गोपाळ गणेश आगरकर यांची माहिती मराठी - Gopal Ganesh Agarkar Information in Marathi
गोपाळ गणेश आगरकर यांची माहिती मराठी - "मी शिक्षक होऊ इच्छितो. लोकात स्वतंत्र विचार उत्पन्न होऊन स्वोन्नतीचे मार्ग लोकांना दिसू लागतील. अशाप्रकारच्या शिक्षकाचे काम करायचे आहे." "इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार" हा त्यांचा बाणा.
गोपाळरावांचा जन्म 1856 मध्ये झाला. ते मोठे हड होते. खेळाडू वृत्तीचे, कहाड जवळच्या टेंभू गावी बाळपण गेले. कृष्णेच्या पाण्यात तासन्तास डुंबायचे. पुढे वहाडात अकोल्यास शिकायला गेले. घरी स्वयंपाकाचे कामही पडे. गरिबीतून शिकत होते. दोन वर्षे मराठीची शिष्यवृत्ती मिळाली. भाषांतर व्रण्यात पटाईत. श्लोक पाठ करायचे, त्यांना इतिहास, संस्कृत काव्ये, नाटके यांची अत्यंत आवड. घरकामामुळे एकदा शाळेत जायला उशीर झाला तर हेडमास्तर म्हणाले, "तुमच्या हातून काय अभ्यास होणार? तुम्ही असेच रखडणार." तेव्हा तेजस्वी गोपाळ उभा राहून म्हणाला, "तुमच्या सारखा एम. ए. होईन तरच नावाचा आगरकर." अकोल्यास वहाड समाचार निघे, "तुम्ही लेख लिहीत जा. पाच रुपये महिना पाठविन," असे संपादकांनी आगरकरास कळविले. गॅदरिंगमध्ये निबंधात बक्षीस. पुढे पुण्यास आले. डेक्कन कॉलेजात जाऊ लागले. एकच सदरा, रात्री धुऊन ठेवायचे. सकाळी तो घालायचे, परीक्षेच्या वेळी फी नव्हती. एक नाटक लिहू लागले. तेव्हा प्रा. केरुनाना छत्रे यांना कळले. त्यांनी फी दिली. लो. टिळकही त्याच वेळचे. दोघांनी पुढे शिक्षणास वाहून घ्यायचे ठरविले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सरकारी नोकरी सोडून न्यू इंग्लिश स्कूल सुरू केले होते. निबंधमाला, केसरी, मराठाही पत्रे सुरू केली होती. आगरकर, टिळक येऊन मिळाले.
गोपाळरावांनी मुन्सफ व्हावे अशी घरच्यांची इच्छा. शिक्षणखाते रडके खाते असे त्यांचे आप्तेष्ट म्हणाले. पुढे त्यांना एका संस्थानात मोठी नोकरी मिळत होती: परंत त्यांनी ढंकनही पाहिले नाही. 1880 मध्ये एम. ए. झाले. विष्णुशास्त्री मरण पावले. लोकमान्य व आगरकर यांना शिक्षा झाली. मुंबईच्या डोंगरीच्या तुरुंगात दोघे 101 दिवस होते. दोघांच्या दिवसरात्र चर्चा होत. दोघांतील मतभेद स्पष्ट झाले. दोघे स्वातंत्र्यभक्त; परंतु आगरकर म्हणत. "हा देश सडलेला. ना बुद्धी ना विवेक, रूढी नि अज्ञान. अशांना कोठले स्वराज्य? श्रेष्ठ-कनिष्ठपणाची थोतांडे, शिवाशीव, स्त्रियांची दुर्दशा, हा धर्म नको." लोकमान्य म्हणत, 'हे सारे सुधारेल तोवर देश आर्थिक शोषणाने मृतप्राय होईल. आधी परके चोर घालवू मग घर सुधारू."
हे दोन थोर पुरुष अलग झाले. आगरकरांनी सुधारक पत्र सुरू केले. "इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार" हा त्यांचा बाणा. त्यांनी चौफेर हल्ला चढवला. ती श्राद्धे, ती तर्पणे, ती पिंडदाने, ती वपने, ती सोवळी-ओवळी, शेंड्या, जानव्यांचे, गंध-भस्माचे धर्म, ती थोतांडे, आगरकर विजेप्रमाणे आघात करू लागले. सनातनी संतापले. आगरकर जिवंत असताना त्यांची प्रेतयात्रा काढून त्यांच्या घरावरून नेली. त्यांच्या पत्नीस काय वाटले असेल. आगरकरांची पत्नी तुळशीबागेत जायची. एकदा एका विद्यार्थ्याने विचारले, "तुमच्या पत्नी तर देव मानतात." ते म्हणाले, “मी तिला सांगतो की देव वगैरे सारे झट आहे; परंतु तिची श्रद्धा आहे. मला माझी मते बनवण्याचा हक्क तसा तिलाही. आगरकर बुद्धीला प्रमाण मानणारे. एकदा त्यांनी 'सुधारका'त महाराष्ट्रीयास अनावृत्त पत्र लिहिले. ते प्रत्येकाने वाचले पाहिजे. “का मी हे सारे लिहितो? इतक्या टीका होतात. तरी का? दारिद्य स्वीकारून हा वेडा पीर का हे सारे प्रतिपादित आहे? सुखाची नोकरी झुगारून, रोगाशी झगडत सर्वांचा विरोध सहन करून हा मनुष्य का हे विचार मांडतो. याचा जरा विचार तरी करा मनात' अशा आशयाचे ते उद्गार आहेत; परंतु शेवटी म्हणतात, "माझ्या विचारांचा समानधर्मी कोणी उत्पन्न होईल. पृथ्वी विपुल आहे. काळ अनंत आहे." असे हे धैर्याचे मेरु! आणि किती साधे. फर्ग्युसन कॉलेजच्या प्रांगणात एकदा सकाळी धाबळीची बाराबंदी घालून, एक पंचा नेसून, एक डोक्याला गुंडाळून ते चिलीम ओढीत होते. दम्यासाठी तंबाकूत औषधी मिसळून ते ओढीत. एक गृहस्थ भेटायला आले. "आगरकर कोठे राहतात?" "मीच तो." "थट्टा नका करू." "अहो खरोखरच मी आगरकर." "स्त्रियांनी जाकिटे घालावी सांगणारे तुम्हीच ना? मला वाटले तुम्ही अपटुडेट साहेब असाल."
एकदा ज्ञानप्रकाशात आगरकर वाटेल ते खातात, वाटेल ते पितात असे कोणी लिहिले, आगरकर म्हणाले, "मी जर एक गोष्ट प्रतिपादणारा व दुसरी आचरणारा असेन तर शिक्षक व वर्तमानपत्रकार होण्यास नालायक आहे. तेव्हा माझ्यावरच्या आरोपाला अणुरेणूइतका पुरावा असेल तर दाखवा. नाहीतर आरोप परत घ्या." तो आरोप करणारा 'ज्ञानप्रकाशात' म्हणाला, “या साधुपुरुषाची काय हो मी विटंबना केली! अरेरे."
असला धुतल्या तांदळासारखा महापुरुष होता. लोकमान्यांची व त्यांची भेट होत नसे. पुण्याच्या लाकडी पुलावर दोघांची गाठ पडणार असे वाटले;. परंतु एकमेकांकडे न पाहता दोघे गेले! बेळगावला लोकमान्य गेले होते. थिएटरात त्यांची कोणी नक्कल केली. टिळक म्हणाले. "माझी नक्कल मला काय दाखवता? त्याची दाखवा. त्या गोपाळाची." लोकांना वाटले गोखल्यांची. तेव्हा टिळक म्हणाले, "तो दुसरा गोपाळ, निदान नकलेत तरी त्याला पाहून समाधान मानीन!" टिळकांना आगरकरांविषयी किती प्रेम. आगरकर वारले तेव्हा रडत रडत अग्रलेख त्यांनी सांगितला.
गोपाळराव दम्याने आजारी असतच. ते म्हणाले, “आता मी मरणाला तयार आहे. मला लोकांना जे सांगायचे होते ते मी सांगून टाकले आहे." 17/6/1895 शनिवारी जुलाब झाला. रविवारी जरा बरे होते. रात्री शौचास स्वत: जाऊन आले. हातपाय धुऊन झाल्यावर पत्नीस म्हणाले, "आता मला बरे वाटते. मी निजतो आणि तुम्हीही निजा." परंतु ती शेवटची झोप. पहाटेस त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्या उशाशी एक पुरचुंडी होती. तिच्यावर एक चिठ्ठी होती. "माझ्या प्रेतदहनार्थ मूठमातीची पत्नीस पंचाईत पडू नये म्हणून व्यवस्था."
असा हा धगधगीत ज्ञानाचा नि त्यागाचा पुतळा होता. शतश: प्रणाम!
0 comments: