Sunday, 1 November 2020

Marathi Essay on "Middle Class of India", "भारतीय समाजातील मध्यमवर्ग मराठी निबंध for Students

Essay on Middle Class in Marathi Language: In this article "भारतीय समाजातील मध्यमवर्ग मराठी निबंध", "Bhartiya Samajatil Madhyam Varg Marathi Essay" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Middle Class of India", "भारतीय समाजातील मध्यमवर्ग मराठी निबंध for Students

इंग्रजांच्या राजवटीचे अनेक परिणाम भारतीय समाजावर व जीवनव्यवस्थेवर झालेले दिसून येतात. सामान्यतः पारतंत्र्यपूर्व काळातील भारतीय, महाराष्ट्रीय समाज खेड्यामध्ये राहणारा अधिक प्रमाणात होता. शहर ही कल्पनाही, आजच्या यंत्रयुगाने जशी शहरे निर्माण केली आहेत, त्यापेक्षा वेगळी होती. हे खेडेगावही आजच्याइतके शहराकडे डोळे लावून बसलेले नव्हते. सामान्यत: खेडे किंवा शहर स्वयंपूर्ण असण्याकडे कल होता. दळणवळणाची साधने आजच्यासारखी व आजच्याइतकी गतिमान नसल्याने जवळजवळच्या खेड्यांमध्ये जो काही संपर्क असे, त्याला व्यापार-उदिमाच्या दृष्टीने महत्त्व असे. प्रसारमाध्यमे, अधिक करून मौखिक परंपरेतील म्हणजे कीर्तने, गोंधळी, भारुडे, देवाच्या यात्रा-जत्रांमधील विविध करमणुकीची साधने अशा प्रकारचीच होती.

ब्रिटिश राज्यकर्त्यांनी यंत्रयुगाने आणलेल्या सुधारणा झपाट्याने भारतामध्ये आल्या. रेल्वे-तारायंत्रे भारतात आली. दळण-वळणाच्या सुविधा निर्माण झाल्या. मुद्रणकलेचाही विकास घडून आला. शैक्षणिक वेगळेपणाने ब्रिटिशांनी आपल्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने जो सुशिक्षित वर्ग निर्माण केला, त्याची पूर्वीच्या काळी गरज नव्हती. प्रामुख्याने या वर्गाचा भर बौद्धिक पातळीकडे होता. आर्थिक दृष्टीनेही हा वर्ग जसा फारसा धनिकांच्या गटातला नव्हता, तसाच शारीरिक दृष्टीनेही काबाडकष्ट करून अर्थार्जन करण्याकडे याचा फारसा कल नव्हता. हा 'मध्यमवर्ग किंवा पांढरपेशा वर्ग' म्हणून ओळखला जाणारा समाजातला घटक इंग्रजांच्या काळात निर्माण झाला. इंग्रजी शिक्षणातून त्याने संस्कार घेतले. प्रामुख्याने नोकरी हा त्याचा जीवनभरचा उद्योग ठरून गेला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून हा वर्ग कुठे ना कुठे नोकरीमध्ये चिकटून गेला की आयुष्यभर इमानेइतबारे एक तारखेच्या पगाराकडे लक्ष, ठराविक वेतन, वेतनवाढ, पेन्शन या आर्थिक स्थिरतेवर तो आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असे. व्यापार, साहस, आर्थिक क्षमता वाढविणे आणि त्यासाठी काही भलेबुरे मार्ग अनुसरणे ही त्याची प्रवृत्ती नव्हती. हा ब्रिटिशांच्या समाजजाणिवेतून निर्माण झालेला मध्यमवर्ग अत्यंत गरीब, कष्ट करून उपजीविका करणाऱ्या वर्गापेक्षा स्वतः बौद्धिक कष्ट करून, 'टेबलवर्क' करून काम करणारा म्हणून वरच्या दर्जाचा समजला जात असे. तसेच समाजातील अत्यंत सधन वर्गाबद्दल त्याला असूया असली तरी त्याच्यापेक्षा आपण अधिक सुसंस्कृत, सदाचाराचे पालन करणारे व समाजसंस्कृतीचे रक्षक आहोत, म्हणून स्वत:ला तो त्याच्यापेक्षा वेगळा व काहीसा श्रेष्ठही समजत असे; आणि या दोन्ही वर्गांवर काही प्रमाणात मध्यमवर्गाने आपला दरारा व अंकुश निर्माणही केला होता, उदाहरण द्यायचे तर, इतिहासकार राजवाडेंनी आपल्या इतिहास-संशोधनाच्या कार्यासाठी एका मोठ्या संस्थानिकाकडे मदत मागितली होती. संस्थानिकाने थोडी नाखुशी दर्शविताच राजवाडेंनी संस्थानिकाच्या चैनीचा उल्लेख करून संस्थानिकाला वठणीवर आणले. संस्थानिकाच्या मनातील सद्भाव जागृत करण्याचे कार्य मध्यमवर्गीय वृत्तीचे संशोधक करू शकत होते. आज हे कार्य करण्याचे किंवा सत्ताधीशाला असे अधिकाराने विचारण्याची हिंमत कुणी दाखवू शकणार नाही. यावरून तत्कालीन कालखंडातील मध्यमवर्गीय समाजाचा सर्व समाजावर असलेला दरारा लक्षात येतो. हा धाक त्याने शारीरिक बळाचा वापर करून मिळविलेला नसतो; तसाच पैशाच्या जोरावरही विकत घेतलेला नसतो. त्याच्या नि:स्पृह, तात्त्विक उच्च विचारसरणीने त्याला हा अधिकार मिळालेला असतो. आज अशा उच्च विचारसरणीचा अभाव आहे असे नाही; पण हा वर्ग तेव्हा जसा संघटित होता तसा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये संघटित राहिलेला नाही.

अव्वल इंग्रजी कालखंडापासून या वर्गाची उभारणी होऊ लागली. हातातली सत्ता व हत्यार गेलेल्या मराठी माणसाने सुशिक्षित होण्याकडे लक्ष दिले. वर्तमानपत्रे, साप्ताहिके, नियतकालिके, ग्रंथ इत्यादी मार्गांनी त्यांनी समाज-प्रबोधनाची वाट अंगीकारली. मिशनरींनी समाजात हिंदू समाजाबद्दल जे चित्र उभे केले होते व त्याद्वारा धर्मातराचा उपाय सुचविला होता त्यावर हल्ला करणे, आपला धर्म कसा उच्च-उदात्त आहे हे सिद्ध करणे, त्याचा प्रसार करणे हे कार्य या काळातील लेखन-व्याख्याने यांच्या पाठीशी होते.हिंदू धर्मातील जातिभेदामुळे होणारा अन्याय दूर करणे व स्पृश्यास्पृश्यतेमुळे, दारिद्र्यामुळे, भुकेपोटी धर्मातराच्या आहारी जाणारा समाज फुटू न देणे या उद्देशाने बदलत्या प्रसारमाध्यमांचा फायदा घेऊन दर्पण, प्रभाकर इत्यादी वृत्तपत्रे पुढे आली; 'पण लक्षात कोण घेतो?' 'विमलेची गृहदशा' इत्यादी कादंबऱ्या लिहिल्या गेल्या व राजा राममोहन रॉय, लोकहितवादी यांसारखे अनेक सुधारक या मध्यमवर्गातूनच पुढे सरसावले. महात्मा फुले, सुधारक आगरकर, पंडिता रमाबाई, धोंडो केशव कर्वे आदींनी स्त्री-शिक्षणाच्या कार्यात पुढाकार घेतला. सामाजिक, सांस्कृतिक चळवळींप्रमाणे राजकीय चळवळीचे नेतृत्वही याच वर्गातील माणसांनी केले. राष्ट्रीय सभेच्या टिळक युगातील आणि गांधी युगातील बहुतांश नेते मध्यमवर्गातूनच पुढे आले होते. 

ही नेतृत्वाची भूमिका मध्यमवर्गाला त्याच्या ज्या गुणविशेषांनी मिळाली होती, ते गुणविशेष नंतर कमी होऊ लागले. स्वार्थपरायणता, भेकडपणा, अंगचोर वृत्ती यांमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास कष्टकरी वर्गाच्या सकस नेतृत्वासमोर मध्यमवर्ग मागे पडू लागला. गंगाधर गाडगिळांच्या कथांमधून व मढेकरांच्या कवितांमधून मध्यमवर्गाच्या या घसरणीचे चित्रण केले आहे आणि त्यावर त्यांनी टीकाही केली आहे. यंत्रयुगाच्या उदयाने ज्या मध्यमवर्गाच्या जाणिवा समाजाला नेतृत्व देत होत्या त्या यंत्रयुगानेच (भारतापुरते तरी), माणसाचे स्थान नगण्य व दुर्लक्षित होऊ लागले होते. माणुसकीऐवजी, 'तू एक मुंगी, मी एक मुंगी ।' अशी केवळ कुणातरी स्वधन्यांची कोठारे भरण्याची वृत्ती सर्व समाजात प्रभाव गाजवीत होती. मध्यमवर्गाने ज्या गरीब-श्रीमंतादी सर्वच समाजाच्या नेतृत्वाचा भार सहजपणे पेलला होता, त्यांपैकी गरीब वर्गातून त्या जीवनातील दुःखाची नस ओळखणारे नेतृत्व उभे राहू लागले होते. 'दणकट दंडस्नायू जैसे । पोलादाचे वळले साग ।' असे शारीरिक कष्टाची प्रतिष्ठा मानणारे नेतृत्व 'नव्या मनूतील गिरिधर पुतळा' (मकर) म्हणून स्वागत होण्याइतके जोरकस होऊ लागले होते. शारीरिक कष्टाची यंत्रयुगामध्ये होणारी गळचेपी व कामे यंत्राच्या अधीन होऊ लागल्याने, मनुष्यबळाची होणारी उपेक्षा व वाढती बेकारी यांच्या प्रक्षोभातून हा कष्टकरी-वर्ग श्रमप्रतिष्ठा जपण्यासाठी एकत्र येऊ लागला होता. कामकरी-शेतकरी संघटनांचे वाढते बळ हे त्याचे प्रतीक होते.

यंत्रयुगाने व वाढत्या विज्ञानशोधाने यंत्राकडून कामे होऊ लागल्यावर वाढती बेकारी दूर करण्याचा उपाय मध्यमवर्गासारख्या केवळ बुद्धिजीवी श्रमावर जगणाऱ्या तरुणांजवळ उरलेला नव्हता. शारीरिक पातळीवरचे कष्ट करण्याची त्यांची कुवत नव्हती आणि त्यामध्ये त्यांची प्रतिष्ठा दुखावली जात होती. हातगाडीवाले, कापडविक्रेते, हमाल, छोटे-छोटे व्यावसायिक, घरगुती उद्योगाला पोषक असे धंदे हे सगळे शारीरिक कष्टाचे असल्याने त्यांमध्ये टेबलासमोर बसून कामे करण्यापेक्षा जास्त वेतन शक्य असले तरी मध्यमवर्गाला ते कमी दर्जाचे वाटत होते. परिणामी, बेकारीचे संकट उलथून लावण्याचा कोणताही उपाय महाविद्यालयीन चाकोरीतून आलेल्या पदवीधारकांसमोर नव्हता. त्यातच १९४० च्या सुमारच्या दुसऱ्या महायुद्धाने तर त्यांच्यातील सर्व प्रकारच्या सद्प्रवृत्तींवर, मानवतेवर, करुणा, दया इत्यादी भावनांवरच हल्ला चढविला होता. ज्याच्या हाती सत्ता तोच काहीही अमानुषता करू शकतो; आणि सत्तेच्या स्पर्धेतून खेळल्या जाणाऱ्या युद्धातून फक्त सर्व समाजातील चांगुलपणा, संतत्व भरडून निघते. त्यामुळे माणुसकीच्या संगळ्याच चांगल्या भावनांचा -हास होतो. याचा या मध्यमवर्गीय समाजावर अनिष्ट परिणाम झाला. बेकारी, समाजमूल्यांची घसरण आणि अतीव बौद्धिक भूमिकेतून देवधर्मावरील श्रद्धेचा संभ्रम यांमुळे सैरभैर झालेल्या मध्यमवर्गाची घसरण थेट आर्थिक सत्ता व शासकीय सत्ता यांच्याकडे जाऊन पोहोचली असेल तर नवल नाही. केवळ सत्ता व आर्थिक सुबत्तेवरचे ऐहिक जीवन एवढ्याच गोष्टींना महत्त्व देण्याकडे त्याचा कल वाढला. याचा निषेध गंगाधर गाडगिळांच्या कथांमधून अत्यंत प्रभावीपणे झालेला आहे. प्रामुख्याने भेकडपणा, नाकर्तेपणा, पळपुटी-पलायनवादी वृत्ती, क्षुद्रपणा याची चीड त्यांच्या आणि पु. भा. भावेंच्या कथांतून जाणवते. उच्च विचारसरणी, साधी राहणी व मूल्यजतन-संवर्धन यांवर निष्ठा असलेला हा वर्ग दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष झळ न बसताही बदलला आणि नकळतपणे त्याची जागा नंतरच्या श्रमजीवी वर्गाने उचलली. शिरवाडकरांच्या 'नटसम्राट'मधील बेलवलकरांसारख्या वयोवृद्ध कलावंताला रस्त्यावरच्या मुलाकडून म्हातारपणी भावनिक आधार मिळतो, तो आधार उच्चभ्रू मध्यमवर्गीयांतील त्यांच्या प्रत्यक्ष मुलांकडून मिळू शकत नाही! हे याचेच प्रतीक आहे. 

सामान्यतः या काळात ज्या सामाजिक प्रश्नांचा विचार व पुरोगामी सक्रिय आचार केला गेला, त्यांचा बहुतांशी संबंध या मध्यमवर्गीय प्रश्नांशी होता. शिक्षण, स्त्रीजागृती, पुनर्विवाह, निराधार स्त्रीसाठी आधारकेंद्रे, स्त्रीशिक्षण तसेच पुरुषवर्गाला नोकरीची शाश्वती, शहरी वातावरणातील राहण्याच्या सोयी, व्यसनमुक्ती, वाचनाची व संस्काराची गरज इत्यादी अनेक प्रश्नांचा विचार मध्यमवर्गीयांच्या जीवनाशी जितका संबंधित आहे, तितका उरलेल्या दोन्ही वर्गांच्या जीवनाशी संबंधित नाही. वरिष्ठ व कनिष्ठ समाजस्तरांमध्ये विवाहाचे किंवा व्यसनाचे फारसे बंधन पाळले जात होतेच असे नाही. उदाहरण द्यायचे झाले तर पुनर्विवाहाचे देता येईल. मध्यमवर्गीय स्त्रीला पुनर्विवाह करताना समाजाचा रोष पत्करावा लागत होता; पण मोलकरीण मात्र पाट लावून आपला प्रश्न सोडवू शकत होती. शिक्षणाची दारे या वर्गासाठी फारच उशिरा उघडली गेली. वरिष्ठ वर्गालाही पुनर्विवाहासंदर्भात पैशाच्या जोरावर प्रश्न सोडविता येत होता.

या सामाजिक प्रश्नांचा विचार करणारा व त्याच्या पुरोगामी व प्रतिगामी सोडवणुकीने अस्वस्थ होणारा वर्ग प्रामुख्याने मध्यमवर्गीय होता. ज्या वेळी कष्टकरी वर्गाचे प्रश्न सोडवण्याची गरज पडली तेव्हाही हाच वर्ग पुढे सरसावला. पण 'उपेक्षितांचे अंतरंग' मध्ये त्यांचे प्रश्न मांडणारे श्री. म. माटे जितक्या तळमळीने त्यांच्या प्रश्नांना भिडू शकत होते, त्यापेक्षाही अधिक आत्मीयता त्याच वर्गातून आलेल्या नेतृत्वाच्या ठिकाणी असण्याची शक्यता असल्याने एक प्रकारे स्वातंत्र्याच्या उदयकाळातच मध्यमवर्गीयांना सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीचे अधिकार गमवावे लागले. जर सानेगुरुजींचा ‘कष्टकरी समाजाच्या कष्टाला कमी न मानता विचारवंत, बुद्धिजीवी वर्गाने आपल्या बौद्धिक सामर्थ्याइतकेच कष्टालाही महत्त्व द्यावे' हा सल्ला अनुसरला असता तर कदाचित मध्यमवर्गीयांची इतकी पीछेहाट झाली नसती.

वरवर पाहता मध्यमवर्गाची व्याख्या आर्थिक दृष्टीने केली जात असली तरी ती पूर्णपणे मध्यमवर्गाचे स्वरूप व्यक्त करणारी ठरत नाही. ही वर्गवारी जातीच्या पातळीवरही मानता येत नाही. ब्राह्मण, मराठा वा अन्य जातींचाही यामध्ये समावेश आहे. हा वर्ग प्रामुख्याने शिक्षणावर भर देणारा आहे. ठराविक काळ शिक्षणामध्ये घालवून त्या शिक्षणाच्या जोरावर नोकरी करणारा हा वर्ग प्रामुख्याने 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।' अशी वृत्ती असलेला आहे. पण त्याच्या मनातील वैभवाची ओढ त्याने दडपून टाकली असली तरी, जेव्हा सगळ्याच जीवनमूल्यांचा -हास होताना त्याला जाणवला तेव्हा ही उपभोगप्रधान वृत्ती प्रभावी झाली आणि त्यामुळे छोट्या प्रमाणावर भ्रष्टाचार, वरची मिळकत याची गोडी वाटून तो पैशाला केंद्रस्थानी मानू लागला. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये यांपैकी एक गट समाजातील धनिकवर्गाचा एक हिस्सा बनला. आणि दुसरा गट सरकारी कार्यालये, बँका, विमा कंपन्या आदींमधील नोकऱ्यांत शिरला. चाकोरीबद्ध चाकरमानी नोकऱ्यांत रमला.

आजही मध्यमवर्ग नाही असे नाही. पण त्याची प्रवृत्ती पूर्वीची राहिलेली नाही, ती संतत्वाकडे वळलेली नसून व्यवहारी बनलेली आहे. समाजातील गुंडगिरी, भ्रष्टाचार, अनैतिक वाटा, दहशतवाद इत्यादी आजच्या समस्या 'जशास तसे' वागून सोडविण्याची त्याची वृत्ती झालेली आहे. तो स्वत:ही मनाला पटत नसताना या मार्गावर उतरत आहे. विभावरी शिरूरकरांच्या 'खरे मास्तर' या चरित्रवजा कादंबरीत आलेले या समस्येचे चित्रण प्रातिनिधिक म्हणायला हरकत नाही. म्हणून सामाजिक प्रश्न अधिक गुंतागुंतीचे आहेतच; पण त्यापेक्षाही हे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारा निःस्पृह समाजगट नाही हे अधिक भीषण आहे. प्रत्येक व्यक्ती व प्रत्येक समाजगट 'मला काय त्याचे?' या प्रवृत्तीने किंवा हतबलतेने स्वत:पुरताच विचार व तोही स्वत:च्या हितसंबंधांना जपत, अत्यंत व्यावहारिक पातळीवर करू लागला आहे. पर्यावरण, जागतिक व्यापारपेठ, वाढती महागाई, शिक्षणातील असंख्य त्रुटी, न्यायव्यवस्थेची अगतिकता, प्रसारमाध्यमांवरील दडपणे, चंगळवादी जीवनधारणा, तरुण पिढीवर संस्कार करण्याची अपुरी यंत्रणा, दहशतवाद इत्यादी अनेक समस्या प्रत्येक समाजगट आपल्या परीने सोडवू पाहत आहे किंवा सोसत आहे. यातून वाटेवर चालू इच्छिणारा समाज नाही असे नाही; पण त्याला हवे असलेले प्रामाणिक व खंबीर नेतृत्व मात्र कुठे दिसत नाही. सगळ्याच क्षेत्रांत विश्वासार्हता जपणारे नेतृत्व असणे ही खरी निकड आहे. एके काळी, ही गरज मध्यमवर्गाने भागविली होती. आज मात्र हाच वर्ग ते कार्य करण्याइतका समर्थ राहिलेला नाही आणि त्याची जागा घेणारा दुसरा वर्ग समाजाने निर्माण केलेला नाही. 

सारांश

प्रामुख्याने मध्यमवर्ग ही कल्पना ब्रिटिश राजवटीत जोपासली गेली. नोकरी करणारा व आर्थिक वैभवापेक्षा नैतिक जीवनसरणी मानणारा हा पापभीरू वर्ग आपल्या नैतिक बळावर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सुधारणा करण्यात व सर्व स्तरांवरील समाजाचे नेतृत्व करण्यात अग्रेसर होता. विज्ञाननिष्ठा, बुद्धिनिष्ठा हे त्याचे सामर्थ्य होते; पण दुसऱ्या महायुद्धाने जीवनमूल्यांचा जो न्हास त्याला जाणवला, त्यामुळे हा वर्ग भेकड, स्वार्थी व द्रव्यलोभी बनला. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हे लक्षात घेऊन सत्तास्थानी चाललेल्या भ्रष्टाचारात सहभागी झाला आणि त्याच्या या अवनतीच्या काळातच, श्रमकरी वर्गातील नेतृत्व उदयाला आल्याने त्याच्या नेतृत्वाची गरज संपली. आज असा वर्ग निर्माण होण्याची गरज आहे.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: