Friday, 23 October 2020

Marathi Essay on "History Repeats Itself", "इतिहासाची पुनरावृत्ती होत असते मराठी निबंध" for Students

History Repeats Itself Essay in Marathi: In this article "इतिहासाची पुनरावृत्ती होत असते मराठी निबंध", "History repeats itself Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "History Repeats Itself", "इतिहासाची पुनरावृत्ती होत असते मराठी निबंध" for Students

Marathi Essay on "History Repeats Itself", "इतिहासाची पुनरावृत्ती होत असते मराठी निबंध" for Students
इतिहास म्हणजे काय? इति ह आस-म्हणजे हे असे घडले हे सांगणारे लेखन. मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांची ती जंत्री असते; पण ती नुसती जंत्री नसते. हे असे का घडले आणि यापेक्षा वेगळे का घडू शकले नाही; असेच घडण्यामागे कोणती कारणे होती; याची कारणमीमांसाही इतिहास करीत असतो. प्रामुख्याने इतिहास म्हटले की, राजकीय घटना आणि राजकीय व्यक्ती यांच्या संदर्भातील कालानुक्रमांनी घडलेल्या गोष्टी सांगण्यावर भर असतो; पण इतिहास सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कौटुंबिक अशा अनेक प्रकारचा असू शकतो. घराण्याचा इतिहास, प्रदेशाशी संबंधित असलेला इतिहास असे इतिहासाचे अनेक प्रकार आहेत. गतशतकांची खानेसुमारी करताना इतिहासामध्ये कृती, घटना, कल्पना, व्यक्तिचित्रे यांवर भर असतो. जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत घडणाऱ्या आणि घडलेल्या घटना पाहता, त्यांमध्ये असणाऱ्या काही समान वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही. त्याच त्याच घटना, त्याच त्याच प्रवृत्ती, त्याच त्याच प्रकारची माणसे परत परत आलेली दिसतात. थोडाफार वेगळेपणा असला तरी जगाच्या पाठीवर 'ती ती पदे नित्य फिरून येती ।' असेच का घडते? युद्धे वाईट, सर्वनाशक, सर्वभक्षक, माणुसकी नष्ट करणारी हे माहीत असूनही परत परत जगाला युद्धाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न का केला जातो? सर्वसत्ताधीश हे समाजाचा विचार न करता शांततेचे नाव घेऊन समानतेचा, न्यायाचा मंत्र जपत युद्धाचे रणशिंग का फुकतात? अजूनही मानवी जीवनामध्ये आदिमानवी प्रवृत्ती अशा मधून मधून उफाळून येतात. त्याची कारणे कोणतीही असली तरी त्यामध्ये 'इतिहासाला सतत तडेच जात असतात' असेच का घडावे? इतिहास शिकण्यामागे आणि घडून गेलेल्या घटनांचा अन्वयार्थ लावण्यामागे एक हेतू असतो-तो म्हणजे 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' हा होय. जर त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती युगानुयुगे होत असेल तर इतिहासापासून मानव काहीच शिकला नाही, शिकत नाही असेच म्हणावे लागेल.

इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणण्यामागे एक गृहीत सत्य दडलेले असते. ही पुनरावृत्ती जशी वाईट व संहारक पातळीवरची असते तशीच चांगली व विश्वसंरक्षक पातळीवरचीही असते. या दोन्ही प्रकारांची पुनरावृत्ती इतिहासामध्ये होत असते. गीतेच्या भाषेत बोलायचे झाले तर 'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति।' हे जसे सत्य पुनरावृत्त होत असते, तसेच 'अभ्युत्थानाय धर्मस्य संभवामि युगे युगे।' अशी सत्याचे व स्वत्वाचे रक्षण करणारी शक्तीही मानवजातीच्या कल्याणाचे स्वप्न साकार करण्यासाठी पुनः पुन्हा पृथ्वीवर अवतरत असते. पण चांगल्या-वाईट अशा दोन्ही प्रकारच्या घटनांची आणि व्यक्तिरेखांची पुनरावृत्ती होत असतानाही आपण 'इतिहासाची पुनरावृत्ती होते' असे म्हणताना वाईट व सर्वसंहारक घटनांकडेच लक्ष वेधीत असतो. 

भारतीय परंपरेतील पुनरावृत्तीकडे बघण्याची दृष्टी 'बी' कवींच्या 'पूर्णापासून ढळलेले जग जाते पूर्णाकडे।' या पंक्तीमधून व्यक्त झालेली आहे. मानव चुका करीत करीतच पूर्णत्वाला पोहोचणार आहे, हा त्यांचा विश्वास आहे. ग्रीकांच्या विचारांचा मागोवा घेतला तर त्यांची इतिहासाची कल्पना यापेक्षा वेगळी आहे. घटनांची अमर्याद साखळी म्हणजे इतिहास, असे ते इतिहासाबद्दल म्हणतात. साखळीत एकासारख्याच सर्व कड्या असतात, तशाच या साखळीतही त्याच त्याच घटना असतात. जगात, प्रारंभापासून घडलेल्या घटनांकडे पाहिले तर एक सत्य जाणवल्याशिवाय राहत नाही. युद्ध, लढाया आणि विनाशकारी घटनांनी इतिहासाचे पानन्पान रक्तलांछित झालेले दिसते. जगरहाटी, जगाचे रहाटगाडगे सुरू राहण्याचे एकमेव कारण म्हणजे विनाशकारी व संहारक प्रवृत्तीने घडवून आणलेल्या घटना होत. त्याचा हेतू पूर्णत्वा'कडे जाण्याचा आहे, असे ग्रीक इतिहासकारांना वाटत नाही हे निश्चित. अविरत फिरत असलेल्या या विश्वचक्राला गती देत असतात ती युद्धे. या युद्धांची कारणेही कमी-जास्त स्वरूपात सारखीच असतात. सत्तेची व मोठेपणाची अमर्याद लालसा, जबरदस्त हाव युद्धाला कारणीभूत असते. राजकारणात आणि समाजकारणात ज्यांची मूल्ये गुंतलेली आहेत, अशा मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठीही कधी कधी युद्धाची शिंगे फुकली जातात. अलेक्झांडरने असेच कारण दाखवून युद्ध पुकारले व प्रदेशांमागून प्रदेश पादाक्रांत केले. चंगेजखानाने आणि मोगल सम्राट बाबरानेही हेच केले. जग जिंकायला उरले नाही म्हणून रडणारे सम्राट आपल्याला परिचित आहेत. महाभारतासारख्या महाकाव्यामध्ये कौरव-पांडवांसारख्या भावाभावांमध्ये रंगलेले सत्तास्पर्धेचे रक्तलांछित राजकारणच आहे! रामायणासारख्या आदर्श ग्रंथातही रामाला युद्धाशिवाय न्याय मिळत नाहीच; पण रामायणामध्ये इतर युद्धांपेक्षा वेगळेपणाही आहे. भरतासारख्या भावासाठी राम राज्य सोडायला तयार होतो; वनवास संपवून परत आलेल्या रामाला भरत त्याचे राज्य देऊन टाकतो, अशी पुनरावृत्ती इतिहासात घडणे दुर्मिळ आहे. मात्र, युद्ध रामरावणांच्या युद्धासारखे नैतिक तत्त्वासाठी असो किंवा कौरव-पांडवांसारखे सत्तास्पर्धेसाठी असो, त्यातून विनाशाची वाटचाल कुणालाच रोखता येत नाही आणि सत्तेवर कुणीही येवो, नव्याने सत्ता काबीज करणाराही जुन्या सत्ताधीशांच्या पायावर पाय टाकतच जुलूम-जबरदस्ती, अन्याय या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय राहत नाहीत, असे इतिहास सांगतो.

तरीही मराठ्यांचे राज्य उभे करणारा शिवाजी वेगळा होता. सर्व धर्मातील चांगली तत्त्वे एकत्र करून 'दिने इलाही' सारखा नवा धर्म प्रसारित करू पाहणारा अकबर वेगळा होता. युद्धाने येणारा मानवी जीवनाचा व मूल्यांचा हास पाहून अहिंसेचा स्वीकार करणारा अशोक वेगळा होता. असे चमत्कार इतिहासात क्वचित घडत असतात. पण तरीही इतिहास असाही पुनरुक्त होत असतो हे म्हणणे अगदीच असत्य नाही. प्रत्येक युगात एखाद्या युगकर्त्याचा अवतार होत असतो. असे प्रेषित देवदूत, अवतार माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी जी तत्त्वे सांगतात, जगाला पटवून देतात, तीही पुष्कळशी समान असतात. असा महात्मा कधी कधी राजा म्हणजे सत्ताधीशही असतो एवढेच फार तर म्हणता येईल. पण माणसाच्या व मनुष्यजातीच्या भल्यासाठी अवतार घेणाऱ्या या व्यक्तीसदा ज्या तत्त्वप्रणालींचा आग्रह धरतात ती पुष्कळशा प्रमाणात समानच असतात. त्यांच्यासमोरच्या समाजाची ढासळलेली सांस्कतिक मल्ये कोणती. त्यांपैकी कोणत्या मल्याकडे समाजाला आकृष्ट करता येईल आणि समाजाची उन्नती व सांस्कृतिक घसरण कशी थांबेल, याचा विचार करून समाजसुधारक, संस्कृतिसंवर्धक व समाजधुरीण नीतितत्त्वांचा प्रसार करीत असतात; पण मूलतः त्यांच्या तत्त्वांची बैठक मानवी मूल्यांचीच असते. भगवान श्रीकृष्ण, भगवान बुद्ध, महावीर वर्धमान, गुरुनानक, येशू ख्रिस्त, महात्मा गांधीजी यांची शिकवण समान वाटते. याचे कारणही इतिहासाची त्यात पुनरावृत्ती असते हेच आहे.

इतिहास इतिहास म्हणजे तरी वेगळे काय? माणसाच्या सनातन अस्तित्वाचा झगडा, स्वत:ची स्वतःलाच पटवून घ्याविशी वाटलेली ओळख आणि प्राणिजीवनापेक्षा जी काही वेगळी मूल्ये त्याला आपल्या मनुष्यत्वाची निशाणी वाटली ती जतन करणे व पुढच्या पिढीच्या हातांत सोपविणे, यापेक्षा इतिहासाचा वेगळा अर्थ कोणता? या सत्याची ओढही काहींना प्रत्येक कालखंडात व प्रत्येक भूप्रदेशात आपल्याकडे खेचून घेते, तर काहींना सत्तेची, अधिकाराची, स्वकुळाची व स्ववंशाची निशाणी कालपटावर अमर कराविशी वाटते. हा संघर्ष म्हणजे केशवसुतांच्या शब्दांत 'पूर्वीपासून अजून, सुरासुर। तुंबळ संग्रामाला करती ।' देव-दानवांचा हा संघर्षच पुनरावृत्त होत असतो. पण त्या काळातील माणसाला मात्र त्यात 'देवांच्या मदतीला' येण्याचे आवाहन संस्कृतिसंवर्धक करीत असतात. घटना, कल्पना, व्यक्ती, कृती यांची ही इतिहासाच्या पडद्यावर होणारी पुनरावृत्ती ही कदाचित नशिबाचा खेळ आहे की काय असे वाटावे इतकी सातत्याने घडत असते.

या पुनरावृत्तीमध्ये तोचतोपणा आहे, यात शंका नाही. पण जगाच्या सुरुवातीपासून तोच सूर्योदय, तोच सूर्यास्त, तीच मानवाची धडपड थेट अनादिकालापासून सुरू आहे; तरी प्रत्येक माणसाच्या दृष्टीने उगवणारा दिवस 'नवा' असतो. कालच्यासारखेच भोजन आज मिळो' आणि 'कालची संकटे आज पळून जावोत' अशी प्रार्थना प्रत्येकजणच करीत असतो आणि त्यात तरीही नावीन्य असते. मानवी प्रवृत्ती सनातन असल्याने पुनरावृत्ती आणि नावीन्य यांचा मेळ व खेळ इतिहासात सर्वत्र दिसत असला तर त्यामध्ये आश्चर्य नाही. रात्रीमागून दिवस उगवतो, तसेच दिवसामागून रात्रही येत असते; पण 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल' ही मानवाची उगवत्या सूर्याच्या दिशेने तोंड करून जगणारी आशावादी प्रवृत्ती पुनरावृत्त होते, ही गोष्ट ‘महत्त्वाची' आहे व मानवाच्या प्रगतीची दर्शक आहे. पण ही वाटचाल सातत्याने होत नाही. कुणाच्या तरी मनात सत्तेची लालसा प्रभावी होते आणि त्यासाठी तो सर्व जगाला युद्धाच्या ज्वालामुखीच्या तोंडावर बसवितो. संस्कृतीचा, सुधारणेचा डोलारा किती वरवरचा आहे हेच यावरून सिद्ध होते. केलेली सर्व प्रगती एका क्षणात नाश पावते आणि माणसाला 'फिनिक्स' पक्ष्यासारखी परत राखेतून संस्कृती उभी करण्यासाठी रक्त आटवावे लागते; पण माणसे परत परत संस्कृतीची मंदिरे उभी करण्यासाठी धडपडतात; ही गोष्ट माणसातील माणुसकीची ओढ व्यक्त करणारी आहे. दुष्ट सत्तेपुढे व बलदंड विनाशकारी शक्तीपुढे उभे राहून विरोध करण्याचे बळ इतिहासामधूनच मिळते, हेही विसरता कामा नये. 'दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।' अशी विश्वासाठी आर्ततेने प्रार्थना करण्याची तळमळ प्रत्येक युगातील ज्ञानेश्वराला वाटते. सगळीकडे अंधार असला तरी 'घरी एकच असलेली पणती' काळोखाला छेद देण्याचा प्रयत्न करीतच असते. माणसातील दुष्ट प्रवृत्ती कमी करण्याचे उपाय आणि मानवी जीवन सुखसमृद्धीने भरून टाकण्याचे स्वप्न पाहणारे हे 'सद्भावाचे दीपस्तंभ' ही इतिहासाची पुनरावृत्ती माणसाला आशादायक आहे.

विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, कलांच्या क्षेत्रामध्ये किंवा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये अशी पुनरावृत्ती होते काय? या क्षेत्रांमध्ये अगोदरच्या चिंतनाचा आधार घेत आपण विकासाकडे जात असतो. इतिहासाची पुनरावृत्ती होते ती फक्त राजकीय क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्र हे इतर सर्व क्षेत्रांवर परिणाम घडविणारे महत्त्वाचे क्षेत्र असल्याने तेथील पुनरावृत्तीचा परिणाम सर्व क्षेत्रांतील प्रगतीला भोगावा लागतो. त्यासाठी राजकीय क्षेत्रातील विधायक प्रवृत्तींची पुनरावृत्ती कशी कायम राहील यावर विचारवंतांनी चिंतन करून उपाय शोधायला पाहिजेत व सत्ताधीशांनी त्यांची कार्यवाही करायला पाहिजे. 

शुक्र, मंगळ, बुध, शनी इत्यादी ग्रहगोलांचे आज संशोधन होत आहे. मानवाला वसाहत करण्यासारखे वातावरण तिथे आहे काय, याचा हे संशोधन मागोवा घेत आहे. ही वृत्तीही इतिहासातील कोलंबसाची, वास्को-दी-गामाचीच वृत्ती नव्हे काय? आपल्या गरजा कोणत्या आणि त्या भागविण्यासाठी काय करता येईल, याचा सनातन शोध घेणे ही मानवी सवय आहे. 'सुखी माणसाचा सदरा' कधीच मिळत नसतो; पण त्याचा शोध घेण्याची माणसाची सवयही कधी सुटत नसते. इतिहासाची अनेकदा पुनरावृत्ती होत असते, ती त्याच्या या जन्मदत्त सवयींमधून. मानव हा सुष्टदुष्ट गुणयुक्त आहे. हातामध्ये सत्ता आली की भ्रष्ट होण्याची त्याला सवय आहे; पण तरीही गुण व अवगुणांच्या वाटेवरून चालताना तो पुष्कळदा 'सत्यम् शिवम् सुंदरम्'च्या संस्कृतीच्या, देवत्वाच्या जवळ जाऊ शकतो. मात्र तिथे चिरकाल राहता न येणे हाही मानवाला असलेला शाप पुनरुक्त होत असतो. म्हणूनच इतिहास जरी पुनरुक्त होत असला तरी त्यातून माणुसकीच्या इतिहासाचे विशेष जमा होत असतात. 

सारांश

इतिहास पुनरुक्त होत असतो, इतिहासापासून माणूस नवे काही शिकत नाही, मग इतिहास शिकायचा कशाला? असा सर्वसाधारण सूर असतो. दुष्टपणा, क्रूरता, मानवसंहार यांपासून सुसंस्कृत म्हणविणारी आजची राष्ट्रेही दूर नाहीत. मग माणसाच्या सुसंस्कृतपणाचे पोवाडे गाणे फोल आहे असे वाटत असले तरी चांगल्या प्रवृत्तीही पुनरावृत्त होत असतात, हेही इतिहासातून शिकायला मिळते. दिवस-रात्र हे चक्र इतिहासातही दिसून येते. माणसाच्या 'माणूस' होण्याच्या धडपडीचा इतिहास हा साक्षीदार असतो. त्याच्या अशा विधायक व विश्वकल्याणकारी प्रयत्नांमध्ये त्यानेच आणलेले अडथळे किती प्रकारचे असू शकतात, ही गोष्ट इतिहासावरून कळू शकते व नकळत ते निवारण्याची वाटही त्याला शोधता येते. त्यामध्ये असलेला विरोध, विकासक्रम मार्गदर्शक ठरतो.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: