Sunday, 25 October 2020

Marathi Essay on "Education and Personality Development", "शैक्षणिक दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्व विकास मराठी निबंध" for Students

Education and Personality Development Essay in Marathi Language: In this article "शैक्षणिक दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्व विकास मराठी निबंध", "शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास मराठी निबंध" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Education and Personality Development", "शैक्षणिक दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्व विकास मराठी निबंध" for Students

बालवाडीपासून महाविद्यालयीन पातळीपर्यंत राबविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक दृष्टिकोन असतो. हा दृष्टिकोन बालवाडीमधल्या अभ्यासक्रमापासून तो थेट डॉक्टरेट प्रबंधाच्या पातळीवरच्या अभ्यासक्रमापर्यंत एकसंधपणे असतो. त्यामध्येही प्राथमिक, माध्यमिक ही शालेय पातळी आणि नंतरची कनिष्ठ, वरिष्ठ ही महाविद्यालयीन पातळी यांमध्ये सुसंगती असते. प्रामुख्याने महाविद्यालयीन पातळीवरच्या अभ्यासक्रमांमध्ये कला, वाणिज्य, शास्त्र अशा शाखांचा चढत्या श्रेणीने अभ्यास अपेक्षित असतो; पण त्यांपैकी काही विषयांच्या अभ्यासाची पायाभरणी शाळेमध्ये झालेली असते. शालेय अभ्यासक्रमानंतर महाविद्यालयाव्यतिरिक्त अनेक विषयांचा डिप्लोमा-पातळीवरचा अभ्यासक्रम आखला जातो. असे अनेक शाखांमधून, त्यांच्या उपशाखांमधून आखले जाणारे अभ्यासक्रम एका विशिष्ट ध्येयाने, एका सूत्राने आखले गेलेले असतात. हे सूत्र म्हणजे त्या त्या राष्ट्राने ठरविलेले शैक्षणिक धोरण व शिक्षणाकडे बघण्याचा त्या त्या राष्ट्राचा विशिष्ट दृष्टिकोन, हे होय. 

भारताच्या शैक्षणिक दृष्टिकोनामध्ये शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीचा विकास व तिच्या आधारे राष्ट्राचा विकास अभिप्रेत आहे. आजच्या शैक्षणिक दृष्टिकोनात व्यक्तिमत्त्व विकासाला महत्त्व आहे; पण तो प्रामुख्याने फक्त बौद्धिक क्षेत्रातील आहे. मुलांचा सर्वांगीण विकास ही कल्पना सतत मांडली जात असली तरी, त्यांचा अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धती मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्यास सुयोग्य आहे का, याचा विचार करणे अगत्याचे ठरते. कला, वाणिज्य यांसारख्या शाखांपैकी त्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे पाहिले जाते आणि ते परीक्षेमध्ये किती गुणवत्ता प्रकट करतात यावर त्यांचे मूल्यमापन केले जाते. यामध्ये त्यांच्या मानसिक विकासाचा फारसा विचार केला जात नाही. राष्ट्राचे सर्वकालीन हित लक्षात घ्यायचे असेल व राष्ट्र बलवान व सामर्थ्यशाली बनवावयाचे असेल तर माणसाचे मन विकसित. झाले पाहिजे. त्याला संस्कारांचे बाळकडू लहानपणापासून मिळाले पाहिजे व त्याचे शरीर निरोगी राहिले पाहिजे. 

व्यक्तिविकास म्हणजे काय याबद्दलच्या कल्पना कालपरत्वे व देशपरत्वेही वेगवेगळ्या असतात. हा व्यक्तिविकास कसा साधावा याचे मार्ग व अभ्यासक्रम वेगवेगळे असतात. तसेच राष्ट्राच्या विकासामध्ये राष्ट्रातील सर्व थरांतील समाजाचा विकास गृहीत असतो. हा सर्व थरांतला समाज भारतापुरता तरी विविध जातींमध्ये, जमातींमध्ये, धर्मामध्ये, पंथांमध्ये, संप्रदायांमध्ये, विविध दैवतांच्या भक्तांमध्ये विभागलेला आहे. त्यांच्या नैतिक व धार्मिक शिक्षणाच्या पद्धती भिन्न आहेत आणि तरीही भारताच्या राष्ट्रीयत्वामध्ये त्यांना एकात्म असे स्थान आहे; म्हणूनच आजच्या शैक्षणिक धोरणाचा विचार करताना या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार झाला पाहिजे. 

आज प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे. नव्हे, प्रत्येकाने शिक्षण घ्यायलाच पाहिजे. त्याला लिहितावाचता आले पाहिजे; त्याच्या आधारे त्याचा उपजीविकेचा प्रश्न त्याला सुलभतेने सोडविता आला पाहिजे, असा त्यामागे उद्देश आहे. सर्वांना समान शिक्षण, समान संधी व शिक्षणाच्या आधारे उपजीविकेचे साधन मिळविणे यावर आजचे शिक्षण आपले लक्ष केंद्रित करीत आहे; पण मध्ययुगीन काळातील व प्राचीन काळातील शिक्षणदृष्टी अशी नव्हती. मुद्रणकलेच्या अभावी पुस्तके नव्हती, दुर्मिळच होती. गुरूचे सान्निध्य व त्याच्या साहचर्याने ज्ञानग्रहण यावर भर होता. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जातीप्रमाणे घरीही व्यवसायाचे शिक्षण मिळणे शक्य होते. यांत्रिक शोधाच्या अभावी दळणवळण यंत्रणा गतिमान नसल्याने प्रत्येक खेडेगाव स्वयंपूर्ण, स्वतंत्र व संपूर्ण, असा घटक विचारात घेऊन शैक्षणिक धोरण आखले जात असे. नोकरी-रोजंदारीइतके धंदेशिक्षणालाही महत्त्व असे. सोनार, सुतार, चांभार, शिंपी, वाणी असे जवळजवळ सर्व प्रकारचे व्यावसायिक शिक्षण प्राथमिक पातळीवर घरून, परंपरेने पालकांकडून दिले जात असे. शाळा असण्यापेक्षा गुरुकुल पद्धतीने मोठमोठ्या विद्वान ऋषींच्या आश्रमांमध्ये शिक्षणाची सोय असे. कोणत्याही थरातील विद्यार्थी गुरुगृही जाऊन हे शिक्षण बालवयापासून घेऊ शकत असे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अशी एकत्र शिक्षणाची सोय वेगवेगळ्या गुरूंच्या आश्रमशाळांतून होत असल्याने सामाजिक भिन्नता असूनही मैत्रीची सवय, विविध थरांतील मुलांच्या अंगी बाणली जायला मदत व्हायची. आजच्या शिक्षणात सर्वांना एकाच प्रकारचे शिक्षण देण्यावर भर आहे. शिवाय मुद्रणकलेमुळे पुस्तके उपलब्ध होतात. पुस्तकांच्या आधारे कोणत्याही प्रकारचे ज्ञान घेता येते. आज तर दरदर्शनच्या, संगणकाच्या आधारे व मुक्त विद्यापीठांच्या योजनेच्या आधारे घरबसल्याही ज्ञान व पदवी प्राप्त करून घेता येते. पण मुद्रणकलेचा शोध न लागलेल्या त्या काळात हस्तलिखिते, पोथ्या यांच्यापेक्षाही गुरुमुखातून मिळणारे शिक्षण- म्हणजे मौखिक पातळीवरचे शिक्षण प्रचलित होते. इतरांनी लेखन-वाचन शिकण्यात वेळ घालविण्यापेक्षा ते शिक्षण ब्राह्मणादी ठराविक जातींनी घ्यावे व त्याआधारे इतरांना धार्मिक चालीरीती समजावून देण्याचे कार्य करावे, अशी जातिविशिष्टताही अनुसरली जात होती. गुरुगृही स्वत:चे काम स्वतः करण्याची सवय लागत असल्याने व श्रम व ज्ञान यांना समान महत्त्व देण्याची गुरूंची भूमिका असल्याने श्रमप्रतिष्ठा राखली जायची. जीवनोपयोगी व उपजीविकेचे साधन म्हणून एखादी स्वतंत्र विद्या शिकण्यावरही भर होता. (लक्ष्मणासारख्या राजपुत्राला झोपडी बांधण्याची विद्या शिकविली होती.) मौखिक पद्धतीवर भर, लेखन-वाचन सर्वांना सक्तीचे नसणे, श्रमाचे मोल विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविणे, साहित्यकलेसारख्या कलांचे स्वतंत्र ज्ञान देणे आणि संरक्षणविद्या शिकविणे, असे काही महत्त्वाचे वेगळे विशेष तेव्हाच्या शिक्षणपद्धतीत होते. ती व्यक्तिमत्त्व-विकासाची तेव्हाची गरज होती. एक प्रकारे प्रत्येक ऋषीचा आश्रम म्हणजे आजच्या दृष्टीने स्वतंत्र बोर्ड-विद्यापीठही म्हणता येतील. कदाचित त्यांच्यामध्ये सुसंगतीही असू शकेल. नालंदा, तक्षशिला, वाराणसी, विक्रमशीला, प्रतिष्ठान ही एक प्रकारे तत्कालीन विद्यापीठेच होती. जगाच्या वेगवेगळ्या भागांतून या ठिकाणी शिक्षणासाठी विद्यार्थी येत असत, हेही लक्षात घेतले तर तत्कालीन आधुनिक शिक्षणपद्धती या विद्यापीठांतून कशी अनुसरली जात होती, त्याची कल्पना येऊ शकेल.

प्रत्येक कालखंडामध्ये प्रदेशपरत्वे कोणती ना कोणती शिक्षणपद्धती रूढ होत असते. एवढेच नव्हे तर, आजही पुणे, मुंबई, औरंगाबाद इत्यादी ठिकाणांच्या विद्यापीठांमधील अभ्यासक्रम व शिक्षणपद्धती एकमेकांशी जुळती असली तरी त्यांमध्ये त्या त्या प्रदेशांच्या गरजांनुसार थोडा वेगळेपणा आलेला दिसून येतो. संस्कृतचे अध्ययन महत्त्वाचे मानणारी काशी-बनारस येथील विद्याकेंद्रे, भारती विद्यापीठ, ज्ञानप्रबोधिनी, केवळ महिलांसाठी असलेले श्रीमती ना. दा. ठाकरसी विद्यापीठ यांच्यामध्येही वेगळेपणा आहे. त्यांचा शिक्षणविषयक धोरणात्मक दृष्टिकोन आधारभूत आहे. पारतंत्र्याच्या काळामध्ये राष्ट्रीय शिक्षणावर भर देणाऱ्या पाठशाळा होत्या. त्यांचाही वेगळेपणा त्यांच्या राष्ट्रविषयक प्रवृत्तीचा भाग ठरतो.

या सगळ्या वेगळेपणाचा संबंध व्यक्तिमत्त्वविकासाच्या त्यांच्या दृष्टिकोनाशी आहे. व्यक्तिमत्त्वविकास हा राष्ट्रविकासाला पोषक ठरावा; व्यक्तिस्वातंत्र्याची त्यामध्ये समज असावी; पण सामूहिक जबाबदारीचेही आकलन सावे: स्वार्थ-परार्थ यांचे भान असावे. इत्यादी अनेक दष्टींनी हा विचार शैक्षणिक धोरणातन राबविला जातो. काही वर्षापूर्वी प्रत्येक शाळेचा अभ्यासक्रमही वेगळा व स्वतंत्र असू शकत होता; पण नंतर वाढत्या शैक्षणिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रादी प्रांतांमध्ये त्याला बोर्ड, विद्यापीठे असे एकसंध-एकत्रित रूप आले. तरीही प्रत्येक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल असल्याने एका विद्यापीठामधून दुसऱ्या विद्यापीठाच्या कक्षेत गेलेल्या विद्यार्थ्याला कधी कधी त्याच वर्षाच्या परीक्षेला बसावे लागते. त्यातूनच समकक्षतेचा विचार रूढ होऊ लागला.

एकदा तयार केलेल्या अभ्यासक्रमामध्ये कालानुरूप व बदलत्या नव्या गरजांनुसार बदल करण्याची आवश्यकता असते. शैक्षणिक धोरण कार्यवाहीत आणताना त्यामध्ये कधी त्रुटी जाणवतात, कधी कार्यवाही करणाऱ्या यंत्रणेमध्ये अपुरेपणा असतो, कधी व्यापक प्रमाणामुळे त्यामध्ये विस्कळितपणा येतो. अशा वेळी मूळ धोरणांचा पुनर्विचार करून बदल करावा लागतो; नवी आखणी करावी लागते. उदाहरणार्थ- पर्यावरणाची गरज भासू लागल्यावर तो विषय अभ्यासक्रमात आला. संगणकासारखा विषय आज माध्यमिक पातळीवरही आवश्यक ठरू लागला. वाढत्या प्रसारमाध्यमांच्या जाळ्यामध्ये मुलांना त्यांचे नेमके महत्त्व कळावे म्हणून त्यासंबंधीचा विषयही अभ्यासात येण्याची गरज काही विचारवंत बोलून दाखवीत आहेत. महाविद्यालयीन पातळीवर तर तो स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासिला जातो. घरोघरचे पाकशास्त्र वाढत्या हॉटेलांसाठी एक वेगळे क्षेत्र ठरले. प्रवास, यात्रा यांचेही अभ्यासक्रम आखले गेले. या सगळ्या अभ्यासक्रमांमागे समाजाच्या वाढत्या गरजांची दखल घेण्याची वृत्ती आहे. आज अभिनय, खेळ, व्यायाम इत्यादींनाही येत असलेले महत्त्व हे त्याचेच दर्शक आहे. शैक्षणिक धोरण ठरविणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांना त्याचे भान व जाण असे. समाजातील विविध थरांशी, तेथील उद्यम-व्यापारांशी त्यांचा संबंध असतो. त्या त्या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करून शैक्षणिक क्षेत्रातील विचार ठरत असतो. निदान तशा त-हेने तो ठरायला पाहिजे.

आज समाजात बौद्धिक क्षमतेची जेवढी गरज आहे तेवढीच संस्कारांची गरज जाणवू लागली आहे. त्यामधूनच शालेय पातळीवर मुद्दाम संतमहंतांच्या कथांद्वारा किंवा अन्य मार्गांनी संस्कार देणारे शिक्षण सुरू झाले. सन १९४०-४५ च्या सुमारास अनेक शाळांमधून ज्ञानेश्वर-तुकाराम इत्यादींचे अभंग हेच कार्य करीत होते. मध्यंतरी ते अनावश्यक ठरले. आज अभंग बदलले पण तीच गरज भागविण्यासाठी अभ्यासक्रमातून तरतूद करावी लागली; असेही कधी कधी घडते. शैक्षणिक धोरणांमध्ये व त्यावर आधारलेल्या अभ्यासक्रमांमध्ये होणारा फेरबदल झटपट होत नसतो; मंद गतीने होत असतो; पण त्याची सुरुवात अगोदरपासून विचारमंथनाच्या रूपाने झालेली असते.

इंग्रजांच्या काळात रूढ असलेल्या शिक्षणपद्धतीमध्ये आपण काही बदल केले असले तरी नोकरदार किंवा चाकरमाने तयार करणारे कारखाने या दृष्टीने असलेले शैक्षणिक धोरण कितीसे बदलले गेले आहे? केवळ एखाद्या विषयाचे ज्ञान मिळून 'टेबलवर्क' करता येते; टेबल (व खुर्चीही) सांभाळता येते; पण स्वयंसिद्ध निर्णय घेण्याची क्षमता त्याद्वारा विकसित होत नाही. आज अशा प्रकारच्या शिक्षणाकडे कल वाढत आहे. केवळ कारकुनी शिकविणारे शिक्षण कालबाह्य झालेले नाही; पण कारकुनी करतानाही स्वत:चे निर्णय घेण्याची, व्यापक विचार करण्याची क्षमता त्याच्याजवळ यावी, असा प्रयत्न शिक्षणातून होऊ लागला आहे. मुख्यतः केवळ सेवाभावी निष्ठा देणारे शिक्षण दिल्याने शासन त्यांना नोकऱ्या देऊ शकेल काय या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नसल्याने धंदेशिक्षण, स्वतंत्र व्यवसायशिक्षण आवश्यक ठरू लागले आहे. कोणताही छोटा-मोठा, स्वतंत्र उद्योग उभा करण्यासाठी नोकरदारांपेक्षा वेगळी मानसिकता असावी लागते. त्याची तयारी शिक्षणातून होण्याची आज गरज आहे. 

आजच्या भारताच्या शैक्षणिक धोरणामधील काही घटकांचा विचार करून या पद्धतीचे स्वरूप उलगडू शकेल.

(१) आजचे शिक्षण सर्वांना आवश्यक मानले आहे. हे शिक्षण एक प्रकारचे आहे. त्यामध्ये ज्ञानविज्ञान, शास्त्रे, समाजशास्त्रे, भाषा इत्यादींना प्राथमिक व माध्यमिक पातळीवर महत्त्व आहे. सर्व थरांतील मुलामुलींना असे एकाच प्रकारचे शिक्षण किती वयोमर्यादेपर्यंत असावे? विशेषतः गरीब कुटुंबांना मोफत शिक्षण देऊनही ते परवडेल काय? या शिक्षणाने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न कितीसा सुटू शकेल? म्हणून साक्षरतेचा आग्रह योग्य असला तरी आयुष्यातील किती कालखंड गणित, इतिहास-भूगोल-भाषा यांसारखे विषय शिकण्यात त्यांनी घालवावा, याचा पुनर्विचार होऊ लागला आहे.

या शिक्षणामध्ये मातृभाषेच्या अध्ययनास महत्त्व व वेळ किती द्यावा? राष्ट्रभाषा म्हणून हिंदी व ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी यांच्या अभ्यासाचे महत्त्व किती प्रमाणात व कोणत्या इयत्तेपासून असावे, याचा विचारही महत्त्वाचा आहे. सर्व प्रांतांतील मुलांना हिंदी व इंग्रजी कामचलाऊ शिकवावी, की साहित्य म्हणूनही तिचे अध्ययन व्हावे? मातृभाषेचे अध्यापनही साहित्यपरिचय करून देणारे किती व व्यावहारिक पातळीवर किती असावे? आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पत्रलेखन येत नाही, अर्ज लिहिता येत नाही; मातृभाषेतून लिहिता येत नाही आणि ज्ञानभाषेतूनही त्याला बोध होत नाही; तर मग, या प्रकारच्या लेखनपद्धती त्याला कोणत्या पातळीवर शिकवाव्यात?

पूर्वीच्या काळी 'जॅक ऑफ ऑल' हा दोष समजला जायचा. आजच्या विद्यार्थ्याला असे 'जॅक ऑफ ऑल' असणे गरजेचे आहे. सभोवतालच्या अनेक विषयांबद्दल त्याला असलेले कुतूहल भागविणारे ज्ञान अभ्यासक्रमातून दिले गेले पाहिजे. 

इंग्रजांनी इतकी वर्षे रूढ केलेली ही शिक्षणपद्धती 'नोकरदारांचे कारखाने' घडविणारी आहे, असे म्हटले जाते. आज याच शिक्षणातून घडलेले प्राचार्यापासून ते शिपायापर्यंतचे नोकरदार हे 'कुणाच्या तरी हुकुमाची केवळ अंमलबजावणी करणारे' आहेत. संस्थापक, भांडवलदार इत्यादींच्या आर्थिक साहाय्याच्या जोरावर आज या संस्था उभ्या असल्याने शिक्षणक्षेत्रातील कार्यवाही करणारे हे पदाधिकारी स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाहीत. याचा अर्थ, शिक्षणसंस्थांमध्येही असा नोकर-मालक संबंध रूढ झालेला आहे, हे मोठे प्रदूषण आहे.

(२) अभ्यासक्रम राबविणारी व आखणारी माणसे त्या पदांवर निवडणुकीद्वारा येत असल्याने त्या पदांवर असलेल्या व्यक्तीच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अभ्यासक्रम तयार होतात. त्यांचा त्या क्षेत्रातील अधिकार, शैक्षणिक दृष्टिकोन व्यापक व सर्वसमावेशक असतोच असे नाही. व्यापार, उद्योग, व्यवसाय, श्रम इत्यादी क्षेत्रांपेक्षा शिक्षण व न्यायदान ही क्षेत्रे मूलभूत दृष्टीने भिन्न असतात, याचा समज नसलेली माणसे केवळ अर्थार्जनाच्या दृष्टीने या क्षेत्राकडे बघतात. समाज घडविण्याचे व निकोप ठेवण्याचे कार्य या क्षेत्राकडून अपेक्षित असते; पण गेल्या पन्नास-साठ वर्षांमध्ये या अध्यापनाच्या क्षेत्राकडे वळलेला गट हा गुणदृष्ट्या निकृष्ट पातळीवरचा आहे. ज्यांना इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकत नाही, अशा व्यक्ती शिक्षणक्षेत्रात, नाइलाजाने व आवड नसताना येत राहिल्याने या क्षेत्राची ज्ञानलालसा व पावित्र्य डागाळले गेले आहे. त्या अध्यापक व अधिकारीवर्गालाच शिक्षणक्षेत्राचे महत्त्व जाणवून कसे देता येईल, या क्षेत्राकडे नारळीकरांसारखे विवेचक बुद्धिमंत कसे आकृष्ट होतील, हा प्रश्न सोडविला पाहिजे.

शिक्षणक्षेत्र आणि अर्थार्जन यांचा संबंध न तोडता, शिक्षण देण्याची आवड व कला असलेला प्राध्यापकवर्ग तयार करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याजवळ नवीन शिकण्याची ज्ञानलालसा हवी. नवीन पिढी घडविण्याचे कार्य आपण करीत आहोत याचा अभिमान हवा आणि समाजाचीही त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आदराची असावी आणि समाजाने आपल्याकडे आदरपूर्वक पाहावे असे त्यांचे आचरण व ज्ञान असावे. आज दोन्ही गोष्टी फारच थोड्यांच्या ठिकाणी आहेत.

शिक्षणाचा उद्देश केवळ पुस्तकी ज्ञान देणे हा नसतो. संगणकांमध्येही असे ज्ञानाचे भांडार भरता येते. आपल्या समाजाचा इतिहास-भूगोल-धर्म-नीती-संतचरित्रे व एकंदर संस्कृतीचा आलेख शिकताना विद्यार्थ्याच्या ठिकाणी स्वाभिमान, (विचार करण्याची पात्रता) विवेकशीलता, स्वदेशाभिमान जागृत झाला पाहिजे. त्यासाठी मातृभाषेचा अभ्यास व मातृभाषेतून शिक्षण उपयुक्त ठरते. मातृभाषेतून शिक्षण देण्याची कल्पना मेकॉलेसारख्या शिक्षणतज्ज्ञाने प्रारंभीच्या काळातच मांडलेली आहे; पण आपल्या शिक्षण-पद्धतीमध्ये त्याचा सर्वांगीण विचार झालेला नाही. भाषा, लिपी, पोशाख, चालीरीती, धार्मिक सणवार, व्रतवैकल्ये, दंतकथा इत्यादी गोष्टींचा संबंध संस्कृतीशी असतो. विचाराला आचाराचे आलेले ते रूप असते. संस्कृतीशी असलेली आचार-विचारांची नाळ शिक्षणातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आजच्या शिक्षणामध्ये या घटकाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही.

शिक्षणपद्धतीमध्ये शिक्षक, विद्यापीठ, महाविद्यालयांचे संस्थापक मंडळ यांचा विचार केला जातो. विद्यार्थिकेंद्रित अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या सभोवताली असलेले वातावरणही परिणाम साधत असते. पालकांचा दृष्टिकोन, संस्थाचालकांची शिक्षणाकडे पाहण्याची भूमिका शिक्षणपद्धतीची कार्यवाही करताना लक्षात घ्यावी लागते; म्हणूनच केवळ देणग्यांच्या मार्गाने आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून शैक्षणिक संस्था चालविण्याचा दृष्टिकोन शिक्षणाला घातक ठरणारा आहे. शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी देणग्यांचा उपयोग करण्याची दृष्टी संस्थाचालकांजवळ असावी. शिक्षकांना मिळणारे वेतन, रोजंदारीसारखे तासावर ठरविले असेल तर ते या पेशाला कमीपणा आणणारे आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या शिकविण्याचा, त्यांनी स्वत:चे ज्ञान वाढविण्यासाठी केलेल्या परिश्रमांचा, विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्रे, शिबिरे इत्यादींच्या आयोजनाचा विचार सध्याच्या पद्धतीत केला जात आहे, ही गोष्ट स्वागतार्हच आहे. विद्यापीठाच्या कक्षेत येणारी महाविद्यालये असोत किंवा शालान्तमाध्यमिक परीक्षा बोर्डाच्या कक्षेत येणाऱ्या शाळा असोत, त्यांचा परस्परसंबध राहिला पाहिजे. महाविद्यालयातील अभ्यासाची माहिती वेळोवेळी विद्यापीठाला कळली पाहिजे आणि शाळांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची गरज बोर्डाला जाणवली पाहिजे. 

शैक्षणिक दृष्टिकोन कसा असावा, त्याने काय साध्य करावे, याचा थोडक्यात गोषवारा पुढील शब्दांमधून देता येईल : "प्रासंगिकता, समानता आणि उत्कृष्टता यांच्या भक्कम खांबांवर आधारित एकरूप समाजाची बांधणी करणे, भारताचे जागतिक संस्कृतीमधील योगदान शोधणे आणि मूळ स्वरूप, ज्ञानाचे एकत्रीकरण करणे, भारतीय असण्याबद्दलचा स्वाभिमान जागृत करून तो वृद्धिंगत करणे, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे; त्या शिक्षणाची जीवनाधिष्ठित कौशल्याशी सांगड घालणे, विविध शालेय स्तरांवर मूल्यांची जोपासना करणे, माहिती व तंत्रज्ञानाबरोबरच जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाणे, अभ्यासक्रमाचे ओझे कमी करणे, प्राथमिक स्तरावरील पहिल्या दोन वर्षांमध्ये भाषा, गणित आणि इतर उपक्रमांबरोबरच पर्यावरण शिक्षणाचा अंतर्भाव करणे, त्रिभाषासूत्राच्या मूळ धोरणाशी निगडित राहून हिंदीला कार्यालयीन भाषा म्हणून; इंग्रजीबरोबरच संस्कृतला ज्ञानभाषा म्हणून महत्त्व आणून देणे; बाह्य परीक्षांचे प्राबल्य कमी करून इयत्ता दहावीपर्यंत नापास किंवा पास हे दोन्ही प्रकार कमी करणे; अध्ययनप्रकियेत श्रेणीदानाच्या पद्धतीचा अवलंब करणे; माध्यमिक शालेय आणि उच्च माध्यमिक स्तरावर सूत्रपद्धतीचा अवलंब करणे; अशा शैक्षणिक आराखड्यांवर विचारवंतांमध्ये चर्चाही होत आहेत. राज्यांच्या गरजांनुसार त्यामध्ये बदल करण्याचेही अधिकार राज्याला आहेत."

एकविसावे शतक हे विज्ञाननिष्ठ शतक म्हणून मानले जाते; म्हणून परीक्षांच्या व अध्यापनाच्या साचेबंद पद्धतीमध्ये बदल करून गुणवत्तेला महत्त्व देणारी पद्धती आणावी. नोकऱ्यांची शक्यता दिवसेंदिवस कमी होत जाणार हे लक्षात घेऊन शिक्षणाने उद्योजकता, नवी कौशल्ये, निर्णयक्षमता, विश्लेषणक्षमता, सजनशीलता यांवर भर देणारी नवी वैशिष्ट्ये स्वीकारावीत. विद्यार्थ्यांत सतत नवे शिकण्याची वृत्ती निर्माण करावी व जागतिकीकरणावर लक्ष ठेवण्याची आधुनिकता आणावी. या गोष्टी अभ्यासक्रमातून कशा येतील, कोणत्या शैक्षणिक स्तरांवर त्यांचे ज्ञान किती द्यावे, याचा विचार हा एक प्रकारे तपशिलाचा भाग आहे. मुख्य मुद्दा हा आहे की, शिक्षणाने घडविलेला विद्यार्थी आज जगाच्या बाजारात टिकला पाहिजे. त्याने आपले वेगळेपण, भारतीयत्व आपल्या उद्योगधंद्यांतून जगासमोर आणले पाहिजे. 

सारांश

व्यक्तिमत्त्वविकासामध्ये सर्वांगीण विकासाकडे लक्ष पुरविलेले असते; पण आज. शैक्षणिक पद्धतीमध्ये फक्त बौद्धिकतेकडे लक्ष अधिक आहे. पूर्वीच्या काळी असलेला गुरुजनांचा सहवास व त्यांचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांसमोर नाही. फक्त पुस्तकी ज्ञानावर भर आहे. विविध विद्यापीठांतील अभ्यासक्रम आज समकक्षतेचा अवलंब करीत असल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष/श्रम/पैसा यांची बचत होऊ शकते. ही सुधारणा जशी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त तसेच छोटे अभ्यासक्रम असावेत, नवे कालानुरूप विषय अभ्यासक्रमात यावेत ही दृष्टीही योग्य आहे; पण मातृभाषेकडे दुर्लक्ष होऊ नये. शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी सुसंस्कृत व गुणवान असावेत. विज्ञाननिष्ठा, आधुनिकता व परंपरेतील संचित यांचा मेळ घातला जावा.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: