Friday, 6 November 2020

Marathi Essay on "Indian Family System", "बदलती भारतीय कुटुंब व्यवस्था मराठी निबंध", "Bhartiya Kutumb Vyavastha Marathi Nibandh" for Students

Essay on Indian Family System in Marathi Language: In this article "बदलती भारतीय कुटुंब व्यवस्था मराठी निबंध", "Bhartiya Kutumb Vyavastha Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Indian Family System", "बदलती भारतीय कुटुंब व्यवस्था मराठी निबंध", "Bhartiya Kutumb Vyavastha Marathi Nibandh" for Students

कुणी घर देतंय का घर?' हा प्रश्न 'नटसम्राट'मधील बेलवलकरांसारखा नटसम्राट जेव्हा रस्तोरस्ती विचारत फिरतो तेव्हा प्रेक्षकवर्ग अस्वस्थ होतो; कारण घर हे माणसाचे निवासस्थान असते; त्याचे आधारस्थान असते. या घरातच त्याला सर्व प्रकारच्या भावनिक, शारीरिक, बौद्धिक किंवा अन्य पातळ्यांवरचा विश्वास मिळत असतो. थकलेल्या मनाचे सांत्वन करून त्याला उत्साह देण्याचे कार्य घरातील जवळची माणसे करीत असतात. केलेल्या कार्याचे व मिळविलेल्या यशाचे खरेखुरे कौतुक घरातील आईवडील व वडीलधारी माणसे करीत असतात; म्हणून व्यक्तीचा विकास लहानपणापासून ते थेट वृद्धत्वापर्यंत याच 'घर' नावाच्या छपराखाली होत असतो. घर म्हणजे त्यातील माणसे. रक्ताच्या व मानवी नात्याने जोडलेली व विकसित होणारी कुटुंबव्यवस्था या घराच्या सावलीत फोफावत आलेली आहे. घर असावे घरासारखे, नकोत केवळ भिंती' असे म्हणण्यामागे घराच्या भिंती बंधनकारक नसतात; तर निवारा देणाऱ्या असतात. निरांजनातील ज्योतीला जसा वादळवाऱ्यापासून वाचविण्यासाठी आडोसा लागतो, तसा आडोसा या कुटुंबाच्या नात्याच्या मजबूत भिंती देत असतात. हे कार्य प्रत्येक काळातील व प्रत्येक प्रदेशातील कुटुंबव्यवस्था करीत आलेली आहे. मग तो देश प्रगत देश असो किंवा डोंगरकपाऱ्यांतील आदिवासींचा प्रदेश असो. कुटुंबातील व्यक्तींची संख्या कमीजास्त असेल, नात्यांमध्ये जवळ-दूरचे हा प्रकारही असेल, पण तरीही ती 'कुटुंबे' असतात. समाज अशा कुटुंबांनी बनलेला असतो. 

पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धती बदलून आधुनिक काळामध्ये विभक्त कुटुंबपद्धती गरज म्हणून स्थिरावली. वाढते शहरीकरण, नोकरी-धंदा-व्यवसायाचे बदलते स्वरूप, यांत्रिक युगातील कारखानदारी इत्यादी घटकांमुळे 'हम दो हमारे दो ।' असे सुटसुटीत कुटुंब सोयीचे ठरू लागले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच या विभक्त कुटुंबाची पायाभरणी होऊ लागली. खेड्यातून शहराकडे उपजीविकेचा हेतू मनात धरून येणारा मध्यमवर्गीय चाकरमान्या प्रथम एकटाच येऊ लागला; मग कुटुंब आणू लागला. सुटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांची ही कुटुंबे आपल्या खेडेगावातील एकत्र कुटुंबामध्ये काही काळ एकत्र येऊ लागली. 'वाडा चिरेबंदी' (एलकुंचवार) या नाटकात खेडेगावातील 'वाडा' पद्धतीमध्ये हे नातेवाइकांचे नातेसंबंध कशा प्रकारचे नाजूक पण चिवट असतात, याचे चित्रण आलेले आहे. एकत्र कुटुंबामध्ये आजोबा-आजी, चुलते-चुलत्या, आत्या-मावश्या अशा साठसत्तर नातेवाइकांचे एकत्रित कुटुंब नांदत असे. त्यामध्ये कर्तेपण वडिलधाऱ्या आजोबांकडे (कधी कधी पणजोबांकडेही) असे. घरातील तंटे-बखेडे, कुरबुरी यांचा सलोख्याने व सामोपचाराने निवाडा करण्याची क्षमता असलेल्या वडिलधाऱ्या नेतृत्वामुळे आपोआपच सामंजस्य, एकमेकांशी जुळवून घेणे, मोठ्यांचा आदर ठेवणे इत्यादी गुणांची जोपासना होत असे. शेतीच्या किंवा मोठ्या प्रमाणातील व्यापार-उदिमाच्या दृष्टीने अशी एकत्र कुटुंबात माणसे एकत्र येण्यामागे विश्वासार्हता जपली जात असे; पण काळानुसार, बदलत्या जीवनमानानुसार विभक्त कुटुंबपद्धतीचा विकास होऊ लागला. मोठ्या कुटुंबातील शिस्त, कर्तव्याची जाणीव, एकमेकांबद्दलचा जिव्हाळा व माणुसकीची शिकवण विभक्त कुटुंबात कमी होऊ लागली. मुख्य म्हणजे एकत्र कुटुंबात लहान मुलांचा व वृद्ध माणसांचा प्रश्न उद्भवत नव्हता. विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये लहान मुलांवर संस्कार करण्याचे कार्य करणारी आजी-आजोबांसारखी वडीलधारी माणसे दुर्मिळ होत चालल्याने व महिलावर्ग नोकरीकडे वळल्याने बालवाडीची, अंगणवाडीची, पाळणाघराची सोय उपलब्ध करण्याची आवश्यकता निर्माण झाली. तसेच शहरातील छोट्या जागा, चाळीमधल्या खोल्या किंवा सोसायटीमधील सदनिका या मोठ्या कुटुंबांचा भार पेलण्याइतक्या ऐसपैस घेण्याची आर्थिक कुवत तरुण पिढीजवळ नसल्याने वृद्धाश्रमाची सोय करण्याची गरजही समाजात निर्माण झाली.

विभक्त कुटुंबपद्धतीच्या वाढत्या पसाऱ्यामध्ये पाळणाघराप्रमाणेच वृद्धाश्रमाची गरज ही भावनिक पातळीवर मध्यमवर्गीयांची कुचंबणा करणारी असली तरी बदलत्या आर्थिक-व्यावहारिक पातळीवर ती अपरिहार्य ठरत आहे. त्यांच्यामध्ये अधिकाधिक सुधारणा, स्वच्छता, तेथील शिक्षकवर्ग यांबद्दल नोकरी करणाऱ्या आईवडिलांनी जागरूकता दाखवून सोयी करून घेणे आवश्यक ठरते. तीच गोष्ट घरातील वृद्ध वडिलधाऱ्यांबद्दल. त्यांचे घरातले अस्तित्व भावनिक पातळीवर कितीही हवेसे वाटले तरी व्यावहारिक अडचणीवर मात करता येत असेल, तरच ते वृद्धांना व तरुण पिढीला परवडू शकते. सध्या तरी आजोबा-आजींची भूमिका नातवंडांना सांभाळण्यासाठी ज्या घरातून होऊ शकते, तिथे वृद्धांचा व मुलांचा प्रश्न समजुतीने सुटू शकतो; पण त्यामध्ये व्यक्तिगत सामंजस्याचा भाग अधिक येतो. 

अव्वल इंग्रजी काळापासून भारतीय जीवनात आमूलाग्र बदल होऊ लागला. देवधर्म, सणवार, व्रतवैकल्ये यांचे महत्त्व कमी होऊन शिक्षण, लौकिक जीवनावश्यकता, यंत्रांनी निर्माण केलेल्या सोयीसुविधा इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. व्यक्तिस्वातंत्र्य व बुद्धिवाद या गोष्टींना अधिक महत्त्व येऊ लागले. त्याचाही परिणाम विभक्त कुटुंबपद्धतीला पोषक वातावरण निर्माण करण्याला कारणीभूत ठरला. बुद्धिनिष्ठता, तर्कसंगती व सामूहिकतेपेक्षा व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेली विचारसरणी मध्यमवर्गीयांच्या मनावर ठसत चालल्याने दोन पिढ्यांमधील वैचारिक अंतर वाढत चालले. त्यातच स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीशिक्षण, स्त्रीसुधारणा, स्त्रीजागृती यांच्याद्वारा 'स्त्री'चा एक व्यक्ती म्हणून विकास होऊ लागल्याने एकत्र कुटुंबव्यवस्थेत स्त्रीकडे येणारी दुय्यम भूमिका सुशिक्षित स्त्रीने नाकारली. आर्थिक पातळीवर स्त्रीच्या मदतीची गरज वाढत चालल्याने नोकरीसाठी किंवा करियरच्या उद्देशाने विकास पावू इच्छिणारी स्त्रीही विभक्त कुटुंबाकडे झुकणे स्वाभाविक ठरले. महागाई, शिक्षण, कुटुंबपोषण इत्यादी आर्थिक बाबी एकाच्या पगारात भागेनाशा झाल्या; म्हणून स्त्रीच्या नोकरीची गरज मध्यमवर्गीयांना आवश्यक ठरली. शिक्षण घेतलेल्या स्त्रीची नोकरी, व्यवसाय किंवा लघुउद्योजकता यांसारख्या गोष्टींमुळे कुटुंबातील स्त्रीचे स्थान उंचावले. तिचे महत्त्व मानण्याची स्थिती कुटुंबव्यवस्थेने लक्षात घेतली; आणि मुख्य म्हणजे पूर्वीच्या पुरुषांवर आधारलेल्या एकखांबी तंबूची कल्पना बदलावी लागली. विभक्त कुटुंबांची ध्येयधोरणे व अंदाजपत्रक यांविषयी दोघांच्या एकत्रित विचाराने निर्णय घेण्याची सवय आधुनिक कुटुंबपद्धतीला लावून घ्यावी लागली. अडीनडीच्या प्रसंगी पुरुषवर्ग कुटुंबाची जबाबदारी उचलायला दुबळा ठरत असेल तर त्या कुटुंबात घरातील स्त्रीकडे कर्तेपण प्रथमपासूनच असल्याने अशी कुटुंबे व त्यांची पुढची पिढी उद्ध्वस्त होण्याचे प्रसंग कमी येऊ लागले. मात्र आपल्यापेक्षा कर्तबगार स्त्री पत्नी म्हणून व्हायला पुरुषांचीच नव्हे तर कुटुंबातील वृद्ध स्त्रीचीही सहजपणे तयारी होत नाही! त्यामुळे येणारे तंटे-बखेडे टाळण्याची गरज निर्माण होते.

एकत्र किंवा विभक्त कुटुंबपद्धतींपैकी एक चांगली व दुसरी वाईट असे म्हणता येत नाही. प्रत्येक पद्धतीमध्ये चांगले-वाईटपण असते. मुख्य म्हणजे या दोन्ही पद्धतींमध्ये कालप्रवाहाशी तडजोड करून व्यक्तीचे व्यक्तिजीवन व सामूहिक जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न सातत्याने नजरेसमोर ठेवलेला असतो. एकत्र कुटुंबपद्धती ही एक प्रकारे सामाजिक संस्थेचे छोटे रूपच असते. कोणत्याही सामाजिक संस्थेत जसे सर्व प्रकारचे सदस्य समाविष्ट झालेले असतात तसेच एकत्र कुटुंबामध्ये सर्व प्रकारची माणसे नातेसंबंधांनी एकमेकांशी बांधलेली असतात. 'मोठे मासे नेहमीच छोट्या माशांना गिळतात' हा निसर्गाचा न्याय कुटुंबसंस्थेत नसतो. उलट छोट्या माशांना सशक्त बनविणे व मोठ्या माशांनी त्यांना संरक्षण व संस्कृतीचे संस्कार देऊन मानव म्हणून घडविणे हे कार्य केले जात असते. हेच कार्य विभक्त कुटुंबामध्ये फक्त आपल्या मुलांपुरते मर्यादित स्वरूपात केले जाते. एकत्र कुटुंबामध्ये कलावंत, तत्त्वज्ञानी व्यक्ती कमी मिळकत आणत असली तरी संसाराच्या प्रवाहात राहू शकते; पण विभक्त कुटुंबामध्ये प्रत्येकाला आपापले अर्थार्जन स्वकष्टाने करणे आवश्यक असते. पण अनेक निरुद्योगी व आळशी माणसे नात्याच्या आधारावर एकत्र कुटुंबामध्ये सुखेनैव राहू शकतात. तशी सोय विभक्त कुटुंबात मिळत नसते.

विभक्त कुटुंबामध्ये भावाभावाचे नाते महत्त्वाचे ठरण्यापेक्षा त्यांची आर्थिक पातळी भोजली जाते. आधुनिक जीवनात तर नातेसंबंधांपेक्षा पैशाला व प्रतिष्ठेला अधिक महत्त्व येत चालले आहे. आजच्या शिक्षणामध्ये संस्कार शिकविण्याची गरज त्यामुळेच निर्माण झालेली आहे. यांत्रिक सुविधा चैनीच्या न राहता गरजेच्या झाल्याने कुटुंबातील प्रमुख व्यक्ती त्यासाठी धडपड करताना पतिपत्नी व मुलेबाळे यांच्या सहवासाकडे दुर्लक्ष करीत आहेत. आपल्या मुलांवर संस्कार करण्यापेक्षा केवळ प्रेम करण्याच्या वृत्तीमुळे त्यांना चैनीची चटक तर लावली जात नाही ना? याची काळजी पालकांना जाणवायला लागली आहे. मुलांचे बाल्य दूरदर्शन किंवा संगणक यांसारख्या यंत्रांच्या किंवा नोकरांच्या सहवासात जाऊ नये, यासाठी हे जागरूक पालक समानधर्मी मित्रमैत्रिणींशी भावाबहिणीसारखे नाते जुळवू पाहत आहेत. अशी समवयस्क व समान संस्कारांवर श्रद्धा ठेवणारी कुटुंबे एकत्र येऊन मुलांचे व आपले एकटेपण, एकाकीपण दूर करतात. नव्हे, तसे करण्याची गरज आज भासू लागली आहे.

कुटुंबसंस्थेचा निकटचा संबंध लग्नसंस्थेशी असतो. पूर्वीच्या काळी वर-वधू संशोधनाचे कार्य घरातील वडिलधारी माणसे करीत असत. आज ते कार्य करण्यासाठी अनेक मंडळे स्थापन झालेली दिसतात. या मंडळांचा हेतू केवळ माहिती पुरविणे एवढाच असेल तर विवाहसंस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण या संस्थांनी विस्कळीत होणारे, घटस्फोटाच्या भोज्याकडे वळणारे संसार सावरण्यासाठी कौन्सिलिंग करण्याचे कामही करण्याची गरज आहे. छोट्या-मोठ्या कारणांनी पति-पत्नीमध्ये होणारे बेबनाव टाळण्यासाठी जर योग्य त-हेने प्रयत्न झाले तर पुढच्या पिढीच्या स्वास्थ्यासाठी व निकोप वाढीसाठी आवश्यक असलेले आई-वडील या दोघांचे सान्निध्य व प्रेम त्यांना मिळू शकेल. आजच्या कुटुंबसंस्थेसमोरचा धोका टाळण्यासाठी त्यांना समजुतीचे चार शब्द अधिकाराने ऐकायला लावण्यासाठी अशा माणसांची व संस्थांची गरज आहे.

पूर्वीच्या एकत्र कुटुंबामध्ये आजी-आजोबा, आई-वडील व मुले अशी तीन वयोगटांची माणसे सामान्यतः एकत्र जीवन जगत असत. आज फक्त आई-वडील व मुले अशा दोन पिढ्यांचाच एकमेकांशी संबंध येत राहतो. त्यातही एक किंवा दोन मुलेच असलेल्या कुटुंबामध्ये मुलांवरच्या संस्कारांबद्दल, जडणघडणीबद्दल, त्यांच्या करियरबद्दल, एवढेच कशाला त्यांना 'जॅक आफै ऑल' बनवायचे की 'मास्टर ऑफ वन्' बनवायचे याबद्दलही आई-वडिलांचे विचार भिन्न असतात. जगाच्या स्पर्धेच्या वातावरणात आपली मुले कशी टिकतील व स्वत:चा ठसा एखाद्या क्षेत्रावर उमटून आर्थिक दृष्टीने कशी प्रतिष्ठित होतील, याचे विचार आई-वडील करीत असतात. त्यांच्यात असलेल्या मतभेदांमुळेही आधीच अत्यंत हुशार-चिकित्सक-संवेदनशील असलेला आजचा पाल्यवर्ग वेगळ्या त-हेने विचार करू लागतो. कधी कधी आई-वडिलांशी त्यांचे विचार जुळत नाहीत; त्यामुळे बालपणापासूनच त्यांच्यासमोर नेमके आदर्श उभे राहिलेले नसतात. अशा वेळी बालजीवन जाणणारे व मुलांचे विकसनशील वय लक्षात घेणारे विचारवंत पालकांना त्यांच्या पालकत्वाची जाणीव करून देण्यासाठी आवश्यक असतात. पूर्वीच्या काळी हे काम प्रगल्भ जाणीव व अनुभवाचे शहाणपण असलेली आजोबा-आजीची पिढी करून देऊ शकत असे. पाल्यांना कसे घडवावे, त्यांचा विकास कसा करावा, पाल्याशी कसे वागावे? (आणि मुख्य म्हणजे 'हे करू नकोस, ते करू नकोस' असे नकारार्थी मार्गदर्शन कसे देऊ नये!) याचे शिक्षण देण्याची गरज आज प्रकर्षाने जाणवत आहे. स्वत:च दूरदर्शनसमोर बसलेले पालक आपल्या मुलांना त्यावरच्या भडक चित्रणापासून कसे दूर राखू शकतील? मुलांवरती संस्कार करण्यासाठी आजचे पालक, नोकरीधंद्यामुळे जास्त वेळ देऊ शकत नसतील, तरी जो वेळ ते देऊ शकतील त्याचा प्रभाव मुलांवर पडत असतो, याचा विचार आजच्या कुटुंबव्यवस्थेमध्ये व्हायला पाहिजे.

आजच्या भारतीय कुटुंबव्यवस्थेसमोरचा आणखी एक प्रश्न लक्षात घ्यावा लागतो. सुशिक्षित घरातील तरुण पिढीला परदेशगमनाचे वेध लागले असल्याने व त्या देशांमध्ये त्यांच्या शिक्षणाचे नेमके मूल्यमापन होऊ लागले असल्याने अनेक कुटुंबांमध्ये लेक-सून-नातवंडे परदेशात व आई-वडील इथे एकटेपणाचे आयुष्य घालविताना दिसतात. मात्र, जुन्या काळापेक्षा हे आई-वडील आपल्याला वेगवेगळ्या छंदांमध्ये व व्यापांमध्ये गुतंवून घेऊ लागले आहेत. जग जवळ येत आहे आणि माणूस एकटेपणा अनुभवीत आहे, असे कौटुंबिक पातळीवरचे चित्र आज दिसत आहे.

शहरातील अपुऱ्या जागांमुळे अनेक मानसिक व शारीरिक व्याधींनी कुटुंबातील माणसाचे स्वास्थ्य बिघडविले जाते. त्याचा पतिपत्नीच्या व मुलांच्या जीवनावरही परिणाम होतो. आवाजाने होणारे प्रदूषण, वाढत्या रहदारीने मनाला येणारी व्यग्रता, प्रतिष्ठेची नवी नवी साधने (दूरध्वनी, कॅसेट्स, संगणक, दूरदर्शन, विविध वाहिन्या इत्यादी) या सगळ्यांनी आजच्या कुटुंबव्यवस्थेला वेगळे रूप आलेले आहे. संस्कारांपेक्षा, सद्शीलतेपेक्षा, माणुसकीपेक्षा व गुणवत्तेपेक्षा पैसा-प्रतिष्ठा-सत्ता-दिखाऊगिरी यांचा प्रभाव तर आपण टाळू शकत नाही; पण उगवत्या पिढीला संस्कारशीलता कशी मिळवावी हाही प्रश्न या कुटुंबासमोर आहे. एकीकडे जुन्या संस्कारातील स्वभावपरिपोषक घटक हवासा वाटत आहे आणि त्याबरोबरच नव्या, आधुनिक, मॉडर्न विचारसरणीच्या श्रीमंती वातावरणात ते संस्कार प्रतिगामी वाटत आहेत. या दुहेरी कात्रीतून सुटण्याची उपाययोजना शोधणे हा आजच्या कौटुंबिक जीवनासमोरचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जुने सण, व्रते, उपास, समारंभ यांना कालानुरूप नवे वळण देण्याचे ज्यांना जमले त्यांची कोंडी कमी होत आहे.

पोशाख व फॅशन्स याचा प्रभावही कुटुंबव्यवस्थेत काही प्रश्न उपस्थित करू लागला आहे. नोकरी करणाऱ्या किंवा एकंदरीतच मध्यमवयीन महाराष्ट्रीयन स्त्रीचा पोशाख भारतीय पातळीवर समान होत आहे. ही गोष्ट चांगली आहे; पण आपण जास्तीत जास्त पोशाखी होत आहोत, फॅशन्सच्या आहारी जात आहोत आणि अधिकाधिक तरुण व सेक्सी दिसण्याचा प्रयत्न करीत आहोत, हे कुटुंबव्यवस्थेतील नीतिमत्तेला घातक ठरणारे आहे. समाजातील स्त्री-पुरुष-मैत्री हीसुद्धा कुटुंबातील नवे नाते जपणारी असावी, ही जाणीव ठेवणारी असायला पाहिजे.

पूर्वी विवाहाने दोन कुटुंबे जोडली जात असत. आज विवाहाने दोन माणसे जोडली जाताना दिसतात. कुटुंबव्यवस्थेचे स्वरूप ज्या विवाहावर अवलंबून असते त्याच्यामध्येच असा वेगळा व आमूलाग्र बदल होत चालल्याने कुटुंबसंस्था वेगळे रूप धारण करू लागली तर त्यात नवल नाही. विवाहाकडे बघण्याची आजची दृष्टी नैतिक किंवा धार्मिक नसून कायद्याकडे झुकलेली आहे. हे पूर्णतया वाईट आहे असे मात्र नव्हे. मानवी स्वभावातील हक्काची व अधिकार गाजविण्याची प्रवृत्ती पूर्वीच्या विवाहपद्धतीत किती त्रासदायक होती, याची जाणीव झाल्यानेच विवाह म्हणजे दोन व्यक्तींमधील 'करार' असे स्वरूप त्याला आले आहे; पण त्यामुळे कुटुंबव्यवस्थेतील स्थैर्याला धक्का पोहोचतो हे विसरून चालणार नाही. विवाहबंधन, कुटुंबसंस्था या माणसाने सुखाने जगण्यासाठी शोधलेले सोपे मार्ग आहेत. एकमेकांच्या विश्वासाचा हात धरून पृथ्वीवरतीच स्वर्गसुख निर्माण करण्याचा तो सोपा मार्ग आहे; म्हणूनच वेळोवेळी विवाहसंस्थेचे आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबसंस्थेचे स्वरूप बदलते असले, तरी मानवी सुसंस्कृती जपण्याचे त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. विवाहामध्ये स्त्री-पुरुष संबंधांचा केवळ लैंगिक वा केवळ भावनात्मक पातळीवर विचार केलेला नसतो. स्त्री-पुरुषामधील आकर्षणाला प्रेमाची बैठक व नीतीचे अधिष्ठान देऊन त्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न प्रत्येक काळात केला जातो; कारण त्यामागे नंतरच्या पिढ्यानपिढ्यांचे संचित जतन करण्याची मानवी दृष्टी असते. भारतीय कुटुंबसंस्थेची आजच्या काळातील परिस्थिती कितीही बदलती व काहीशी अस्थिर असली तरी तिला अजून तरी हे व्यापक भान आहे. 

सारांश

बदलती कुटुंबव्यवस्था ही बदलत्या समाजव्यवस्थेचा पाया असतो. कुटुंबव्यवस्थेचा संबंध 'घर'या कल्पनेशी असतो. आजचे हे घर विभक्त कुटुंबव्यवस्थेचे अनुसरण करणारे म्हणजे पति-पत्नी व मुले यांच्यापुरतेच समजले जाणे ही काळाची व परिस्थितीची (विशेषतः आर्थिक) गरज आहे. शहरीकरणाचा तो अपरिहार्य परिणाम आहे. पण त्यामुळे ग्रामीण जीवनातून आलेला विविध नातेसंबंध जपण्याचा संस्कार भारतीय कुटुंबात अजूनही कायम आहे. सणावाराला महत्त्व देऊन हे नातेसबंध आपण अजूनही जपत आलो आहोत. स्त्रीशिक्षण-स्त्रीजागृती यामुळे कुटुंबामध्ये पूर्वीची ‘एकखांबी तंबू' म्हणजे केवळ पुरुषांवर अवलंबून असलेली एक कुटुंबपद्धती बदलली आणि स्त्रीलाही कुटुंबव्यवस्थेत आर्थिक व व्यावहारिक दृष्टीने जबाबदारी पेलता आली. पाळणाघर व वृद्धाश्रम या संस्थांची गरज निर्माण झाली; पण त्या मनाने स्वीकारण्याची व त्या संस्था सामाजिक दृष्टीने निकोप करण्याची प्रवृत्ती अजून समाजात वाढीला लागली नाही. आजचे विवाह हे दोन व्यक्तींच्या नातेसंबंधांवर आधारलेले असतात; त्यामुळे वाढत्या बेबनावावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने स्त्री-पुरुषामध्ये सामंजस्य आणण्यासाठी व मुळातच विवाह जुळविण्यासाठी संस्थात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींची निकड आहे. आजी-आजोबा व नातवंडे यांचा एकमेकांना मिळणारा सहवास कुटुंबाच्या दृष्टीने संस्कार देणारा होता; पण आज तो संस्कार कमी होत आहे. पति-पत्नींनी आपल्या मतभेदांनी आपल्या मुलामुलींचे जीवन आपण अस्थिर करीत नाही ना, ही काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. यांत्रिक प्रगतीचे परिणामही लौकिक पातळीवर जीवनात सोयीसुविधा आणत असले तरी मानसिक स्वास्थ्य व सांसारिक समाधान देण्यात किती यशस्वी होत आहेत, हा प्रश्नही सोडवायला पाहिजे; आणि मुख्य म्हणजे भावी पिढीला या स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी 'घडविताना' त्यांच्यामध्ये द्वेष, मत्सर हे वाढीला लागत आहेत, ते दूर करायला पाहिजेत. मानवता, दया, शिस्तपालन, निर्भयता इत्यादी वैशिष्ट्यांचे संस्कार त्यांच्यावर कुटुंबसंस्थेत व्हायला पाहिजेत, त्याच्या जोडीला कष्ट करण्याची सवय व बौद्धिक विकास याची समज कुटुंबातील मोठ्यांनी द्यायला पाहिजे; कारण त्यांच्यावरतीच समाजजीवनाची मूल्ये अवलंबून असतात.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: