Essay on Indian Education System in Marathi : In this article " भारतातील शिक्षणपद्धती मराठी निबंध ", " आजची शिक्षण पद्धती माह...
Essay on Indian Education System in Marathi: In this article "भारतातील शिक्षणपद्धती मराठी निबंध", "आजची शिक्षण पद्धती माहिती", "भारतीय शिक्षण व्यवस्था निबंध मराठी" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Indian Education System", "भारतातील शिक्षणपद्धती मराठी निबंध", "आजची शिक्षण पद्धती माहिती" for Students
कोणत्याही शिक्षणपद्धतीचा संबंध शिक्षणाच्या ध्येयधोरणांशी असतो. पुढच्या पिढीला शिक्षण देण्यामागे असलेला उद्देश कोणता आणि हा उद्देश सफल होण्यासाठी कोणती पद्धती कार्यवाहीत आणायची याचा विचार शिक्षणपद्धतीमध्ये असतो. ब्रिटिशांनी पारतंत्र्याच्या काळात घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीमध्ये त्यांच्यासमोरचे भारतीयांना सुशिक्षित करण्याचे उद्दिष्ट कोणते होते, हे स्पष्ट झालेले आहे. त्यांना केवळ 'कारकुनांचे कारखाने' चालवावयाचे होते; या म्हणण्यामागे अर्धसत्य आहे. त्यांना भारतीयांना ज्ञानसंपादनाच्या वाटेवर आणून सोडायचे होते; कारण ज्ञानलालसेच्या छंदामध्ये व्यवहाराकडे लक्ष कमी कमी होत जाते. माणूस ज्ञानी होतो; पण 'शहाणपण' शिकतोच असे नाही. भारतीय माणसाला असे ज्ञानवेडे केले तर ते ज्ञान देणारी इंग्रजी सत्ता, इंग्रजी भाषा, त्यातून प्रकट होणारी अत्याधुनिक संस्कृती यांमुळे भारतीयांच्या मनातील जेत्यांबद्दलचे शत्रुत्व कमी होईल आणि ते 'भो भो, पंचम जॉर्ज' अशी त्याची स्तुतिसुमने गाऊ लागतील. त्यांना ज्ञानमार्गाने कृतिप्रवण करणारे शहाणपण यायला वेळ लागेल. तोपर्यंत आपल्या सत्तेची पाळेमुळे त्यांच्या मनात व देशात पक्की रुजविता येतील; हा त्यांचा उद्देश होता.
त्यांच्या शिक्षणपद्धतीमध्ये हे ज्ञानी करण्याचे ध्येय होते. शिवाय, ही शिक्षणपद्धती त्यांना भारताच्या प्रत्येक प्रांतात राबविता येईल अशा स्वरूपात तयार करावयाची होती आणि त्यापेक्षाही जर भारतीय शिक्षणपद्धती कुठे अल्पस्वल्प स्वरूपात कार्यवाहीत असेल तर तिचा बीमोड करून “भारतीयांजवळ कोणतीच शिक्षणपद्धती नव्हती, ते अशिक्षित व अनपढ होते; त्यांना आम्ही शिक्षणपद्धतीचा धडा घालून दिला," हा समज भारतीयांच्या मनात दृढ करायचा होता. त्या दृष्टीने त्यांनी भाषिक शिक्षणाकडे लक्ष पुरविले. प्रांतिक भाषाशास्त्राच्या अभ्यासाला प्रेरणा देऊन प्रांतिक भाषेत पुस्तके तयार केली. या भाषाज्ञानाच्या आधारे इंग्रजी शिक्षणाचा देशभर प्रसार केला. मुद्रणकला, दळणवळणाच्या वाढत्या यांत्रिक सुधारणा, सर्वांना शिक्षणाकडे वळविण्यासाठी शाळा-शाळांना एकत्रित करण्यासाठी विद्यापीठे अशी सलग बांधणी उभी केली. आजही त्यांची शिक्षणपद्धतीची आखणी योग्य असल्याने आपण तीच अनुसरत आहोत.
केवळ ज्ञानवंत घडविणे हा उद्देश असणेही फारसे सदोष नाही. ज्ञानसंवर्धनाने राष्ट्रसंपन्नता येते; पण ज्ञानसंपादनातून 'शहाणपण' येण्यावर दृष्टी असायला पाहिजे. या ज्ञानसंपादनाचा व्यवसायात उपयोग करता येणे शहाणपणातून शक्य होते. “घरोघरी ज्ञानेश्वर जन्माला येऊन भागत नसते. ज्ञानेश्वरादी संतांनी ज्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाचा संसारी जीवनात उपयोग करायला समाजाला प्रवृत्त केले, तशी “शहाणे करूनी सोडावे । सकलजन ॥" ही ज्ञानलालसेमागे प्रेरणा असायला पाहिजे. आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये ज्ञानसंवर्धनाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही आणि ही ज्ञानाची व्यावहारिक उपयुक्तताही प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा शिक्षितांच्या मनात जागृत होत नाही. 'जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी शिकवावे ।।' हा शहाणपणाचा मार्ग अवलंबिण्यापेक्षा समाजात घडणाऱ्या बऱ्यावाईट घटनांकडे लक्ष न देण्याची, अंग काढून घेऊन 'मला काय त्याचे' ही भावना वाढण्याची प्रवृत्ती या शिक्षणपद्धतीमधून आली आहे.
याचे कारण उघड आहे. ही शिक्षणपद्धती जरी ज्ञानसंपादनाचे ध्येय बाळगत असली तरी ती विशिष्ट अभ्यासक्रमावर व त्यासाठी नेमलेल्या पुस्तकांवर अवलंबून ठेवलेली असते. केवळ त्या पुस्तकांच्या अध्ययनावरच ज्ञान मर्यादित राहता कामा नये. पुस्तके ही निमित्त असतात. पुस्तकांतील ज्ञानाच्या आधारे ज्ञानाची कवाडे किलकिली होत असतात; पण हे विसरून आज शिक्षणपद्धतीत नेमलेल्या पुस्तकांवरच भर दिलेला असतो. नेमलेली पुस्तके पुष्कळदा ज्ञानाच्या दृष्टीने अपुरीही असतात आणि गावोगावचे शिक्षक, प्राध्यापक-वर्ग त्या पुस्तकाबाहेर डोकावण्याचा फारसा प्रयत्नच करीत नाही. काहींची तर ती कुवतही नसते. यामध्ये येणारे दोष टाळण्यासाठी
(१) अभ्यासक्रमात नेमलेली पुस्तके ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने लक्षात घेतली गेलेली असायला पाहिजेत.
(२) त्यांमध्ये बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणाचा चढता क्रम अनुसंधान राखून दिलेला असणे आवश्यक असते.
(३) शिक्षणाच्या गावोगावी निघणाऱ्या शाळा-महाविद्यालयांतून शिकविणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांची क्षमता विकसित होण्यासाठी ग्रंथालये असायला पाहिजेत व शिक्षकांना शिक्षणाच्या उद्देशाचे आकलन होणे व ते कार्यवाहीत कसे आणायचे याचा सराव असणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे.
(४) मुख्य म्हणजे सर्व अभ्यासक्रम विद्यार्थिकेंद्रित असावेत. विद्यार्थ्यांची प्रवृत्ती शिक्षणाकडे कशी वळेल, ते ब्रिटिशांच्या काळात लक्षात घेण्याची फारशी गरज नव्हती; कारण तेव्हा सर्व थरांतील व सर्व आर्थिक पातळ्यांवरचे विद्यार्थी शिक्षणाकडे वळविण्याचे आजच्यासारखे धोरण नव्हते. आज सर्वांना काही पातळीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे करावे; समाजात साक्षरांची व जमल्यास सुशिक्षितांची संख्या वाढती ठेवावी, यावर शिक्षणाचा भर आहे. म्हणून शिक्षणाकडे आकृष्ट झालेला बहुसंख्य विद्यार्थी कोणत्या हेतूने शिक्षणाकडे येत आहे व त्याला शिक्षणाची आवड कशी निर्माण होईल, त्याची आकलनक्षमता कशी वाढत राहील याचा विचार आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये आता सुरू झालेला आहे.
ज्या विद्यार्थ्याला ज्ञान द्यायचे; आदर्श व्यक्ती, आदर्श नागरिक व समाजातील एक घटक म्हणून घडवायचे त्याच्याकडे लक्ष देणे ही विद्यार्थिकेंद्रित पद्धती केवळ ज्ञानाचे वाटप करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे. याची सुरुवात बालवाडीपासून होत असते. बालवाडी ते पदव्युत्तर या वाढत्या पायऱ्यांनी त्याचा विकास घडविण्याची जबाबदारी शिक्षकावर असते.
बालवाडीमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांची मन:स्थिती, त्यांच्या ठिकाणी असलेल्या विविध क्षमता, घराच्या बाहेरच्या विश्वात वावरण्याचा त्यांचा सराव, त्यांचा शारीरिक-मानसिक निकोपपणा देणारे घरगुती वातावरण इत्यादी घटक शिक्षणातील अभ्यासक्रमापेक्षाही महत्त्वाचे असतात. आजकाल अर्थार्जनासाठी स्त्रीला घराबाहेर पडावे लागत असल्याने दोन-अडीच वर्षांपासून बालक अंगणवाडी, बालवाडी यांच्या आश्रयाने विकासाच्या दिशा शोधत असते. आजच्या बालमानसशास्त्रानुसार या पहिल्या दोन ते तीन वर्षे वयापर्यंतच बालकाचा जो विकास घडत असतो, त्याच्या ज्या क्षमता विकास पावतात त्यातूनच त्याचे जीवनभराचे व्यक्तिमत्त्व घडत असते. या वयामध्ये नादमयता, लयबद्धता, सततची क्रियाशीलता व भावनाशीलता हे बालकाचे अनुभवविश्व व्यापक करायला मदत करीत असतात. म्हणूनच बडबडगीते, साभिनय हालचालींवर आधारित गाणी, गोष्टी, वेड्यावाकड्या रेघोट्या रेखाटणे, खेळ खेळणे अशा गोष्टींवर भर असावा. वैयक्तिकतेतून सार्वजनिक जीवनाची ओळख, सामूहिक जीवनातील शिस्त व आनंद याचा त्याला परिचय करून घेण्याचे हे पहिले स्थळ असते. या वयात मूल अनुभवातून शिकत असते; म्हणूनच पशू, प्राणी, पक्षी, परिचित वस्तू यांच्या चित्रांतून भाषेची ओळख त्याला व्हायला साहाय्य होत असते. भाषा हे त्याचे जिज्ञासातृप्तीचे साधन असते आणि हे काय?', 'हे कसे?', 'हे कोण?' या प्रश्नांमधून त्याचे जगाचे आकलन समृद्ध होत असते. त्याच्या ठिकाणची ही प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती वाढत कशी राहील व त्याची जिज्ञासातृप्ती कशी होईल, असा अभ्यासक्रम असावा. वाचन-लेखनाचा परिचय नंतरच्या काळात करून द्यावा. अशा बालवाड्यांतून विशिष्ट अभ्यासक्रमापेक्षाही मातेचे वात्सल्यमय वातावरण मिळणे गरजेचे आहे; पण उपजीविकेचे साधन म्हणून चालविल्या जाणाऱ्या बालवाड्यांतून हे भान कितीसे असते व ते असण्यासाठी काय करायला हवे याकडे दुर्लक्ष होत आहे.
केवळ बालवाडीपुरतेच हे चित्र मर्यादित राहिलेले नाही. थेट पदव्युत्तर परीक्षेपर्यंत शिक्षणाकडे बघण्याची ही दृष्टी वाढत चालली आहे. बालवाडीपासून घेतल्या जाणाऱ्या भरमसाट संख्येच्या देणग्या, खासगी शिकवण्या व क्लासचे अफाट महत्त्व, परीक्षापद्धतीतील कॉपीसारखे सतत वाढते प्रकार यांमधून शिक्षणाचे मूळ ध्येय केव्हाच गळून गेले आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती शिक्षणक्षेत्रात दिसत आहे. या क्षेत्राला दिवसेंदिवस बाजारू व धंदेवाईक स्वरूप प्राप्त होत आहे. उद्योगक्षेत्राप्रमाणे याही क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. दरवर्षी जाहीर होणाऱ्या शालान्त परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये नाव येणे या गोष्टीला नको तितके महत्त्व येत असल्याने आपल्या शाळेचा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणण्याचे भलेबुरे मार्ग सर्वांनाच परिचित झालेले आहेत. विद्यार्थी ज्ञानाच्या विशुद्ध ओढीपोटी हे करीत नाही. तो स्पर्धेच्या चक्रात गुंतवून टाकला जात आहे.
ही शिक्षणव्यवसायाकडे धंदेवाईक दृष्टीने पाहण्याची सवय वाढत चालली आहे. डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी अधिकारी या तोडीची प्रतिष्ठा शिक्षक-प्राध्यापकांच्या व्यवसायाला राहिलेली नाही. पूर्वीच्या काळी गुरुजी, प्राध्यापक यांच्या ज्ञानाचा दरारा समाजामध्ये होता; पण आज तो दरारा तर राहिलेला दिसत नाहीच, उलट एक प्रकारची केविलवाणेपणाची व दयनीयतेची वृत्ती या पेशाबद्दल वाढलेली दिसते. याला कारण आमचा हा प्राध्यापकवर्ग आहे असे मान्य केले तरी त्यामागील कारणमीमांसा लक्षात घेतली गेली, तर त्यांच्याकडे दोष किती द्यायचा याबद्दल विचार करावा लागेल. गेल्या ५०-६० वर्षांपासून या पेशाकडे वळलेला वर्ग हा प्रामुख्याने तृतीय दर्जाचा आहे. या व्यवसायामध्ये आर्थिक प्राप्ती तुलनेने कमी असल्याने प्रत्येक तरुण पिढी नाईलाजाने या व्यवसायाकडे वळलेली आहे. ते या व्यवसायाशी किती एकनिष्ठ असणार व विद्यार्थ्यांबद्दल त्यांना किती प्रेम असणार? असे साधारणतः विसाव्या शतकाच्या मध्यापासून घडत आल्याने आजच्या प्राध्यापकाचे आदर्श ढासळलेले आहेत, असे म्हणता येईल. त्यासाठी या व्यवसायास प्रतिष्ठा व आर्थिक स्थिरता प्राप्त होण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करण्याची, जागृती आणण्याची गरज आहे. म्हणूनच केवळ त्यांच्या पदव्यांच्या आधारावर त्यांचे स्थान पक्के करण्यापेक्षा, त्यांच्या ज्ञानाची व निष्ठेची पारख वेळोवेळी करून घेण्याचे काही निकष निवडले पाहिजेत. सर्व थरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणक्षेत्रात प्रवेश असल्याने प्राध्यापक-वर्गातही सर्व थरांचे प्रतिनिधित्व असणे स्वाभाविक आहे. पण त्यातही गुणवत्ता, शिक्षणाची ओढ, शिकविण्याची क्षमता असणे याची मूलत:च आवड हवी आणि तशी ती नसेल तर ती विद्यापीठाने नव्या योजना राबवून निर्माण करायला पाहिजे.
इंग्रजांनी स्थापन केलेल्या कारकून तयार करणाऱ्या कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना निदान नोकरी मिळविण्यात तरी कष्ट नव्हते; पण आज नोकरी, व्यवसाय किंवा उपजीविकेच्या साधनाची सोय या शिक्षणातून होत नाही, हे सत्य लक्षात घेऊन शिक्षणाचे स्वरूप बदलावयास हवे. बेकारी, वाढती लोकसंख्या, शहरी वातावरण, व्यसनाधीनता, गुंडगिरी या सगळ्या सामाजिक समस्या लक्षात घेऊन व्यवसायाभिमुख शिक्षण जसे अगत्याचे, महत्त्वाचे आहे तसेच विज्ञाननिष्ठ व संस्कारित पिढी घडविण्याचीही गरज आहे. वास्तवाभिमुख शिक्षणपद्धती अमलात आणल्यास ही गरज पुरी होऊ शकेल. त्या दृष्टीने आज सुरू केलेले व्यावहारिक मराठी लोकसाहित्य, समाजशास्त्र हे अभ्यासक्रम वास्तवाचे ज्ञान करून देणारे आहेत; पण हे प्रयत्न अपुरे आहेत.
कला, शास्त्र व वाणिज्य या शाखांकडे वळणारा विद्यार्थ्यांचा प्रचंड लोंढाच शिक्षणपद्धती कोलमडून पडायला कारणीभूत आहे, असे वाटायला लागले आहे. सत्रपद्धती काय किंवा परीक्षापद्धती काय, ज्ञानाशी असलेल्या एकनिष्ठतेच्या आधारेच ती यशस्वी होत असते. या पद्धतीमध्ये व्यापक प्रमाणावर शिथिलता व गैरव्यवस्था येणे स्वाभाविक आहे. परीक्षापद्धतीतील महत्त्वाचा दोष म्हणजे ती ज्ञानाची पातळी जोखणारी राहिली नसून केवळ स्मरणशक्तीची कसोटी तोलणारी परीक्षा ठरत आहे. निकालपत्रातील गोंधळाला आळा घालण्याचा मार्ग कठीण झाला आहे आणि याच प्रश्नपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असणे हे अत्यंत धोकादायक आहे. प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांजवळ अभ्यासक्रमाच्या तारतम्याचा विवेक व ज्ञान असेल आणि उत्तरपत्रिका तपासनिसांना जर ज्ञानाची कदर असेल तरच खऱ्या अभ्यासू व हुशार विद्यार्थ्याला कदाचित न्याय मिळू शकतो, एरवी नाही, ही वस्तुस्थिती आहे. विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा हा दाखला त्याची बौद्धिक क्षमता सिद्ध करणारा ठरत असल्याने विविध ठिकाणांच्या नोकऱ्यांमध्ये त्याला आपली बौद्धिक क्षमता स्वतंत्र परीक्षांच्या द्वारा सिद्ध करावी लागते.
जशी बालवाडीत त्याच्या व्यक्तिमत्त्वाची बैठक सिद्ध होत असते, तसेच शालेय, माध्यमिक पातळीवरच्या शिक्षणामधून व्यक्तिमत्त्वाला व्यापकता लाभत असते. पण त्यासाठी माध्यमिक स्तरावर कोणकोणते विषय असावेत, त्यांचा अभ्यासक्रम किती सखोल किंवा तोंडओळख करून देणारा असावा याबद्दलही वेळोवेळी बदल केले गेले आहेत. विशेषतः साहित्य, नाट्य, शास्त्र, गणित, व्यवहार व भाषा यांच्यावर किती भर दिलेला असतो, यावर विद्यार्थ्यांच्या मनाचा कल अवलंबून राहतो.
केवळ शालेय पातळीवरचेच नव्हे, तर महाविद्यालयीन शिक्षणामध्येही इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून स्वीकारलेली असली तरी मातृभाषेचे माहात्म्य व मातृभाषेतून ज्ञानप्राप्तीची सुलभता मेकॉलेपासून सगळ्यांनीच मानलेली आहे, हे विसरता कामा नये. महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये मराठी वा अन्य देशी भाषांमधून शास्त्रादी विषय शिकविण्यासाठी आवश्यक असलेली ग्रंथसंपदा फारशी नाही. तांत्रिक, पारिभाषिक शब्दांची निर्मिती होऊ शकलेली नाही. ही मातृभाषेतून तत्त्वज्ञानादी विषय शिकविण्यासंबंधात असलेली अडचण नजरेआड करण्यासारखी नाही. पण ग्रंथ नाहीत म्हणून इंग्रजी माध्यमातून शिकविणे व शिक्षण इंग्रजी माध्यमातून म्हणून मातृभाषेतून ग्रंथनिर्मिती थंडावलेली, हे दुष्टचक्र कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि त्यासाठी ते ते विषय इंग्रजी व मातृभाषा अशा दोन्ही माध्यमांतून शिकविणे ही पहिली काही वर्षांपुरती सोय ठेवून नंतर मातृभाषेतून ते ते विषय शिकविणे हा पर्याय मानता येतो; पण त्यासाठी स्वभाषा, स्वसंस्कृती व स्वराष्ट्र यांबद्दल तज्ज्ञमंडळींच्या मनात आत्मीयता हवी आणि त्याच्या प्रगतीसाठी निश्चित आराखडा आखून, योजनाबद्ध प्रयत्न सातत्याने केले गेले पाहिजेत.
इयत्ता पहिलीपासून इंग्रजीचा अट्टाहास, ती एक ज्ञानभाषा आहे या दृष्टीने उचित आहे; पण तिचे स्थान मातृभाषेच्या तोडीचे मानण्याची चूक होता कामा नये. संस्कृतिसंवर्धनासाठी मातृभाषा गरजेची आहे. हे भाषिक व्यवहाराचे भान व स्थान लक्षात घेऊन शालेय पातळीवर त्रिसूत्री (इंग्रजी-हिंदी-मातृभाषा) की द्विसूत्री (इंग्रजी व मातृभाषा) याचा निर्णय घेणे अगत्याचे आहे. काही वर्षांपूर्वी शालेय पातळीवरील शिक्षणातून इंग्रजी हा विषय काढून टाकल्याने पाचवी ते बारावी पर्यंतच्या एका पिढीचे झालेले नुकसान शिक्षणपद्धतीने नजरेसमोर ठेवायला पाहिजे.
आजच्या सर्व पातळ्यांवरच्या शिक्षणाबद्दल सर्वसामान्य माणस असंतष्ट आहे. या शिक्षणाने ना विज्ञाननिष्ठा रुजवली ना विवेकवाद शिकविला. आपल्या सभोवतालच्या जीवनातील सामाजिक, आर्थिक, राजकीय गरजा समजून घेण्याची व त्या पूर्ण करण्याची क्षमता हे शिक्षण देऊ शकत नाही. या शिक्षणामुळे माहिती खूप मिळते; पण ज्ञानसाधनाच दुर्लक्षित झाली आहे. स्वदेशाभिमान, स्वसंस्कृतिनिष्ठा, परंपरेची जपणूक इत्यादी जीवनधारणेला आवश्यक असलेली वशिष्ट्ये या शिक्षणातून जणू काही हद्दपार केली जात आहेत. साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान यांचा अभ्यास ज्या संकृतीशी निगडित असतो, त्यावर लक्ष केंद्रित केले जात नाही. असे 'नन्नाचे पाढे' खूप आहेत आणि तरीही या शिक्षणाच्या साच्यामध्ये शिरल्याशिवाय आजच्या पिढीसमोर दुसरा कोणताच पर्याय नाही.
शिक्षणपद्धती कालमानानुसार लवचिक असायला हवी. काळाच्या व समाजाच्या गरजा लक्षात घेऊन तिच्यात बदल करायला पाहिजे व आधीच्या योजना कार्यवाहीत आणतानाचे जे धोके टाळता आले नाहीत ते टाळण्याचे उपायही शोधायला पाहिजेत. कोणत्याही शिक्षणपद्धतीमध्ये ज्ञानग्रहण ते ज्ञानसंवर्धन ही गोष्ट महत्त्वाची असते. अभ्यासक्रमात नेमलेल्या पाठ्यपुस्तकांचा हेतू ज्ञानाची वाट सुचविणे हा असतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीने नव्या नव्या विषयांमधील नवे संशोधन विद्यार्थ्यांसमोर कसे येईल व त्याद्वारे त्यांच्या प्रतिभेला चालना कशी मिळेल याकडे लक्ष पुरवायला हवे. यांपैकी काही ज्ञानशाखा समाजोपयोगी ज्ञान देत असतात; तर काही ज्ञानशाखा मानसिक विकास करणाऱ्या असतात. यांचे तारतम्य शिक्षणात पाळले गेले पाहिजे. त्यासाठी शिक्षकवर्ग केवळ कर्तव्यनिष्ठ व ज्ञानपिपासू असून भागणार नाही, तर व्यावहारिक जीवनात या ज्ञानाचा वापर कसा करायचा याचेही भान त्याच्याजवळ असावे लागते. शिक्षकाची आपल्या शिक्षकी पेशाशी बांधिलकी असणे जसे महत्त्वाचे आहे तसेच समाजात शिक्षकाला त्याच्या विद्वत्तेमुळे प्रतिष्ठा असण्याचीही गरज महत्त्वाची आहे. आज समाजातील प्रत्येक व्यक्ती पैशाच्या मागे धावत आहे. पैशाने काहीही विकत घेता येते, ही वस्तुस्थिती असलेल्या या जगात विद्वत्ता व नीतिमत्ता यांना किंमत उरलेली नाही. समाजातील ही परिस्थिती बदलली तर गुणांना व ज्ञानलालसेला किंमत येऊ शकेल. शिक्षकी पेशाकडे आदराने पाहिले जाईल अशा प्रकारे सामाजिक सुधारणा आणि शिक्षणपद्धतीमधील विकसनशीलता यांचा परस्परावलंबी संबंध लक्षात घेऊन शिक्षणपद्धतीच्या विकासाचा विचार करायला पाहिजे.
सारांश
शिक्षणपद्धतीचा संबंध शिक्षणाच्या ध्येयधोरणांशी असतो. ब्रिटिश कालखंडात 'ज्ञानवंत होणे' हे ध्येय ठरवून शिक्षणाची शालेय ते पदव्युत्तर अशी क्रमवार पद्धती रूढ केली गेली; पण ज्ञानातून शहाणपण यावे व सुसंस्कारित नागरिक घडावा हे तेव्हाचे धोरण नव्हते. आज त्या दृष्टीने थोडेफार प्रयत्न होत आहेत; पण ते अतिशय अपुरे आहेत. ज्ञानसंपादनाची भिस्त ज्या पाठ्यपुस्तकांवर अवलंबून राहू लागली त्या पुस्तकांतील ज्ञानापुरतेच शिक्षण घेण्याकडे कल वाढला. ग्रामीण भागातील शिक्षक-प्राध्यापकांना ग्रंथालये व अन्य साधनसुविधा मिळणे दुर्लभ झाले. शिक्षणपद्धती विद्यार्थिकेंद्रित असण्याकडे दुर्लक्ष झाले. बालवाडीतील शिक्षणाने शिक्षणाचा पाया घातला जातो; पण त्याच्याकडे गरजेपुरतेही लक्ष दिले गेले नाही. सर्व शिक्षणाला धंदेवाईक, बाजारू स्वरूप आले. परीक्षापद्धतीतील त्रुटी रुंदावत चालल्या. भाषिक दृष्टिकोनातून इंग्रजी, हिंदी व प्रादेशिक भाषा यांच्यात समन्वय साधण्याची गरज लक्षात घेतली गेली नाही. शिक्षणातून संस्कृतिनिष्ठा जपली जायला पाहिजे व विद्यार्थ्यांसमोर ज्ञानाची नवी दालने खुली होतील अशी शिक्षणपद्धती व शिकविणाऱ्याजवळ सामाजिक बांधिलकीचे भान पाहिजे.
COMMENTS