Marathi Essay on "My Favourite Poet", "माझा आवडता कवी मराठी निबंध", "Maza Avadta Kavi Marathi Nibandh" for Students

Admin
0
Essay on My Favourite Poet in Marathi: In this article "माझा आवडता कवी मंगेश पाडगावकर मराठी निबंध", "Maza Avadta Kavi Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10. 

Marathi Essay on "My Favourite Poet", "माझा आवडता कवी मराठी निबंध", "Maza Avadta Kavi Marathi Nibandh" for Students

"या जन्मावर, या जगण्यावर

शतदा प्रेम करावे" 

(जगण्यावर विलक्षण प्रेम करण्याचा) असा संदेश देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर हे माझे आवडते कवी आहेत.

मराठी साहित्यातील एक प्रतिभावंत कवी म्हणून त्यांची आपणा सर्वांनाच ओळख आहे.  १० मार्च १९२९ हा त्यांचा जन्मदिवस.

Marathi Essay on "My Favourite Poet", "माझा आवडता कवी मराठी निबंध", "Maza Avadta Kavi Marathi Nibandh" for Students

मराठी काव्यमनावर पाडगावकरांच्या कवितेने अनेक वर्षे गारूड केले. त्यांच्या कवितेची सुमारे पंचवीसहून अधिक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. 

पाडगावकरांनी आपल्या कवितेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. 'सुबोधता' हा त्यांच्या कवितेचा खास गुण आहे.

पाडगावकरांचे चाळीसहून अधिक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. मुलांशी एक वेगळेच नाते त्यांनी जपले होते. मुलांसाठी त्यांनी विपुल लेखन केले आहे.

जीवनाच्या वाटेवर आनंदाची नक्षत्रे पेरणारा हा एक आनंदयात्री कवी होता.

'श्रावणात घननिळा बरसला', 'अशी पाखरे रे येती स्मृती ठेवूनी जाती', यासारखी शेकडो भावगर्भ, अर्थपूर्ण गाणी लिहिणारे पाडगावकर स्वतः एक काव्यनक्षत्र होते. 

'मिश्कीलता' हा पाडगावकरांचा स्थायिभाव होता. अर्धशतक काव्यलेखन, गीतलेखन करणारे पाडगावकर जीवनाकडे सकारात्मकपणे पाहत असत. माणसाचे जगणे, त्याचा निसर्गाशी संबंध, निसर्गाचे नानाविध सोहळे त्यांच्या कवितांमधून कसे नटून-थटून येत. संत कबीरांच्या दोहयांचा मराठी भाषेत अनुवाद कवी पाडगावकरांनी केला आहे. मुंबई आकाशवाणीवर काही काळ कार्यक्रम अधिकारी तथा निर्माते म्हणूनही त्यांनी काम केले होते. 

पाडगावकरांची कविता सादर करण्याची पद्धत अफलातून होती. पुरेशी उंची, भक्कम देह, सावळा वर्ण, बोलका, हसरा चेहरा, डोळ्यावर जाड भिंगाचा चश्मा, हनुवटीखाली बुलगानीन कट दाढी आणि एका हातात कागद! दूरदर्शनवर त्यांचे अनेकदा काव्यवाचन व्हायचे. १९६०-७० या दशकात मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विदा करंदीकर यांनी काव्यवाचनाने मराठी रसिकांना मराठी काव्याची भुरळच पाडली. वयाच्या चौदाव्या वर्षापासून मराठी साहित्यविश्वाला भरभरून दिल्यानंतर मराठी जणांचे आयुष्य समृद्ध केल्यानंतर तेच

"इतकं दिलंत तुम्ही मला

खरं सांगतो माणूस केलंत तुम्ही मला" 

अशा शब्दात रसिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

सांग सांग भोलानाथ, चांदोमामा, आता खेळा नाचा, वेडं कोकरू हे बालकवितासंग्रह मुलांच्या जगात फारच प्रिय ठरले.

चांदोमामा, ढग, वाघोबा, परी, पक्षी, पाऊस या सगळ्या गोष्टींचं मुलांना आकर्षण असतं. हे ते ओळखून होते. वयाच्या ऐंशीत पोहोचल्यावरही अत्यंत रसरसलेल्या व प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या कविता लिहिणारे पाडगावकर शेवटपर्यंत 'तरुण'च राहिले.

पाडगावकरांच्या संवेदनशील मनाने 'सलाम' काव्यसंग्रहाची निर्मिती झाली. त्यातील सलाम ही कविता म्हणजे जनसामान्यांचा आक्रोशच होय. समाजमनाच्या संघर्षाची कविता आहे. पाडगावकरांनी वेगवेगळ्या विषयांवर कविता केल्या. प्रेमकविता, तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता, बालगीतं, निसर्गकविता, हास्यकविता त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन घडवतात.

प्रचंड काव्य व साहित्यसंपदा असणाऱ्या या कवीचा अनेक सन्मानांनी गौरव करण्यात आला आहे. भारत सरकारने २०१३ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचं विशेष कौतुक केलं. ३० डिसेंबर २०१५ रोजी त्यांचे देहावसान झाले. व्यक्ती मृत्युमुखी पडते; पण कवी कधी मरत नाही. आपल्या कवितेतून, कवितेतील शब्दांतून तो पुन्हा पुन्हा जिवंत होतो आणि म्हणतो,

"सांगा कसं जगायचं?

गाणं म्हणत की कण्हत कण्हत..."

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !