Wednesday, 29 April 2020

चित्रपट आणि समाज यांच्यातील संबंध मराठी निबंध Aajche Chitrapat ani Samaj Marathi Nibandh

Marathi Essay on Impact of Cinema on Society : Today, we are providing चित्रपट आणि समाज यांच्यातील संबंध मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Aajche Chitrapat ani Samaj Marathi Nibandh to complete their homework.

चित्रपट आणि समाज यांच्यातील संबंध मराठी निबंध Aajche Chitrapat ani Samaj Marathi Nibandh

कापडाच्या पडद्यावरची निर्जीव चित्रे हालू लागली हा एक 'थ्रिलिंग' अनुभव होता. थोड्याच कालावधीत ती बोलू लागली आणि मूक चित्रपटाचा बोलका चित्रपट भारतात उदयाला आला. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर नाटकाच्या पार्श्वभूमीवर आलेला हा सिनेमा म्हणजे चलत्चित्रपट, समाजाला एक वेगळे व प्रभावी प्रसारमाध्यम असल्याची जाणीव झाली. नाटकामधून समाजाला उद्बोधन, प्रबोधन व करमणूक हे एकत्रितपणे मिळत होते. तीच अपेक्षा ठेवून भारतीय जनतेने चित्रपटाचे स्वागत केले. १९१३ मध्ये 'राजा हरिश्चंद्र'सारख्या पौराणिक चित्रपटाने भारतात चित्रपटयुगाचा ओनामा करून दिला. तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा हा दृष्टिकोन होता. नाटकापेक्षा या माध्यमाच्या कक्षा फार व्यापक व रुंदावलेल्या होत्या. त्यामुळे ज्याप्रमाणे दूरदर्शन आले आणि आकाशवाणीचे क्षेत्र मर्यादित झाले, तशीच काहीशी परिस्थिती चित्रपटाच्या आगमनाने नाट्यसृष्टीची होईल की काय, असे वाटू लागले; आणि तितकी मर्यादित अवस्था जरी नाट्यसृष्टीच्या वाट्याला आली नाही, तरी चित्रपटाच्या तंत्राने आणि मंत्राने समाजमनावर जबरदस्त मोहिनी घातली यात शंका नाही.

आज आपण चित्रपटसृष्टीचा विचार करताना तिच्या प्रारंभीच्या स्वरूपापासून खूप दूर आलेलो आहोत. अगदी प्रारंभीच्या काळामध्ये, तिच्या तंत्र-मंत्रामधून एका नव्या कलेचा तो प्रारंभ आहे याची जाण होती आणि ज्याप्रमाणे कथा-कादंबरी-नाटकांमधून समाजाचे प्रश्न व जीवन प्रतिबिंबित होत असते, त्याप्रमाणेच चित्रपटांमधूनही तीच अपेक्षा बाळगली जात होती. कोणत्याही काळातील चित्रपटांतून समाजाचे, समाजमनाचे, त्याच्या आशा-निराशेचे चित्रण दृश्य रूपात चित्रित होत असते. समाजजीवनातील संस्कृतिदर्शन, त्याच्या संवादविवादाचे स्वरूप तत्कालीन जबाबदार चित्रपटांतून घडत असते. आजचे चित्रपटही त्याला अपवाद नाहीत. मात्र चित्रपट, नाटक, साहित्य यांमधील चित्रणातून समाजाला उद्बोधन व मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन करण्याचीही क्षमता असते, ही गोष्ट आजचे चित्रपट विसरले आहेत. प्रबोधन व उद्बोधनाची गोष्ट राह दे पण निदान समाजावर वाईट, समाजविघातक परिणाम होऊ नयेत याची काळजी घेण्याची जाणीवही आजच्या चित्रपटसृष्टीजवळ कुठे उरली आहे? पण ज्या काळामध्ये चित्रपटाचा प्रारंभ झाला ही जाणीव त्याच्या ठिकाणी होती, हे विसरून चालणार नाही.
तो काळ राजकीय धामधुमीचा होता. तेव्हा सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय प्रबोधनावर भर देण्याची अत्यंत आवश्यकता होती. समाजहिताच्या चौकटीमध्ये नाटक-साहित्याला जसे बसविले जात असे, तसेच चित्रपटालाही बसविले गेले. प्रभातच्या 'माणूस', 'कुंकू' यांसारख्या नंतरच्या चित्रपटांचा याच परंपरेमध्ये उल्लेख करावा लागतो. करमणूकप्रधान चित्रपटांनी गल्ला जमवायचा आणि उद्बोधनपर चित्रपटांसाठी त्याचा विनियोग करायचा, ही दृष्टी भालजी पेंढारकरांसारख्या काही चित्रपटमहर्षीनी अनुसरलेली दिसते. तिच्या पाठीशी हीच समाजऋणाची जाणीव होती. उद्बोधन व करमणूक यांचे एकत्र चित्रण करण्याचेही प्रयत्न झाले. पण यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, चित्रपटव्यवसाय हा एक नवा उद्योग म्हणून पाहिला जाऊ लागला. निर्माता, प्रायोजक-भांडवलदार, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते, छायाचित्रण, त्यातील तंत्रसुधारणा, प्रकाश-योजना अशा अनेक घटकांचा समन्वय साधल्याशिवाय चित्रपट तयार होऊ शकत नाही. चित्रपटगृह, तिकीटविक्री, पोस्टर्स अशा अनेक घटकांचा समावेश चित्रपटप्रसारणात होत असतो. त्यासाठी लागणाऱ्या भांडवलाची गरज भांडवलदार पुरी करतो आणि वसुलीचा विचार केल्याशिवाय कोणत्याही चित्रपटात आपले भांडवल गुंतविणे त्याला शक्य नसते; म्हणूनच भांडवलदार, निर्मात्यांचा प्रभाव जसजसा वाढत चालला तसतसा चित्रपट हा व्यवसाय न राहता पैसे कमावण्याचा एक धंदा बनू लागला. त्याद्वारा व्यक्त होणारा सामाजिक संघर्ष किंवा त्याच्यामागे असलेली समाजसुधारणेची जाणीव केवळ नावापुरती उरली.

चित्रपटव्यवसायाकडे आर्थिक फायद्या-तोट्याच्या भूमिकेतून फक्त निर्माते व भांडवलदार हेच पाहत होते असे नाही, तर अभिनेतेही आपल्या कलेची जाण पैशात मोजून घेऊ लागले. आपल्या भोवतालच्या प्रसिद्धीच्या वलयाचा फायदा ते धनामध्ये वसूल करून घेऊ लागले. एक नवे कलादालन म्हणून या क्षेत्राकडे वळणारा वर्गही संख्येने मोठा होता. करमणुकीसह प्रबोधन-उद्बोधन करणारे हे नवे क्षेत्र दिग्दर्शक, संगीततज्ज्ञ, कॅमेरामन, वेशभूषाकार, तांत्रिक सुविधा पुरविणारे कलाकार, लेखक-पटकथालेखक इत्यादी अनेकांना आकर्षित करणारे व आव्हान देणारे होते. ते जसे फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देणारे माध्यम होते, तसेच आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीनेही धनवंतांचे व उद्योजकांचे लक्ष वेधून घेणारे होते. एक मोठा व्यवसाय त्याद्वारा उभा होत होता. आज चित्रपटक्षेत्रातील आर्थिक आलेख पाहिला तर हिंदी चित्रपटांच्या एकूण निर्मितीखर्चापैकी । चाळीस टक्के खर्च प्रत्यक्ष निर्मितीवर होतो; बावीस टक्के रक्कम कलावंतांच्या मानधनावर खर्ची पडते; तर पंधरा टक्के रक्कम जाहिरातींवर खर्च केली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 'कॉर्पोरेट सेक्टर' म्हणजे कंपनी स्थापून चित्रपटनिर्मिती करण्याची आधुनिक लाट सध्या येऊ पाहत आहे; पण जागतिक पातळीवर आपला खास ठसा उमटविण्यात मात्र अजून भारतीय चित्रपटसृष्टीला पाहिजे तसे यश आलेले नाही. मात्र यामुळे चित्रपटसृष्टीला एक नवा मार्ग मिळाला.

आजच्या चित्रपटांच्या कथानकांचा विचार केला तर परदेशस्थ भारतीय प्रेक्षक नजरेसमोर ठेवूनही चित्रपट तयार केले जात आहेत. केवळ १.५ कोटीत तयार झालेल्या 'मान्सून वेडिंग'ने तीस कोटींचा व्यवसाय केला. अर्थातच, चित्रपटसंख्या विचारात घेता सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती भारतात होत असली, तरी आर्थिक पातळीवर भारतीय चित्रपट उद्योग फार भरीव यश मिळवू शकलेला दिसत नाही. काही मोठे हिंदी चित्रपट एकाच वेळी ५००-६०० चित्रपटगृहांत झळकले, ही भारताच्या चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने मोठीच झेप होती. आज आपण 'देवदास'च्या पन्नास कोटींची चर्चा करतो; पूर्वीच्या 'देवदास'शी अभिनयाच्या संदर्भात त्याची तुलना करून त्याचा हिणकसपणा लक्षात आणून देतो. पण कलेच्या दृष्टीने नव्या 'देवदास'कडे पाहणारा वर्ग अल्पसंख्याक आहे. भव्य सेट, अफाट खर्च इत्यादी आर्थिक बाजूच्या घटकांची होणारी या चित्रपटाची जाहिरात पाहता, कलेपेक्षा एक व्यवसाय म्हणून त्याला येणारे मूल्य लक्षात येते. असे असले तरी चित्रपटासारखा भारतीय मनोरंजनाचा व्यवसाय पद्धतशीरपणे विकसित करण्याचा, निदान वाढता ठेवण्याचा प्रयत्न लक्षणीय आहे.

कुठल्याही कलेच्या क्षेत्राला व्यावसायिक रूप आले की, त्यातील कलादर्शन निर्भेळ राहतेच असे नाही. पण चित्रपट, दूरदर्शन, संगीत, नाटक यांसारख्या सामूहिक साहचर्यावर आधारलेल्या कलाक्षेत्रांच्या बाबतीत व्यावसायिक दृष्टीने विचार होऊ लागणे हे प्रगतीचे लक्षणही समजले जाते. सर्व प्रकारच्या कलावंतांच्या कलेला तांत्रिक मदतीने व जाहिरातीच्या आधाराने मोठ्या प्रमाणावर वाव मिळतो; म्हणूनच चित्रपटाच्या प्रारंभीच्या काळापासून चांगल्या कथा-कादंबरी-वाङ्मयाचे पटकथेमध्ये रूपांतर करणारा वर्ग नव्याने तयार झाला. पटकथा-लेखक हे वेगळे क्षेत्र लेखणीस मिळाले. 
तसेच त्यामुळे 'मूळ साहित्य' व 'साहित्यकार' प्रकाशात आले. भारतीय महाकाव्ये, पुराणे, ऐतिहासिक व्यक्ती यांच्यावरच्या चित्रपटांतून मूळ साहित्याकडे व पर्यायाने संस्कृतीकडे लक्ष वेधले गेले, हे चित्रपटसृष्टीचे योगदान विसरता येत नाही. सुभद्राहरण, रुक्मिणी-स्वयंवर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संताजी-धनाजी यांसारख्या चित्रपटांनी सांस्कृतिक जागरणाचे केलेले कार्य आजही महत्त्वाचे मानावे लागते. आज भगतसिंगांवरचे, महात्मा गांधींवरचे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचे चित्रपट याच सांस्कृतिक-राजकीय जागरणाचे कार्य करीत आहेत. ही वृत्ती अत्यंत कमी प्रमाणात दिसते हे विसरता येत नसले तरी त्यांच्याद्वारे निदान 'मिणमिणत्या पणतीच्या' प्रकाशाचे कार्य होत आहे, ही विधायक वृत्ती लक्षात घेतली पाहिजे. दृक्-श्राव्य पातळीवरचे हे प्रभावी लोकसंबंध साधणारे माध्यम असल्याने त्याची दृष्टी ज्या ज्या साहित्यावर पडली ते प्रकाशमान झाले.
चित्रपटाचा नवा व्यवसाय शासनाला उत्पन्नाचे एक नवे दालन म्हणून किफायतशीर ठरला. गरजूंच्या दष्टीने नोकरीचे एक नवे क्षेत्र उपलब्ध झाले. समाजाला फावला वेळ घालवायला आणि करमणूक करून घ्यायला एक मोठे साधन मिळाले आणि समाजविचारवंतांना लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवायला एक जबरदस्त प्रसारमाध्यम उपलब्ध झाले. जोपर्यंत या विचारवंतांचा पगडा या व्यवसायात महत्त्वाचा होता तोपर्यंत समाजप्रबोधन करण्याचे कार्य करमणूक करता करता चित्रपटांतून साधले जात होते. कलेची अंगभूत जाण असलेल्या दिग्दर्शकांकडून कलात्मक सौंदर्यसृष्टीला पोषक असेही चित्रपट निघत होते. व्ही. शांताराम, कपूर घराणे यांसारख्यांचे काही चित्रपट कलात्मक भाग ठेवूनही समाजहित जपणारे आहेत, हे आजही जाणवते. पण जोपर्यंत चित्रपट घडविणाऱ्यांमध्ये ही सामाजिक जागरणाची समज प्रभावी होती तोपर्यंतच असे दर्जेदार चित्रपट निघू शकले.

समाजावर चित्रपटाचा पगडा वाढत चालला आणि या व्यवसायामध्येही दिवसेंदिवस नवी नवी तांत्रिक सुविधा येऊ लागली. या तंत्रज्ञानातील प्रगतीचा फायदा घेणारे चित्रपटसृष्टीतील सर्व घटक केवळ समाजाचे हित लक्षात घेणारे होतेच असे नाही. तसेच त्यांची दृष्टी केवळ शुद्ध कलात्मक होती असेही नाही. अशा लोकांमुळे चित्रपटसृष्टी बदलत चालली; त्यातही सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांचे स्वरूप व दृष्टिकोनही हळूहळू बदलू लागला. वृत्तपत्रे, नियतकालिके यांच्या स्वतंत्र विचारांना जशी भांडवलदार-मालकवर्गाच्या राजकीय मतांशी तडजोड करावी लागली, तशीच परिस्थिती चित्रपटांवरही आली. त्यातही नवविचारांची, सुधारणावादी, समाजपरिवर्तनाची भूमिका घेणारे काही चित्रपट समाजाला वळण देत होते; पण त्यांचे हे नवीन विचार समाजप्रबोधन करीत असले तरी त्यांनाही सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणे कितपत शक्य होते, याचा विचार व्हायला हवा. त्यामुळे एकाच वेळी सनातनी विचारसरणीवर टीका करणारे चित्रपट जसे निघत होते, तसेच जपजाप्य, यज्ञयाग, भारतीय संस्कृतीत मूलभूत असलेल्या चालीरीती, तीर्थस्थानांच्या यात्रा यांनाही महत्त्व देणारे चित्रपट निघू लागले. एक प्रकारे जुन्या-नव्या विचारांचे मंथन चित्रपटसृष्टीत होऊ लागले आणि त्यावर निर्माता व भांडवल पुरविणारा यांची हुकमत वाढत चालली. 'अछूत कन्या', 'गोदान', 'आवारा' यांसारख्या चित्रपटांतून समाजप्रबोधन होत होते. व्यवसायाचा भागही त्यामध्ये पाळला जात होता आणि अशा चित्रपटांमधून राष्ट्रभक्ती, समाजसुसंवादित्व, समाजऐक्य इत्यादींचा प्रसार होत होता. 'पैगाम'सारख्या चित्रपटाचा उद्देश जातींमधील संघर्ष कमी करणे हा होता आणि याच परंपरेतून जातिभेदामधील असमानता, अस्पृश्यता, बालविवाह इत्यादी तेव्हाच्या समाजाच्या त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवले जाण्याचे कार्यही होत होते. 'दो आँखें बारह हाथ' सारखा चित्रपट तर गुन्हेगारांमधील माणुसकी कशी जागृत करता येते, या मानसशास्त्रीय सिद्धान्तावर आधारलेला आहे. असे चित्रपट आजही निघतात, नाही असे नाही. पण समाजाचा कल सवंग करमणुकीकडे वळणे सहज शक्य असते. त्याचा फायदा उठवून 'गल्लाभरू' चित्रपटांचे पेव फुटले तर त्याचे नवल वाटायला नको. आजचे चित्रपट तर केवळ लैंगिक भूक भागविण्यावर व त्यामागोमाग हिंसक दृश्यांची रेलचेल चित्रित करण्यावर समाजाची गर्दी खेचत आहेत. त्यातही त्यातील अभिनय, दिग्दर्शन यापेक्षाही त्यामधील भव्य सेट व त्यासाठी केलेला अमाप खर्च हेही काही चित्रपटांचे आकर्षण ठरलेले आहे. गोरगरीब जनतेला चैनीची, आलिशान बंगल्यांची, भव्य दृश्यांची चटक लावून चंगळवादी संस्कृतीची विकृती त्यांच्यामध्ये पेरण्यात या चित्रपटांना वाढते यश मिळत आहे. 

अशा चित्रपटांतून समाजशिकवणुकीची जबाबदारी तर सोडाच, पण कलात्मक दृष्टीही गुदमरली गेली आहे. काही चित्रपट तर केवळ सुरेख छायाचित्रण व सुमधुर लोकप्रिय संगीत यांवर यशस्वी होत आहेत. त्या संगीताचा व त्यामधील भव्य चित्रणाचा चित्रपटाच्या कथानकाशी संबंध असण्याची शक्यता प्रेक्षकही गृहीत धरेनासे झाले आहेत. आपली तर्कशक्ती घरी ठेवून चित्रपटगृहात प्रवेश करावा, या भूमिकेवर आजचा प्रेक्षक खूश आहे. भव्य सेटिंगसाठी पौराणिक व ऐतिहासिक कथानके उपयुक्त ठरतात. या दृष्टीने खरे-खोटे पौराणिक-ऐतिहासिक चित्रपट लोकांसमोर येतात. अशी कथानके किंवा दर्जेदार साहित्यिकांच्या कथा-कादंबऱ्या निवडून त्यावर चित्रपट निघतात; पण पुष्कळदा त्या साहित्यकृतीतील दर्जाच चित्रपटांमध्ये नामशेष झालेला असतो! 'चित्रपटाची गरज वेगळी असते' या मुद्द्याची ढाल पुढे करून कथानकाला सवंग रूप दिले जाते; त्यामुळे साहित्यकृतीवर अन्याय होतो आणि साहित्यिकाची लोकमानसातील प्रतिमा डागाळते. हीच गोष्ट दूरदर्शनच्या अनेक मालिकांमध्ये आजही घडते आहे. 
आजच्या चित्रपटांमधून लोकांना हवी म्हणून दिली जाणारी सवंग दर्जाची करमणूक हिंसा, लैंगिकता, बीभत्सता, अश्लीलता यांकडे वळलेली आहे. मानवी जीवनातील विकृतीवर तिचा भर आहे. मांगल्य, पावित्र्य, कुटंबनीती या सर्व सद्गुणांचा केवळ चवीपुरता शाब्दिक वापर करण्यावर त्यांचा भर आहे. शासनाकडून वा समाजमान्य विविध संस्थांद्वारा मिळणारे पुरस्कारही या अधोगतीला थोपविणारे नाहीत. सेन्सॉर बोर्ड तर कशाचे सेन्सॉर करते याचाच प्रश्न पडतो. सेन्सॉर बोर्डाला चुंबनदृश्ये चालत नाहीत; पण बलात्कार, अश्लील संवाद, क्रूरपणाचे तपशीलवार चित्रण चालते. त्यांना ते कात्री लावू शकत नाहीत. यावरून सेन्सॉर बोर्डाची वृत्ती व हतबलता, नाकर्तेपणा उघड होतो. 

एक काळ असा होता की, दिग्दर्शकाच्या किंवा अभिनेत्यांच्या कलागुणांवर, नावांवर चित्रपट चालायचा. पण आजच्या सगळ्या चित्रपटांमध्ये नायक-नायिका साचेबंद असतात. नायक कुठल्या तरी 'स्वप्नसुंदरी'च्या प्रेमाने विव्हळ झालेले असतात. तिच्या प्राप्तीसाठी जिवाची बाजी लावतात. तिला घरचा किंवा 'खानदाना'चा विरोध असतो. एखादा खलनायक असतो. त्याच्याशी दोन हात करण्याने चित्रपटाची रंगत वाढते. त्यांना वास्तव जीवनातील नोकरीधंद्याच्या विवंचना नसतात. त्यांच्या नायिकांनाही घरातील देखण्या फर्निचरपेक्षा चित्रपटात अधिक महत्त्वाचा अभिनय नसतो. देहप्रदर्शन, भावना जागृत करणारी मादकता, खलनायकाने केलेला बलात्कार आणि नायकाचे तथाकथित नायकत्व; यापेक्षा वेगळे असे चित्रपटात फार कमी असते. कधी या कथानकाला देशभक्तीची ऊब दिली जाते; कधी हिंदु-मुस्लिम संघर्षाचे रंग दिले जातात; पण कथानक तेच असते. ही प्रेमकथाही नसते. त्यापेक्षाही प्रेक्षकांच्या भावना चाळविण्याचे व चेतविण्याचे कार्य ती करीत असते. त्यामुळे बलात्कारासारख्या दृश्यांमध्ये प्रेक्षकांच्या मनात चीड उत्पन्न होण्यापेक्षा विकृत दृष्टी जागृत होण्याचाच संभव असतो.

हिंदी चित्रपट पाहून भारतीय तरुणाची कल्पना करायची म्हटली तर फसगतच होईल. चित्रपटामध्ये रेखाटलेला शूर, धाडसी नायक प्रत्यक्षात मात्र व्यसनांमध्ये गुरफटलेला व बेकायदेशीर कृत्यांमध्ये धाडस वाया घालविण्यात कृतार्थता समजणारा झालेला आहे. हिंदी चित्रपटातील प्रेमचित्रणाने आताच्या महाविद्यालयीन जीवनामधील गुंडगिरी वाढली आहे. एवढेच नव्हे तर, असे गुंडपणाने वागणे नायिकेचे प्रेम संपादन करण्यासाठी आवश्यकच असते, असाच समज रूढ होऊ पाहत आहे. महाविद्यालयीन जीवनात आलेली असुरक्षितता ही शैक्षणिक क्षेत्राला लाजिरवाणी आहे; पण शिक्षणापेक्षा प्रेमाचे आखाडे, मारामारीचे अड्डे व धांगडधिंगा घालण्याला मोकळे मैदान असेच त्याचे स्वरूप चित्रपटांतून रेखाटले जाते. 
भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल सरसकट विधाने करताना आपल्या नजरेसमोर प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टी असते; पण हिंदीच्या जोडीलाच मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, तुलू, गुजराथी अशा विविध भारतीय प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांची प्रवृत्ती सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक भाषेची व प्रदेशाची विशिष्ट जीवनसरणी, पोशाख यांचे दर्शन त्यातून घडत असते. या सगळ्याच प्रादेशिक चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटांचे आकर्षण व अनुकरण अधिक होत असते, याबद्दल वादच नाही. पण या प्रत्येक भाषेने चित्रपटसृष्टीमध्ये भर घातली आहे. त्यांची एकमेकांमध्ये देवाणघेवाणही चालते. एका दृष्टीने चित्रपटसृष्टीतील हा आंतरभारती-प्रकारच म्हणावा लागेल. एकमेकांच्या संस्कृतीचा परिचय व त्या त्या भाषेमधील दर्जेदार चित्रपटनिर्मिती डबिंगद्वारे हिंदी व अन्य प्रांतीय भाषांमधून येत असल्याने एकात्मतेची जाणीव विकसित होण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा करून घेता येईल. भारतीय सामाजिक जीवन आणि त्यामधील विविध प्रश्न यांचे स्वरूप जनतेसमोर मांडले जाते, ते अशा विविध भाषांमधील चित्रपटांमुळे. म्हणूनच कन्नडमधील धर्मविरोधी चळवळ, बंगालमधील संवेदनशील वृत्ती व महाराष्ट्रातील पुरोगामित्व यांचा एकमेकांशी सांधा कसा आहे हे कळणे हेही सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने महत्त्वाचेच ठरते. चित्रपटांनी हे साधले जाते.

भारतीय चित्रपटसृष्टीचा स्वतंत्रपणे विचार करताना इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, चिनी इत्यादी भाषांतील चित्रपटही भारतात पाहिले जातात. त्यांचे महोत्सवही साजरे होतात. जागतिक पातळीवर टिकण्यासाठी, त्यांच्या स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी काही भारतीय चित्रपटमहर्षीही आपले सामर्थ्य वाढवीत आहेत. कलात्मकता व समाजमनावर आपल्या चित्रपटाचा होणारा परिणाम याचा जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने विचार करणारे दिग्दर्शक व निर्माते चित्रपटांद्वारे नवे आदर्श रेखाटू शकतील. मानसिक पातळीवरचे चित्रपट, हेरगिरीचे किंवा युद्धावरचे चित्रपट तुलनात्मक दृष्टीने पाहून हिंदीमध्ये व प्रादेशिक भाषांमध्ये तसे चित्रण आणण्याचा भारतीयांचा प्रयत्न हा सामाजिक जाणीव व्यक्त करणारा ठरतो.

चित्रपटांद्वारे भारत एकत्र जोडला जात आहे. अशा वेळी त्यांमध्ये वर उल्लेखिलेल्या गोष्टींसारख्या काही गोष्टी समान असल्या तरी प्रदेशपरत्वे सामाजिकतेची जाणीव काही भाषांतील चित्रपटांतून अधिक प्रभावीपणे जतन केलेली दिसते. मराठीपुरते बोलायचे तर 'मीठभाकर', 'श्यामची आई', 'सुवासिनी' अशा अनेक चित्रपटांनी सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करायला मदत केलेली आहे. आजही 'दहावी फ', 'वास्तुपुरुष' यांसारखे चित्रपट ही वृत्ती प्रगट करीत आहेत. 'धाकटी जाऊ' किंवा 'माहेरची साडी' यांसारखे चित्रपट लोकांच्या भावनांना हात घालीत आहेत. मात्र त्यांच्यातील भडकपणा हा 'गल्लाभरू' पातळीकडे झुकणारा आहे हे खरेच. मात्र एकंदरीतच हिंदी चित्रपटांमध्ये आदर्श भारतीय पत्नीचे, मातृवत्सल मातेचे, लबाड-धूर्त राजकारणी माणसांचे, नीतिभ्रष्ट सत्ताधाऱ्यांचे साचेबंद चित्रण होत असते हे विसरून चालणार नाही. समाजाला लुटणारा दुष्ट सावकार किंवा ठाकूर यांसारख्या एकसुरी चित्रणामधून समाजस्थितीचे नेमके भान प्रेक्षकांना येऊ शकत नाही. पोलीस व गुन्हेगार यांचे चित्रण तर इतके साचेबंद असते की, कोणत्याही चित्रपटातले चित्रण कोणत्याही दुसऱ्या चित्रपटात चपखल बसू शकेल; त्यामुळे लोकांमध्ये सिनिक वृत्ती व मानसिक दृष्टीने गैरसमज निर्माण व्हायला मदत होते. चित्रपटांतून उलगडणारी कलाकृती, तिचे स्वतंत्रपण, तिचा खास अनुभव असे वेगळेपणाने प्रसारित होणारे चित्रपट हाताच्या बोटांवर मोजण्याइतके थोडे आहेत. 
आजच्या चित्रपटांच्या जबरदस्त परिणामाने समाजातील प्रामाणिकपणाला, मेहनती वृत्तीला, प्रयत्न करण्याला आळा बसत चालला आहे. झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने त्यांच्या मनात घर करून राहतात व अशा श्रीमंतीसाठी काय वाटेल ते करण्याची तयारी असलेली युवा पिढी समाजस्वास्थ्याला धक्का देऊ लागली आहे. कारखानदारी, यंत्रसुविधा यांसारख्या सुविधांनी आधीच माणसाच्या श्रम करण्याच्या प्रवृत्तीला धोका निर्माण केला आहेच. त्यामध्ये चित्रपटातील अशा श्रीमंतीच्या प्रदर्शनाने तरुणांची मने त्याकडे आकृष्ट झाल्याशिवाय राहत नाहीत. तेथील पशुतुल्य रानटीपणा, हिंसा यांचा स्वीकार करण्यात त्यांना अनैतिकता वाटेनाशी झाली आहे. समाजस्थैर्याच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत घातक आहे. शिवाय अशा त-हेची चैनी, चंगळवादी, आलिशान श्रीमंती सर्वसाधारण माणसांना व गरीब जनतेला मिळविणे शक्य नसते; त्यामुळे त्यांना येणारे नैराश्य हेही समाजस्वास्थ्याला बाधक ठरणारे आहे. अशा त-हेचे अनेक समाजविघातक परिणाम समाजाच्या सर्व थरांतील लोकांवर होत असताना त्यांवर उपाययोजना शोधण्याचे प्रयत्न मात्र खूपच अपुरे आहेत..

आपल्याला असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आपण चित्रपटांच्या संदर्भात अतिरेक तर करीत नाही ना याचा विचार निर्माते, दिग्दर्शक, नट यांनी करायला पाहिजे. आपल्याला जे पटेल ते सांगण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे. चित्रपटाच्या माध्यमातून ते अधिक प्रभावीपणे लोकांच्या मनावर बिंबविताही येते आणि निर्माते-दिग्दर्शकांपैकी काही निर्माते-दिग्दर्शक प्रामाणिकपणे आपले विचार प्रसारित करीत असतात, असे जरी समजले तरी चित्रपटातील स्वैर-स्त्रीपुरुष चित्रण, कुटुंबव्यवस्थेतील नात्यांमधील अनैतिकता यांमधून व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार होतो असे मानले तरी ते समूहाच्या व उगवत्या पिढीच्या दृष्टीने घातकच ठरते व निकृष्ट पातळीवरचेच ठरते. समाजातील अनपढ व भाबड्या माणसाला हीनतेकडे नेण्याला असे स्वैराचारी चित्रण कारणीभूत ठरते; म्हणूनच बोलण्याचे व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य किती घ्यायचे याचे भान प्रत्येक क्षेत्रातील कलावंताने जसे ठेवायला हवे, तसेच चित्रपटांतील कलावंतांनीही बाळगायला पाहिजे. चित्रपटातील कलेला कुणाचाच विरोध असणार नाही आणि चित्रपटांनी सामाजिक सुधारणांचा उद्घोष केलाच पाहिजे असेही कुणी म्हणणार नाही. पण कमीत कमी, माणसातील गुणदोषांचे चित्रण करताना घेतले जाणारे स्वातंत्र्य समाजघातक ठरणार नाही; इतके बंधन तरी त्यांनी पाळायला पाहिजे. भारतीय दैवतांची व श्रद्धास्थानांची टिंगलटवाळी करताना आपण त्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना अस्थिर करीत आहोत, हे त्यांनी विसरता कामा नये. माणसाला काय किंवा समाजाला काय जगताना कोणता ना कोणता आधार हवा असतो. तो आधारच काढून घेतला जात नाही ना, हे चित्रपटांनी पाहायला पाहिजे.
अशा गोष्टींवर उपाय म्हणजे समाजाला सतत जागृत ठेवणे, काय चांगले, काय वाईट, कोणत्या श्रद्धा बळकट व कोणत्या घातक याचे सतत भान आणून देणे. हे कार्य समाजहितचिंतकांनी, विचारवंतांनी करायला पाहिजे. आजची सिनेसाप्ताहिके अभिनेत्यांच्या विविध प्रकरणांवर चर्चा करण्यात रंगतात; त्यांनी किती व कशा पद्धतीने कर चुकविला, कुणाबरोबर नृत्य केले अशा फालतू गोष्टींमध्ये रस घेतात. त्याऐवजी चित्रपट कसे असावेत, कसे पाहावेत, अभिनेते अनैतिक वागत असतील तर त्यांना कसे सुधारावे याबद्दलची चर्चा चित्रपट साप्ताहिकांमधून यायला पाहिजे. कलावंतांची कला मोठी असते; पण कलावंत माणूस असतो. त्याला अनेक प्रकारचे मोह होऊ शकतात. अशा मोहग्रस्त, व्यसनाधीन, देशद्रोही व केवळ पैशाच्या मागे लागलेल्या कलावंतांना समाजाने प्रोत्साहन न देता, त्यांना त्यांच्या दोषांची समज द्यायला पाहिजे. आज आर्थिक साहाय्यासाठी अनेक दिग्दर्शक देशद्रोही मार्गाने अन्य देशांची मदत घेत आहेत; भारताबाहेरच्या बँकांमध्ये गैरमार्गाने पैसा साठवीत आहेत. सिने-साप्ताहिकांमधून वेळोवेळी ही माहितीही सिने-रसिकांना मिळत आहे. अशा कलावंतांचे 'उदोउदो' करणे समाजाला घातक आहे. त्यांच्यातला 'भारतीय' जागा करण्याची गरज आहे आणि कलेचे कौतुक कलेच्या सदंर्भात, पण त्यांच्यातील ‘माणसा'चे म्हणून असलेले दोष समाजाने खपवून घेता कामा नयेत. समाजाने कलावंताला, दिग्दर्शकाला, निर्मात्याला, लेखकाला व सर्वच चित्रपटसृष्टीला हे भान आणून द्यायला पाहिजे. त्यासाठी चित्रपटांची परीक्षणे देताना हे कलावंत 'माणूस' म्हणून कमीत कमी नीतिमान असण्याची व देशभक्त नसले तरी निदान ते देशद्रोही नसल्याची खात्री समाजाने करून घ्यायला पाहिजे.

बालगंधर्वांसारखा अभिजात नट प्रेक्षकांना 'मायबाप' अशा संबोधनाने पुकारायचा. या 'मायबापांनी कलेला व कलावंताला प्रोत्साहन द्यायचे असते. पण कला व कलावंत जर समाजाच्या, संस्कृतीच्या मर्मस्थानांवरच हल्ला करीत असतील, संस्कृतीच्या नरड्यालाच नख लावीत असतील तर या प्रेक्षकरूपी 'मायबापां'नी त्यांना वठणीवर आणायला पाहिजे. प्रेक्षक प्रोत्साहन देतात म्हणून कलावंत कलेची मंदिरे उभारू शकतात. एक प्रकारे चित्रपटातील समाजविघातक चित्रण टाळण्याचा 'रिमोट कंट्रोल' प्रेक्षकांच्याच हातात असतो. त्याने त्याचा योग्य वेळी व योग्य प्रमाणात व योग्य त-हेने वापर कसा करावा यासाठी विचारवंतांनी प्रेक्षकांना जागृत ठेवले पाहिजे; मार्गदर्शन केले पाहिजे; चांगले व वाईट कलावंत ओळखायला शिकविले पाहिजे आणि चांगले व वाईट चित्रपटही ओळखण्याची समज प्रेक्षकांना आणून द्यायला पाहिजे.
त्यासाठी विचारवंतांजवळ धैर्य पाहिजे व प्रेक्षकांना आपले विचार पटवून देण्याचे सामर्थ्य पाहिजे. शासनाने वेळोवेळी चांगले चित्रपट व कलावंत यांना पुरस्कार देऊन समाजाची दृष्टी निकोप केली पाहिजे. कलावंताला प्रोत्साहन देताना त्यांच्यातल्या 'माणूसपणा'लाही महत्त्व द्यायला पाहिजे. एन. एफ. डी. सी. सारख्या संस्थांनी यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. जागतिक व भारतीय पातळीवर चित्रपटांच्या संदर्भात वेळोवेळी चर्चा व शिबिरे यांचे आयोजन व्हायला पाहिजे. सेन्सॉर बोर्डाचे कार्यही त्यांनी प्रामाणिकपणे केल्यास ते खूप काही करू शकतील.

भारतासारख्या देशात हिंदी चित्रपटाला खूप काही करण्यासारखे आहे. अशिक्षितपणा व दारिद्र्य या दोन रोगांनी भारत पोखरला जात आहे. कुटुंबसंस्था व विवाहसंस्थेतील एकनिष्ठा यांच्या संदर्भात समाज गोंधळलेल्या अवस्थेत आहे. बदलत्या शिक्षणविषयक पद्धतीमध्ये पालक-पाल्य-शिक्षक-संबंध अधिक स्नेहार्द्र होण्याची गरज आहे. जातिजातींमधील तेढा, दुरावा समाज दुभंगू पाहत आहे. या सगळ्या प्रकारच्या समस्यांनी प्रत्येक व्यक्तीचे मन संभ्रमित झालेले आहे. चित्रपटांतून ही अशी वास्तवातील माणसे, त्यांचे सर्व पातळ्यांवरचे प्रश्न चित्रपटांना आव्हान देणारे आहेत. चित्रपटांनी माणसांसमोर वास्तवही रेखाटावे आणि त्यांच्या मनातील स्वप्नसृष्टीचेही चित्रण करावे. पण त्यांना स्वप्नील जगामध्येच राहायला शिकवू नये आणि त्यांच्यामधल्या रानटी प्रवृत्तींना खतपाणी घालण्यापेक्षा मानवी प्रवृत्ती समर्थ कराव्यात. माणुसकीच्या रुंदावत चाललेल्या कक्षा, माणसाची बौद्धिक क्षेत्रामधील झेप, त्याच्या ठिकाणी उपजत असलेल्या मानवी शक्तीचा विकास, यांकडे लक्ष केंद्रित करावे.
आज तर दूरदर्शनने व त्याच्या वाहिन्यांनी चित्रपटगृहांचे आकर्षण संपुष्टात आणले आहे; पण घराघरांतल्या छोट्या पडद्यावर चित्रपटकथा रंगत असल्याने त्याच्या परिणामांची तीव्रता कितीतरी पटींनी वाढली आहे. अशा वेळी चित्रपटसृष्टीला योग्य मार्गावर ठेवण्याचे कार्य समाजाला करायचे आहे. ते समाज करू शकेलही. समाजमन योग्य मार्गावर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात तरी तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्यासारख्या विभूतींनी मोलाचे कार्य पार पाडले असून आजही पांडुरंगशास्त्री आठवले, वामनराव पै, यांसारख्या आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती समाजमन सुदृढ करण्याचे कार्य नेटाने करीत आहेत. अर्थात, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी 'कॉमन मॅन'ची जागृतीच महत्त्वाची आहे. 

सारांश 
भारतीय चित्रपटाच्या प्रारंभीच्या काळामध्ये नाटकांप्रमाणेच त्यानेही उद्बोधन-प्रबोधनाचे कार्य केले. पण नंतरच्या काळात त्याला व्यावसायिकतेचे स्वरूप आले. व्यावसायिक पातळीवर मोठी आर्थिक उलाढाल करणारे क्षेत्र म्हणून चित्रपटसृष्टी विकसित होऊ लागली आणि या क्षेत्राची धोरणे प्रामुख्याने उद्योगपतींच्या मर्जीवर अवलंबून ठेवणे गरजेचे झाले. केवळ हीन पातळीवरचे करमणूकप्रधान चित्रपटही गल्लाभरू म्हणून पडद्यावर गर्दी खेचून घेऊ लागले. कलादर्शन, सामाजिक हित व प्रबोधन यांच्याकडे दुर्लक्ष झाले. तांत्रिकदृष्ट्या पटकथा-लेखन, प्रकाशयोजना, चित्रण, संगीत, पोशाखादी सजावट-व्यवसाय, प्रसिद्धितंत्र, तिकीटविक्री इत्यादी अनेक प्रकारे व्यवसाय व कला यांना या क्षेत्रात संधी मिळत गेली; पण प्रचंड प्रसिद्धिशक्ती असलेल्या या माध्यमामुळे कलावंत, दिग्दर्शक यांच्या व्यसनांना व अनैतिकतेला प्रोत्साहन मिळत गेले. समाजात चंगळवादी, अनैतिक, लैंगिक, हिंसक वृत्ती बळावत चालली आहे. मूठभर कलेच्या नावाखाली व व्यक्तिस्वातंत्र्याच्या बुरख्याखाली चैनी व छंदीफंदी वृत्ती समाजाला आकर्षित करू लागली. समाजसुधारणा तर राहिली दूरच! पण समाजाला पैशाच्या नादाने देशद्रोहाला व अनाचाराच्या वाटेला नेण्याचे कार्य चित्रपट करू लागले. शासनही या व्यवसायाकडे केवळ आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून पाह लागले. चांगले व समाजाला मार्गदर्शन करणारे व तरीही कलेचे मूल्य जपणारे असे चित्रपट निदान हाताच्या बोटांवर मोजण्याइतके तरी आहेत. ही वस्तुस्थिती पाहता निराशेचे पटल गडद होत नाही इतकेच. चित्रपटातील तरुणांचे चित्रण व स्त्री-प्रतिमा त्यांना कमीपणा आणणारी आहे. त्या मानाने प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये काही प्रमाणात समाजजाणीव आहे असे जाणवते.

त्यासाठी समाजजागृती-विचारवंतांजवळचे धैर्य व योग्यायोग्याच्या समजदारीने चित्रपटांवर बहिष्कार घालणे किंवा स्वागत करणे, हे शस्त्र उपयुक्त ठरणारे आहे.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: