Friday, 30 October 2020

Marathi Essay on "Women Empowerment", "महिला सक्षमीकरण काळाची गरज मराठी निबंध", "Mahila Sashaktikaran Marathi Nibandh" for Students

Essay on Women Empowerment in Marathi Language: In this article "महिला सक्षमीकरण काळाची गरज मराठी निबंध", "स्त्री सबलीकरण मराठी निबंध", "Mahila Sashaktikaran essay in marathi" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Women Empowerment", "महिला सक्षमीकरण काळाची गरज मराठी निबंध", "Mahila Sashaktikaran Marathi Nibandh" for Students

भारतीय संस्कृतीमध्ये काही सणांमध्ये देवींना महत्त्व आहे. नवरात्रासारख्या सणांमध्ये तर नऊ दिवस देवींचा, त्यांच्या 'नवविधा' रूपांचा भक्तिपूर्वक उत्सव साजरा केला जातो. गौरी, चंडिका, सरस्वती, लक्ष्मी, ललितकला इत्यादी रूपांचे होणारे पूजन म्हणजे स्त्रीच्या विविध भूमिकांचे स्मरण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारताच्या सांस्कृतिक परंपरांमध्ये देवीपूजकांचा एक मोठा प्रवाह आहे. तसेच भारतात अनेक प्रदेशांत पूर्वी मातृसत्ताक पद्धती प्रचलित होती. तसेच महिषासुरमर्दिनी हे स्त्रीचेच रूप देवी म्हणून पूजले जाणारे आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे (माहूर, कोल्हापूर, तुळजापूर या ठिकाणांच्या देवीतीन पीठे व वणी इथली देवी-अर्धे पीठ) स्त्रीचे महत्त्व सिद्ध करणारी आहेत. जिथे देव पराभूत होतात तिथे ते शत्रूवर विजय प्राप्त करून घेण्यासाठी देवीला आवाहन करतात, अशा कथाही लोकसाहित्यात आहेत.

या पुरातन कथांमधील समजुर्तीवरून समाजामध्ये स्त्रीशक्तीची असलेली जाणीव व्यक्त होते; पण नंतरच्या कालखंडामध्ये मात्र स्त्री व पुरुष यांच्यात समानता राहण्यापेक्षा स्त्रीचे स्थान दुय्यम पातळीवरचे समजले गेले. पुरुषप्रधान व पितृसत्ताक पद्धतीच्या प्रभावाने पुरुषांचे महत्त्व स्त्रीपेक्षा अधिक समजले जाऊ लागले; याचे कारण स्त्री व पुरुष यांची संख्या किती याच्याशी संबंधित नसून, काही प्रमाणात ते दोघांमधील कामाच्या विभागणीशी संबंधित असावे, असे म्हणायला वाव आहे. प्रारंभी, म्हणजे आदिमानवाच्या काळामध्ये स्त्री युद्धातही भाग घेत होती. कष्टाची व मेहनतीची कामे ती करीत होती. पण निसर्गाने तिच्यावर सोपविलेल्या सर्जनशक्तीच्या निर्मितीप्रक्रियेच्या काळात ती अशी कष्टप्रद कामे करू शकत नव्हती. अशा काळामध्ये तिलाच इतरांच्या मदतीची गरज शारीरिक व भावनिक पातळीवर जाणवत होती. प्रसूतीसाठी सुरक्षित आडोशाची जागा हीही तिची गरज होती आणि माणसाच्या बाबतीत तर लहान बालकाचे पालनपोषण, संस्कारसंवर्धन, जडणघडण ही काम पुरुषांपेक्षा तिला करणे आवश्यक होते. ते तिला अधिक चांगले जमत होते आणि तिलाही ही कामे करण्यात खूप समाधान व आनंद मिळत होता. अशा प्रकारच्या म्हणजे मुलांची जडणघडण व शिक्षण करण्याची प्रथा महाभारतातील काही कथांवरूनही स्पष्टपणे कळून येते. शंतनूपत्नी गंगा जेव्हा शंतनूपासून विभक्त होते तेव्हा ती आपल्या पुत्राला बरोबर घेऊन जाते. त्याचे संगोपन, शिक्षण पूर्ण करून नंतर त्याला शंतनूच्या हवाली करते. पुत्रावर संस्कार करण्याचे मातेचे कर्तव्य समाजाने या काळात गृहीत धरलेले आहे; पण संगोपनाची जबाबदारी स्त्रीची असली तरी पुत्राचे नाव, गाव, कूळ, गोत्र, पित्याचेपुरुषाचे असल्याने स्त्रीचे महत्त्व कमी होऊ लागले असावे. गरोदरपण, प्रसूती व बालकांवर संस्कार या कालखंडामध्ये संरक्षण, निवारा, अन्न यांसाठी ती पुरुषांवर अवलंबून असल्याने तिचे दुय्यमपण केवळ या काळापुरतेच मर्यादित न राहता कायमस्वरूपी झाले. अन्न, वस्त्र, निवारा यांसाठी पुरुषांना शिकारीसारखे धाडसी उद्योग करावे लागत; दगडधोंडे, लाकूडफाटा गोळा करून निवारा तयार करावा लागे. या कामांच्या मोबदल्यात त्यांचे वर्चस्व वाढत चालले आणि स्त्रीजात सहकारी म्हणजे दुय्यम ठरू लागली. निर्मितीची शक्ती असलेली आणि मानवजातीवर बालपणापासून संस्काराचे काम करणारी स्त्री गुणवैशिष्ट्यांनी सरस असूनही तिच्याकडे सहकाराची भूमिका आली आणि तिचे रक्षण करण्याची शारीरिक क्षमता दाखविणाऱ्या पुरुष जातीकडे मात्र प्रमुखपद आले. यातील उपरोधिकता लक्षात येण्यासारखी आहे. 'बळी तो कान पिळी' या म्हणीचा प्रत्यय म्हणा किंवा 'संघर्षात टिकणे' ही शक्ती प्रभावी ठरली म्हणा, पण स्त्रीजातीकडे आलेले हे दुय्यमपण अजूनही कायम राहिले आहे.

भटक्या टोळ्यांमधून समूहजीवन अस्तित्वात आले. समूहजीवनात एकाच प्रदेशात स्थिर होण्याची प्रवृत्ती विकसित झाली. वर्तमानाच्या जोडीला भविष्यकाळातील स्थिरस्थावरता पाहण्याकडे कल वाढला. 'आज इथे, तर उद्या तिथे' ही वृत्ती बदलली. समूहजीवनाची नियमावली तयार होऊ लागली. मुलेबाळे, त्यांचे संगोपन, घरदार, जमिनीवरचा हक्क अशा अनेक दृष्टींनी भटक्या टोळ्यांपेक्षा या जीवनात बदल होऊ लागला. अशाच काळात शेतीचा शोध लागला आणि नवल म्हणजे शिकारी वृत्तीच्या काळात हा शोध घरात-गुहेत राहणाऱ्या स्त्रीने लावला. शिकारी-वृत्तीकडून कृषिअवस्थेकडे वळण्याची ती प्राथमिक पायरी ठरली. अन्न मिळविण्याचा एक वेगळा मार्ग माणसाच्या हातात आला. यामधूनच भूमाता व स्त्री यांच्यातील साम्य व त्यावर आधारलेली धर्मकल्पना उदयाला आली. लहान मुले आणि पिके ही देवाची निर्मिती आहे हा विचार सुचला आणि संस्कृतीमध्ये त्यांचा स्त्रीच्या कर्तव्याकर्तव्याशी संबंध जुळला गेला. जमिनीजवळ असलेली सर्जनशक्ती व स्त्रीजवळ असलेली सर्जनशक्ती या दैवी मानल्या गेल्या. त्यासाठी पूजनाची गरज निर्माण झाली. तिची ही दैवीशक्ती निरनिराळ्या देवींच्या रूपांमधून धर्माने स्वीकारली. त्यामधून तिच्या अमानवी रूपाकडे तारक व संहारक अशा दोन्ही शक्तींकडे समाजाचे लक्ष वेधले गेले. 'स्त्री हे परमेश्वराचं साक्षात रूप समजण्याची कल्पना' या भूमिकेतून आलेली आहे.

कधी स्त्रीला देवी मानले गेले, तर कधी तिला राक्षसी मानले गेले. प्रारंभीच्या काळामध्ये पुरुषजातीने स्त्रीजातीची कल्पना या दोन प्रकारांत केली. अर्थातच कधी प्रतिस्पर्धी तर कधी रक्षक ही भूमिका नंतरच्या भांडवलशाहीच्या काळात बदलली. या काळात तिचे क्षेत्र घराशी निगडित झाले. पितृसत्ताक पद्धतीचा उदय होताच स्त्रीच्या वागण्याबोलण्यावर अनेक निर्बध आले. अनेक 'मिथ'कथा तयार झाल्या. उदाहरणार्थ- सावित्रीसत्यवानाच्या कथेमध्ये सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्यक्ष यमराजाशी वाद घातला आणि त्याला वादात जिंकून आणि प्रसन्न करून पतीचे प्राण परत मिळविले; पण अशा व्रतकथांमधील स्त्रीच्या बौद्धिक विकासाकडे लक्ष वेधण्यापेक्षा तिच्या पातिव्रत्याला महत्त्व दिले गेले. सावित्रीच्या कथेत पतीने तिचे रक्षण करायच्याऐवजी तिनेच पतीचे रक्षण केले; पण स्त्रीच्या ठिकाणी असलेली ही बौद्धिक ताकद, तिचे निर्णय घेण्याचे सामर्थ्य यांकडे दुर्लक्ष होऊन तिला दुय्यम स्थान मिळाले. आजही अनेक क्षेत्रांमध्ये स्त्री आपले बौद्धिक, आत्मिक, मानसिक कौशल्य पुरुषांपेक्षा अधिक प्रभावीपणाने दाखवीत आलेली आहे; तरीही तिला सहकाऱ्याचेच स्थान देण्याची समाजाची, पुरुषांची व पुष्कळदा तिची स्वत:चीच प्रवृत्ती असते. इतक्या वर्षांच्या पुरुषसत्ताक प्रभावाच्या दडपणाखाली तीच आपले सामर्थ्य विसरून गेली आहे आणि समाजाने दिलेले घरातील कर्तव्य, केवळ 'चूल आणि मूल' यामध्ये आपल्या आयुष्याची कृतार्थता मानू लागली आहे.

शिक्षक, डॉक्टर, वैमानिक, सैनिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये आज स्त्री कर्तबगारी गाजविताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर मध्ययुगीन कालखंडात राजपुत्राला जसे राजा म्हणून शिक्षण देऊन घडविले जात असे, तसे शिक्षण राजघराण्यातील मुलींना व सुनांना मिळत नसूनही वेळप्रसंग पडल्यावर त्यांनी राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. अहिल्याबाई होळकर, ताराबाई (शिवाजी महाराजांची सून), झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी अनेक उदाहरणे या संदर्भात देता येतील. सामान्यतः पतीच्या मागे स्त्रीच्या कर्तबगारीला धुमारे फुटलेले दिसतात. म्हणजे पितृसत्ताक पद्धतीनुसार राजाचा पुत्र राजा म्हणून घडविला जात असतानाही या राजघराण्यातील स्त्रिया त्यांच्या रोजच्या राजकीय व्यवहारात लक्ष देत असल्याशिवाय त्यांच्याजवळ हे कौशल्य व असे राजकारणपटुत्व आलेले नाही. राजकारण, साहित्यादी कला, तत्त्वज्ञान, अध्यात्माच्या मार्गाने समाजसुधारणा अशा अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी गाजविलेल्या कर्तबगारीची व स्वत:च्या वेगळेपणाची झलक दाखविली असली तरी अशा स्त्रियांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी अत्यल्प आहे. अशा स्त्रिया अपवादभूत असल्याने तो नियम ठरत नाही. सर्वसामान्य स्त्रीचे कार्यक्षेत्र म्हणून या क्षेत्रांचा उल्लेख होत नाही, तर 'चूल आणि मूल' हेच घराच्या चार भिंतींनी मर्यादित केलेले क्षेत्र म्हणजे स्त्रीचे क्षेत्र समजले जाते व त्याला विरोध करणारी स्त्री बंडखोर व बदनाम ठरते.

स्त्रीनेही हे क्षेत्र नाइलाजाने असेल किंवा आपखुषीने असेल पण मान्य केलेले दिसते; आणि हे तिच्या अंगवळणी पडले. इतक्या वर्षांच्या, नव्हे शतकांच्या सवयीनंतर स्त्रीचे व्यक्तिमत्त्वच बदलून गेले आणि आपण "घराबाहेरच्या क्षेत्रांमध्ये धीटपणे वावरू शकणार नाही. आपण पुरुषांच्या आधाराशिवाय घरातही समर्थपणे जगू शकणार नाही. झाडाच्या आधाराशिवाय जशी वेल वाढू शकत नाही, तसेच आपण पुरुषांच्या खंबीर आधाराशिवाय टिकाव धरू शकणार नाही", असा समज शतकानुशतके तिच्या मनावर कोरला गेला. निसर्गतः स्त्री खरोखरीच एवढी दुबळी नाही. पण कायमस्वरूपी तिच्या मनावर तसे कोरले गेल्याने, सुसंस्कृतपणाच्या नावाखाली ती अधिकाधिक परावलंबी बनली.

स्त्रीला सबल व्हायचे असेल तर प्रथमतः तिच्या मनावरचा हा संस्कार पुसून टाकला गेला पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की, तिने पुरुषांना डावलून त्यांचे स्थान हस्तगत केले पाहिजे. समाजात काय किंवा घरात काय, एक व्यक्ती जर खंबीर असेल तरच घराची प्रगती होते. अशी एक प्रमुख व्यक्ती पुरुष असायला हरकत नाही; पण त्याने स्त्रीवर्गाला आपली प्रतिस्पर्धी न मानता सहकारी समजले पाहिजे. एकमेकांच्या सहकार्याने जगण्यातच संस्कृतीचे सामर्थ्य दडलेले असते. पुरुष म्हणजे एकाचा आकडा व स्त्री म्हणजे शून्य व हे शून्य एकाच्या पुढे आले तरच प्रगती, असे जुने समीकरण बदलून दोघेही एकाचेच आकडे आहेत; कुणीही कुठे असले तरी त्यांच्या एकत्र येण्याने विकासाची गती वाढते, असे समीकरण रूढ करायला पाहिजे. हा विचार समाजमनामध्ये रुजविणे महत्त्वाचे आहे. हा समज जिच्या हाती पाळण्याची दोरी ती मातेच्या रूपामधली स्त्रीच मुलींच्या व मुलांच्या बालवयापासून त्यांच्या मनात रुजविण्याचे कार्य करू शकते. 'मुलगी म्हणजे परक्याचे धन', 'कन्यादानासारखे पुण्य नाही', 'हुंडी कशी पटवायची' ही भूमिका मुलीच्या मनावर ठसविण्याचे काम प्रथमतः माताच करीत असते. त्यामध्ये बदल घडायला पाहिजे. त्याऐवजी शारीरिक-मानसिक-बौद्धिक अशा पातळ्यांवर तिला सुसंस्कृत केले पाहिजे. तिचे जीवनातील स्थान दुय्यम नसून सहकाराचे आहे; एक प्रकारे नाटकात जे स्थान दिग्दर्शकाचे असते ते तिचे आहे; याची तिला बालपणापासूनच शिकवण दिली पाहिजे. सर्व घरादाराचे सूत्र हातात ठेवण्याइतके तिने सामर्थ्यशाली असायला पाहिजे. एक प्रकारे ती Kingmaker असली पाहिजे. 'पतंगाची दोरी' नावाचे अनंत काणेकरांचे एक नाटक आहे. त्यामध्ये 'स्त्री'ची तुलना पतंगाशी केली आहे. पतंगाने कसे उडावे, हे ज्याच्या हातात त्याची दोरी असत तो ठरवितो, असे म्हणून स्त्रीच्या सर्व प्रकारच्या कर्तृत्वाला समाजाने व पुरुषसत्ताक प्रवृत्तीने कसे स्वत:च्या ताब्यात ठेवले आहे, ते या नाटकामधून दाखविले आहे. पण हे प्रतीक स्त्रीच्या संदर्भात वेगळा अर्थ सुचवू शकते. घराबाहेरच्या क्षेत्रामध्ये कर्तबगारी गाजविणारी मुले व पती यांच्या श्रेयाचे सूत्र तिच्या हातात तिने ठेवायला पाहिजे. यामध्येच तिच्या सबलीकरणाचे रहस्य आहे. आकाशात भरारी घेणे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच भरारीला रीत लावणे हेही महत्त्वाचे असते. ते ती करू शकली पाहिजे.

केवळ पुरुषांशी स्पर्धा करणे हे महत्त्वाचे नाही. स्त्रीने या स्पर्धेपेक्षा स्पर्धा करणाऱ्यांना घडविणे हे महत्त्वाचे आहे. विशेषतः घरात किंवा समाजात काय आज जे दहशतीचे, गुंडगिरीचे, लाचलुचपतीचे व अनीतीचे दर्शन घडत आहे, ते दूर करण्याचे सामर्थ्य स्त्रीच्या हातात आहे. मुलांवर, पतीवर, भावांवर व वडिलांवर या नात्याप्रमाणेच ती जिथे नोकरी करीत असेल त्या प्रत्येक क्षेत्रात तिला असे संस्काराचे आदर्श उभे करता आले पाहिजेत. त्यासाठी शिक्षण, संस्कार, धर्म, नीती यांच्या कल्पना तिने समजून घेतल्या पाहिजेत आणि केवळ स्वतःपुरते त्याचे आचरण करून थांबता कामा नये तर सभोवतालच्या स्त्री-पुरुष, मुले इत्यादींवर त्यांचे संस्कार घडविण्याचे बळ तिच्या मनगटात, वाणीत, लेखनात हवे, तिला ते अंगभूत हवे. हे मिळविणे सोपे नाही. स्वत:ला समर्थ बनवून समाज घडविण्याच्या या कामामध्ये तिला आत्मभान येणे व स्वत:वर विश्वास असणे अगत्याचे आहे.

आज पुरुषाच्या बरोबरच्या स्पर्धेत धावताना तिची दमछाक होत आहे. नोकरी, शिक्षण, उद्योजकता, पोलीसदल, सैन्य, संगणकादी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणे ही सबलीकरणाची पहिली पायरी ठरते; पण त्यापेक्षाही एका महत्त्वाच्या आत्मसामर्थ्याचा प्रत्यय तिचा तिलाच यायला पाहिजे. तो म्हणजे आपण काय करावे? आपले खरे कार्यक्षेत्र कोणते? ते कसे हस्तगत करावे? आज नोकरीच्या किंवा घराबाहेरच्या अन्य व्यापात गुंतल्याने तिचे घरादाराकडे विशेषतः मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. पती व्यसनाच्या व अन्य दुष्ट प्रलोभनांच्या मागे धावतो आहे आणि मुले व्यसनाधीन व लैंगिकदृष्ट्या विकृत होत आहेत. यांच्यावर संस्कार करणे हे स्त्रीला पूर्वापार काळापासून साधलेले आहे. मग ही मुले व ही पुढची पिढी जशी घरातली असेल तशीच समाजातली असेल, विविध जाति-जमातींमधील असेल; त्यांना योग्य संस्कार देऊन घडविणे हे फार मोठे कार्य, सर्जनशीलतेची साक्षात मूर्ती असलेली स्त्रीच करू शकेल. त्यासाठी तिने सामर्थ्यशाली होणे आवश्यक आहे.

कायद्याच्या कक्षेमध्ये आज तिच्या हातात खूप काही तिला मिळालेले आहे. पुरुषांच्या बरोबरीने तिला समानतेचा अधिकार मिळालेला आहे. शिक्षणात समान संधी आहेत. तसेच कर्तृत्वक्षेत्रातही समान संधी देण्याचा प्रयत्न आहे. राजकारणाच्या दालनातही तिच्यासाठी राखीव जागा ठेवल्या जातात. अशा घराबाहेरच्या विश्वात वावरताना तिला कधी कधी पुरुषांची मदत घ्यावी लागत असली तरी काही काळाने ती त्या त्या कामात स्वत:चा वेगळेपणा दाखविण्याइतकी सबल होऊ शकते, हे अनेक उदाहरणांनी स्पष्ट केले आहे. तरीही अनेक ठिकाणी तिच्या कर्तृत्वाबद्दल अनुदारपणाने बोलले जाते. त्यामध्ये नैतिकतेचेही रंग मिसळले जातात. यामागे एकमेकांबद्दलची स्पर्धेची भावना असते. ती दूर व्हायला पाहिजे. स्त्री व पुरुष हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून सहकारी आहेत, ही भावना समाजात निर्माण करण्याने स्त्रीच्या कर्तृत्वाला खराखुरा वाव मिळू शकेल.

यासाठी तिने आर्थिक दृष्टीने सक्षम व स्वतंत्र असणे ही प्रथम गरज आहे; पण ती मिळवती असून प्रश्न सुटत नाही. एक वेळ ती मिळवती नसली तरी चालेल, पण घरातील, समाजातील आर्थिक व्यवहारांवर पुरुषांप्रमाणे व पुरुषांच्या बरोबरीने तिने अधिकार मिळविला पाहिजे. त्यासाठी सुशिक्षित व्हायला पाहिजे. तिला मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेता आले पाहिजे; आणि केवळ शाळा, महाविद्यालयातील शिक्षणापेक्षाही तिच्यावर संस्कार घडायला पाहिजेत. हे संस्काराचे धडे जीवनाच्या शाळेतून मिळत असतात. घरातल्या जीवनाबरोबरच घराबाहेरच्या विश्वामध्ये वावरण्याने विश्वाचे, माणसांचे व्यवहार व चांगले-वाईट स्वरूप तिला उलगडता येते. कुणाचा पांगुळगाडा न घेता स्वतंत्रपणे वावरण्याचे, निर्णय घेण्याचे धाडस तिने दाखवायला पाहिजे आणि असे जगासमोर वावरताना आपली प्रतिमा शुद्ध ठेवली पाहिजे; ती नैतिकतेला, मानवतेला सोडून असता कामा नये. स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व समाजासमोर ठेवतानाही कुठे समानता, कुठे सहकार्य तर कुठे प्रमुख याचे भान ठेवून वागता आले पाहिजे. पुरुषांच्या सदोष वर्तनाला व दंडेलशाहीला एकजुटीने विरोधही करता आला पाहिजे.

लैंगिक पातळीवर समाजाची स्त्रीकडे व पुरुषाकडे पाहण्याची, न्याय देण्याची वृत्ती वेगळी आहे. समाजाची ही वृत्ती बदलायला लावून पुरुष गुन्हेगार किंवा दोषी असेल तर त्याला शासन करण्याची व समज देण्याची जाणीव समाजात निर्माण करायला पाहिजे. स्त्रीवर होणारे बलात्कार व त्यामुळे तिच्यावर बसणारा बदचाली'चा शिक्का हा स्त्रीवरचा प्रमुख अन्याय आहे. त्याच्या विरोधी लढा देऊन स्त्रीने पुरुषांना शासन होण्यासाठी जनमत जागृत करायला पाहिजे. 

सुशिक्षित, सुदृढ, सुसंस्कारित व बलवान समाज घडण्यासाठी समाजातील पन्नास टक्के असलेली स्त्रीशक्ती समर्थ होणे आवश्यक ठरते. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था व इतर सामाजिक संस्था स्त्रीशी माता, पत्नी, भगिनी, कन्या, सासू, सून, नणंद या नात्यांनी जशा संबंधित आहेत, तशाच ती एक नागरिक व जबाबदार व्यक्ती म्हणूनही संबंधित आहेत. तिच्या सबलीकरणाचा संबंध समाजाच्या सबलीकरणाशी संबंधित आहे. लढाईवरून पळून येणाऱ्या पतीला पूर्वीच्या काळातील स्त्री घरात घेत नव्हती, हे पत्नीव्रत जसे महत्त्वाचे तसे आज व्यक्ती म्हणून विवाहात, कुटुंबात व समाजात आपले नेमके कर्तव्य बजावण्याचे तिला कळणे म्हणजे ती सबल आहे हे सिद्ध होईल. तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा हा अर्थ तिला उमगला पाहिजे. केवळ आपल्या मनाला रुचेल/पटेल तसे वागणे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य नव्हे व सबलीकरणही नव्हे. आपल्यावरच्या नैतिक, धार्मिक, कौटुंबिक, वैवाहिक वा अन्य जबाबदाऱ्या ओळखून वागणे हे सबलीकरण होय. अर्थात, त्यासाठी राजकारणातही तिला अधिकार हवा, हक्क हवा; कारण ‘सर्वे गुणा कांचनम् आश्रयन्ते।' या न्यायाने सर्व प्रकारची क्षमता राजसत्तेपाठोपाठ येत असते. पण राजसत्तेत तीस टक्के म्हणजे सर्वस्व नव्हे, ते सबलीकरणाचे एक साधन आहे, एकमेव साधन नव्हे. 

सारांश

सर्जनशीलतेची शक्ती असलेल्या स्त्रीला समाजात सतत दुय्यमपणा स्वीकारावा लागणे ही परिस्थिती बदलायला पाहिजे. बालसंगोपन व संस्कारक्षमतेचे सामर्थ्य असणे हे तिचे विशेष महत्त्वाचे न ठरता केवळ शारीरिक पातळीवरील दुर्बलता सामाजिक रूढीने तिच्या मनात निर्माण केली आहे. ती स्वत:चे व समाजाचे रक्षण करण्याइतकी समर्थ आहे, हे तिचे तिलाच पटले पाहिजे. ही तिची समर्थता पूर्वीच्या साडेतीन शक्तिपीठे किंवा नवरात्रोत्सव यांमधून व्यक्त झालेली आहे. बुद्धिकौशल्य, राजकारणपटुत्व, रणकौशल्य इत्यादी विशेषणांच्या जोडीलाच तिच्याजवळ उपजत सहनशीलता, क्षमाशीलता इत्यादी स्त्रीविशेष आहेत. त्यांच्या जोरावर तिने आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावे व घरातील सर्वच निर्णायक गोष्टींमध्ये अधिकार मिळवावा. स्वतः स्पर्धेत उतरणे वा स्पर्धेत उतरणाऱ्यांना घडविणे हे आपल्या हातात ठेवून तिने समाजहिताचे सूत्र आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे. लैंगिक पातळीवर तिने स्वातंत्र्य व स्वैराचार यांमधील फरक स्वतः ओळखावयास हवा व पुरुषवर्गाला स्वैराचारापासून दूर ठेवण्याइतके सबळ व्हायला हवे.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: