Essay on What if British never ruled India in Marathi : In this article " ब्रिटिश सत्ता भारतात आली नसती तर मराठी निबंध " for stude...
Essay on What if British never ruled India in Marathi: In this article "ब्रिटिश सत्ता भारतात आली नसती तर मराठी निबंध" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "What if British never ruled India", "ब्रिटिश सत्ता भारतात आली नसती तर मराठी निबंध" for Students
अशा 'जर-तर'च्या भाषेत विचार करून कल्पनाशक्तीला ताण देण्यात फायदा काय? इतिहास तर त्यामुळे बदलत नसतो. घडलेल्या घटना या 'काळ्या चिरेवरच्या रेघा' असतात. त्यांचा कालखंड, व्यक्ती व त्यांचा वर्तमानावर कोरला गेलेला परिणाम यात बदल होत नसतो. तरीही अशा 'जर-तर'च्या पद्धतीने केलेल्या विचारांचा फायदा असतो. भविष्यकालीन वाटचालीमध्ये त्या चिंतनाने सावधपणा येऊ शकतो. गतकालीन घटनांचा अन्वयार्थ लावून आपण इतिहासाचे आपले चिंतन तर्कसंगत करीत असतो. व्यापारी म्हणून आलेले आणि सत्ताधीश बनलेले ब्रिटिश सर्वच पातळीवर आपले शत्रू आहेत की, त्यांच्याकडून आपल्याला काही प्रगतीची द्वारेही किलकिली झालेली आहेत, याबद्दल मार्गदर्शन होऊ शकते. हिंदुस्थान शोधायला निघालेल्या कोलंबसाचेच उदाहरण घेऊन हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल. कोलंबसाला हिंदुस्थान शोधायचा होता; पण त्याला हिंदुस्थानचा किनारा न मिळता अमेरिका सापडली. जर तेव्हाच त्याला हिंदुस्थानचा शोध लागला असता तर? महाराष्ट्राचा नकाशाच बदलून गेला असता. हिंदुस्थानातला युरोपियन राष्ट्रांचा वावर तेव्हापासूनच सुरू असता. ज्या वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ इथे विठ्ठलाच्या नामस्मरणाने ज्ञानदेव-नामदेवांनी रोवली त्याच्या आधीच पाश्चात्त्य संस्कृतीचे मूळ इथे रोवले गेले असते. शिवाजीमहाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न महाराष्ट्राने पाहिलेच नसते. कोलंबसाच्या संदर्भातील या 'जर-तर'च्या विचारांनी वारकरी संप्रदायाच्या उभारणीतून महाराष्ट्रीय समाज कसा एकत्र आला व त्याच्या सांस्कृतिक पातळीवरच्या उद्बोधनातून 'हिंदवी स्वराज्या'च्या उभारणीला शिवाजीमहाजांना कसे लोकबळ मिळाले याचे महत्त्व कळू शकते. पण एवढेच नाही तर, आज भारतातील एक प्रादेशिक राज्य म्हणून मराठी माणसाची जी तेव्हापासूनची जडणघडण आहे, त्याचे महत्त्वही लक्षात येते. 'जर-तर'च्या कल्पनेचे महत्त्व मढेकरांच्या शब्दांत सांगायचे तर 'आम्हास आम्ही पुनः पाहतो। काढुनि चष्मा डोळ्यांवरचा ।' इतिहासाचा, राजकारणाचा, घटनांचा कालानुक्रमाने केलेल्या विचारांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची दृष्टी आपल्याला येते; आणि ऐतिहासिक सत्याबद्दलचे आपले विचार पक्के होऊ लागतात.
पंधराव्या शतकात ब्रिटिश भारतात आले; पण ते वरवर व्यापाराच्या उद्देशाने; आणि एकोणिसाव्या शतकात त्यांनी भारतावर राज्य करण्याइतके आपले राजकीय बळ वाढविले. ब्रिटिशांच्या समोर असलेला भारत हिंदू, मुस्लिम व अन्यत्र छोट्या राज्यांनी व्यापलेला होता. त्याला जवळजवळ एका छत्राखाली आणण्यात ब्रिटिश यशस्वी झाले. १८०८ ते १९४७ पर्यंत जवळजवळ दीडशे वर्षे या खंडप्राय देशावर त्यांनी अंमल गाजविला. ब्रिटिशांशी संघर्ष करून आपण स्वातंत्र्य मिळविले; पण त्या वेळी ब्रिटिश सत्तेची स्थितीच जगभर राज्य टिकविण्यास समर्थ राहिली नव्हती. त्यांच्या ताब्यात असलेले अनेक प्रदेश त्यांना सोडावे लागत होते. भारतावर राज्य करणे हेही त्यांना. असेच डोईजड होत होते; म्हणून त्यांनी भारत स्वतंत्र करण्याचा विचार पक्का केला आणि जाता जाता 'पाकिस्तान'च्या रूपाने एकसंध भारताची कायमस्वरूपी फाळणी करून हिंद-मुस्लिम वैराची तेढ जागती ठेवली. आपण स्वातंत्र्य मिळविले की, त्यांनी स्वातंत्र्य दिले याचे उत्तर फाळणीचा पर्याय भारताला मान्य करावा लागला, यावरून स्पष्ट होते.
कोणतीही राजसत्ता हेच करीत असते. औरंगजेबानेही मराठी सत्ता पराभूत करता येत नाही, हे पाहिल्यावर कैदेत असलेल्या शाहमहाराजांना स्वतंत्र केले. आपोआप राज्यरक्षण करणाऱ्या ताराबाईमध्ये व शाहंमध्ये राज्यपदावरून वितुष्ट आले. परिणामी, सातारची गादी शाहूमहाराजांकडे व कोल्हापूरची गादी ताराबाईंकडे, अशी मराठी राज्याची विभागणी झाली. ब्रिटिशांनीही जाता जाता भारताची फाळणी करून भारतासमोर असाच कायम पेचप्रश्न उभा ठेवला.
ब्रिटिशांची भारत काबीज करण्याची पद्धती इतर शत्रूपेक्षा वेगळी होती. कोलकाता, सुरत, मुंबई या परिसरात त्यांनी आपली व्यापारी ठाणी वसविली. त्यांच्या संरक्षणाच्या निमित्ताने आपला फौजफाटा, तटबंदी इत्यादी सैनिकी सोयी उपलब्ध करून घेतल्या. अशा प्रकारची व्यापारासाठीची तटबंदी उभारायला त्यांना शिवाजीमहाराजांनी विरोध केला. 'इंग्रज हे वरकड सावकारांसारखे नाहीत' हे शिवाजीमहाराजांनी लक्षात घेऊन 'त्यांच्या संरक्षणाची हमी आपल्या राज्याकडे राहील' असे सांगितले. व्यापारी संबंधाच्या जोरावर त्यांनी राजसत्तांमध्ये हस्तक्षेप करायला प्रारंभ केला. राघोबादादांना त्यांनी थोरल्या माधवराव पेशव्यांच्या विरोधात केलेली मदत इतिहासास ज्ञात आहेच. याचा अर्थ ते मुसलमानांसारखे किंवा शक-हणादी टोळ्यांसारखे युद्ध करून राज्य स्थापन करण्याच्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने गेले व भारताचे राज्य त्यांनी एक-एक प्रदेश स्वतंत्रपणे जिंकीत हस्तगत गेले. 'शिंदे विरुद्ध होळकर' असे मराठी सरदारांमध्ये एकेकाला मदत करीत त्यांनी पेशव्यांचा पराभव केला. भारतातील सर्व शक्ती एकत्र न येऊ शकल्याने ब्रिटिशांना भारत जिंकणे सोपे ठरले. आजही जागतिक पातळीवरून व्यापाराच्या निमित्ताने भारतात ज्या परदेशी कंपन्या अनेक मार्गांनी येऊ पाहत आहेत, त्यांच्यापासून भारताला सुरक्षित राहून आपले व्यापारउदीम कसे विकसित होतील, याबद्दल सावधानतेचा इशारा हा इतिहास देत आहे. .
ब्रिटिशांनी इथे आणलेला वसाहतवाद केवळ राजकीय, धार्मिक व आर्थिक पातळीपुरता मर्यादित नव्हता. भारतीय जीवनाच्या सर्व अंगांना त्यांनी आपल्या वळणावर नेले. भारतीय इतिहास, संस्कृती, धर्म, पंथ, नैतिकता, पोशाख, चालीरीती यांबद्दलची न्यूनगंडाची भावना त्यांनी अत्यंत हुशारीने, कल्पकतेने व योजनापूर्वक भारतीयांच्या मनावर ठसविली. आपण जित आहोत, गुलाम आहोत, ही भावना येऊ न देता त्यांना विविध प्रकारच्या उद्योगांत गुंतवून ठेवले. स्वातंत्र्यकाळापेक्षा पारतंत्र्यामधील जीवन सुखी वाटेल; ऐषारामी वाटेल; अशा सुविधाही काही ठिकाणी पुरविल्या. शिक्षण, दळणवळण, लेखन, प्रसारमाध्यमे व ऐहिकतेवर भर असलेल्या या जीवनसरणीमध्ये आपला देश गुलामगिरीत आहे, ही जाणीव सुसंस्कृत असलेल्या फार थोड्या समाजसुधारकांना अस्वस्थ करीत होती. आसेतुहिमाचल पसरलेल्या या सत्तेविरुद्ध एखादा तात्या टोपे, एखादी झांशीची राणी यांची बंडखोरी अत्यंत अपुरी होती. हातातील शस्त्र काढून घेतलेल्या या समाजाला त्यांनी कला, साहित्य, धार्मिक, सामाजिक सुधारणा इत्यादींमध्ये गुंतवून टाकून निष्क्रिय केले. पण पुष्कळदा संकटे जितकी प्रभावी तितकेच त्यांच्यावरचे नवे प्रभावी उपायही शोधले जातात. क्रांतिकारी चळवळी, राजकीय पातळीवरची जागृती इत्यादी जुने मार्ग अनुसरता-अनुसरता सत्याग्रह, अहिंसा, भाषणे-लेखन यांद्वारे जागृती इत्यादी नवे मार्ग देशभक्तांनी शोधले आणि अथक व अखंड प्रयत्नांनी ब्रिटिशांना भारतात राज्य करणे अवघड करून टाकले. स्वातंत्र्यासाठी काही पिढ्यांची जीवने खर्ची पडली. ब्रिटिश सत्ता इथे आली नसती तर ते बलिदान वाचले असते. पण त्याबरोबरच ब्रिटिशांच्या विरोधात भारतभर ज्या चळवळी उभ्या राहिल्या, त्या चळवळी उभ्या राहिल्या नसत्या. आपण एकजुटीने शत्रूशी लढले पाहिजे, ही जाणीव रुजली गेली नसती. भारतात राहन किंवा नेताजी सुभाषचंद्रासारखे भारताबाहेर सेना उभी करून, ही एकतेची जाणीव व शक्ती एकवटली गेली. ती एकतेची जाणीव ब्रिटिशांच्या भारतातील सत्ताधीश म्हणून येण्यामुळेच झाली.
ब्रिटिश सत्ता इथे येण्याच्या अगोदर भारतभूमी ही सुवर्णभूमी होती. 'सुजलां, सुफलां' होती. या वैभवाच्या लालचीने ब्रिटिश सत्ता भारतात आली व भारताला जितके लुटता येईल तितके लुटून दरिद्रीनारायण करून निघून गेली. भारतातील कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर इंग्लंडमधील उद्योगधंदे, व्यापार व कारखाने संपन्न झाले. ब्रिटिशांनी आखलेली तेव्हाची व्यापारी धोरणे भारताला अधिकाधिक कंगाल करणारी होती. स्वातंत्र्य मिळताक्षणीच या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग भारताने शोधले. आजच्या आपल्या आर्थिक समस्या, दारिद्रय, बेकारी इत्यादींचे भेडसावणारे प्रश्न हे पारतंत्र्याच्या काळातील गैरव्यवहाराचे व जाणूनबुजून आखलेल्या धोरणांचे परिणाम आहेत. भारताला कंगाल करण्याचे त्यांचे पद्धतशीर प्रयत्न किती दूरगामी परिणाम करणारे होते हे यावरून लक्षात येईल.
सामाजिक दृष्टीने विचार करता, भारतीयांच्या मनावर आपण ब्रिटिशांपेक्षा सर्वच बाबतीत कमी व असंस्कृत आहोत, हा समज ब्रिटिशांनी अनेक मार्गानी रुजविला. शिक्षणपद्धती, न्यायदानपद्धती, भाषा, चालीरीती या सगळ्यांमध्ये त्यांनी केलेल्या सुधारणांच्या व बदलांच्या द्वारा हा समज भारतीयांच्या मनावर पुन:पुन्हा बिंबविला गेल्याने एक प्रकारच्या न्यूनगंडाच्या मानसिक भावनेने आपला कब्जा घेतला आहे. बेकारी व आर्थिक दुखणे (वसाहतवादातील) यांमुळे आपोआपच स्पर्धात्मकता आली; त्यामुळे अनैतिक पातळीवर धर्म व जातपातीचे राजकारण शिरले. सामाजिक दृष्टीने धार्मिक पातळीवर सुधारणा करू पाहणाऱ्या संस्थांकडून एखाददुसऱ्या जातीमध्ये व धर्मामध्ये पुरोगामित्व आणण्याचे प्रयत्न झाले. ब्रिटिशविरोधी लढ्यातही अशा जातीयवादी लढ्याचे (वसाहतवादी) शस्त्र देशभक्तांनी वापरले. ब्रिटिशांनी सुद्धा 'तोडा आणि राज्य करा' या तत्त्वाचा वापर करून जातिजातींमध्ये व धर्माधर्मामध्ये कडवटपणा व वैरभाव निर्माण करण्यामध्ये यश मिळविले. पाकिस्तान व बांगलादेश ही याच ब्रिटिश धोरणाला आलेली विषारी फळे आहेत. इंग्रज नीतीने जोपासलेला व दिवसेंदिवस बाळसेदार होणारा जातीयवाद आजही हिंदु-मुस्लिम, दलित-दलितेतर अशा भारतीय समाजातील भेदाभेदांतून समाज एकसंध होण्यामध्ये अडथळा निर्माण करीत आहे. त्यावरून ही विषवल्ली किती जहरी होती हे कळून येईल.
भारत हा विविध जातिधर्मानी नटलेला, विविध संस्कृती असूनही एकसूत्री राहिलेला देश आहे. इथल्या विविध संस्कृती, चालीरीती, विविध वंश, धर्म या सगळ्यांतून भारतीय धर्म आकारास आलेला आहे. जे जे नवे आक्रमक आले, त्यांना आपल्यामध्ये सामावून घेण्याची विलक्षण समन्वयवादी दृष्टी या देशाच्या धर्मकल्पनेत सतत जागरूक असते. अपवाद फक्त मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीयांचा म्हणता येईल. पण या विविधतेला विषमतेचे रूप देण्याचे कार्य ब्रिटिश धोरणांनी साधले. एकमेकांतील सहकार्यावर भर देऊन उभी असलेली इथली जातीयतेची जाणीव नाहीशी करून ब्रिटिश शासनाने त्यामध्ये उच्चनीचतेची कडू बीजे पेरली. मोठमोठ्या राजवटी नांदलेल्या या देशामध्ये जनतेच्या असलेल्या पाण्याच्या, अन्नधान्याच्या, दळणवळणाच्या, सुरक्षिततेच्या सोयीसुविधा इंग्रजांनी प्रथम उद्ध्वस्त करून टाकल्या. पूर्वी राजधानीसारख्या शहरांमध्ये गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी खापरीचे नळ हे जमिनीखालून नेलेले होते. इंग्रजांनी अशा सोयी प्रथम तोडून-मोडून टाकल्या आणि नवीन सोयी निर्माण करून आपण भारतीयांची कशी काळजी घेतो, याचे चित्र जनतेसमोर उभे केले. उपनिषदादी ग्रंथांमधील भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय जीवनदृष्टी येथील संतमहंतांचे सामाजिक कार्य, येथील संस्कृत-प्राकृतादी भाषा, चंद्रगुप्त, शिवाजीमहाराज यांच्यासारख्यांचे राजकीय कर्तृत्व, चाणक्यासारखे राजनीतिज्ज्ञ, भास्कराचार्यांसारखे ज्योतिर्विद, नालंदा, तक्षशिलेसारख्या ठिकाणी चालणारी तेव्हाची विश्वविद्यालये या सगळ्या कर्तृत्वशाली परंपरांचे भारतीयांच्या मनामध्ये असलेले चित्र पुसून टाकण्याचा उद्योग ब्रिटिशांनी प्रथम हाती घेतला. या सगळ्या उज्ज्वल गोष्टींचे विकृतीकरण करण्यामध्ये त्यांनी आपल्याच भारतीय बुद्धिमान लोकांचे साहाय्य घेतले. भारतीयांपैकी काही महत्त्वाच्या माणसांना रावबहाद्दर, रावसाहेब अशा पदव्या देऊन, अन्य सवलती देऊन त्यांना आपल्याकडे ओढून घेतले; इंग्रजी शिक्षणाने त्यांना प्रभावित केले; आणि त्यांच्याद्वारे, त्यांच्याकडून भारतीयांच्या चालीरीती, देवदेवता, पूजापद्धती, संस्कृती, पोशाख यांच्यातील असलेल्या-नसलेल्या त्रुटी लोकांच्या समोर आणल्या. 'फोडा आणि राज्य करा' हेच त्यांचे धोरण भारतीयांच्या मनात न्यूनगंड पेरण्यासाठीही त्यांनी उपयोगात आणले. रानटी लोकांवर राज्य करण्यापेक्षा लोकांना शिक्षणात गुंतविले, त्यांच्या मनात त्यांच्या संस्कृतीबद्दल हीनतेची जाणीव निर्माण करून दिली, की त्यांच्यावरचा आपल्या राज्याचा सूर्य मावळण्याला खूप काळ जावा लागेल; हे ब्रिटिशांचे धोरण भारतीयांच्या लक्षात यायला फार काळ जावा लागला.
या शासनाच्या जोडीलाच भारतभर पसरलेल्या त्यांच्या धर्माच्या मिशनऱ्यांचे कार्यही ब्रिटिश सत्ता स्थिर करण्याला मदत करीत होते. ब्रिटिशांच्या बरोबरच हे मिशनरी भारतात आले आणि त्यांनी अत्यंत निष्ठेने, भारताच्या सगळ्या भागांतून धर्मप्रसार करण्याचे कार्य पद्धतशीरपणे केले. भारतीय समाजातील जातिव्यवस्था, गरिबी, अशिक्षितपणा, कर्मठपणा या सगळ्यांचा फायदा घेऊन त्यांनी समाजातील सर्व थरांत विशेषतः गोरगरीब जनतेत ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. विहिरींमध्ये, तळ्यांमध्ये पाव टाकून बाटविल्याची भावना निर्माण केल्याची उदाहरणे तर हजारोंनी आहेत. गरिबीत खितपत पडलेल्या अज्ञानी भारतीय लोकांसमोर स्वातंत्र्याचे व शिक्षणाचे, सधनतेचे व नोकरीधंद्याचे आमिष दाखविले. ना. वा. टिळकांसारख्या कविहृदयाच्या विचारवंताला वैचारिक पातळीवर ख्रिश्चन धर्माचे महत्त्व पटवून दिले. ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे चर्च उभारून रविवारच्या प्रार्थना सुरू केल्या. आजही या मार्गाने, वैद्यकीय वा अन्य मदत मिळवून देण्याच्या नावाखाली भारतीयांची संख्या कमी करून ख्रिश्चनांचे बळ वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. स्वातंत्र्य मिळून आज अर्धशतक उलटले तरी त्यांच्या या प्रयत्नावर आपल्याला विरोध करणारा मार्ग मिळत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अजूनही या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची भारतीयांची मनोधारणा नाही. याला कारण त्यांच्यावर इंग्रजांचा व त्यांच्या संस्कृतीचा असलेला जबरदस्त पगडा हेच आहे. त्यांचा धर्म, त्यांच्या चालीरीती, त्यांचे पोशाख, त्यांची भाषा आपल्यावरील प्रभाव आजही कायम आहे.
ब्रिटिश शासन असे मिशनऱ्यांच्यामार्फत आपली सत्ता व आपला धर्म इथे रोवून ठेवू शकले. इतके की, इंग्रज गेले तरी आमचे इंग्रजाळलेपण संपले नाही पण यामध्ये त्यांनी वेगळे काही केले असे नाही. ते सत्ताधीश म्हणून आले होते. आपण जिंकलेले होतो. जेते जितांशी यापेक्षा वेगळे वागत नसतात. पण तरीही इथल्या दीडशे वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय समाजाला त्यांनी काही चांगल्या वळणावरही नेले, असे म्हणावे लागते. ते जर भारतात आले नसते तर भारतातील मध्ययुगीन कालखंडाचा अस्त व्हायला आणखी काही काळ जावा लागला असता. या ज्या काही चांगल्या गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत घडल्या त्या करताना त्यांचा हेतू भारताच्या चांगल्याचा नव्हता, तर स्वत:ची सत्ता इथे कशी अधिकाधिक स्थिरावेल याचा होता. इंग्रज राजवटीमध्येच भारतात आसेतुहिमाचल (संस्थानांचा अपवाद वगळता) एकच राजकीय सत्ता अंमल गाजवीत होती, असे म्हटले तर त्यात वावगे नाही. त्याच्या पूर्वी भारतात अनेक छोटीमोठी राज्ये विखुरलेली होती. एकछत्री अंमल भारतात प्रथमतः इंग्रज सत्तेने आणला. भारतीयांमध्ये एकराष्ट्रीयत्वाची जाणीव यामुळे निर्माण झाली. म्हणूनच ब्रिटिशविरोधी लढ्यामध्ये सर्व भारत एकदिलाने सामील झाला. भौगोलिकदृष्ट्या पाहता ब्रिटिशांची सत्ता मौर्य किंवा मोगल सत्तेपेक्षा अधिक विस्तृत प्रदेशात, भारतभर पसरलेली होती.
हे जरी खरे असले तरी त्याच्या पूर्वीच्या काळातही एकसंधतेची जाणीव धार्मिक व सांस्कृतिक पातळीवर भारताच्या जनतेच्या मनात रुजलेली होती. विशेषतः मराठी संतसाहित्याची साक्ष काढली तर त्यांच्या हिंदीमध्ये लेखन करण्यामागे आंतरभारतीचा विचार असलेला स्पष्टपणे दिसतो. बाराव्या-तेराव्या शतकांतील भक्तिसंप्रदायाच्या लाटेतील साहित्यामागे ही जाणीव प्रकट झालेली दिसते. पण तरीही ब्रिटिश सत्तेने जसे सर्व भारताला एका सत्तेखाली आणण्यात यश मिळविले तसे राजकीयदृष्ट्या कोणत्याही सत्तेला जमलेले नाही, हे मान्य करावे लागते.
ब्रिटिश सत्तेच्या काळातच यंत्रयुगाचा उदय झाला. यंत्रयुगाचा उदय केवळ ब्रिटिशांनीच घडवून आणला असे जरी नसले तरी भारतात यंत्रयुग अवतरले ते ब्रिटिश सत्तेमुळेच, हेही तितकेच खरे आहे! भारताला आधुनिकतेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याचे, मध्ययुगीन संस्कृतीतून बाहेर काढण्याचे श्रेय ब्रिटिश सत्तेला द्यावे लागते. दळणदळण, व्यापारउदीम यांना त्यांनी आधुनिकतेच्या मार्गावर नेले. पाश्चात्त्य विचारसरणी, पाश्चात्त्य शिक्षणपद्धती त्यांनी भारतात सुरू केली. प्रादेशिक भाषांचा विकास केला. प्रादेशिक भाषांचा शिक्षणामध्ये समावेश करून प्रदेशानुसार इंग्रजी माध्यमातून आधुनिक विषयांच्या शिक्षणावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. धर्म, अध्यात्म इत्यादी विषयांपेक्षा गणित, इतिहास, भूगोल, शास्त्र, साहित्य इत्यादी विषयांना महत्त्व दिले. वृत्तपत्रे, पुस्तके, साप्ताहिके, नियतकालिके यांचा मुद्रणकलेच्या आधारावर विस्तार करता आला. लेखनाच्या व भाषणांच्या आधारे विचारमंथन होऊ लागून सामाजिक सुधारणा, जुन्या रूढींचा निषेध यांवर भर आला. पुरोगामी विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या संस्थांमुळे समाजात जुने-नवे यांचा संघर्ष सुरू झाला. एका नव्या युगाची ती सुरुवात तर होतीच, पण या संघर्षाच्या रणधुमाळीचा हेतू वेगळा होता. परकीय अंमल उलथून टाकण्याचे विचार लोकांच्या मनात रुजू नये, हा त्यामागे प्रमुख हेतू होता. इंग्रज सत्तेने आणलेल्या सुधारणांनी हा समाज दिपून जावा, स्वातंत्र्याच्या काळातील सुखाचा त्याला विसर पडावा व नोकरशाहीमध्येच त्याच्या बुद्धिशक्तीचा व्यय व्हावा हा ब्रिटिशांचा उद्देश सफल झाला.
'भारतीय असंतोषाचे जनक' असे ज्यांना म्हटले जाते त्या लोकमान्य टिळकांसारख्या जहाल पुढाऱ्यांना या गोष्टीची जाणीव लोकांना करून देण्याची गरज वाटली. भारतीय संस्कृतीचे अस्सलपण समाजासमोर आणण्यासाठी 'गीतारहस्य' सिद्ध झाले; कारण ब्रिटिशांनी सुरू केलेल्या शिक्षणपद्धतीमध्ये तत्त्वज्ञानादी विचारसरणीमागे, भाषिक विचार मांडण्यामागे आणि भारतातील थोरांच्या व इतिहासाच्या लेखनामागे, एकच एक भूमिका होती; आणि ती म्हणजे भारतीय मनाचे खच्चीकरण करावे, ही होय. भारतीय संस्कृती व इंग्रजी संस्कृती तोडीस तोड होत्या; पण भारत जित असल्याने त्यांनी भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचे विकृत चित्रण लोकांसमोर ठेवायच्या हेतूने त्यांची सर्व यंत्रणा राबविली गेली. पण तरीही त्यामुळे पाश्चात्त्य संस्कृतीचा भारतीयांना जवळून परिचय झाला व तौलनिक दृष्टीने त्यांना विचार करण्याची क्षमता येऊ शकली. (स्वतः रविवारी चर्चमध्ये जायला कधीही न चुकणारा ख्रिश्चन भारतीयांना मात्र जुन्या रूढींना चिकटून राहण्याबद्दल दोष देत होता.) स्वत:च्या इतिहासाचा अन्वयार्थ लावण्याची, स्वतःच्या सांस्कृतिक जीवनाचा आलेख किती उच्च आहे यांची जाणीव राष्ट्रीय वृत्तीच्या विचारवंतांना होऊ लागली. 'पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ' हा विश्वास ते जनतेच्या मनात निर्माण करू शकले आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृतीतील सत्याग्रह, सत्य, अहिंसा, फकिरी वृत्ती यांचा साधनांसारखा उपयोग करून स्वातंत्र्य मिळविता येते, हा एक नवा पाठ भारताने घालून दिला. शत्रूला चकित करणारे साधन असेल तर यश मिळणे सोपे जाते. भारतातील टिळक, गांधीजी, नेहरू, सुभाषचंद्र बोस, सावरकर, वल्लभभाई पटेल या सगळ्यांच्या प्रयत्नांमागे वेगळेपणा होता. ब्रिटिश आले म्हणून तर हे सामर्थ्य जाणवू शकले!
सारांश
ब्रिटिश व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले; येथील राजकारणात लक्ष घालू लागले आणि एकेक प्रदेशातील सत्ता काबीज करीत भारतावर एकतंत्री राज्य सुरू झाले. व्यापक प्रदेशावर असे राज्य त्यांच्या आधी कोणत्याच सत्तेला मिळविता आले नव्हते. भारताला स्वातंत्र्य देऊन जातानाही 'पाकिस्तान'च्या रूपाने त्यांनी भारताची फाळणी करण्याचा, भारताला कमकुवत करून ठेवण्याचा डाव हुशारीने साधला. त्यासाठी राजकीय दृष्टीने त्यांनी जातिजातींमध्ये जितकी तीव्रतम फुटीर वृत्ती निर्माण करता येईल तेवढी करून ठेवली. भारतीयांच्या मनामध्ये स्वसंस्कृती, स्वभाषा, स्वदेश इत्यादींच्या संदर्भात कमीपणाची भावना जाणीवपूर्वक व योजनाबद्ध रीतीने रुजवली. पाश्चात्त्य संस्कृतीकडे वळविण्यासाठी धर्मातर, प्रसारमाध्यमे, यंत्रयुगांनी आणलेल्या नव्या सुविधा-सुधारणा, नवा भाषिक व शैक्षणिक दृष्टिकोन, यामुळे जित कसे चकित होतील व आपल्याविरुद्ध बंड करण्यापेक्षा आपल्या तत्त्वांचा अवलंब कसा करतील, याचे पद्धतशीर धोरण ब्रिटिशांनी आखले. भारतीय इतिहास, तत्त्वज्ञान, ग्रंथसंपदा, ऋषितुल्य संत-महंत यांच्याबद्दल गैरसमज पसरवून पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा भारतीयांच्या मनावर त्यांनी ठसविला. पण ब्रिटिशांनी भारताला मध्ययुगातून यंत्रयुगात आणले. ब्रिटिशांनी यंत्रयुगाच्या सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, एकतंत्री अंमल, प्रसारमाध्यमांची व दळणवळणाची गतिशील सोय, सामाजिक सुधारणा इत्यादी अनेक चांगल्या गोष्टी भारतामध्ये आणल्या असल्या तरी त्यांचा हेतू भारतभूमी जास्तीत जास्त गुलामीत कशी राहील हाच होता. कोणत्याही जेत्यांचा हाच उद्देश असतो; पण भारतीय जनतेला त्याचे आकलन व्हायला वेळ लागला. त्यांची संस्कृती, कला, साहित्य उच्च दर्जाची होती; जगभर पसरलेली होती. अशा विरोधकांशी लढताना केवळ क्रांतिकारी मार्ग अनुसरून भागणार नाही याची जाणीव होऊन सत्याचा आग्रह, अहिंसा, फकिरी वृत्ती अशा नव्या शस्त्रांचा वापर भारताला सुचला. आपल्या संस्कृतीकडे बघण्याची नवी दृष्टीही भारताला येऊ शकली. ब्रिटिश भारतात आले नसते, तर जगाच्या नकाशावर भारताला जे लक्षवेधी स्थान आज मिळाले आहे, ते प्राप्त व्हायला वेळ लागला असता.
COMMENTS