Saturday, 31 October 2020

Marathi Essay on "crime against women", "महिलांवरील वाढते अत्याचार मराठी निबंध", "स्त्रियांवरील अत्याचार एक सामाजिक समस्या मराठी निबंध" for Students

Essay on Crime Against Women in Marathi Language: In this article "महिलांवरील वाढते अत्याचार मराठी निबंध", "स्त्रियांवरील अत्याचार एक सामाजिक समस्या मराठी निबंध", "Save Environment Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "crime against women", "महिलांवरील वाढते अत्याचार मराठी निबंध", "स्त्रियांवरील अत्याचार एक सामाजिक समस्या मराठी निबंध" for Students

'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते । रमन्ते तत्र देवता ।' अशी नारीच्या पूजनाची महती या संस्कृत सुभाषितकाराने गायिली आहे. जगात फक्त दोन प्रमुख जाती. एक स्त्रीची व दुसरी पुरुषाची असेही म्हटले जाते. असे नारीचे मानवी जीवनातील पूजनीय स्थान सांगताना 'न स्त्री स्वातंत्र्यमहर्ति ।' असे म्हणून तिच्या स्वातंत्र्याची किल्ली मात्र पुरुषांच्या हातात देऊन टाकली आहे. पुरुष व स्त्री यांच्याकडे बघण्याच्या दृष्टीची भिन्नताच यामधून जाणवते. स्त्री वंदनीय आहे, पूजनीय आहे म्हणून रक्षणीय आहे व हे रक्षण करण्याचे कार्य ती स्वतः करू शकत नाही. ते कार्य पिता, पती व पुत्र यांच्याकडून होते, ही समाजाची वर्षानुवर्षांची दृष्टी केवळ या वरील दोन सुभाषितांचा एकत्र अर्थ घेतला तरी स्पष्ट होते. तिच्या वाट्याला आलेली 'कुणीतरी तिचे रक्षण करावे' ही भूमिका कधीपासूनची आहे? निसर्गातील मादीकडे ही भूमिका आलेली दिसत नाही. ती काही ठराविक कालखंड वगळता स्वत:चे स्वतः रक्षण करू शकते. मग स्त्री स्वत:चे रक्षण का करू शकत नाही? तिची अशी मानसिकता कुणी निर्माण केली असेल? सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीमध्ये तिच्याकडे असे दुय्यमपण दिले गेले आहे, की मूलतः ती रक्षणीय ठरणारी वस्तू आहे? सिंहिणीच्या मदतीला सिंह धावून येण्याची गरज भासत नाही; पण माणसाच्या जीवनात स्त्रीच्या मदतीला पुरुषाची गरज भासते. याचे कारण मानवी जीवनाचा भर स्त्री-पुरुष यांच्या सहकार्यावर आहे. मुलांच्या जन्मापासून त्यांच्या भरणपोषणाची व त्यांना घडविताना आपाततः मानवी संस्कृतीची जडणघडण करण्याची जबाबदारी स्त्री आणि पुरुष या दोहोंवर असते. म्हणूनच जीवनाच्या सर्व मानवी आघाड्यांवर स्त्री-पुरुष यांच्या एकमेकांच्या सहकार्याची गरज दोघांनाही जाणवत असते आणि अशा सहकार्याच्या पातळीवर त्यांच्यातील समानतेपेक्षा पूजनीयत्व किंवा दुय्यम समजून रक्षणीयत्व ही भूमिका स्त्रीच्या वाट्याला आली. तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांचा व बलात्कारांचा संबंध तिच्या अशा प्रकारच्या दुय्यमत्वाशी आहे. संसारात तिचे स्थान 'केवळ वामे तु जनकात्मजा ।' असे दुय्यमच राहिले. प्रत्येक गोष्टीत तिचे सहधर्मचारिणीत्व केवळ पतीच्या कार्यात 'मम' म्हणण्यापुरतेच समजले गेले आणि त्यामुळेच तीही स्वत:ला त्याच पातळीवर समजू लागली. आपण आपलेच काय पण समाजाचेही रक्षण करू शकतो असा विश्वासच तिच्या मनातून नाहीसा झाला; म्हणूनच अत्याचारांचा विशेषतः तिच्यावरच्या बलात्काराचा संबंध रक्षक म्हणून व भक्षक म्हणूनही पुरुषांशीच जोडला जातो.

आज जागतिक पातळीवर महिला एकत्र यायला लागल्या आहेत. शारीरिक पातळीवर कदाचित स्त्री दुबळी असली तरी बुद्धिमत्तेच्या, ज्ञानाच्या पातळीवर स्त्री व पुरुष असा फरक नसतो, हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात 'माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे स्पष्ट झाले आहे. सामान्यतः सन १७९२ पासून मंद गतीने का होईना याची जाणीव होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणजे सन १९७५ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला वर्ष' म्हणून जाहीर करण्यात आले. स्त्रीविषयक प्रश्नांना अग्रक्रमाचे स्थान मिळू लागले. जगभरातील स्त्रीची परिस्थिती, एक व्यक्ती म्हणून समजून घेण्याकडे लक्ष देण्याची गरज समाजातील विचारवंतांना जाणवली. १९९८ मध्ये चीनमध्ये-बीजिंग येथे आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरली आणि स्त्रीविषयक प्रश्नांचा सर्वांगीण विचार सुरू झाला. स्त्री-शिक्षण, तिची सक्षमता, तिच्यावर होणारे अन्याय यांचे स्वरूप समजून घेतले जाऊ लागले आणि त्यानुसार त्यांचा प्रतिकार कसा करावा याचे भान समाजाला व समाजातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या स्त्रीला येऊ लागले. पाश्चात्त्य देशांतील वरवर सुधारणांची कवचकुंडले धारण केलेले देश असोत, किंवा ज्याला मागासलेले समजतात असे भारत-पाकिस्तानसारखे देश असोत, स्त्रीवरच्या अन्यायामध्ये फारसा फरक पडलेला कुठेच दिसत नाही आणि अगदी अनादिकालापासून सर्वसामान्य पातळीवरची स्त्री सतत अन्यायाला, अत्याचाराला व बलात्काराला आपापल्या परीने तोंड देत जगत आलेली आहे किंवा अन्याय सहन करीत आलेली आहे. वेदकालीन गार्गी, मैत्रेयी यांचे अपवाद असोत; मध्ययुगीन रझिया सुलताना, जिजाबाई, राणी चेन्नमा यांचे अपवाद असोत; पण ते अपवाद आहेत. त्यांच्यावरून नियमांचीच खातरजमा होत असते.

कुणीही कुणावरही कधीच अन्याय करीत नाही, असे आदर्श समाजजीवनाचे चित्र फक्त कविकल्पनेतच असते. श्रीमंत गरिबांवर अन्याय करीत असतात. सत्ताधीश सत्तेचा गैरवापर करीत अन्याय करीत असतात. वरिष्ठ समजला जाणारा वर्ग कनिष्ठावर अन्याय करीत असतो आणि असे नसले तरी प्रत्येक समाजस्तराला आपल्यावर अन्याय होतो असेच वाटत असते. पण व्यक्ती-व्यक्तींनी एकमेकांवर अन्याय करणे वेगळे आणि 'स्त्री' म्हणून स्त्रीला सोसावे लागणारे अन्याय वेगळे. कुठे वांशिक भेदातून अन्याय होत असतात; कुठे जाती भिन्नतेमुळे अन्याय सहन करावे लागतात; पण त्यांमध्ये आणि स्त्रीवर होणाऱ्या अन्यायांमध्ये मूलतः फरक आहे. तिच्यावरच्या अन्यायांमध्ये शारीरिक अत्याचारावर भर असतो. हा शारीरिक अत्याचार तिला मानसिक दृष्टीने घाबरवून टाकतो; कारण त्या अत्याचाराच्या वाच्यतेने ती समाजबहिष्कृत केली जाते. समाजात तिला बदनाम केले जाते. तिच्या आत्मसन्मानावर- प्रतिष्ठेवर आघात केले जातात. तिला घरादाराला मुकावे लागते. तिच्यावर अत्याचार करणारा पुरुष समाजात उजळ माथ्याने मिरवू शकतो. कदाचित समाजाला त्याचा पत्ताही लागत नाही; पण अत्याचाराची बळी झालेली महिला मात्र समाजातून उठते. म्हणूनच तिच्यावर होणारा शारीरिक अत्याचार हा तिच्या जीवनाचा प्रश्न ठरतो.

तिला आयुष्यातून उठविणारे असे अत्याचार समाजाच्या अनादिकालापासून होत असले तरी त्यांची कारणपरंपरा शोधता येते. कदाचित अगदी प्रारंभी तिचे व पुरुषवर्गाचे स्थान समान पातळीवरचे असेल; पण नंतरच्या धकाधकीच्या जमान्यात, पुरुष घराबाहेरच्या जगात शिकारीसाठी, टोळ्यांपासूनच्या संरक्षणासाठी जास्त काळपर्यंत घराबाहेर वावरत असेल. कामाच्या विभाजनामध्ये घरातील, मुलाबाळांच्या संगोपनाची, स्वयंपाक-पाण्याची जबाबदारी मूलत:च कलेची आवड असलेल्या स्त्रीकडे आली असेल. घराबाहेरच्या कामात गुंतलेल्या पुरुषांना आपला बौद्धिक विकास करणे शक्य झाले असेल आणि त्यामधूनच स्त्रीचे स्थान दुय्यम होऊ लागले असेल. मानवजातीच्या संदर्भात मुलांचे संगोपन, त्यांना घडविणे, त्यांच्यावर संस्कार करीत त्यांना लहानाचे मोठे करणे हे काम घरात राहणारी माता करू लागली. ही चिकाटीची कामे करता करता पितृसत्ताक, पुरुषप्रधान सत्ता विकसित होत गेली असेल.

वैदिक काळात गार्गी, मैत्रेयीसारख्या स्त्रिया तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आपले वेगळे कर्तृत्व सिद्ध करताना दिसतात. एखादी रझिया सुलताना बनते- दिल्लीच्या तख्तावर विराजमान होते. एखादी चांदबिबी किल्ल्याचे रक्षण करून राज्यउभारणीत मदत करते; पण त्यावरून सर्वसामान्य थरातील स्त्रीचे जीवन जोखता येत नाही. स्त्री व पुरुष असा भेद सर्वच क्षेत्रांत केला जातो. तिच्या गुणांना, त्यांच्या विकासाला पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळत नाही; त्यामुळे आपण सगळ्याच दृष्टीने कमी आहोत, ही भावना तिच्या मनात रुजते. आपण कोठेतरी कमी आहोत, ही भावना खोलवर रुजली असल्याने स्त्री अन्यायाचा प्रतिकार करू धजावत नाही. अन्यायापुढे हतबल ठरते. स्त्रीला गरीब गाईची उपमा दिली जाते. समाजच तिला गरीब गाय बनवतो; तिला मानसिकदृष्ट्या पराधीन बनवतो.

स्त्रीवरचे हे शारीरिक अत्याचार वाढत राहिले; कारण तिला शिक्षण, समाजकारण, राजकारण, कलाक्षेत्रे इत्यादी घराबाहेरच्या विविध क्षेत्रांत वावरण्याची संधी नाकारली गेली. 'क्वचित् गानी पतिव्रता' (गाणारी स्त्री पतिव्रता असतेच असे नाही.) यांसारख्या वचनांनी तिच्या केवळ पातिव्रत्याला महत्त्वाचे स्थान देऊन तिच्या 'एक व्यक्ती' म्हणून असणाऱ्या गुणांना दुय्यमत्व दिले. मुलीला घडविताना घरसंसार, स्वयंपाक, घरातल्यांचे मानपान एवढेच शिकविण्यावर भर राहिला. तिच्या मनाचा व बुद्धीचा नीट विकास झाला तरच ती आदर्श पत्नी व आदर्श माता ही पदे जबाबदारीने सांभाळू शकते. शिवाजी महाराजांवर संस्कार करणारी जिजामाता अशिक्षित नव्हती. रामायण-महाभारतादी कथा तिला माहिती होत्या. लहानपणापासून ती जाधवभोसले यांच्यासारखे मराठे सरदार व राज्यकर्ते मुसलमान यांच्या राजकीय हालचाली समजणारी होती; म्हणून महाराष्ट्रातील स्त्रियांवर होणारा अन्याय तिला अस्वस्थ करीत होता. जिजाईंच्या या अस्वस्थतेतूनच शिवरायांमधील राजा घडत गेला-संस्कारला गेला. तेव्हा हे आदर्श पत्नीचे, आदर्श मातेचे कर्तव्य पार पाडणाऱ्या स्त्रीजवळ शिक्षणाचे, संस्कारांचे, पारंपरिक वारशाचे व घरात शिकविलेले शिक्षण होते. द्रौपदीजवळही असेच संस्कार होते; म्हणून तिने पांडवांबरोबर वनवास भोगून आपल्यावरच्या अन्यायाचा बदला घेतला. म्हणजे स्त्री आपल्यावरच्या अत्याचाराचा बदला घेऊ शकते; पण त्यासाठी तिला जागरूक राहावे लागते आणि त्यासाठी मुलांना किंवा पतीला 'घडवावे' लागते. ती स्वतः त्याचा बदला घेऊ शकत नाही, असे चित्र निदान 'कालपर्यंत'च्या स्त्रीचे दिसते. 

स्त्रीवर होणाऱ्या मानसिक अन्यायांपेक्षा तिच्यावर होणारा शारीरिक अत्याचार हा सर्वात मोठा आघात असतो; कारण धर्मामध्ये, लौकिक जगामध्ये, कुटुंबामध्ये व स्त्रीच्या विश्वामध्येही तिच्या मनापेक्षा शरीराला महत्त्व अधिक असते. तिच्या संदर्भातली सगळी नैतिकता तिच्या शरीरपावित्र्याशी जखडलेली आहे; कारण निसर्गतः अपत्यसंभवाचा संबंध मनापेक्षा देहाशी अधिक असतो, म्हणूनच देहभ्रष्ट करणारा अत्याचार तिच्या बाबतीत अनर्थकारक ठरतो. समाजाने, धर्माने, पुरुषवर्गाने यावर भर दिला आणि त्यामुळे इतरांवर, म्हणजे पुरुषवर्गावर होणाऱ्या अत्याचारापेक्षा स्त्रीवरचा अत्याचार लक्षात घेण्याची गरज आजच्या विचारवंत समाजाला जाणवू लागली.

कुटुंबामध्ये, घरामध्ये व सार्वजनिक जीवनात या शारीरिक पावित्र्यावर जसजसा अधिकाधिक भर येत चालला, तसतसा स्त्रीचा सगळीकडचा वावर मर्यादित होऊ लागला. संस्कारांमधून मिळणारे शिक्षण कमी झाले. घराबाहेरच्या जगामध्ये वावरण्याने येणाऱ्या बुद्धीची प्रगल्भता, सावधानता, चतुरपणा, माणसे ओळखण्याची शक्ती अशा अनेक गुणांनी ती पुरुषांपेक्षा मागे पडू लागली आणि म्हणूनच आपले जगणे कुणावरती तरी अवलंबून ठेवण्याची दुबळी वृत्ती तिच्यामध्ये बळावली. आपल्या मुलांना 'समर्थ' बनविणारी स्त्रीच आपल्या मुलीला वेगळे घडवू लागली आणि मुख्य म्हणजे-मुलगी म्हणजे आपल्यासारखेच परस्वाधीन जगणे म्हणून तीच तिचा राग करू लागली. बाहेरच्या जगातच काय पण सासरी वावरतानाही इतरांची मने सांभाळून राहण्याचे व पतीलाच परमेश्वर मानण्याचे शिक्षण या पराधीनतेतून तिला दिले जाऊ लागले. तिच्यावरचे सासरी होणारे अत्याचार, तिच्यामधल्या या दुबळेपणातून आले. सामान्यतः 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' या न्यायाने तिला दुबळेपणामुळे अत्याचाराचे बळी व्हावे लागले. पूर्वीही सासरच्या छळाला कंटाळून विहीर जवळ करणाऱ्या सासुरवाशिणी कमी होत्या असे नाही; पण हल्ली प्रसारमाध्यमांतर्फे त्या बातम्या समाजाच्या कानावर येऊ लागल्या; त्यामुळे समाजमन अस्वस्थ होऊ लागले.

अत्याचार आणि अन्याय हे एकमेकांच्या फार जवळचे असले तरी अत्याचाराचा संबंध शरीराशी असतो. त्याद्वारा होणारा अन्याय मनावर आघात करीत असतो. पण शरीरावर आघात न करताही स्त्रीला अनेक अन्याय मूकपणे सहन करावे लागतात. या सगळ्याच अन्यायांचे मूळ अत्याचारात नसते; पण अत्याचारांचा हेतू मात्र अन्याय करण्याचाच असतो. या दृष्टीने विचार करता, घराच्या परिसरात नात्याच्या बंधनातून तिला अत्याचार सहन करावे लागतात. त्यांचे स्वरूप वेगळे असते. हे अत्याचार घरातल्याच इतर पुरुष नातेवाइकांकडून विकृत लैंगिक वर्तनातून घडलेले असतात. एकत्र कुटुंबातील या नातेवाइकांना ती टाळू शकत नाही; त्यांच्याबद्दल कुणाकडे बोलू शकत नाही आणि या तिच्या अगतिकतेचा फायदा घेऊन ती वाईट वळणाकडे गेली तर त्याचा दोष मात्र तिला असतो. स्त्रीवर लैंगिक अत्याचार करणारा दोषी असूनही तो निर्दोष राहतो, हीच वस्तुस्थिती अशा प्रकारचे अत्याचार वाढण्याला मदत करणारी आहे. समाजातील या नैतिकतेवर संपूर्ण कुटुंबव्यवस्था अवलंबून आहे; त्यामुळे लैंगिक पातळीवरच्या या अत्याचाराला स्त्री वाचा फोडू शकत नाही. या संदर्भात समानता कशी आणायची? अशा बलात्कारित स्त्रीला समाजात प्रतिष्ठा देणे किंवा तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पुरुषाला शासन करणे यांपैकी कोणताही पर्याय समाजाच्या हातात नाही. म्हणून अशा प्रकारचे बलात्कार कमी व्हावेत यासाठी समाज स्त्रीला दोषी ठरवितो; कारण निसर्गन्यायानुसार स्त्री अडकते. तिनेच अशा अत्याचारांपासून दूर राहण्याचे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा समाज करतो. ती स्वतः सुरक्षित राहू शकत नाही; म्हणून तिला सुरक्षित कसे राहावे हे न शिकविता, तिच्यावर समाज बंधने लादतो.

कुमारीमातेचा प्रश्न यांसारख्या अत्याचारांतूनच उद्भवतो. कुंतीसारख्या राजघराण्यातील स्त्रीलाही कुंवारपणात झालेल्या 'कर्णा'चे मातृत्व उघड करता आले नाही, तिथे सर्वसामान्य स्त्रियांची काय अवस्था! (पण कुंतीच्या पूर्वीच्या काळातील सत्यवती मात्र कुमारीपणात झालेल्या 'व्यासां'चा उल्लेख भीष्माजवळ करते!) निसर्गतः स्त्रीचे मातृत्व उघड होत असल्याने, समाजाने नीतिपालनासाठी स्त्रीवर अधिक बंधने घातली. सुसंस्कृत समाजात तिच्या बंधनांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न फारसे कुणी करीत नसेलही; पण या समाजव्यवस्थेतील पुरुषाकडे झुकणाऱ्या नीतीमुळे असंस्कृत समाजात स्त्रीवरचे अत्याचार वाढत चालले. स्त्रीच्या देहाला आणि पुरुषाच्या मनाला ज्या नीतीमध्ये महत्त्व येऊ लागले ते टाळता येणे शक्य नव्हते; पण त्यामुळेच स्त्रीवरचे अत्याचार पुरुषवर्गाला आपली सत्ता व अधिकार दाखविण्याचे एक साधन वाटू लागले. तिची लीनता, विनम्रता, सहनशीलता यांचा संबंध दुबळेपणाशी जखडला जाऊन ती कुणाची तरी मालमत्ता समजण्याची प्रवृत्ती जगात मध्ययुगीन काळात बळावली. निसर्गाने तिच्याकडे दिलेली निर्मितीची शक्ती ही समाजव्यवस्थेसाठी तिला बंधनकारक ठरली. तिच्या या शारीरिक निष्कलंकतेवरच कुटुंबाची पती, पुत्र इत्यादी नात्यांची जडणघडण अवलंबून असल्याने जन्मापासून त्या प्रकारे तिला घडविण्याची पद्धत पडली. आज नोकरीधंद्याच्या निमित्ताने घराबाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या आधुनिक स्त्रीला घरावरच संस्कार करायला वेळ राहिला नाही; म्हणून मुलांना व घरातील समस्त पुरुषांना संस्कार देण्याचे कार्य होऊ शकत नाही; त्यामुळे आधीच पाशवी पातळीवरील वासनांचे आधिक्य असलेल्या पुरुषांकडून अशा प्रकारचे बलात्कार अधिक होऊ लागले.

कालखंड कोणताही असो, राजवट हिंदूंची असो, मुस्लिमांची असो वा इंग्रजांची असो- स्त्रीवरचा हा बलात्कार वेगवेगळ्या प्रकारे वाढतच राहिला. रात्री-बेरात्री घराबाहेर हिंडताना, नोकरीधंद्याच्या निमित्ताने परगावी जाताना किंवा पुरुषवर्गाशी समानतेने वागण्याच्या भरात ती बलात्काराची बळी ठरू लागली. स्त्रीस्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पनेच्या आहारी गेल्यामुळे, चित्रपटातील फॅशन्सचा प्रभाव वाढल्याने, तिच्याकडे बघण्याची पुरुषांची दृष्टी कामुक होऊ लागली आणि बलात्काराला रोखण्याचे बळ न मिळविणारी ही स्त्री दुसऱ्यांना दोष देऊ लागली. बलात्कार कोणत्याही कारणाने होत असला तरी तो गुन्हाच ठरतो. त्याला शासन करण्यासाठी असलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी व त्यांच्या पाठपुराव्यासाठी स्त्रियांनी एकत्रित येऊन आपले सामर्थ्य वाढवायला हवे; पण त्याबरोबरच कराटे किंवा अन्य प्रकारचे संरक्षणात्मक उपाय शिकून घ्यायला पाहिजेत. शासन किंवा कुणी महात्मा फुले, कुणी महर्षी कर्वे मदतीला आले तर ठीकच, पण स्वत:च आपण आपल्यावरच्या कोणत्याही प्रकारच्या अन्यायाचा, विशेषतः बलात्काराचा प्रतिकार करण्याची शारीरिक ताकद कमविली पाहिजे. आपल्या वागण्याने, पोशाखाने, कर्तबगारीने आपल्या मनोधैर्याचा व आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय पुरुषांना आणून देण्याचे जर स्त्रीला जमले तर तिच्यावरचे अत्याचार कमी होऊ शकतील.

विवाह हे स्त्रीच्या आयुष्याचे एकमेव इतिकर्तव्य ठरविले गेले; त्यामुळे कोणत्याही मार्गाने तिचा विवाह करण्यामागे पालकांचे प्रयत्न राहिल्याने, मुलगी म्हणजे त्यांना जबाबदारीचे ओझे वाटू लागले. या जबाबदारीतून सुटण्यासाठी भ्रूणहत्या होऊ लागली. सासरी मुलीला निराधार वाटू लागले किंवा सासरी छळ होऊ लागला, तर ना उपजीविकेसाठी शिक्षण ना आई-वडिलांचा आधार. यामधूनच सासरचा छळ सोसणे, शारीरिक कष्ट भोगणे, मारहाण सहन करणे याशिवाय पर्याय राहिला नाही. अत्याचाराचे हे दुसरे रूप आहे. तिला पतीशिवाय दुसरा आधार नसल्याने विधवा स्त्रीचे आयुष्य हे अधिक शारीरिक कष्टांनी व उपासतापासांनी आळविले जाऊ लागले, हाही अत्याचारच. या अत्याचारामागेही तिच्या संरक्षणाची सोय नसणे हाच विचार आहे. समजा, ती नीटनेटकी राहिली, कुणाचे तिच्याकडे लक्ष गेले, तर तिच्याकडून 'पाप' घडेल, या भीतीने ती शरीराला आळविण्याचा व कुरूप दिसण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या संसाराच्या भावनांचा व तिच्या कोवळ्या वयाचा विचार न झाल्याने तिचा मानसिक पातळीवर होणारा छळ वेगळाच. पण तो बाजूला ठेवला तरी अत्याचाराचे स्वरूप विसरता येत नाही. या प्रकारच्या अत्याचारांमधून अनैतिकतेला खतपाणीच घातले जाते.

स्त्रीवरच्या अत्याचाराला आणखीही वेगळा संदर्भ आहे. युद्धांमध्ये, दंगलींमध्ये, रणधुमाळ्यांमध्ये शत्रुपक्षाकडील स्त्रिया पळविणे व बलात्कार करणे हे पराक्रमाचे कृत्य समजले जाते. नौखालीच्या दंगलीत अनेक स्त्रियांची अब्रू लुटली गेली. अशा वेळी हे कृत्य करणाऱ्यांना त्या स्त्रियांबद्दलचा राग नसतो, त्यांच्या ठिकाणी असलेली क्रूर पाशवी वासना त्यांना अशा ठिकाणी तृप्त करून घेता येते. घरीदारी स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक अत्याचारांपेक्षा या बलात्कारातील वृत्ती अधिक हिंसक आहे. स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू आहे, ही भावना त्यामध्ये प्रभावी झालेली असते. लढा द्यायचा आहे तो या पाशवी पातळीवरच्या शक्तींशी. या पाशवी शक्ती सुसंस्कृत होऊ शकतील काय? त्यांना आटोक्यात तरी ठेवता येईल काय? यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. आदिवासी जमातींपैकी काही जमातींमध्ये 'बलात्कार हा क्षमा न करण्यासारखा गुन्हा' आहे आणि त्याला मृत्युदंड ही एकमेव सजा आहे. अशी सजा मिळत असल्याने रानावनात एकट्यादुकट्या वावरणाऱ्या स्त्रीच्या वाटेला जाण्याचे धाडस कुणीही करीत नाही. असे शासन आज सरकार देऊ शकत असले तरी साक्षीपुराव्याच्या जाळ्यात त्यातला गुन्हा कसा गाळून टाकायचा ते वकिलांना बरोबर जमते; कारण वकिलांना पुष्कळदा आपल्या हुशारीची खात्री असते; भरभक्कम फीची आसक्ती असते आणि सामाजिक, नैतिक जबाबदारीची पर्वाही नसते. समाजात वकील, डॉक्टर इत्यादी सर्वच व्यवसायांमध्ये ही सामाजिक जाणीव जागृत होणे आवश्यक आहे. अशी जागृती स्त्रियांवरील अत्याचार रोखू शकेल.

स्त्रीच्या मनात शारीरिक दुबळेपण रुजविले गेले. पुरुषांच्या शारीरिक बलवत्तेच्या जोडीलाच सत्ता, अधिकार, पैसा व सामाजिक, धार्मिक समजुती यांमुळे स्त्रीवरचे हे सर्व प्रकारचे अत्याचार वाढते राहायला मदत झाली. तिचे सहधर्मचारिणीचे व सल्लागाराचे स्थान जाऊन ती केवळ 'पती हाच परमेश्वर' कशी समजेल यावर भर दिला गेल्याने ती पतीला, पित्याला, मुलाला व कौटुंबिक नात्याने जखडलेल्या पुरुषांना नैतिकतेचे संस्कार देण्यातच अपुरी पडू लागली.

कुटुंबव्यवस्था स्त्रीवर अवलंबून असते; पण कुटुंबप्रमुख मात्र पुरुष असतो. कुटुंबाला घडविण्याचे व सुसंस्कारित करण्याचे कार्य स्त्री करीत असते. आज उभी असलेली संस्कृती स्त्रीच्या त्यागावर, सहनशीलतेवर, संयमावर व स्वतः पुढे न येता इतरांना पुढे येण्याचे संस्कार देण्यावर आधारलेली आहे. एक प्रकारे 'कुटुंब घडविणे' हे तिने आपले 'करियर' केले आहे. याचा अर्थ, तिला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून विकास करता येत नाही; तिला स्वत:चे संरक्षण करता येत नाही; स्वत:ला बलात्कारासारख्या अत्याचारापासून सुरक्षित ठेवता येत नाही असा नाही. ती ताकद निसर्गत:च तिच्याजवळ आहे. जयवंत दळवींच्या 'पुरुष'सारख्या नाटकांमधून त्याची सूचना दिलेली आहे. शारीरिक पातळीवरच्या अन्यायाचा प्रतिकार ती शारीरिक पातळीवरून करू शकते. फक्त आपल्या या शारीरिक क्षमतेची जाणीव तिने ठेवायला पाहिजे व आपण अधिकाधिक सबल कशा राहू याकडे लक्ष पुरविले पाहिजे. प्रचंड शक्ती असलेल्या हत्तीला मुंगीसुद्धा हैराण करू शकते. स्त्रीने आपली शारीरिक क्षमता वाढविली आणि आपल्या सामर्थ्याची जाणीव ठेवली तर बलात्कारांचे प्रमाण कमी होईलच, पण समाजात नैतिकता विकसित व्हायला मदत होईल.

बलात्काराची रूपे विविध आहेत. ज्याला धार्मिकतेचा आधार मिळालेला आहे, अशी देवदासींची प्रथा, देवाला मुली वाहण्याची प्रथा- हा एक प्रकारे बलात्कारच आहे. वेश्याव्यवसायाचे ते दुसरे रूप आहे. या दोन्ही प्रकारांत स्त्रीची होणारी विक्री व तिची फसवणूक यांचा संबंध लैंगिकता व अर्थप्रधानता या दोन गोष्टींशी आहे. वेश्याव्यवसाय हा अनादिकालापासून चालत आला आहे. याला बलात्कार म्हणायचे की ती एक भावनिक पातळीवरची समाजाची गरज म्हणायचे? वेश्याव्यवसायात पडलेल्या सर्वच स्त्रिया फसविल्या गेलेल्या असतात काय? पैसे मिळविण्याचा सोपा मार्ग म्हणून त्याकडे स्वतः होऊन वळणाऱ्या स्त्रिया नसतात काय? असे प्रश्न समाजचिंतकांनी वेळोवेळी विचारात घेतले आहेत. कुटुंबसंस्थेच्या नैतिक पातळीमध्ये न बसणारा स्त्रीवर्ग पूर्वीही 'अप्सरा' या नावाने असावा आणि सामाजिक नैतिकता व कुटुंबसंस्था टिकविण्यासाठी त्याची आवश्यकता मानावी लागते, असे मत समाजशास्त्रज्ञ देऊ लागले आहेत. ज्यांच्या भावनिक तीव्र गरजा कुटुंबसंस्थेमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत अशा स्त्रिया वेश्याव्यवसायाकडे वळलेल्या असाव्यात. त्यांना बलात्कारित म्हणता येत नाही. पण आपला हा उपजीविकेचा व्यवसाय प्रौढावस्थेतही आपल्याला आर्थिक मदत देणारा ठरावा, यासाठी मुली पळवून आणणे आणि त्यांचा शरीरविक्रय करून आपले पोट भरणे, हा नवाच व्यवसाय सुरू झाला. विशेष म्हणजे स्वतः प्रौढावस्थेत गेलेल्या- वृद्धावस्थेत गेलेल्या- स्त्रियाच तो करू लागल्या.

कुटुंबसंस्थेबाहेर राहणारा व तरीही स्वत:चे स्वतंत्र नीतिनियम पाळणारा स्त्रीवर्ग पूर्वीपासून समाजात आहे. विवाहबंधन न स्वीकारताही या स्त्रिया एखाद्या पुरुषाशी आयुष्यभर एकनिष्ठ राहतात. पुष्कळदा या स्त्रिया संगीत, तमाशा अशा कलाक्षेत्रांतील कलाकार असतात. अशा स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराकडे समाज सहानुभूतीने पाहतोच असे नाही.

कुटुंबसंस्थेचा स्त्रीला आधार मिळावा; यातून बालविवाह, अनेक स्त्रियांशी विवाह किंवा जरठ-बालविवाह अशा विवाहांना मान्यता मिळत राहिली. एक प्रकारे हेही अत्याचाराचे वेगळे रूपच म्हणता येईल.

आधुनिक युगात पैसा केंद्रस्थानी आहे. त्याच्या पाठीशी सत्तेचे बळ आहे; म्हणूनच भल्याबुऱ्या मार्गाने संपत्ती मिळविण्याचे जे अनेक मार्ग सुचतात, त्यांतलाच विवाह हा एक सोयीस्कर मार्ग समजला जातो. भरपूर हुंडा घेऊन अनेक लग्ने करणे व अगोदरच्या पत्नीचा छळ करून तिचे जगणे कठीण करणे, हे मार्ग अनेक सुशिक्षित अनुसरताना दिसतात. स्वत:चा 'अहम्' सुखावण्यासाठी घरातल्या सुनेचा छळ करणारे सासू-सासरे कमी नाहीत. पाशवी वासनांच्या आहारी जाणारे नवरे तर स्त्रीला किती प्रकारे शारीरिक त्रास देत असतील त्याबद्दल सांगणे कठीणच!

या सर्व प्रकारच्या अत्याचारांचा हेतू काय? कोणत्याही शारीरिक अत्याचाराचा हेतू आपली सत्ता अबाधित ठेवणे व दुसरी सत्ता ठेचून काढणे हाच असतो. पुरुषप्रधान व पितृसत्ताक जीवनामध्ये अशा द्वेषाच्या व स्त्रीला विकसित होऊ न देण्याच्या भावना समाजघातक आहेत. सुसंस्कृतता विकसित करणे, समाजात स्त्रीकडे बरोबरीच्या नात्याने पाहण्याची सवय लावणे (व ज्यांना ती लावून घेता येत नसेल त्यांना शासन करणे), हे स्त्री व पुरुष दोघांचे कर्तव्य आहे. अत्याचार, बलात्कार करणारा पुरुष असला तरी वैर त्याच्यातल्या रानटी प्रवृत्तीशी आहे. हाच पुरुष स्त्रीचा पिता, पती, पुत्र, नातू, बंधू, मित्र अशा विविध नात्यांनी तिच्याशी जोडलेला आहे; म्हणूनच पुरुषांच्या मनामध्ये या नात्यांची जाणीव जागृत करणे, जनमत बनविणे हा यावरचा मोठा उपाय आहे. त्यासाठी स्त्रियांनी समूहाने एकत्र यायला पाहिजे. आपल्यातले दोष, आपला दुबळेपणा टाकून आत्मविश्वासाने, विचारपूर्वक मार्ग ठरवून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. समाजासमोर आपली प्रतिमा कशी असावी, व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाच्या भावना चाळवतील असा पेहराव करायचा की नाही हे ठरवायला हवे. दूरदर्शन, चित्रपट-वाहिन्या, पोस्टर्स यांवरची स्त्रीची चित्रे आपल्याला कमीपणा आणणारी आहेत असे तिला जरी वाटत नसले तरी त्यामुळे आपल्यावरच्या अत्याचाराला प्रोत्साहन मिळते, हे तिला लक्षात घ्यावेच लागेल. कला, व्यवहार, करियर, संसार या सगळ्यांचा समाजाच्या दृष्टीने व स्वत:च्या भवितव्याच्या दृष्टीने तिने विचार करायला पाहिजे. 

समाजाची दृष्टी व वृत्ती बदलविण्याचे सामर्थ्य तिने दाखवायला पाहिजे. ज्या जोतीबा फुलेंच्या काळात शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रीला दगडांचा मारा खावा लागत होता, त्या स्त्रीलाही आज नोकरी-धंदाव्यवसाय-करियर यामुळे जीवनात व संसारात स्थिरता आणता येऊ लागली आहे. अहिल्याबाई होळकर, ताराबाई यांच्यासारख्या कर्तबगार ऐतिहासिक स्त्रियांचे आदर्श तिने आपल्या समोर ठेवले पाहिजेत. आज राजकारण, समाजकारण, अध्यात्म, शिक्षण, लेखन, विविध कलाक्षेत्रे इत्यादी अनेक ठिकाणी ती कर्तबगारी सिद्ध करीत आहे. एका कर्तबगार पुरुषामागे इतके दिवस त्याची पत्नी असे, आज अशा एखाद्या कर्तबगार पत्नीच्या कार्यामध्ये पती आपली दुय्यमपणाची (सहकाराची) भूमिका बजावताना दिसत आहे. याचा फायदा तिच्यावर होणाऱ्या अत्याचारविरोधी आवाज उठवायला निश्चितच उपयोगी पडणार आहे. एकाच वेळी कुटुंबसंस्था विस्कळीत न होऊ देणे व घरीदारी होणाऱ्या अत्याचारांचा प्रतिकार करणे हे सामर्थ्य तिच्याजवळ आहे. फक्त त्याचे भान तिला यायला पाहिजे.

जगभरातील महिला आज स्वत:चा विचार करण्यासाठी एकत्र येत आहेत; जागृत होत आहेत; आपले सामर्थ्य कशात आहे याचे विश्लेषण त्या करू पाहत आहेत. पुरुषप्रधान समाजरचना उलथून टाकून स्त्रीप्रधान समाजरचना आणण्याचे स्वप्न स्त्रीने पाहू नये; पण पुरुषप्रधान समाजरचनेत तिचे स्थान न्याय्य व सुरक्षित ठेवणारे व तिला एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवायला पोषक असे वातावरण हवे आहे. केवळ मालकीची किंवा भोग्य वस्तू म्हणून तिच्याकडे बघितले जाऊ नये, यासाठीही तिची मानसिक जडणघडण समृद्ध व्हायला पाहिजे. स्वैराचार व स्वातंत्र्य यांमधील फरक तिला व सभोवतालच्या समाजातील पुरुषवर्गाला ओळखता येण्याइतकी सुसंस्कृतता समाजात यायला हवी. यासाठी नारीतत्त्वाचे पूजन व तिला जोपर्यंत स्वसंरक्षणाचे भान येत नाही तोपर्यंत तिचे 'रक्षण' समाजाने करायला पाहिजे. 

सारांश

मानवी संस्कृतीच्या वाटचालीमध्ये स्त्रीकडे दुय्यमपण आले. तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांचा संबंध तिच्या दुय्यमपणाशी आहे. स्त्रीवर स्त्री असल्यामुळे होणारे अन्याय अधिक आहेत. एक व्यक्ती म्हणून होणाऱ्या अन्यायापेक्षा त्यांचे स्वरूप अधिक जाचक आहे. अत्याचार व अन्याय यांमध्ये बलात्कार पातळीवरचा अन्याय म्हणजे न बोलता तिला आयुष्यातून उठविणाराच अन्याय होय.

बालसंगोपन, घर-संस्कृती संवर्धन करताना घराबाहेरच्या विश्वातील तिचे स्थान गौण होत गेले व पुरुषप्रधान अर्थव्यवस्थेवर आधारलेल्या सत्तास्पर्धेच्या राजकारणात तिच्याकडे, मूलतः नसलेले हे दुय्यमपण आले. ती नेहमीच पडद्यामागची राहिली. एक व्यक्ती म्हणून तिचे सर्व पातळ्यांवरचे स्वातंत्र्य हळूहळू कमी होत गेले. कुटुंबसंस्था, विवाहपद्धती, धर्म, चालीरीती इत्यादी सर्वच क्षेत्रांमध्ये तिला शारीरिकदृष्ट्या दुबळी ठरवून तिच्या मानसिक व बौद्धिक क्षमतेकडे तिचे दुर्लक्ष कसे होईल, यासाठी पद्धतशीर प्रयत्न झाले. कौटुंबिक नात्यापेक्षाही तिच्याकडे 'उपभोग्य वस्तू' म्हणून पाहण्याची सामाजिक हीन संस्कृती रोखली गेली नाही. आज नोकरी वा अन्य कारणांनी घराबाहेर कार्यरत असलेल्या स्त्रीलाही या समस्येला तोंड देत जगावे लागते आणि ही समस्या सोडविण्यासाठी घरातील मुलाबाळांवर संस्कार करण्याची निकड दिसत असूनही तिला वेळ देता येत नाही. परिणामी अत्याचारांचे प्रमाण वाढते राहते. कौटुंबिक जीवन, विवाह इत्यादी घटक स्त्रीजीवनात महत्त्वाचे व निर्णायक असतात, तसे ते पुरुषवर्गाच्या जीवनात नसतात; यामुळे तिची खूपशी शक्ती हे घटक सुस्थिर करण्यामध्ये खर्च होते. स्वत:चे मानसिक सामर्थ्य विकसित करायला व अन्यायाला विरोध करून जनमत तयार करायला तिला फार श्रम करावे लागतात. जुने संस्कार तिला पुसता येत नाहीत. कुटुंबसंस्कृती तिच्या श्रमावर उभी राहते; पण त्याचे श्रेय मात्र तिला मिळत नाही. आज निदान ही जाणीव निर्माण होऊ लागली आहे. समाजात शारीरिक, आर्थिक दांडगेपणाला शिस्त लावता आल्याशिवाय हे अत्याचारांचे व बलात्कारांचे अन्याय्य प्रकार कमी होणार नाहीत.

धार्मिकतेच्या नावावर चालणारे देवदासीसारखे प्रकार, घरातील नात्यांचा आधार घेऊन स्त्रीवर होणारे अन्याय, वेश्याव्यवसाय या सगळ्यांमध्ये प्राणिपातळीवरची लैंगिकतेची भूक आहे. ही प्रवृत्ती दूर करणे व समाजात सुसंस्कृत मानव घडविणे हाच या प्रकारच्या अन्यायावरचा उपाय आहे.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: