Wednesday, 4 November 2020

Marathi Essay on "Vrudhanchya Samasya", "वृध्दांच्या समस्या मराठी निबंध for Students

Essay on Vrudhanchya Samasya in Marathi Language: In this article "वृध्दांच्या समस्या मराठी निबंध", "वृद्धपणा : समस्या आणि उपाय मराठी निबंध", "Vrudhanchya Samasya Marathi Nibandh Mahiti" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Vrudhanchya Samasya", "वृध्दांच्या समस्या मराठी निबंध for Students

वृद्धपणा म्हणजे परिपक्वता; विचारांची, जीवनविषयक अनुभवांची केवढी तरी शिदोरी वृद्धांजवळ असते; पण ती पेलणारी शरीरयंत्रणा मात्र थकत चाललेली असते. वाढत्या वयामुळे शरीराला येणारी ही थकावट माणसाला अस्वस्थ करते; सुखाला ओहोटी लावते. 'सुखी म्हातारपण म्हणजे गुलबकावलीचे फूल,' असे 'नटसम्राट'मधील बेलवलकर म्हणतात. गुलबकावलीचे फूल जसे नेहमीच दुर्मिळ असते, तीच गोष्ट सुखी म्हातारपणाबद्दलही खरी असते. सुख हे मानण्यावर आहे. पण तरीही वाढत्या प्रौढ वयातून जेव्हा व्यक्ती वृद्धपणाकडे झुकू लागते तेव्हा तिला हा वृद्धपणा नको असतो. लोकांनी आपल्याला 'म्हातारा' म्हणू नये, याची ती काळजी घेऊ लागते. “शरीर थकले तरी आपण मनाने तरुण आहोत, तरुणांच्या बरोबरीने कामे करू शकतो; तरुणांना लाजवील असा उत्साह आपल्याजवळ आहे", हे सिद्ध करण्याचा ती अट्टाहास करीत असते.

एकीकडे माणसाला खूप जगावे असे वाटत असते; पण नवल म्हणजे म्हातारपणाचा मात्र तिटकारा असतो. याचे कारण उघड आहे. वृद्धपणामुळे देहातील काम करण्याची शक्ती व उमेद कमी कमी होत जाते. नव्या गोष्टी स्वीकारण्यापेक्षा 'बाबावाक्यम् प्रमाणम्' या न्यायाला अनुसरून अंगवळणी पडलेल्या जुन्या गोष्टींचा आग्रह सवयीनुसार ते धरू लागतात. “विशीमध्ये माणूस काळाच्या पुढे धावत असतो, चाळिशीत तो काळाबरोबर असतो आणि पन्नाशीनंतर तो काळाच्या मागे पडतो," अशा प्रकारचे वि. स. खांडेकरांचे विधान वृद्ध माणसाच्या प्रवृत्ती कोणत्या असतात, यावर प्रकाश टाकते. आपण काळाच्या बरोबर राहू शकत नाही, याची जाणीव त्याला स्वत:ला डाचत असते; स्वत:ला वृद्ध समजण्याचे तो टाळतो; वृद्धत्वाचा द्वेष करतो, हीच एक महत्त्वाची समस्या वृद्धपणाच्या संदर्भात प्रथम सोडविता आली पाहिजे.

शरीराला येणारा हा वृद्धपणा मनाने स्वीकारायला शिकले पाहिजे. आपल्याला आलेल्या म्हातारपणाने आपल्या शारीरिक शक्ती पूर्वीइतक्या जोमदार राहणार नाहीत, ही जाणीव ठेवून वागणे हे त्याला जमले पाहिजे. तसेच आपल्या जीवनभराच्या आयुष्याने आपल्यास जे अनुभवांचे संचित दिलेले आहे, त्याचा शांतपणाने विचार करण्याची सवय त्याने लावून घ्यायला पाहिजे. पुढच्या पिढीला हे अनुभवाचे धन आपण देऊ शकतो, ते त्यांना त्यांच्या कलाकलाने शिकविणे, त्यांच्याशी मोठेपणाने पण मैत्रीचे संबंध जोडणे, त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वासाचे व आपुलकीचे वडीलधारे नाते निर्माण करणे हे वृद्धांना जमले पाहिजे.

हे जमणे वाटते तितके सोपे नाही. या वृद्धांना आयुष्यात अनेक गोष्टी मिळालेल्या नसतात; मिळाव्या असे वाटत असूनही ते शक्य झालेले नसते. ते सुख पुढच्या पिढीस सहजपणे मिळताना पाहिले की, त्यांना त्याबद्दल चीड वाटू लागते. कधी कधी आपण केलेल्या चुका तरुण पिढी करताना दिसल्यावर त्यांना त्यामधले धोके सांगावेसे वाटतात. परंतु तरुण पिढीला या 'वृद्धांचे अनुभवांचे बोल' रुचण्याइतके पक्केपण आलेले नसते; त्यामुळे ते त्यांच्या वाटेने, स्वतंत्रपणे वागताना पाहून वृद्धांना आपले घरातले व तरुण पिढीच्या मनातले स्थान ढळल्याचे दुःख होत असते. अशा वेळी 'दुसऱ्यांच्या चुकांनी माणसे सुधारत नसतात' असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. 'आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहोत' हे समजून वागायला शिकणे वृद्धपणाचे धोके टाळण्यासाठी आवश्यक असते.

पुष्कळदा ही वृद्ध माणसे आपल्याला मुलांच्या बरोबरीचे समजून वागतात; याचे कारण त्यांना आपल्या मुलांच्या मनात आपल्याला घरातील कुटुंबाचे कर्तेपणाचे स्थान आहे हे पटवून द्यायचे असते; पण राजाच्या मागून राजपुत्र जसा सत्तेवर येणे नैसर्गिक असते, तसेच घरातही कर्त्या पुरुषाचे स्थान तरुण पिढीकडे जाणे हे स्वाभाविक असते; निसर्गाला धरून असते. तरुण पिढीच्या कर्तृत्वालाच त्यामुळे वाव मिळत असतो; पण वृद्ध माणसे हे विसरतात. आपले कर्तेपणाचे स्थान गेल्याने आता आपल्या शब्दास कुटुंबात किंमत राहिलेली नाही; आपल्याला मान नाही; आर्थिक दृष्टीने आपण दुबळे असल्याने आपल्याकडे घरातल्या माणसांकडून दुर्लक्ष होत आहे, ही जाणीव वृद्धपणामध्ये त्रास देत असते. कुटुंबामध्ये आपले महत्त्वाचे पद, आपल्याला असलेला मान आता वृद्ध झाल्याने मिळेनासा झाला, हे त्यांच्या मनातील दुःख असते.

याबरोबरच एकटेपणाची, एकाकीपणाची पोकळी मनात निर्माण होते. माणसाला समाजात राहायलाही आवडते आणि कधी कधी त्याला एकांतही प्रिय असतो; पण म्हातारपणामध्ये जाणवणारी एकटेपणाची भावना एकांतवासाची नसते. आपल्या हातातून आयुष्य निसटते आहे, ते पकडून ठेवण्याची ही माणसे धडपड करीत असतात. त्यासाठी इतरांना आपले महत्त्व, आपले जीवनविषयक चिंतन वेळी अवेळी ऐकवू लागतात. त्यांच्या या वागण्या-बोलण्यात उपदेशाचा सूर मोठा असतो. परिणामी, बाकीची वृद्ध माणसेही त्यांच्यापासून लांब जातात, दुर्लक्ष करतात, त्यांना टाळतात; त्यामुळे एक प्रकारची 'आपण कुणाला नको आहोत' अशी न्यूनगंडाची भावना मनात निर्माण होते. वृत्ती चिडचिडी होते. हट्टीपणा वाढतो. ती अधिकच एकाकी होतात.

भारतीय परंपरेत वानप्रस्थाश्रमाची कल्पना आहे. ठराविक वयानंतर स्वतः होऊन आपले अधिकार पुढच्या पिढीच्या हातात सोपविणे, घरातील गोष्टींमध्ये फारसे लक्ष न घालणे, मुलामुलींनी सल्ला विचारला तर 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' असा सर्वांना सांभाळून घेणारा सल्ला देणे, अशा वृत्तीने घरातही वानप्रस्थाश्रमातील संसारमुक्तीची प्रवृत्ती जपता येईल. घरातील इतरांना आपण कोणत्या गोष्टींमुळे आवडते होऊ, हवेहवेसे वाटू, आपल्या कोणत्या सवयी त्यांना आवडत नसतील, याचा विचार आपला आपणच करून वागता आले तर हे एकटेपण दूर करता येते. मुख्य म्हणजे आपल्याच समस्या उगाळत बसण्यापेक्षा व आपल्याच शारीरिक किंवा मानसिक गरजा कुरवाळीत बसण्यापेक्षा मुलांच्या समस्या समजून घेणे व प्रसंगी पडते धोरण स्वीकारूनही त्यांना सावरण्यासाठी धडपडणे, त्यांना मदत करणे अशी पक्व व समतोल वृत्ती वृद्धांनी बाळगली पाहिजे. आपल्याला आयुष्यात काय मिळाले, आपल्याला इतरांनी काय दिले, यापेक्षा आपण आयुष्यभरात इतरांना काय देऊ शकलो, ही वृत्ती या वयामध्ये जोपासली पाहिजे. इतरांना समजून घेतले पाहिजे, तरच म्हातारपणीच्या 'संध्याछाया भिवविती हृदया' ही भीती कमी होईल.

समस्या फक्त वृद्धपणाच्याच असतात असे थोडेच आहे? तरुण व प्रौढ यांच्याही समस्या असतात; पण त्यांच्यासमोर भविष्यातील स्वप्नांचा फुलोरा पसरलेला असतो. ती वर्तमानात जगण्यापेक्षा भविष्यकाळातच वावरत असतात. म्हातारपणी अशी भविष्यकाळाविषयी रम्य स्वप्ने रंगविण्याची वा ती साकारण्याची शक्ती उरलेली नसते, हे म्हातारपणाचे महत्त्वाचे दुःख असते. शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्टींनी या वयात दुर्बलता आलेली असते. लहानपण जसे कुणावर तरी अवलंबून असते, तीच स्थिती वृद्धपणाची झालेली असते; पण पुढे पुढे पाहत धावणाऱ्या तरुण पिढीला हे समजू शकत नाही. घरातील वृद्धांची मने, त्यांचे प्रेम त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. त्यांना योग्य तो मान, आदर देऊन वागले तर त्यांच्या अनुभवांचा फायदा तरुण पिढीला मिळू शकेल. पण या दोन पिढ्या एकमेकांना समजून घेत नाहीत. त्यामुळे वृद्धपणाच्या समस्या अधिक त्रासदायक होतात.

तरुण पिढीसमोरच्या अनेक समस्यांमुळे त्यांना वृद्धपणाची कदर करता येत नाही. छोटी जागा, अपुऱ्या सोयीसुविधा, आर्थिक चणचण यांमुळे घरोघरी निर्माण होणाऱ्या प्रश्नांमधून वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची सोय पाहिली जाते.विशेषत्वाने सधनवर्ग आणि पुष्कळदा मध्यमवर्गही या सुविधेचा फायदा घेऊ शकतो. पण वृद्धांना मात्र वृद्धाश्रमात एकाकीपणा वाटतो व 'आपल्याला घराबाहेर काढले आहे, आपले कुणीच नाही; मुले, नातवंडं, सुना, लेकी यांच्या सहवासात राहण्याच्या या दिवसांत आपल्याला वृद्धाश्रमाचा आश्रय घ्यावा लागत आहे', अशी खंत वाटत असते; ते दुःख त्यांचे मन पोखरीत असते. वृद्धाश्रमातील सार्वजनिक जीवनामध्ये घराचा ओलावा येणे कठीण; म्हणून वृद्धाश्रमातील त्यांचे जीवन त्यांच्या मनात घरातील माणसांबद्दलची कटुता वाढवायला कारणीभूत होण्याची शक्यता असते. तसेच 'मुलांना फक्त आपला पैसा हवा आहे; आपण नको आहोत,' ही भावना काही वेळा खरी असली तरी त्यामुळे आपण आपल्याला किती त्रास करून घ्यायचा याचा पाचपोच वृद्धांना ठेवता आला पाहिजे. मुलांच्या हातात आपली आर्थिक मिळकत सोपविताना, आपण आपली स्वत:ची भविष्यकालीन तरतूद करून ठेवायचा विचारीपणा दाखवायला हरकत कोणती? केवळ भावनेच्या आहारी जाऊन, सर्वस्वी त्यांच्या अधीन होण्याचे टाळता आले पाहिजे. 'समोरचे ताट द्यावे; पण बसायचा पाट देऊ नये' हे 'नटसम्राट'मधील कावेरीचे शहाणपण म्हातारपणात तरी उपयुक्त ठरणारे असते.

असे म्हटले जाते की, 'लहान मुलांना मुलांमध्ये खेळायला आवडते. तरुणांना समवयस्कांमध्ये रमायला आवडते.' मग वृद्धांना मात्र वृद्ध माणसांच्या सहवासापेक्षा तरुणांचा व बालकांचा सहवास का हवासा वाटतो? कदाचित वृद्धांच्या हातून निसटून गेलेल्या या तरुणाईच्या व बाल्यजीवनाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद त्यांना तरुण पिढीच्या व बालकांच्या सहवासात अनुभवता येत असेल. कसेही असले तरी आज लहान मुलांसाठी अंगणवाडी, बालवाडी यांची समाजाला गरज आहे, तशीच वृद्धांसाठी वृद्धाश्रमांचीही गरज आहे. पूर्वीची वृद्ध माणसे वानप्रस्थाश्रमात अरण्यामध्ये जाऊन राहायची. आज अरण्ये उरलेली नाहीत, पण घरात राहताना वृद्धांनी ही वृत्ती ठेवून राहायला पाहिजे आणि घरातील माणसांची इच्छा असेल तर वृद्धाश्रमाची वाटचालही स्वीकारायला हवी. पुढच्या पिढीशी जुळवून घेण्याची वृत्ती जोपासायला पाहिजे; त्यांच्या कर्तृत्वाला वाव द्यायला पाहिजे; तरच आपले वृद्धपणाचे जीवन सुखदायक होईल.

वृद्धपणाच्या समस्या पूर्वीही होत्या; पण त्या आजच्याइतक्या उग्र रूप धारण करणाऱ्या नव्हत्या. तेव्हा एकत्र कुटुंबपद्धती होती. एकेका घरामध्ये चुलत, सख्खे धरून पन्नास-साठ माणसांचे कुटुंब असे. शहरापेक्षा खेडेगावच्या जीवनात तर आलेगेलेही खूप असत. शहरातही खेड्यातील नातेवाइकांचे, त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षणाच्या निमित्ताने येणे-जाणे, कायमस्वरूपी राहणेही कमी नव्हते. आजच्या चार-पाच माणसेच असलेल्या विभक्त कुटुंबाच्या तुलनेत ही जुन्या काळातील कुटुंबे म्हणजे जणू काही छोट्याशा संस्थाच असत. त्यांचा कारभार, त्यांची शिस्त यांवर प्रामुख्याने घरातील वृद्ध आजोबा-आजी, आत्या, काका यांचे नियंत्रण असे. गरीब किंवा श्रीमंत घरांमध्येही हेच दिसून येत असे; त्यामुळे वृद्धांच्या मताला व त्यांच्या विचारांना घरामध्ये मान असे. एकमेकांमधील जिव्हाळा वाढता राही; कोणालाच एकटेपणा जाणवत नसे; आणि घराचे घरपण सांभाळण्याची जबाबदारी पेलता पेलता वृद्धांनाही सामंजस्याने विचार करण्याची, नवे-जुने स्वीकारण्याची सवय लागत असे.

आजचे सगळेच चित्र त्यापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना तरुण रक्त व युवा पिढी जेवढी पटकन सामावून जाऊ शकते तेवढे वृद्धांना जमणे अवघड जाते. पण अशा तडजोडीशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्यायही नसतो. रूळ बदलताना गाडीची जशी थोडीफार खडखड होते, तसेच या वृद्धांच्या अवस्थेत या नव्या प्रश्नांना व नव्या परिस्थितीला सामोरे जाताना त्यांना त्रास होतो; पण त्याचा विचार प्रौढ वयातच सुरू केला पाहिजे. मुलगी सासरी जाते. मुले शिक्षणासाठी परगावी व परदेशी जातात. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने भाऊ-भाऊही वेगळ्या शहरात राहतात. किंबहुना एका गावात राहूनही सलोख्याने विभक्त राहण्याकडे भावाभावांचा कल वाढत चालला आहे. त्या प्रकारचेच हे वृद्धाश्रमात राहणे किंवा आपापली स्वतंत्र सोय करणे हे वृद्धांनी मनाने स्वीकारायला पाहिजे. दूर राहूनही मनातला जिव्हाळा कसा जपायचा असतो, याची उदाहरणे घालून द्यायला पाहिजेत. सध्या साठीनंतरच्या वृद्धांना 'ज्येष्ठ नागरिक' म्हणतात. तसेच वृद्धाश्रमाचे नाव व स्वरूपही बदलून टाकता आले पाहिजे.

ज्येष्ठ नागरिकही अनेक शहरांतून स्वत:ची संघटना उभारून, स्वमनोरंजन, उद्बोधन व त्यांच्या जोडीला समाजोपयोगी कार्य करण्यात स्वत:ला गुंतवून घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या व औषधपाण्याच्या सुविधांमुळे असलेली सर्व प्रकारची क्षमता लक्षात घेता, त्यांनी या आपल्या मोकळ्या वेळेचा असा सदुपयोग सुरू केला आहे. आपापल्या आवडीनुसार त्या त्या कार्यामध्ये स्वत:ला गुंतवून घेणे हे वृद्धांना सहज शक्य आहे. आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या असे वाटत असेल, त्या त्या क्षेत्रांत, छंदात स्वत:ला रमविणे हा फार मोठा विरंगुळा त्यांच्यासमोर आहे. जगभरातील वृद्धांच्या वाढत्या समस्यांना हे चांगले उत्तर होऊ शकते.

एका सुभाषितात 'ज्या सभेत वृद्ध नाहीत, ती सभाच नाही' असे म्हटले आहे. हे वृद्धपण केवळ शरीराशी निगडित नाही, हे तर उघडच आहे. आयुष्यभराच्या अनुभवांनी त्यांना खूपसे शिकविलेले असते. समजदारी, व्यापक व सखोल दृष्टी, जीवनाचे नेमके भान त्यांना आलेले असते. त्याचा लाभ समाजाला करून देण्याने त्यांचे स्वत:चे जीवनही सार्थकी लागत असते. आज घरातले वृद्ध आश्रमात जात असले तरी घराला आणि समाजाला त्यांच्या चिंतनशीलतेची गरज आहे. वृद्धांनी या गोष्टीकडे लक्ष पुरवले तर त्यांच्या जीवनात गुलबकावलीच्या फुलाचे अस्तित्व जाणवू लागणे सहज शक्य आहे..

वृद्धपणाचा विचार जेवढा मध्यमवर्गीयांमध्ये केला जातो तेवढा त्यांच्यापेक्षा आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेल्या समाजाला करता येत नाही. त्यांपैकी ज्यांना वृद्धाश्रमाची वाट चालावी लागते त्यांना तिथेही अन्न, वस्त्र, निवारा पुरेसा मिळत नसतो; त्यामुळे त्यांना घरच्या मुलामाणसांत राहायला जाण्याची इच्छा व्हावी, हे पुष्कळसे स्वाभाविक आहे. पण मध्यमवर्गीयांना परवडणारे वृद्धाश्रम त्यांच्या त्यांच्या आर्थिक ताकदीनुसार बऱ्यापैकी सोयीसुविधा देऊ शकतात. अशा वृद्धाश्रमातील माणसांशी संपर्क ठेवण्याचा, त्यांचे मनोरंजन करण्याचा उद्योग काही सामाजिक संस्था करीत असतात. एक ऑक्टोबरला जगभर 'वृद्धदिन' साजरा होतो; त्यामुळे वृद्धांबद्दलची सहानुभूतीची जाणीव समाजमनामध्ये जागी ठेवली जाते. वृद्ध मंडळींनी स्वतः एकत्र येऊनही व्यसनमुक्ती, संस्कारशिक्षण, अपंगांना मदत असे काही सामाजिक कार्य सुरू केले तर त्यांचा वेळ चांगल्या प्रकारे जाईल व त्यांचे एकाकीपण दर होऊ शकेल.

वृद्धाश्रमातील वृद्धांप्रमाणेच घरोघरी असलेली ही वृद्धांची पिढी आपले मन घरातल्या अनेक उद्योगांत गुंतवून ठेवू शकते. विभक्त कुटुंबामध्ये केवळ घर राखण्याचे काम करणे, मुलांकडे लक्ष देणे, आले-गेले पाहणे अशी अनेक कामे करणारी 'घरची माणसे' तरुण पिढीला हवी असतात. प्रत्येक शहरातून, खेड्यातून परिस्थितीनुसार कोणते काम आपल्याला करता येईल, करायला आवडेल, त्याचा विचार करून त्यामध्ये स्वत:ला गुंतवून ठेवणे हे एवढे ऊन-पावसाळे पाहिलेल्या आपल्या मनाला नक्कीच कळू शकेल. आपणच आपले मन रमवायचे असते; दुसऱ्याचे मन वळवायचे असते आणि निसटलेल्या क्षणांमधील स्मृतींचा आनंद, पुनःप्रत्यय घेत जगायचे असते.

बालपण, तरुणपण, प्रौढपण आणि वृद्धपण या मानवी जीवनातील चार अवस्था आहेत. या चारही अवस्थांमध्ये जसा आपल्या शरीराच्या ठेवणीमध्ये बदल व विकास होत असतो, तसेच मनाच्या ठेवणीमध्येही विकास होणे गरजेचे असते. पण जसे शारीरिक विकसन निसर्गावर अवलंबून असते तसे मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक वा आत्मिक विकसन निसर्गावर अवलंबून नसते. त्यासाठी माणसाला स्वतः प्रयत्न करावे लागतात. त्याची सुरुवात लहानपणापासून होत असते. कदाचित एकत्र कुटुंबात, विविध नात्यागोत्यांच्या परिवारामध्ये ती जडणघडण स्वाभाविकपणे होत असेल. एकमेकांशी जुळवून घेण्याची, माणसे ओळखण्याची, दुसऱ्यांकडून कामे करवून घेण्याची व त्यांच्या मनात आपल्याबद्दलची आदराची भावना निर्माण करण्याची अशी स्वत:ची विविधांगी विकसनशीलता बालपणापासूनच संस्कारित होत असेल. आज अशा विकासासाठी आपण स्वत:च प्रयत्न करायला पाहिजेत. ध्यानधारणा, जपजाप्य हे पूर्वीचे मानसिक समाधान मिळवून देणारे मार्ग आपण अनुसरायचे की नाही, नसतील तर त्याऐवजी आपले मन गुंतविण्याचे व मनःशांती मिळविण्याचे अन्य उपाय कोणते, याचा विचार आपण प्रौढपणीच करून ठेवला पाहिजे.

सामान्यतः निवृत्त झालेल्या माणसांना वृद्धत्वाचा प्रश्न अधिक त्रासदायक वाटतो. वर्षानुवर्षे नोकरीच्या निमित्ताने कुणीतरी आखून दिलेल्या दिनक्रमाचे पालन करण्याची सवय झालेल्या या वर्गाला स्वत:च्या कामाचे वेळापत्रक ठरविण्याची सवयच राहिलेली नसते; आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने माणसांच्या गराड्यात राहण्याची सवय अंगवळणी पडलेली असते. त्यामुळे अशी ज्येष्ठ मंडळी चार दिवसांत आपल्या मोकळेपणाला कंटाळतात. दिवसभर काय करायचे हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतो. घरातल्या माणसांना त्यांचे घरातले हे इतके राहणे त्रासदायक वाटू लागते. पुरुषवर्गाच्या तुलनेत निवृत्तीचे वय गाठलेल्या महिलेचे मन इतके निष्क्रिय होत नाही. घरकामाची सवय व आवड असल्याने ती आपला वेळ घरकाम, स्वयंपाक (व गप्पाष्टकेही) यांमध्ये मजेत घालवू शकते. स्त्री कधी निवृत्तच होत नसते' असे म्हटले तर ते वाजवी ठरेल. तिचे केवळ नोकरी हेच एकमेव कार्यक्षेत्र नसल्याने ती आपोआपच स्वत:ला अनेक उद्योगांत गुंतवून घेऊ शकते. घर, मुले इत्यादींची तिला उपजतच ओढ असते. 'आवा चालली पंढरपुरा। वेशीपासून आली घरा।' ही तिची घराची ओढ निवृत्तीच्या काळातही साथसंगत करीत असते.

वृद्धपणा ही समस्या आहे की, स्वत:कडे, स्वत:च्या छंदाकडे, समृद्धीकडे लक्ष देत आनंद घेण्याचा काळ आहे, हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे। चित्ती असू द्यावे समाधान ॥' ही वृत्ती वृद्धपणाला सगळ्यात जास्त लागू पडणारी आहे. 

सारांश

खूप जगावे असे प्रत्येकाला वाटते; पण वृद्धपणा मात्र कुणालाच नको असतो; कारण वृद्धपणा म्हणजे शारीरिक दृष्टीने कमजोर व दुबळे होणे होय; दुसऱ्यावर अवलंबून राहणे होय. पुढच्या पिढीशी मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करण्याने हे परावलंबित्व व एकटेपण सुसह्य होऊ शकते. पुढच्या पिढीला उपदेश करू नये; त्यांच्या गरजा व समस्या समजून घ्याव्यात; घराचे अधिकारपद त्यांना आपण देत नसतो, तर ते त्यांना निसर्गक्रमाने मिळत असते हे भान ठेवावे. घरात असूनही घरातल्या गोष्टींत गरजेपुरतेच लक्ष देणे हे वृद्धांना जमले पाहिजे. तरुण व मुले आपल्याशी जिव्हाळ्याने व आदराने वागावीत असे वाटत असेल तर त्यांच्यापुढेही आज जे डोंगराएवढे प्रश्न आहेत, ते समजून घ्यावेत. शक्यतोवर आपली आर्थिक जबाबदारी आपण दुसप्यांवर सोपवू नये. एकाकीपण टाळण्यासाठी पेलेल अशा उद्योगात किंवा छंदामध्ये स्वत:ला गुंतवून घ्यावे. ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांमधून होणाऱ्या सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा. आहार-विहारात नियमितता ठेवून प्रकृतीची काळजी स्वत:च घ्यायला शिकावे. स्वत:चे दिवसाचे वेळापत्रक स्वतः ठरवून जगण्याची सवय लावावी.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: