Tuesday, 6 October 2020

Marathi Essay on "Mi Paus Boltoy", "पावसाचे मनोगत निबंध मराठी", "मी पाऊस बोलतोय आत्मकथन निबंध" for Students

Mi Paus Boltoy Essay in MarathiIn this article पावसाचे मनोगत निबंध मराठी, "मी पाऊस बोलतोय आत्मकथन निबंध" for students. Pavsache Atmavrutta Marathi Nibandh or class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Mi Paus Boltoy", "पावसाचे मनोगत निबंध मराठी", "मी पाऊस बोलतोय आत्मकथन निबंध" for Students

रविवारची सुट्टी म्हणून आई आणि बाबा बाजारहाट करायला बाहेर गेले होते. घरात मी एकटीच होते, अभ्यास करत! 

एवढ्यात बाहेर अंधारून आलं, अरेच्चा! असं कसं झालं? आता तर लख्ख सूर्यप्रकाश होता. बाप रे! ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि पावसाचे टप्पोरे थेंबही पडू लागले. मला तर भीतीच वाटली. आई-बाबांनी तर छत्री पण नेली नाहीये. आता ते दोघं भिजणार, या कल्पनेनंच मला रडू कोसळलं. मी खिडकीजवळ उभी राहून त्यांची वाट पाहत होते. मी सहज खिडकीतून हात बाहेर काढला. माझ्या हातावर पावसाचे थेंब टपटप पडू लागले. तो थंडगार स्पर्श मला आवडला. मी माझ्या ओल्या हातांनी चेहऱ्यावरून 'पाऊस' फिरवला. अहा! किती मस्त वाटलं सांगू...

माझ्या हातातील पावसाचे काही थेंब खाली जमिनीवर पडले आणि माझ्याशी चक्क बोलू लागले...

"अवनी, तुला आवडतो ना आम्ही?" मी म्हणाले, हो... मला पावसाळा आवडतो; पण आज असा अचानक कसा काय तू आलास? आई-बाबांनी तर छत्रीपण नेली नाहीये. तू तर जूनमध्ये येतो ना? आज सगळ्यांचीच तारांबळ उडवलीस तू!"

पावसाचे थेंब हसत-हसत म्हणाले, “कशी फजिती झाली सगळ्यांची! बरं का अवनी, आमच्या येण्या-जाण्याच्या वेळा कधीच निश्चित नसतात. आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा पृथ्वीवर बरसतो. तुम्हा माणसांना मात्र वाटतं की, आम्ही तुमच्या तालावर नाचावं; पण आम्हाला नाही ते आवडत! 

तुम्ही माणसं निसर्गाला ताब्यात घेऊ पाहता! स्वार व्हायचं असतं तुम्हाला निसर्गावर! आणि म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्वापार वाढलेली, घनदाट सावली देणारी, प्राणी-पक्ष्यांचा आसरा असणारी झाडं इंधनासाठी, कधी फर्निचरसाठी, कधी घरबांधणीसाठी, तर कधी रस्ता रुंदीकरणासाठी कापून टाकता.

आम्हाला पृथ्वीवर यायला खूप आवडतं. सगळ्या धरित्रीला न्हाऊ घालून हिरवंगार नटवायला आवडतं. नदया, नाले, तलाव जेव्हा भरून वाहतात तेव्हा खूप आनंद होतो आम्हाला आणि तुम्हीपण आमचं ते रूप पहायला, हिरव्यागार अवनीच्या दर्शनासाठी घरापासून किती दूरवर सहलीला जाता, हो ना?

आम्ही कधी नाचत-नाचत, तर कधी शांतपणे पृथ्वीवर अवतरतो. हा वारा खूप खट्याळ आहे, तोच आम्हाला बेशिस्त बनवतो. आमची काही भावंडं शिंपल्यात पडून मोती होऊन एखादया युवतीच्या गळ्यात विराजमान होतो तर कधी कमल दलांवर सी-सॉ खेळत मज्जा करतो. कधी रंगीबेरंगी फुलपाखरांशी खेळतो, कधी शेतामध्ये डोलणाऱ्या कणसांसोबत मस्ती करतो. पक्ष्यांच्या पंखांवर बसून उंच आभाळातून चक्करही मारून येतो.

झाडांच्या शेंड्यावरून, खोडांवरून, डोंगरदऱ्यांतून घसरगुंडी खेळतात. मोरही आम्हाला पाहून त्याचा सुंदर पिसारा फुलवून नाचतो व आनंद व्यक्त करतो. चातकपक्षी तर केवळ आमच्यासाठी तहानलेला असतो.

शेतकरी दादा डोळ्यात प्राण आणून आमची वाट पाहत असतो. उन्हानं तापलेल्या धरणीमातेकडे आम्ही जेव्हा झेपावतो तेव्हा माय-लेकराची गाठ पडावी इतका आम्हाला आनंद होतो. देवानं ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच आम्हाला पृथ्वीवर येता येतं; पण कधी कधी आमच्याकडूनही चुका होतात. मग 'अवकाळी' पावसाच्या नावानं तुम्ही बोटं मोडता, हो ना? पण आम्हाला तुमच्या डोळ्यात पाणी पहायला नाही आवडत. माझी विविध रुपं चित्रकार आपल्या कुंचल्यातून आणि लेखक-कवी आपल्या शब्द फुलांद्वारे रेखाटतो, मला आवडतं ते! अगं अवनी, तुझे आई-बाबा आले वाटतं भिजून, जा दरवाजा उघड त्यांच्यासाठी पटकन् मी परत येईन तुझ्याशी गप्पा मारायला!" हे ऐकलं आणि अवनी आनंदानं दरवाजाकडे पळाली.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: