्ठांचे वर्तमानपत्रही लोक विकत घेतात. त्यांना आवश्यक असलेला भाग वाचतात. सर्वच्या सर्व वर्तमानपत्र वाचणारा वाचक कदाचित पूर्वीच्या काळात असू शकेल; आज तसा मिळणार नाही.

वर्तमानपत्राच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये मुद्रणकला नव्हती तेव्हा प्रसारमाध्यमे होती; पण त्यांची मदार हस्तलिखितांवर आणि मौखिकतेवर अधिक होती. हस्तलिखितांचा मार्ग खर्चिक होता; आणि कीर्तने, प्रवचने, गोंधळ, तमाशा, लावणी, पोवाडे, वासुदेव, पिंगळा, ‘जय जय रघुवीर समर्थ' असा समर्थांचा जयघोष करीत येणारा समर्थदास; ही सगळी प्रसारमाध्यमे मौखिक होती. गावागावांत प्रसंगपरत्वे दवंडी पिटून बातम्या प्रसृत केल्या जायच्या. वेळोवेळी देवतांच्या व संतांच्या जत्रा-यात्रा यांतूनही भजन-पारायण इत्यादींच्या निमित्ताने होणारे कार्यक्रमही तेव्हाची प्रसारमाध्यमे होती; पण त्यांमध्ये राजकीय घटनांवर फार कमी भर होता. सामाजिक व त्यापेक्षाही धार्मिक पातळीवरचे प्रबोधन करणारी ही प्रसारमाध्यमे होती; पण तरीही आज जी प्रसारमाध्यमे म्हणताक्षणी राजकीय घडामोडींना व सामाजिक घटनांना प्रथम स्थान मिळते ते स्थान तेव्हा नव्हते. म्हणूनच तेव्हाच्या प्रसारमाध्यमांचे विषयही वेगळे होते व त्यांच्या प्रसारालाही गतीची व प्रदेशाची मर्यादा पाळावी लागत होती. त्या काळी राजकीय घडामोडींचा प्रसार दरबारी लोकांपुरता, सैन्यापुरता व राजकारणात महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांपुरताच होता. सामान्य जनतेचा आज जसा पदोपदी राजकीय पर्यावरणाशी संबंध येत असतो तशी स्थिती पूर्वी नव्हती.

या पार्श्वभूमीवर वर्तमानपत्राचे आगमन किती वेगळे होते हे कळू शकेल. त्याचा संबंध केवळ मुद्रणकलेशी किंवा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांशी नाही तर शहरीकरणासाठी, सुशिक्षितपणाशी व जनसामान्यांपर्यंत जगातील सर्व घडामोडी पोहोचू शकतात, या कल्पनेशी आहे. लेखन-वाचनाशी संबंध असलेला समाज घडविण्यात ललित साहित्याइतकाच वर्तमानपत्राचाही (व नंतरच्या साप्ताहिके, नियतकालिके इत्यादींचा) वाटा आहे. समाजजागृतीचे एक प्रभावी व दूरवर पोहोचणारे साधन वर्तमानपत्राच्या रूपाने समाजाच्या हातात मिळाले.

वर्तमानपत्राने प्रसारमाध्यमांच्या विषयामध्येच बदल केला. वर्तमानपत्राचा प्रमुख विषय असतो राजकारण. राजकीय घडामोडी त्यासाठी आवश्यक ती जागृती करता करता वाचकवर्गातील विविध आवडीनिवडींची दखल घेतली जाते. सामाजिक, पुरोगामी, प्रतिगामी, नव्या सुधारणा, जुन्या गोष्टींचा अभिमान व आग्रह, धर्माबद्दलचे वाद, साहित्य, व्यापार इत्यादी अनेक विषय हे पुष्कळदा चवीपुरते येत असतात. वृत्तसृष्टीचा एक वेगळा सामूहिक व्यवसाय वर्तमानपत्राच्या माध्यमासाठी तयार होऊ लागला. प्रथमतः या व्यवसायाने शहरी पातळीवर कार्य पोहोचविले. आज तर त्याचे स्वरूप जागतिक, भारतीय, प्रादेशिक, प्रांतिक व स्थानिक अशा उतरंडीवर, पायऱ्यांवर भिन्न भिन्न स्वरूपांत प्रकटत आहे. अगदी प्रारंभीच्या काळातील इंग्रजीतील 'न्यूजशीट' किंवा 'न्यूजलेटर' असे स्वरूप असलेले हे वर्तमानपत्र NEWS या शब्दांमधून चारही दिशांतील घडामोडी सांगण्यासाठी असलेले साधन आहे हे स्पष्ट होते.

ब्रिटिशांच्या अमदानीत महाराष्ट्रात जांभेकरांच्या 'दर्पण' रूपाने वृत्तपत्र अवतरले. तात्कालिक घटनांचे वस्तुनिष्ठ वर्णन हे त्याचे स्वरूप असूनही या काळातील वृत्तपत्रांनी सामाजिक व राजकीय प्रश्नांवर विचारमंथन केले; पण लोकमान्य टिळकांचा केसरी, आगरकरांचा मराठा, सुधारक इत्यादींनी त्याची व्यापकता नजरेसमोर आणून दिली. समाजातील अन्याय वेशीवर टांगण्याचे एक प्रभावी साधन, वृत्तपत्राच्या रूपाने मराठी/भारतीय माणसाच्या हाती आले. त्याला यंत्रयुगातील रेल्वेसारख्या नव्या दळणवळण माध्यमाने दूरवर जाण्याची क्षमता प्राप्त झाली. शिक्षणव्यवस्थेने लेखक-वाचक वर्ग तयार होत होता. इंग्रजी राजवटीमधील सुधारणा, नवेपणा, वेगळेपणा व भारतीय संस्कृतीतील चालीरीती, पद्धती यांच्या संदर्भात तौलनिक पातळीवर होणारा विचार वर्तमानपत्राद्वारे प्रसारित होत होता. लोकांची मने घडविण्याचे किंवा बिघडविण्याचे प्रभावी साधन वृत्तपत्राने दिले होते. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांनी लोकांना नव्या घडामोडी वाचण्याची सवय लागली होती. ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हते, त्यांच्यासाठी वर्तमानपत्रांचे वाचनही सामुदायिक पातळीवर होत होते. शस्त्रापेक्षाही भाषा प्रभावीपणे लोकांमध्ये उठाव किंवा बंड घडवू शकते, हे कळल्यानेच टिळकांना त्यांच्या लेखनाबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता.

कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये अनेक विभाग असले तरी वर्तमानपत्राचे स्वरूप त्याच्या अग्रलेखावरून ठरत असते. पारतंत्र्याच्या काळात प्रामुख्याने हे अग्रलेख राजकीय पक्षोपक्षीय विषयांवर आधारित असत. पारतंत्र्याच्या काळातील वर्तमानपत्रे त्यांच्या अग्रलेखांवरून ओळखली जायची. संपादकांची जबरदस्त लेखणी व त्यांची राजकीय भूमिका हा वर्तमानपत्राचा कणा अग्रलेखातून प्रभावीपणे व्यक्त होत होता; आणि राजकीय पातळीवर आवश्यक असलेले जनजागरण व जनमन घडविण्याचे कार्य वर्तमानपत्रामधून संपादक करून घेत होते. स्वातंत्र्याच्या उदयानंतर हे जनजागरणाचे उद्दिष्ट व त्या दृष्टीने राजकीय क्षेत्रातील घडामोडींवर टीकाटिप्पणी करणारे संपादकीय लेखन बदलले व वर्तमानपत्राची भूमिकाही बदलू लागली. वर्तमानपत्रांच्या संख्येत वाढ झाली. त्यांच्या कक्षेत अनेक विषय येऊ लागले; पण मूळ हेतूपासून ते दूर जाऊ लागले. 'अग्रलेखां'मधील सर्वकषता, मौलिकता, चिंतन, विविध विषयांचा व्यासंग, जीवनदृष्टी यांची घसरण सुरू झाली. आजच्या वर्तमानपत्रांतही ‘अग्रलेख' किंवा संपादकीय' असते; पण त्याला पूर्वीच्या अग्रलेखाचे स्थान व दर्जा नसतो. पूर्वीचे संपादक हे समाजशिक्षकाच्या भूमिकेतून लिहीत असत. समाजजीवनावर भाष्य करून समाजाला राजकीय दृष्टीने जागृत करणे व सक्रिय करणे हे त्यांच्यासमोर एकमेव ध्येय होते. 'आधी समाजकारण की आधी राजकारण' अशा वादामध्येही राजकारणावर लक्ष देण्याची गरज नाकारली जात नव्हती आणि राजकारण' याचा अर्थ पारतंत्र्यापासून मुक्त होण्याचे मार्ग शोधणे हाच होता.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर असे समान ध्येय उरले नाही. सत्तेचे राजकारण हळूहळू उदयाला येऊ लागले. विविध पक्षोपपक्षांच्या भूमिकांनी बहुरंगी होणाऱ्या राजकीय रंगपटावर भाष्य करण्याची जबाबदारी पेलणारे विचारवंत संपादक नव्हते असे नाही; पण हळूहळ वर्तमानपत्र हा व्यवसाय होऊ लागला. कालचे वर्तमानपत्र संपादकाच्या नावाने चालत असे. आजचे वर्तमानपत्र आर्थिक सत्ता असलेल्या मालकाच्या ध्येयधोरणांनुसार चालवले जाते. आजही विचारवंत व राजकारणावर भाष्य करणारे जाणकार संपादक नाहीत असे नाही; पण त्यांच्या लेखणीला व जनजागरणाला विशिष्ट पक्षीय विचारांची मर्यादा पाळावी लागते. एकीकडे लेखन-स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या आणि लेखन-स्वातंत्र्यावरच्या बंदीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करणाऱ्या वर्तमानपत्रासारख्या माध्यमालाच असे दुहेरी स्वरूप येत चालले आहे. मुद्रक, प्रकाशक, वितरक, सरकारी कोट्यातून मिळणाऱ्या जाहिराती, बातमीदार वर्ग, सदर-लेखक असे गट तयार होऊ लागले. कोणताही उद्योग जेव्हा व्यावसायिक स्वरूप धारण करून आर्थिक दृष्टीने किफायतशीर होऊ लागतो तेव्हा तिथे धनदांडग्यांचे राजकारण आल्याशिवाय राहत नाही. वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले जाते; पण हा आधार भक्कम राहण्याचे व सरकारला व जनतेला त्रुटी दाखवून योग्य मार्गावर ठेवण्याचे कार्य ही वर्तमानपत्रे पूर्वीच्या वर्तमानपत्रांच्या तुलनेत किती प्रमाणात करू शकत आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पुष्कळदा ते फक्त बातम्या देत असतात; भलावण करीत असतात; जाहिरातबाजी करीत असतात; आणि या गोष्टींकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून जनतेला चित्रपट, क्रीडाविश्व इत्यादी विषयांतील चटकदार व खमंग वैयक्तिक-खासगी गोष्टींकडे वळवितात. पीतपत्रकारितेला उघडपणे तरी विरोध करता येतो; पण गुप्तपणाने येणाऱ्या अशा पीतपत्रकारितेची पातळी गाठणाऱ्या मजकुराला कायद्यामध्येही अडविता येत नाही. वाचकही अशा मजकुराकडे आकर्षित होतो; कारण राजकीय बातम्या, घडामोडी इत्यादींची माहिती त्याला दूरदर्शनवरून आधीच मिळालेली असते. 

आकाशवाणी व दूरदर्शन ही वर्तमानपत्रांसमोरची मोठी व जबरदस्त आव्हाने होती. त्यांच्यासमोर टिकाव धरण्यासाठी वर्तमानपत्रांना आपल्या स्वरूपात आमूलाग्र बदल करावा लागला. दूरदर्शनसारखे दृक्-श्राव्य माध्यम सर्व थरांतील शिक्षित-अशिक्षित समाजाला आकर्षित करणारे होते. मूलत:च साक्षर नागरिकांची संख्या कमी असल्याने वर्तमानपत्रांच्या वाढीला मर्यादा होत्याच; तरीही वर्तमानपत्रांनी शहरांची मर्यादा ओलांडून स्थानिक पातळी गाठली. गावोगावी निघणारी वर्तमानपत्रे किंवा महाराष्ट्र पातळीवरच्या वृत्तपत्रांच्या स्थानिक आवृत्त्या हे त्यांचे स्वरूप वर्तमानपत्रांच्या नव्या बदलत्या धोरणाची जाणीव करून देणारे आहे. स्थानिक आवृत्त्यांमधील स्थानिक महत्त्वाच्या बातम्यांमुळे ती वाचकवर्ग खेचू शकली. याच्या जोडीलाच वर्तमानपत्रांनी राजकीय घडामोडींच्या व राजकीय भाष्याच्या जोडीला अनेक विषयांवरचे लेखन द्यायला सुरुवात केली. शास्त्रीय, ललित-साहित्य, साहित्यिकांचा परिचय, महिला सदर, क्रीडाविश्व, चित्रपटजगत्, बालजगत्, पाठ्य-अभ्यासक्रम, भाषिक जागृती देणारी लेखमाला, सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचा परिचय करून देणारे लेख, व्यापारजगत्, आध्यत्मिक चिंतन, ऐतिहासिक जागरण, विनोद, म्हणी-वाक्प्रचार-शब्दसंग्रह यांचे खजिने; असे जे जे सुचेल व समाजाकडून अपेक्षिले जाईल ते ते साहित्य प्रकाशित करून रोज वाचकांच्या हातात ताजेपणाने ठेवण्याचा नियम वर्तमानपत्रांनी अनुसरला. वर्तमानपत्रांतील विजय तेंडुलकरांसारख्यांची, शांताबाई शेळकेसारख्यांची सदरे ही नंतर पुस्तकरूपानेही संग्राह्य ठरली. या काळात ग्रंथवाचन कमी होऊ लागले होते; पण अशा विविध सदरांतून वाचकाला विविध विषयांचे ज्ञान घेता येत होते.

कालची वर्तमानपत्रे सदस्यांच्या वाढत्या संख्येकडे वर्गणीसाठी लक्ष देत असतील; पण आज सदस्यांची संख्या कितीही वाढली तरी वर्तमानपत्रांचा वाढता खर्च त्यामधून भागणे शक्य राहिले नव्हते. त्यासाठी जाहिरातीचा हुकमी एक्का त्यांनी शोधला. मात्र वर्तमानपत्रांचे स्वरूपच या साधनस्वरूपी आलेल्या जाहिरातींनी बदलून टाकले. त्यांनीच वर्तमानपत्रांमध्ये इतकी जागा व्यापली की, प्रसारमाध्यमांतील वैचारिक 'प्रसार' अंग चोरून व जाहिरातीचा ‘प्रचारधंदा' मात्र तेजीत असे वर्तमानपत्रांचे स्वरूप झाले. जाहिरातींतून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी वर्तमानपत्रे निघतात की काय असे वाटावे इतके जाहिरातींचे प्रस्थ वाढले आणि त्यापेक्षाही चिंता वाटावी अशी गोष्ट म्हणजे जनजागरणाविषयी ज्या प्रसाराची गरज असते तो 'प्रसार'च प्रचाराची पातळी गाठण्याइतका खालच्या पातळीवर उतरला. एखाद्या विचाराचा व मताचा प्रसार करताना जी पथ्ये व संशोधन अपेक्षित असते, त्याचाच अभाव दिसून येऊ लागला.

आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन वर्तमानपत्रांनी विविध विषयांवर लक्ष केंद्रित करणारी वर्तमानपत्रे प्रकाशित करण्यावर भर दिला. अगदी ताजी बातमी देणारी सायंदैनिके तर अनेक वर्तमानपत्रांनी सुरू केली. शिवाय कालच्या वर्तमानपत्रांपेक्षा आजच्या वर्तमानपत्रांचे स्वरूप अधिकाधिक निर्दोष झालेले आहे. वृत्तव्यवसाय हा एक मोठा आर्थिक उलाढाल असलेला व्यवसाय म्हणून विकसित झालेला आहे. सरकारचा तो मोठा आधारस्तंभ आहे. वृत्तपत्रव्यवसायाचे पद्धतशीर शिक्षण घेतलेला वर्ग त्याचे बाह्य स्वरूप अधिकाधिक नेटके, बांधेसूद व प्रभावी कसे होईल याकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवीत आहे; म्हणूनच तांत्रिक दृष्टीने, कलात्मक दृष्टीने आजचे वर्तमानपत्र दर्शनीय आहे; पण मंत्राच्या दृष्टीने मात्र खूपच कमी पडत आहे. ते प्रचार चांगला करू शकते; पण 'प्रसारा'त कमी पडत आहे; आणि मुख्य म्हणजे एखाद्या विषयाच्या किंवा तत्त्वाच्या प्रसारासाठी आवश्यक असलेली देशविषयक किंवा समाजविषयक पोटतिडीक किंवा बांधिलकी याचीच उणीव आहे. कालच्या वर्तमानपत्रांजवळ समाजनिष्ठा व सामाजिक बांधिलकी/तळमळ उत्कटतेने होती व ती परखडपणे मांडण्याची निर्भयताही होती. आज याच दोन्ही गोष्टींची कमतरता आहे. 

सारांश .

आधुनिक काळातील पहिले लिखित प्रसारमाध्यम म्हणजे वृत्तपत्र! ते नंतरच्या प्रभावी प्रसारमाध्यमांसमोरही टिकून राहिले. मध्ययुगीन काळातील प्रसारमाध्यमे मौखिक होती. वर्तमानपत्रांच्या लिखित स्वरूपामुळे प्रसाराची कक्षा व व्याप्ती वाढली. वर्तमानपत्रे राजकीय घडामोडींसाठी व त्या अनुषंगाने इतर विषय. संपादक व त्याचा अग्रलेख हे मुख्य आकर्षण. नंतरच्या काळात वर्तमानपत्रे धनिकांच्या हातात गेली व व्यावसायिक बनली. आर्थिक मदतीसाठी जाहिरातींतील जनजागरणाने ‘प्रचारा'ची पातळी गाठली. नव्या माध्यमांसमोर टिकण्यासाठी वर्तमानपत्रांनी स्वरूप बदलले; विविधांगी बनले; विषयवार वर्तमानपत्रे निघाली. तंत्रदृष्टीने पुढारलेली आजची वर्तमानपत्रसृष्टी मंत्र हरवून बसली आहे.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: