Thursday, 1 August 2019

वाचन एक उत्तम छंद मराठी निबंध। Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi

वाचन एक उत्तम छंद मराठी निबंध। Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi

'असा धरी छंद। जाई तुटोनिया भावबंध।'
संतमहात्म्यांच्या या शिकवणीप्रमाणे आपण कुठला ना कुठला तरी छंद जोपासायलाच हवा. छंद जोपासल्याने आपल्याला रोजच्या धकाधकीच्या, चाकोरीबद्ध जीवनाचा कंटाळा येत नाही. कुणाला पोस्टाची तिकिटे, जुनी नाणी जमवण्याचा छंद असतो, कुणाला गाण्याचा, तर कुणाला चित्र रेखाटण्याचा छंद असतो. प्रत्येक जण आपल्या या छंदातून मनमुराद आनंद लुटत असतो.
अशा या अनेक छंदांपैकी ‘वाचन' हा एक उपयुक्त व उत्तम असा छंद आहे. वाचनाचा छंद आपण इतरांना त्रास न देता जोपासू शकतो व हा छंद खूप खर्चिकही नाही. दिवाळीमध्ये महाराष्ट्रात दिवाळी अंक शेकडोंच्या घरात प्रसिद्ध होऊन त्याची वाचकांना जणू मेजवाणीच मिळत असते. सुट्ट्यांच्या काळात ठिकठिकाणी भव्य पुस्तक प्रदर्शने आजही भरतात व वाचकांचा त्याला प्रचंड प्रतिसादही मिळतो.

वाचनाचा छंद केवळ आपली ज्ञानाचीच भूक भागवत नाही, तर मन प्रसन्न करणारे, उत्साही करणारे असे मनोरंजनही करते. दूरच्या प्रवासातील कंटाळवाणा रिकामा वेळ वाचनाच्या छंदामुळे सुखकारक ठरतो. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या थोर देशभक्तांना, क्रांतिकारकांना जेव्हा कारावास भोगावा लागला, तेव्हा त्यांनी ब्रिटिश सरकारला पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली. वाचनाच्या या छंदाने त्यांची ज्ञानाची भूक भागून या कठीण प्रवासात पुस्तकांनी त्यांची साथ केली. अशाप्रकारे दुःखाच्या प्रसंगी, एकटे असताना, प्रवासात पुस्तके आपली साथ करतात. कदाचित मित्र कंटाळतील, एक वेळ आई-वडीलही थकतील; पण पुस्तके कधी कंटाळा करत नाही की थकतही नाही. आपल्याला कशीही, कुठेही हवी तेव्हा, हवी तिथे साथ करायला ती सदैव तयारच असतात.
उत्तम पुस्तकाच्या वाचनात आपण आपल्या चिंता काही वेळ का होईना, पण विसरतो. उत्तम पुस्तकांच्या वाचनाने मिळणारा आनंद उच्च दर्जाचा असतो. सतत उत्तमोत्तम वाचन केल्याने व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊन व्यक्ती बहुश्रुत होते.

वाचनाच्या छंदामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यास प्रेरणा मिळते. उदा. 'वीणा गवाणकर' अनुवादीत ‘एक होता कार्व्हर' 'विठ्ठल कामत' यांचे 'इडली ऑर्कीड आणि मी' ही आणि इतर पुस्तके आयुष्यातील अडचणींवर मात करत पुढे प्रगतीपथावर जाण्यास प्रेरणाच देतात. 'शिवाजी सावंत' यांची 'मृत्युंजय' 'युगंधर' या पुस्तकातून हजारो वर्षापूर्वीच्या प्राचीन ऐतिहासिक, पौराणिक काळाचे वर्णन वाचताना त्या कालखंडात फिरून आल्याचा अनुभव मिळतो. त्या काळातील रिती-रिवाज, खान-पान, परंपरा, व्यापार उदीम, शिष्टाचार इ. घटकांची माहिती मिळते. त्यामुळे वाचनाच्या छंदातून केवळ ज्ञान न मिळता भूतकाळातील कालखंडाची भ्रमंती केल्याचासुद्धा अनुभव प्राप्त होतो.
आजवर जगात होऊन गेलेल्या थोर विचारवंत, बुद्धिजीवी व्यक्तींनी तर आपल्या वाचनाच्या छंदाबद्दल भरभरून लिहिले आहे. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ 'जयंत नारळीकर' यांनी 'माझा छंद माझा आनंद' या लेखात आपण पुस्तकाच्या वाचनासाठी कसे प्रयत्न केले व शेवटी ते पुस्तक मिळाल्यावर झालेल्या आनंदाचा अनुभव किती और होता, हे आवर्जून सांगितले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या वाचनाच्या छंदाबाबत सर्वांनाच ठावूक आहे. सलग तासन् तास ग्रंथालयात बसून वाचनाचा आनंद ते घेत असत. 'वाचाल तर वाचाल' असा अनमोल संदेश त्यांनी आपणा सर्वांना दिला.

आपल्या मराठी भाषेत उत्कृष्ट दर्जाची साहित्य निर्मिती विविध साहित्य प्रकारांतून झालेली दिसते. आध्यात्मिक ग्रंथ वाचनाने मनाला उभारी येते. उत्तम अभंग, काव्य वाचनाने रसिकता हा गुण वाढीस लागतो, ललित साहित्याच्या वाचनामुळे आपणास अनुभवांच्या पुन:प्रत्ययाचा आनंद घेता येतो. वाचनामुळेच माणसाची विचारशक्ती, कल्पनाशक्ती, संवेदनशक्ती अशा शक्तींचा विकास होतो. म्हणून जीवनाच्या सर्व अंगाचे दर्शन घडवणारा व मनावर संस्कार करणारा वाचनाचा आनंद हा श्रेष्ठ आनंद नक्कीच आहे.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

1 comment: