Essay on Science and Religion in Marathi Language : In this article " शास्त्र आणि धर्म मराठी निबंध ", " Science and Religion ...
Essay on Science and Religion in Marathi Language: In this article "शास्त्र आणि धर्म मराठी निबंध", "Science and Religion Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Science and Religion", "शास्त्र आणि धर्म मराठी निबंध" शास्त्र आणि धर्म मराठी निबंध for Students
शास्त्र म्हणजे बुद्धीचा प्रांत समजला जातो; पण धर्म म्हणताक्षणी मात्र मानवतेला धारणा देणारा तो धर्म हा अर्थ नजरेसमोर येण्याऐवजी हिंद, इस्लाम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध हे धर्मसंप्रदाय नजरेसमोर येतात आणि त्यापेक्षाही त्यांचे आपापसांतील संघर्ष आठवतात. धर्माच्या कडवेपणाखाली वाहिलेले रक्ताच्या नद्यांचे पाट आठवतात आणि धर्म म्हणजे संघर्षाला/युद्धाला आमंत्रण असे वाटते. पण धर्माच्या नावाखाली 'शुद्ध रक्ताचा' आग्रह धरून युद्धे पेटत असली तरी त्याची सगळी मदार विज्ञानाने निर्माण केलेल्या शस्त्रसंपदेवर असते, हे विसरता येत नाही. भारतावर राज्ये, साम्राज्ये गाजविणाऱ्या बहुसंख्य वंशांच्या व टोळ्यांच्या एका हातात धर्मग्रंथ होते आणि दुसऱ्या हातात तलवार होती. पुढील काळातील आक्रमकांकडे तर बंदुका, तोफा अशी शस्त्रसज्जता होती. उपरोधिकपणे म्हणायचे, तर शास्त्र आणि धर्म यांचे असे अतूट नाते मानवाच्या प्रारंभापासून चालत आलेले आहे. ब्रिटिशांसारख्या सत्ताधाऱ्यांनी तर अगोदर व्यापाराच्या मिषाने प्रवेश केला; मिशनरींना धर्माचा प्रांत मोकळा करून दिला आणि दीडशे वर्षांची गुलामी भारताला सहन करायला लावली व त्यासाठी यंत्रयुगातील सर्व सुविधांचा कल्पकतेने उपयोग करून घेतला.
भारताचाच काय, पण जगाचा इतिहास एक गोष्ट सिद्ध करताना दिसतो; ती म्हणजे ज्याचे हत्यार नवीन, आधुनिक व जास्त संहारक त्याचा धर्मप्रसार प्रभावी! बाबरादी राज्य असेच त्यांच्या शस्त्रावर भारतात स्थिरावले! धर्माचा कडवेपणा शस्त्राच्या ताकदीवर वाढत जातो. 'ज्याची राज्यसत्ता न्यायी तोच चांगला शासनकर्ता' ही शासनसंस्थेची व्याख्या होण्यापेक्षा ‘ज्याची शासनसंस्था शस्त्रसज्ज तोच व्यवहारात न्याय देऊ शकतो' असेही जाणवते. 'बळी तो कान पिळी' याबरोबर 'बळी तोच वाली' होऊ शकतो, हेही जाणवल्याने राज्य व धर्म बलवान होण्यासाठी शास्त्राने प्रयोगशाळा उघडल्या. धर्म आणि शास्त्र यांचे आधुनिक युगातील हे नाते पाहिले की दोन्हीही क्षेत्रे आपापल्या मूळ उद्देशांपासून किती दूर आलेली आहेत, याची खंत वाटायला लागते.
'जीवनाला धारणा देणारा तो धर्म' ही धर्माची बैठक आहे. मानवी जीवनातील शिवत्व, मंगलत्व, व विश्वासार्हता हे मानवी धर्माचे उद्देश आहेत. प्राण्याच्या पातळीपेक्षा माणसाच्या जीवनाची सार्थकता कोणत्या पद्धतीच्या जगण्यातून त्याला प्राप्त करून घेता येते, या विचारातून धर्मभावनेचा उदय झाला. प्रारंभीच्या काळात त्याच्या कल्पनेत निसर्गाच्या उग्र व भयप्रद रूपापासून माणसाला हवे असलेले संरक्षण अपेक्षित होते; म्हणूनच निसर्गातील उग्र व विनाशी रूपांची प्रार्थना व स्तवने यांना धर्माच्या आचारात स्थान मिळाले. 'दीनाचा दयाळू अशा देव नामक शक्तीची कल्पना फार पुढच्या काळातील आहे. त्याच्या आधी इंद्र-वरुण इत्यादी पाऊस, पाणी, वारा, उष्णता यांच्याच प्रतीकात्मक पूजनात मानवाने स्वत:चे संरक्षण शोधले. मात्र ते शोधत असतानाच शास्त्राची वाटचालही त्याच्या बुद्धीने सुरू केली होती. सत्यवान-सावित्रीच्या कथेमधील सावित्री हे सूर्याचे प्रतीक आहे. केवळ ऊर्जेचा उपयोग करून, बुद्धीच्या जोरावर आपण सर्व संकटांवर मात करू शकतो हे सावित्रीने प्रश्नोत्तराने सत्यवानाचे प्राण परत मिळविले, या प्रतीकातून सांगितले आहे. एवढेच कशाला, ऋग्वेदादी काळापासून कोणत्याही देवतांच्या पूजनामध्ये असलेले जलाचे व फुलांचे महत्त्व, नदीत-समुद्रात उभे राहून सूर्याला प्रात:काळी ओंजळीतील पाण्याने अर्घ्य देणे, तेच पाणी डोळ्यांना लावणे, आजूबाजूला शिंपडणे या सगळ्या कर्मकांडाचा पसारा थोडासा बाजूला सारला तर त्यामागे असलेले शास्त्रीयतेचे तात्त्विक स्वरूप कळून येईल. सूर्य, निसर्गातील ऊर्जा, पाणी, फुले यांचे साहचर्य, त्यांद्वारे पूजनाच्या मार्गाने त्याच्या सततच्या सान्निध्यातील निसर्गाचा ऋणनिर्देश हा अर्थ आज लक्षात घेता येतो. सकाळी सूर्योदयाच्या पूर्वीचे व संध्याकाळच्या संधिप्रकाशाचे महत्त्व त्रिकाल संध्येमध्ये जतन करण्याचा प्रयत्न आहे. पण प्रारंभीच्या काळातील ही शास्त्र व धर्म यांची सांगड घालणारा आचारधर्म नंतरच्या काळात केवळ सांकेतिक होत गेला; तांत्रिक झाला आणि त्याच्या पाठीशी असलेला जीवनरहस्यांचा मंत्र विसरला गेला. धर्मातील आचाराला कर्मकांडाचे स्वरूप आले.
प्रारंभीच्या काळात धर्माचे स्वरूप एकेरी व साधे होते. एका समूहाने मिळवून आणायचे व एकत्र येऊन त्याची एका नेत्याने वाटणी करायची. 'वाटणी करणारा, विभाग करणारा तो भगवान' ही भगवंताची साधी व सामाजिक जीवनातील कामाच्या विभागणीवर आधारलेली कल्पना होती; पण सामाजिक परिस्थिती व समाजाचा विस्तार बदलत चालला आणि भगवानाला देवपण प्राप्त झाले. धर्माची धारणा ज्या मानवी समाजाच्या व प्रत्येक व्यक्तीच्या जीवनस्थैर्याचा व विकासाचा विचार करणारी होती, तिच्यात अध्यात्माचा नुसता शिरकावच झाला असे नसून धर्म म्हणजे लौकिकापलीकडच्या जीवनालाच भजणारा व स्वर्ग-मोक्ष, पुण्यसंचय, पापयोनी, नरक इत्यादी कल्पनांना महत्त्व देणारा ठरला. याचे प्रत्यंतर आज गणेशपूजनामध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रपुष्पांजलीचा अर्थ पाहिला तर येते. मंत्रपुष्पांजलीचा अर्थ उघडपणे 'आमच्या राज्याचे साम्राज्य होऊ दे, समुद्रापर्यंतचा प्रदेश आमच्या आधिपत्याखाली येऊ दे ....' अशा प्रकारचा लौकिक जीवनातील सत्ता, राज्य, वैभव, सुखसोयी यांची मागणी करणारा आहे. ऋग्वेदातील अनेक सूक्तांमध्ये 'माझे गोधन वाढते राहू दे, शत्रूच्या गायी (तेव्हा गाय ही संपत्तिदर्शक होती) मला जिंकता येऊ देत' अशा प्रकारच्या प्रार्थना आहेत. कालांतराने संस्कृत भाषा लोकांच्या रोजच्या बोलण्यातून अस्तंगत झाली. तिची जागा मराठी, गुजराती व हिंदी या भाषांनी घेतली. मंत्रपुष्पांजली म्हणजे देवाची प्रार्थना एवढेच समाजाच्या मनात ठसले. समाजातील वाढत्या संमिश्रतेमुळे, पाश्चात्त्यांकडे तर वाढत्या पोपसत्तेमुळे व समाजमनावरच्या अंधश्रद्धेच्या पुटांमुळे धर्माचे लौकिक पातळीवर समाजधारणा करणारे रूप बदलून केवळ मोक्षासाठी व आध्यात्मिक पातळीवरचे कर्मकांड करणारी संस्था असे बनले. पण धर्मातील अजूनही आचार-स्वरूपातील काही विधी पाहता त्यांच्यातील शरीरशास्त्र, निसर्गशास्त्र, पर्यावरण, नीतिशास्त्र, नागरिकशास्त्र इत्यादी शास्त्रीय धारणांची जाणीव होऊ लागते. देवाला वाहण्याची पत्री-फुले यांचे औषधी उपयोग आज वैद्यकशास्त्राला जाणवू लागले आहेत. वटसावित्रीच्या पूजेतील 'वट', पिंपळ, अश्वत्थ या वृक्षांचे जीवनधारणेतील औषधी महत्त्व लक्षात घेऊनच त्यांच्या सान्निध्याचा आग्रह धर्माच्या व्रताचरणामध्ये आहे. पिंपळाच्या सान्निध्याने रक्तदाबावर नियंत्रण येते, गवतावर चालल्याने रक्ताभिसरण सुधारते, ही भूमिका आता नव्याने लक्षात घेतली जात आहे.
त्या काळातील शास्त्रीय शोधांची त्या कर्मकांडाला मर्यादा होती. ज्या काळी जुळी मुले एका पित्याची असूच शकत नाहीत, असे शास्त्र सांगत होते त्या वेळी सीतेचे निरपराधित्व तिलाच काय पण रामालाही सिद्ध करणे शक्य नव्हते. तसेच 'पृथ्वीभोवती सूर्यादी ग्रहगोल फिरतात ही गोष्ट कदाचित तेव्हाच्या शास्त्रदृष्टीने सिद्ध केलेली असेलही. पण जेव्हा शास्त्रज्ञांना 'हे सत्य नाही' हे जाणवले तेव्हा त्याचा तितक्याच स्वच्छ मनाने स्वीकार करण्याची धारणा पोपसत्तेच्या हातात गेलेल्या धर्माजवळ राहिली नाही. प्रयोगपूर्वक संशोधन करून लावलेले शोध हे शास्त्रांचे क्षेत्र आहे, त्याला आव्हान न देता धर्मक्षेत्राने त्याचा स्वीकार करायचा असतो आणि नित्य व नैमित्तिक कर्मकांडाच्या आधारे समाजात त्याचा सातत्याने प्रसार करायचा असतो, हे शास्त्र व धर्म यांचे नाते पुष्कळदा दुर्लक्षित होते.
शास्त्राला लागलेले शोध जतन करून ठेवण्याची आधुनिक काळातील सोय (मुद्रण, टेपरेकॉर्डिंग, संगणक इत्यादी) तेव्हाच्या काळी उपलब्ध नव्हती; पण याचा अर्थ शास्त्रीय शोध लागत नव्हते किंवा लागलेले नाहीत असे नाही. महाभारतकालीन जीवनव्यवस्था, युद्धसंग्रामातील डावपेच, आर्य, अनार्य, राक्षस, यक्ष, किन्नर इत्यादी जाती व जमाती शास्त्रीयतेपासून वंचित होत्या असे म्हणता येत नाही; पण त्यांचे हे संशोधन गुरूच्या सहवासात पुढच्या पिढीच्या हातात, शिष्यांची पारख करून दिले जात होते. प्रत्यक्ष व्यक्तीचा व्यक्तीशी संपर्क महत्त्वाचा होता. भौतिक पातळीवर वेदांसारख्या अपौरुषेय ग्रंथांतील तत्त्वज्ञान जतन करताना घनपाठी, दशपाठी पद्धतींनी त्यांतील शब्दोच्चारणही जपण्याचा प्रयत्न आजच्या टेपची जाणीव करून देणारा आहे. हे शास्त्रपुनीत ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविणारी प्रसारमाध्यमे पुष्कळदा धर्माच्या प्रभावाखाली व धर्माच्या आधिपत्याखाली होती. शास्त्राने लावलेले शोध प्रत्यक्ष जीवनात उपयोगात आणले जाणे हे महत्त्वाचे असते; म्हणून तर विज्ञानाने लावलेल्या नव-नवीन शोधांपेक्षा समाजात विज्ञाननिष्ठा उदयाला येणे महत्त्वाचे समजले जाते. हे प्रसाराचे कार्य धर्मातील आचाराने केले. जे शास्त्रीय शोध धर्माच्या विचारप्रणालीमध्ये बसू शकले त्यांचा धर्माने व्रते, नित्य व नैमित्तिक आचार, सण, उत्सव इत्यादी प्रसारमाध्यमांच्या मार्फत सातत्याने जतन केले- प्रसार केला. वैदिक धर्मामध्ये मानलेले विष्णूचे दशावतार पाहता डार्विनचा उत्क्रांतिसिद्धान्त आठवल्याशिवाय राहत नाही. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह हे पहिले चार प्राण्यांच्या जीवनातून मानवाची होत असलेली उत्क्रांती तर पाचवा वामनावतार म्हणजे बुटका ज्ञानी मानव व नंतरचे परशुराम, श्रीराम व श्रीकृष्ण हे पराक्रमी मानव व बुद्धासारखा धर्मचिंतक मानव अशा पायऱ्या विष्णूच्या दशावताराच्या कथांतून समाजाच्या मनात कायम ठसल्या गेल्या; पण त्यांच्या पाठीशी असलेला मानवी उत्क्रांतीचा विचार सुटून जेव्हा त्यांच्यातील चमत्कारांना महत्त्व येऊ लागले तेव्हा शास्त्राचा व धर्माचा असलेला संबंध लक्षात येईनासा झाला.
आज तर डार्विनच्या उत्क्रांति-सिद्धान्तालाच आव्हान करणारे संशोधन पुढे येऊ लागले आहे. पृथ्वीवरच्या मानवाची उत्पत्ती मत्स्य, कूर्म या प्राण्यांपासून झालेली नसून तो अन्य ग्रहांवरून पृथ्वीवरती आलेला आहे; हे त्याच्या मेंदूच्या व शरीराच्या वाढीवरून आणि अन्य भौगोलिक पातळीवरच्या संशोधनाधारे प्रतिपादन केले जात आहे. श्री. सुरेशचंद्र नाडकर्णीसारखे विचारवंत हा नवा सिद्धान्त मांडू पाहत आहेत. तेच शास्त्रसंमत ठरले तर उत्क्रांतिवादाचा सिद्धान्तच बाद ठरेल व धर्मातील दशावतारांचा संदर्भही वेगळ्याप्रकारे विचारात घ्यावा लागेल. प्रश्न आहे, तो अशा शास्त्रीय संशोधनाच्याअनुसार धर्माला विकसित का होता येत नाही याचा. एक तर शास्त्राचा संबंध समाजातील मूठभर ज्ञानवंतांशी असतो, तर धर्माचरणाचा संबंध सर्व समाजाशी असतो; शास्त्रसंमत, बुद्धिनिकषावर उतरलेल्या संशोधनाला समाजमान्यता मिळावी लागते. त्यासाठी त्याचा प्रसार व्हावा लागतो; आणि समाजाच्या मनावर पूर्वापार असलेल्या व धर्माने बिंबविलेल्या पूर्व सत्याचा पगडा दूर होणे सोपे नसते. त्यासाठी धर्मपीठे, धर्मगुरू, पुरोहितवर्ग यांना तो सिद्धान्त समजला पाहिजे; त्याचे आकलन व्हायला पाहिजे. हे कार्य इतके सोपे नाही. धर्माने सांगितलेला नित्य व नैमित्तिक आचारधर्म सांगण्याचा व्यवसाय पत्करलेल्या वर्गाजवळ चिकित्सक बुद्धी नसते; म्हणून 'का', 'कशाला' हे प्रश्न त्याला कुणी विचारलेले रुचत नाहीत. त्यामुळे गंध कोणत्या बोटाने लावायचे याच्या पाठीशी जर कारणपरंपरा असेल तर ती लुप्त झाली. त्यामुळे धर्माचे स्वरूप 'बाबा वाक्यम् प्रमाणम्' असे सांकेतिक व गतानुगतिक बनले. लग्नविधीमध्ये मंगलाष्टके उरली; पण अग्नीला व पाण्याला महत्त्व का हे सांगता येईनासे झाले, तेव्हा त्याला केवळ कर्मकांडाचे रूप आले. कोणत्याही कोर्टाच्या बाहेर; विविध प्रकारचे अर्ज लिहून देणाऱ्याला कायद्याचे जसे फक्त जुजबी ज्ञान असलेच तर असते; तसेच धर्माच्या क्षेत्रातही, धर्माचे मूळ स्वरूप व त्यामधून जाणवणारे शास्त्राचे आकलन फारसे नसलेल्यांच्या हातामध्ये धर्माचरणातील आचारधर्म एक व्यवसाय म्हणून वाढत गेला. त्याचा बौद्धिक क्षेत्राशी असलेला संबंध आकलन करून घेण्याची गरजच उरली नाही. किंबहुना, त्याचा बौद्धिक क्षेत्राशी, बुद्धीशी, तर्कशास्त्राशी संबंध असतो, हीच जाणीव लुप्त झाली.
धर्माचा संबंध मनाच्या उन्नयनाशी असतो. बुद्धिनिष्ठता हा त्याचा पाया असतो. व्यक्तीची, समाजाची, समूहाची व पर्यायाने राष्ट्राची- देशाची प्रगती साधणे हे कार्य धर्माच्या नजरेसमोर असते. ही प्रगती केवळ शारीरिक सुखसोयी पुरविणारी नसते. त्यापेक्षाही माणसाचे मन व्यापक व विशाल कसे होईल; मानवी जीवनाची शाश्वती ज्या मूल्यांवर आहे त्या मूल्यांवर आधारलेली प्रगती मानवजातीला कशी साधता येईल, याचा विचार धर्म करीत असतो. धर्माला नीतीचा आधार व बैठक असते; कर्तव्याची जाणीव धर्माला असते. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर माणसाने कसे आचरण ठेवावे, कसे वागावे, यासाठी 'संस्कार' नेमलेले आहेत. माणसाच्या जीवनाला अर्थपूर्णता देण्याचे कार्य धर्माने केले आहे; पण धर्माचा हा शाश्वत अर्थ बाजूला राहतो आणि वेगवेगळ्या प्रदेशातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा धर्मांमध्ये मानवजात स्वत:ला अडकवून घेते. त्या त्या धर्माचे मूळ स्वरूप तो धर्म सत्तेवर येताच बदलू लागते; आणि धर्माच्या नावाखाली राष्ट्राराष्ट्रांत रणकंदन पेटते; कारण धर्माच्या नावाखाली मने भडकवून देणे सोपे असते. आपला धर्म सर्वश्रेष्ठ एवढेच प्रत्येकाचे म्हणणे नसते, तर माझा धर्मच सत्तेवर असला पाहिजे असा प्रत्येकाचा आग्रह असतो. यासाठी परधर्मीयांवर आक्रमण करणे, त्यांना जगणे कठीण व अशक्य करणे व परिणामी जीवनमूल्यांचाच हास घडविणे ही धर्माची किमया पाहता धर्मकल्पनेचा मूळ ध्येयापासूनच झालेला अध:पात धर्माबद्दल तिरस्कार निर्माण करतो.
हीच गोष्ट शास्त्राबद्दलही दिसत नाही काय? माणसाच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शास्त्राने जे विश्व उभारलेले आहे, ते मनापेक्षा बुद्धीला अधिक मानणारे आहे; पण त्याचा हेतू मानवी जीवन अधिकाधिक सुखी व समाधानी कसे होईल हाच असतो. हे सुख केवळ भौतिक पातळीवरच राहत असेल तर माणसाच्या मनाचा विकास होणार नाही. बौद्धिकतेला, शास्त्राला मनाच्या विकासाचा अंकुश पाहिजे. बुद्धीने लावलेल्या शोधाने माणसाचे जर भले होणार नसेल तर ते शोध दूर सारले पाहिजेत, हे मानवाला त्याचे विकसित मन सांगू शकले पाहिजे. माणसाचा मेंदू हे अजब रसायन आहे. त्याच्या सर्व शक्तींचा उलगडा अजूनही झालेला नाही; पण शास्त्र या बुद्धीच्या आधारावरच भूतकाळाचा वेध घेऊ पाहते आणि त्यामध्ये वर्तमानातील नवीन संशोधनांनी काही बदल करावा लागत असेल तर त्याचाही स्वीकार करण्यात माघार घेत नाही. तेराव्या व चौदाव्या शतकातील पुनरुत्थानाच्या चळवळीने जसा मानवतावादी दृष्टिकोन प्रभावी झाला तसाच या काळातील शास्त्रीय शोधांनीही धर्माच्या नावाखाली वाढलेल्या कूपमंडूक व तंत्रपातळीवरील आचरणधर्माला धक्के द्यायला सुरुवात केली; कारण धर्माच्या गैरवापरातून समाजातील मोकळे वातावरण जाति-जमातींच्या कप्प्यात बंदिस्त केले गेले होते. खरे पाहता, समाजबांधणीला आवश्यक असलेल्या प्रवृत्तींवर धर्मांनी, जातींची व उपजातींची केलेली आखणी म्हणजे कामाची केलेली विभागणी (Division of Labour) होती. ज्ञानसंचय, संरक्षण, आर्थिक-देवाणघेवाण व या सगळ्यांसाठी अनुयायी वर्ग अशा विभागणीतून धर्माची समाजविकासाची व्यक्त होणारी दृष्टी महत्त्वाची होती; पण त्यांच्यामधील सुसंवाद राखण्याचे तर राहोच, याउलट, त्यांचे प्रवाहित्वच खंडित करण्याकडे आचारधर्मांचा वापर होऊ लागला. अशा गैरवापरामुळे व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होऊ लागली. श्रेष्ठ-कनिष्ठतेवर कारण नसताना येणारा तत्कालीन धर्माचरणातील भर शास्त्राच्या कसोटीवर टिकेनासा झाला. हिंदू समाजातील अस्पृश्यता, मंदिरप्रवेश, उपासनेचे अधिकार, विशिष्ट पोशाख, विशेषतः शिरोभूषण (अठरापगड जाती) या सगळ्यांचा गैरवापर झाला; म्हणूनच साने गुरुजींच्या शब्दांत सांगायचे तर 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ।' ही धर्म संकल्पनेमागील मूलभूत बैठकच धर्म हरवून बसला. एकनाथांसारख्या संतश्रेष्ठांनी वाळवंटातील हरिजनाच्या मुलाला कडेवर घेऊन हीच धर्मातील मानवतेची मूळ वृत्ती जागविण्याचा प्रयत्न केला. गंगेची कावड रामेश्वराला नेण्यात जे पुण्य मिळते तेच पुण्य ती कावड तहानलेल्या गाढवाच्या मुखात घालूनही मिळते, हे त्यांनी स्वतःच्या कृतीने समाजाच्या मनावर ठसविले. धर्माचा गैरवापर टाळण्याची गरज यावरून स्पष्ट होते.
धर्माची बैठक श्रद्धेवर आधारलेली असते तर शास्त्राची बुद्धिप्रामाण्यावर. धर्माचा संबंध मनाशी असतो तर . शास्त्राचा बुद्धीशी; पण मानवी जीवनव्यवहार एकेरी नसतात. ते बुद्धी व मन यांच्या संमिश्रतेने घडत असतात. - बुद्धीला पटलेल्या गोष्टी मनाला जाणवाव्या लागतात. बुद्धीच्या कक्षेपेक्षा मनाची कक्षा कितीतरी व्यापक आहे. निसर्गाची व मानवी मनाची अनेक रहस्ये अजूनही अज्ञात आहेत. त्याची जाणीव अस्पष्टपणे मनाला विविध मार्गांनी सूचना करून मिळत असते. जगण्याच्या पलीकडे असलेले, माणसाला प्रत्यक्ष अनुभव नसलेले विश्व शोधण्याचा प्रयत्न अध्यात्माच्या वाटेवर धर्म करीत असतो. ज्ञानयोग, भक्तियोग, हटयोग, कर्मयोग, आत्मा, परमात्मा, जीवशिव, प्रकृति-पुरुष या कल्पनांच्या साहाय्याने मानव त्याचा या पृथ्वीतलावरच्या जीवनाशी असलेला संबंध उलगडू पाहतो. हा आध्यात्मिक पातळीवरचा धर्म तत्त्वज्ञानींना व ऋषिमुनींना जाणवतो; पण वस्तुनिष्ठ पातळीवर त्याचा उलगडा करता येत नाही. तो बुद्धिगम्य नसतो. पण याचा अर्थ, धर्म व बुद्धिगम्य शास्त्र ही एकमेकांच्या विरोधी असतात असा होऊ शकत नाही. धर्माच्या या स्वरूपाचा प्रत्यय मनाला श्रद्धेच्या पातळीवरच येऊ शकतो. म्हणून 'श्रद्धावान् लभते ज्ञानम्' (ज्ञान म्हणजे पारमार्थिक, आध्यात्मिक ज्ञान होय.) असे म्हटले जाते.
आत्मिक पातळीवरचे हे काहीसे अतींद्रिय अनुभव विज्ञानाने सिद्ध करता येतात, असा काही विचारवंतांचा दावा आहे; पण काहीही असले तरी हे अनुभव व्यक्तिनिष्ठच असतात. या शक्ती सर्वांच्या ठिकाणी नसतात; म्हणूनच अनेक भोंदू साधूंना त्याच्या आधारे स्वत:चे महत्त्व वाढवायला संधी मिळाली. 'सुक्याबरोबर ओलेही जळते' या न्यायाने अशा भोंदुगिरीमुळे आध्यात्मिक पातळीवरील धर्माच्या स्वरूपाकडे संशयाने पाहिले जाऊ लागले. अशा शक्तीच्या आधारे समाजातील लोकांची फसवणूक केली जाऊ लागली; म्हणून 'अंधश्रद्धांचे निर्मूलन' करण्याची गरज धर्माच्या पातळीवर निर्माण झाली.
धर्मातील ज्या गोष्टी, जी तत्त्वे शास्त्राच्या निकषावर सिद्ध करता येत नाहीत, त्यांच्या आचरणाने समाजाची फसवणूक होऊ शकते; पण त्यासाठी शास्त्रज्ञांनी सर्वच धर्मतत्त्वांना विरोध करण्याचे कारण नाही. धर्मतत्त्वे ही व्यक्तीच्या व समाजाच्या विकासाच्या दष्टीने सिद्ध झालेली असतात. माणसाचा व समाजाचा सर्वांगीण विकास हे धर्माचे उद्दिष्ट असते. या दृष्टीने एखाद्या व्यक्तीजवळ असलेल्या अशा अतींद्रिय शक्तीच्या विकासासाठी त्याने प्रयत्न करणे, तीर्थयात्रा करणे, मूर्तिपूजा करणे, त्रिवेणी संगमावर किंवा निर्जन प्रदेशात तप करणे यामागे असलेले शास्त्रीय तत्त्व शोधता आले तर शोधावे. पण यामध्ये अर्थ नसतो असे म्हणून धर्माला हानिकारक समजू नये; कारण त्रिवेणीसंगमाच्या ठिकाणी मनाची एकाग्रता साधण्याची असलेली शक्ती, पाण्याला स्मृती जतन करण्याची असलेली क्षमता, मानवी भावभावनांनी कलुषित होणारा निसर्ग परिसर या गोष्टी शास्त्रसंमत आहेत. अग्निहोत्रांनी व पूजाविधींनी मानसिक समाधानाबरोबर मानसिक विकसन व परिसर-वातावरणशुद्धी घडते, याबद्दल दुमत नाही; पण या सगळ्या धर्माचरणातील ‘मंत्राला' असलेले महत्त्व विसरले गेल्याने धर्म व शास्त्र यांच्यातील सुसंवाद लक्षात येईनासा झाला.
आज अनेक धार्मिक विधींची तपासणी शास्त्रीय निकषावर करून 'अंधश्रद्धा' दूर करून धर्माचे शुद्ध स्वरूप उजळ करायला शास्त्र मदत करीत आहे. धार्मिक पातळीवरील अंधश्रद्धा नाहीशा करण्याच्या प्रयत्नात धर्मातील श्रद्धेला धक्का लागू नये याची काळजी शास्त्राने घ्यायला पाहिजे; कारण शास्त्रीय संशोधनाने कितीही सुखसोयी निर्माण केल्या तरी त्यामुळे माणसाची सुखांची लालसा 'ययाती'प्रमाणे वाढत चाललेली आहे. स्वत:च्या दैहिक व शारीरिक पातळीवरील सुखासाठी दसऱ्यांना दःखी करायला त्यास भीती वाटत नाही. सुख लुबाडून घेणे ही त्याची वृत्ती त्याच्यातील माणसाला शोभणारी नाही. त्याला सर्वच पातळीवर शास्त्रीय संशोधनाचा उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याच्या मनावर धर्माचा संस्कार असायला पाहिजे. धर्मामुळे त्याचे मन समृद्ध बनते, त्याला शांतता लाभते. माणूस म्हणून जगण्याचे संस्कार धर्मामुळे मिळतात. आज एवढी समृद्धी असूनही मानव 'गुरू'च्या शोधात धडपडतो; आश्रमांना, गरीब-अपंगांना देणग्या देतो; देवालये बांधतो; याचे एक कारण शास्त्राने जे मिळाले आहे ते परिपूर्ण नाही ही त्याला असलेली जाणीव आणि दुसरे कारण आहे, भविष्याची भीती. या गोष्टी त्याला धर्मातील तत्त्वांकडे वळायला लावतात. पाप-पुण्याच्या, न्याय-अन्यायांच्या विचारांच्या रूपात त्याच्या मनात संघर्ष उभा राहतो आणि मग त्यासाठी तो पुण्य कृत्य म्हणून देवधर्माकडे वळतो.
केवळ भौतिकवादाने मनुष्य सुखी होऊ शकत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य व भौतिकवाद यांच्या अतिरेकी विचारांनी समाजातील गरीब-श्रीमंतांमधील दरी अधिकच रुंदावत आहे व सामाजिक संघर्षाला आमंत्रण देत आहे, याचीही जाणीव शास्त्राला येऊ लागली आहे. शास्त्रीय संशोधनाला मानवतेची व्यापक बैठक धर्माकडून मिळायला पाहिजे आणि धर्मातील गैरप्रकारांना शास्त्रीय निकषांवर दूर ठेवण्याचे कार्य शास्त्राला करता आले पाहिजे; कारण शास्त्र काय किंवा धर्म काय पूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. जीवनाला परिपूर्णता देण्याचा ध्यास दोन्हीही क्षेत्रांजवळ आहे. शास्त्राची वाटचाल विश्लेषणात्मक आहे; तर धर्माची वाटचाल व्यक्तिगत व सामाजिक अनुभवांनी साधलेल्या ध्येयांच्या मार्गाने होत आहे. दोघांचे मार्ग कोणतेही असले तरी त्यांच्या एकमेकांना पूरक असलेल्या, साहाय्यभूत असलेल्या घटकांनीच जीवनाचा विचार सामग्याने होऊ शकतो, हे विसरता कामा नये. आमचे शास्त्रीय संशोधक जरी निरपेक्ष वृत्तीने व विधायक दृष्टीने संशोधन करीत असले तरी त्यांच्या शास्त्रीय दृष्टीला राजसत्ता विनाशकतेकडे प्रेरित केल्याशिवाय राहत नाही. उदाहरणच द्यायचे तर, आज शास्त्रीय संशोधनाच्या आधारे मानव ग्रहांवर सत्ता प्रस्थापित करू लागला आहे; पण त्या संशोधनावरही आपलीच सत्ता राहावी असा प्रयत्न प्रगत राष्ट्रे जाणीवपूर्वक करीत आहेत. तसेच शास्त्राने अणु-परमाणूमधील शक्तीचा शोध घेतला; पण त्याचा उपयोग माणसाच्या विनाशासाठी अणुबॉम्ब निर्माण करून केला गेला. शास्त्राला धर्मातील मानवी मूल्यांची जाणीव असली पाहिजे; तरच त्याचे शोध माणसाचे माणूसपण जपून ठेवू शकतील! धर्माच्या अनिर्बंध गैरवापरावर, अंधश्रद्धेमुळे जोपासल्या जाणाऱ्या अस्पृश्यतेसारख्या रूढींवर अंकुश ठेवण्यासाठी शास्त्रातील बौद्धिक धारणा उपयुक्त ठरल्या पाहिजेत. शास्त्र व धर्मभावना यांचे असलेले असे आंतरिक संबंध लक्षात घेतले तर दोघांच्या सहकार्याने मानवी जीवनामध्ये निकोपपणा येऊ शकेल, याची जाणीव होईल. अर्थात, हे सहकार्य शंभर टक्के असू शकत नाही व त्या प्रमाणात त्यामध्ये त्रुटी राहतील हे लक्षात घेऊन वेळोवेळी शास्त्र-धर्म-संबंध बुद्धीच्या व श्रद्धेच्या प्रकाशात तपासून घेण्याची गरजही तत्कालीन विचारवंतांनी भागविली पाहिजे.
सारांश
शास्त्राने निर्माण केलेल्या शस्त्राच्या बळावरच हिंदु-मुस्लिम-ख्रिश्चन इत्यादी धर्म राजकारण करीत असतात. प्रत्येक राजसत्ता या प्रकारच्या कोणत्या ना कोणत्या धर्मसंस्थेला शस्त्राच्या जोरावर बलवान करीत असते. प्रारंभीच्या धर्मकल्पनेत निसर्गापासून संरक्षण ही भूमिका होती. नंतरच्या समाजाच्या संमिश्रतेच्या स्वरूपामध्ये धर्माचे लौकिक जीवनाला स्थैर्य देण्याचे स्वरूप दुर्लक्षित केले गेले. तेव्हाच्या शास्त्रीय सत्याचा प्रसार धर्माच्या नित्य-नैमित्तिक विधीतून केला जात होता. उदाहरणार्थ उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त विष्णूच्या दशावतारांच्या रूपाने लोककथांनी जतन केला. शास्त्रीय शोधांबरोबर धर्माला आपल्या रूढी-आचार बदलता आले पाहिजेत; पण धर्मपीठांजवळ व पुरोहितांजवळ एवढी आकलनक्षमता दाखवण्याची वृत्ती नसते. शास्त्राचा संबंध प्रत्यक्षाशी, भौतिकतेशी असतो; तर धर्माचा भर त्याच्या आधारावर समाजधारणेला व व्यक्तीच्या विकासाला आवश्यक असलेली नियमव्यवस्था देण्यावर असतो. आजही धर्माला माणुसकीचे जतन करणारी मूल्ये जपण्याची गरज वाटते. त्यासाठी आवश्यक असलेले मानसिक उन्नयन साधण्याच्या वृत्तीतून आध्यात्मिक विचार केला जातो; शास्त्रीय संशोधनाचा गैरउपयोग केला जातो. मानवाच्या विनाशाला शास्त्र कारणीभूत होते. त्याला खऱ्या मानवतेची ओळख करून देणारी नैतिक मूल्ये शिकविण्याची गरज आहे. धर्माचे स्वरूप हीच मूल्ये प्रमाणभूत मानते.
COMMENTS