Essay on Leadership in Marathi Language : In this article " नेतृत्व अर्थात पुढारीपण मराठी निबंध ", " Netrutva Gun Marathi Nib...
Essay on Leadership in Marathi Language: In this article "नेतृत्व अर्थात पुढारीपण मराठी निबंध", "Netrutva Gun Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Leadership", "नेतृत्व अर्थात पुढारीपण मराठी निबंध", "Netrutva Gun Marathi Nibandh" for Students
नेतृत्व आपल्याकडे असावे असे प्रत्येकालाच वाटत असते; पण नेतृत्वामागे कर्तृत्व असावे लागते. म्हणजेच त्यासाठी आपल्या अंगी काही विशिष्ट गुणसंपदा असली पाहिजे, याची जाणीव फारच थोड्या व्यक्तींना असते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि अगदी प्राणिपातळीपासून आजच्या बहुढंगी अद्ययावत समाजरचनेपर्यंत नेतृत्वाशिवाय प्रगतीची वाटचाल होत नसते हे सत्य आहे. हे पुढारीपण फक्त राजकीय क्षेत्रातीलच असते असे नाही तर धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा अनेक क्षेत्रांत असते. राजकीय व धार्मिक क्षेत्रांतले नेतृत्व काळावर प्रभावी ठसा उमटवीत असल्याने ते प्रथमदर्शनी नजरेत भरते. वैदिक धर्मातील शंकराचार्य, बौद्ध धर्मसंस्थापक गौतम बुद्ध, जैन धर्मसंस्थापक महावीर जैन, ख्रिश्चन वा मुस्लिम अशा सर्वच छोट्यामोठ्या धर्माचे संस्थापक हे प्रथम दर्जाचे नेतृत्व होय आणि त्यानंतर या धर्माची व पंथ-संप्रदायांची परंपरा पुढे नेण्यासाठी हे संस्थापक आपला वारस निवडतात. त्याच्या नेतृत्वाखाली पंथाचा विकास व प्रसार होत असतो. हा वारस निवडताना त्या त्या संस्थापकाची काही निश्चित व स्पष्ट कल्पना असलेली जाणवते. उदाहरणार्थमहानुभाव पंथाची स्थापना श्री चक्रधर स्वामींनी केली. त्यांच्या पंथामध्ये माहिमभट्टासारखे अनेक महान बुद्धिवंत शिष्य होते; पण त्यांनी बुद्धीचा निकष लावण्यापेक्षा माणसांना प्रभावित करणारे व माणसे जोडणारे चक्रधरांवर व पंथावर असीम निष्ठा असलेले असे नागदेवाचार्यच पंथप्रमुख म्हणून निवडले. यावरून नेतृत्वासाठी आवश्यक असलेले विशेष कोणते याची कल्पना करता येते. केवळ अफाट बुद्धिमत्ता हा नेतृत्वाचा निकष ठरत नाही. पंथाच्या तत्त्वज्ञानाची ओळख असणे, पंथसंस्थापकाबद्दल निष्ठा असणे आणि पंथाचा प्रसार करण्यासाठी कोणाला कशा त-हेने आपल्या पंथाकडे आकर्षित करता येईल, याची समज असणे हे विशेष, नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजेत. नेत्याचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी असायला पाहिजे. आपल्या पंथाला किंवा देशाला पुढे नेण्याचे ज्याला साधते तो नेता! प्रसंगानुरूप धोरण आखणे व प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर लोकांना व सदस्यांना ते पटवून देणे हे त्याला जमले पाहिजे. लोकसंग्रह करण्याचे कौशल्य तर त्याच्याजवळ असायला पाहिजेच; पण लोकसंग्रहासाठी नाटकीपणा किंवा विरोधकांना दुखविण्याचे तंत्र न वापरता, त्यांना आपल्याकडे वळविणे ज्याला जमते तो खरा नेता. महात्मा गांधीजी, जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या नेत्यांजवळ, ही माणसे राखण्याचे कौशल्य होते. ज्ञानेश्वरांमध्ये अशा प्रकारचे लोकनेत्याचे गुण दिसतात. तेराव्या शतकातील तळागाळातील लोकांना आत्मभान आणून देणाऱ्या ग्रंथांमध्ये समाजातील उच्चवर्णीयांच्या गुणांचेही तोंडभरून कौतुक केले आहे आणि मग नेमकी संधी साधून त्यांच्या दोषांकडे लक्ष वेधले आहे. बौद्ध, जैन इत्यादी सर्व धर्मीयांचे विशेष सांगितले आहेत आणि त्यापेक्षा वारकरी समुदाय कसा सर्वसमावेशक आहे, इकडे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशा नेत्यांजवळ फक्त आपला पंथप्रसार किंवा आपल्या राष्ट्राचे हित एवढेच महत्त्वाचे नसते, तर मानवजातीचे व्यापक कल्याण त्यांच्यासमोर असते. भविष्याचा वेध घेण्याची व त्यानुसार वर्तमानात आखणी करण्याची दृष्टी त्यांच्याजवळ असावी लागते. मूलत: त्यांचे कर्तृत्व स्वार्थनिरपेक्ष असावे लागते. त्यांची निःस्वार्थी वृत्ती पटावी लागते. ते देशाचे नेतृत्व करीत असतील तर त्यांनी देशासाठी काय व किती त्याग केलेला आहे याचे गणित लोकांच्या मनात असते. आजही पूर्वी स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या त्यागी नेत्यांच्या कामगिरीवर अनेक पक्ष कार्यरत आहेत. 'राखावी बहुतांची अंतरे। भाग्य येते तद्नंतरे ।।' हे पक्षाच्या, देशाच्या दृष्टीने पटणारे सत्य आहे. पूर्वीच्या तपाच्या पुण्याईवर नवे देशभक्त घडतात. शिवाजीमहाराजांच्या पुण्याईवर संभाजीमहाराजांच्या वधानंतरही महाराष्ट्र प्राणपणाने लढू शकला व स्वातंत्र्य टिकवू शकला. आजच्या लोकशाही सत्तेमध्ये हे नेतृत्वाचे पूर्वपुण्य कोणत्या पक्षाच्या विचारात आहे, ते ओळखता आले पाहिजे आणि या पुण्याईच्या जोरावर राष्ट्राचे नेतृत्व करता आले पाहिजे.
आज लोकसत्ताक राज्यपद्धती आहे. सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षांप्रमाणे, विरोधी पक्षही स्वतंत्र नेतृत्व घेऊन देशहिताचा विचार करीत असतात. या विरोधी पक्षांची एकमेकांकडे बघण्याची दृष्टी नायक-खलनायकाची असता कामा नये. सत्तेवरच्या व सत्तेबाहेर असलेल्या पक्षनेतृत्वाचा विचार राष्ट्रप्रगतीचाच असेल याकडे सर्व पक्षांच्या नेत्यांचे लक्ष असावे लागते. पुष्कळदा पक्षीय नेतृत्वाची दृष्टी सत्ता काबीज करण्याच्या मार्गाने कार्यरत होत असते. ती दृष्टी विधायक व देशहिताची असायला हवी. स्वार्थपरायणता टाळून, वर्षानुवर्षे स्वत:च्याच घराण्याच्या हातात सत्तेचे सुकाणू कसे राहील, याचे राजकारण करणारे नेतृत्व हे खरे नेतृत्व नव्हे. नेत्याच्या हातातील सत्ता किंवा त्याचे आर्थिक वैभव हे जनतेच्या हिताचे साधन आहे. याच अर्थाने 'राजा म्हणजे प्रजेचा उपभोगशून्य स्वामी' ही 'राजसंन्यास' मधील राम गणेश गडकरींनी राजाची केलेली व्याख्या कोणत्याही क्षेत्रातील नेत्याने लक्षात ठेवायला पाहिजे.
नेता किंवा पुढारी म्हटले की अनुयायी आलेच. जसे कामगार-भांडवलदार, राजा-प्रजा, तसेच नेता-अनुयायी. आजकाल अनुयायी होण्यात समाजाला कमीपणा वाटतो. पण प्रत्येकजणच सेनापती होऊ लागला तर सैनिक असल्याशिवाय लढाई जिंकली जात नसते. नेता आणि अनुयायी यांच्या एकमताने समाजाचा व समाजातील संस्थांचा विकास होत असतो. अनुयायीपण हे कमी प्रतीचे नसते. महर्षी कर्वे यांनी स्त्रीविषयक सुधारणांचे नेतृत्व केले व अनाथ-विधवा महिलांसाठी वेगळी वाट आखली. त्या वाटेवर चालण्याचे धैर्य समाजातील महिला अनुयायींनी दाखविले. महात्मा फुले यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीच्या वाटेवरून चालणारे अनुयायी त्यांना मिळाले म्हणून त्यांची सामाजिक क्रांती यशस्वी ठरली. तेव्हा अनुयायीपण हेही तितकेच महत्त्वाचे असते. तानाजी मालुसरे, येसाजी कंक यांसारखे अनुयायी शिवाजीमहाराजांना मिळाले नसते तर हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले नसते. या अनुयायांमधूनच पुढचा नेता घडत असतो आणि अनुयायांची नेत्याच्या ठिकाणी असलेली एकनिष्ठ वृत्ती ही समाजाच्या विकासाला व प्रगतीला पोषक ठरत असते. 'यथा राजा तथा प्रजा ।' हे जसे म्हटले जाते, तसेच 'यथा प्रजा तथा राजा।' हे सूत्रही महत्त्वाचे असते. राजा किंवा नेता यांना योग्य मार्गावर ठेवून आपली प्रगती साधण्याचे कौशल्य प्रजेजवळ हवे. कर्तृत्व अनुयायांचेही असते. खरेखुरे नेतेपण ही सुळावरची पोळी असते. एखादा नेता व्यक्तिगत मोहाच्या अधीन होऊन आपल्या कर्तव्यापासून भ्रष्ट होत असेल तर त्याची कानउघाडणी करण्याचे कार्य अनुयायांनी करायला पाहिजे. याचा अर्थ, अनुयायीही नेत्याइतकाच जागरूक व संस्कारक्षम असावा लागतो.
अगदी अनादिकाळापासून आजतागायत समाजात असे नेतृत्व व अनुयायी हे दोन घटक विविध संस्थांमध्ये असलेले जाणवतात. साधे एखाद्या कुटुंबाचे उदाहरण घेतले तरी त्याचे नेतृत्व घरातल्या ज्येष्ठ पुरुषाकडे किंवा स्त्रीकडे असते. त्या घराच्या सर्वांगीण विकासाचा विचार त्या कुटुंबप्रमुखाच्या नजरेसमोर असतो. काही घरांमध्ये असे निर्णय ती एकटी व्यक्ती कुटुंबप्रमुख म्हणून घेते. पण सामान्यतः आजकाल हे कौटुंबिक पातळीवरचे निर्णय सर्वांच्या सल्ल्यानुसार, एकमेकांच्या विचार-विनिमयानुसार घेतले जातात. जी गोष्ट कुटुंबासारख्या समूहाची, तीच सार्वजनिक क्षेत्रातील गणेशोत्सवासाठी स्थापन होणाऱ्या गणेशमंडळांची, तीच गोष्ट मोठमोठ्या सामाजिक संस्थांची, तीच गोष्ट देशाचा राजकीय कारभार करणाऱ्या संस्थांची. वरवर पाहता नेता म्हणून एकाला जबाबदार धरलेले असले तरी त्याच्या प्रत्येक निर्णयामागे त्याचे अनुयायी-त्याच्या बरोबर असतात. बहुमताने घेतलेल्या निर्णयानुसार तो नेता कार्यवाही करीत असतो. मग ती जुन्या काळातील राजघराण्याच्या राजसत्ताक पद्धतीच्या नेतृत्वाची कल्पना असो, एकतंत्री सत्तापद्धती असो किंवा आजची लोकशाही सत्तापद्धती असो. कार्यवाहीत येणारे निर्णायक मत केवळ एका व्यक्तीचे नसते. मात्र एकतंत्री व राजसत्ताक पद्धतीमध्ये कधी कधी केवळ एका व्यक्तीच्या मताला किंमत मिळते. राजाचे मत व त्याचा निर्णय दरबारातील प्रधान, मंत्री इत्यादींना मान्य नसला तरी ते राजाला अडवू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती इतिहासाने अनेकदा सिद्ध केलेली आहे. त्यासाठी राजपुत्रातून भावी राजा घडविण्याची गरज, दक्षता नेहमी घेतली गेली पाहिजे. संपूर्ण राज्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपवायची त्याच्या ठिकाणी शौर्य, धैर्य, निर्णयक्षमता, सारासार विवेकबुद्धी, माणसाची पारख, समयसूचकता व सर्वांच्या संरक्षणाची हमी घेण्याचे कौशल्य राजघराण्यात जन्म घेतल्याने येत नसते. त्यासाठी संस्कार व शिक्षण यांची आवश्यकता असते. राजाच्या मोठ्या पुत्राला असे शिक्षण बालपणापासून दिले जाते. मात्र कधी कधी त्याच्याकडे जन्मत:च आवश्यक असलेले राजगुण कमी प्रमाणात असतात. (उदाहरणार्थ- सवाई माधवराव किंवा त्याच्या आधीचे नारायणराव पेशवे), कधी कधी संतत्व किंवा तत्त्वज्ञान, काव्यमय वृत्ती यांचा पगडा प्रथम पुत्रावर असतो व नेतृत्वामध्ये ते उणे असतात. अशांच्या हाती सोपविलेल्या राज्यामध्ये अंदाधुंदी माजते, नैतिकता ढासळते, राज्याचे संरक्षण कमजोर होते. मुख्य म्हणजे राजघराण्यातील इतरांना सत्तेचा मोह अनावर होतो. पेशव्यांच्या घराण्यातील राघोबादादांसारखे पेशवे तर पेशवेपदासाठी ब्रिटिशांची मदत घेऊ पाहत होते. ही 'भाऊबंदकी' समाजाच्या स्थैर्याला घातक ठरते. सुदैवाने अशा काळी नाना फडणवीस, सखाराम बापू इत्यादींच्या एकत्र येण्याने 'बारभाई कारस्थान' मराठी राज्याला नेतृत्वासारखे मार्गदर्शक ठरते. ज्या वेळी एकतंत्री व वांशिक, घराणेशाहीवर आधारलेली एकतंत्री राज्यसत्ता दुबळी होते, त्या वेळी समाजातूनच जागरूकपणे नेतृत्व उभे राहायला हवे. समाजातील शहाणपण असे जागरूक व सावध असावे लागते.
सध्याच्या काळामध्ये अशा प्रकारच्या राजसत्तेपेक्षा लोकशाहीवर आधारलेली सत्ता प्रचलित झालेली आहे. अशा लोकशाहीमध्ये सामान्यत: नेता लोकांमधून निवडला जातो. कालचा अनुयायी आज नेतृत्व करू शकतो. 'गुलामाची मुले नेहमीच गुलाम राहत नसतात', तीही स्वकर्तृत्वावर नेतृत्व करू शकतात; पण तरीही लोकशाहीमध्येसुद्धा अनेक ठिकाणी घराणेशाही वंशपरंपरागतरीत्या सत्ता काबीज करताना दिसते. अशा वंशपरंपरागत सत्तेमागे लोकशाहीचा पाठिंबाही घेतला जातो. मात्र अशासाठी पुढच्या पिढीला नेतृत्वाचे बाळकडू देण्याचे कार्य इमानेइतबारे. किती केले जाते, याबद्दल सामान्य जनतेला विश्वासात घेतलेले नसते. अशा वेळी लष्कराच्या मदतीने लोकमताचा कौल घेतो आहोत असा आभास निर्माण करीत किंवा भल्याबुऱ्या मार्गाने लोकमत आपल्या बाजूला वळवीत नवे नेतृत्व वाजतगाजत सत्ता ग्रहण करताना दिसते. शेवटी काय राज्यपद्धती कोणतीही असो, चांगले, सत्त्वशील व खंबीर नेतृत्व लाभणे हे त्या त्या राष्ट्राच्या नशिबावरच अवलंबून असते, असे म्हणावे लागते.
संस्थेसमोर काय किंवा देशासमोर काय वेळोवेळी संघर्षाचे स्वरूप बदलते असते. तशा बदलानुकूल नेतृत्वही लाभावे लागते. उदाहरणार्थ- चर्चिलसारखे नेतृत्व इंग्लंडच्या युद्धकाळात इंग्लंडला अनुरूप होते; पण ते नेतृत्व नंतरच्या शांततामय काळातील इंग्लंडच्या प्रगतीला पोषक ठरले नसते. प्रारंभीच्या काळात जेव्हा संस्थांचे किंवा राज्याचे स्वरूप मर्यादित असते तेव्हा नेतृत्वाचे स्वरूपही वेगळे असते आणि जेव्हा संस्थांचा व्याप वाढतो, राज्यविस्तार होऊ लागतो तेव्हा नेतृत्वाचा आवाकाही व्यापक होऊ लागतो. तलाव, नदी व समुद्र यांच्यातील पाणीपातळी जशी वेगवेगळी असते तसेच नेतृत्वामध्येही वेगळेपणा आवश्यक असतो. नेतृत्वगुणांचे शिक्षण देण्यासाठी काही एखादा अभ्यासक्रम नसतो; पण त्यासाठी आवश्यक असलेले गुण अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तके शिकत असतानाच दृग्गोचर होऊ लागतात. हे विद्यार्थ्यांच्या ठिकाणी दिसणारे नेतृत्वाचे गुण वेगवेगळ्या क्षेत्रांतील असतात. काहींजवळ कलात्मक क्षेत्रातील नेतृत्वाचे विशेष असतात; वेगवेगळ्या साहित्यसंस्था व त्यांच्या कार्याचे समाजासाठी योगदान कसे साधावे हे काहींना जमते; काहींना सामाजिक सुधारणा, सामाजिक चळवळी यांच्यामध्ये नेतृत्व करणे जमते; तर काहींना छोट्यामोठ्या धार्मिक संस्थांमधून नैतिक जागरण करण्याचे कार्य आवडते. त्यांच्या गुणांचा विकास शालेय व महाविद्यालयीन पातळीवर करून घेणे हे आवश्यक असते. छोट्या-छोट्या गटांचे नेतृत्व करतानाच नेतृत्वाचे क्षेत्र वाढत जाते; क्षितिजे विस्तारत जातात, तसेच नेतृत्वाचे आपल्याजवळचे गुणविशेषही बदलते व अधिक सखोल व्हायला लागतात. एखाद्याच्या ठिकाणी जन्मजात असलेल्या नेतृत्वाच्या विशेषत्वांना शिक्षणातून असे खतपाणी घातल्याशिवाय खरे नेतृत्व तयार होत नसते. मात्र सध्या त्यालाही बाजारू स्वरूप आलेले आहे. 'समुद्री चहुकडे पाणीपिण्याला थेंबही नाही ।' अशी परिस्थिती नेतृत्वाच्या संदर्भात दिसत आहे. नेते खूप आहेत, पुढारी असंख्य आहेत; पण त्यांच्या ठिकाणी जाहिरातीची स्टंटबाजी आहे आणि निष्ठेचा अभाव आहे. लोकांना हे कळत नाही असे नाही. पण 'उडदामाजी काळेगोरे ।' कसे निवडावे? राजकारणात तर सत्तेच्या हव्यासासाठी पक्षबदल सर्रास होत आहे. सत्तेसाठी जुन्या पक्षनिष्ठा सोडून नवे पक्ष उभे करण्यात अनेक अनुयायी नेतृत्व मिळवीत आहेत.
नेतृत्वामध्ये असलेली अफाट सत्ताशक्ती या सगळ्यांना आकर्षित करीत असते. केवळ सत्तेच्या लोभापोटी आज नेतृत्व वाटेल ते करायला सिद्ध होत आहे. नेतृत्व हा धंदा होऊन बसला आहे. सरकारी व खासगी क्षेत्रांतील वशिलेबाजी हा नेतृत्वाला लागलेला कलंक आहे. ज्यांचे नेतृत्व आपण करीत आहोत, त्यांच्याबद्दलची आत्मीयता, निष्ठा, जिव्हाळा, तळमळ ही नेतृत्वाची अट असते. ही सामाजिक बांधिलकी म्हणजे थट्टेचा व गरजेपुरता मिरवण्याचा विशेष होत आहे. अशा वेळी अनुयायांनी सावधपणे नेतृत्वाला योग्य मार्गावर आणणे हाच उपाय असतो. निदान राजकारणाच्या क्षेत्रात मतामतांचा गलबला असताना व मतदारांसमोर अनेक आमिषांचे मायाजाल उभे केले जात असताना आजही मतदार नेतृत्वाला धडा शिकवू शकतो, हे सिद्ध होत आहे.
सारांश
नेतृत्वामागे कर्तृत्व असावे लागते. सर्वच क्षेत्रांत नेतृत्वाची गरज असते. नेतृत्वाची निवड करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. धार्मिक क्षेत्रात संस्थापक किंवा अधिकारी व्यक्ती ही निवड करते. नेत्याचे गुणविशेष बहुआयामी व्यक्तिमत्त्व, वक्तृत्वकला, माणसे जोडण्याची वृत्ती, नि:स्वार्थीपणा हे होत. सत्ता हे साधन असावे. अनुयायांचे महत्त्व कमी लेखू नये. अनुयायी नेत्याला योग्य मार्गावर ठेवू शकतात. एकतंत्री राज्यव्यवस्थेत वंशपरंपरागत नेतेपद असते. अशा वेळी नेता बालपणापासून घडविता येतो. पण मूलतः कर्तृत्वाचा अभाव असेल तर तो अपयशी ठरतो. सध्याच्या लोकसत्ताक राज्यपद्धतीमध्ये नेता घडविण्याचे शिक्षण आपले आपण घ्यायचे असते; पण नेता ही एक व्यक्ती असली तरी नेतृत्व मात्र अनुयायांच्या विचारविनिमयाने ठरत असते. हे अनुयायी म्हणजे समाज जागृत असेल तर तो आपले नेतृत्व स्वत:च निवडू शकतो.
COMMENTS