महागाईचा भस्मासूर मराठी निबंध। essay on mehangai in marathi
आज सगळ्याच वस्तूंच्या किंमती अगदी गगनाला भिडलेल्या आहेत. एखादया वस्तूची किंमत वाढली की ती कमी होण्याचे नावच नाही ! बाजारातील अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ वगैरे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत दिवसेंदिवस भरमसाट वाढ होत आहे, त्यामुळे सर्वच स्तरातील लोकांची आर्थिक कुचंबणा झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वच अस्वस्थ झाले आहेत.
घरातील आजी तिच्या तरुणपणातील स्वस्ताईचे वर्णन करताना सांगते, “आमच्या काळात नारळ दोन रुपयाने मिळत होता, शंभर-दोनशे रुपयांत महिन्याचा खर्च निघून पन्नास-शंभर रुपये शिल्लक राहत. आजीच्या या सर्व गोष्टी आज चमत्कारिक कथाच वाटतात.
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण वाढत्या किंमतीमुळे या मूलभूत गरजांची पूर्तता होणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. वर्तमानपत्रात कुपोषणाच्या बातम्या येतात. गरिबीमुळे स्वत:चे व कुटुंबाचे दोन वेळेचे पोटसुद्धा भरू न शकल्याने आत्महत्या करणाऱ्या पतीपत्नींच्या कहाण्या वाचताना मन गलबलून जाते. आज समाजात होणाऱ्या चोऱ्यामाऱ्या, लाचलुचपत, भ्रष्टाचार यांसारखे समाजिक गुन्हे हे आत्यंतिक दारिद्र्यामुळे घडत आहेत. लोकसंख्या वाढते आहे. त्याप्रमाणात रोजगार धंदा न वाढल्याने बेकारीचे प्रमाण एकसारखे वाढते आहे. महागाई रोखण्यासाठी सरकारला धारेवर धरले जाते. वेगवेगळे मोर्चे काढत ह्या वाढत्या महागाईला विरोध करण्याचे प्रयत्नही चालूच आहेत. जीवनोपयोगी वस्तूंच्या गगनाला भिडणाऱ्या किमती वाजवी व स्थिर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेतृत्वाखाली आंदोलने केली जात असली, तरी त्याचा अपेक्षित परिणाम दुर्दैवाने दिसतच नाही.
सतत वाढणारी लोकसंख्या हेच महागाई वाढण्याचे मूळ कारण आहे. उत्पादित वस्तूंचे उत्पादन जरी वाढले, तरी वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पादन कमीच ठरते व मागणी तर वाढतच जाते. त्यामुळे मागणी जास्त पुरवठा कमी, अशी स्थिती असल्यास शास्त्राच्या नियमानुसार, वस्तू मालाच्या किंमती वाढून महागाई वाढते. बरेचदा, वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मधल्या दलाल वर्गामुळेसुद्धा किंमती वाढतात. बरेचदा बाजारात मुद्दाम वस्तूला भाव जास्त मिळावा, म्हणून कृत्रिम स्वरूपाची टंचाई निर्माण करून वस्तूंचे भाव वाढवत जातात. मग अशा वेळी फक्त लोकसंख्या नियंत्रणात ठेवली तर महागाई कमी होईल असे नाही, तर लोकांची कृतीक्षमता वाढली पाहिजे. त्याचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, म्हणजे लोकांना नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे उपलब्ध होतील, असा विकास आराखडा केला पाहिजे. जेणेकरून लोकांकडे पैसा उपलब्ध असेल, तर विविध क्षेत्रातील उत्पादन वाढून अधिकाधिक नोकरी-रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील. उत्पादनाचा वेग वाढेल. लोकसंख्येच्या मागणीएवढा पुरवठा प्राप्त होत गेल्यास महागाईची टांगती तलवार न राहता अर्थव्यवस्थाही मजबूत होईल.
खेडोपाडी, शहरात योग्यप्रकारे उदयोग निर्मिती होऊन उत्पादन क्षमता वाढल्यास मागणी-पुरवठ्याचे अर्थशास्त्रीय गणित स्थिर राहून महागाईला नक्कीच आळा बसेल.
0 comments: