Essay on Subhash Chandra Bose in Marathi Nibandh : In this article read "माझा आवडता नेता सुभाषचंद्र बोस मराठी निबंध", "नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती मर
Essay on Subhash Chandra Bose in Marathi Nibandh : In this article read "माझा आवडता नेता सुभाषचंद्र बोस मराठी निबंध", "नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती मराठी निबंध", "Marathi Essay on Subhash Chandra Bose" for Students.
नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी माहिती निबंध - Marathi Essay on Subhash Chandra Bose Mahiti
नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी माहिती निबंध - शून्यातून विश्व निर्मिणारा महान सेनापती! त्यांनी पुरोगामी पक्ष काढला. देशभरातील युवकांचे संघटन केले. अदम्य साहस आणि अपूर्व तेजाच्या बळावर आझाद-हिंद-सेना स्थापन केली. तुमचे जीवन आम्हाला जातीय विषापासून मुक्त करो, देशसेवेचे वेड लावो. केवढे भव्यदिव्य जीवन, लहानपणापासूनच ते बाणेदार. विद्यार्थी असताना भारताचा अपमान करणाऱ्या गोऱ्या प्राध्यापकाच्या त्यांनी तोंडात मारली. ते विवेकानंदांचे भक्त. हिमालयातही निघून गेले होते; परंतु तेथे एका साधूने त्यांना सांगितले, "भारताची सेवा कर, गरिबांची सेवा कर, तेच प्रभूचे दर्शन."
ते हिमालयातून भारतमातेच्या मुक्तीसाठी आले. विलायतेत गेले; परंतु परत आले तो असहकाराचा यज्ञ पेटलेला.महात्माजी राष्ट्राला त्याग-दीक्षा देत होते. देशबंधू चितरंजन दास एका क्षणांत फकीर झाले. ते दिवस तेजाचे, पुण्याचे होते. सारे राष्ट्र उठले, पेटले. सुभाषबाबू देशबंधूंना मिळाले आणि तेव्हापासून जीवनयज्ञ सुरु झाला. स्वयंसेवक संघटना बेकायदा झाल्या. हा तरुण तुरुंगात गेला. हजारो गेले. पुढे सुटका. देशबंधू 1925 मध्ये अकस्मात मरण पावले. राष्ट्र हादरले. सुभाषबाबू तरुणांची संघटना करू लागले. ते महाराष्ट्रात आले होते. जवाहरलाल, नेताजी व जयप्रकाश म्हणजे भारताचे तीन पृथ्वीमोलाचे हिरे.
1928 मध्ये कलकत्ता काँग्रेस झाली. सुभाषबाबू स्वयंसेवकांचे मुख्य होते. 1930 साल उजाडले. सत्याग्रह संग्राम सुरू झाला. सुभाषबाबू कितीदा तरी तुरुंगात गेले. त्यांची प्रकृती बिघडली. ते युरोपात गेले. त्याच वेळी विठ्ठलभाई पटेलही युरोपात आजारी होते. सुभाषचंद्रांनी त्यांची सेवा केली. 1930 मध्ये हरिपुरा काँग्रेसचे ते अध्यक्ष होते; परंतु त्यांचे व काँग्रेसचे मतभेद झाले. अध्यक्षही चुरशीच्या निवडणुकीने ते झाले. गांधीजी म्हणाले, "माझा हा पराजय आहे." कोणते मतभेद होते? जगात महायुद्ध पेटणार असे दिसत होते. त्याबाबतीत सुभाषबाबूंची काही निश्चित योजना होती. त्यांचे धोरण काँग्रेस नेत्यांना पटले नाही. पुढे त्यांना राजीनामा द्यावा लागला. पंडितजींना अति दुःख झाले. “पृथ्वीने दुभंग होऊन मला पोटांत घ्यावे'' म्हणाले.
सुभाषबाबूंनी पुरोगामी पक्ष काढला. देशभर संघटना केली आणि 1939 मध्ये महायुद्ध आले. सरकार सुभाषबाबूंवर सक्त पहारा करीत होते. ते आजारी आहेत. बातमी आली. आम्ही 41 साली वैयक्तिक सत्याग्रहात तुरुंगात होतो. नेताजी निसटल्याची बातमी आली. पठाणी वेषात संकटांतून ते शेवटी अफगाणिस्तानातून इटलीत व जर्मनीत गेले.
इकडे देशात चलेजाव लढा पेटला. नेताजींनी जर्मनीच्या ताब्यातील हिंदी सैनिकांना आझाद सैनिक बनविले. हिंदी लोकांची प्रतिष्ठा राखली. पाणबुडीतून अटलांटिक व हिंदी महासागर ओलांडून धैर्यमूर्ती आली. ब्रह्मदेश जिंकित जपान आलेला. हजारो हिंदी सैनिक युद्धकैदी झालेले. नेताजींनी आझाद सेनेची आधीच सुरु झालेली चळवळ व्यवस्थित केली. अंदमान-निकोबार 'शहीद' बेटे झाली. एकेक चमत्कार, 'अर्जी-ए-हुकुमते-हिंद' स्थापन झाले. नाणे पाडले. खाती पाडली. अक्षरराष्टांनी, स्वतंत्र हिंदी व्यापाऱ्यांनी कोटी कोटी खजिने दिले. गळ्यातील हार लाखो रुपयास जात. स्त्रियांच्या पलटणी उभ्या राहिल्या. कॅप्टन लक्ष्मी उभी राहिली.
परंतु देशातील चलेजाव लढाही थांबला होता. लगेचच अॅटमबाँबने जपान पाडले. आझाद हिंद फोज गवत खाऊन लढत होती. बैलगाड्यांतून रणगाड्यांशी झुंजत होती; परंतु आता उपाय नव्हता नेताजींचे डोळे भरून आले. "तुम्ही महात्माजींकडे जा. मी देशासाठी जातो." ते विमानात चढले; परंतु त्या विमानाने त्यांना देवाघरी नेले. त्यांची शेवटची भेट, रिस्टवॉच, जवाहरलालकडे आली. ती त्यांनी शरदबाबूंना दिली. आझाद सैनिक गिरफ्तार झाले. अनेकांना गोळ्या घालण्यात आल्या.
परंतु काँग्रेसने उंच आवाज केला. स्वर्गीय भुलाभाई उभे राहिले. "गुलाम राष्ट्राला बंडाचा अधिकार आहे." ते म्हणाले. पंडितजींनी जयहिंद मंत्र राष्ट्राचा केला. नेताजी हृदया-हृदयात अमर झाले. केवढे धगधगीत जीवन! ते एकदा म्हणाले, "माझ्या लग्नाचा विचार मला कधी शिवला नाही. भारतामातेचे स्वातंत्र्याशी लग्न कधी लावीन हाच विचार माझ्या मनात असतो." यांच्या रोमारोमांत भारतीय स्वातंत्र्याची उत्कटता होती.
नेताजी आम्ही धन्य, आम्ही तुम्हास पाहिले, तुमची वाणी ऐकली, शून्यातून विश्व निघण्याचे महान अद्वितीय कर्तृत्व पाहिले! भारतीय स्वातंत्र्य आणण्यात तुमचा केवढा हिस्सा! प्रणाम, प्रणाम तुम्हाला। तुमचे जीवन आम्हाला जातीय विषापासून मुक्त करो, देशसेवेचे वेड लावो.
COMMENTS