Wednesday, 28 October 2020

Marathi Essay on "Science and Art", "शास्त्र आणि कला : आंतरिक संबंध मराठी निबंध" for Students

Essay on Science and Art in Marathi Language: In this article "शास्त्र आणि कला : आंतरिक संबंध मराठी निबंध", "विज्ञान आणि कला मराठी निबंध" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Science and Art", "शास्त्र आणि कला : आंतरिक संबंध मराठी निबंध" for Students

Marathi Essay on "Science and Art", "शास्त्र आणि कला : आंतरिक संबंध मराठी निबंध" for Students

'साहित्य, संगीत कलाविहीनः साक्षात् पशु पुच्छविहीनः' असे कलेचे महत्त्व सांगितलेले आहे. माणसाला माणूसपण येते ते साहित्य, संगीत, शिल्प, नृत्य, चित्र, नाट्य इत्यादी कलांच्या सान्निध्यामुळे. ज्यांना ही कलानिर्मिती जमत असेल ते तर कलावंत म्हणूनच जगाच्या समोर येतात. कलास्वाद घेणे हे प्रत्येक माणसाच्या रक्तात असते. त्याला वाव देणे व कलेला कमी प्रतीचे न समजणे हे मनावर ठसविण्याचा प्रयत्न हे सुभाषित करीत आहे; कारण सामान्यतः बुद्धिवंत व कलावंत यांमध्ये बुद्धिवंतांबद्दल समाजात आदर असतो; पण कलावंताला तितका सन्मान दिला जात नाही. प्रत्येक घरात 'ज्ञानेश्वर' जन्मावेत ही अपेक्षा पालक करतात; पण आपल्या पाल्याला कलावंत घडविण्याचे स्वप्न फार थोडेजण पाहतात. याचे कारण उघड आहे. बुद्धीच्या जोरावर अर्थार्जनाचा मार्ग सापडतो; पण कलेच्या जोरावर उपजीविकेची वाट आपली आपण हुडकून काढावी लागते. पदवी देणाऱ्या अभ्यासक्रमात बुद्धीची मशागत करण्याचे पद्धतशीर प्रयत्न राबविले जातात; पण तितका भर कलेची जपणूक व विकसन करण्यावर नसतो. अर्थात, अलीकडील काळात मात्र संगीत, चित्र, शिल्प इत्यादी कलांचे पद्धतशीर शिक्षण देण्याकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष वळलेले आहे हे, स्तुत्यच आहे; पण ज्यामुळे प्रतिष्ठा येते त्या बुद्धीच्या प्रांगणातील ज्ञानावर आधारलेल्या शास्त्रकारणाच्या कसोटीला महत्त्व येणे स्वाभाविक आहे.

बुद्धीच्या तीक्ष्ण प्रकाशात पाहणारी शास्त्रदृष्टी व मनातील भावभावनांच्या आंदोलनात जीवनाचा अर्थ शोधणारी कलादृष्टी या एकमेकांच्या विरोधी आहेत, असा समज आजच्या या शिक्षणपद्धतीने अधिक प्रमाणात तर पोसला गेलेला नाही ना? निरीक्षण, प्रयोग, विश्लेषण, निष्कर्ष इत्यादींच्या आधारे शास्त्राची वाटचाल होत असते. व्यक्तिनिष्ठतेपेक्षा वस्तुनिष्ठतेला शास्त्रात महत्त्व असते. सत्यान्वेषण हा तिचा धर्म आहे. जे आहे, जे काटेकोर नियमांच्या आधारे सिद्ध झाले आहे, ते स्वीकारणे ही शास्त्राची शिस्त आहे. वास्तवाचे बुद्धिगम्य आकलन करण्यावर शास्त्राचा भर असतो. 'दोन अधिक दोन बरोबर चार म्हणजे चारच' हे त्याचे सांगणे असते. शास्त्राला वास्तवाचे घटकशः विश्लेषण करता येते; पण शास्त्रालाही अमर्याद विश्वाचे आकलन बुद्धीच्या नजरेतून पूर्णांशाने होते काय? कार्यकारणसंबंधाने सगळेच वास्तव आकलन होऊ शकते काय? काटेकोरपणाच्या चिमटीतून सत्याचा अंश काही शास्त्रांमधून गळून तर जात नाही ना, अशा शंका शास्त्रालाच येऊ लागल्या आहेत आणि सत्याचा शोध घेणाऱ्या व्यक्तीची दृष्टी कितीही वस्तुनिष्ठ ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी तिच्या व्यक्तित्वातील विशेष रंग त्यामध्ये उतरतातच, ते तिलाही रोखता येत नाहीत, हे आज शास्त्रालाही संमत होऊ लागले आहे. विशेषतः इतिहास, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, व्याकरण, मानसशास्त्र यांसारख्या शास्त्रांमध्ये गणितादी शास्त्रांइतका काटेकोरपणा येऊच शकत नाही. व्यक्तिमत्त्वाचे रागरंग, मते, समजुती इत्यादींचा त्या त्या निष्कर्षावर प्रभाव पडत असतो, हे मान्य झाल्यामुळे शास्त्राच्या जोडीला विज्ञानशाखा मानल्या जाऊ लागल्या आहेत. निरीक्षणात किंवा विश्लेषणातही त्रुटी राहू शकतात व शास्त्रात अपुरेपणा येऊ शकतो, याची जाणीव बुद्धीला होऊ लागली आहे.

शास्त्रीय शोधांच्या द्वारे मानव आज ग्रहगोलावर वसाहत करण्याचा विचार करू लागला आहे. संगणकाच्या आधारे किंवा यंत्रमानवाच्या आधारे किंवा क्लोनच्या शोधाद्वारे त्याला मानवाची निर्मिती करण्याची वाट सापडू पाहत आहे; पण त्याच्या शोधांना ही दिशा वास्तवातील घटना पाहूनच मिळते. झाडावरून खाली पडणारे फळ व आकाशात उंच उडविलेली जड वस्तू पृथ्वीच्या दिशेनेच झेपावते हे अनेकदा पाहूनच मानवाला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला; पण निसर्ग व स्वत:चे मन हे मानवी बुद्धीला सर्वांगाने आकलन होऊ शकत नाहीत, ही बुद्धीची मर्यादाही त्याला अनेकदा जाणवली. या गूढ रहस्यांचा शोध त्याला मनाच्या मदतीने निदान अंधुकसा तरी लागू शकतो; हे अध्यात्माच्या क्षेत्रात त्याच्या प्रत्ययास आले.

सत्याचा शोध घेण्याची बुद्धीची चलती तर्कशास्त्राचा हात धरून चालते. 'यत्र यत्र धूमः तत्र तत्र अग्नि।' या न्यायाने बुद्धी सत्यापर्यंत पोहोचते. कलांमध्येही असे तर्कशास्त्र असते, विश्लेषण असते; पण त्याची जातकुळी वेगळी असते. प्रत्येक कलाकृती प्रथम बौद्धिक पातळीवर समाधान करीत असते; त्याशिवाय तिचा रसास्वाद घेता येत नाही. बुद्धीला पटणे, संभाव्य वाटणे व नंतरच आस्वाद ही प्रक्रिया कोणत्याही कलाकृतीच्या संदर्भात घडत असते; पण हे पटणे साचेबंद नसते. एखाद्या चित्रामध्ये निळ्या रंगाशेजारी हिरवा रंग योग्य आहे की नाही, हे ती चित्राकृती निश्चित करीत असते. इंदिराजी गांधी किंवा विन्स्टन चर्चिल यांच्या व्यंगचित्रात दाखविलेले नाक प्रत्यक्षात त्याच आकाराचे आहे की नाही, हे व्यंगचित्रात शोधायचे नसते; तर त्यामधून त्या त्या व्यक्तिमत्त्वाचा चित्रकाराला सांगायचा असलेला विशेष खरा की खोटा हे शोधायचे असते. कलाकृतीमधील सत्य हे लेखकाने 'पाहिलेले' सत्य असते; त्याला 'जाणवलेले' सत्य असते. त्याला फुलाकडे पाहून 'फुलराणी' दिसली म्हणून प्रत्येक फूल फुलराणीसारखे व्यक्तिमत्त्व धारण करणारे नसते; आणि तरीही ती फुलराणी वास्तव असते. साहित्यातील त्या विशिष्ट कवितेच्या संदर्भात ते बुद्धीचे समाधान करणारे असते. एखाद्या कवीला फुलाकडे पाहून 'निसर्गापासून मानव किती दूर आलेला आहे' ही व्यथा अस्वस्थ करते; तर एखाद्याला 'वनवासी फूल' पाहून अध्यात्म-विचार सुचतात. शास्त्रज्ञ मात्र फुलांच्या विविध घटकांचे विश्लेषण करून त्यांच्या जाति-उपजाती, त्यांना फुलण्यासाठी आवश्यक असलेले हवा-पाणी-खत किंवा त्यांचे औषधी उपयोग यांची सिद्ध करता येईल अशी माहिती देतो. फुला-पानांच्या निसर्गचित्रणात कवी, त्याला दिसणाऱ्या आणि जाणवणाऱ्या निसर्गास त्याच्या अनुभवाचे रंगरूप देतो. वास्तवात त्याचे रंगरूप कोणते आहेत याची दखल त्याला घ्याविशी वाटत नाही; कारण फुलाफळांची सृष्टी पाहून त्याच्या मनावर होणारा सौंदर्याचा, प्रसन्नतेचा, आनंदाचा किंवा जीवनविषयक चिंतनाचा शिडकावा तो त्या चित्रणातून व्यक्त करीत असतो. कलेचा आस्वाद घेणाऱ्या रसिकालाही याची समज आलेली असते. बौद्धिक पातळीवरची जाणीव आणून देणे एक वेळ सोपे असते; पण ही कलेची समज जागृत करणे तितकेसे सोपे नसते. आंब्याचा आकार, रंगरूप सांगता येते; पण त्याची चव अनुभवल्याशिवाय कळत नसते. बौद्धिक क्षेत्राची धाव कळण्यापर्यंत/ आकलनापर्यंत असते; पण कलेचे क्षेत्र मात्र वळण्याशी/आचरण करण्याशी संबंधित असते. कलेच्या संदर्भात वस्तू हे निमित्त असते. कलावंत त्या वस्तूच्या निमित्ताने जीवनविषयक चिंतन सांगत असतो. एवढेच नव्हे तर, त्या सत्याच्या चिंतनाला सौंदर्याचे रंग आलेले असतात. शर्करामिश्रित औषधामध्ये औषध व साखर ही भिन्न असतात; पण कलाकृतीमध्ये मात्र दोन्ही एकजीव होऊन आपल्यासमोर येत असतात.

कधी कधी बुद्धीपेक्षा मनाची झेप फार दूरवर पोहोचते आणि एखाद्या साध्या विषयाच्या आधारे मनाला कल्पनाशक्तीच्या व अंत:प्रेरणेच्या मदतीने विश्वाचे नियम जाणवायला लागतात. विश्वनियमांचा शोध घेणाऱ्या बुद्धीच्या आधी भावनाप्रधान व संवेदनशील मनाचा कलावंत तेथे पोहोचतो. अद्भुत, विज्ञान आणि कथासाहित्यातील अद्भुतता व शिक्षण हे असेच माणसाला ग्रहगोलावर नेण्याचे स्वप्न पाहते. ग्रहगोलावरची प्रतिसृष्टी कशी असेल; यंत्रमानव कसा असेल इत्यादींचे कल्पनारम्य चित्रण प्रथम साहित्यात आले आणि नंतर बुद्धीला त्यामागून जाण्याची वाट शोधाविशी वाटली. भूतकथा, चांगल्या रहस्यकथा, इसापनीती इत्यादींमधून मानवी मन व प्रवृत्तींबद्दलचे चित्रण आले आणि मानसशास्त्राला सिद्धान्त शोधायला मदत झाली. एवढेच कशाला? आइन्स्टाईनसारखा संशोधक हा संगीततज्ज्ञ होता. यावरून एकाच व्यक्तीमध्ये बुद्धी व मन कसे कार्यप्रवण होतात ते कळू शकेल.

कलावंताची कल्पनाशक्ती जागृत व्हायला साधेही कारण पुरत असते. सत्यापर्यंत जाण्याचा त्याचा मार्ग वेगळा असतो. 'धोंड्यामधुनी दिसते कवीला' असे याच अर्थाने म्हटले जाते. शास्त्राच्या सत्यान्वेषी दृष्टीच्या पलीकडचे परमसत्य त्याला जाणवू शकते. बुद्धीने वस्तूचे जड रूप आकलन होत असते. तो तिचा अट्टाहास असतो; पण कलेला वस्तूचा सर्वांगीण शोध घेता येतो. मन व बुद्धी यांच्या नेमक्या समन्वयाने सत्याचे आकलन व्हायला मदत होते.

सत्य सत्य म्हणजे तरी काय? बुद्धीला जाणवलेल्या सत्याच्या रूपाचे रंगही विविध असतात. अपवाद, प्रत्यापवाद सांगावे लागतात; आणि कधी अपवादांची संख्या अधिक भरली तर नियम बदलून घ्यावा लागतो. मुंबईसारख्या शहराबद्दलचे एक सत्य सांगते की, ते बकाल शहर आहे; तर दुसरे सत्य सांगते की ते अत्यंत गजबजलेले शहर आहे; लालबाग-परळच्या वस्तीकडे पाहून काढलेले निष्कर्ष, कुलाबा-मलबार हिलवरून काढलेल्या निष्कर्षांपेक्षा वेगळेच असणार; आणि हे सर्व सत्यच असते, वास्तव असते; याचे कारण सत्याला, भांड्याला जसा आकार असतो तसा आकार, रंगरूप नसते; तरीही ते आपल्या बुद्धीला जाणवलेले असते. बुद्धीला पटवून देता येणाऱ्या सत्याला त्रिकालाबाधित सत्य म्हणतात; पण त्याला जेव्हा अनुभूतीची जोड मिळू शकते तेव्हा त्यामध्ये विश्वात्मकता येते.

सत्य, शिव व सौंदर्य यांचा शोध कला घेत असते; तर शास्त्राला त्यामधील फक्त सत्याबद्दल अधिक ओढ असते. मात्र शास्त्रांचा व विज्ञानाचा विकास जसजसा होऊ लागला तसतसा कलेला त्याचा उपयोग झाला. छायाचित्रणाचा शोध लागण्यापूर्वी निसर्गाचे हुबेहूब चित्रण करताना चित्रकाराला किती मेहनत घ्यावी लागत असेल, याची कल्पना आपल्याला येऊ शकते; पण छायाचित्रणाच्या कल्पनेने तोच निसर्ग एका क्षणात कागदावर बंदिस्त करता येतो. मानसशास्त्रातील संशोधनामुळे साहित्यातील मनोविश्लेषण अधिक काटेकोर होऊ लागले. साहित्यातील 'संज्ञाप्रवाहांचे चित्रण' किंवा चित्रकलेतील 'प्रतीकात्मता' इत्यादींचा संबंध शास्त्रीय प्रगतीशी आहे. आजच्या संगणकाच्या शोधाने कलावंतांच्या कल्पनाशक्तीला एका वेगळ्या विश्वाचे दालन खुले करून ठेवले आहे. 

तांत्रिक प्रगतीने तर कलेला घरोघरी पोहोचायला प्रचंड साहाय्य केले आहे. मुद्रणकलेने साहित्यातील अक्षरबद्ध कलेला अक्षरश: अ-क्षरस्वरूप आणून दिले आहे. समाजातील साहित्यिकांना लेखनसुलभता आणून दिली आहे. आकाशवाणीच्या सुरांनी संगीताचे वेड विकसित केले. दूरदर्शनने कलेला समाजाच्या जवळ आणून सोडले.

शास्त्राची दृष्टी भावनारहित असते व ती देत असलेल्या ज्ञानामध्ये आनंद गुदमरून जातो किंवा ज्ञान प्राप्त झाले की जिज्ञासेतील आनंद संपतो, असे म्हटले जाते; पण ते तितकेसे सत्य नाही. चंद्राचे वास्तव स्वरूप कळूनही किंवा इंद्रधनुष्याचे रंग कसे निर्माण होतात हे कळूनही त्याचा मनावर होणारा आल्हाददायक परिणाम घडतच असतो. गुलाबापासून गुलकंद तयार करतात हे माहिती असले तरी त्यामुळे गुलाबाच्या फुलाचे सौंदर्य मनावर प्रभाव गाजविल्याशिवाय राहणार आहे थोडेच? एवढेच कशाला चंद्र, सूर्य, शुक्र, मंगळ इत्यादींचे वास्तव स्वरूप सगळ्यांच्याच परिचयाचे असूनही कुसुमाग्रजांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' या कवितेचे सौंदर्य आहे तसेच अम्लान राहिलेले आहे. 

कला आणि शास्त्र ही जीवन समजून घेण्याची साधने आहेत. कला व शास्त्र ही विभागणी सोयीसाठी आहे. भावनेवर व मनाच्या स्पंदनांच्या तालावर चालणाऱ्या कलेला बुद्धिनिष्ठ ज्ञानाची मदत असते आणि बौद्धिकतेवर आधारलेल्या शास्त्राला भावनेचा ओलावा असतो. कलेसाठी कला किंवा ज्ञानासाठी ज्ञान असे नसून जीवनाकलनासाठी हे दोन्हीही घटक मदत करीत असतात. 'भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्यांची कसोटी' आशी दोन्हींची एकरूपता प्रत्येक ठिकाणी असते. असे असूनही दोहोंमध्ये विरोध आहे, असा समज का प्रसृत व्हावा? माणसाला जितकी मस्तकाची गरज आहे तितकीच अंत:करणाची आहे; पण बौद्धिक विकासाचे जसे आराखडे बसविता येतात, तर्कशास्त्रानुसार श्रेष्ठता-कनिष्ठता किंवा चूक की बरोबर सांगता येते तसे कलेच्या क्षेत्रात निश्चित आराखडे अंधुकपणेच सांगता येतात; आणि कलाकृतीचे चांगलेपण बाह्य निकषांपेक्षा प्रत्येकाच्या मनावरच्या सौंदर्यात्मक परिणामावर मोजले जात असते. साहजिकच, तेही धूसरच असते. शास्त्रीय शोधांची प्रचीती व शास्त्रीय ज्ञानाची पारख लगेच होऊ शकते तसे कलाकृतीच्या संदर्भात नसते. म्हणून जिथे सत्य आहे तिथे कल्पनेला वाव नाही, असे समजले जाते. कारण कल्पना म्हणजे असत्य, आभास, खोटे असा समज रूढ आहे; पण कल्पना म्हणजे असत्य नसून सत्यावर प्रकाश टाकणारी दुसरी बाजू आहे, हे जाणून घेतले तर शास्त्र व कला यांचा संबंध कसा असतो, हे स्पष्ट होईल. 

सारांश

बुद्धीला कलेपेक्षा अधिक महत्त्व येते. बुद्धिवंताची प्रज्ञा व कलावंताची प्रतिभा यांचे वेगळेपण, व्यक्तिनिष्ठता, विषयनिष्ठता, शास्त्रीय भाषा व कलेची भाषा (माध्यमे) यांमध्ये फरक असतो. कलेचा संबंध मनाशी, शास्त्राचा बुद्धीशी. बुद्धीची दृष्टी विषयाच्या आकलनाकडे असते, तर कलेची दृष्टी आस्वादाकडे असते. आस्वादासाठी आकलनाची पातळी गाठावी लागतेच. मन हे विश्वातील अनेक रहस्यांकडे कल्पनाशक्तीच्या साहाय्याने प्रथम पोहोचते व नंतर बुद्धी त्यांचा वेध घेते. विश्वातील सत्यदर्शन बुद्धी घडविते, तर सौंदर्यदर्शनाच्या माध्यमातून सत्याकडे पाहण्याची गरज कलेला जाणवते. शास्त्राच्या प्रगतीचा कलेला सौंदर्यास्वादासाठी उपयोग होतो. जीवन समजून घेण्याची ही दोन्ही साधने एकमेकांना पूरक आहेत.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: