Essay on Save Environment in Marathi Language : In this article " वसुंधरा वाचवा मराठी निबंध ", " पर्यावरणाचा समतोल मराठी निबं...
Essay on Save Environment in Marathi Language: In this article "वसुंधरा वाचवा मराठी निबंध", "पर्यावरणाचा समतोल मराठी निबंध", "Save Environment Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Save Environment", "वसुंधरा वाचवा मराठी निबंध", "पर्यावरणाचा समतोल मराठी निबंध" for Students
प्रदूषणमुक्त जीवन पर्यावरणाचा संबंध फक्त निसर्गसृष्टीशीच असतो असे नाही. माणूससुद्धा निसर्गाचीच निर्मिती आहे. 'पिंडी ते ब्रह्मांडी' या न्यायाने त्याच्यातही निसर्गप्रवृत्ती आहे; पण निसर्गानेच निर्माण केलेल्या माणसाने निसर्गाचा समतोल बिघडविण्याचे कार्य केले आहे. इतर प्राण्यांजवळ प्रगल्भ बुद्धी व स्वैरसंचार करणारे मन नसल्याने त्यांच्याकडून निसर्गव्यवस्थेला फारसा धोका पोहोचण्याची शक्यता नव्हती; पण माणसाकडून मात्र स्वत:च्या जीवनात समृद्धी, सुखसोयी व सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या प्रयत्नांतून निसर्गाच्या चक्रनेमिक्रमात बदल घडविले गेले. निसर्गव्यवस्थेमध्ये मनुष्य केंद्रवर्ती नाही. निसर्ग माणसांच्या मदतीसाठी नाही आणि नाशासाठीही नाही. पण निसर्गाचा उपयोग करून घेताना निसर्गातील ज्या घटकांची हानी होते ते भरून काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते, ही गोष्ट मानव विसरला आणि निसर्गाकडून वारेमाप लूट करताना त्याने हाच निसर्गाचा खजिना रिता झाला तर पृथ्वीवरचे सर्वांचेच जीवन धोक्यात येईल, प्रलय माजेल हे लक्षात घेतले नाही. माणसाच्या अमर्याद लालसेपोटी त्याने निसर्गाचे हे संकट स्वत:वर व सर्वच जीवसृष्टीवर ओढवून घेतले आहे.
याची जाणीव झाल्याने जागतिक पातळीवरही त्याचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेसारखी राष्ट्रे युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत; पण आजही या प्रगत देशातील केरकचरा, निसर्ग प्रदूषित करणाऱ्या वस्तू इत्यादी. अप्रगत देशांच्या किनाऱ्यावर टाकण्याचे कार्य कौशल्याने केले जात आहे. मानवी स्वार्थप्रेरित प्रवृत्तीत असलेले हे प्रदूषण दूर झाल्याशिवाय निसर्गाचा हास थांबविण्याचे प्रयत्न तोकड्या वस्त्रासारखे अपुरेच ठरणार आहेत.
मिनीची धप व जंगलतोडी याबद्दलची खंत तर फार प्राचीन काळापासन भारतीय व पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांचे औषधी उपयोग लक्षात घेऊन माणसांच्या मनावर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व ठसविण्याचा प्रयत्न यासाठी केला जातो. तुळशीचे माहात्म्य, वड, पिंपळ, औदुंबर इत्यादी झाडांचे औषधी उपयोग लक्षात घेऊन व अशा मोठ्या वृक्षांमुळे थांबणारी जमिनीची धूप आणि त्यांच्यापासून मिळणारी नैसर्गिक छाया वगैरेंचा विचार करून त्यांची तोड थांबविणे हाच धर्मशास्त्रातील नियमांचा हेतू आहे; पण धर्मातील प्रत्येक नियमाकडे अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहणाऱ्या अंधबुद्धिवाद्यांनी हे निसर्ग वाचविण्याचे, त्याच्या पाठीशी असलेले धोरण लक्षात घ्यायला पाहिजे.
निसर्ग माणसाच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. त्याच्या शक्तींचा संयमित उपयोग करून मानवी जीवन समृद्ध करता येते, हा शोध माणसाला लागला. त्यामधूनच माणसाने आजची औद्योगिक प्रगतीची वाटचाल केली आहे. पण निसर्गाची होणारी हानी भरून काढण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना मात्र त्याने वेळच्या वेळी केली नाही. वाढती शहरे व प्रदूषणाची केंद्रे बनलेले कारखाने उभारताना शेतीसाठी, वनराईसाठी असलेली जमीन कशी उपलब्ध करायची, त्यांचे प्रमाण कसे राखायचे हा तोल सावरणे अगत्याचे आहे, हे मानव विसरला. भारतातील वनक्षेत्राचा विचार करताना मोहन धारिया लिहितात, “गेल्या काही वर्षांत झालेल्या बेकायदा आक्रमणामुळे वनक्षेत्र फक्त ६९-७० दशलक्ष हेक्टर एवढेच राहिले आहे. महाराष्ट्रात तर केवळ ६ ते ७ टक्के चांगले वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. अनेक जिल्ह्यांत तर ३ टक्के क्षेत्रसुद्धा चांगल्या वनाखाली राहिलेले नाही...! मानवी गरज भागविण्यासाठी याच वेगाने जंगलतोड होत राहिल्यास महाराष्ट्र खरोखरीच केवळ दगडांचा देश ठरेल !"
स्वातंत्र्याच्या सुरुवातीला भारताची ३५ कोटी असलेली लोकसंख्या आज १२१ कोटीत पोहोचली आहे. त्यांच्या गरजा भागविण्यासाठी वनसंपदेवर व जमिनीच्या कसावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. पाण्याचा उपसा वाढत आहे; पण शेतीला पाणी पुरविण्याची नैसर्गिक योजना बंद पडत चालली आहे. शेतीच्या क्षेत्रात वापरात येणाऱ्या रासायनिक औषधांच्या चुकीच्या व सततच्या उपयोगाने भूजलामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले आहे. जास्तीची रासायनिक खते जमिनीतून खाली पाण्यात जातात व प्रदूषण वाढवितात. पिकांमध्येही सततच्या रासायनिक फवाऱ्यांमुळे दूषितपणा आला आहे. केवळ शीतपेयेच नव्हेत तर त्यामुळे धान्यधुन्येही निःसत्त्व व प्रदूषित बनत चालली आहेत. मानवी मूलभूत गरजांवरचीच म्हणजे- अन्न व पाणी यांवरची ही प्रदूषणाची चाल मानवाला कोणत्या सुधारणांच्या बदल्यात परवडण्यासारखी आहे? आधुनिक शेतीमध्ये वापरली जाणारी ही औषधे प्रथमावस्थेत पिकांच्या वाढीच्या दृष्टीने व फळाच्या आकारमानाच्या दृष्टीने उपयुक्त वाटली तरी आज त्यांच्या सकसतेत किंवा जीवनसत्त्वांच्या संदर्भात घातक ठरत आहेत. नवीन पद्धतीने तयार झालेल्या आवळ्यामध्ये आवळ्याचे गुणधर्म घटत चालले आहेत! हीच गोष्ट अनेक फळांच्या संदर्भात प्रयोगाने सिद्ध होऊ लागली आहे.
सध्याच्या बेरोजगारी, निरक्षरता, मागासलेपणा, उद्योग, शेती, सामाजिक सेवा इत्यादी समस्यांपेक्षा पर्यावरणाचा प्रचंड गतीने होत असलेला हास व लोकसंख्यास्फोट या दोन समस्यांकडे प्रथम लक्ष द्यायला पाहिजे. त्यातूनच 'वनीकरण' यासाठी 'वनराई' ही १९८६ साली रीतसर नोंदणी झालेली संस्था प्रयत्नशील आहे. आदिवासींच्या मदतीने या संस्थेने चालविलेले कार्य हा एक आशेचा किरण म्हणावा लागेल. सर्वांच्या मदतीने 'पाणी अडवा, पाणी मुरवा' ही त्यांची योजना सुप्त हरितक्रांतीच्या दृष्टीने कार्यरत आहे. गोबरगॅस, स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी एवढ्यापुरतीच त्याची विकासकक्षा सीमित नसून खेडेगावात शालेय, महाविद्यालयीन शिक्षण, उत्पन्नाचे साधन हे प्रश्न सोडविण्यातही त्याचा हातभार लागू शकतो.
भारत देश कृषिप्रधान आहे, याचे भान शहरीकरण करताना बाळगायला पाहिजे. शहरीकरणाला विरोध असण्याचे कारण उद्भवत नाही; पण शहरातील नोकरी-व्यवसाय, शहराकडे येणारा लोकप्रवाह यांचे पुरेसे नियोजन झालेले नसल्याने वाढत्या शहरीकरणाने पर्यावरणाला जबरदस्त हादरा बसला आहे. शहरातून निसर्ग तर हद्दपारच झाला आहे. अवाढव्य वाढत्या व्यापात डांबरी रस्ते, कारखाने, उंच इमारती इत्यादी अनैसर्गिक जीवनपद्धती व निसर्गापासून माणूस दुरावल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडते. शिक्षणसंस्थांना मोकळी मैदाने नसल्याने कृत्रिमतेवर भर येतो आणि सतत यंत्रांच्या सान्निध्यात जीवन घालवावे लागल्याने माणूसही यंत्रवत झाला आहे. हे सोडून देण्यासारखे नाही. रात्र व दिवस हे निसर्गचक्र त्याच्या जीवनात उरलेले नाही. श्वसनाला आवश्यक असलेली शुद्ध हवा शहरात अशुद्ध होत आहे; त्यामुळे माणूस शारीरिक, मानसिक पातळीवर तर रोगट होत आहेच; पण अनेक प्रकारच्या विकृतींनी तो ग्रासत चालला आहे. रस्त्यांवरच्या वाहनांनी केलेले हवेचे प्रदूषण, छोट्या जागांमधील अस्वच्छता, सॅनिटरी सिस्टिममधील दुर्गंधी, तुंबलेली गटारे व वाढत्या कचरापट्टीचे क्षेत्र, हे सगळे दृश्य शहराला अवकळा आणणारे आहे. शहरातील श्रीमंत-गरिबांच्या वसाहतींमधील भेदभावही वाढत्या चंगळवादाला प्रोत्साहन देणारा आहे. एखादे शहर विकसित होताना आवश्यक असलेल्या आखणीचा व योजनाबद्धतेचा अभाव हे प्रदूषणाचे खरे कारण आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शहरीकरण किती प्रमाणात असावे, कसे असावे, खेड्याचा व त्याचा आंतरिक संबंध कसा असावा याचा कोणताही विचार नसलेले हे शहरीकरण मानवी जीवनाला घातक ठरत आहे.
वाढती औद्योगिक क्रांती, कारखाने, गिरण्या, उद्योगधंदे हेही पर्यावरणाचा विचार लक्षात न घेता शहरी व ग्रामीण जीवनापुढे संकटे उभी करीत आहेत. सिगारेट-मद्याच्या विरोधात घोषणा आणि त्यांच्या शेजारीच त्यांच्या जाहिराती! हवेच्या प्रदूषणाबरोबर ध्वनिप्रदूषणाचा धोकाही माणसातील निरोगीपणाला आव्हान देत आहे. कोणत्याही उत्सवी समारंभामध्ये लाइटिंग व ध्वनिवर्धक प्रदक्षणामध्ये भरच टाकत असतात. टांकसाळी, कारखाने इत्यादींमुळे होणारे ध्वनिप्रदूषण जसे त्रासदायक तसेच कारखान्यांतून सोडलेल्या दुषित पाण्यामुळे नदी-नाले प्रदूषित होत आहेत हेही लक्षात घ्यायला पाहिजे. याचा अर्थ, शहरीकरणाकडे किंवा औद्योगिक क्रांतीकडे पाठ फिरवायची असे नाही; पण त्याला मर्यादा घालणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा विरोध मानवी विकासाला असण्यापेक्षा अतिरिक्त व अनावर लालसेपोटी पर्यावरणाकडे होणाऱ्या दुर्लक्षाला आहे. मानवी विकासकामांसाठी जंगलतोड झाली तर नवी योजना आखून वृक्षसंवर्धन करायला पाहिजे. शेतीची जमीन कमी होत चालली तर शेती कशी वाढेल याचा विचार व्हायला पाहिजे. एका ठिकाणचा समुद्र हटवून गावे वसविण्याची कल्पना पूर्वीही द्वारका वसविण्याच्या कथेत आहे; पण त्या समुद्राच्या पाण्याचा ओघ कुठे त्रासदायक होईल ते लक्षात घेऊन त्यावर पर्याय शोधला पाहिजे.
पर्यावरणाचा -हास केवळ माणसाच्या अति हव्यासाने होतो याबद्दल शंका नसली, तरी निसर्गातील घटनांमुळे पर्यावरणामध्ये बिघाड होत असतो हेही विसरून चालणार नाही. सिंधू, गंगा, गोदावरी इत्यादी नद्यांचे प्रवाह वेळोवेळी बदलून त्यांच्या तीरावरचे मानवी जीवन व तेथील निसर्ग नष्ट होण्याचे प्रसंग कमी नाहीत. भूकंप, ज्वालामुखी, पूर्वीच्या पावसाळी प्रदेशांची अवर्षणामुळे बनलेली राजस्थानसारखी वाळवंटे, अतिवृष्टी, अवृष्टी, चक्रीवादळे इत्यादी अस्मानी संकटे सर्वस्वी माणसाच्या वृत्तीनेच आणलेली आहेत असे म्हणता येत नाही. अशा नैसर्गिक आपत्तींसमोर टिकाव धरण्यासाठी माणसाने नैसर्गिक साधनांचा बुद्धीने उपयोग केला आणि मान जीवनाला स्थिरता आणून दिली हे विसरता येत नाही; पण वाढत्या रोगराईला काबूत आणता आणता व यंत्राच्या साहाय्याने सर्व प्रकारच्या कमीत कमी श्रमांमध्ये जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्याच्या नादात निसर्गातील मूळ साधनसामग्रीलाच ओहोटी लागत आहे, याचे भान त्याने ठेवायला पाहिजे होते. सर्वत्र आटत चाललेले भूजल, आम्ल-वर्षा, अणुऊर्जेमुळे वाढत असलेला किरणोत्सर्ग, वातावरणातील वरच्या थरातील ओझोन वायूला पडलेले भगदाड आणि पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणातील वाढत चाललेले तापमान याची दखल वेळच्या वेळी न घेतल्याने पर्यावरणासंबंधीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. याचा निकटचा संबंध मानवी प्रगतीशी जोडला जातो; पण हीच प्रगती साधताना त्याने थोडा विवेक दाखविला असता तर पर्यावरणाचा -हास न होताही त्याला मर्यादित प्रमाणात प्रगतीचे टप्पे गाठता आले असते. मुख्य म्हणजे प्रगतीच्या सुविधांपेक्षाही मानवी जीवनातील स्पर्धात्मक वृत्तीपोटी व अघोरी महत्त्वाकांक्षेपोटी युद्धांसारख्या सुलतानी संकटांवर विजय मिळविण्यासाठी त्याने निर्माण केलेली साधने निसर्गाच्या व मानवी संस्कृतीच्या हासाची खरी कारणे आहेत. त्यासाठी त्याने आपल्या बुद्धि-शक्तीच्या जोरावर शस्त्रसज्जतेसाठी निसर्गातील झाडे, झुडुपे, जमिनी, जमिनीतील खनिजे इत्यादी सगळ्यांचाच वारेमाप गैरवाजवी उपयोग केला आहे. माणसाच्या या बेजबाबदार वृत्तीने कार्बन-डाय-ऑक्साइड, मिथेन, नायट्रोजनडाय-ऑक्साइड, रेफ्रिजरेटर्समधील फ्रिऑन वायू हे घातक वायू वातावरण दूषित करीत आहेत. त्यावरचा उपाय शोधण्याची गरज हे माणसाच्या बुद्धीसमोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे.
पृथ्वीवरचे हे वाढते तापमान प्रत्यक्षपणे तर घातक आहेच; पण त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे प्रसरण होऊन समुद्राची पातळी वाढत राहील. शिवाय अंटार्क्टिका खंडातील बर्फ प्रचंड प्रमाणात वितळेल. या दोन्हींमुळे पृथ्वीवर जलप्रलय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सन १९९५ मध्ये अंटार्क्टिका खंडात अॅमेझॉन नावाचा एक प्रचंड हिमनग नाट्यपूर्ण रीतीने कोसळला. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात पेटणारे वणवे, समुद्रकिनाऱ्यावर मरून पडलेले हजारो जलचर अशा अनेक आपत्ती येणाऱ्या भविष्यातील संकटांची चाहूल देऊन मानवाला जागृत करू पाहत आहेत.
औद्योगिकीकरणाच्या नावाखाली किनाऱ्यांवरचे, खाडीमधले जीवनही कसे उद्ध्वस्त होत आहे, तेही लक्षात घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ- धरमतर खाडीच्या परिसरातील बड्या उद्योगपतींनी उभारलेला पोलादाचा उद्योग, त्यामुळे सुरू झालेला अजस्र बोटींचा संचार मासेमारी व शेती या व्यवसायांना नामशेष करणारा ठरत आहे. शिवाय येथील पर्यावरणाचे संरक्षण करणारी खारफुटीची जंगलेही नाहीशी होत आहेत. येथील गोरगरीब व आगरी समाजाचे जीवन तर उद्ध्वस्त झालेच; पण येथील औद्योगिकीकरणाने कुणाचा फायदा झाला व पर्यावरणाचा किती न्हास झाला हे लक्षात घेण्यासारखे आहे. मानवी जीवनाच्या मूलभूत गरजांपेक्षा अशा स्वार्थी मूठभर समाजाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी होणारा पर्यावरणाचा -हास मानवी स्वार्थी प्रवत्तींवर प्रकाशझोत यापासून होणारा हास थांबविण्याचे उपाय प्रथम शोधले पाहिजेत.
गेल्या शे-दोनशे वर्षांमध्ये माणसाने निसर्गात प्रमाणाबाहेर केलेल्या हस्तक्षेपामुळेच हे संकट ओढवलेले आहे व ते सर्व राष्ट्रांसमोरचे, प्राणिसृष्टीसकट सर्व मानवापुढचे आहे याविषयी वैज्ञानिकांमध्ये एकवाक्यता झालेली आहे. 'युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज' (यूएनएफसीसीसी)' या सर्वसमंत अशा प्रारूप मसुद्याच्या आधारे संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पातळीवर या आव्हानाशी लढण्याचा प्रयत्न करीत आहे. या संस्थेचे सदस्य असलेल्या १६८ देशांच्या प्रतिनिधींची आठवी परिषद अलीकडेच दिल्लीत संपन्न झाली. या प्रश्नाचे गांभीर्य भारत सरकारला १९७२ पासूनच जाणवलेले आहे असे दिसून येते. १९८० मध्ये पर्यावरणाचा न्हास थोपविण्याच्या दृष्टीने समिती स्थापन करून विचार केला गेला होता. त्यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र खाते निर्माण करून त्याचे प्रतिबंधात्मक उपाय कार्यवाहीत आणण्याचेही प्रयत्न सुरू झाले. पोल्यूशन कंट्रोल बोर्ड, नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट बोर्ड, सेंट्रल गंगा ऑथॉरिटी, एनव्हायरनमेंट इन्फरमेशन सिस्टिम, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट, इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट रिसर्च अॅन्ड एज्युकेशन इत्यादी संस्थांच्या आधारे हे कार्य तत्परतेने सुरू झाले. शालेय शिक्षणामध्येही त्याचा स्वतंत्रपणे विचार करण्यावर भर दिला गेला. जलसंवर्धन व जलप्रदूषीकरण या संदर्भात कार्यवाही होऊ लागली. पाणी, हवा व एकंदरच पर्यावरणरक्षणाच्या संदर्भात कायदे केले गेले; पण एवढ्याने संकटाची तीव्रता कमी होण्याची शक्यता फारशी नव्हती; कारण पर्यावरणाचा व्हास थांबवणे हे एखाददुसऱ्या क्षेत्राशी संबंधित नसून त्याचा संबंध आर्थिक प्रगती, राजकीय स्थैर्य, सामाजिक जागृती, जागतिक पातळीवर मिळणारी मदत इत्यादी अनेक क्षेत्रांशी आहे. या सगळ्या पातळ्यांवरून होणारे प्रयत्न जितके एकजुटीने, जाणीवपूर्वक, तातडीने व निष्ठेने होऊ शकतील तितके या प्रश्नांतील तीव्रतेपासून आपण सुरक्षित राहण्याची शक्यता वाढ शकेल: पण या विविध क्षेत्रांमधील सामंजस्य अपरे आहे. झाडे लावण्याचे कार्य-जंगलखाते जाणते: पण झाडांच्या व जंगलाच्या विकसनासाठी गावकऱ्यांची मदत कशी व किती मिळविता येईल, याचा विचार त्यांच्या कक्षेत येत नसल्याने ते त्या संबंधात काहीही हालचाल करीत नाहीत. नैसर्गिक सीमा कशा आखून घ्यायच्या हे जीवशास्त्रज्ञ जाणतात; पण जमिनी नसलेल्या शेतकऱ्यांकडून धान्य कसे पिकवायचे, इंधन कसे जपायचे हे क्षेत्र त्यांच्या कक्षेत येत नाही! अशा समस्यांचा विश्लेषणात्मक विचार राजकीय पक्षांनी करून व्यावहारिक पातळीवर त्यावर तोडगा काढता आला पाहिजे. आज पुष्कळशी समाजजागृती झालेली दिसून येते; पण नागरी सुविधांचे अपुरेपण, नियोजनांचा अभाव, व्यक्तिगत स्वार्थ इत्यादींमुळे समस्येवरचे उपाय अपुरे ठरत आहेत. पाण्याचा वापर एकीकडे कमी कसा होईल यावर लक्ष द्यायचे तर शहरात अनेक ठिकाणी नळाचे पाइप फोडून पाण्याचा गैरवापर होतो व पाणी फुकट वाहून जाते. शुद्ध पाण्याचा आग्रह धरायचा तर विविध कंपन्यांच्या हवाबंद बाटल्यांतील पाण्याच्या शुद्धतेबद्दलच शंका निर्माण झाल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी तर सॅनिटरी व्यवस्थेमध्येही पाण्याअभावी अस्वच्छता वाढत आहे. पर्यटनस्थळांतील जागांची व तीर्थस्थळांची आजची स्थिती पर्यावरणाच्या दृष्टीने कशी आहे हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या एकाच उदाहरणावरून लक्षात येण्यासारखे आहे. जर निसर्गप्रकोपाचे संकट थोपवून धरायचे असेल तर व्यक्तिगत, सार्वजनिक, संस्थात्मक, सरकारी, जागतिक अशा सर्व पातळ्यांवरून जागरूकपणे प्रयत्न व्हायला पाहिजेत. इंधनबचत, विजेची काटकसर, ध्वनिप्रदूषण टाळणे, आपल्या अवाजवी गरजा कमी करणे, अन्नाची नासधूस होऊ न देणे इत्यादी छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाला करता येतील.
ज्या आधुनिकीकरणाच्या मार्गाने मानवजातीचे सर्व प्रकारचे कल्याण साधले जाईल असे म्हटले जात होते ते या पर्यावरणाच्या हासाला फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे, असे आता विचारवंतांना जाणवू लागले आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक, स्वार्थप्रेरित जीवनधारणा, फक्त दैहिक पातळीवर मानवी सुखांचा होणारा विचार, सत्तास्पर्धेसाठी बौद्धिकतेचा होणारा दुरुपयोग इत्यादींमुळे फक्त भोगवादी-चंगळवादी प्रवृत्ती बळावली. निसर्गाबद्दलची कृतज्ञता तर राहिली बाजूलाच; पण निसर्गशक्ती, निसर्गप्रेरणा पुरेशा प्रमाणात लक्षातच घेतल्या नाहीत. 'काही दिल्याशिवाय मिळत नसते' हा निसर्गक्रम धुडकावून लावल्याने निसर्गाचा खजिना संपत चालला आहे. आज भारतीय संतप्रेरित संस्कृतीतील आत्मनियंत्रण, मानवतावादी दृष्टिकोण, दातृत्वाचे महत्त्व, वृक्षवल्लींनाही सोयरे मानण्याची प्रवृत्ती, सुसंस्काराच्या प्रभावाने निसर्गालाच मित्र करण्याची वृत्ती यांचे महत्त्व कळू शकते. मानवी मन व मानवी बुद्धी या संकटावरही मात करण्याचा प्रयत्न जरूर करू शकेल; पण त्यासाठी त्याला आजच्या प्रत्येक गोष्टीत निसर्गावर कुरघोडी करण्याची वृत्ती सोडून द्यायला पाहिजे. निसर्गशक्तींचा किती प्रमाणात व कशा त-हेने उपयोग करून घ्यायचा याचे तंत्र आखायला व ते सर्व जगभर प्रसारित करायला पाहिजे. ज्ञान व विज्ञान यांची सांगड घालायला शिकले पाहिजे; आणि स्वत:चा, केवळ स्वतःच्या वंशाचा, स्वत:च्या देशाचा असा 'स्वकेंद्रित' विचार करण्याचे सोडून देऊन पृथ्वीवरच्या सर्व चराचराचा विचार माणसाच्या अस्तित्वासाठी (व नंतर समृद्धीसाठी) करायला शिकले पाहिजे. तसे न केले तर तात्पुरती मलमपट्टी रोगाचा पूर्ण नाश करू शकणार नाही.
सारांश:
पर्यावरणाचा होत असलेला हास व वाढते प्रदूषण हे संकट मानवाने आपल्या बेजबाबदारपणाने ओढवून घेतले आहे. निसर्गाचा फायदा घेतला. सुखसमृद्धीच्या व स्पर्धात्मक दृष्टीने संहारात्मक अशा संशोधनामुळे निसर्गशक्तीची अक्षरश: लूट केली. जमिनीतील खते व खनिजे नाहीशी होत आली. अन्न, पाणी, हवा, अवकाश इत्यादी सर्वच पर्यावरण दूषित बनले. वाढती शहरे व औद्योगिकीकरण ही त्याची प्रमुख कारणे आहेत. माणूस ही निसर्गाची निर्मिती आहे हे लक्षात घेतले तर स्वत:ची नैसर्गिक शक्तीही मानव वैज्ञानिक शोधांपोटी हरवून बसला. वसुंधरा वाचवा ही मोहीम सर्व मानवजातीने तन-मन-धनाने राबवली पाहिजे. वृक्षसंवर्धन, विज्ञानसुविधांचा अतिरिक्त उपयोग टाळणे. लोकसंख्येला आळा घालणे. गरजा कमी करणे. स्पर्धात्मक वत्ती व आत्मकेंदित भाव सोडून विचार करणे यांमुळे मानवी प्रयत्न यावरही निसर्गाच्या साहाय्याने मात करू शकतील.
COMMENTS