Sunday, 1 November 2020

Marathi Essay on "Indian Society Then and Now", "भारतीय समाजाचा बदलता चेहरा मराठी निबंध for Students

Essay on Indian Society in Marathi Language: In this article "भारतीय समाजाचा बदलता चेहरा मराठी निबंध", "Present Indian Society Marathi Essay" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Indian Society Then and Now", "भारतीय समाजाचा बदलता चेहरा मराठी निबंध for Students

प्राण्यांचे कळप असतात; पण माणसांचा समाज असतो. या समाजाला काही नैतिक अधिष्ठान असते. मानवतेच्या बैठकीवर त्याचे अस्तित्व आधारलेले असते. प्रत्येक समाजाची संस्कृती काही प्रमाणात भिन्न असली तरी त्याचा हेतू एकच असतो. मानवी जीवनाची सुरक्षितता, त्याचा विकास, त्याच्या सर्व प्रकारच्या गरजा भागविणे, या हेतूने एकत्र आलेल्या टोळ्या कुठल्या ना कुठल्या प्रदेशात स्थिरावतात व त्या प्रदेशानुसार त्यांचे जीवनमान बदलते. जीवनाचा लौकिक व अलौकिक अर्थ त्यांना जाणवायला लागतो. भारतीय समाजाचा विचार करता या समाजाला व त्याच्या संस्कृतीला फार प्राचीन व सनातन म्हणजे तेजस्वी परंपरा आहे. ही परंपरा जशी हजारो वर्षांच्या समाजजीवनातून आकारास आलेली आहे, तशीच प्रत्येक कालखंडात तिच्यामध्ये बदल, स्थित्यंतरेही होत आलेली आहेत. केवळ एखाद्या प्रदीर्घ कालखंडातच नव्हे तर आसेतुहिमाचल पसरलेल्या या अवाढव्य प्रदेशात एकाच वेळी अनेक संस्कृतींचे समाजही गुण्यागोविंदाने नांदत आलेले दिसून येतात. भारतीय समाजाच्या मूलभूत प्रेरणांचा विचार करताना, त्यामध्ये विविधतेतून असलेल्या एकतेचा प्रत्यय सातत्याने येत राहतो. हा भारतीय संस्कृतीचा मूलबंध या समाजाच्या नसानसांतून जाणवत आलेला आहे.

या समाजाने फार पाहिलेले आहे; फार सहन केलेले आहे आणि फार पचविलेले आहे. अनेक टोळ्यांनी आपल्या वसाहतींसाठी निवडलेल्या या प्रदेशातील समाजात संमिश्रता आणि विरोधाभास जाणवला तर नवल नाही. एकाच वेळी बहुपतित्व जसे रूढ आहे, तसेच बहुपत्नीत्वही येथे रुळलेले आहे; जातिपातीची कडक बंधनेही आहेत आणि आध्यात्मिक पातळीवर समानताही आलेली आहे. मनात श्रद्धेवर आधारलेले पारलौकिक जीवनसंदर्भ घट्ट रुजलेले आहेत; तरीही वास्तवाकडे पाठ फिरवण्याची वृत्ती बोकाळलेली नाही; सत्तेची व धनाची हाव विसरलेली नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर आषाढी-कार्तिकीला नियमाने वारी करणारा वारकरी शिवाजी महाराजांच्या सैन्यात भरती झालेला आहे. 'कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।' या वृत्तीने त्याने चारही मुक्ती साध्य केल्या आहेत. जे महाराष्ट्रात तेच पंजाबमध्ये, बंगालमध्ये, दक्षिणेकडच्या कन्नड प्रदेशात! प्रमाण कमीजास्त असेल एवढेच. 

अशा या बदलाला सामोरे जाण्याची तयारी ठेवून व जुन्यातील मूळ न सोडता नव्यातील चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची वृत्ती ठेवणाऱ्या भारतीय समाजाचे आजचे स्वरूप लक्षात घेताना ब्रिटिशांच्या सहवासाने व यंत्रयुगाच्या प्रवाहाने त्याचे स्वरूप कसकसे संमिश्र झालेले आहे व जुन्या-नव्याच्या संघर्षामध्ये त्याचे स्वरूप किती प्रमाणात बदलले आहे, ते समजून घ्यावे लागते. परंपरेने मनात रुजलेल्या देवदैवतांच्या श्रद्धा, धर्मश्रद्धा एका बाजूला, आणि दुसरीकडे आजच्या विज्ञानाने आणून दिलेला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन. एका बाजूला, सर्वांना समान लेखावे, हा मानवतावादी विचार आणि दुसऱ्या बाजूला राजकीय दृष्टीने खतपाणी घालून बळकट केलेला जातीयवाद यांमधील संघर्षाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे! त्यातून भारतीय समाजमनाची जडणघडण बदलत आहे; आणि तरीही व्यक्तिपूजा करणाऱ्या व घराणेशाहीची परंपरा मानणाऱ्या भारतामध्ये लोकशाहीची मूल्ये जतन होताना दिसतात.

समाजाच्या मूलभूत प्रवृत्ती स्थिर असल्या तरी अनेक कारणांनी त्यांच्यामध्ये बदल घडून येणे हे स्वाभाविकच आहे. माणसाप्रमाणेच समाजजीवनातही बदल होणे अपरिहार्य असते. या तत्त्वाप्रमाणेच दुसरीही एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे, या बदलामध्येही सुसंगती असते. समाजातील विविध तत्त्वांचे -एकमेकांशी असलेल्या संघटनात, एक चांगले आणि दुसरे वाईट असे नसते. समाजात जेव्हा जातिव्यवस्थेवर आधारलेली उच्चनीचता होती, तेव्हाही ती सर्वस्वी वाईट नसून तिच्या आधारे समाजातील व्यवसाय, राहणीमान यांचा समतोल साधलेला होता. जेव्हा प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व स्वतंत्र होते तेव्हा त्या खेड्याच्या विकासाशी ही जातिनिहाय उद्योगधंद्याची असलेली बांधिलकी लक्षात घेण्यासारखी होती. ब्रिटिशपूर्व शिक्षणपद्धतीत जन्माने दिलेल्या उद्योगधंद्याचे ज्ञान घरी परंपरेने घेता येत होते; गुरुगृहीही मिळत होते; पण सर्वांना एकाच प्रकारचे पुस्तकी शिक्षण, ज्ञान देण्यावर त्याचा भर नव्हता. त्यामुळे शिंप्याच्या व्यवसायात इतर जातीची व्यक्ती स्पर्धा निर्माण करीत नव्हती. स्पर्धात्मक प्रवृत्तीपेक्षा सहकार्य भावनेवर शिक्षण व खेडोपाडीचे शासन अधिक भर देणारे होते. ती पद्धती गुणदोषयुक्त होती असे म्हणताना ती त्या काळातील समाजाच्या अधिकाधिक गरजा भागविणारी होती की नाही या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते.

यंत्रयुगाने आजचे खेडे दुसऱ्या खेड्यांशी व लांबलांबच्या प्रदेशांशी जोडले गेल्यावर व शहरीकरणाची गरज निर्माण झाल्यावर समाजाची घडी वेगळ्या तत्त्वावर घातली जाणे, स्वाभाविकच आहे. मात्र अशा बदलातून निर्माण झालेल्या आजच्या समाजाच्या स्वरूपामागे एकच एक कारण आहे, असे नाही. समाजाची संस्कृती बदलण्यामागे अनेक कारणांचे समुच्चयित स्वरूप असते. प्रादेशिक, राजकीय, तांत्रिक, आर्थिक, कायदेशीर, धार्मिक वा अन्य अनेक क्षेत्रांतील बदलांचे परिणाम समाजावर होत असतात. शिवाय सामाजिक बदल ही अत्यंत मंद गतीने होणारी प्रक्रिया आहे. त्यातही जुन्या गोष्टी सोडायला व नवीन गोष्टी स्वीकारायला समाजमनाची फारशी तयारी नसते. चुलीची जागा गॅसच्या शेगड्यांनी घ्यायला, पितळेच्या ताटवाट्यांची जागा स्टेनलेसस्टीलच्या भांड्याने घ्यायला पिढ्या जाव्या लागल्या. जुन्यांनी प्रथमत: विरोध करीत-करीतच नव्याच्या प्रवेशाला संमती दिलेली असते. स्त्रीशिक्षणाला संमती देताना समाजाने अशा अनेक अंधश्रद्धांचे अडथळे प्रथम उभे केले. इंग्रजी भाषेतील पुस्तकांना प्रथम घरात स्थान न देता विहिरीच्या कोनाड्यात राहावे लागले. पण नेहमीच नव्याची सरशी होत नसली तरी नव्या-जुन्याच्या संमिश्रतेतून समाजाच्या धारणा बदलत जातात. हे बदल मूळ स्वरूपापेक्षा कधी समाजपोषक वा समाजघातकही असू शकतात हे लक्षात घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थआपला पारंपरिक पोशाख इंग्रजी संस्कृतीच्या पोशाखाने बदलत गेला; पण आजचा भारतीय पोशाख हा पूर्वीपेक्षा वेगळा असूनही स्वत:चे स्वतंत्रपण निर्माण करू शकला. इंग्रजी भाषेच्या संदर्भात कन्नड वा बंगाली प्रदेशात इंग्रजीचा विकास होऊन त्यांच्या त्यांच्या प्रादेशिक भाषाही सकस झाल्या; पण मराठीबाबत मात्र विकासदृष्टी मर्यादित राहिली.

सामाजिक बदल होताना प्रथम तो विचाराच्या पातळीवर होत असतो. त्या मंथनातून नंतर तो आचाराच्या पातळीवर येत असतो. प्रथम विचाराच्या पातळीवर असलेला हा बदल संघर्षाशी किंवा ज्ञानाशी संबंधित असतो. उदाहरणार्थ- यंत्राच्या साहाय्याने होणारी शेती पाहून शेतीसाठी मंत्रतंत्र, यज्ञ करणाऱ्या समाजाला प्रथम आश्चर्य वाटले आणि त्यामधूनच नव्याजुन्याचे वेगळे तंत्र प्रसारित झाले. वाढती लोकसंख्या ही महाभारतकालीन समस्या नव्हती. अनेक विवाह हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने राबणारे हात होते; पण नंतरच्या काळातील अन्नधान्याच्या समस्या वाढल्याने, शेतीव्यवसायाला मर्यादा पडल्याने, वाढती लोकसंख्या ही अनेक समस्यांना आमंत्रण देणारी ठरली. दारिद्र्य, अशिक्षितपणा, घरे-शरीरे यांच्याकडे पुरेसे लक्ष देता न येणे, हे प्रश्न शहरे-खेडे यांना ग्रासून राहिले. तंत्रज्ञानाच्या वाढत्या पसाऱ्यामुळे कारखानदारीने आर्थिक विकासाचे वेगळे मार्ग अनुसरले व शहरीकरणाची वाढ झाली. इतकी की 'खेड्याकडे चला' हे राजकीय दृष्टीने सांगण्याची गरज गांधीजींसारख्या राजकारणी संताला वाटली. शहरांकडे वळलेल्या या अनावर लोंढ्यामुळे बकाल वस्ती वाढली. आर्थिक पातळीवर दोन टोकांचे समाजस्तर निर्माण झाले. इमारतीच्या वरच्या भागात राहणाऱ्या सधन वर्गाच्या पायथ्याशी, हा आर्थिक दृष्टीने व संस्कृतीच्या दृष्टीनेही अनपढ असलेला समाजघटक समाजाच्या अनेक प्रश्नांना निर्माण करण्यास कारणीभूत ठरला आहे. कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरासारखा कामगारवर्ग हा नवाच गट समाजाला लक्षात घ्यावा लागला हे वेगळेच. तंत्रज्ञानाच्या विकासाप्रमाणेच कायद्यामुळेही समाजस्थित्यंतराला गती येत असते. कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या वाईट गोष्टी टाळण्यासाठी नागरिक सावध व सक्षम असले तर त्यांना कायद्याची मदत घेता येते. राजकारण व त्याचे तत्कालीन स्वरूपही समाजबदलाला कारणीभूत असते. निवडणुका, त्यांचा आर्थिक बोजा, त्यांमधील जातिपातींची घेतली गेलेली मदत, त्यांतील गैरप्रकारांकडे असलेला ओढा यांमधूनही समाज खूप काही आत्मसात करीत असतो. राजकारण, कायदे पूर्वीही होतेच; पण आजचे त्यांचे हाताबाहेर गेलेले स्वरूप पाहता समाजातील सद्गुणांची जोपासना करण्यापेक्षा उच्चाटन करण्यावर त्यांचा भर आहे व कोणत्याही मार्गाने सत्ता जवळ करण्याचे प्रयत्न पाहता समाजातील सज्जन वर्ग घाबरून जात आहे हे लक्षात येऊ शकते.

न्यायसंस्था, कुटुंबसंस्था, शिक्षणसंस्था, धर्मसंस्था या सगळ्या सामाजिक संस्थांवर याचा परिणाम होत असतो. पण त्यातल्या त्यात कुटुंबसंस्था हा भारतीय समाजाचा कणा मानला जातो. त्याच्यावर शहरीकरण, कारखानदारी, शिक्षण, धर्मांतर आणि नोकरीच्या शोधात दाही दिशांना करावी लागणारी भटकंती, यांचा फार मोठा परिणाम होऊन राहिलेला आहे. एकत्र कुटुंबाची एकत्र जबाबदारी, आर्थिक मदत, लहान पिढीचे पालनपोषण यांमध्ये बदल होत चालला. नातेवाइकांचा मेळावा एखाद्या सुटीमध्ये एकत्र जमत असला तरी शेजारी राहणारा मग तो कोणत्याही जातीचा व प्रदेशातला असो त्याच्याशी जवळिकीचे संबंध जुळून येऊ लागले. एक प्रकारे मोठ्या व्यापाराच्या शहरांमध्ये दूर-दूर राहणाऱ्या भावाबहिणींपेक्षा शेजारधर्म पाळणारे मित्र-मैत्रिणी अधिक प्रमाणात जोडले गेले. वेगळ्या प्रकारचे सामाजिक बंधन निर्माण झालेल्या या समाजात रक्ताच्या नात्यापेक्षा ही नाती प्रभावी झाली. एवढेच नव्हे तर 'हम दो, हमारे दो' च्या काळात शेजारच्या घरातल्या किंवा आपापल्या मित्रमैत्रिणींच्या मुलांशी आपल्या मुलांची मैत्री जुळवून घेऊन त्यांच्यामध्ये आपुलकीचे भाऊबहीणसदृश नाते निर्माण करण्याचा प्रयत्न सधन कुटुंबांमध्ये वाढीस लागलेला दिसतो. या अशा नव्या मानलेल्या नातेसंबंधात घरगुती जिव्हाळा मिळतो आणि दुराग्रही नातेवाइकांमधील खोटेपणा टाळता येतो, ही नवी जाणीव होऊ लागली.

पूर्वीची वाडा-संस्कृती नष्ट झाली; पण त्या जागी ही कॉलनी-सदनिका संस्कृती आकारास आली. घराघरातली वडिलधारी मंडळी लांब राहिली; पण अंगणवाडी, बालवाडी, शेजारचे आजीआजोबा जोडले गेले. पुष्कळदा ही नाती दत्तक असली तरी आंतरभारतीच्या पातळीवरही पोहोचली. पण या जोडीलाच विविध जातींमधील असमानतेच्या प्रवृत्तीमुळे अनेक सामाजिक प्रश्नही समाजासमोर उभे राहिले. त्यांची सोडवणूक करण्यासाठी राजा राममोहन रॉय, लोकहितवादी, जोतीबा फुले, आगरकर, गांधीजी इत्यादी समाजसुधारकांनी सुधारणावादी व्यक्तिनिष्ठ विचारसरणीवर भर दिला. काही प्रमाणात अस्पृश्यतेच्या प्रश्नावर मात करता आली. पारतंत्र्याच्या काळात शिक्षण व स्वातंत्र्यलढा यांच्यावर लक्ष केंद्रित करून समाजाला एका ध्येयाने प्रेरित करता आल्याने जात, धर्म, चालीरीती, वंश या प्रकारची विविधता असूनही एकसूत्रता साधली गेली. शहरीकरण, दळणवळणाची वाढती साधने, शैक्षणिक समानता, वृत्तपत्रादी विविध प्रकारचे लेखन यांमधूनही समाजातील एकता आंतरभारतीच्या स्वरूपात समाजाच्या मनात रुजली. अर्थातच, ब्रिटिशांच्या राजकीय ‘फोडा आणि राज्य करा' या धोरणामुळे हिंदूंमधील जातिभेदाचा प्रश्न व हिंदु-मुस्लिमांमधील तेढ वाढती ठेवण्यात शासन यशस्वी झाले व गावोगावी त्या दृष्टीने समाजात दुहीचा विचार पेरला गेला. तसेच ख्रिश्चन मिशनरींनी भारतीय देवदैवतांबद्दल, भारतीय जीवनाबद्दलचे जे समज लोकांच्या मनात मुद्दाम पेरले होते, त्यामुळे समाजातील परकीयांचे आसन तर बळकट व्हायला मदत झालीच! पण समाजात फॅशन्स्च्या नावाखाली स्वीकारलेल्या चालीरीती, पोशाख इत्यादींमध्ये भारतीयत्वाला हीनतेची वागणूक मिळत गेली. समाजात या अशा विचारांमुळे रुजविलेली स्वत्त्वहीनतेची जाणीव भारतीय परंपरेला नावे ठेवत आधुनिकतेचा स्वीकार करू लागली. 'धड ना जुने सोडता येते, पण नवे तर अप-टु-डेट वाटते,' अशी त्रिशंकू अवस्था भारतीय समाजात वाढत चालली आहे. 

अर्वाचीन शिक्षणपद्धतीमध्ये झालेला बदल समाजाचा चेहरा बदलण्याला कारणीभूत ठरणार आहे. जुन्या गुरुकुल पद्धतीत 'दक्षिणा' महत्त्वाची नव्हती; शिक्षण पुस्तकी नव्हते; पैशाकडे पाहून दिले जाणारे नव्हते; पण आज सगळ्यांना एकाच प्रकारचे दिले जाणारे शिक्षण पैशावर अवलंबून असल्याने, तो पैसा व्यवसायातून किंवा नोकरीतून भरून काढण्याची प्रवृत्ती जोर धरू लागली. व्यवसायातील निष्ठा ढासळण्याच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे हे विसरता येत नाही. एकाच प्रकारचे शिक्षण सगळ्यांना आवश्यक आहे काय? या शिक्षणात बौद्धिक विकासावर सर्वांत मोठा भर असल्याने संस्कार, मानवतावादी मूल्यांना आपोआपच कमीपणा येऊन समाजातील कृतज्ञता, गुणांचा आदर व त्यांची कदर करण्याची प्रवृत्ती हळूहळू नामशेष होऊ लागली. प्रौढ शिक्षणाची सुविधा, मोफत शालेय शिक्षण, (सध्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची सुविधा) या सगळ्यांचा परिणाम समाजाच्या शिक्षणाकडे कल वाढविण्याच्या हेतूला बळकटी आणणारा असला तरी त्यामुळे विविध छोटे-मोठे व्यवसाय मागे पडले किंवा अशिक्षितांच्या हाती पडले. तसेच चांगले शिक्षण द्यायचे तर त्यासाठी वाजवी, गैरवाजवी किंमत मोजण्याची तयारी करताना कुटुंबाचे आर्थिक अंदाजपत्रक तणावाचे ठेवण्याला कारणीभूत ठरू लागले. या सगळ्यांमुळे हळूहळू पैसा आणि एकमेव पैसाच समाजाच्या सर्व व्यवहाराच्या केंद्रस्थानाकडे सरकला. 'सर्वे गुणाः कांचनम् आश्रयन्ते ।' या वचनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट पैशामध्ये मोजली जाणे हे समाजाच्या अंगवळणी पडले. अर्थातच लाचलुचपत, अनैतिक मार्गाने पैसा मिळविणे व पुरविणे याचा विधिनिषेध समाजात राहीनासा झाला.

स्त्रीमुक्ती, स्त्रीजागृती, स्त्रीशिक्षण या कल्पनांचा विचार ही या युगाची एक महत्त्वपूर्ण शक्ती आहे. स्त्री-पुरुष समानता, त्यांच्या कामाची वाटणी, घरी किंवा शिक्षण, नोकरी-व्यवसाय इत्यादी घराबाहेरच्या क्षेत्रांतही स्त्रीला तिच्या क्षमतेनुसार मान, काम व वेतन देण्याचा आग्रह वाढला. त्यांना कमी दर्जा देणे किंवा 'न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति।' ही भूमिका बदलू लागली. तिचा विचार करताना केवळ कुणाची तरी सहचारिणी किंवा माता या भूमिकांपेक्षा तिच्या स्वतंत्र कर्तबगारीला महत्त्व येऊ लागले. घराबाहेरच्या विविध क्षेत्रांत आत्मविश्वासाने, मोठ्या पदांवर काम करणारी ही स्त्री, एके काळी अनेक बंधनांनी जखडलेली होती. केशवपन, बालविवाह, शिक्षणाचा अभाव यांमधून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न महर्षी कर्वेसारख्या सुधारकांनी ध्येयवादाचा अंगीकार करून केला; त्यामुळे अजूनही तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन जरी पुरेसा निकोप नसला आणि तिच्या दुर्बलतेचा फायदा घेतला जात असला, तरी शिक्षणाने व समाजातील समानतेच्या तत्त्वाची थोडीफार जाणीव झालेली असल्याने तिचे जीवन काहीसे प्रगतिपथावर वाटचाल करू लागले आहे. पुरुषांची म्हटली गेलेली कार्यक्षेत्रेही तिने आत्मसात केली आहेत आणि बुद्धी, भावना व कार्यक्षमता या दृष्टीने ती कुठेही पुरुषापेक्षा उणी नाही हे समाजाला मान्य करावे लागले. घरातील व समाजातील स्त्रीचे स्थान असे बदलत चालले तरी अजूनही हुंडाबळी, बालविवाह, स्त्रीला घरकामात मिळणारी अन्यायाची वागणूक यांमध्ये आणखी बदल होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी हे स्त्रीविषयक धोरण वरवरचे असते. आर्थिक अडचण सोडविण्यासाठी तिचे साहाय्य घेतले जाते; पण त्या प्रमाणात तिला अधिकार दिले जात नाहीत; तिला ते मिळवावे लागतात. आजच्या समाजजीवनात यामुळे फार मोठा बदल घडून आला आहे.

तंत्रज्ञानाने तर सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र क्रांती केली आहे. बायोगॅसमुळे खेडोपाडीचे जीवनमान बदलून गेले. शेतीव्यवसायामध्ये कृषिविद्यापीठे व तंत्रज्ञानाने आलेली नवी उपकरणे यांमुळे बदल घडविला. अर्थात, हा बदल मोठ्या प्रदेशावर शेती असलेल्या शेतकऱ्यांना अधिक उपयुक्त ठरला; पण महाराष्ट्रातील शेती लहान लहान तुकड्यांमध्ये विभागलेली असल्याने यंत्रसामग्रीच्या वापराला मर्यादा येते. हायब्रिड बीबियाणे, शेतीमधील वाढते संशोधन व प्रयोग यांमुळे जुन्या शेतीपेक्षा वेगळेपणा आला; शेतकरी-जीवनात फरक पडला; पण मुख्य फरक पडला तो वाहतूकयंत्रणा वाढल्याने. खेड्यामध्ये तयार होणारा कच्चा माल, धान्यधुन्य यांना बाजारपेठ कमी श्रमात, अधिक पैशात/किमतीत व स्पर्धात्मक पातळीवर उपलब्ध होऊ शकली. सॅटेलाइटसारख्या गोष्टीमुळे त्यांच्या जीवनात नवी जागृती आली; पण तरीही नवी दृष्टी स्वीकारताना त्यांच्या मनात पिढ्यान्पिढ्या रुजलेल्या जुन्या श्रद्धा टाकून देता येणे त्यांना कठीण होते. या श्रद्धांची बौद्धिक पातळीवर पाठराखण करणे त्यांना शक्य नव्हते. पण आजच्या वैज्ञानिक दृष्टीने जरी विचार केला तरी भूमिपूजन, धान्यसमृद्धीसाठी काही धार्मिक विधी, गाय-बैल यांचे पोळ्यासारख्या सणाचे निमित्त साधून पूजन या गोष्टींमध्ये निसर्गसान्निध्याबद्दल कृतज्ञतेची जाणीव या व्रतांमधून जतन केलेली असते; ती अंधश्रद्धेच्या नावाखाली मोडीत काढणे शेतकऱ्याच्या मनाला रुचत नसते. त्यामुळे विज्ञानाने, तंत्रज्ञानाने आणलेली सोय आणि मानवी मनाच्या विकसनशीलतेसाठी महत्त्वाची असलेली निसर्गकृतज्ञतेची जाणीव या दोन्हींचा नेमका समन्वय शेतकऱ्यांना अद्याप घालता आलेला नाही.

सश्रद्धता आणि बुद्धिनिष्ठता यांच्या संभ्रमात आजचा समाज गोंधळलेला आहे. 'मला जे पटेल तेच मी करीन' ही भूमिका निभावताना त्याच्या आड केवळ अंधश्रद्धा अडथळा निर्माण करतात असे नाही, तर विज्ञानाच्या दृष्टीला न दिसणाऱ्या पण अनुभवाला येणाऱ्या श्रद्धा, समजुती त्याला टाळाव्याशा वाटत नाहीत. निसर्गाच्या व गाई-गुरे-पशुपक्षी, रानटी क्रूर प्राणी यांच्या सहवासात त्याला अनेक प्रकारचे जीवनशिक्षणाचे पाठ मिळू शकतात. उदाहरणार्थ- भूकंपाची जाणीव आपल्या आधी पशुपक्षी, प्राणी यांना होते व ते सैरभैर होऊन धावत, उडत राहतात हा प्राण्यांकडून मिळणारा इशारा, झाडांपासून पावसाचे व प्रदूषण टाळण्याचे होणारे साहाय्य इत्यादींबद्दल कृतज्ञता जपण्याची त्याला गरज असते. तत्दर्शक विधी हे अंधश्रद्धेतून आलेले आहेत, हे त्याच्या मनाला पटत नाही; पण विज्ञानाने व तंत्रज्ञानाने करून दिलेल्या सुविधाही वस्तुनिष्ठ दृष्टीने त्याने स्वीकारल्या आहेत. गाईकडे केवळ उपयुक्त पशू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन त्याला मानवत नाही. आजच्या समाजाची उपयुक्तता, आर्थिक सबलता, सत्ता व या सगळ्यांसाठी चाललेली मूल्यांकडे दुर्लक्ष करून वाढत असलेली स्पर्धात्मक वृत्ती दिवसेंदिवस त्याचा कब्जा घेत आहे. त्यामुळे एकमेकांतील जिव्हाळा, लहानांची जपणूक, वडीलधाऱ्यांबद्दल आदरभाव, आदरातिथ्याचे महत्त्व, मानवता, संयमशीलता, व्यक्तिनिष्ठतेबरोबरच समाजनिष्ठता, या समाजस्थिरतेला आवश्यक असलेल्या मूल्यांचा अभाव फार प्रकर्षाने जाणवत आहे. संशोधनशाळेत निर्माण केलेल्या 'रोबो'सारखेच आपण 'यांत्रिक होऊ लागलो आहोत की काय? याची तपासणी करायला पाहिजे. नव्या नव्या ग्रहगोलांवर वस्ती करण्याचे स्वप्न पाहणारा आजचा समाज हा मानवी समाज असला पाहिजे. भोगवाद व त्यागशीलता यांचा योग्य समन्वय घालण्यातच त्याचे हित सामावलेले आहे. 

भारतीय समाजामध्ये परिस्थितीनुसार, कालानुसार, विज्ञानाच्या संशोधनानुसार खूप बदल झालेले आहेत. त्याचा चेहरामोहरा निश्चितच बदललेला आहे. प्रश्न आहे तो यांपैकी मूलगामी व गाभ्यावर परिणाम करणारा भाग यामध्ये आहे का, याचा. भारतीय समाजामध्ये ब्रिटिश सत्ता आल्यावर ऐहिकतेकडे झुकलेला कल ब्रिटिश गेल्यावरही कायम राहिला; पण तो आता चंगळवादाकडे वळत आहे. गांधीजींनी 'खेड्याकडे चला' असा संदेश देऊनही औद्योगिकीकरण, कारखानदारी, व्यापारी, यांत्रिक सुविधा, नोकरी, छोटेमोठे व्यवसाय यांमुळे शहरीकरण वाढतेच राहिले. त्याला आळा बसला नाही; आणि आता तर अतिरिक्त शहरवाढीमुळे शहरव्यवस्था कोलमडून पडू लागली आहे. एकीकडे खेडी ओस पडत आहेत; तिथे उद्योगधंदे व शिक्षणाच्या सुविधा नेण्याचा प्रयत्न होत आहे; हेही नसे थोडके; पण देशाचा विकास नेहमीच शहरपातळीवर अधिक होत असतो. या शहरविकासाच्या योजना पाश्चात्त्य देशांकडे पाहून केल्या जात आहेत. त्यापेक्षा आपल्या देशाची परिस्थिती वेगळी आहे हे विसरले जात आहे. ते देश कृषिप्रधान नाहीत; व्यापारप्रधान आहेत. विज्ञान-व्यापारप्रधान संस्कृतीचा हा चेहरा अध्यात्म-कृषिप्रधान संस्कृतीच्या भारताला तसाच्या तसा लावण्यात आपण चुकत आहोत; म्हणून हा चेहरा पुष्कळ ठिकाणी मुखवट्यासारखा उसना ठरत आहे. भारतीय समाज हा शहर व खेडे यांमध्ये विभागलेला आहे, असे म्हणण्यापेक्षा तो शहरी असूनही खेडेगावचे संस्कार सोडू इच्छित नाही हे म्हणणे अधिक योग्य आहे. खेड्याची कृषिप्रधान, कष्टकरी-शेतकरी, निसर्ग-सान्निध्यात वावरलेली संस्कृतीच शहरामध्ये, मनात खेडेगावचे स्वप्न सांभाळत वावरत आहे. विविध देवदेवतांच्या पूजनात, सणांत व व्रतोत्सवात त्याला मानसिक समाधान लाभते. विज्ञानाने त्याची श्रद्धा फारशी दुभंगलेली नाही. तो व्यक्तिपूजक आहे पण दरवेळी व्यक्तिपूजेने त्याचे नुकसान होते, असे म्हणता येत नाही. एका दैवतापेक्षा अनेक दैवते भजणारे विविध समाज इथे इतके दिवस सुखाने नांदत आहेत. त्यांना एकाच एका दैवताचा आदर्श देण्याची गरज नाही. समन्वय साधण्याची कला असलेल्या या समाजाने अनेक देवांची पूजा करूनही एकमेकांना समजून घेत विकास साधलेला असल्याची अनेक उदाहरणे भूतकाळात दिसत आहेत.

भारतीय समाजाचा विचार करताना हा समाज आर्थिक दृष्टीने सामान्यतः गरीब, मध्यम व श्रीमंत अशा तीन विभागांत विभागलेला आहे, हे लक्षात घ्यावे लागते.या तीन स्तरांवर असलेला विविध जाति-जमातींमध्ये विभागलेला ग्रामीण व शहरी असा समाज अनेक कारणांनी बदलत चाललेला आहे; पण विशेषतः स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात 'मध्यमवर्ग' नाहीसा तरी होत आहे किंवा असला तर निष्क्रिय तरी झालेला आहे, हे या सगळ्या बदलांमागचे एक प्रमुख कारण म्हणावे लागते. ब्रिटिश सत्तेच्या कालखंडामध्ये ज्या मध्यमवर्गाने संस्कृतिरक्षणाचे, स्वातंत्र्याची भावना जागृत ठेवण्याचे व समाजनीति-संरक्षणाचे जे कार्य केले होते तेच कार्य करणारा निष्ठावंत समाजगट आज अभावाने जाणवत आहे. याच मध्यमवर्गीय वृत्तीस आजचा चंगळवाद पटत नाही; भ्रष्टता रुचत नाही; पण त्याशिवाय दुसरा पर्याय त्याला दिसत नाही.

आजच्या भारतीय समाजातील बदलाची मीमांसा करताना असे म्हणावेसे वाटते की, पाश्चात्त्य नवेपण त्याला सोडवत नाही आणि भारतीय शाश्वत त्याला सुटत नाही, अशी गोंधळलेली अवस्था या समाजाच्या वाट्याला आली आहे. 

सारांश

भारतीय समाजात पूर्वीपासून विविधता आहे. देवदैवते, धर्म, राहणीमान, व्रतवैकल्ये सर्व प्रकारांत विविधता असूनही त्यांच्या समन्वयातून भारतीय समाजाची उज्वल, मूल्याधारित जीवनपरंपरा साकारत आलेली आहे. आध्यात्मिक व लौकिक जीवनाचे आदर्श इथे जोपासले गेले आहेत. श्रद्धा, बुद्धिनिष्ठता, आदर्श व व्यावहारिकता यांची योग्य तडजोड भारतीय समाजात वेळोवेळी घालण्याचा प्रयत्न झालेला आहे. कालानुसार व परिस्थितीनुसार स्वीकारावे लागणारे बदल स्वीकारत ती आजपर्यंत आपले एकसंधत्व जपत आलेली आहे.

समाजाच्या संस्कृतीत बदल होणे वेगळे आणि ती आमूलाग्र बदलणे वेगळे. भारतीय समाजात यंत्रयुगाने, तांत्रिक सुविधांनी, नव्या शिक्षणपद्धतीने, दळणवळणाच्या गतिमानतेने, नव्या प्रसारमाध्यमांनी खूप बदल घडवून आणले आहेत. शहरीकरणाने व कारखानदारीने मूल्यव्यवस्थेतही अर्थकारण प्रभावी ठरले आहे. कष्टकरी, कामगार, मध्यम व गर्भश्रीमंत असे आर्थिक दृष्टीने तीन ठळक थर झाले. नंतरच्या काळामध्ये जाति-जमातींना महत्त्व आले. विभक्त कुटुंबपद्धती, स्त्री-जागृती यांमुळे समाजात काही नव्या संस्था निर्माण झाल्या. समानता, विज्ञाननिष्ठा, बुद्धिवादी पुरोगामी विचारसरणी प्रभावी होऊ लागली; पण श्रद्धा, सनातन संस्कार, परंपरा यांचे महत्त्वही समाजाला पटले होते. ब्रिटिशांनी रुजविलेल्या पाश्चात्त्य कल्पनांच्या जोडीलाच भारतीय संस्कृतीला कमीपणा देण्याचा त्यांचा प्रयत्न समाजाचे सत्त्वहरण करणारा ठरला. त्यांच्या राजनीतीने समाजात केवळ जातिजातींमध्येच दुरावा पेरला नाही, तर कष्टकरी, बुद्धिजीवी व विविध धर्मीय यांनाही एकमेकांपासून विभक्त ठेवण्याचे प्रयत्न केले. तसेच सश्रद्धता व बुद्धिनिष्ठता यांच्यातील समाजाचा संभ्रम संपलेला नाही. व्यक्तिनिष्ठता व समाजनिष्ठता यांची नेमकी क्षेत्रे त्याला गोंधळात टाकत आहेत. मुख्य म्हणजे त्यांची व्यापारप्रधान, वैश्यपोषक संस्कृती अध्यात्मप्रवण, कृषिप्रधान संस्कृतीला लावताना जेवढा विचार व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही. उत्पादनक्षमता व वैचारिक मूल्य जपणाऱ्या विविधतेतून एकता टिकविण्याच्या या भारतीय समाजाची आजची संभ्रमावस्था दूर करण्याची गरज आहे.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: