Thursday, 29 October 2020

Marathi Essay on "Science and Human values", "विज्ञानाची प्रगती आणि मानवी मूल्यांचा हास मराठी निबंध" for Students

Essay on Science and Human values in Marathi Language: In this article "विज्ञानाची प्रगती आणि मानवी मूल्यांचा हास मराठी निबंध" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Science and Human values", "विज्ञानाची प्रगती आणि मानवी मूल्यांचा हास मराठी निबंध" for Students

एके काळी गुहेत राहणाऱ्या मानवी प्राण्याने आपल्या बुद्धीच्या व मनाच्या जोरावर आजचे आधुनिक विश्व व संस्कृती उभी केली आहे. त्याच काळातील मांजर, कुत्रा, सिंह इत्यादी प्राणी मात्र अशी प्रगतीची दालने उभारू शकली नाहीत. मानव-प्राण्याजवळ स्वसंरक्षणाचे कोणतेही साधन नाही; पण उत्क्रांतीच्या टप्प्यात असेल किंवा अन्य कारणांमुळे असेल तो प्राण्यापेक्षा बुद्धीच्या जोरावर विश्वाचे रहस्य शोधण्याची धडपड करू लागला. शारीरिक, मानसिक व बौद्धिक पातळीवरचे आपले जीवन सुखी कसे करता येईल याचा विचारच त्याला विज्ञानाच्या प्रगतीकडे नेऊ शकला; आणि रेव्हरंड ना. वा. टिळकांसारख्या कवीच्या शब्दांत म्हणायचे तर 'पाहीन एके दिनी, मीच सारे कुठे झाकले चंद्र तारे रवी।' अशा शोधयात्रेमध्ये त्याला आपले जीवन निदान शारीरिक सुखसोयींनी समृद्ध करण्याचा मार्ग सापडला.

विज्ञानाच्या प्रगतीला कारणीभूत झालेले प्राथमिक अवस्थेतील तीन शोध म्हणून चाकाचा, घर्षणातून निर्माण होणाऱ्या विजेचा व मुखातील ध्वनींच्या साहाय्याने तयार झालेल्या भाषेचा उल्लेख करावा लागतो. मानवाच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये पृथ्वीच्या उदरातून, खाणीतून सापडलेल्या ब्राँझ, लोह धातूंनाही महत्त्व आहे. निसर्गातील झाडाझुडपांच्या औषधी उपयोगाच्या शोधांनाही महत्त्व आहे. विविध धातूंच्या प्रमाणशीर मिश्रणांनी तयार केलेली अनेक औषधे माणसाला दीर्घायुषी करू शकतात, याचाही शोध घेतला गेला आहे. विज्ञानाच्या शोधांचा हेतू (१) माणसाचे जीवन अधिकाधिक सुखी व समृद्ध करणे; (२) त्यासाठी सर्व प्रकारच्या संकटांवर, रोगांवर, वातावरणातील अशुद्धतेवर उपाय शोधणे; (३) निसर्गशक्ती स्वतःच्या सुखांसाठी व अखिल मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने उपयोगात आणणे व त्यासाठी निसर्गावर ताबा मिळविणे या दृष्टीने मानवी जीवनाची गुरुकिल्ली शोधण्याचा आहे. आज तर संगणकासारख्या शोधाने माणसाने एका क्रांतिकारी युगाची सुरुवातच करून दिली आहे, असे म्हणायला हरकत नाही. आता तर मानवाचा शोध केवळ यंत्रमानव निर्माण करून समाधान पावला नाही तर ‘डी. एन. ए' च्या आधारे अन्य मानव निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी करू पाहत आहे. 'टेस्ट ट्यूब बेबी' प्रयोगापेक्षाही हा प्रयोग त्याला नवे तंत्र हस्तगत करून देणारा आहे. मानवनिर्मितीचे रहस्यच त्याच्या हाती गवसले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

विज्ञानाने व त्याच्या आधारावरच्या तंत्रज्ञानाने केलेली ही वाटचाल माणसाच्या बुद्धीचा एक चमत्कारच म्हणावा लागतो. निसर्गाचे निरीक्षण व शक्य असल्यास प्रयोग यांच्याद्वारा तर्कसंगत पद्धतीने विज्ञानाने प्रारंभापासून केलेले हे संशोधन मानवी जीवनाच्या सर्व अंगांना केवळ स्पर्श करणारे आहे, असे नसून पुष्कळदा त्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे आहे. माणसाच्या वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक सर्वच पातळ्यांवर विज्ञानाने प्रगती साधलेली आहे. आज खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेले विजेचे दिवे, विजेची उपकरणे, शहरांचा सर्वांगीण विकास, दळणवळणात गतिमानता आणणारी वाहने, गतिमान प्रसारमाध्यमे, मुद्रणकला या सर्वांच्या पाठीशी विज्ञानाची दृष्टी आहे. मानवी जीवनातील आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या विज्ञानाची जडणघडण केवळ पाच शतकांतली आहे असे म्हटले जाते; पण प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना वैज्ञानिक दृष्टी नसली तरी वैज्ञानिक शोधांचे फलित आढळते. भगीरथ प्रयत्नांनी गंगेचे पाणी उत्तर प्रदेशात खेळविणे, हिमालयात वास्तव्य असलेल्या शंकराच्या जटेत गंगेचे उगमस्थान सांगणे, मलयगिरीवरच्या औषधी लंकेच्या रणक्षेत्रावर मारुतीने आणणे, मारुतीचे स्वरूप, महाभारतीय युद्धामधील विविध शस्त्रास्त्रे, शंभर कौरवांचा जन्म इत्यादी लोकसाहित्यांतील कथांमधून केवळ काल्पनिकताच आहे असे समजणे या विचारवंतांना मान्य नाही. रामेश्वर ते लंका यांदरम्यान रामाने बांधलेला सेतू आजच्या विज्ञानाला सापडला आहे. याचा अर्थ, त्या काळीही विज्ञानाची वाटचाल सुरू होती. फक्त ती प्रसारित करण्याची यंत्रणा नसल्याने लोकसाहित्यांतून व धार्मिक रूढींतून जतन केली जात होती. पण कोणत्या तरी कारणांनी ही वाटचाल खंडित झाली असावी. आजही अजंठा, वेरूळमधील कैलास लेण्यासारखी लेणी, शिल्पे, बौद्ध धर्मीयांची सभामंडपरचना यांमधून विज्ञानाच्या प्रगतीचा वेध घेता येतो; पण ही दृष्टी त्या काळात, आजच्यासारखी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जाणवत नव्हती.

या वैज्ञानिक प्रगतीमध्ये मानवी बदीचे अथक परिश्रम आहेत हे मान्य करायला पाहिजे: पण तेव्हाच्या गहेत राहणाऱ्या माणसापेक्षा आजचा उंच उंच इमारती बांधणारा व राजमहालात ऐषारामी जीवन जगणारा मनुष्य प्रगत झाला आहे काय? तेव्हाच्या त्याच्या प्राणिपातळीपेक्षा मानवी पातळीवर त्याचे उन्नयन झाले आहे काय? व ते झाले असेल तर त्याला वैज्ञानिक प्रगतीने किती हातभार लावलेला आहे याचे सकारात्मक उत्तर देणे कठीण आहे. आजच्या आधुनिक युगात त्याची हिंसक प्रवृत्ती विज्ञानाच्या प्रगतीचा हात धरून अधिक घातक बनली आहे. रोगप्रतिबंधक औषधे शोधणारे हेच विज्ञान लाखो माणसांचे जीवन एका क्षणात कसे उद्ध्वस्त करता येईल, याचे शस्त्र शोधीत आहे. वाढते शहरीकरण, सिमेंटची जंगले, कारखान्यांनी निर्माण केलेले प्रदूषण, पिकांच्या संदर्भातील प्रयोगांमुळे मानवी खाद्यपदार्थांमध्ये येणारे विषारी घटक, पाण्याचा उपसा करण्यामुळे पाण्याची खालावणारी पातळी, यांमुळे विज्ञानाच्या प्रगतीने पृथ्वीवरच्या माणसाचे जीवनच प्रदूषित झाले आहे. निसर्गाकडून अनेक गोष्टी घेताना त्याला सुरक्षित ठेवण्याचे भान वैज्ञानिक शोधांनी दाखविले नाही. पर्यावरणाचा तोल ढासळण्याला विज्ञानाची बेसुमार व अनिबंध वाटचाल कारणीभूत ठरत आहे. पर्यावरणाचा तोल सावरण्याचे कार्य आज विज्ञान करू पाहत असले तरी नैसर्गिक शक्तींचा वारेमाप वापर करताना काही बंधने पाळण्याची गरज विज्ञानाला जाणवू पाहत आहे. जी स्थिती नैसर्गिक प्रदूषणाची तीच मानवी जीवनातील सांस्कृतिक, नैतिक, धार्मिक, सामाजिक मूल्यांच्या संदर्भातील प्रदूषणांची झालेली आहे. विज्ञानाने एक वेळ निसर्गावर विजय मिळविला असेल; पण मानवी मनाला जिंकणे त्याला शक्य झाले नाही; म्हणूनच विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाने माणसाचे मन परत प्राणिपातळीवर जाऊ लागले आहे. माणसाने उभारलेली मानवी संस्कृतीची मंदिरे कोसळू लागली आहेत. मूल्यांचा -हास घडविणारी महायुद्धे हीच विज्ञानाची देणगी होणार असेल तर विज्ञानाने साधणारी प्रगतीही दूर करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.

आज विज्ञान दूरदर्शनच्या माध्यमातून घरोघरी पोहोचले आहे; पण त्याचा उपयोग कसा केला जात आहे? कोणते संस्कार ते समाजावर करीत आहे? समाजाला अनैतिकतेकडे, अश्लीलतेकडे, अधर्माकडे, हिंसकतेकडे, अमानुषतेकडे सातत्याने नेण्याचे कार्य दूरदर्शनमुळे होत आहे हे नाकारता येत नाही. हा दोष विज्ञानाचा नाही. विज्ञानाचा उपयोग करणारा माणूस त्याला जबाबदार आहे. त्याच्या आर्थिक स्वार्थापोटी तो समाजाला या माध्यमातून कोणत्याही हीन पातळीपर्यंत न्यायला मागेपुढे पाहणार नाही; कारण विज्ञान त्याच्या मनाला सुसंस्कार देऊ शकले नाही, देऊ शकत नाही. हातातील हत्यार प्रभावशाली करणे एवढेच विज्ञानाला साधते; पण ते हत्यार चालविणारे मन विवेकशील आहे की नाही व नसेल तर त्याला विवेकी बनविणे हे कार्य विज्ञानाने कधीच हाती घेतले नाही. ते त्याचे क्षेत्रच नाही. गरज आहे ती असे सुसंस्कार देण्याची. मनावर असे संस्कार रुजविलेले असल्याशिवाय माणुसकीच्या मूल्यांची जपणूक करता येणार नाही. माणुसकीचा प्रारंभापासूनचा वसा माणसाला टिकवायचा असेल तर विज्ञानाच्या प्रगतीच्या जोडीला जीवनाला अर्थ देणाऱ्या मानवी मूल्यांची शिकवण प्रत्येक पिढीला दिली पाहिजे.

वैज्ञानिक प्रगती कशाला म्हणायची? केवळ सुखवादाची लयलूट व चंगळ म्हणजे वैज्ञानिक प्रगतीचा कडेलोट असे म्हणता येईल काय? वैज्ञानिक शोधांनी माणसाच्या मनातील स्पर्धात्मक भावनेला, स्वार्थाच्या प्रवृत्तीला, भोगलालसेला खतपाणी घातले आहे. याचे कारण त्याच्यावर आवश्यक ते संस्कार बालपणापासून घडलेले नाहीत. हे संस्कार देवाधर्माचे नाव घेऊन रुजविले तरी चालतील किंवा देवाधर्माचे नाव न घेताही माणुसकीची नियमावली म्हणून रुजविता येतील. पण खोटे बोलू नये, चोरी करू नये, कुणाला फसवू नये, प्राण्यांबद्दलही करुणा दाखवावी, भुकेलेल्याला घास द्यावा, दुबळ्यांना आधार द्यावा, पापवासना नसावी, शठाशी शठ असावे; पण सज्जनाला छळू नये, इत्यादी मानवी मूल्ये कोणत्याही मार्गाने समाजात टिकली पाहिजेत. ही मूल्ये टिकविण्यासाठी पापपुण्याची नावे घेऊन स्वर्गनरकाचा, देवाचा धाक दाखवा किंवा समाजाच्या स्वास्थ्यासाठी त्यांची आवश्यकता पटवून द्या. पण महत्त्व या मूल्यांना आहे. देवाधर्माची उभारणी या मूल्यव्यवस्थेसाठी असते. या मूल्यव्यवस्थेच्या स्थिरतेसाठी विज्ञान काय करू शकते? विज्ञान फक्त अग्नीला काडेपेटीत बंदिस्त करू शकते, लायटरमध्ये उपलब्ध करून देते. पण त्याचा उपयोग अन्न शिजविण्यासाठी करायचा की अन्य विध्वंसक कार्यासाठी करायचा ते शिकवू शकत नसल्याने जीवनातील मूल्यकल्पनाच हरवू लागली आहे. किंबहुना जीवनात मूल्यांची गरजच काय असा प्रश्न विज्ञानाच्या प्रभावाखाली बुद्धिवादी माणसांकडून जेव्हा विचारला जातो तेव्हा त्यांना विज्ञानाचा हेतू तरी कळलेला आहे की नाही याचाच प्रश्न पडतो.

विज्ञानाने माणसाच्या जीवनाला निश्चित आधार मिळतो; त्याला संरक्षण मिळते; त्याच्या जिज्ञासेला उत्तरे मिळतात; पण माणसाच्या प्रवृत्तींवर माणुसकीचे संस्कार होण्याची गरज असते. समाजात त्याला स्वास्थ्य, सुरक्षितता व गुणसंवर्धनाला पोषक वातावरण मिळते. माणसाने निर्माण केलेल्या समाजाचे अस्तित्व त्याच्या वर्तनावर अवलंबून असते. त्यासाठी त्याला त्याच्या स्वार्थावर व नैसर्गिक प्रवृत्तींवर संयमाचे बंधन घालावे लागते. समाजासाठी व त्यानेच निर्माण केलेल्या कुटुंबसंस्थेसाठी त्याला त्याच्या कामप्रवृत्तीवर नियंत्रण ठेवावे लागते. केवळ मुलांच्याच नव्हे तर पुढील पिढ्यांच्या संस्काराची व संरक्षणाची तो काळजी घ्यायला शिकतो. कुटुंबाचा व समाजाचा एक घटक या नात्याने त्याच्यावर असलेल्या जबाबदारीचा व त्याच्या कर्तव्यांचा समावेश मानवी मूल्यांमध्ये केला जातो. समाज, प्रांत, राष्ट्र, परंपरा, संस्कृती इत्यादी टिकविण्यासाठी मूल्यव्यवस्था असते. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या शब्दांत भारतीय संस्कृतीने माणसाची चतुर्विध प्रवृत्तीच सांगितली आहे. ही प्रवृत्ती किंवा ही मानवी मूल्ये माणसांनी आपल्या स्वास्थ्यासाठी व विकासासाठी जतन करायची असतात. विज्ञानाच्या शोधांचा जीवनात वापर करताना याच मूल्यांकडे डोळेझाक होऊ लागली आहे. विज्ञानाचा उपयोग करणाऱ्या मनावर संस्कारांचे दडपण नसल्याने ते केवळ सत्ता, केवळ धनसंपत्ती व सुखाच्या नावाखाली व्यसनाधीनता यांच्या अधीन झाले आहे.

विज्ञानाने लावलेल्या शोधांचा उपयोग करणारे मन संस्कारित नसल्याने विज्ञानाच्या शोधांचा दुरुपयोग झाला ही जशी वस्तुस्थिती आहे, तशीच विज्ञानाच्या प्रगतीने आणलेल्या तंत्रज्ञानाने व औद्योगिक क्रांतीने माणसाच्या अस्तित्वाला यंत्रवत करून टाकले हीही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही. माणसाचे जगणे यंत्रासारखे करून टाकले. यंत्राच्या तालावर माणूस जगू लागला. औद्योगिक क्रांतीमुळे वाढलेल्या कारखानदारीने कामगार-मजूरभांडवलदार हा नवाच वर्ग समाजात निर्माण केला. समाजातील 'आहे रे' व 'नाही रे' अशी गरीब-श्रीमंतांमधील दरी सामाजिक प्रश्नांमध्ये भर घालू लागली. शैक्षणिक पातळीवर विज्ञानामुळे अनेक सोयी उपलब्ध केल्या गेल्या. पण त्यामध्ये असलेला व्यक्तिमत्त्वाचा व माणसाचा स्पर्श नाहीसा झाला. बुद्धीचे महत्त्व वाढले आणि शारीरिक कष्टांचे मूल्य घसरले. लायनस पॉलिंगसारख्या शास्त्रज्ञांना अण्वस्त्रामुळे मानवाचे भवितव्य धोक्यामध्ये आहे याची झालेली जाणीव म्हणजे विज्ञानाला असलेली जीवनमूल्यांची जाणीव होय. अण्वस्त्र चाचण्यांवर बंदी आणण्याचे त्यांचे प्रयत्न हे याचेच दर्शक आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन उघड्यावर अण्वस्त्र चाचण्या करण्यावर बंदी घालणारा आंतरराष्ट्रीय करार केला गेला. शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या पॉलिंगचे पुढील मत वैज्ञानिक प्रगती व मानवी मूल्ये यांच्या संबंधात महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणतात, 'विज्ञानावर सामाजिक जबाबदारी असते; म्हणून शास्त्रज्ञांनी समाजापासून दूर राहणे योग्य नाही.' शास्त्रज्ञांनी आपल्या शोधांमुळे मानवजातीची हानी होत नाही ना, एवढेच लक्षात घेऊन त्याचे कर्तव्य संपत नाही, तर त्याला देत असलेल्या सुविधांमुळे त्यांचे सांस्कृतिक जीवन अधिक समृद्ध कसे होईल याकडे लक्ष पुरविले पाहिजे. नाहीतर भस्मासुराप्रमाणे तो स्वत:च्याच मस्तकावर हात ठेवून सर्व मानवजातीचे भविष्य धोक्यात आणील.

सारांश

विज्ञानाच्या प्रगतीने माणूस सुखसोयींची अनेक साधने प्राप्त करून घेऊ शकला. निसर्गाच्या निरीक्षणातून विज्ञानाने मानवी जीवनात शारीरिक पातळीवरच्या सुविधा आणल्या. पूर्वीही विज्ञानाने समाजोपयोगी कार्य उभे केले आहे; पण माणसाच्या मानवता, करुणा इत्यादी मूल्यांची जपणूक विज्ञानाला कराविशी वाटली नाही. देवधर्म किंवा अन्य कोणत्याही नियमव्यवस्थेचा आधार घेऊन ही मूल्यव्यवस्था टिकविण्याची गरज आहे.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: