Tuesday, 27 October 2020

Marathi Essay on "Non Violence", "अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म मराठी निबंध", "Ahinsa Marathi Nibandh" for Students

Essay on Non Violence in Marathi Language: In this article "अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म मराठी निबंध", "अहिंसा जीवनाचा नियम निबंध", "Ahinsa Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Non Violence", "अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म मराठी निबंध", "Ahinsa Marathi Nibandh" for Students

'जीवो जीवस्य जीवनम्।' हा प्राण्यांच्या जीवनाचा धर्म सांगितला जातो; पण माणसाच्या जीवनाचा धर्म मात्र क्षमा, शांती, दया, करुणा, अहिंसा या तत्त्वांमधून व्यक्त होत असतो. मानवी समाजाची बैठक या मल्यांवर आधारलेली असते. प्रत्येक धर्मामध्ये या तत्त्वांचा उद्घोष होत असतो. मनुष्य म्हणून णुसकीचे जतन या मूल्यांतन केले जाते. मोठे मासे छोट्या माशांना गिळत असतात. पण मानवी संस्कती मात्र छोट्यांनाही माणुसकीचे धडे देत बलवान व्हायला मदत करीत असते. मानवी संस्कृतीची मंदिरे ज्या तत्त्वांवर आधारलेली असतात त्या तत्त्वांपैकी 'अहिंसा' हे एक मानले जाते.

अहिंसेचा पाया मानवी मनातील करुणा, दया हा आहे. त्यापेक्षाही हिंसेला हिंसेने उत्तर देण्यापेक्षा अहिंसेच्या सामर्थ्यावर ती रोखता येते, हा विश्वास त्यामध्ये आहे. शारीरिक सामर्थ्यापेक्षा माणसाजवळ असलेल्या बुद्धीच्या व मनाच्या शक्तीला आवाहन करून अहिंसा हिंसेचा प्रतिकार करू शकते, हा विश्वास अहिंसा तत्त्वाच्या पाठीशी आहे. महात्मा गांधीजींनी आधुनिक युगातही याच मानसिक शक्तीला जागृत करण्याच्या भूमिकेतून 'अहिंसा' तत्त्वावर भर दिला आहे. 

'अ-हिंसा' हे तत्त्व नकारात्मक आहे. 'हिंसा' नाही ती 'अहिंसा'; पण एवढाच त्याचा अर्थ नाही, तर जेव्हा माणूस हिंसेकडे वळतो तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीला विचार पटवून देण्यात तो दुबळा ठरल्याने त्याच्यावर शारीरिक दृष्टीने शासन करीत असतो. कदाचित त्यामुळे त्याच्यावर अन्यायही होत असेल, अशा वेळी ज्याच्यावर अन्याय होतो, तोही मग शस्त्राच्या साह्याने हिंसेचा प्रतिकार हिंसेने करू पाहतो. हिंसेला हिंसेने उत्तर दिल्याने हिंसाचार वाढतो; पण तोच प्रतिकार अहिंसेने केला व हिंसाचार करणाऱ्याला अहिंसेने अडवले तर हिंसाचाराला आळा बसतो. प्रश्न आहे तो हिंसेचा प्रतिकार अहिंसेने करता येतो तो किती मर्यादेपर्यंत? जर माणुसकीची मूल्ये शत्रूच्या रक्तात भिनलेली असतील तरच हिंसेला या मार्गाने प्रतिबंध होऊ शकतो. महात्मा गांधीजींना हा विश्वास आहे. येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, महावीर इत्यादी धर्मसंस्थापकांचा व प्रेषितांचा हा विश्वास आहे. मानवातील करुणा, दयावृत्ती जागृत करण्याचे सामर्थ्य अहिंसेत आहे. शत्रूच्या हातातील शस्त्र काढून घेण्यापुरता प्रतिकार करावा; पण शस्त्राला ताकद देणारे शत्रूचे मन अहिंसेने जागे करावे. दुष्ट, राक्षसी प्रवृत्तींचा नाश करायचा आहे, माणसाचा नव्हे; हे तत्त्व नजरेसमोर असेल तर शत्रूच्या हातातील शस्त्रे निकामी करण्यापुरतीच हिंसेची मदत घ्यावी. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचे तर 'दुरिता'च्या 'दुष्टपणा'चे निर्दालन करायचे असते, माणसातील दुष्ट प्रवृत्ती नामशेष करायच्या असतात, माणसे नव्हेत.

हा विचार लक्षात घेऊन गांधीजींनी तिला समर्थांचे शस्त्र म्हटले आहे. दुबळ्यांची व भेकडांची अहिंसा, हे करू शकत नाही. ही अहिंसा राजकीय क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न सम्राट अशोकाने केला; म्हणून तर अशोकचक्राला भारतीय ध्वजचिन्हामध्ये स्थान मिळाले. गांधीजींनी हे जीवनमूल्य राजकारणात शस्त्र म्हणून उपयोगात आणले व निःशस्त्र असलेल्या भारतीय जनतेच्या मनात सरकारविरोधी उठाव करण्याचे बळ आणून दिले. 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?' हे सत्य असले व भारताचे स्वातंत्र्यही केवळ अहिंसेच्या पालनाने मिळालेले आहे असे नाही, हे वास्तव असले तरीही न्यायाचा पुळका असल्याचा देखावा करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला ‘अहिंसा' व 'सत्याचा आग्रह' या मूल्याधिष्ठित नव्या मार्गाने गोंधळून टाकले, हे नाकारता येत नाही. हिंसेमध्ये शस्त्राचे बळ आहे; पण अहिंसेमध्ये शापाचे बळ आहे. क्रौंच पक्ष्यांच्या जोडीतील एकाला कोणा पारध्याने मारण्याच्या उद्देशाने बाण मारून घायाळ केले, ते पाहणाऱ्या वाल्मिकींच्या अंत:करणात दया उत्पन्न झाली व लगेच त्यांच्या तोंडून 'मा निषाद प्रतिष्ठा त्वं' ही शापवाणी उच्चारली गेली. निरपराध पक्ष्यांना मारणाऱ्या पारध्यांच्या जातीला कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही, हा शाप अहिंसेची वाटचाल कशी होत आली, हे सांगणारा आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक असलेल्या श्रीचक्रधरस्वामींकडे पारध्याच्या भीतीने घाबरलेला ससा आश्रयासाठी आला आणि त्याच्या मागोमाग येणाऱ्या पारध्याने सशावर हक्क सांगताच स्वामींनी त्याला विचारले, 'ज्याने प्राण वाचविला त्याचा त्यावर हक्क असतो. प्राण घेणाऱ्याचा हक्क कसा?' पारध्याला मुकाटपणे मागे परतून लावण्याचे सामर्थ्य स्वामींच्या न्याय्य वाणीत होते; म्हणून अहिंसा तत्त्वाचे पालन होऊ शकले. अहिंसेच्या पाठीशी अशी पुण्याई व कोणत्या ना कोणत्या प्रकारचे बळ असावे लागते. गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाच्या पाठीशी त्यांनी लोकमताचे सामर्थ्य उभे केले होते.

अहिंसेचे उगमस्थान मानवजातीबद्दलची अपार करुणा हे होय. धर्म-संस्थापकांच्या व प्रेषितांच्या मनात मानवी मनाच्या उन्नयनाची अवस्था म्हणून अहिंसेला किंमत होती. 'अहिंसा परमो धर्मः।' ही एक जीवनप्रणाली म्हणून काहींनी स्वीकारलेली आहे. केवळ मानवजातीपुरतीच त्यांची अहिंसावृत्ती मर्यादित ठेवणे त्यांना संमत नव्हते. अखिल विश्वातील सर्व जीवसृष्टीबद्दलच त्यांच्या मनात ही करुणा भरून राहिलेली होती. आजही अनेक जीवदया केंद्रांतून प्राण्यांना खायला देणे, त्यांच्या हिंसेला विरोध करणे ही कार्य संस्थात्मक पातळीवर केली जातात. मांसाहारास तर त्यांचा सक्त विरोध असतोच; पण माणसाच्या हालचाली, श्वासोच्छ्वासादी क्रिया यांच्यामुळेही अनेक सूक्ष्मातिसूक्ष्म प्राण्यांची हत्या होत असते हेसुद्धा टाळण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही छोट्यातल्या छोट्या प्राण्यालाही इजा न पोहोचविता जगणे हे माणसाला शक्यच नाही, हे तत्त्व लक्षात ठेवायला पाहिजे. झाडाझुडुपांवरील जीव-जिवाणूंची काहींच्या मते तर झाडाझुडुपांचीही त्यांना जीव असल्याने- कळत नकळत हत्या होत असते. आपल्या डोळ्यांनासुद्धा किंवा दुर्बिणीला सुद्धा न दिसणारे जीव आपल्या पायाखाली. मारले जात असतात. ते आपण टाळू शकत नाही. इतकी पराकोटीची अहिंसा पाळणे माणसाला शक्य नसते. शिवाय जाणीवपूर्वक किंवा सूडबुद्धीने केलेली हिंसा वेगळी. माणसाच्या मनातील भावनिक पातळीवर हिंसेबद्दल घृणा असणे हे महत्त्वाचे आहे. ते प्रत्यक्षात जितके आणता येईल तितके आणण्याचा प्रयत्न करावा; पण आपल्या जगण्यामुळे घडणारी ही हत्या हा त्याचा गुन्हा मानला जाता कामा नये.

हिंसा अनेक प्रकारची असते. बौद्धिक व विशेषतः भावनिक पातळीवरची हिंसा लक्षात येत नाही; पण अशा मानसिक व बौद्धिक पातळीवरच्या दुखविण्यानेच शारीरिक पातळीवर हिंसा करण्याची वृत्ती बळावते. ज्या वेळी कोणत्याही त-हेने एखादा मनुष्य किंवा समाजगट आपला हेका/हट्ट सोडायला तयार नसतो तेव्हा त्याला शारीरिक दमदाटीशिवाय किंवा शारीरिक दखापतीचा धाक दाखविल्याशिवाय दसरा पर्याय नसतो. 'छडी लागे छमछम' हे शिक्षणातले जने व सध्या बाद केलेले तत्त्व याच विचारसरणीवर आधारलेले आहे; पण याला 'हिंसा' असे म्हटले जात नाही. त्याच्या पाठीशी सधारण्याचे उद्दिष्ट असते: म्हणन त्याला 'शासन' म्हटले जाते, हिंसा नव्हे. हिंसेमध्ये पराकोटीची क्रूरता असते. विरोध पूर्णपणे निपटून काढण्यासाठी विरोधकाचा पूर्ण निःपात करणे, हा हिंसेचा हेतू असतो. युद्ध, हल्ले इत्यादी जमावाने होणाऱ्या हिंसेला केवळ सत्तास्पर्धेचे आकर्षण कारणीभूत झालेले असते. अशा प्रकारच्या हिंसेचा प्रतिकार 'शठम् प्रति शाठ्यम् ।' या न्यायाने करण्याची प्रवृत्ती स्वाभाविक समजली जाते. ठोशाला उत्तर ठोशानेच द्यावे लागते, असा आतापर्यंतचा इतिहास आहे; पण अशा 'जशास तसे'ने मानवी संस्कृतीने युगानुयुगे जतन केलेल्या जीवनमूल्यांचाच व्हास होतो, हे थेट महाभारतकालीन युद्धांपासून आजपर्यंतच्या सगळ्याच प्रकारच्या रणधुमाळ्यांनी सिद्ध केले आहे.

हे जीवनमूल्यांचे रक्षण करायचे असेल तर हल्लेखोर राष्ट्रांना अडविण्याचा पर्याय शोधता आला पाहिजे. हा पर्याय म्हणून अहिंसा सांगितली जाते. दुसऱ्या राष्ट्राच्या शस्त्राला उत्तर शस्त्राने द्यावे; पण त्याला शस्त्राचा अवलंब करण्याचे धैर्य होऊ नये इतके आपले शस्त्रसामर्थ्य बळकट करता आले असेल तर युद्धाची ठिणगी पडण्याची वेळ लांबत जाऊ शकते. ज्यांच्याजवळ युद्ध करण्याची व जिंकण्याची जय्यत तयारी आहे त्यांनी केवळ सत्तेच्या लोभाने जग जिंकण्याच्या वेड्या ऊर्मीपोटी रणसंहार मांडू नये; पण जर कुणी युद्धाचे आव्हान दिले तर आपल्या युद्धसामर्थ्याने त्याच्या हिंसेला कह्यात ठेवावे; पण 'शक्तिपरेशाम् परपीडनाय ।' असा आपल्या शक्तीचा दुरुपयोग करू नये, ही भूमिका अहिंसेचे तत्त्व स्पष्ट करणाऱ्याची आहे. योग्य ध्येयाच्या सिद्धीसाठी युद्ध करावे लागले तर गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वामध्ये ते बसू शकते.

आपण कुणाला दुखापत करू नये हे मान्य; पण आपल्यावर कुणी हल्ला केला तर शारीरिक बळ एकवटून प्रथम त्याचा प्रतिकार करायला पाहिजे. विशेषतः ज्याच्यावर राज्याच्या रक्षणाची व संरक्षणाची जबाबदारी आहे, अशा राजसत्तेने अशा परकीय आक्रमणाविरुद्ध प्रजेचे संरक्षण करण्यासाठी हिंसेचा मार्ग अवलंबिला तर ती राजसत्ता ‘अहिंसातत्त्वाच्या विरोधी ठरते काय?' मत्त माजलेल्या हत्तीसारखी ज्यांची प्रवृत्ती आहे, त्यांना काबूत आणण्यासाठी हिंसेचा अवलंब कधी कधी योग्य ठरतो. ज्याच्यावर कोणत्या ना कोणत्या पदाची जबाबदारी आहे, त्याने हिंसेचा किंवा अहिंसेचा वापर विचारपूर्वकच करायला पाहिजे. अहिंसेच्या संदर्भात सांगितला जाणारा एक दाखला लक्षात ठेवण्यासारखा आहे. सापाने कुणाला विषारी दंश करू नये हे मान्य; पण साप विषारी दंश करणार नाही हे कळल्याने पोरेसोरेसुद्धा त्याला खेळण्यासारखे वागवतील व जगणे कठीण करून टाकतील. स्वतःच्या सामर्थ्याचा व पराक्रमाचा उपयोग दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करू नये; पण आपल्यावर हल्ला करण्याची किंवा आपल्याला दुखविण्याची हिंमतही शत्रूला होता कामा नये, हे तत्त्व राजसत्तेने जसे पाळायला पाहिजे तसेच सर्वसामान्य माणसाने आपल्या नित्याच्या व्यवहारातही अनुसरायला पाहिजे.

हिंसेने हिंसेचा प्रतिकार करण्यापेक्षा क्षमाशीलता व सहनशीलता यांमुळेही हिंसेला प्रतिबंध करता येतो. इतिहासातील एकनाथ महाराजांसारख्या संतांचे उदाहरण घेऊ. सहनशीलतेमुळे ते विरोधकाला नमवू शकले. गोदावरी नदीवरून स्नान करून येणाऱ्या एकनाथांच्या अंगावर एक यवन थुकला. ते परत जाऊन स्नान करून आले; पण यवनाने त्यांच्या अंगावर धुंकण्याचा क्रमही सोडला नाही. दरवेळी न रागावता एकनाथ परत नदीवर जाऊन स्नान करून येऊ लागले. शेवटी त्यालाच आपल्या वर्तनाची लाज वाटली. एक प्रकारे अहिंसेचा हा भिन्न मार्ग! ब्रिटिशांसारख्या सत्ताधीशांसमोर याच तत्त्वाचा यशस्वी वापर करून गांधीजींनी लोकांना अहिंसाचरण शिकविले. 

धर्मसंस्थापक, प्रेषित किंवा साधुसंत इत्यादींनी अहिंसेचे आचरण करायला सांगणे वेगळे, आणि राजकारणाच्या क्षेत्रातील महात्मा गांधीजींसारख्या नेत्याने राजकारणातील एक शस्त्र म्हणून त्याचा वापर करणे वेगळे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील प्रसंग त्याच्यापुरते सीमित असतात. 'क्षमा शस्त्र जया नराचिया हाती । दुष्ट तयाप्रती काय करी ।' असा अनुभव तुकाराम महाराजही सांगतात; पण राजकारणासारख्या सत्तास्पर्धेच्या खेळामध्ये अहिंसेचे व सत्याग्रहाचे महत्त्व गांधीजींनी आग्रहपूर्वक मांडले व आचरणात आणण्याचाही मनःपूर्वक प्रयत्न केला; पण अशा तत्त्वाचे आचरण करण्यासाठी असलेली मानसिक शक्ती सर्वसामान्य माणसांजवळ नसते. जेव्हा प्रतिकार करण्याचे बळच अंगी नसते तेव्हा तो अहिंसेचा आश्रय घेतो व सामर्थ्य मिळताच हिंसेकडे वळतो. भृगुऋषींनी मारलेली लाथ छातीवर झेलण्याचे सामर्थ्य एखादा नारायणच दाखवू शकला. त्यासाठी अंगी देवत्वाचे गुण बाणवावे लागतात .

एक मात्र स्पष्ट आहे की, माणसांच्या दुःखांचे मूळ हिंसेमध्ये आहे. ऐहिक लाभांच्या मागे लागलेला आजचा आधुनिक काळातील मानव तर हिंसेच्या मार्गावरून हलायलाही तयार नाही. आज तर युद्धाच्या हिंसाचारामध्येही रसायनांनी आणि अण्वस्त्रांनी विश्वसंहारात्मक भयानकता आणलेली आहे. रोगजंतूंचा हवेमध्ये फैलाव करून शत्रुसंहार करण्याची, संहाराची राक्षसी पद्धती शोधून विज्ञानाने माणसातील हिंसाचारी प्रवृत्तीला खतपाणीच घातले आहे. हिरोशिमाची घटना तर मानवाच्या मनातील सत्याबद्दलचे, सद्गुणांबद्दलचे, माणसाबद्दलचे प्रेमच आटत चालले आहे, हे स्पष्ट करणारी आहे. माणसातील माणुसकी नष्ट होण्याचे कारण सर्व क्षेत्रांतील स्पर्धेमुळे वाढत चाललेली हिंसा हे आहे. कुणीतरी महात्मा येऊन हे सांगेपर्यंत आपण हिंसेच्या वाटेवर करीत असलेली ही वाटचाल थांबविणार आहोत की नाही?

शारीरिक पातळीवरची हिंसा दिसू शकते, दाखविता येते; पण हिंसेचे प्रकार विविध आहेत. मानसिक किंवा बौद्धिक पातळीवर इतरांचे केले जाणारे शोषण ही सुद्धा एक प्रकारे हिंसाच होय. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासावर आणली जाणारी मर्यादा हे हिंसेचे दुसरे रूपच ठरू लागते. मात्र व्यक्तीचे स्वातंत्र्य कशाला म्हणायचे आणि तिचे स्वैराचारी वर्तन कशाला म्हणायचे याचे भान आज ठेवले जात नाही. व्यक्तितत्त्वांमागील तात्त्विक विचारसरणी निकोप असते; पण प्रत्यक्षात त्याच्या उपयोगामध्ये 'अहंपणा' व 'अहंसत्ता' राबविली जाते. व्यक्तिस्वातंत्र्य व समाजधारणा यांचा समन्वय साधणारी वृत्ती बळावत जाण्यापेक्षा स्पर्धात्मक पातळीवर स्वार्थ व भ्रष्टाचार वाढत चालला आहे. हिंसेचीच ही दुसरी रूपे आहेत. सांस्कृतिक वातावरण बिघडवून टाकण्याचे कार्य, शांततेच्या काळातही या प्रवृत्ती करीत असतात. अहिंसेचा हिंसेच्या या पिलावळीला विरोध आहे.

सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक वा मानसिक क्षेत्रांतही वाढत चाललेल्या हिंसेचे मूळ भोगवादी व जडवादी जीवनसरणीमध्ये आहे. अधिकाधिक भौतिक पातळीवरील उपभोगाच्या मागे लागलेल्या आजच्या समाजाचे दर्शन वि. स. खांडेकरांच्या 'ययाती'मध्ये पाहायला मिळते. भोगवादाला सीमा नसते, इतरांचा व समाजाचा विचार करणे त्यांना मूर्खपणाचे वाटते. 'यावत् जीवेत्' सर्वच्या सर्व फक्त आपणच उपभोगावे ही वृत्ती प्राण्याच्या जीवनपातळीपेक्षाही क्षुद्र आहे. बुद्धीच्या जोरावर मानव आकाशाला गवसणी घालू पाहत आहे व सागराचा तळ शोधू पाहत आहे; पण पृथ्वीच्या पाठीवरचे आपले जीवन कसे समृद्ध व सुखीसमाधानी होईल, याचा मंत्र ज्या अहिंसादी जीवनमूल्यवादी विचारसरणीत दडलेला आहे, त्याचे भान त्याला नाही. माणसाचा तो स्वत:च शत्रू झालेला आहे. विज्ञानातूनच भस्मासुर निर्माण होत आहे, त्याला आवरण्यासाठी करुणेचा झरा अहिंसेमधून वाहता ठेवण्याची गरज आहे. 

सारांश 

अहिंसा हे मानवी मूल्य मानले जाते. हिंसाचार करणाऱ्याच्या प्रवृत्ती बदलणे हे अहिंसेला शक्य होऊ शकते. गांधीजींनी हे मानवी तत्त्व राजकारणात शस्त्र म्हणून योजले. त्यांच्या अहिंसा तत्त्वाच्या पाठीशी लोकमताचे सामर्थ्य त्यांनी उभे केले.

प्राणिमात्रांची हिंसा न करणे हे अहिंसेचे व्यापक रूप आहे; पण अहिंसा पाळणे वेगळे व स्वत:च्या जगण्यासाठी अहिंसक होणे वेगळे. हिंसेचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक असे वर्गीकरण करता येते. तसेच अहिंसेचेही करता येते. हिंसेच्या पाठीमागे असलेला हेतू विनाशक असतो; म्हणून शासन वेगळे व हिंसा वेगळी! अन्यायाच्या प्रतिकारार्थ होणारे कृत्य, अन्यायाचे परिमार्जन झाल्यावर बदलले पाहिजे. मानवी दुःखाचे मूळ हिंसेमध्ये आहे. अतोनात महत्त्वाकांक्षेपोटी माणसे हिंसेचा स्वीकार करतात. विज्ञानामुळे त्याला मदत होत आहे. बौद्धिक पातळीवरील हिंसा व्यक्तिस्वातंत्र्याला घातक आहे; पण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली वाढणारे स्वार्थ व भ्रष्टाचार हे हिंसेचेच रूप आहे. समाजात मानवी मूल्ये जपलेली असल्याशिवाय अहिंसेचे पालन करणे अवघड असते.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: