Essay on Dada Bhai Naoroji in Marathi Language : In this article read "महर्षी दादाभाई नौरोजी मराठी माहिती निबंध", "Dada Bhai Naoroji Marathi Nibandh" for Students.
महर्षी दादाभाई नौरोजी मराठी माहिती निबंध - Marathi Essay on Lala Lajpat Rai
महर्षी दादाभाई नौरोजी मराठी माहिती निबंध - भारतीय जनतेला 'स्वराज्य' शब्दाचा मंत्र देणारे तपस्वी गुरु! ब्रिटिश पार्लमेंटमधील निवडणुकीत निवडून आले. हिंदी लोक बुद्धिमान नाहीत, त्यांच्यात नीती नाही, असे कोणी लिहिताच ते त्यांना सडेतोड उत्तर देत. लंडनमधील ब्रिटिश पार्लमेंटप्रमाणेच हिंदी पार्लमेंट अस्तित्वात यावे, हे त्यांचे स्वप्न होते.
चार सप्टेंबर हा दादाभाईंच्या जयंतीचा दिवस... 'स्वराज्य' शब्दाचा मंत्र देणाऱ्या महर्षीचा दिवस. 92 वर्षांचे ते महान जीवन. 1825 मध्ये मुंबईतील मांडवी भागात ते जन्मले. 11 व्या वर्षीच दादाभाईंचे लग्न झाले. पत्नी गुलाबबाई सात वर्षांची. दादाभाई अतिबुद्धिमान, इंग्रजी शाळा सुरु झालेली, तिच्यात गेले. नुकत्याच सुरू झालेल्या कॉलेजात सहा मुले घ्यायची होती. बाळशास्त्री जांभेकर निवड करायला गेले. शिक्षकाने श्रीमंत मुलांना पुढे केले. दादाभाई गरीब; परंतु बाळशास्त्रींनी त्यालाही निवडले.
कॉलेजमध्ये उत्तम अभ्यास केला. ते खेळाडूही होते. विटी-दांडू त्यांना फार आवडे. हिंदी क्रिकेट असे ते या खेळाला म्हणत. त्यांची स्मरणशक्ती अपूर्व. एकदा वाचले की म्हणून दाखवित. गोष्टींचा ते कोश होते, गणित, विज्ञान, वाङ्मय यात प्रवीण झाले आणि पहिले प्राध्यापक झाले.
त्यावेळचे न्यायमूर्ती म्हणाले, “मी निम्मे पैसे देतो. पारशी समाजाने निम्मे जमवावे. या बुद्धिवान तरुणाला बॅरिस्टर व्हायला जाऊ दे." परंतु पारशी समाजाला मिशनयांची भीती वाटे. दोन पारशी तरुण ख्रिस्ती झाले होते. म्हणून प्रश्न तसाच राहिला.
स्टुडंट्स लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटी त्यांनी प्राणमय केली. तेथे निबंध वाचले जात. चर्चा होई. गुजराती ज्ञानप्रकाश सुरु झाला. दादाभाई लिहीत. 1849 मध्ये ऑगस्ट 4 ला स्त्रीशिक्षणाचा पाया घातला गेला. स्टु. लि. सा. सोसायटीच्या सभासदांनी मुली गोळा करायचे ठरविले. दादाभाई पारशी समाजात हिंडू लागले.
व्हरांड्यात मुली बसतील. तेथे आम्ही सकाळी येऊन शिकवू असे हे मित्र म्हणत. 44 पारशी मुली आल्या. 24 हिंदू मुली, श्री. जगन्नाथ शंकरशेट यांनी शाळेला सुंदर इमारत दिली. त्यावेळेस 'चाबूक' मराठी पत्र निघे. त्याने स्त्री-शिक्षणावर खूप टीका केली. बायका नवऱ्यांना गुलाम करतील, त्यांना कोर्टात खेचतील वगैरे म्हटले. दादाभाईंनी पारशी मुलींना इंग्रजीही शिकवायला प्रारंभ केला. पारशी-मुसलमान यांचा दंगा 57 च्या आधी एकदा झाला. दादाभाईनी त्या दंग्याच्या काळात 'रास्त गोफ्तार' पत्र सुरु केले. 'खरे सांगणारा' असा या नावाचा अर्थ.
मित्रांच्या व्यापारी कंपनीत त्यांनी सामील व्हायचे ठरविले. 1855 मध्ये ते 27 जनला विलायतेला जायला निघाले, प्रोफेसरी सोडून गेले. इंग्लंडमध्ये स्थापन झालेली पहिली हिंदी फर्म, लंडनमध्ये गुजरातीचे प्राध्यापक झाले. लंडन कॉलेजच्या सिनेटवरही होते. मध्यंतरी 57 चा इतिहास घडला. पुढे अमेरिकेतील युद्ध झाले, कंपनीचे दिवाळे निघाले. दादाभाईंनी बहुतेकांचे देणे दिले. अपूर्व गोष्ट असे तिकडील लोकास वाटले.
त्यांची पत्नी अशिक्षित होती. तिला त्यांनी शिकवायचा खप प्रयत्न केला. अपयश आले. आई म्हणाली दुसरे लग्न कर. ते म्हणाले, "तुझा मुलगा पत्नीस न आवडता तर तिला दुसरे लग्न कर असे सांगितले असतेस का?" आई पुन्हा या बाबतीत बोलली नाही. लंडनमध्ये असता एका मित्राकडे जात. त्याला तीन मुली.
कोणी मुंबईस कळविले की, दादाभाई एका इंग्रज मुलीशी लग्न लावणार आहेत! आईचे पत्र आले, "मी तुला दुसरी बायको कर म्हणत होते. आता असे करून कलंक लावणार?" दादाभाई तिकीट काढून लगेच मुंबईला आले. रात्री 12 वाजता घरी आले. मायलेकराची तसेच पतीपत्नीची भेट झाली. संशय गेले. जाताना आई, पत्नीला घेऊन गेले; परंतु पुढे धंदा बुडाल्यावर ते स्वदेशी परत आले. नंतर त्यांनी बडोद्यात मल्हाराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत काम स्वीकारले. कारभारी, अधिकारी सारे भ्रष्ट, रेसिडेंटची मिजास. मल्हारसंघांनी दादाभाईंना दिवाण व्हा विनविले. दिल्ली सरकारने चौकशी कमिटी नेमून मल्हारसंघांच्या कारकीर्दीवर रिपोर्ट लिहविला. याला उत्तर उद्या म्हणून कळविले. दादाभाईनी "उत्तर काय लिहायचे? मागील चर्चेत अर्थ नाही. पुढे कारभार सुरळीत राहण्याची हमी देतो," असे उत्तर द्यायला सांगितले. कमिशनचा रिपोर्ट खोटा म्हणते तर अंगलट येते. दादाभाईनी निर्धारपूर्वक हेच उत्तर द्या म्हणून महाराजांस सांगितले आणि प्रकरण निवळले.
दिवाणगिरी सोडून ते विलायतेत आले. प्रचार करु लागले. निबंध, लेख, भाषणे यांनी जागृती करु लागले. हिंदुस्थानचे उत्पन्न वर्षाला सरासरी फक्त 20 रु. असे सिद्ध केले. पार्लमेंटमधील निवडणुकीला उभे राहिले.
लॉर्ड संलिसबरी म्हणाले, “या काळ्या आदमीला का निवडणार?' परंतु काळा आदमी निवडून आला. इंग्लंडमध्ये ते हिंदवी बाजू सारखी मांडीत. हिंदी लोक बुद्धिमान नाहीत. त्यांच्यात नीती नाही, असे कोणी लिहिताच ते त्यांचे दात त्यांच्या घशात घालीत.
ते पुन्हा विलायतेत गेले; परंतु 1907 मध्ये परत आले. 1896 मध्ये त्यांना विद्यापीठाने डॉक्टर पदवी दिली. अॅनी बेझंट बाईंनी होमरुल चळवळ सुरू केली. 70 वर्षांची ती वृद्ध 90 वर्षांच्या दादाभाईंना म्हणाली, "तुम्ही अध्यक्ष व्हा लीगचे." ते झाले; परंतु 1917 मध्ये जूनच्या 30 तारखेस 92 वर्षांचे होऊन ते देवाघरी गेले. त्यांच्या पुण्यवान स्मृतीस भक्तिमय प्रणाम. भारताचे ते पितामह, अनेक इंग्रजांनी त्यांना साधुतुल्य पुरुष म्हटले. महात्माजींचा त्यांच्याशी दक्षिण आफ्रिकेतून नेहमी पत्रव्यवहार, दादाभाई त्यांना स्वहस्ते पत्राचे उत्तर देत. थोर पुरुष, नि:स्पृह निर्भय : चंदनाप्रमाणे ते झिजले.
दादाभाई म्हणत जे हाती घ्याल ते तडीस न्या. त्यांचा हा स्फूर्तिदायी संदेश आपण पाळू या. "हिंदी पार्लमेंट कधी स्थापन होईल? असे ते म्हणायचे. आज ते स्थापन झाले आहे. ते भारताला भूषणभूत करणे म्हणजेच दादाभाईंचे ऋणी होणे होय.
0 comments: