Essay on Advertisement in Marathi Language : In this article " जाहिरातीचे सामर्थ्य मराठी निबंध ", " जाहिरातीचे फायदे आणि तोटे...
Essay on Advertisement in Marathi Language: In this article "जाहिरातीचे सामर्थ्य मराठी निबंध", "जाहिरातीचे फायदे आणि तोटे मराठी निबंध" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Advertisement", "जाहिरातीचे सामर्थ्य मराठी निबंध", "जाहिरातीचे फायदे आणि तोटे मराठी निबंध"" for Students
वर्तमानात विज्ञानाने सर्वच जीवनक्षेत्रे व्यापून टाकली आहेत. पुष्कळदा त्यामुळे त्या क्षेत्राचे मूळचे स्वरूपही बदलून गेलेले असते. जाहिरातीचे वर्तमान स्वरूप व जाहिरात करण्याची विविध माध्यमे पाहता, जाहिरातीचा उद्देशच विज्ञानाच्या प्रभावाने बदलून गेला आहे की काय असे वाटू लागते. एका चित्रपटाची जाहिरात तर मोबाइलवरून अनेक मोबाइलधारकांपर्यंत पोहोचवली गेली होती. प्रत्येकाला असे व्यक्तिगत महत्त्व मिळाले तर आपोआपच त्या गोष्टीकडे अधिक जिव्हाळ्याने पाहिले जाते. अशा व्यक्तीला महत्त्व देणारी व व्यक्तिव्यक्तींपर्यंत पोहोचण्याची गरज जाहिरातीला प्रथमपासूनच जाणवलेली आहे. मुद्रणकला व दळणवळणाची अतिगतिमान अशी साधने नसलेल्या मध्ययुगीन कालखंडातही जाहिराती मौखिक पातळीवर केल्या जात होत्या. इंदुरी, पैठणी इत्यादी कपड्यांच्या पेठांची जाहिरात कीर्तन, गोंधळ, भारुडे या प्रसारमाध्यमांतून होत होती. मध्ययुगीन काळातील कालविपर्यासाचा दोष पत्करूनही आलेली वर्णने आणि कीर्तनाच्या साहाय्याने गावोगावी त्यांचा होणारा प्रसारही तात्त्विक दृष्टीने जाहिरातच होती. फक्त ती साहित्याच्या माध्यमातून, अनुषंगाने आलेली होती; कारण त्या काळी स्वतंत्रपणे जाहिरात करण्याची कल्पना लोकांसमोर असण्याची शक्यता कमीच. तसे पाहू गेले तर आपल्या नेहमीच्या बोलण्यातही आपण एखाद्या पर्यटनस्थळाची, आवडलेल्या चित्रपट-नाटक-पुस्तकाची भलावण करीत असतो. ऐकणाऱ्याने त्या त्या गोष्टींचा अनुभव घ्यावा ही त्यामागे इच्छा असतेही; पण त्यापासून आपल्याला आर्थिक पातळीवर जोपर्यंत फायदा मिळवावयाचा नसतो तोपर्यंत तिचे स्वरूप केवळ माहितीचे असते; जाहिरातीचे नसते.
आज जाहिरात हे स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित झालेले आहे. त्याचे तंत्र, मंत्र व त्याआधारे एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून जाहिरातक्षेत्राचा प्रभाव वाढत चाललेला आहे. वर्तमानपत्रे, पोस्टर्स, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट-मध्यंतरे, विक्रेते, ग्रंथ इत्यादी अनेक मार्गांनी जाहिरातींनी आपले जीवन व्यापून टाकलेले आहे. काय खायचे, काय ल्यायचे, चैन कशी करायची, प्रवास कसे व कोणत्या प्रदेशात, कोणत्या कालखंडात करायचे, कलांचा आस्वाद कसा घ्यायचा व प्रामुख्याने जीवनाचा उपभोग विविधांगांनी कसा घ्यायचा याचा एक आराखडाच जाहिरातींनी आपल्यासमोर रेखाटलेला असतो. 'चकाकते ते सोने नसते' असे म्हटले जाते; पण जाहिरातींची अशी झळाळी प्राप्त झालेल्या पितळेपढे सोन्याचे तेजसदा फिके पडते इतके जाहिरातीचे आक्रमण वर्तमानकालीन जीवनावर प्रभावी ठरत चालले आहे. जाहिरात केली तर माताल हे अक्षरश: या जाहिरातींनी सिद्ध करून दाखविले आहे. खऱ्याचे खोटे किंवा खोट्याचे खरे करण्याचे वकिली तंत्र जाहिरातींच्या माध्यमाला साधले आहे; म्हणूनच साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकरांनी जाहिरातीला 'पासष्टावी कला' असे म्हटले आहे. भारतीयांनी चौसष्ट कला मानल्या. त्यांमध्ये जाहिरात ही पासष्टावी कला होय. जाहिरातीमध्ये कलात्मकतेला जरूर स्थान आहे; पण या कलात्मकतेला उपयुक्ततेची जोड असते. ही कला विशुद्ध कला नसते. तिच्या निर्मितीमागे वस्तूची वाढती विक्री हे ध्येय असल्याने कलेचे स्थान साधनाचे, म्हणजेच दुय्यम असते. मुलीला दोन सेकंदांत मॅगी करून देणाऱ्या जाहिरातीमध्ये मातृवात्सल्य दाखवायचे नसते; तर 'मॅगी'ची उपयुक्तता पटवून द्यायची असते.
जाहिरातीचे नेमके कार्यक्षेत्र कोणते? वर्तमानपत्रातली जाहिरात व बातमी यांमध्ये फरक कोणता? बातमी, माहिती, परिचय, लेख या प्रकारांमध्ये वास्तवाला व सत्यतेला महत्त्व असते; पण जाहिरातीमध्ये हे वास्तव लक्ष्यवेधी करण्यासाठी कलेतील अतिशयोक्तीची व कल्पकतेची मदत घेतलेली असते. तिचे त्याद्वारा विक्रीमूल्य वाढावे व लोकांना ती वस्तू खरेदी करण्याचे आकर्षण वाटावे हा स्पष्ट हेतू बाळगून जाहिरात तयार होत असते. तिच्या कलात्मकतेचा किंवा कल्पकतेचा हा मुख्य हेतू असतो. त्या विशिष्ट वस्तूची उपयुक्तता लोकांना पटवून देणे व ती वस्तू खरेदी करायला ग्राहकाला प्रवृत्त करणे हा हेतू जाहिरातीद्वारे साधला जात असतो; म्हणून जाहिरातीमधील कल्पकतेला व अतिशयोक्ती वर्णनाला वस्तुवैशिष्ट्याची बैठक असावी लागते. उदाहरणार्थ- कोणत्याही साबणाच्या जाहिरातीमध्ये साबणाची ‘स्वच्छता करणे' हा गुणधर्म डावलून चालत नाही.
एकाच क्षेत्रातील वस्तूंची अशी वेगवेगळ्या कंपन्यांकडून होणारी निर्मिती जाहिरातीसमोर आव्हाने उभी करते. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी त्यांना जाहिरातीचा अधिक कौशल्याने उपयोग करून घ्यावा लागतो. ही स्पर्धा निकोप असायला पाहिजे. तिचा रोख वस्तूच्या गुणवैशिष्ट्यांकडे निर्देश करणारा पाहिजे. जाहिरातीद्वारा जे विशेष दिलेले असतील त्याची प्रचीती ग्राहकाला येणे हे जाहिरातीचे खरे यश होय. जाहिरातीच्या मार्गाने ग्राहकाला निवड करायला वाव मिळत असतो. विविध कंपन्यांच्या त्याच त्या वस्तूंपैकी त्याच्या पसंतीला एखाद्या कंपनीचा माल येतो. त्याच मालाची सातत्याने खरेदी करण्याकडे त्याचा कल राहावा व त्याने दुसरा तसाच माल खरेदी करू नये, यासाठी त्या मालाची जाहिरातही नित्य नवे रूप घेणारी असावी लागते. मुख्य म्हणजे लोकांच्या मागणीनुसार त्या मालाच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये बदल व नवेपणा यायला पाहिजे. सुधारित माल जाहिरातीची नित्यनूतनता जपत असतो. ही वस्तू ग्राहकाला सहजपणे, कुठेही विकत घेता आली पाहिजे. जाहिरातीद्वारे ग्राहकसंख्या वाढती ठेवायची तर मालाची विपुलता असायला पाहिजे व विपुल प्रमाणात मालाची निर्मिती केली तर ग्राहकसंख्या वाढती राहायला जाहिरातीने मदत केली पाहिजे. देश-परदेशात या मालाला 'मार्केट' मिळविता आले पाहिजे. त्यासाठी केवळ वर्तमानपत्रादी माध्यमे अपुरी ठरू लागली आहेत. इंटरनेट व वेब यांच्या साहाय्याने मालाची विक्री व ग्राहकांपर्यंत उपलब्धी सोयीची होऊ लागली आहे. जाहिरातीच्या सगळ्या सीमा पार करण्याची व यशशिखरे गाठण्याची सिद्धीच याद्वारे जाहिरातीच्या हातात मिळाली आहे. यासाठी कधी कधी करावी लागणारी नियमांची, कायद्यांची व नैतिकतेची पायमल्ली दुर्लक्षित केली जात आहे, हे सत्य विसरून चालणार नाही. तयार झालेल्या मालाची गुणवैशिष्ट्यांसह ग्राहकाला माहिती करून देणे व खरेदीला प्रवृत्त करणे हे कार्य मनाशी धरून आलेली जाहिरात त्या तत्त्वाशी बांधील राहते काय? बाजारात टिकण्यासाठी भरमसाट जाहिरातबाजी करणे व दुय्यम किंवा नकली माल घ्यायला ग्राहकाला प्रवृत्त करणे हे सामाजिक स्वास्थ्य प्रक्षित करणारे आहे.
कुठलाही नवा माल जेव्हा बाजारात येतो तेव्हा आधीच्या तत्सदृश मालांच्या पार्श्वभूमीवर त्याला जाहिरातीची गरज भासते. त्या मालामध्ये वेगळेपणा असावा लागतो व त्याचे विक्रीमूल्यसुद्धा तुलनेने अल्प असावे लागते. पण एकदा का त्याचा खास ग्राहकवर्ग तयार झाला, त्या विशिष्ट Brand शिवाय दुसऱ्या मालाकडे न पाहणारा खास त्याचा ग्राहकवर्ग निश्चित झाला की, त्याचे विक्रीमूल्य वाढत्या महागाईच्या व वाढत्या निर्मितीमूल्याच्या तत्त्वांवर वाढू लागते. जोपर्यंत त्या मालाच्या गुणवत्तेमध्ये उणेपण येत नाही तोपर्यंत ग्राहक त्याच मालाची खरेदी करण्यावर भर देतो. पण ग्राहकसंख्या वाढू लागली म्हणजे मागणी वाढली की पुरवठा वाढवावा लागतो व मालाची गुणवत्ता घसरू लागते. एकदा त्या कंपनीचे नाव झाले की नवे ग्राहकही खरेदी करताना फारसे चिकित्सक राहत नाहीत. ग्राहकाच्या या विश्वासू वृत्तीचा फायदा जाहिराती घेऊ लागतात. मालनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या फायद्याचा असा मार्ग शोधताना आपण ग्राहकाची विश्वासार्हता गमावत आहोत, याचे भान जाहिरातीमध्ये नसते. उलट, ग्राहकाला गाफील ठेवण्याचे कार्यच अशा जाहिरातीकडून केले जात असते.
बाजारात येणाऱ्या नव्या मालाला तत्सदृश मालाच्या जाहिरातींकडे लक्ष द्यावे लागते. जी जाहिरात व जो माल ग्राहकपसंतीला उतरलेला असतो त्याची नक्कल करून आपल्या मालाला उठाव आणणे, हे कार्य जाहिरातीत सतत चालत असते. गाजलेल्या कंपनीच्या सारखेच सर्व स्वरूप त्यांचेच वाटावे असे शिक्के शोधून दारोदारी विक्री करणारे विक्रेते जाहिरातीचा गैरवापरच करीत असतात. जेव्हा हा माल डुप्लिकेट (नकली) आहे असे ती कंपनी जाहिरात करेल व ते लोकांपर्यंत पोहोचवेल तोपर्यंत विक्रेत्यांनी ग्राहकांच्या गळ्यात तो माल सफाईने बांधलेला असतो. एखाद्या दुकानातून घेतलेला माल पटला नाही तर किंवा नकली किंवा खराब निघाला तर ग्राहकाजवळ तो परत करण्याचे व आपली तक्रार नोंदविण्याचे काही साधन तरी असते; पण दारोदारी विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर अशी कारवाई करता येणे कठीण जाते. रामदासांनी राजकारणात वावरताना सावधानतेचा इशारा दिला आहे; पण सर्वसामान्य माणसांना जाहिरातबाजी व तिचे चालतेबोलते हस्तक यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा वर्तमानयुगातील जाहिरातींपासून पाळावा लागतो! मात्र जाहिरातीला सरावलेल्या आजच्या सुजाण ग्राहकाला जाहिरातीचे हे स्वरूप परिचित झालेले आहे. साबण, पावडर, चहाकॉफी इत्यादींच्या विविध कंपन्यांच्या आकर्षक जाहिरातींमधून तो फक्त पाहतो; त्यामधून फक्त माहिती घेतो; आणि स्वत:च्या अनुभवाच्या आधारावर वस्तूची निवड करतो.
कोणत्याही क्षेत्रातील व्यापारी वर्गाला व कारखानदारीला आर्थिक दृष्टीने जाहिरात करणे हे फायदेशीर ठरते; नव्हे, ती वर्तमानकालीन जीवनाची अत्यावश्यक घटक बनलेली आहे. जाहिरातीतील मजकूर खरा की खोटा हा नंतरचा भाग; पण आधुनिक काळामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा तो मार्ग झालेला आहे. मालाची खरेदी करणारी व्यक्ती समाजातील असते. या समाजातील व्यक्तीला मालाची माहिती करून देणे, पटवून देणे व तिला त्याची गरज आहे हे आग्रहाने तिच्या मनावर बिंबवणे हे काम जाहिरात करीत असते. ही व्यक्ती ज्या समाजाचा घटक असते त्या समाजाच्या संस्कृतीचे काही निकष असतात; काही आदर्श असतात; काही आचरणीय तत्त्वप्रणाली असते. त्याचा त्या समाजघटक असलेल्या व्यक्तीच्या मनावर पगडा असतो. समाजाचे हे नैतिक वास्तव जाहिरातीने लक्षात घ्यायला पाहिजे. कल्पकतेच्या नावाखाली आपल्या मालाला उठाव आणून देताना या तत्त्वांना डावलून किंवा त्यांचा फायदा उठवून, नवतेच्या नावाखाली जाहिरातीने आकर्षक बनण्याचा प्रयत्न करणे हे गैर आहे. व्यसनांच्या मालाची जाहिरात करताना मोठमोठ्या थोर व आदरणीय व्यक्तींच्या व दैवतांच्या नावांचा उपयोग या दृष्टीने खटकणारा आहे.
कोणत्या प्रकारच्या मालाची जाहिरात करावी व कोणत्या प्रकारच्या मालाची जाहिरात करू नये; याचा कोणताही निश्चित निकष नसतो. सामाजिक दृष्टीने, समाजाला व्यसनांकडे नेणाऱ्या वस्तूंचीही निर्मिती होत असते व त्यांचा खास ग्राहकवर्ग त्या प्रकारच्या माहितीसाठी जाहिरातीकडे वळतो. या अशा मालांच्या जाहिरातीमुळे सामाजिक क्षेत्रात व्यसनांचे प्रमाण अतिरिक्त वाढते; त्याला जाहिरात जबाबदार धरता येईल काय? या व्यसनाधीनतेसाठी महान व थोर व्यक्तींची नावे जाहिरातीला उपयुक्त ठरतात. व्यसनांची जाहिरात, अनैतिक मालाची जाहिरात, जाहिराती थांबविल्याने थांबणार नाहीत व जाहिरात हे असे क्षेत्र होत चालले आहे की त्याला हे जाणवले तरी परडवणारे नाही. ते अशा सामाजिक जबाबदारीतील नैतिकता जाणूनबुजूनही दुर्लक्षित करू शकते; कारण त्याचे लक्ष आर्थिक संपन्नतेवर स्थिर झालेले असते. समाजातील व्यक्तीही सततच्या अशा जाहिरातीने संस्कृतीमधील नैतिक, पारंपरिक मूल्यांपासून अलिप्त व्हायला लागते. उदाहरणार्थपोशाखातील व पेहेरावातील आकर्षकतेच्या नावावर येत असलेल्या वर्तमानकाळातील जाहिरातीतील ‘फॅशन्स' सांस्कृतिक मूल्यांना तर गुंडाळून ठेवत आहेतच; पण सांस्कृतिक मूल्ये बाळगणे हेच जुनाटपणाचे लक्षण आहे हा समज लोकमानसात त्यांनी रुजविला आहे.
एक काळ असा होता की, जाहिरात ही कायद्याच्या चौकटीत बसणारी असावी; सत्यतेवर आधारलेली असावी; तिला संस्कृतीचे अंगभूत बाळकडू असावे; ती प्रामाणिकपणाला जपणारी असावी; हा तिच्याबद्दलचा समज कमीजास्त प्रमाणात ती दृढ करू पाहत होती. जसे दागिने घडविताना सोनार अस्सल सोन्यामध्ये हिणकस भाग थोडा तरी मिसळणारच, तसेच जाहिरातीत थोडे जास्त करून' सांगितलेले असणारच हे गृहीत धरलेले असते; पण त्यातील अस्सल व हिणकस यांचे प्रमाण ठरलेले असते. ते जेव्हा हिणकसतेकडे झुकते तेव्हा ग्राहकाची फसवणूक होते. तीच गोष्ट जाहिरातीमध्ये घडत आहे. आज जाहिरातीचे जे प्रमाणनिकष ठरविले जात आहेत त्यांमध्ये कायद्याचे, नैतिकतेचे, सत्याचे व प्रामाणिकतेचे वरवरचे स्वरूप अस्सल असते; पण या सर्व क्षेत्रांतील पळवाटीचा फायदा जाहिरातींमध्ये पुरेपूर घेतला जात आहे. या सर्व क्षेत्रांतील मर्यादा जिथे जिथे अंधूक व अस्पष्ट आहेत; त्या त्या जागा हेरून जाहिराती आपले हातपाय पसरवीत असतात. अशा अनेक उदाहरणांमध्ये व्यक्तिगत आवडीनिवडी प्रभावी ठरतात. कायदा, नैतिकता इत्यादींच्या चौकटीत राहिल्यासारखे दाखवून समाजघातक कल्पना जाहिरातींमधून प्रसृत करीत असतात.
'खोटे बोलणार नाही; खरे तेच सांगेन' अशी कोर्टातील शपथ घेऊन जाहिरात आलेली नसते; पण तरीही तिला खऱ्याखोट्याचे भान ठेवावे लागते. त्या 'सत्याचा शेवटी विजय होतो आणि खोटेपणा कधी ना कधी कळून येतो' यामुळे नाही. जाहिरातीने नेहमी प्रामाणिक असावे असे म्हटले जाते. त्यामागे जाहिरातीची दूरदर्शी दृष्टी असते. प्रामाणिकपणाच्या आधारावरच तिची विश्वासार्हता अवलंबून असते. विशेषतः अनभिज्ञ ग्राहकाच्या विश्वासार्हतेवर ही जाहिरात जास्त प्रमाणात अवलंबून असते. पुष्कळदा आर्थिक उलाढालींच्या जाहिरातींमध्ये ठळक अक्षरांतील लेखन फक्त वाचले जावे असे असते; आणि ग्राहकाला ते आकर्षित करते. तंबाखू, गुटखा यांच्यासारख्या व्यसनांच्या जाहिरातीमध्ये तर मर्दानीपणाची किंवा शूरत्वाची प्रौढी मिरवलेली असते आणि कायद्यातून काढलेली पळवाट अत्यंत बारीक टाइपमध्ये छापलेली असते. अशा मखलाशीमुळे माणसे व्यसनाकडे वळतात, असे म्हणता येत नाही. पण माणसांचा व्यसनांकडे असलेला कल या अशा जाहिरातीमुळे वाढतो आणि व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम त्यांच्या मनावरून पुसले जातात. हा जाहिरातीचा प्रभाव समाजविघातक आहे.
जाहिरातीत सुसंस्कृतपणाच्या मर्यादा पाळल्या जाव्यात ही अपेक्षाही पूर्ण केली जात नाही. जाहिरातीमध्ये विशेषतः दूरदर्शनसारख्या दृक्-श्राव्य माध्यमाच्या जाहिरातींचा भर प्रामुख्याने 'दृश्यते'वर अधिक असतो. याचा फायदा उठविण्याची कल्पना जाहिरातीला सुचली नसती तरच नवल! पोशाख, पेहराव, पुरुषी प्रसाधने इत्यादींच्या जाहिरातींमध्ये आवश्यक असो किंवा नसो स्त्रियांची रेखाटने, तीही शृंगारिक त-हेने आल्याशिवाय भागतच नाही. चित्रपटात जशी चुंबनदृश्यांवर बंदी असते; पण बलात्काराच्या तपशीलवार चित्रणाला आडकाठी नसते. तीच गोष्ट जाहिरातीमधील स्त्रीविषयक दृश्यांबद्दल म्हणता येईल. कधी कधी ज्या मालाची जाहिरात असते त्याचा व त्या स्त्रीचित्राचा अर्थाअर्थी संबंधही नसतो. काहींमध्ये मात्र कल्पकता असते. मूळ प्रश्न असा की, या स्त्रीदृश्यांमुळे किंवा स्त्रीप्रतिमेमुळे काय साधले जाते? अशा स्त्रीप्रतिमांशी निगडित असलेल्या जाहिरातींचा आस्वाद घेताना मनामध्ये ती दृश्ये आल्याशिवाय राहत नाहीत. जाहिरातीतील दृश्यांप्रमाणे त्या विशिष्ट पावडरच्या सुवासाने कोणीतरी आकर्षित होऊन आपल्या मागे येईल; अशी स्वप्ने जागविण्याची सवय ग्राहकाला लागते. दृश्यांचा समाजमनावरचा परिणाम लक्षात घेता अशा जाहिरातीतील दृश्यांनी कोणती बंधने पाळावीत, हे लक्षात येऊ शकेल; पण जाहिरातीला समाजमनावर परिणाम करायचा असतो तो खरेदीच्या दृष्टिकोनातून. त्याचे समाजाशी, सामाजिक परिणामाशी याव्यतिरिक्त काही देणेघेणे असते, हे मानण्याची त्याला गरज वाटेनाशी झालेली आहे. समाजाची स्त्रीकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे; अनैतिकतेकडे वळली आहे. याला कारण फक्त जाहिरातीच आहेत असे मात्र समजता कामा नये. चित्रपटसृष्टीही त्याला कारणीभूत आहे. जाहिरातीच्या स्त्रीप्रतिमांच्या माध्यमातून त्याचा नुसताच प्रसार होतो असे समजण्याचे कारण नाही, तर त्याला प्रतिष्ठा येऊ लागली आहे, हे धोकादायक आहे.
जाहिरातीमध्ये स्त्रीप्रतिमा टाळाव्यात असे नाही. जाहिरातीने कोणत्या गोष्टीकडे ग्राहकाचे लक्ष वेधावे हा मुद्दा विचारात घेतला पाहिजे. एखाद्या पेयाच्या जाहिरातीसाठी किती शारीरिक कसरती व संकटे पार केलेली दाखवावी, याला काही मर्यादा असावी. बालकांच्या सुदृढतेच्या किंवा त्याच्या संदर्भातील संगोपनाविषयीच्या वस्तूंच्या जाहिरातीमध्ये, वस्तूच्या घटकांमध्ये असलेला विशेष येण्यापेक्षा आईची देखभाल चित्रित करण्यावरच भर असतो. जीवनविमा वा अशाच प्रकारच्या जाहिरातीमध्ये व्यक्तीने काळजी घ्यावी याकडे लक्ष वेधण्यापेक्षा त्याला भयभीत करण्याकडे अधिक कल असतो.
जाहिरातीला कोणतेही जीवनक्षेत्र वर्ण्य नाही. ज्या वस्तूंची जाहिरात झालेली नाही आणि तरीही ती ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे, अशी वस्तू दाखविणे आज जवळजवळ अशक्यच म्हणायला पाहिजे. या जाहिरातीचा विषय असलेल्या वस्तूंपैकी काही खरोखरीच जीवनावश्यक असतात; तर काही वस्तूंची जीवनावश्यकता ठराविक वर्गापुरतीच असू शकते. काही वस्तू मात्र सुरुवातीला सुखासीन व चैनीच्या जीवनाची चटक वाढविणाऱ्या असतात. कदाचित माणसाच्या आयुष्यातील आनंदाचा संबंध त्यांच्याशी असेलही; पण या चैनीशी, व्यसनांशी किंवा मौजमजेशी संबंधित असलेल्या वस्तूंची आवश्यकता, नित्यासाठी उपयुक्तता जाहिराती पटवून देऊ लागल्या आहेत. चैनीच्या व गरजेच्या, यांच्यातील पुसट होणाऱ्या सीमा जाहिरातीने आणखीनच अंधूक केल्या आहेत. गरजेच्या दृष्टीने दुय्यम असलेल्या वस्तूंची भुरळ घालण्याचे कार्य जाहिरात करीत असते. फॅशनेबल वस्तूंची गरज पटवून देण्याचे कार्य जाहिरातीने केले जात आहे; त्यामुळे कमीत कमी गरजांपेक्षा जास्तीत जास्त वैभवी व फॅशन्सच्या वस्तूंवर आधारलेले जीवन आजच्या पिढीला आकर्षित करीत आहे. जेव्हा जीवनमूल्यांपेक्षा अत्याधुनिकता व पोशाखी वृत्ती प्रभावी होऊ लागते तेव्हा जीवनाचा तोल सावरायला पाहिजे. जाहिरातीच्या वाढत्या आक्रमणाने हा तोल सावरायची जाणीव लुप्त होऊ लागली आहे.
हे टाळायचे असेल तर जाहिरातदारांनी स्वतःहोऊन काही बंधने स्वीकारायला हवीत. त्यांनी व्यक्तीच्या किंवा समाजाच्या नीतिरक्षणाची जबाबदारी उचलावी, असे कुणीही म्हणणार नाही; पण सामाजिक बांधिलकीची किमान जाणीव तरी त्यांनी बाळगायला पाहिजे, नाही तर समाजाच्या हासाबरोबरच ते स्वत:चीही अवनती करून घेतील. जाहिरात करणे हेच एक व्यसन ठरेल. सामाजिक जबाबदारीची जाणीव बाळगणारी जाहिरात समाजाला प्रभावित करण्याचे, संस्कार देण्याचे व ध्येयप्रेरित करण्याचे कार्य करू शकते. तिच्याजवळ ते सामर्थ्य निश्चित आहे आणि प्रत्येक मालाच्या जाहिरातीच्या प्रसंगी या दृष्टिकोनातून तिने विचार केलेला असावा, ही चांगल्या जाहिरातीकडून अपेक्षा असते. शब्दांमध्ये, मांडणीमध्ये, दृश्यांमध्ये एक प्रकारे भारावून टाकण्याचे सामर्थ्य आहे, हे लक्षात ठेवून आर्थिकतेकडे लक्ष देण्याचे भान तिने ठेवायला हवे.
सारांश
ग्राहकाला वस्तूचा ठावठिकाणा माहिती करून देऊन वस्तू खरेदी करायला प्रवृत्त करणे हा जाहिरातीचा हेतू. जाहिरातीतून वस्तूचे वैशिष्ट्य लक्ष्यवेधी केलेले असते; व्यावसायिक दृष्टी प्रमुख असते; पण स्पर्धेमधून तिच्यात अनेक दोष शिरले आहेत. इंटरनेट-वेब यांसारख्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्या प्रसाराला मदत होत आहे. नैतिकतेचे बंधन पाळण्यापेक्षा तोडण्याकडे जाहिरातीचा कल वळलेला आहे. नकली व दुय्यम पातळीवरच्या वस्तूची जाहिरात अस्सल म्हणून करून समाजाला फसविण्यात ती पारंगत होत आहे. ग्राहकाला मोह पाडून ती समाजसंस्कृतीला घातक अशा सवयी रूढ करू पाहत आहे. असभ्यता, असंस्कृतपणा यांना फॅशन्सच्या नावाखाली जाहिरातीत स्थान मिळत आहे. जाहिरातीने आपले समाजाला प्रभावित करण्याचे सामर्थ्य समाज घडविण्याकडे वळवावे. संस्कृतिसंवर्धन करणे जमले नाही तर निदान संस्कृतिभंजन तरी करू नये.
COMMENTS