Essay on Veer Savarkar in Marathi : In this article " स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी ", " स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाषण...
Essay on Veer Savarkar in Marathi: In this article "स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी", "स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाषण", "Swatantryaveer Savarkar Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Veer Savarkar", "स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी", "Swatantryaveer Savarkar Marathi Nibandh" for Students
'जे देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले
२८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्हयातील 'भगूर' या छोट्याशा गावात दामोदरपंत सावरकर यांच्या घरी एक पुत्ररत्न जन्माला आले. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले.
विनायक नऊ वर्षांचा असताना त्याची आई राधाबाई स्वर्गवासी झाली; पण वडिलांनी आईच्या मायेने मुलांचा सांभाळ केला.
विनायकचा मोठा भाऊ गणेश आणि विनायक, दोघांना आपले आयुष्य देशसेवेसाठी खर्चिले. गणेशला बाबा आणि विनायकला तात्या ही टोपण नावे मिळाली. पुढे ही नावे सार्वजनिक क्षेत्रातही रूढ झाली.
पत्नीच्या निधनानंतर दामोदरपंतांनी दोन्ही मुलांना (गणेश, विनायक) शिक्षणासाठी नाशिकला ठेवले.
शिक्षण घेत असताना विनायक विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करायचा. त्यातून त्याला अनेक गोष्टींचे ज्ञान झाले.
चाफेकर बंधूंच्या कार्याचा, देशसेवेचा विनायकच्या मनावर खोलवर परिणाम झाला. १८९७ साली महाराष्ट्रात प्लेगची साथ आली आणि माणसे उंदरांप्रमाणे मरू लागली. तेव्हा ब्रिटिश शिपाई घरात घुसून माणसांचा छळ करीत. या कृत्याविषयी चाफेकर बंधूंच्या मनात चीड उत्पन्न झाली. त्याच वेळी इंग्लंडच्या राणीचा राज्यारोहण सोहळा भारतातही मोठ्या प्रमाणात साजरा करायचे ठरत होते. यामुळे लोकांच्या मनात इंग्रजांविरुद्ध संताप निर्माण होऊन इंग्रज सरकारला धडा शिकवण्यासाठी शपथा घेतल्या जाऊ लागल्या.
चाफेकर बंधूंनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या घालून त्याला मारले. त्याचा सूड म्हणून त्या बंधूंना इंग्रज सरकारने फासावर लटकवले.
छोट्या विनायकवर या घटनेचा परिणाम झाला. पुढे मरेपर्यंत देशसेवेचे व्रत त्यांनी अंगीकारले.
शाळेत असतानाच 'मित्रमेळा' या नावाने संघटना सुरू केली. 'मित्रमेळा' हा देशभक्तीचा संस्कार होता. व्यायामशाळा, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती साजरी करणे असे कार्यक्रमही सुरू झाले. १८९९ मध्ये त्यांच्या वडिलांचे दामोदरपंतांचे प्लेगमुळे निधन झाले.
शालेय शिक्षणानंतर हुशार, तीव्र बुद्धिमत्तेच्या विनायकने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. समविचारी मित्रांची संघटना फर्ग्युसन कॉलेजमध्ये असतानाच उभी राहिली. शिवरायांचे स्तवन, इतर हिंदू राजांच्या शौर्यकथा कथन करण्यात येऊ लागल्या.
देशभक्तीने भारावलेल्या युवकांनी 'अभिनव भारत' ही संघटना स्थापन केली.
ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी केली होती. त्याविरुद्ध देशभरात मोर्चे, निदर्शने सुरू होती. 'अभिनव भारत' संघटनेने मात्र पुण्यात ठिकठिकाणी विदेशी वस्त्रांची होळी केली. याचाच परिणाम म्हणून सावरकरांना वसतिगृहातून काढून टाकले. पुढे मित्रांकडे राहून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
मे १९०६ मध्ये सावरकर बोटीने इंग्लंडला उच्चशिक्षणासाठी रवाना झाले. इंग्लंडमध्ये त्यांनी हिंदू तरुणांशी संवाद साधत मोठे संघटन उभे केले. क्रांतिकारकांच्या त्यागाच्या कथा ऐकून अनेक युवकांचे देशप्रेम वाढीस लागले.
इटलीचे स्वातंत्र्यवीर 'मॅझिनी' यांचा सावरकरांवर प्रभाव होता. त्यांचे साहित्य वाचून नंतर त्यांनी मॅझिनीचे चरित्र लिहून काढले.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा समग्र इतिहास लिहून काढला. स्वातंत्र्यलढ्यासाठी भारतीयांची मानसिकता तयार केली. गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची प्रात्यक्षिके झाली. सूत्रधार म्हणून बाबाराव (गणेश) सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा इंग्रज सरकारने ठोठावली. संतापून मदनलाल धिंग्रा यांनी कईनवर गोळ्या झाडल्या, त्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांना फासावर लटकवले.
कर्झन वायली आणि जॅक्सन यांच्या हत्येमागे विनायक सावरकरांचा हात होता, हे लक्षात आल्याने सावरकरांविरुद्ध खटला भरला गेला.
एवढ्या सर्व धकाधकीतही सावरकर बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले. बंधू बाबाराव अंदमानला होते. भारतात परत येत असतानाच त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या व राजद्रोह हे आरोप ठेवून अटक केली गेली. लंडनच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर अटक झाली होती, तरी खटला भारतात चालविला जाणार होता म्हणून त्यांना भारताकडे रवाना करण्यात आले.
क्रांतिकार्य करण्यासाठी इंग्रजाच्या कैदेतून मुक्त झाले पाहिजे. या विचाराने त्यांनी मार्सेल्स बंदराजवळ बोट थांबली असता समुद्रात उडी घेऊन फ्रान्सचा किनारा गाठला. पुन्हा ब्रिटिशांनी त्यांना पकडले आणि खटला चालवून दोन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा सेल्यूलर जेलमध्ये भोगत असताना कोलू ओढणे, काथ्याचा दोरखंड वळणे अशी शारीरिक यातना देणारी कामे त्यांना करावी लागली. जेलमधील जाचक अटी, निकृष्ट आहार यामुळे सावरकरांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. सावरकरांना मुक्त करण्यासाठी सर्व स्तरातून दबाव वाढत होता.
१९२४ ते १९३७ पर्यंत सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते. तिथेही समाजातील भेदभाव नाहीसा करण्यासाटी अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले.
मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचे महत्त्वाचे कार्य सावरकरांनी केले. इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द दिले.
अखेर १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला.
सावरकरांचे वाचन, मनन, चिंतन आणि लेखन सुरूच होते. १९५७ हे भारतीय स्वातंत्र्याच्या लक्ष्याचे शताब्दी वर्ष.
त्या निमित्ताने दिल्लीत आयोजित केलेल्या मोठ्या कार्यक्रमात अग्रणी स्वातंत्र्यसेनानी म्हणून सावरकरांना निमंत्रित केले होते.
सावरकरांनी 'हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने' हा ग्रंथ लिहिला. त्यांचे कवीमन होते. 'ने मजसी ने परत मातृभूमीला' हे अजरामर गीत तसेच 'जयोस्तुते...' हे स्वातंत्र्यदेवतेला उद्देशून लिहिलेले गीत आजही राष्ट्रीय सणाला आपल्यातील देशभक्ती प्रखर करण्याचे काम करतात.
वयाच्या ८३व्या वर्षी २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या कार्याने 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी अजरामर ठरली.
शनिवारवाड्यावर एका कार्यक्रमात आचार्य अत्रे यांनी सावरकरांचा 'स्वातंत्र्यवीर' असा उल्लेख केला होता. हीच त्यांची ओळख कायम राहिली.
भारतीय स्वातंत्र्यासाठी आयुष्याची पर्वा न करणाऱ्या स्वातंत्र्यवीराला मानाचा मुजरा!
COMMENTS