सेनापती पांडुरंग महादेव बापट मराठी माहिती निबंध Pandurang Mahadev Bapat in Information Marathi : डेक्कन कॉलेजात शिकत असताना त्यांनी एक दिवशी तलवार हात
सेनापती पांडुरंग महादेव बापट मराठी माहिती निबंध
Pandurang Mahadev Bapat in Information Marathi : डेक्कन कॉलेजात शिकत असताना त्यांनी एक दिवशी तलवार हाती घेऊन देशाच्या स्वातंत्र्यार्थ देह पडेपर्यंत धडपडण्याची शपथ घेतली. त्यांनी त्या दिवसाला मंगल दिवस असे म्हटले आहे. कार्लाईलने म्हटले आहे. “ज्याला जीवनाचे ध्येय गवसले तो धन्य होय."
महर्षी सेनापती बापटांचा मला थोडा फार सहवास मिळाला त्यामुळे मी कृतार्थ झालो आहे. विनोबाजी व सेनापती हे माझे दोन हृदयदेव. मी त्यांच्यापासून दूर दूर असलो तरी एकांतात त्यांच्याजवळ मुकेपणाने बोलतो. त्यांची थोडीफार कृपादृष्टी अनधिकारी असूनही मला लाभते ही प्रभूची कृपा. सेनापती म्हणजे मूर्तिमंत त्याग व सेवा. स्वत:ची विशिष्ट मते असली तरी सर्व पक्षांविषयी आदर. कोणी कुठे सेवा करो. त्यांचे कौतुक करतील. कोणी बोलावले तर जातील. आपला जेवढा उपयोग होईल तेवढा होऊ द्यावा हे क्रत. वृद्धपण त्यांना माहीत नाही. ते चिरयुवा आहेत. चिरवर्धमान आहेत. खरोखरच ते श्रीहरीचे आहेत. भले जीवन जगणे हा त्यांचा धर्म. आपल्या चैतन्यगाथा या कवितासंग्रहातील अखेरच्या कवितेत ते म्हणतात, "प्रभूच्या बागेतील मी बुलबूल आहे. भलाई हे माझ वतन आहे."
ते महाराष्ट्राची, भारताची पुण्याई आहेत. त्यांच्या पुण्यपावन मूर्तीला भक्तिमय प्रणाम. त्यांचा जन्म 1880 च्या नोव्हेंबरच्या 12 तारखेस नगर जिल्ह्यात पारनेरला झाला. तो दिवस कार्तिक शुद्ध एकादशीचा म्हणून पांडुरंग नाव.
'सेनापतीच्या ज्या काही गोड आठवणी मजजवळ आहे त्या सांगतो.
विलायतेत चार वर्षे शिकायला होते. त्यांना स्वातंत्र्याचा ध्यास लागला होता. तेथे असलेल्या हद्दपार रशियन देशभक्तांजवळ बॉम्ब करण्याची विद्या शिकले. लष्करी शिक्षणासाठी एडिंबरोच्या रायफल तुकडीतही नाव नोंदविते झाले. तेथील तरणांचे म्होरके स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती म्हणत "सावरकर सुंदर बोलत. स्फूर्ती देत."
सेनापती मातृभूमीला परत आले. कलकत्त्याला हिंदी क्रांतिकारकांच्या सूत्रधारास भेटले. गोया अधिकाऱ्यांचे खून पाडण्याचे धोरण ठरले होते. सेनापती म्हणाले, "हा मार्ग नव्हे. जनतेत जागृत करून योग्य वेळी बंड करू."
सेनापतींवर पकड वॉरंट निघाले. ते चार वर्षे अज्ञातवासात गेले. शेवटी अटक झाली. मुंबईच्या लॉकअपमध्ये आणले. पोलीस अधिकारी व्हिन्सेंटसाहेबावर सेनापतींच्या स्वच्छ व स्पष्ट वागण्याचा अपार परिणाम झाला, "तुम्हाला सोडले तर काय कराल?" या प्रश्नाला सेनापती म्हणाले, "वेळ आली तर सशस्त्र बंडही करावे लागेल."
पुढे सुटले, आपल्या पत्नीला अज्ञातवासात एक करुण पत्र लिहिले, "मी अज्ञातवासात एक प्रकारे नष्टवत, मृतवत. शास्त्राची अशा परिस्थितीत पटुन्हा पती करायला संमती आहे. तू पुनर्विवाह कर." त्यांनी आपल्या मित्रालाही, "माझ्या पत्नीशी विवाह लाव" म्हणन पत्र लिहिले. मनाचा असा मोठेपणा कोठे पहावयास मिळेल?
सेनापतींच्या घरी मी गेलो की, मला लेनिन-मिक्श्चर मिळायचे. रशियन क्रांतीचा पहिला वाढदिवस होता. मराठा पत्राच्या कचेरीत काम करीत होते. म्हणाले, “आपण हा मंगल दिवस येथे साजरा करू." डाळ, मुरमुरे आणले. म्हणाले, “घ्या हे लेनिन मिक्श्चर."
1920-21 च्या मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. सेनापती हे नाव तेव्हापासून त्यांना मिळाले. त्यांना शिक्षा झाली. पुढे सुटले. पुन्हा सत्याग्रह. अखेर त्यांनी 1924 साली शस्त्र सत्याग्रहही केला. कोणाला ठार न करता शुद्धबुद्धीने शस्त्र घेऊनही सत्याग्रह करता येतो हा सिद्धांत त्यांना मांडायचा होता. सात वर्षांची शिक्षा झाली. पुन्हा 31 साली खुनाला उत्तेजन देणारे भाषण केले म्हणून सात वर्षांची शिक्षा.
काँग्रेस मंत्रिमंडळ आले तेव्हा सुटले. 1937 मध्ये. नगरला भेटले तेव्हा म्हणाले, "तुरुंगात तुमची पत्रे वाचली. श्यामची आई वाचली. आवडली पुस्तके." मला अपार आनंद झाला. मी एक धडपडणारा वेडावाकडा जीव. मी त्यांच्या चरणांकडे बघत होतो.
तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्या मनात प्राणयज्ञाची कल्पना खेळत होती. एकदा म्हणाले, "गंगेच्या तीरावर असताना ही कल्पना मला सुचली. अहिंसा प्रभावी व्हायला अहिंसक हव्यात. हजार हजार माणसांनी ध्येयार्थ प्राण फेकावे." स्वत: मुळा-मुठा संगमावर जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. देशातील भेद जावेत. हिंदू-मुसलमान ऐक्य यावे म्हणून; परंतु मित्रांच्या आग्रहाने म्हणा किंवा प्रभूच्या कृपेने म्हणा सेनापतींनी संकल्प दूर ठेवला.
1938 मध्ये धुळ्याची गिरणी तीन दिवसात उघडली नाही, तर तापीत उडी घेईन असे मी घोषित केले. सेनापती धावत आले. म्हणाले, "गुरुजी मरणार असतील तर मलाही मेले पाहिजे." परंतु गिरणीचा प्रश्न सुटला.
दुसऱ्या महायुद्ध काळात प्रचार सभातून सेनापती युनियन जॅक जाळायचे. म्हणायचे, "इंग्रजांच्या स्वातंत्र्याची ही खूण म्हणून मी आदराने तिला आधी ओवाळतो आणि आपल्या पारतंत्र्याची खूण म्हणून आता जाळतो."
अस्पृश्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून मी महाराष्ट्रभर हिंडत होतो. त्यावेळी सेनापती माझ्याबरोबर होते. त्यावेळच्या किती आठवणी.. रस्त्यात अपार धूळ, आम्ही नाकावर रुमाल धरायचो. सेनापती म्हणायचे, "उद्या अमेरिकेत शोध लागेल की धुळीत व्हिटॅमिन आहे. सुंदर धूलिकणाने भरलेल्या बाटल्या येऊ लागतील. मग त्या तुम्ही नाकात कोंबाल, हे शरीर मातीचेच आहे. जाऊद्या थोडी धळ नाकात."
तात्यांना मुले म्हणजे प्राण. अनेक ठिकाणी जेवायला वेळ असला की, जवळच्या मुलांना म्हणायचे, “या गोट्या खेळू या. तुमचा नेम नीट लागला तर बैदूल बक्षीस देईन." तात्यांना दिसते कमी. तरी ते अचूक नेम मारीत.
तात्या अंतर्बाह्य स्वच्छतेचे भोत्ते. सफाईचे काम करायचे. एकदा एका गावी त्यांचे कपडे एका मुलाने त्यांना न कळत धुतले. पण नीट धुतले नाहीत. सेनापतींनी दुसऱ्या गावी गेल्यावर ते स्वत: परत धतले; म्हणाले, "काम करतो म्हटले तर नीट केले पाहिजे." त्यांचे म्हणणे किती खरे!
सेनापती श्रीहरीचे चेले. म्हणायचे, "तो श्रीहरी मला सांगतो. तो मजजवळ बोलतो." मार्क्सवादी मित्रांना म्हणायचे, "तुमच्या सर्व प्रयोगांच्या मागे माझा श्रीहरी मी ठेवीन." परंतु ते आग्रही नाहीत, ते खरोखरच सारे नाटक समजतात. ही माणसे म्हणजे नाना प्रकारची पात्रे. गांधी खून खटल्यात त्यांनी सावरकरांच्या बचाव निधीला मदत केली. आर्थिक अडचणीमुळे सावरकरांना आपला बचाव करात आला नाही, असे होऊ नये म्हणून महात्माजींच्या खुनानंतर सेनापती जिवंत समाधी घेणार होते. देशातील द्वेष-मत्सर शमावेत म्हणून.
तात्या शब्दाला जागणारे. एक दिवस मी मुंबईत राहतो तेथे आले होते. तेथे विश्वनाथ नावाच्या तामीळ बिहाडकरुच्या मुलाने फार आग्रह केला तेव्हा म्हणाले, “परत कधी तरी येईन." आणि खरेच एक दिवस उजाडत आले म्हणाले, “येईन म्हटले होते. आलो. मुलांना दिलेला शब्द पाळावा. माणसे खोटे बोलतात असे त्यांना वाटता कामा नये."
सेनापतींचा स्वभाव फार विनोदी. थोर सेवक हरिभाऊ फाटक नि सेनापती एकदा पुण्याच्या रस्त्यातून चालले होते. रस्त्यातला कोणताही देव दिसला की, हरिभाऊ चप्पल काढ्न नमस्कार करायचे. तसा त्यांनी केला. सेनापती म्हणाले, "हरिभाऊ, देव दिसताच अगदी चप्पल काढता!"
अज्ञातवासातून आल्यावर पारनेरला भंगी काम, साक्षरता इत्यादि सेवा करीत. वडील गणपतीचे पुजारी. लोकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या. तेव्हा वडिलांना म्हणाले, "तुम्ही गणपतीची पूजा करताना त्याची बैठक साफ करता. मी माझ्या गणपतीची साफ करतो. माझा गणपती जगभर पसरला आहे." सेनापतींचा महान् निरंहकारी त्याग, ही अखंड सेवा का फुकट जाईल?
COMMENTS