Essay on Dr Rajendra Prasad in Marathi Language : In this article read "डॉ. राजेंद्र प्रसाद निबंध मराठी", "माझा आवडता क्रांतिकारक मराठी निबंध", "Marat
Essay on Dr Rajendra Prasad in Marathi Language : In this article read "डॉ. राजेंद्र प्रसाद निबंध मराठी", "माझा आवडता क्रांतिकारक मराठी निबंध", "Marathi Essay on Dr Rajendra Prasad" for Students.
डॉ. राजेंद्र प्रसाद निबंध मराठी - Marathi Essay on Dr Rajendra Prasad
डॉ. राजेंद्र प्रसाद निबंध मराठी - प्राध्यापकी आणि वकिली असा भरपूर सन्मान व पैसा देणारा व्यवसाय सोडून चंपारण्यात महात्माजींची भेट झाल्यावर तीस कोटी जनतेची सेवा करण्यासाठी जीवन वेचणारा त्यागी सुपुत्र. घटना समितीचे अध्यक्ष आणि भारताचे पहिले राष्ट्रपती.
ज्या बिहारमध्ये भगवान बुद्धांनी राजगृह येथे प्रथम त्या कोकराला बळी देण्याऐवजी मला द्या म्हणून प्रेममयी वाणी राजाच्या यज्ञात उच्चारली आणि मानवाच्या इतिहासत एक अमर नवीन पान लिहिले, त्या बिहारातच राजेंद्रबाबूंचा पुण्य जन्म झाला. तिथीप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्तजयंती हा त्यांचा वाढदिवस. इंग्रजी तारीख 3 डिसेंबर. राजेंद्रबाबूंना 64 पुरी होऊन पासष्टावे लागले महान सेवकांचे महान जीवन, अतिबुद्धिवान. बहुतेक सर्व परीक्षांत ते पहिले आले. त्यांच्या परीक्षेच्या वेळेस नेहमी अडचणी यायच्या, कधी नावच नसावे. कधी घोटाळा व्हावा. शेवटी सर्वकाही व्यवस्थित होऊन पहिले यायचे.
शिक्षण संपल्यावर काही दिवस प्राध्यापकी केली. नंतर वकिली; परंतु चंपारण्यात महात्माजी आले. राजेंद्रबाबूंच्या जीवनात पुनर्जन्म झाला. अशा रीतीने हा थोर पुरुष तीस वर्षे सारखी सेवेची गंगा ओतीत आहे. बिहारमध्ये खादीची संघटना त्यांनी केली. बिहारमध्ये भूकंप झाला, तेव्हा सरकारने त्यांना सोडले. तुरुंगात ते आजारी होते; परंतु लोकांची दैना पाहून त्यांचे आजारीपण पळाले. त्यांनी जनतेजवळ मदत मागितली. सरकार व जनता यांच्यात अधिक मदत कोण करते, याची चढाओढ लागली. राजेंद्रबाबूंनी पत्रक काढून जनतेला म्हटले, "पैसे आता पुरे, अधिक लागले तर सांगेन."
1942 च्या आंदोलनात बिहारमध्येच सरकारने अति जलम केला. किती ठिकाणी गोळीबार! सुटल्यावर राजेंद्रबाबूंनी सर्व प्रांताचा दौरा आरंभिला. गोळीबारात अपंग झालेले लोक भेटत. त्यांची ते व्यवस्था लावीत. चार जिल्हे अजून हिंडायचे होते. अंगात ताप होता तरी जातच होते. एके दिवशी 100 ताप होता मग कार्यक्रम थांबवला.
1942 च्या आंदोलनात तुरुंगात एकाच्या अंगावर फाटके कपडे होते. मित्राला म्हणाले, "त्याला कपडे मागवून द्या." सर्वांची त्यांना काळजी. लहान लहान कार्यकर्त्यांची नावे त्यांच्या लक्षात असत. एकदा मोतीहारीला सभा होती, "अरे, बत्ताख मियांही आले नाहीत, ते बघा" शेजाऱ्याला म्हणाले. बत्ताख मियांपर्यंत बात गेली. 1977 साली चंपारण्यातील लढ्यात शेतकरी बत्ताख मियाँ होता. राजेंद्रबाबूंना 15-20 वर्षे झाली तरी त्यांची ओळख नि स्मृती होती. बेतियाला गेले तर लगेच म्हणाले, “चंद्रिकाबाबू बरे आहेत ना?" रांचीला गेले तर म्हणाले, “कोहडा पांडे कोठे आहेत?" सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अशी स्मृती ठेवणे हे मनाच्या मोठेपणाचे लक्षण आहे.
एकदा एका जिल्ह्यातील काही कामावर एका मोठ्या कार्यकर्त्यांचे नाव घालण्यात येणार होते. श्री. चक्रधर राजेंद्रबाबूंना म्हणाले, "हे गृहस्थ प्रसिद्ध असले तरी त्यांना संघटना जमणार नाही. या दुसऱ्या कार्यकर्त्यांचे नाव घाला." राजेंद्रबाबूंनी ते ऐकले. ते 34 साली मुंबईच्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. अधिवेशन संपले. जाताना महात्माजींच्या चरणांची धूळी लावून निघाले. महात्माजी हसले व शेजारच्या मुलाची टोपी वल्लभभाईच्या डोक्यावर चढवून भारावलेले वातावरण त्यांनी मोकळे केले.
बिहार भूकंप असो किंवा राष्ट्रसभेचे अध्यक्षपद कठीण प्रसंगी घेणे असो जबाबदारी घ्यायला राजेंद्रबाबूंनाच उभे राहावे लागते. घटनासमितीचेही तेच अध्यक्ष केले गेले. त्यांच्यासारखा निर्भय, निर्मल, निरहंकारी; परंतु खंबीर, श्रद्धावान सेवक कोण?
ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. अंमळनेर तालुक्यातील नांदेड गावी जायचे होते. मोटारची काही अडचण आली. सायंकाळ झालेली, आम्ही रस्त्याच्या कडेला झाडाखाली खान्देशी धुळीत बसलो. मी पत्रातील काही कविता म्हटल्या. मला म्हणाले, “छान आहेत." ती वृक्षाखालची सायंकाळ मी विसरणार नाही!
लहानाहून लहान नि महानाहून महान, अजातशत्रु, ज्ञानी असून निगर्वी, अशा या पुण्यपुऋषाला माझ्यासारख्याचे आयुष्य थोडे थोडे मिळून ते शताय होवोत.
COMMENTS