Saturday, 31 October 2020

Marathi Essay on "Problems of Working Women", "नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्या मराठी निबंध" for Students

Essay on Working Women in Marathi Language: In this article "नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्या मराठी निबंध", "Naukri Karnarya Mahilanchya Samasya Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Problems of Working Women", "नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्या मराठी निबंध" for Students

नोकरीसाठी ठराविक वेळी घरातून बाहेर पडणारी स्त्री हे दृश्य आज सर्वांच्याच परिचयाचे झालेले आहे. अशा नोकरी असलेल्या मुलीला लग्नाच्या बाजारामध्ये तिच्या नोकरीमुळे किंमत आलेली असते. शाळा-महाविद्यालयांतून वा अन्य छोटे पदविकेचे शिक्षण घेतानाच मुलींच्या मनात नोकरीचे ध्येय जागे होत असते. त्या दृष्टीनेच त्यांनी आपले शिक्षण केलेले असते. शिक्षण कुठल्याही क्षेत्रातले असो, मिळेल ती नोकरी करणे हे त्यांचे साध्य असते. घराबाहेरच्या जगात वावरताना त्यांना त्यांच्या आवडीनिवडी भागविणे शक्य होते. अशी नोकरी मिळाली नाही आणि केवळ घरातच राहावे लागले तर तो स्त्रियांना कमीपणा वाटतो. आपण नोकरी न करता, नुसतेच घरकाम करतो हे सांगताना त्यांचा सूर नाराजीचा असतो. यातूनच नोकरीकडे बघण्याची स्त्रीची भूमिका कळून येते. 

एके काळी नोकरी करणे हे आजच्याइतके सर्रासही नव्हते व प्रतिष्ठेचेही नव्हते. लग्न जुळेपर्यंत किंवा निराधार-विधवा स्त्रिया नोकरीच्या, त्याही शाळेत शिक्षिका किंवा रुग्णालयात (हॉस्पिटलमध्ये) नर्सेस म्हणून काम करताना दिसत. पण बदलत्या आर्थिक परिस्थितीने, वाढत्या महागाईने आणि मुलींना दिल्या गेलेल्या शिक्षणाच्या समान संधींनी नोकरी ही वाट निश्चित होऊ लागली. शहरातील वाढते खर्च, शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग, लग्न होईपर्यंत हुंडा जमविण्याला साहाय्य किंवा घरातील भावाबहिणींसाठी म्हणून नोकरी करणारी मुलगी लग्न झाल्यावरही आर्थिक भार उचलण्यासाठी घराबाहेर जाऊ लागली. नोकरीसाठी घराबाहेर पडणे हा तिच्या प्रतिष्ठेचा भाग होऊन गेला.

नोकरीच्या ठिकाणी मग ते टेबलवर्क असो किंवा शाळा-महाविद्यालयात शिकवणे असो, त्या ठिकाणी स्त्री-पुरुष समानता आढळते काय? अशा सुशिक्षित पातळीवरच्या नोकरीमध्ये वेतनाच्या दृष्टीने, कामाच्या तासांच्या दृष्टीने, कामाच्या वर्गवारीच्या दृष्टीने आज समानता असली तरी काम करण्याच्या संदर्भात त्या पुरेशा गांभीर्याने काम करीत नाहीत, असा पुरुषांचा दृष्टिकोन असतो, तर स्त्रिया अत्यंत जबाबदारीने आपले काम करतात असाही काहींचा दृष्टिकोन आढळतो. दोन्ही प्रकारांत तथ्य नाही असे नाही. काम टाळणे हा स्वभाव काही फक्त पुरुषांचाच असतो असे नाही. स्त्रीही कधी कधी कामाकडे दुर्लक्ष करते; आपल्या गोड बोलण्याने इतर सहकाऱ्यांकडून आपली कामे करून घेते, असा तिच्याबद्दलचा सर्वसाधारण समज होतो, तो तिच्यावर अन्याय करणारा आहे.

एक काळ असा होता की, स्त्री शिक्षक, प्राध्यापक, नर्सेस, डॉक्टर, कारकून अशा दुय्यम पातळीवरच्याच नोकऱ्यांमध्ये लायक समजली जायची. त्यामध्येही प्राचार्या, एखाद्या संस्थेचे मुख्य पद, मॅनेजर अशी पदे जबाबदारीने सांभाळण्याची पात्रता तिच्याजवळ आहे, हे मान्य होत नव्हते. पण आता अशा जबाबदारीच्या पदावरतीही ती काम करू शकते, हे तिने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहेच. पण या क्षेत्रांव्यतिरिक्त पोलीस, हॉटेल, विमान कंपनी, रेसकोर्स, चित्रपट-निर्माती अशा वेगवेगळ्या ठिकाणीही तिने आपल्या कर्तृत्वाची चमक दाखविली आहे. ज्या ठिकाणी ती अधिकारी म्हणून वावरते, त्या ठिकाणी तिच्या हाताखालच्या पुरुषांना तिने दिलेले काम करणे, तिने घेतलेले निर्णय अनुसरणे कमीपणाचे वाटते; त्यामुळे अशा पदांवर कामे करताना तिला हाताखालच्या व्यक्तींकडून कामे करून घेताना अधिक जागरूक राहावे लागते. ही जबाबदारीची पदे पुरुषांनाच सांभाळता येतात असा समज तिच्या हाताखाली काम करणाऱ्या सगळ्यांचाच असतो; त्यामुळे या पदांवर काम करणाऱ्या स्त्रीबद्दल व तिच्या कामाच्या उरकाबद्दल हाताखालच्या माणसांच्या मनात विश्वास नसतो. आपल्या कामाने तिला तो निर्माण करावा लागतो. या पदांची नावेही - प्राचार्य, मॅनेजर, डॉक्टर, वकील इत्यादी- याला पूरकच आहेत. याचे कारणही लक्षात येण्यासारखे आहे. इतक्या वर्षांत या क्षेत्राकडे स्त्रीला फिरकता न आल्याने ही क्षेत्रे म्हणजे स्त्रियांना न जमणारी असा समज लोकमानसात रूढ झालेला आहे. नोकरीच्या दुय्यम पातळीवर स्त्रीचा वावर समाजमान्य झाला तरी सर्वोच्चपदी तिला काम करता येते, हे संमत होण्यासाठी काही पावसाळे जाण्याची गरज आहे; म्हणूनच हाताखालच्या स्त्री-पुरुषांचे सहकार्य मिळविताना तिला कधी अधिक कडक व्हावे लागते, तर कधी स्त्री-सुलभ कौशल्याने आपले संघटनकौशल्य उपयोगात आणावे लागते.

सामान्यतः मध्यमवर्गातील स्त्री ज्या क्षेत्रांमध्ये नोकरी करते, तिथे तिच्या वेतनामध्ये वेगळेपणा नसतो. तिचे वेतन पुरुषापेक्षा कमी नसते; पण ज्या वेळी बदलीवर प्रमोशन अवलंबून असते तेव्हा बदलीसाठी घरापासून दूरच्या गावी राहणे स्त्रीला काही वेळा शक्य नसते. घर, घराची-मुलांची जबाबदारी तिला लक्षात घ्यावी लागते; त्यामुळे वेतन व वरच्या पदावर काम करण्याची संधी निसटते. सुशिक्षित कुटुंबामध्ये याबद्दल निदान जाणीव असते. अनेकदा तिला घरच्या माणसांचे, परगावी नोकरीसाठी जाण्याबद्दल प्रोत्साहनही मिळते. पण अशा कुटुंबांची संख्या खूपच कमी आहे. लायकी असून वरच्या पदावर काम करण्याची संधी न मिळाल्याने ती नाराजही होते. परगावी जायचे तर राहण्यापासूनच्या प्रश्नांना विचारात घ्यावे लागते. सुरक्षिततेचा विचारही करावा लागतो.

काही ठिकाणांच्या नोकरीमध्ये तिला वेतनही कमी दिले जाते. रिपब्लिक कोरियामध्ये तिला पुरुषांच्या वेतनाच्या ४७ टक्के वेतन मिळते, तर जपानमध्ये ५१ टक्के वेतन मिळते. भारतात सामान्यतः असे मध्यमवर्गीय स्त्रीच्या नोकरीच्या क्षेत्रात घडत नाही; पण खासगी संस्था मात्र हा फरक करतात. भारतात बांधकामावरील स्त्री व पुरुष मजुरांच्या पगारात (ज्याला रोज, रोजी किंवा हजेरी म्हणतात.) तफावत आहे. स्त्रीला पुरुषापेक्षा कमी हजेरी मिळते.

अजूनही स्त्रीची नोकरी म्हणजे तिच्या चैनीसाठी असते, असा समज असतो. घरची आर्थिक जबाबदारी पार पाडण्यासाठी ती नोकरीकडे वळते, हे सत्य असूनही मान्य होत नाही. तसेच तिच्या नोकरीमुळे एका लायक व उमद्या तरुणाला बेकार राहावे लागत आहे, हा समजही तिला दूर करता आलेला नाही. श्रीमंत कुटुंबातील अनेक महिलांचा पगार घरातल्या किरकोळ खर्चालाही पुरेसा नसतो. त्यांची नोकरी म्हणजे वेळ घालविण्याचे एक साधन असते. अशा महिला समाजाच्या नजरेसमोर असतात. पण हे प्रमाण टक्केवारी पाहता कमी आहे. नोकरी करण्याची गरज भासल्याने स्त्री घराबाहेर नोकरीसाठी येते, हा समज रूढ व्हायला अजून काही वर्षे जावी लागतील. मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेतलेल्या मुलीला मात्र आपल्या नोकरीकडे पाहण्याची ही दृष्टी खटकते. पुष्कळदा परीक्षांमध्ये ती मुलांपेक्षा अधिक गुण मिळवून आपली हुशारी सिद्ध करीत असते आणि तरीही बेकारी दूर करण्याचा उपाय म्हणजे स्त्रीने नोकरी करू नये, असे म्हणणारी वृत्ती नोकरीपेशातील स्त्रीवर अन्याय करणारी आहे. 

स्त्रीची नोकरी म्हणजे आर्थिकदृष्ट्या 'आगगाडीचे दुसरे इंजिन' समजले जाते. घरातील पुरुषांच्या पगाराच्या तुलनेत तिचे नोकरीतले स्थान व तिचा पगार कमी असतो; पण जेव्हा तिचे स्थान व पगार घरातील पुरुषांपेक्षा अधिक मानाचे व वरचे असते तेव्हा घरातील पुरुषांना त्यामध्ये कमीपणा वाटतो. त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना बळावते व घरीदारी ती त्याच्या वागण्यातून प्रगट होते. त्यामुळे नोकरीमध्ये वरिष्ठ पद स्वीकारताना स्त्रीला याचा विचार करावा लागतो. घरी व नोकरीमध्ये पुरुषांपेक्षा तिचे स्थान नेहमीच दुय्यम प्रतीचे व केवळ सहकाऱ्याचे असावे अशी भावना पुरुष व समाज या दोन्ही ठिकाणी असल्याने स्त्रीला कर्तबगारीच्या पदांवर कामे करताना सर्व दृष्टींनी विचार करावा लागतो. केवळ आपल्या अंगच्या गुणांना वाव मिळत आहे म्हणून मानाची व अधिकाराची पदे पुरुष जसा स्वीकारतो तसे तिला करता येत नाही. बँकेतल्या प्रमुख पदी असलेल्या मॅनेजरच्या हाताखाली त्याची पत्नी किंवा भगिनी नोकरी करीत असेल तर तिला कमीपणा वाटत नाही. पण महाविद्यालयाच्या 'प्राचार्या' असलेल्या पत्नीच्या हाताखाली कारकून किंवा प्राध्यापक म्हणून काम करताना पतीला कमीपणा वाटतो आणि बरोबरचे सहकारीही त्याच्याकडे कुचेष्टेने पाहतात; त्यामुळे लायकी व गुणवत्ता असूनही स्त्री अशा पदावर काम करायला नेहमी उत्सुक असतेच असे नाही. समाजमन बदलणे हाच त्यावरचा उपाय आहे आणि ते कधीतरी बदलेल याची खात्री स्त्रीला वाटू लागली आहे. स्त्रीचे शहाणपण चुलीपुरते' या समजापासून आपण सध्या फार दूर येऊ शकलो आहोत. घराबाहेरच्या विविध क्षेत्रांमध्ये स्त्रीची कर्तबगारी मान्य झालेली आहे. याच्याच पुढचा टप्पा म्हणजे अत्युच्च पदावरही ती कामे करते हे पुरुषांनी व तिच्या पतीने मनापासून स्वीकारणे हा होय. आर्थिक दृष्टीने, वाढत्या महागाईने स्त्रीला नोकरी करणे भाग आहे, हे सत्य आज पुरुषांनी मान्य केले आहे. त्याच्याच पुढची पायरी म्हणजे तिचे कर्तृत्व आपल्यापेक्षा अधिक असू शकते व त्याच्या जोरावर ती घराची आर्थिक बाजू मजबूत करू शकते हे मान्य करणे व त्यासाठी तिला सहकार्य करणे व प्रोत्साहन देणे ही होय. 

नोकरीच्या क्षेत्रात वावरतानाही स्त्री आपल्या घरातील कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत नाही. आपली नोकरी घरासाठी आहे याचे तिला पुरेपूर भान असते; म्हणूनच नोकरी करून घरी येणारी स्त्री स्वयंपाक, घराची देखभाल, मुलांचा अभ्यास या कामात गुंतली जाते. किंबहुना नोकरी करून घरी येतानाच रेल्वेच्या डब्यात बसल्या बसल्या ती भाजी निवडणे, शिवणकाम-विणकाम करणे असे उद्योग करीत असते. कार्यालयामध्येही तिच्या डोक्यात घरातील कामांचा विचार असतो. घराशी तिची असलेली ही जवळीक समाजानेही समजून घ्यायला पाहिजे. घरासाठी तिने नोकरीच्या कामाकडे दुर्लक्ष करू नये. पण तिच्या घरातल्या कामांमध्ये पुरुषांचे सहकार्य तिला अपेक्षित असते, हे लक्षात घ्यावे. नोकरीवरून घरी आलेला पुरुष करमणुकीच्या माध्यमांकडे वळतो. स्त्रीला मात्र तसे करता येत नाही. पण आज अनेक घरांमध्ये दिसणारे सहकार्याने केले जाणारे कामाचे दृश्य पुरुषांच्या मनातील सुसंस्कृतपणा व्यक्त करणारे आहे. घरातल्या कामांमध्ये तिला मदत करणे हे पुरुषांना आपले कर्तव्यच आहे असे वाटले पाहिजे. मुलांचा अभ्यास घेणे, घराची साफसफाई करणे ही कामे केवळ स्त्रीवर सोपविण्यापेक्षा पुरुषांनी त्यामध्ये केलेले सहकार्य तिला शारीरिक व मानसिक दृष्टीने उत्साह देणारे ठरते. 

कारखाने, मोठमोठ्या यंत्रांशी निगडित असलेल्या कंपन्या या ठिकाणी नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या प्रश्नांचे स्वरूपही फारसे वेगळे नसते. तांत्रिक सुविधांमुळे किंवा अन्य कारणांमुळे नोकरकपात करण्याची वेळ आली तर तेथील स्त्रीच्या नोकरीवर प्रथम गदा येते. अशा ठिकाणी बाळंतपणासाठी घ्यावी लागणारी मोठी रजा प्रथम नजरेत भरते. अशा रजेच्या कालखंडात दुसऱ्या पुरुषाला घेतले जाते व त्याला कायम करण्याकडे कंपन्यांचा व कारखान्यांचा कल असतो. कामगार युनियनसारख्या संघटनाही स्त्रियांच्या अशा मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यासाठी या कामगार संघटनांमध्ये त्यांना स्थान मिळाले तर त्या स्त्रियांच्या म्हणून ज्या गरजा आहेत, त्यांबद्दल विचार मांडू शकतील.

गेल्या पन्नास-साठ वर्षामध्ये स्त्रीच्या या प्रकारच्या सर्वच प्रश्नांचा विचार समाजात खूपसा सहानुभूतीने होऊ लागला आहे. एवढेच कशाला, एखाद्या क्षेत्रामध्ये पुरुषांप्रमाणे स्वतंत्र ‘करियर' करणाऱ्या स्त्रीलाही समाज समजून घेऊ लागला आहे. अशा घराबाहेरच्या क्षेत्रात उद्योजक म्हणून, कलावंत म्हणून वावरताना घरातील जबाबदाऱ्यांना तिला अग्रक्रम देता येणार नाही, याची जाणीव पुरुषांना व घरातील लहानमोठ्या सर्वांनाच होऊ लागली आहे. अशी कुटुंबे आज उच्चवर्गीय थरातली व संख्येने अल्प असली तरी समाजात दिसू लागली आहेत, हेही विसरून चालणार नाही; आणि घरातली पुढची पिढी घडविण्याची जबाबदारी पती व घरातील इतर माणसे स्वीकारू लागली आहेत. अशा स्त्रीचा व तिच्या 'करियर'चा अभिमानाने उल्लेख केला जात आहे. पुरुष म्हणजे मिळविता आणि स्त्री म्हणजे केवळ गृहिणी ही वृत्ती बदलत जाण्याने स्त्रीच्या कार्यातील, नोकरीतील अडथळे कमी होण्याची शक्यता आहे.

विवाहाने स्त्रीच्या जीवनात फार मोठे स्थित्यंतर घडून येते; पण असे स्थित्यंतर पुरुषांच्या जीवनात घडण्याची शक्यता नसते. स्त्रीच्या माहेरी असलेले वातावरण वेगळे असू शकते. सासरचे वाईट किंवा चांगले असे एका साच्यात बसविण्यापेक्षा ते वेगळे असते हे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. लग्नामुळे शहरांतून खेड्यांत किंवा मध्यमवर्गातून उच्चभ्रू स्तरात जावे लागणाऱ्या मुलीला वेगळ्या वातावरणाशी जुळवून घेण्यास काही वेळ द्यावा लागतो. नोकरीमध्ये ती करीत असलेल्या कामावर त्याचा परिणाम होतो. तशीच स्थिती गरोदरपणातही असते. तिची मानसिक व शारीरिक स्थिती, तिच्यावर काम सोपविताना लक्षात घेतली जावी. लहान मुलांचे संगोपन करण्यासही तिला वेळ द्यावा लागतो. नोकरीमध्ये यासाठी पर्याय ठेवता येईल. मूल दोन अडीच वर्षांचे होईपर्यंत आईने अर्धवेळ नोकरी पत्करावी; म्हणजे तिची ओढाताण होणार नाही, मुलाकडेही लक्ष देता येईल आणि नोकरीतील कामावरही विपरीत परिणाम होणार नाही. या वेळात इतर कोणाला नोकरीवर घेता येईल.

नोकरी करणाऱ्या स्त्रीला मुलांकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. ज्या वयात त्याला त्याच्या आई-वडिलांच्या सहवासाची अपेक्षा असते, त्याच वयात त्याला पाळणाघरात ठेवून आई-वडिलांना नोकरीचा रस्ता धरावा लागतो. मुलाच्या संस्कारक्षम वयात जे आपुलकीचे संस्कार त्याच्यावर व्हायला पाहिजेत, त्याला ते मूल मुकते. आईलाही याची जाणीव असते. तिलाही बालकाची ओढ वाटत असते; पण या नैसर्गिक भावनेला दूर सारून तिला नोकरीकडे वळावे लागते. आई-वडिलांच्या सहवासाचा संस्कार न मिळाल्याने आजची पिढी बंडखोर, गुंड, अविचारी होत चालली आहे. ही वस्तुस्थिती आज समाजविचारवंतांना अस्वस्थ करीत आहे. म्हणून मूल लहान असेपर्यंत वयाच्या काही ठराविक काळापर्यंत त्याला पालकांच्या सहवासाचा असलेला हक्क मिळाला पाहिजे. म्हणून माता व पिता दोघांनीही अर्धवेळ नोकरी केली तर ही कर्तव्ये पार पाडणे सुलभतेने शक्य होऊ शकेल. शिवाय स्त्रीच्या नोकरीमुळे मुलांकडे तिचे दुर्लक्ष होते या लोकापवादातील हवाही निघून जाईल.

आपली लहान मुले सांभाळण्याचा हा प्रश्न जसा मध्यमवर्गीय स्त्रीला सोडवावा लागतो, तसा तो कामगार-स्त्री, मोलकरीण, स्वयंपाकीण यांनाही सोडवावा लागतो. पण त्यासाठी त्या आपल्या मुलाला गरज असेल तोवर बरोबर घेऊन वावरतात; कारण त्यांच्या कामाचे स्वरूप वेगळे असते. त्या कुठल्या तरी इमारतीच्या किंवा घरबांधणीसारख्या शरीरकष्टाची कामे करीत असतात किंवा कुणाच्या घरी मोलकरीण, स्वयंपाकीण अशा कामावर असतात. म्हणून कामाच्या ठिकाणी त्या मुलांना घेऊन जाऊ शकतात. या स्त्रिया फार पूर्वीपासून अशी घराबाहेरची कामे 'मोली' करीत असतात. स्वत:चे संरक्षण कसे करायचे, समूहाने कसे राहायचे याचेही तंत्र त्यांनी जमविलेले असते. त्यांच्यामध्ये स्वयंपाकादी कामाचाही फार मोठा बडिवार नसतो आणि मुख्य म्हणजे मध्यमवर्गीय स्त्रीपेक्षा ती अधिक धीट असते; शारीरिक-मानसिक दृष्टीने कणखर असते. कामाच्या ठिकाणी ठेकेदार किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास त्या एकजुटीने दूर करू शकतात. अशा कष्टकरी स्त्रियांचे प्रश्न व त्यांच्या भोवतालचे वातावरण वेगळे असते. त्यांच्याजवळचे धैर्य व मानसिक बळ आजच्या मध्यमवर्गीय स्त्रीने बाळगले तर काही प्रश्नांवर उत्तरे मिळू शकतील.

गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या स्त्रीकडे एक जबाबदार व्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे, याची समाजाला सवय होऊ लागली आहे. नोकरीमध्ये अत्युच्च पदांवर काम करण्याची तिची पात्रता आता समाजमान्य होत आहे. "बाईमाणूस असून ती पुरुषांसारखे तडफेने काम करते' असे कौतुकाचे उद्गारही निघू लागले आहेत. पण तडफदारपणे काम करणे व निर्णय घेणे हे पुरुषांना जमते, बाईला जमत नाही असाही सूर त्यामध्ये आहे. याला कारण घराच्या बाहेरची सर्व क्षेत्रे पुरुषांच्या कर्तबगारीचीच असतात व त्या क्षेत्रांत स्त्री अपवादानेच येते, असा समज अजूनही पुरता दूर झालेला नाही.

नोकरीच्या संधी दिवसेंदिवस कमी होत जात आहेत व शिक्षण घेतलेल्या मुलामुलींची संख्या मात्र वाढत राहणारी असल्याने घरातील पुरुष बेकार असणे समाजाला परवडणारे नाही; म्हणून त्याचा दोष स्त्रीच्या नोकरीकडे दिला जातो. शिवाय नोकरी करणारा मुलगा घराला जसा कायमस्वरूपी आधार देतो तसा आधार मुलगी देऊ शकत नाही. तिचे लग्न झाल्यावर तिचा पगार तिच्या सासरकडे जाणार असतो, हा दृष्टिकोन समजून घेऊन मुलींच्या/स्त्रियांच्या नोकरीकडे समाज पाहत असेल तर त्यामध्ये फारसे चूक नाही, हे स्त्रीनेही समजून घेतले पाहिजे. ही जशी एक बाजू झाली तशीच नोकरी करण्यासाठी स्त्रीने घराबाहेर पडणे, ही आज गरज आहे. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये 'एक खांब' पद्धती (म्हणजे एकाच्याच पगारावर अवलंबून राहणे) परवडणार नाही. घरकामाचा बोजा सांभाळूनही स्त्री नोकरीच्या वाटेकडे वळते तीही गरज भागावी म्हणून. घरसंसार, मुले इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडूनही ती नोकरीच्या मार्गाने संसाराला मदत करीत असते. त्यामध्ये तिची ओढाताण होत असते; म्हणून तिचे हे योगदान घराने व समाजाने समजून घ्यावे, तिच्या कामाकडे सहानुभूतीने पाहावे ही भूमिका अपेक्षित आहे. अशी जाणीव बाळगली तर तिला गरोदरपणासाठी किंवा बाळंतपणासाठी मिळणाऱ्या भरपगारी रजेबद्दल इतरांना कुरकूर करायला वाव नाही, हे कळून येते. तिच्याबद्दलच्या सहानुभूतिपोटी तिला घरकामात मदत करण्यात कमीपणा वाटण्यापेक्षा अशी मदत करणे हे आपले घरासंबंधीचे कर्तव्यच आहे, ही जाणीवही पुरुषांना होऊ शकेल. एकमेकांच्या सहकार्याने घरातली कामे करण्यामध्ये अधिक आपुलकी व एकमेकांबद्दलचा जिव्हाळा व विश्वास जपला जाईल.

घरकामे करायला पुरुषांना कमीपणा वाटतो. ती बायकांची कामे आहेत ही मानसिक घडण बदलायला पाहिजे. घराच्या स्वास्थ्यासाठी आपण अर्थार्जन करीत असतो. मुलांवर संस्कार करणे, त्यांना घडविणे या घराच्या जबाबदाऱ्या अर्थार्जनाने भागविता येतात. पण अर्थार्जन हे कारण आहे, साधन आहे, साध्य आहे. घरात मिळविता येणारे समाधान व त्यातून घडविता येणारी पुढची पिढी म्हणून वर्षानुवर्षे हे काम सांभाळणारी गृहिणी जर गरजेपोटी नोकरी करू लागली तर तिच्या कामातील आपला वाटा पुरुषांनी उचलावा, ही तिची अपेक्षा चूक नाही. हे कामही कष्टाचे असले तरी महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेतले तर घरकामात कमीपणा मानण्याची वृत्ती नाहीशी होईल.

नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या प्रश्नाचा विचार करताना, अशा सर्व बाजू लक्षात घेतल्या पाहिजेत. समाजाला त्याची जाण आणून दिली पाहिजे. समाज म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसते. आपणच असतो, आपल्यापासूनच अशा सुधारणांची, पटलेल्या विचारांची कार्यवाही सुरू झाली तर, नोकरी करणाऱ्या स्त्रीला काम करायला अधिक हुरूप येईल. घराबाहेरच्या क्षेत्रात इतर पुरुषांच्या सहवासात स्त्री वावरत असते. बरोबरीचे सहकारी व वरिष्ठ पुरुष अधिकारी यांच्याशी तिचे वागणे हाही पतीच्या घरातील इतर व्यक्तींच्या व समाजाच्या दृष्टीने वाद निर्माण होण्यासारखा विषय असतो. स्त्री-पुरुष या दोघांच्या वागण्यात लोकांच्या नजरेला खटकेल इतका मनमोकळेपणा येऊ न देणे व मैत्रीच्या नात्याची मर्यादाही विवाहित-अविवाहित स्त्रीनेच सांभाळणे अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा असते; कारण त्याचा परिणाम स्त्रीलाच अधिक त्रासदायक ठरतो. अशा प्रसंगी स्त्रीलाच आपल्या पतीचा विश्वास गमावला न जाण्याची काळजी घ्यायला पाहिजे. पतिपत्नी नात्यामधील विश्वास जपण्याची जबाबदारी स्त्री-पुरुष दोघांवरही असते; पण त्याबद्दल स्त्रीलाच नेहमी दोषी धरले जाते, हे वास्तव नोकरी करणाऱ्या स्त्रीने विसरता कामा नये. उलट तिच्या मनमोकळेपणाचा फायदा घेणाऱ्यांपासून व तिला व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली गैरवर्तनाच्या वाटेवर नेऊ पाहणाऱ्यांपासून तिनेच सावध राहायला पाहिजे. एखाद्या सहकाऱ्याशी मैत्री ठेवण्यापेक्षा त्याच्या पत्नीशीही ओळख करून मैत्री वाढविण्याने दोन्ही घरांमधील स्वास्थ्य व शांतता टिकविण्याचे श्रेय तिला मिळविता येईल. शेवटी स्त्री-पुरुष संबंध हा कोणत्याही क्षेत्रात वाद निर्माण करणारा ठरू शकतो. त्यासाठी आजच्या समाजाची व घरातील सर्वांचीच मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि एकमेकांबद्दलच्या विश्वासानेच नोकरी करणाऱ्या स्त्रीला घराचा आधार मिळविता येईल हेही विसरता कामा नये. 

सारांश

नोकरी करणारी स्त्री आज समाजाने मान्य केली आहे. पन्नास-साठ वर्षांपूर्वी नोकरीसाठी स्त्रिया इतक्या संख्येने घराबाहेर पडत नसत. मात्र ही वस्तुस्थिती फक्त मध्यमवर्गीय स्त्रीबद्दलच आहे. कष्टकरी स्त्री नेहमीच घराबाहेरच्या कामातून अर्थार्जन करीत आलेली आहे. तिचे कामाचे स्वरूप व तिचे वेतन हे पुरुषाच्या तुलनेत कमीच होते. मूल सांभाळण्याची जबाबदारीही ती नोकरी करीत असून पार पाडत होती आणि आजही तिच्या या स्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही व ती त्याबद्दल फारशी जागरूकही नाही. मध्यमवर्गीय स्त्रिया कुणाच्या तरी हाताखाली काम करता करता आता महत्त्वाच्या व वरिष्ठ पदाच्या जबाबदाऱ्याही हुशारीने पार पाडू लागल्या आहेत. मात्र, समाजात व घरात त्यांच्याकडे कौतुकाने व अभिमानाने पाहण्यापेक्षा कुचेष्टेने व मेहेरबानीच्या नजरेने पाहिले जाते.

नोकरी करणाऱ्या स्त्रीला घराची, मुलाबाळांची व पतीची जाणीव लक्षात घ्यावी लागते. बदली स्वीकारताना यांचा अग्रक्रमाने विचार करावा लागतो. स्वत:ची शारीरिक व नैतिक सुरक्षितता आणि सामाजिक समज लक्षात घ्यावे लागतात. स्त्री नोकरीसाठी घराबाहेर पडल्यामुळे मुलांचे व कुटुंबसंस्थेचे जे नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्यांची सोडवणूक करण्यासाठी पतीने व घरातील इतरांनी तिला मदत करणे आवश्यक आहे. घरी पतीचा विश्वास व नोकरीच्या वा अन्य ठिकाणी पुरुषवर्गाशी मैत्री याचे तारतम्य तिला ठेवावे लागते.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: