पहाटेची भ्रमंती मराठी निबंध - Pahatechi Bhramanti Marathi Nibandh: हा निबंध मॉर्निंग वॉकचे (पहाटेची भ्रमंती) फायदे समजावून सांगतो. हे आपल्याला मॉर्निं
पहाटेची भ्रमंती मराठी निबंध - Pahatechi Bhramanti Marathi Nibandh
तसा मी सूर्यवंशीच ! सूर्याच्या किरणांनी हलवल्यावरच उठणारा. पण परवा पप्पांना पहाटेची गाडी गाठायची होती म्हणून स्टँडवर सोडण्यासाठी लवकर उठणं भागच पडलं.... गाडी सुटली तेव्हा झुंजूमुंजू होत होतं. चुरचुरल्या डोळ्यांनी अन् कुडकुडत्या अंगांनी माझ्यासारखे निरोप घेऊन परतू लागले. रिक्षा मिळेना म्हणून पायीच घरची वाट धरली.
रस्त्यावर तुरळक रहदारी होती. रस्तेही आळोखेपिळोखे देत उठत होते. पथारीवाले आपापले संसार मांडत होते. चहाची दुकाने शटर्स्च्या पापण्या उचलून पूर्ण जागी झाली होती. वाफाळलेल्या गरम गरम चहाचे घुटके घेत माणसं ताजीतवानी होत होती.... काही घरं झोपली होती. काही सुस्तपणा झटकत उठत होती. काही मात्र "good boy' सारखी उठून केव्हाच तय्यार झाली होती. त्यांच्या पुढच्या अंगणात सडासंमार्जन व रांगोळ्या काढण्यावरूनच कळत होते. 'उठी उठी गोपाळा'चे सूर कुठल्या तरी घरातील रेडिओवरून ऐकू येत होते. कुठे सनईचे, भैरवीचे सूर तरंगत होते. मनाला वेगळीच प्रसन्नता येत होती. हा अनुभव मला नवा होता. छान होता.
वाटेत लागलेल्या मैदानावर मुले पळण्याचा व्यायाम करीत होती. मोठी माणसे जलद चालण्याचा ! कॅनव्हासचे बूट, स्पोर्टस् पँट, टी शर्ट व हातात टेनिसची रॅकेट नाचवत कोणी स्थानिक पीट सॅम्प्रास टेनिस कोर्टकडे चालले होते. कोणी पी.टी.उषा, ट्रॅकसूट घालून रनिंगच्या आवेशात होती. या माझ्याच वयाच्या युवकांना उत्साहाने मैदानावर पाहून, माझी मलाच थोडी शरम वाटली. 'आलं पाहिजे' म्हणत पुढे झालो.... मैदानावर जाण्यासाठी माकडटोपी, स्वेटर, हातमोजे, पायमोजे घालून काही पेन्शनर वृद्ध रस्त्याने येताना दिसले.... सकाळपाळीचा कुणी कामगार सायकल मारीत ड्यूटी गाठत होता... ही सारीच माणसे कशी तरतरीत दिसत होती.... शेजारच्या देवळात काकड आरती चालू होती. अमंगलावर पावित्र्याचे प्रोक्षण होत होतं. जग मंगलमय होत होतं.... इतरेजन पोटपूजेला लागले होते.
दुधाच्या पिशव्या वाटणारे इकडून तिकडे पळत होते. पेपरवाली पोरे कमीत कमी वेळात पेपर वाटण्याची करामत करत होती. सफाई कामगार खराट्याच्या फणीने रस्ते विंचरत होते. त्यांच्यातला गुंता काढत होते.... आता रस्ते कसे नीटनेटके दिसत होते.... अंधाराचे जाळे फिटू लागले होते. आकाशनगरीतील लक्ष लक्ष रत्नदीप विझू लागले. क्षितीजावर टपोरा शुक्रतारा मोगऱ्यासारखा फुलला होता... उषाराणी रजनीला निरोपाचे विडे देत होती. त्या निरोप समारंभास पक्ष्यांनी संगीत दिलं. मंद, थंड, शीतल मरुतराणा त्याची वार्ता पसरवीत होता. अरुणाच्या रथात बसून रविराज अवकाश भ्रमणाच्या तयारीत होता. त्याच्या स्वागताला रंगांची उधळण आकाश अंगणात झाली. फुलांनी परिमल उधळला. पवित्रता, मंगलता, प्रसन्नता यात जग न्हाऊन निघालं.... हा निसर्ग, हे रम्य दृश्य मला अनोखं होतं. विलक्षण मोहवीत होतं. चराचरामधलं चैतन्य माझ्या गात्रागात्रांत सळसळू लागलं. मी करंटा, रोज याला मुकत होतो.
"ते काही नाही. रोज अभ्यंगस्नान करून, शुचिर्भूत होऊन निसर्गदेवतेला वंदन करायचंच!” निश्चय करून घराच्या अंगणात पाय ठेवला तोच निश्चयाला उजवा कौल देणारी शुभशकुनाची भारद्वाज पक्ष्याची जोडी मला दिसली.
पहाटेची भ्रमंती किंवा एक प्रसन्न पहाट मराठी निबंध
मी यंदाच्या सुट्टीत माझा वर्गमित्र अमित याच्या गावी जायचे ठरवले. अमितच्या गावी येऊन पोहोचलो, तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले होते. अमितच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले. रुचकर भोजन घेतल्यावर निद्रादेवीने माझ्या अंगावर आपले पांघरूण केव्हा घातले, ते मला कळलेच नाही.
मला जाग आली, तेव्हा सभोवार अंधार होता. पहाट झालेली नव्हती. अमितच्या घरातील मंडळी मात्र जागी झालेली होती. त्या सर्वांची नित्याची कामे शांतपणे चालू होती. मी अमितलाविचारले, “बाहेर एक फेरी मारू या का?" अमितने लगेच होकार दिला. मग पहाटेची भ्रमंती करण्यासाठी मी आणि अमित घराबाहेर पडलो. सूर्योदय झालेला नव्हता. दिशा नुकत्याच उजळत होत्या. सारा गाव हळूहळू जागा होत होता. घरोघरी अंगणात सडा-सारवण, झाडलोट ही कामे चालू होती. वातावरण शांत व प्रसन्न होते. मी आणि अमित मूकपणे चालत होतो. शहरात कधी अनुभवायला न मिळणारी नीरव शांतता व प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती.
आम्ही टेकडीवर पोहोचलो. अंधुक अंधुक दिसू लागले. आकाशातील तारे हळूहळू विझू लागले. एखादाच तारा आपले तेजस्वी अस्तित्व दाखवत होता; पण मावळतीचे वेध त्यालाही लागले होते. पूर्वेकडचे आकाश आता केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघाले होते. एखादया विदूषकाने क्षणाक्षणाला रंगीबेरंगी कपडे बदलावेत तसाच हा प्रकार दिसत होता. त्या क्षणी बालकवींची ओळ मनात जागी झाली- 'कुणी उधळिली मूठ नभी ही लाल गुलालाची!'
पाहता पाहता क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाडांना जाग आली. अरुणोदय होत होता. पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले. मनात आले, ही रम्य, प्रसन्न पहाट जो अनुभवतो, त्याचे अंत:करणही तसेच विशाल होते. म्हणून तर खेडेगावांतून अजूनही मानवतेचे दर्शन घडते !
त्या प्रसन्न वातावरणात काही काळ रेंगाळून आम्ही परत फिरलो. परतीच्या वाटेवर घरांच्या छोट्या अंगणात तुळशीवृंदावनांपुढे रांगोळ्यांची शोभा दिसली. रानाकडे निघालेल्या गुरांच्या गळ्यांतील घंटा किणकिणत होत्या. दूरवरून देवळांतील सनईचे मंजूळ सूर कानांवर पडत होते. सारे गाव आता कामाला लागले होते. पण शहरातील धांदल त्यात दिसत नव्हती. सगळीकडे 'प्रसन्नता' भरून राहिली होती. शाहीर होनाजीची 'अमर भूपाळी' जणू साकार झाली होती. पहाटेच्या या आगळ्यावेगळ्या भ्रमंतीने आपण समृद्ध झालो आहोत, असे मला वाटले.
पहाटेची भ्रमंती निबंध मराठी - Morning Walk Essay in Marathi
मार्च महिन्यामध्ये माझ्या वार्षिक परीक्षा संपल्या. वर्षभर अभ्यास करून थकलेल्या मनाला थोडा आराम मिळावा. मनामध्ये पुन्हा उत्साह निर्माण होवा. म्हणून मी या सुट्टीत माझ्या मित्राच्या गावाला जाण्याविषयी बाबांकडून अगोदर परवानगी मिळवली होती. माझा अभ्यास, वर्षभराची मेहनत पाहून बाबांनी सुध्दा मनमोकळेपणाने मला परवानगी दिली होती. त्यामुळे परीक्षा संपल्या संपल्या मी गावाला जाण्याची तयारी केली आणि मी या उन्हाळी सुट्टीत माझा वर्गमित्र दुर्गेश याच्या गावी जायचे निश्चित केले. ठरवल्याप्रमाणे दुर्गेशच्या गावी येऊन पोचलो. जेव्हा मी दुर्गेशच्या गावाला पोहचलो तेव्हा खुपच रात्र झाली होती. दिवसभर शेतामधील काबाडकष्टाची कामे करून गाव एकदम शांत झोपी गेले होते. दुर्गेशच्या घरातील सर्व कुटुंबियांनी अतिशय आनंदाने माझे मोठ्य प्रेमाने स्वागत झाले. रात्रीचे स्वादिष्ट, चवदार, गावाकडचे लज्जतदार जेवण घेतल्यावर केव्हा निद्रादेवीने माझ्या अंगावर आपले पांघरूण घातले, ते मला कळलेच नाही.
मला अगदी पहाटे पहाटे जाग आली, तेव्हा आजुबाजूला अजून सुध्दा सर्वत्र अंधार होता. मी जागा झालो तेव्हा पहाट सुध्दा झालेली नसावी. दुर्गेशच्या घरातील सर्व मंडळी मात्र झोपेतून जागी झालेली होती. त्या सर्वांची दररोजची कामे शांतपणे चालू होती. पहाटेची भटकंती करण्यासाठी मी आणि दुर्गेश घराबाहेर पडलो. दोघेजण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत हळूहळू पुढे पुढे चालत होतो. दुर्गेश त्याच्या गावातील विविध गंमती- जमती याविषयी मला सांगत होता. गावातील सर्वच मंडळी जागी झाली होती. सर्वांची आपआपली कामे शांतपणे चालू होती.
सूर्योदय अद्याप झालेला नव्हता. सभोवार दिशा नुकत्याच उजळत होत्या. आता मात्र सारा गाव हळूहळू झोपेतून जागा होत होता. प्रत्येक घरासमोर अंगणात सडा - सारवण, झाडलोट, गुरा-ढोरांची ही कामे चालू होती. सर्वत्र गावातील वातावरण शांत, प्रसन्न आणि मनमोहक होते. शांतपणे हे सर्व दृश्य पाहत पाहत मी आणि दुर्गेश चालत होतो. गर्दीने गजबजलेल्या, नेहमी धावपळीच्या शहरात कधी अनुभवायला न मिळणारी नीरव शांतता, अल्हाददायकता, थंडगार गारवा व प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती.
लवकरच आम्ही एका जवळच्या टेकडीवर येऊन पोचलो. सूर्योदय होण्याला आता थोडाच वेळ शिल्लक असावा म्हणून आता आजूबाजूला अंधुक अंधुक दिसू लागले होते. आकाशातील सर्व तारे हळूहळू दिसेनाशे होऊ लागले होते.
पूर्व दिशेला आकाश आता केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघायला सुरुवात झाली होती. एखाद्या सर्कसमधील विदूषकाने क्षणोक्षणी रंगीबेरंगी कपडे बदलावेत तसाच हा सर्व प्रकार मला वाटत होता. त्या क्षणी बालकवींची ओळ मनामध्ये जागी झाली -
'कुणी उधळिली ही मूठ नभी लाल गुलालाची!'
पाहता पाहता हळूहळू पूर्वेकडील क्षितिजाची कडा पिवळसर सोनेरी होऊ लागली. सर्वत्र पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाडे सुध्दा जागी होऊ लागली होती. पूर्वेला मनमोहक अरुणोदय होत होता. पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले होते. मनात आले, ही रम्य प्रसन्न अल्हाददायक अशी पहाट जो अनुभवतो, त्याचे अंतःकरणही तसेच विशाल होते. म्हणून तर खेडेगावांतून, गावागावातून अजूनही मानवतेचे, माणसुकीचे उद्दात दर्शन आपल्याला घडते!
त्या प्रसन्न वातावरणात, नीरव शांतता असणाऱ्या हिरव्यागार परिसरामध्ये काही क्षण घालवून आम्ही परत फिरलो. परतीच्या वाटेवर प्रत्येक घरांच्या छोट्या अंगणात तुळशीवृंदावनांपुढे रांगोळ्यांचे छान आणि उठावदार नक्षीकाम दिसले. काही घरांपुढे तर विविध रंगांनी रांगोळीकाम सजवले असल्यामुळे ते मनाला खूप मोहित करत होते. ते सुंदर नक्षीकाम पाहून त्यांचा फोटो मोबाइल मध्ये काढण्याचा माझा मोह आवरला नाही. या सर्व अविस्मरणीय आठवणी मी माझ्या मोबाइल जपून ठेवायच्या असे ठरवले होते. रानाकडे चारा खाण्यासाठी निघालेल्या गुरांच्या गळ्यांतील घंटा किणकिणत होत्या. दूरवरून मंदिरातील सनईचे मंजूळ सूर कानांवर पडत होते. सारे गाव आता कामाला लागले होते. पण शहरातील सततची धावपळ, धांदल, गर्दी त्यात कोठेच दिसत नव्हती. सगळीकडे वातावरणामध्ये 'प्रसन्नता, आल्हाददायकता, मनाला निरव आत्मसुख देणारी शांतता' भरून राहिली होती. होनाजी या प्रसिद्ध शाहीरची 'अमर भूपाळी' जणू या ठिकाणी साकार झाली होती.
पहाटेच्या या आज झालेल्या आगळ्यावेगळ्या भ्रमंतीने आपण समृद्ध झालो आहोत, असे मला वाटले.
COMMENTS