Essay on Tourism in Marathi Language : In this article " पर्यटन व्यवसायाचे फायदे आणि तोटे मराठी निबंध ", " पर्यटनाचे महत्व मर...
Essay on Tourism in Marathi Language: In this article "पर्यटन व्यवसायाचे फायदे आणि तोटे मराठी निबंध", "पर्यटनाचे महत्व मराठी निबंध" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Tourism", "पर्यटन व्यवसायाचे फायदे आणि तोटे मराठी निबंध" पर्यटनाचे महत्व मराठी निबंध for Students
केल्याने देशाटन... मनुजा चातुर्य येतसे फार' असे म्हटलेले आहे. पर्यटन, पंडित-मैत्री, सभेमध्ये वावर इत्यादी अनेक मार्गांनी माणसाला चातुर्य येऊ शकते; पण पर्यटन करण्याने पर्यटनव्यवसायालाही अनेक दृष्टींनी फायदा होऊ शकतो, हे आजचे उद्योग-क्षेत्रातले त्याचे आर्थिक पातळीवरचे उच्चांकाचे स्थान पाहता सहजपणे लक्षात येते. आजच्या जीवनातील यांत्रिकता व तोचतोपणा पर्यटनाने दूर होऊ शकतो. नवे प्रदेश, नवीन समाजपद्धती, वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणींचे अनुकरण करणाऱ्या जमाती, निसर्गाची भव्यता आणि ऐतिहासिक वास्तू इत्यादींच्या दर्शनाने मानवाला आपल्या जीवनाचा अर्थ उमगायला लागतो. आनंद तर मिळतोच. समाजात भिन्न आवडी-निवडींच्या लोकांमध्ये वावरण्याचा सराव होतो. घराबाहेरच्या जगामध्ये ते स्वत:चे स्वतंत्र मैत्रीचे बंध जोडू शकतात. आपण सगळे एकच आहोत, ही एकात्मतेची जाणीव दृढ होऊ लागते. जाती, धर्म, इत्यादींची बंधने सैल होऊ लागतात.
आधुनिक कालखंडात दळणवळणाची गतिमान यांत्रिक सुविधा सुखसोयींसह, पैसे मोजून माणूस मिळवू शकत असल्याने प्रवासातील आनंद त्याला उपभोगता येतो. पूर्वीच्या काळी फारच थोड्या लोकांचा प्रवासाशी संबंध येई. लांबचा प्रवास अभावानेच असे; आणि तो सुलभही नव्हता. शेजारच्या गावातील नातेवाइकांकडे किंवा अन्य कारणाने आणखी कोठे जायचे तर बैलगाडी किंवा असेच काही वाहन किती त्रासदायक ठरत असेल, याची आपण आज केवळ कल्पनाच करू शकतो. प्रवासात चोराचिलटांचा त्रास निवारण करण्याचीही यंत्रणा नव्हती. प्रवास फक्त यात्रेच्या-जत्रेच्या रूपाने केला जात असे. आजही अनेक यात्राकंपन्या आहेत; पण पूर्वीच्या मध्ययुगीन कालखंडात पायी यात्रा करण्याच्या कल्पनेवर पुण्यसंचयाच्या हेतूने भर दिला जाई. तरीसुद्धा ज्ञानदेव-नामदेव यांच्यासारखे संतश्रेष्ठ भारतभर वारकरी संप्रदायाचा झेंडा लावीत प्रवास करून आले. लोकसंपर्क, धार्मिक तत्त्वांचा प्रसार किंवा युद्धातील सैनिक म्हणून, यांव्यतिरिक्त गावाच्या चतुःसीमा ओलांडण्याची प्रथा मध्ययुगीन कालखंडात नव्हती. भारताच्या शोधासाठी निघालेला कोलंबसाचा समुदाय किंवा वास्कोडी-गामा तसेच देशोदेशींचे व एकमेकांकडचे राजदूत, वकील, पोस्टमनचे काम करणारे सांडणीस्वार, व्यापारीवर्ग हेच काय ते स्वग्राम सोडून फिरणारे फिरस्ते होते.
आधुनिक काळामध्ये मात्र समाजात प्रवासाची आवड वाढत चाललेली आहे. पाश्चात्त्य देशांतील लोकांना तर आठवडाभराच्या नोकरी-व्यवसायानंतर शनिवार-रविवार जवळपासच्या स्थळांना भेटी देत घालविण्याची सवयच आहे. भारतात आल्यानंतर थंड हवेची ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सर्वसामान्य नोकरदारवर्गही आज सुटीचा कालावधी प्रवासामध्ये घालविण्याचा बेत ठरवितो. कुठल्या पर्यटन कंपनीचे दर काय, सोयीसुविधा किती प्रकारच्या इत्यादींचा अंदाज घेतो, माहिती करून घेतो आणि प्रवासाचे प्रस्थान ठेवतो. त्याला प्रवासात व मुक्कामाच्या पर्यटनस्थळांमध्ये घरासारख्या सुखसोयी हव्या असाव्यात. यामुळेच पर्यटन- व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले. पर्यटनव्यवसायाने बघता बघता टाकलेल्या जाळ्यात सर्व जग गुरफटून गेले. यामधून देशांनाही पर्यटकांकडून कराच्या रूपाने त्यांनी आपल्या देशात येऊन केलेल्या खर्चाच्या माध्यमातून अफाट आर्थिक फायदा होऊ लागला. देशी-अंतर्देशी पर्यटनसंस्था काही कोटींचा फायदा करून देऊ लागल्या. अनेकांना व्यवसाय-उपजीविकेचे, वाटाडे, माहीतगार, प्रसारक इत्यादी नवीन मार्ग उपलब्ध झाले. वेगवेगळ्या व्यवसायांतून पर्यटनासाठी सवलती देण्यात येऊ लागल्या आणि अशा वाढत्या देशाटनामुळे माणसाला फिरण्याची, देशविदेश पाहण्याची चटक लागली. एखादे कुटुंब वर्षभरात कुठे प्रवासाला गेले नाही तर इतरांना ते खटकू लागते इतकी आपल्या भारतीयह्न प्रामुख्याने मध्यमवर्गीयह्न समाजाला पर्यटनाची सवय लागली आहे. परदेश-सहल तर पुण्यामुंबईच्या प्रवासाइतकी समाजाच्या अंगवळणी पडली आहे. ज्यांचे नातेवाईक परदेशी आहेत, त्यांना परदेशी प्रवास अधिक सुलभतेने करता येण्याची सवलतही मिळू शकते.
वाढत्या पर्यटनव्यवसायाने माहितीपत्रके, प्रवासवर्णने, राहण्याजेवण्याच्या सोयींसाठी इमारती, सदनिका, हॉटेल्स, आपल्या व्यवसायाची जाहिरात इत्यादी अनेक दुय्यम पातळीवरच्या उद्योगांना विकसित व्हायला मदत केली; पण त्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक दृष्टीने मूळ वातावरण गढूळ करायलाही हातभार लावला हे विसरून चालणार नाही. पर्यटनस्थळांच्या एकंदर सांस्कृतिक वातावरणात गढूळता आणण्याचे दोष काही प्रमाणात पर्यटनव्यवसायाकडे जातात आणि काही प्रमाणात पर्यटकांकडे जातात. या दोघांनी मिळून प्रदूषणामध्ये किती भर घातली, हे तर कोणत्याही पर्यटनस्थळाचे दहा वर्षांपूर्वीचे व आजचे वातावरण पाहिले की सहजपणे जाणवते. भारताच्या किनारपट्टीचे सौंदर्य तेथील नागरिकांनी जितके गलिच्छ केले नसेल तेवढे या पर्यटकांनी विशेषत: परदेशस्थ पर्यटकांनी केले आहे. स्वत:च्या देशात स्वच्छतेचे महत्त्व जाणणारे हे परदेशी पाहुणे भारतात मात्र खाण्यापिण्याच्या वस्तूंची रिकामी पार्सल्स, प्लॅस्टिकचा कचरा कुठेही टाकून पर्यावरणाचा तोल बिघडविण्याला हातभार लावतात; एवढेच नव्हे तर त्यांचे, आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने असभ्य ठरणारे वागणे-बोलणे-चालणे पर्यटनस्थळांचे सांस्कृतिक जीवनही कलुषित करायला व तेथील लोकांसमोर नको ते आदर्श उभे करायला कारणीभूत ठरते, हे विसरून कसे चालेल?
सांस्कृतिकतेतील प्रदूषणाइतकेच पर्यावरणाचे प्रदूषणही घातक असते, याचा प्रत्यय जग प्रत्यही घेत आहे. पर्यटनव्यवसायाने हे प्रदूषण वाढू नये याची तरी खबरदारी घ्यायला पाहिजे; पण केवळ पर्यटनव्यावसायिकच आर्थिक फायद्यांचा विचार करीत आहेत असे नाही तर सरकारही आर्थिक फायद्याकडे लक्ष देऊन प्रदूषणाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करीत आहे. पर्यटनामुळे वसाहत-सुविधा, अन्नपाण्याची सोय, वाढती वाहतूक यंत्रणा इत्यादींमुळे हवेचे प्रदूषण वाढत जाते. त्यावर पर्यटनव्यावसायिकांजवळ उपाययोजना आहे काय? महाबळेश्वरसारख्या निसर्गरम्य थंड हवेच्या स्थळातील गारवा व झाडी दोन्हीही कमी होत चालली आहेत. लोणावळा व खंडाळा ही पर्यटनस्थळे निसर्गरम्य आहेत, हे इतिहासजमा होऊ लागले आहे. तसेच मालदीवसारख्या बेटाजवळचे प्रवाळाचे खडक नामशेष होत आहेत. अशा प्रकारचा निसर्गसंपत्तीचा विध्वंस टाळण्याचे उपाय पर्यटनव्यवसायाने शोधायला पाहिजेत. मात्र हा निसर्गविध्वंस फक्त पर्यटनामुळे व पर्यटकांच्या वृत्तीमुळेच होतो, असे समजण्याचेही कारण नाही. एकंदर समाजातच याबद्दल अनास्था व अज्ञान आहे. नागरी जीवनाची समज जोपासणे गरजेचे आहे. कोणत्याही त-हेने का होईना निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे, हे या व्यवसायाने विसरून चालणार नाही. आल्प्स पर्वताच्या संदर्भात अशी ‘परिसर जतना'ची जाणीव संस्था व्यक्त करू लागल्या आहेत. निसर्गाचा अतिरिक्त उपयोग टाळून स्वसुरक्षितता आणि पर्यावरणाचा तोल सांभाळण्याची लक्षवेधी जबाबदारी पर्यटनव्यवसायांनी कधीच टाळता कामा नये. पर्यटकांवर अत्यंत कडक व काटेकोर बंधनांचे दडपण ठेवून निसर्गबचावाचे धोरण राबवायला पाहिजे.
पर्यटकांसाठी राहण्या-जेवणाच्या सुविधा, सदनिका पुरविताना अन्न-जलसंवर्धन-व्यवस्थेवरही अतिरिक्त भार पडतो; खेडेगावांतील शेतीची जमीन नापीक होते, चराऊ कुरणांवर व त्यामुळे गाई-गुरादी जनावरांवर त्याचा परिणाम होतो. झाडाझुडपांची तोड, खेडेगावांजवळच्या प्रशस्त मोकळ्या जागांचा रहिवाशांना मोकळेपणाने घेता येणारा. आनंद, मोकळी हवा या सगळ्यांवरच गदा येते. नदीनाले यांचे पाणी किती गढूळ होते, हे गंगा-गोदावरी यांच्या उदाहरणांनी लक्षात आले आहे. कोणत्याही प्रदेशातील वाढता वावर त्या प्रदेशाची धूप वाढवीत असतो. पर्यावरण वाचविण्याची पर्यायी शिस्तबद्ध योजना राबवली गेली, तरच एखाद्या प्रदेशाचे मूळ पर्यावरण पुष्कळसे प्रदूषणरहित राहू शकते. पर्यटनस्थळांची देखभाल ठेवण्याची तेथील नैसर्गिकतेला धक्का न लावण्याची व स्थळाचे आकर्षण टिकविण्याची जबाबदारी पर्यटनव्यवसायाला उचलता आली तर हा व्यवसाय अधिक तेजीत चालू शकेल.
पर्यटनसंस्था समाजाच्या अधिक जवळ जाऊ शकते. त्यांचा अधिकारीवर्ग पर्यटनाच्या निमित्ताने समाजाच्या सतत सहवासात असतो. याचा फायदा घेऊन पर्यावरण प्रदूषणाचा धोका पर्यटकांना पटवून देणे हे पर्यटनव्यावसायिक करू शकतील. आपण स्वत:ही निसर्गाचेच एक घटक आहोत; निसर्गाच्या, मानवनिर्मित वास्तूंच्या सान्निध्याने आपली जीवनकक्षा अधिक व्यापक व समृद्ध होत असते; हे त्यांचे ऋण लक्षात घेऊन त्यांचे जतन करण्याची व पुढील पर्यटकांसाठी त्यांचे तेच शुद्ध स्वरूप राखून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, हे तत्त्व पटवून द्यायला पाहिजे व तसे वर्तन ठेवण्याचे बंधन या कंपन्यांनी स्वत:वर घालायला पाहिजे. केवळ आर्थिक लाभावर लक्ष ठेवण्यापेक्षा त्यांनी ही दृष्टी ठेवल्यास त्यांच्या व्यवसायाबद्दल लोकांत जिव्हाळा निर्माण होऊ शकतो; पण त्यासाठी त्यांनी ही जाण असलेली सुसंस्कृत माणसे कामावर नेमली पाहिजेत.
प्रत्येक देशाची संस्कृती तेथील लोकांच्या वर्तनातून व्यक्त होत असते. एक संस्कृती चांगली व दुसरी वाईट असे म्हणता येत नसले तरी अनेक संस्कृतींचा परिचय पर्यटकांच्या आगमनाने पर्यटनस्थळींच्या नागरिकांना होत असतो. हा परिचय चांगला नसतोच असे नाही; शिवाय त्यांच्यामुळे तेथील जनजीवन आधुनिक बनते हेही विसरून चालणार नाही. पर्यटनस्थळांचे महत्त्व प्राप्त झालेल्या भागातील अनेक व्यवसायधंद्यांना व कलाकारांना जगासमोर येण्याची संधी लवकर मिळाली, हेही विसरता येत नाही. अजिंठा-वेरूळ, ताडोबाचे जंगल, महाबळेश्वर, माथेरान यांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि गोवा राज्यातील समुद्रकिनाऱ्यावरील अनेक स्थळांना जगाच्या नकाशावर स्थान मिळाले ते पर्यटनास महत्त्व प्राप्त झाल्यामुळेच होय; पण त्याबरोबरच येथील समाजाला सांस्कृतिक पातळीवरच्या सदोषतेलाही सामोरे जावे लागत आहे. पर्यटकांच्या पोशाखांचे व रीतिरिवाजांचे रहिवाशांना अनुकरण करावेसे वाटणे साहजिकच असते. पर्यटकांचे स्वत:च्या परिसरातले वागणे-बोलणे वेगळे असेलही; पण प्रवासात पर्यटकही मोकळेपणाने वागतात, स्वच्छंदी बनतात, थट्टामस्करीची मर्यादा ओलांडली जाते, आणि त्याचा प्रभाव तेथील स्थानिक रहिवाशांवर पडतो. रहिवाशांच्या चांगल्या-वाईटाचा विवेक त्यांनाच गावंढळपणा व मागासलेपणाचा वाटू लागतो. असे अनेक दोष तेथील सामाजिक जीवन दूषित करून टाकतात. पाश्चात्त्य संस्कृतीतील चांगल्याचा प्रभाव होण्यापेक्षा वाइटाचा असा संपर्क भारतीय संस्कृतीला महाग पडतो.
परदेशी लोकांचे एक वेळ सोडून दिले; पण शाळा किंवा महाविद्यालयीन पातळीवरच्या पर्यटनांमधून किती व कशा प्रकारे मूळ वास्तूंची पावित्र्यहानी व सौंदर्यहानी केली जाते, याचे प्रत्यंतर सर्वांच्याच अनुभवाला आलेले आहे. स्वत:चे नाव लिहिणे, चित्रे काढणे या मार्गांनी आपण आपलेच नुकसान करीत आहोत, ही जाणीव या विद्यार्थिवर्गाला द्यायला पाहिजे. अन्य देवालये, अजंठा-वेरूळसारख्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करणारी शिल्पकलेची मंदिरे, ताजमहाल, कुतुबमिनार यांसारखी ऐतिहासिक घटनांची स्मृतिमंदिरे इत्यादी ठिकाणी पर्यटन करताना जे सुसंस्कृतीचे चालचलन असायला पाहिजे, त्याची शिस्त पर्यटकांना लावण्याचे कार्य पर्यटन-व्यावसायिकांनी कटाक्षाने करायला पाहिजे. पर्यटनव्यावसायिकांना ते सहजपणे करता येईल; कारण त्यांच्या हातात आर्थिक सत्ता असते. पर्यटकांच्या व्यसनाधीनतेला मर्यादा घालण्याचे कार्य पर्यटनव्यावसायिक करू शकतात.
पुष्कळदा पर्यटनस्थळांमध्ये अशा प्रकारच्या व्यसनांना पोषक अशी व्यवस्था पुरविण्याकडेही पर्यटनव्यावसायिक जातीने लक्ष देतात. परिणामी, पर्यटनस्थळे म्हणजे व्यसनांची आगरे बनायला वेळ लागत नाही. एवढेच नव्हे तर, मुक्तपणे व्यसनांमध्ये डुबण्याच्या हेतूनेच अनेक पर्यटक पर्यटनाचे बेत आखतात. पर्यटकांना अशा सोयी पर्यटनव्यवसायाने पुरविल्या नाहीत म्हणजे व्यसनाधीनता नाहीशी होईल, असे मुळीच नाही; पण या गोष्टीला जेवढा आळा घालता येईल, तेवढा हा व्यवसाय आपली विश्वासार्हता टिकवून ठेवू शकेल.
भारत म्हणजे सांस्कृतिक वास्तूंचा खजिना आहे. काश्मीर, गोवा, केरळ यांसारखी निसर्गाने नटलेली स्थळे तर देशात असंख्य आहेत. वैदिक, बौद्ध, जैन, मोगल यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी स्थळे जशी आहेत तसेच आदिवासी, पांडवकालीन, रामायणकालीन वास्तूही संशोधकांनी शोधून काढल्या आहेत. रामाच्या काळात बांधलेल्या सेतूच्या खुणा आज पाश्चात्त्य संशोधकांनी शोधून काढल्या आहेत. भोपाळजवळच्या भीमाबेटकीच्या परिसरातील पांडवकालीन आदिवासींनी दगडावर कोरलेल्या चित्रांचा मागोवा भारतीय संशोधकांनी घेतला आहे. प्राचीन शिल्पकला, गुहा, राजवाडे, मंदिरांवरची बांधकामे, प्रतिध्वनीच्या गमतीजमतीचा अनुभव आणून देणारे मनोरे, काय पाहू आणि काय नको असे होऊन जावे, एवढी अफाट मानवनिर्मित व निसर्गनिर्मित वैभवस्थळे भारतभर मुक्तपणे विखुरलेली आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे हा पर्यटन-व्यवसायाचा हेतू असला पाहिजे. भारतीय पर्यटनव्यवसायाजवळ भारताच्या बहुरंगी व बहुढंगी संस्कृतीचे दर्शन आपण घडवीत आहोत हा स्वाभिमान असला तर पर्यटकांच्या मनात ते एकत्वाची भावना निर्माण करू शकतील. प्रवास हे माणसातील माणुसकी जागविण्याचे फार मोठे साधन होऊ शकते.
त्यासाठी शांततेची आवश्यकता असते. काश्मीर किंवा श्रीलंका या ठिकाणी असलेल्या संघर्षमय वातावरणात जायला पर्यटक उत्सुक नसतात आणि अशा ठिकाणी अवेळी नेण्याचे धाडस पर्यटनव्यावसायिकही करीत नसतात. सुवर्णमंदिर, अयोध्येचे राममंदिर अशा संवेदनशील ठिकाणांकडे काही काळ तरी पर्यटक दुर्लक्ष करतात. पर्यटनाचा हेतू चांगल्या प्रकारची करमणूक करणे, मोकळा वेळ सत्कारणी लावणे हा असतो; त्यामुळे जिवाचा धोका पत्करून पर्यटने केली जात नसतात. मात्र डोंगरदऱ्या पायाखाली घालत हिंडण्यात रंगणारे काही धाडसी मशाफीर मशाफिरीसाठी अशा धोकादायक प्रदेशांतही जाऊ पाहतात. डोंगर-कपारी चढणे. रानोमाळ प्रवास करणे, पायी हिंडणे हा छंद जोपासणारे रसिकही प्रवास करू लागले आहेत. वाहनांच्या एवढ्या अद्ययावत सुविधा असूनही पायी हिंडण्याचा हा छंद कशासाठी? पंढरपरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांपेक्षा पायी प्रवास करणाऱ्या या प्रवाशांचा हेतू वेगळा असतो. निसर्गसहवास हा त्यामागील प्रमुख हेतू असतो; त्यातून आपणही निसर्गाचीच निर्मिती आहोत, ही जवळीक आपोआपच वाढत जाते..
पर्यटन करण्याचा उत्साह वाढत राहावा, अशी असंख्य पर्यटनस्थळे भारतात आहेत. भाविक-वर्ग यात्रांच्या निमित्ताने अशा अनेक पवित्र स्थळांचे दर्शन वर्षानुवर्षे घेत आला आहे. पर्यटकांची संख्याही वाढती आहे; पण अजूनही व्यवसाय म्हणून भारतात या व्यवसायाच्या विकासाला व अधिक लाभ करून घ्यायला खूप वाव आहे. त्यासाठी हॉटेल्सची सुविधा व्यवस्थित असायला पाहिजे. स्वच्छतेकडे अधिक लक्ष पुरवायला पाहिजे. अशा अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही सोय नसते; स्वच्छतागृहे नसतात. छोट्या-मोठ्य ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाची साधने नसतात किंवा महाग असतात. नव्या युगातील हा नवा व्यवसार जाहिराती करण्याबाबतही अजून मागासलेला आहे. अजून खूप गोष्टी शिकायला खूप मोठा वाव आहे.
सारांश
जीवनाच्या कक्षा रुंदावतात, दळणवळणाच्या सुविधा नसलेल्या काळातही व्यापारीवर्ग, यात्रेकरू, फिरस्ते, सैनिक प्रवासाच्या निमित्ताने लोकसंपर्क साधत होते. आधुनिक काळातील पर्यटनविषयक सोयींमुळे व जीवनातील यांत्रिकता दूर करण्याच्या उद्देशाने प्रवासाची आवड वाढते आहे. पर्यटनव्यवसायामुळे आर्थिक उलाढाल वाढली व अनेकांना नवे व्यवसायक्षेत्र उपलब्ध झाले; पर्यटनांमुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे. सांस्कृतिक प्रदूषणही वाढले; पण याचा दोष नागरी जीवनाची पुरेशी समज नसण्यामध्ये आहे. त्यासाठी पर्यटनव्यावसायिकांना नैतिक जबाबदारीची जाण असणे गरजेचे आहे. समाजघातक सवयींवर पर्यटनव्यावसायिक बंधने घालू शकतात. भारतासारख्या असंख्य पर्यटनस्थळे असलेल्या देशात तर या व्यवसायाला खूप वाव आहे.
COMMENTS