Tuesday, 3 November 2020

Marathi Essay on "What if women ruled the world ", "जगाचे नेतृत्व स्त्रियांकडे दिले तर मराठी निबंध" for Students

Essay on what if women ruled the world in Marathi Language: In this article "जगाचे नेतृत्व स्त्रियांकडे दिले तर मराठी निबंध" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "What if women ruled the world ", "जगाचे नेतृत्व स्त्रियांकडे दिले तर मराठी निबंध" for Students

'जग हे परमेश्वराला पडलेले सुरेख स्वप्न आहे' असे म्हटले जाते. स्त्री व पुरुष हे दोघे या स्वप्नांचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या ठिकाणी असलेल्या भिन्न गुणधर्माच्या जोरावर हे जग एकमेकांच्या सहकार्याने परमेश्वराच्या स्वप्नातील सुंदरतेला वास्तवामध्ये साकार करू शकेल; पण वास्तवात हे स्वप्न साकार होण्यासाठी आवश्यक असलेले स्त्री व पुरुष यांचे एकमेकांशी सहकार्य साधले गेलेच नाही. अगदी संस्कृतीच्या प्रारंभापासून या जगातील सगळ्याच गोष्टींवर पुरुषांनी आपली मोहर व आपली कर्तृत्वाची मुद्रा उमटविली आणि आपल्या पराक्रमाचे पोवाडे गाण्याचे व आपल्या कर्तृत्वाला दाद देण्याचे काम स्त्रीकडे सोपविले. लग्न-विधीमध्ये जसे केवळ 'मम' म्हणून हाताला हात लावण्यापुरतेच सहधर्मचारिणीचे काम असते, तेवढेच काम पुरुषाने स्त्रीकडे सोपविले. तिचे स्थान केवळ सहकार्य करण्याचेच राहिले असे नाही, तर दुय्यम पातळीवरचे समजले गेले. सहकार्य देतानाही, ही त्यापेक्षा अधिक काही करू शकत नाही, अशीच अबलेची मनोभूमिका तिच्या मनात वर्षानुवर्षे रुजवली. संसारामध्ये स्त्री ही पुरुषाची सखी, पत्नी, सहधर्मचारिणी म्हणून त्याला सतत प्रोत्साहित करीत असते; त्याला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी धडपडत असते. पण तिच्या या धडपडीकडे व सद्प्रवृत्तीकडे लक्ष दिले गेले नाही. उलट पुरुषांना ज्या प्रकारचा सल्ला सोयीचा व फायद्याचा ठरेल तसाच सल्ला स्त्रीने दिला तरच तो मानला जाऊ लागला; यामुळे एक फार मोठा धोका निर्माण झाला. जग शांततेच्या नावाखाली युद्धाचे रण पेटवू लागले; स्पर्धेच्या नावाखाली मत्सराची वाढ करू लागले; संरक्षणापेक्षा दहशतीसाठी बलाचा, बुद्धीचा व मानसिक ताकदीचा वापर होऊ लागला. नव्या संशोधनाचा वापर अणुबॉम्ब, विनाशकारी शस्त्रे व संहारकतेसाठी कसा करता येईल, यावर भर दिला गेल्याने जग विनाशाच्या खाईजवळ येऊन पोहोचले. निसर्गाचा स्वार्थी वापर करून प्रदूषणाचे संकट उभे केले.

ही विनाशाकडे केली जाणारी वाटचाल केवळ पुरुषांच्या एकतंत्री प्रभावामुळे झाली. त्यांच्या ठिकाणच्या बुद्धिशक्तीला संस्काराचे, माणुसकीचे बाळकडू मिळाले असते तर मानव असा प्राणिपातळीवर उतरला नसता. प्राण्यांमध्येसुद्धा काही नीतिनियम असतात; पण माणसाने त्याच्याही खालची हीन पातळी गाठली; आणि आज या सगळ्या प्रकारच्या विनाशकारी, प्रलयंकारी आपत्तीतून सुटण्याचा मार्ग कोणता ते माणसातील माणुसकीचे उद्धारक संत, महंत, तत्त्वज्ञ, प्रेषित इत्यादी शोधत आहेत. हा मार्ग मिळेल, जर पुरुषी पराक्रमाला स्त्रीच्या विवेकाची, पुरुषी बुद्धीला स्त्रीच्या उपजत सर्जनशीलतेची, पुरुषी मनोबलाला स्त्रीच्या भावनोत्कटतेची साथसंगत मिळाली तर. हे जग 'स्वप्नाहनीही सुंदर' होण्याची वाट चालू शकेल, असा विश्वास वाटत असल्याने स्त्रीच्या हाती जगाच्या उद्धारकाचे प्रमुख पद सोपविण्याचा विचार होऊ लागला.

'स्त्रीच्या हाती' असे म्हणताना स्त्रीप्रवृत्ती व पुरुषप्रवृत्ती यांच्या एकमेकांशी सहकार्याची अपेक्षा आहे. या प्रवृत्ती दोघांच्याही ठिकाणी असतात; पण स्त्री ही केवळ शारीरिक पातळीवर स्त्री असते असे नसून तिच्याजवळ संयम, सर्जनशीलता, दयाळूपणा, उद्यमशीलता, समजून घेण्याची व देण्याची क्षमता हे गुण प्रकर्षाने असतात. बंडखोरी हा तिचा स्वभावधर्म नसून ती अपवादभूत प्रवृत्ती असते. विनाशासाठी ती हातात शस्त्र उचलते; पण सुधारण्याचे सर्व मार्ग खुंटल्यावर. आज स्त्री जग सुधारू शकेल असे वाटू लागले आहे, ते तिच्या ठिकाणच्या या निसर्गदत्त शक्तीमुळे. जीवनाची आकर्षक मांडणी करण्याची कलासक्त वृत्ती तिच्याजवळ आहे. सुंदरतेचे तिला वेड आहे. या सुंदरतेला संरक्षण देण्याची शक्ती पुरुषाजवळ आहे. त्याने त्याचा चांगल्या गोष्टींच्या संरक्षणासाठी उपयोग करावा अशी शिकवण स्त्री देऊ शकते. आज गरज आहे ती अशा संयमाची, विवेकाची, समजून घेण्याची व सहानुभूतीने वागून दुष्ट शक्तीला पराभूत करण्याची. हे करण्याची अंगभूत धमक तिच्याजवळ आहे. काही गुण तिच्याजवळ निसर्गत:च आलेले आहेत, तर काही गुण सामाजिक, धार्मिक परिस्थितीशी तडजोड करीत जगताना तिच्या अंगी बिंबले गेले आहेत. उदाहरणार्थ- पितृसत्ताक पद्धतीने स्त्री लग्नानंतर पतीच्या घरी जाते. लहानपणापासून ज्या माहेरी तिचे आयुष्य व्यतीत झालेले असते, तिथल्या सवयी, तिथले वातावरण, तिथले नातेगोते-संबंध या सगळ्या गोष्टी सोडून ती नव्या वातावरणात आपल्या जीवनाचे कलम रुजविते. शतकानुशतकाच्या सवयीने या गोष्टी तिच्या अंगवळणी पडल्या आहेत. 'सासर हेच आपले खरे घर' हे स्त्रीच्या मनात आता इतके पक्के रुजलेले आहे की, तिचा पती जर माहेरी राहणारा असेल तर घरजावई म्हणून त्याची टवाळी होते. सासरी जाण्याच्या या प्रथेमुळे तिच्याअंगी नव्या वातावरणाशी स्वत:ला जुळवून घेण्याची हातोटी आली; सासरची विविध नाती जपण्याची जाणीव आली. अनेक प्रकारचे बौद्धिक पातळीवरचे गुणविशेष असूनही ती 'घरवाली' हेच आपले कर्तृत्वक्षेत्र' समजू लागली. असे अनेक छोटेमोठे विशेष सामाजिक चालीरीतींनी, धार्मिक बंधनांनी तिने स्वत:मध्ये बाणवून घेतले. स्वत:च्या मानपानापेक्षा घराण्याचा मानपान जपणे हे तिला अधिक महत्त्वाचे असते हे जाणवले आणि या सगळ्या गोष्टी आत्मसात करीत असताना स्वतः पडद्याबाहेर न येता सर्व सूत्रे पडद्यामागून हलविण्याचे कौशल्यही ती अंगी आणू शकली. सामाजिक व धार्मिक बंधनांनी तिला जखडून ठेवले असे आपण म्हणतो. त्यामुळे ती संयम व सहनशीलता हे गुण आत्मसात करू शकली. म्हणून असे म्हणावे लागते की, आजची स्त्री ही केवळ निसर्गतः स्त्रीसुलभ भावनांनी घडलेली आहे असे नाही, तर शतकानुशतकांच्या वातावरणातूनही तिने काही गुणवत्ता संपादन केली आहे. आजपर्यंत जिला आपले घर सांभाळता आले तीच स्त्री जगाचे बिघडलेले गाडे सुरळीत करू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जातो तो या तिला दोन्ही मार्गांनी मिळालेल्या विशेषांमुळे!

भारतातील स्त्री अधिक सोशिक आहे असे म्हटले जाते. भारतात टिकून असलेली कुटुंबव्यवस्था या स्त्रीच्या समंजसपणावर व सोशिकतेवर अवलंबून आहे; म्हणूनच सहनशीलता व उग्रता यांचे योग्य प्रमाण ठेवणे तिला जमले तर जगाची सूत्रे ती समर्थपणे सांभाळू शकेल.

सहनशीलता, संयम, शांत, स्थिर वृत्ती यांसारख्या तिच्या विशेषांचा कदाचित आतापर्यंत गैरफायदा घेतला गेला असेल. स्त्री आपल्या भावनांवर जसा ताबा ठेवू शकते तसा पुरुष ठेवू शकतोच असे नाही. मुख्य म्हणजे राजकारणाच्या आखाड्यात वर्षानुवर्षे वावरणाऱ्या पुरुषांनी कितीतरी गुणविशेष कमावले आहेत; पण त्यांच्या वापरामागे स्वसत्ताभिलाषा आणि त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची प्रवृत्ती असल्याने ती समाजाला घातक आहे. स्त्रीजवळ अशा टोकाची प्रवृत्ती कमी असते; कारण स्वभावतः सर्जनशीलतेची शक्ती तिच्याजवळ असल्याने संहारकतेला सामोरे जाताना ती हजारदा विचार करते.

'स्त्री जन्मा ही तुझी कहाणी। हृदयी अमृत नयनी पाणी।' असे तिचे वर्णन केले जाते. ती हळवी असल्याने तिच्या डोळ्यांत टचकन पाणी येते. दुसऱ्यांच्या दुःखाने ती विव्हळ होते, हे एक प्रकारे मानवतेचे मोठे लक्षण आहे. ती स्वत:वरचा अन्याय दूर करू शकत नाही; म्हणूनही ती अश्रू गाळत असते. आजही अनेक प्रसंगांत असे अश्रू गाळण्याचे तिच्या नशिबी येते. स्वत:वर येत असलेल्या संकटामुळे ती दुसऱ्यांचाही सहानुभूतीने विचार करू लागली आहे. मूलत:च ती मानसिक दृष्टीने पुरुषांपेक्षा कणखर आहे; अगदी चिवट आहे. आकलनक्षमतेच्या संदर्भात पाहता मुलांपेक्षा मुलींना लवकर समज येते. त्या लवकर जाणत्या होतात. प्रश्न येतो तो त्यांच्या शारीरिक ताकदीच्या संदर्भात. अनेकांच्या मते, स्त्री निसर्गतः शारीरिकदृष्ट्या अबला आहे. ती गरोदरपणात, बाळंतपणात थोडीफार दुसऱ्यांवर अवलंबून असते. या कालखंडात कुणाच्या तरी मदतीची तिला गरज असते. पण याचा अर्थ असा नव्हे की, ती अबला, दुबळी, अशक्त व स्वसंरक्षण करण्यामध्ये अपुरी आहे. तिला सौंदर्याची आवड आहे; पण सौंदर्य हा नाजूकपणा म्हणजे दुबळेपणा नव्हे. सामाजिक परिवर्तनामध्ये जी धार्मिक बंधने तिच्यावर लादली गेली त्यांमध्ये सौंदर्यामुळे ती 'रक्षणीय वस्तू' समजली जाऊ लागली व तिचा नाजूकपणा म्हणजे दुबळेपणा ठरला; पण गरोदरपणाचे व बाळंतपणाचे कष्ट सहन करणारी स्त्रीजात शारीरिकदृष्ट्या दुबळी म्हणणे चूक आहे. उलट शारीरिक व मानसिक दृष्टीने ती पुरुषांपेक्षा अधिक कणखर आहे.

लोकसाहित्यामध्ये स्त्रीशक्तीच्या अनेक कथा दिसतात. नवरात्रासारख्या सणांमधून स्त्रीच्या उग्र व मंगल, रक्षक व भक्षक अशा दोन्ही रूपांचे पूजन केलेले दिसते. लोकसाहित्य, पुराणकथा या एक प्रकारे प्राचीन लोकमानसाचे प्रतिबिंबच आहे, हे मत लक्षात घेतल्यास स्त्रीशक्तीचा त्यातून व्यक्त झालेला प्रत्यय तिचे स्वरूप व्यक्त करणारा आहे. इतिहासातही अनेक स्त्रियांनी गरज पडली तेव्हा राजकारणाची जबाबदारी कणखरपणे सांभाळली आहे. तिचे घराबाहेरच्या क्षेत्रातले कर्तृत्व अशा वेळी समाजाच्या नजरेसमोर आलेले आहे.

आजची स्त्री जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये अत्युच्च पदावरच्या कामांमध्येही आपले कौशल्य प्रगट करू शकली आहे. जागतिक पातळीवरच्या महिला परिषदांमध्ये महिलांच्या सबलीकरणाचा विचार करताना तिच्या प्रगतीचा आढावाही नजरेसमोर आलेला आहे. तिच्यामधील गुणांना योग्य वाव व संधी मिळणे आवश्यक आहे. आज तिला शिक्षणाची, नोकरीची, कलासाधनेची, कारखानदारीमधील कामगिरीची इत्यादी क्षेत्रांतील संधी पुरुषांच्या बरोबरीने मिळू लागल्यावर तिच्या कर्तृत्वाचा प्रकाशच जाणवू लागला आहे. संगणक, उपग्रहांच्या मोहिमा यांमध्ये ती अग्रेसर आहे. पाश्चात्त्य स्त्रीच्या तुलनेत भारतीय स्त्रीची प्रगती थोडी मंद आहे एवढेच, पण भारतीय स्त्रीमुळे आजची कुटुंबव्यवस्था टिकून राहिली आहे. भारतीय स्त्रीची निष्ठा, तिचा निरलस उद्योग करण्याचा स्वभाव व सहनशीलता याचे हे फलित आहे. अशी स्त्री जर पुरुषांच्या बरोबरीने जगाच्या नियंत्रणात सहभागी झाली तर जगामध्ये कितीतरी चांगला बदल होईल; आणि आजचा विनाशाच्या वाटेवरचा प्रवास थांबून जगण्याचा आनंद मिळू शकेल. मात्र, हे कार्य एकटी स्त्री करू शकणार नाही. स्त्रीच्या हातात जगाचा कारभार सोपविला गेला तर कदाचित तिच्या वृत्तीही वाईटाकडे वळण्याचा धोका नाकारता येत नाही; कारण सत्ता माणसाला भ्रष्ट करीत असते. स्त्रीच्या हातात सत्ता आली तर तीही एक व्यक्ती असल्याने भ्रष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सत्ता जर स्त्री व पुरुष यांच्यामध्ये राहिली तर दोघांच्या जीवनदायी प्रवृत्तींनी जग संकटमुक्त राहू शकेल.

स्त्रीच्या हाती सत्ता देणे सत्ताधारी सरकारला अजून रुचत नाही. सत्तेमध्ये, शिक्षणामध्ये, सगळ्याच घराबाहेरच्या क्षेत्रांमध्ये काही काळ तरी तिला आरक्षणाची गरज आहे. महिला आरक्षण विधेयक आज अनेक पातळ्यांवर वावटळीत सापडलेल्या पानासारखे गिरक्या घेत भिरभिरत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र स्त्रियांच्या सत्तेची दशकपूर्ती सन २००३ मध्येच साधली गेली आहे. २४ एप्रिल, १९९३ ला राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन त्र्याहत्तरावी व चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती अस्तित्वात आली. त्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. महाराष्ट्र, कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये यापूर्वीच महिलांना आरक्षण ठेवलेले होते, हे ही येथे लक्षात घेणे अगत्याचे आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवले आहे. अर्थात, असे आरक्षण मिळालेले असले तरी प्रारंभापासून आजतागायत आणि आरक्षण देण्यात आले म्हणूनही त्यांच्याकड़े पुरुषवर्गाने हेटाळणीनेच पाहिले आहे.

आज महाराष्ट्रात एक लाख अकरा हजार स्त्रिया ग्रामपंचायत सदस्या आहेत; नऊ हजारांहन अधिक सरपंचपदी आहेत. सुमारे बाराशे महिला पंचायत समिती सदस्या असून एकशेसहा स्त्रिया सभापती आहेत. पाचशे सत्त्याऐंशी महिला जिल्हा परिषद सदस्या असून अनेक स्त्रियांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले. आहे. देशपातळीवर सुमारे सात लाख महिला पंचायत राज्यव्यवस्थेमध्ये कामे करीत आहेत. नगरपालिका, महानगरपालिका या पातळीवरील महिलांची संख्या वेगळीच आहे. 

या कालखंडात स्त्रियांनी स्वत:चे किती प्रश्न लक्षात घेतले, किती प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, याचे उत्तर पुष्कळसे समाधानकारक असले तरी पुरुषी मानसिकतेशी सारखे झगडे देण्यातही तिची ताकद तिला खर्च करावी लागली. दारूबंदी आंदोलनासंदर्भातील अनेक खेड्यांतील तिची कामगिरी कौतुकास्पद व आदर्श अशी आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा यासंदर्भात तिने उचललेली पावलेही तिच्या क्षमतेची व दृष्टिकोनाची जाणीव करून देणारी आहेत. प्रचंड राज्यकारभारव्यवस्थेत या गोष्टींचे स्थान फारसे महत्त्वाचे नाही; पण त्यामुळे महिलेला स्वकर्तृत्वाचे पुरेसे आत्मभान येऊ शकले. प्रामुख्याने सर्वसामान्य थरातून, मध्यम व दलित वर्गातून कामाची समज व उरक असलेल्या महिला जितक्या या क्षेत्रांत दिसतात तेवढ्या श्रीमंत वर्गातील महिलांचा सहभाग आढळत नाही. मात्र, यामधून महिलांचे नेतृत्व महिलेमधूनच विकसित होण्याची असलेली गरज भागलेली दिसत नाही.

सर्व क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे पद स्वीकारून त्या कामात स्वत:चे वेगळेपण दाखविणे आज महिलेस जमायला लागले आहे. अनेक स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये कामे करताना, त्यांना त्यांच्या घरातल्या माणसांचे विशेषतः पतीचे सहकार्य प्रामुख्याने घराचीह्न मुलांची जबाबदारी घेण्यात मिळू लागले आहे. घराबाहेरचे प्रतिष्ठेचे क्षेत्र पत्नीने सांभाळण्यात पतीला कमीपणा वाटण्याचे प्रमाण पुष्कळसे कमी होत चालले आहे. पण त्याबरोबरच घराची, घरातील मुलाबाळांची जबाबदारी कुणीतरी एकाने सांभाळली पाहिजे, ही येऊ लागलेली नवी दृष्टी, कुटुंबव्यवस्था सुदृढ होण्याच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे.

इतर क्षेत्रांपेक्षा राजकारणाचे, राजसत्तेचे क्षेत्र वेगळे आहे. त्या क्षेत्रातील कर्तृत्वाचा व अधिकाराचा प्रभाव जवळजवळ इतर क्षेत्रांवर असतो; म्हणूनच या क्षेत्रात वावरताना प्रारंभी जरी कुणाच्या तरी हातातले बाहुले म्हणून ती स्त्री सुरुवात करीत असली तरी नंतर अनुभवाने व निरीक्षणाने आपली जबाबदारी ओळखून पार पाडायला, निर्णय घ्यायला ती शिकते, हेही आता स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ, ही गोष्ट प्रत्येक स्त्रीला जमतेच असे नाही. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे तिच्यातही कमीजास्त प्रमाणात गुणदोष असणारच. पण स्त्री म्हणून तिच्यामध्ये उणेपणा आढळत नाही.

आजच्या लोकशाहीच्या राजवटीमध्ये कुणीही एक व्यक्ती सर्वस्वी राजशकट चालवीत नसते. अनेकांचे सहकार्य त्यासाठी आवश्यक असते. हे सहकार्य मिळविणे आणि इतरांशी सहकार्य करीत, इतरांची मते घडवीत स्त्री राजकारणाच्या सर्व पातळ्यांवर वावरायला शिकली आहे. म्हणून आपले काही वेगळेपण टिकवायला व त्याचा ठसा उमटवायलाही स्त्रीने सुरुवात केली आहे. विरोध होतच असतो. त्यातूनच आपण टिकून व तावून-सुलाखून निघायचे आहे, ही समज व कणखरपणा इतक्या वर्षांच्या अनुभवाने तिने मिळवला आहे; आणि स्त्री संघटित होणे, स्त्रीजागृती ही गोष्ट पुरुषविरोधी आहे हा समज तिच्या मनातून कमी होऊ लागला आहे. स्त्रीविषयक प्रश्नांची कक्षा केवळ स्त्रीजीवनापुरतीच सीमित नाही, तर तो सर्व समाजाच्या प्रश्नांपैकीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे, याची जाणीव कायम राहिली तर स्त्रीच्या स्वभावतः असलेल्या स्वभावगुणांनी ती राष्ट्राची व विश्वाची बिघडत चाललेली घडी नीट बसवू शकेल.

पुरुषवर्गाने जगाची घडी नीट बसविली नाही; आणि ती घडी बसविण्याच्या कार्यामध्ये स्त्रीसत्ता यशस्वी होऊ शकेल असा एक प्रकारे स्त्रीला प्रोत्साहन देण्याचा कल यामधून दिसून येतो, असे काही समजदार, समतोल विचारवंतांना वाटते. स्त्रीच्या हाती सत्ता देणे म्हणजे निश्चित काय? सत्ता ही अशी कुणी कुणाला देण्याची वस्तू आहे की स्वत:च्या असलेल्या सामर्थ्याच्या जोरावर मिळविण्याची गोष्ट आहे? इतक्या दिवसांमध्ये स्त्रीने सत्ताकेंद्रे काबीज का केली नाहीत? याचा अर्थ निसर्गतः तिचा कल वेगळा आहे; आणि वर्षानुवर्षाच्या सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीमध्ये तिचे स्थान दुय्यम पातळीवरसुद्धा ठेवले गेले नाही. उलट आपण अत्यंत दुर्बल, अगतिक व रक्षणीय वस्तू आहोत असा तिचा समज दृढ केला गेला. आजघडीला असलेली महिलेची ही स्वत:कडे कायम न्यूनगंडाने पाहण्याची भूमिका तिने सोडण्याची गरज आहे. स्त्री म्हणून जन्म घेताना जे गुणविशेष तिला निसर्गतः प्राप्त झाले आहेत आणि मुख्य म्हणजे सर्जनशीलतेच्या तिच्या ठिकाणी असलेल्या शारीरिक क्षमतेमुळे तिची व्यक्तिशः जी निर्मितीक्षम मानसिक प्रवृत्ती घडलेली आहे, त्याची, आजच्या जगाच्या प्रलयंकारी अवस्थेला सावरण्यासाठी आवश्यकता आहे. ही आवश्यकता विचारवंत पुरुषवर्गाला जाणवत आहे. माणसाजवळच्या पुरुषी प्रवृत्तींना स्त्रीप्रवृत्तींची साथ मिळाली तर पूर्णापासून ढळलेले हे जग पुन्हा पूर्णत्वाकडे' जाण्यासाठी गतिशील होईल. 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु।' ही विधायक दृष्टी भारतीयांच्या विचारसरणीचा गाभा आहे. माणसाजवळची (म्हणजे स्त्री व पुरुष अशा दोघांजवळचीही) बौद्धिक, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक, तात्त्विक इत्यादी सर्व प्रकारची शक्ती विधायकतेने उपयोगात आणली पाहिजे, ही समाजधारकांना झालेली जाणीवच, स्त्री जग सुधारू शकेल अशा विश्वासातून व्यक्त होत आहे.

जग घडविण्यामध्ये पुरुषांनीही विधायक दृष्टीने खूप कार्य केले आहे; पण नराचा नारायण होण्यापेक्षा सत्तेचा गैरवापर करण्याकडे मानवी प्रवृत्तीचा. कल पटकन वळत असतो. विज्ञानाने आणलेल्या विधायक सुविधा, जीवनामध्ये आणलेली सर्व प्रकारची सुखसाधने ही विसरण्यासारखी नाहीतच. दूरध्वनी, दूरदर्शन, प्रवाससुविधा, संगणकाने वाचनसंस्कृतीच्या पुढची गाठलेली अवस्था या सगळ्या विधायक गोष्टी माणसानेच प्रामुख्याने पुरुषवर्गानेच घडविलेल्या आहेत. पण त्याच विधायकतेला एका क्षणात उद्ध्वस्त करण्याची किमया हीच विज्ञानदृष्टी जेव्हा दाखवू लागते तेव्हा माणसाला आपण कशासाठी जगतो याचाच विचार पडतो. अशा वेळी विज्ञान, यंत्रज्ञान इत्यादी सर्व प्रकारच्या ज्ञानलालसेमागे 'जग फुलविण्याचे' स्वप्न असावे; दुरित दूर करण्याची ताकद व वृत्ती असावी; एकमेकांशी स्पर्धा नाइलाजाने केली जावी; एकमेकांना सावरून घेऊन मानवतेचे जग उभारण्याचा आटापिटा करावा; ही दृष्टी ठेवण्यासाठी स्त्रीशक्तीची उपासना करावी, ही भूमिका या शीर्षकातून मांडायची आहे.

सारांश

आतापर्यंतच्या पुरुषप्रधान नेतृत्वाने जगाला खूप विधायक सुविधा प्राप्त करून दिल्या आहेत; पण त्यांच्या कर्तृत्वाचा रोख जगाला विनाशकतेकडे नेण्यात झालेला दिसून येतो. सत्तास्पर्धा, स्वसामर्थ्याचे प्रदर्शन यांसाठी सर्व जगालाच त्यांनी विनाशाच्या तोंडाशी आणले आहे. म्हणूनच त्याच्या सामर्थ्यापेक्षा स्त्रीच्या सहनशीलता, सोशिकता, शांतपणा, क्रियाशीलता, सर्जनशीलता या गुणांनी जग मानवतेच्या ध्येयाकडे व प्रगतीकडे वळेल या भूमिकेतून तिच्या नेतृत्वाचा विचार केला जातो. तिच्या नैसर्गिक गुणांनी व सामाजिक परिस्थितीने तिच्यामध्ये आणलेली समजूतदारपणाची, तडजोडीची व स्वत:पेक्षा घराण्याचा उत्कर्ष जपण्याची वृत्ती तिच्या नेतृत्वाने जगाच्या उत्कर्षाला साहाय्यभूत ठरेल. तिने आपली बौद्धिक व मानसिक क्षमताही अनेक वेळा सिद्ध करून राज्यकर्ती, विचारवंत व अन्य महत्त्वाची पदे यशस्वी करून दाखविली आहेत. आजही समाजाने तिच्या कर्तृत्वास थोडा वाव देताच ती अनेक क्षेत्रांत आपले सामर्थ्य सिद्ध करून दाखवीत आहे. तिच्याजवळ निर्णय घेण्याची क्षमता आहे; समाजाला वैचारिक मार्गदर्शन करण्याची कुवत आहे; समाजाला एकत्रित, संघटित करण्याचे कौशल्य आहे. त्याला वाव मिळणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आजपर्यंत तिच्या कर्तृत्वप्रधानतेकडे जे दुर्लक्ष झाले ते दूर व्हावे, हा विचार तिच्या नेतृत्वाच्या माध्यमातून मांडायचा आहे. विशेषतः पुरुषाप्रमाणेच स्त्रीचा विचार एक जबाबदार व्यक्ती म्हणून व्हावा आणि मूलत:च स्त्रीचे म्हणून जे व्यक्तिमत्त्वविशेष आहेत, त्यांचा फायदा विश्वाच्या समृद्धीसाठी व्हावा, करून घेतला जावा ही दृष्टी या लेखामागे आहे.

'अबला यत्र प्रबला । मूर्खः राजा निरक्षरो मंत्री ।

नहि नहि तत्र धनाशा, जीवित आशाऽपि दुर्लभः भवति ।' 

हा समाजाचा, स्त्रीच्या 'सबलतेकडे, सामर्थ्यवान होण्याकडे' बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे, ही या लेखातील विचारामागची विचारवंतांची भूमिका आहे.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: