Religion and Politics Essay in Marathi: In this article "राजकारण आणि धर्मकारण मराठी निबंध", "Rajkaran ani Dharma karan Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Religion and Politics", "राजकारण आणि धर्मकारण मराठी निबंध", "Rajkaran ani Dharma karan Marathi Nibandh" for Students
सामाजिक जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक क्षेत्रांपैकी राजकारण आणि धर्मकारण ही दोन महत्त्वपूर्ण क्षेत्रे आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकावर त्यांचा परिणाम होत असतो. राजकारण ज्या राज्यशास्त्रावर अवलंबून असते व धर्मकारण ज्या धर्मशास्त्रावर विसंबून असते, त्यांच्यातील तत्त्वांचा व नियमांचा समाजाच्या स्थिरतेशी व विकासाशी असलेला संबंध मूलगामी स्वरूपाचा असतो. राज्यशास्त्र व धर्मशास्त्र यांपैकी राज्यशास्त्राचे स्वरूप तत्कालीन राजकारणांनी बदलते असते. राजकारणातील नव्या नव्या खेळीमुळे त्याच्या नियमांमध्ये बदल होत जातात. त्या तुलनेत धर्मशास्त्रामध्ये फारसे बदल होत नसतात. कालपरत्वे धर्मातील आचारांमध्ये बदल होतात; पण विचारांची व तत्त्वांची बैठक तीच राहते. कालपरत्वे व प्रदेशपरत्वे बदलणाऱ्या राजकारणाचा व धर्मकारणाचा नेमका संबंध काय हा प्रश्न प्रत्येक वेळी लक्षात घ्यावा लागतो. धर्मकारणाशिवाय (धर्मातील नैतिक तत्त्वांशिवाय) राजकारण अस्थिर होते आणि राजकारणाने राज्य उभे केल्याशिवाय धर्मकारण विकास पावू शकत नाही, असे आतापर्यंतच्या उदाहरणांवरून दिसून आले आहे.
राजकारण' असे म्हणण्यापेक्षा 'राजनीती' असे म्हटल्याने 'राजकारण' या शब्दाला चिकटलेले अनैतिकतेचे रंग दूर सारून विचार करता येईल. राजनीतीने समाजाला लौकिक व व्यावहारिक पातळीवरच्या जीवनात स्वास्थ्य मिळते; पण धर्मकारणाने माणसाच्या अस्थिर जीवनाला अर्थ प्राप्त होतो. त्याचे प्राणिपातळीवरून उन्नयन करण्याचे कार्य धर्म करीत असतो; म्हणूनच राजकारण आणि धर्मकारण यांचा संबंध असतो-नसतो किंवा असावा-नसावा या प्रश्नापेक्षा त्यांचा एकमेकांशी कशा प्रकारचा संबंध समाजाला पोषक ठरेल या प्रश्नाचा विचार महत्त्वाचा आहे.
राजकारण कोणत्या क्षेत्रात घुसलेले नाही? 'नाट्य, साहित्य इत्यादी कलाक्षेत्रे, डॉक्टर, वकिली, व्यावसायिक क्षेत्रे किंवा कारखानदारी वा उद्योजकतेची क्षेत्रे अशा सर्व ठिकाणी राजकारण शिरले आहे असे म्हणण्यामागे 'राजकारण' म्हणजे राजकीय घडामोडी हा अर्थ नसून, त्या त्या क्षेत्रातील स्वार्थपरायणता, वशिलेबाजी, गुंडगिरी, धनदांडगेपणा, लबाडी, खोटेपणा, अनैतिकता, फसवेगिरी, नैतिकतेचा वरपांगी आभास यांसारखा अर्थ व्यक्त होत असतो. 'राजकारण' या शब्दाला हा अर्थ का आला असेल, हे लक्षात घेतले तर राजकीय क्षेत्राची कल्पना येऊ शकते. 'राजकारण हे वारांगनेसारखे रूप पालटणारे असते', असे जे म्हटले जाते, त्याच्यामागे हीच लौकिक-व्यवहारी, स्वार्थ पाहून वागण्याची राजकारणाची वृत्ती स्पष्ट करावयाची असते. राजकारणात एकनिष्ठता पाळली जात नसते. राजकारण म्हणजे एकनिष्ठेला व विश्वासाला फाटा देऊन वागणे किंवा राजकारण म्हणजे अट्टल बदमाशांचा अड्डा, या म्हणण्यातून राजकारणाचे स्वरूप अनादिकालापासून कसे आहे त्याचेच चित्र रेखाटलेले आहे. राजकारणात खरेच असे काळेबेरे असावे लागते काय? 'सत्तेच्या सिंहासनावर साधुत्वाचा निभाव' कधी लागूच शकत नाही काय? मग धर्मातील नैतिकतेचा राजकीय क्षेत्राशी संबंधच काय? हा प्रश्न आज जे राजकारणाचे स्वरूप दिवसेंदिवस गढूळ होत चालले आहे, त्यामुळे विचारात घ्यावा लागतो.
राजनीतीचे म्हणजेच राजकारणाचे क्षेत्र असे नीतीला सोडून असते तर शिवाजीमहाराजांच्या नैतिकतेचे कौतुक झाले नसते. 'अशीच असती अमुची माता सुंदर, रूपवती ।। आम्हीही सुंदर झालो असतो ॥' असे म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची सन्मानपूर्वक पाठवणी करणाऱ्या शिवाजीची सुसंस्कृती याच राजकारणाच्या क्षेत्रात वाखाणली जाते. “हे राज्य व्हावे ही 'श्री' ची इच्छा आहे" अशी जाणीव ठेवून महाराष्ट्र राज्याची संस्थापना करणाऱ्या शिवाजीच्या मनात हीच दृढ भावना होती. रामदासांच्या झोळीत त्याने राज्याचे दान टाकले होते की नाही याबद्दल साशंकता असेल; पण त्या लोककथेवरून राजाच्या मनातील संतत्वाचा आदर व्यक्त होतो. राजकारणामागे अशी समाजहितकारक नैतिकतेशी एकनिष्ठता जेव्हा असते तेव्हा राज्ये भरभराटीला येतात. अशी निष्ठा ही धर्मकारणाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने राजकारण व धर्मकारण यांच्या अन्योन्य संबंधाचे स्वरूप स्पष्ट होऊ शकते. यात धर्मकारण यशस्वी होते ते राजकारणातील बलशालीत्वानेच. राजकारणाच्या बहरंगी व बहुढंगी रूपामागे अशी समाजहिताची व नैतिकतेची (त्यासाठी धर्मकारणाची) बैठक असावी लागते. योग्य साध्य गाठण्यासाठी राजकारणात साधनशुचिता पाळली गेली नाही तरी त्यामुळे उद्दिष्टांचे स्वरूप मलिन होत नाही, अशी श्रीकृष्णासारख्या राजकारणधुरंधरांची विचारसरणी असते. म्हणूनच “ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा।" (ऊस गाठाळ असतो, वेडावाकडा असतो; पण रस तसा नसतो. तो रसाळच असतो.) या उक्तीप्रमाणे राजकारणाचे उद्दिष्ट समाजहित हेच असावे लागते. हे समाजहित धर्मातील नैतिकतेशी निगडित असते. धर्माचा राजकारणाशी असा पायाभूत संबंध आदर्श ठरतो. या आदर्शापासून धर्मातील नैतिकता व राजकारण जितके दूर जाईल तेवढे राजकारण दूषित होत असते.
राजनीती किंवा राजकारण यांचा संबंध प्रदेशाशी असतो, भूगोलाशी असतो. आधिपत्याखाली असलेल्या प्रदेशातील समाजावर त्याची हुकमत चालत असते. समाजाच्या संरक्षणाची, स्वास्थ्याची, विकासाची जबाबदारी कशी पार पाडावी हे राजकारणाचे उद्दिष्ट असते. त्या समाजाच्या संदर्भातील ही कर्तव्ये पार पाडताना त्या समाजाच्या नैतिक वर्तनाचा ज्या हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, इस्लाम इत्यादी धर्माशी संबंध असतो, त्या धर्मांना लक्षात घेतल्याशिवाय प्रजेचे किंवा जनतेचे हितसंबंध जपण्याची कर्तव्ये राजकारणाला पार पाडता येत नाहीत. अशा वेळी धर्म या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा विशिष्ट 'धर्म' हा अर्थ घेतलेला असतो. धर्म हा प्रदेशाशी निगडित नसून समाजाशी निगडित असतो. समाजमन व व्यक्तिमन हे त्याचे क्षेत्र होय. हा धर्म त्याला जन्माने किंवा धर्मांतराने मिळालेला असतो. तो त्याच्या आत्मिक विकासाचा विचार करीत असतो. मानसिक, आध्यात्मिक, आधिभौतिक विचारांमुळे माणसाच्या जीवनाचे सार्थक होते, हा विचार धर्माने माणसाच्या मनात रुजविलेला असतो; म्हणून संभाजीमहाराजांसारखे महाराष्ट्राचे नेतृत्व हिंदुधर्मासाठी हौतात्म्याला जवळ करते. धर्माच्या निष्ठाही जाज्वल्य असतात. समाजमनाला त्या अफूच्या गोळीसारखी गुंगी आणतात; पण त्यांमधूनच माणूस प्रचंड मोठी कार्येही करू शकतो.
प्रत्येक धर्माचे आचार व विचार असे दोन विभाग असतात. विचार, तत्त्वज्ञान, तत्त्वप्रणाली यांची बैठक सर्व धर्मांमध्ये कमी-जास्त प्रमाणात समान असली तरी आचारांमध्ये, दैवतांमध्ये भिन्नता असते. जेव्हा एकाच राज्यामध्ये अनेकधर्मीय समाज असतो; तेव्हा त्या विविधतेमुळे संघर्षाचे, वैमनस्याचे, स्पर्धेचे वातावरण समाजात अस्वस्थता निर्माण करीत असते. अनेक धर्म, संप्रदाय व पंथ पोटात घेणाऱ्या भारतासारख्या देशातील राजकारणाला सर्व धर्माना समान मानण्याच्या तत्त्वामागे व धर्मनिरपेक्षतेवर लौकिक जीवन आधारित ठेवण्यामागे हीच अस्वस्थता निर्माण होऊ न देण्याचे व्यापक धोरण आहे. पण व्यापक तत्त्वे कार्यवाहीत येताना त्यांमध्ये सदोषता कशी राहणार नाही, याची जबाबदारी तत्कालीन राजकारण्यांनी घ्यायला पाहिजे.
सर्व धर्माच्या लोकांना/अनुयायांना नागरिक म्हणून समान वर्तणूक, समान संधी, समान शिक्षण अशी सर्व क्षेत्रांमध्ये समानता देण्याचे ध्येय राजसत्तेसमोर असते. लोकसत्ताक राज्यपद्धतीमध्ये त्या त्या धर्माच्या लोकसंख्येनुसार त्यांना प्रतिनिधित्व असल्याशिवाय त्यांचे हक्क जपले जात नाहीत. पण पुष्कळदा त्यामुळे(१) प्रतिनिधित्व निवडणुकीद्वारे मिळत असल्याने, त्या धर्माच्या अनुयायांच्या सुसंस्कृतपणाशी व निवडणुकीतील नैतिकतेशी त्याचा संबंध असतो व असंस्कृत व आग्रही प्रतिनिधित्व राजसत्तेला धर्मकारणाच्या क्षेत्रात खेचित असते. (२) तसेच सर्वांना समान कायदा असला तरी धर्माने घालून दिलेल्या नियमांमध्ये कायदा फारशी लुडबूड करू शकत नाही. विशेषतः विवाह, घटस्फोट, स्त्रीशिक्षण इत्यादींविषयक असलेल्या धर्मनियमांना कायद्यात सवलत द्यावी लागते. (३) प्रत्येक धर्मामधील सण, व्रते, उत्सव इत्यादींनी सार्वजनिक पातळीवर शिस्त लावताना धर्माधर्मातील संघर्ष टाळण्याचे कार्य राजकारणाला अवघड जाते. सक्षम व समाजहितदक्ष राजकारणालाही हे काम अत्यंत कौशल्यपूर्वक करावे लागते आणि राजकारणात भ्रष्टतेचे प्रमाण जसजसे वाढते असते तसतसे या मार्गाने येणारे धर्मकारण राजकारणात अनंत समस्या निर्माण करते; याचे प्रत्यंतर सध्याच्या भारतातील राजकारणामध्ये येत आहे.
समाजाच्या धारणेसाठी जी नैतिक मूल्ये समाजाने मान्य केलेली आहेत त्यांचा उल्लेखही 'धर्म' या शब्दाने केला जातो. हिंदू, ख्रिश्चन, इस्लामी, बौद्ध या अर्थापेक्षा हा अर्थ व्यापक व सर्व धर्मांना व्यापून उरणारा आहे. ही नैतिकता केवळ राजकीय क्षेत्रातच अपेक्षित असते, असे नसून शिक्षण, व्यापार, उद्योजकता, कामगार, शेतकरी, प्रसारमाध्यमे, कला, सिनेसृष्टी, जाहिराती, क्रीडा, करमणुकीची साधने, दळणवळण, व्यवहार इत्यादी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांशी संबंधित असते. व्यक्ती व समाज यांच्या नात्यावर हे ethics लक्ष ठेवीत असते. यामधून मानवी मूल्यांची जपणूक व्हावी हा धर्माचा उद्देश असतो. सत्याचा, शब्दप्रामाण्याचा वा अहिंसेचा महात्मा गांधीजींचा आग्रह या तत्त्वांचे पालन राजकीय क्षेत्रातही व्हावे यासाठी होता. करुणा मानवता, दया इत्यादी सर्व धर्मांनी स्वीकारलेली मूल्ये राजकारणाने डावलू नयेत, ही भूमिका राजकारणधर्मकारण संबंधांवर प्रकाश टाकणारी आहे. युद्धामध्ये 'गुडघ्याखाली वार करू नये' यांसारखे नियम हेच सूचित करतात.
रामायणाच्या काळामध्ये वसिष्ठांसारखे राजगुरू राजा दशरथाला राज्यकारभारात मार्गदर्शन करणारे होते. राजा जनकाला शतानिक या राजगुरूंचे मार्गदर्शन होते. याचा अर्थ राज्यविस्तारावर, राज्यातील न्यायादी सर्व व्यवस्थांवर नीतीचा व धर्माचा अंकुश होता. दक्षिणेकडील प्रदेशांत जाताना विश्वामित्रांनी आपल्याबरोबर राम-लक्ष्मणांना दशरथाच्या परवानगीने नेले होते. वसिष्ठांच्या सल्ल्याने दशरथ त्यांना विश्वामित्रांबरोबर पाठवायला तयार होतो. दक्षिण दिग्विजयासाठी धर्मसत्ता राजसत्तेला कशी मदत करीत असते, हे यावरून लक्षात येते.
राजा जनक तर राजर्षी होता. राजा आणि ऋषी या दोन्ही क्षेत्रांतील तो अधिकारी व्यक्ती होता. तसेच शत्रूचा व दुष्ट शक्तीचा नाश करण्याचे सामर्थ्य ज्या 'शापाद् अपि आणि शराद् अपि।' या वाक्प्रचारातून रूढ झालेले आहे, त्यामध्ये या दोन्ही शक्तींच्या सामर्थ्याला असलेला वाव स्पष्ट झाला आहे. नंतरच्या ऐतिहासिक कालखंडामध्ये राजसत्ता व धर्मसत्ता यांची क्षेत्रे अलग झालेली दिसतात. शंकराचार्य, मौलवी, पोप यांच्याकडे धर्मनिर्णयाचे, धार्मिक क्षेत्रातील पापपुण्याचे अधिकार एकवटले होते. आधुनिक काळातील लोकमान्य टिळकांसारख्यांना किंवा ज्ञानकोशकार केतकरांना यासाठीच ही धर्मसत्ता प्रायश्चित्त घ्यायला लावू शकली. ऐतिहासिक काळातील एखादा रामशास्त्रींसारखा न्यायाधीश राघोबादादांसारख्या राजकारणी व्यक्तीलाही शासन सुनावू शकतो. यामध्येही न्यायक्षेत्रावर असलेला धर्माचा प्रभाव लक्षात येतो.
आधुनिक विज्ञान-यंत्रयुगाच्या प्रकाशात धर्मक्षेत्राकडे व धर्मगुरूकडे गांभीर्याने व निष्ठेने पाहण्याची गरज कमी होऊ लागली. आधीच बलहीन होत चाललेल्या धर्मगुरूंच्या सत्तेला ब्रिटिश राजवटीत अधिक हीनता व दयनीय अवस्था येऊ लागली. त्यांची राज्यकारभारातील अधिकारपदे गेली. आर्थिक सत्ता लोकांच्या अध:पतित वृत्तीने घसरणीला लागली. भारतातील विविध धर्माच्या पसाऱ्यात धर्मकारण मागे पडू लागले; पण तरीही त्याचा राजकारणातील प्रभाव वेगळ्या मार्गाने कार्यान्वित झाला; कारण भारतात मुळातच अनेक धर्माचे लोक आहेत. युरोपातील राष्ट्रामध्ये जसा खिश्चन धर्म महत्त्वाचा आहे, तसे एकाच धर्माचे छत्र भारताच्या मस्तकावर नाही. भारतात प्रत्येक धर्मानुयायाला राजकारणात स्थान द्यावे लागत होते. लोकसंख्येच्या प्रमाणात अल्पसंख्याक धर्मानुयायांचे हक्क मान्य होत होते. एकीकडे अल्पसंख्याक धर्मानुयायींना व जातींना सवलती व सूट द्यायची आणि त्याचबरोबर आपली धर्मनिरपेक्षितता जोपासायची; ही एकमेकांच्या विरोधी वाटणारी कसरत राजकारणी करीत होते. पारतंत्र्याच्या काळामध्ये ब्रिटिश सत्तेने भारतीयांच्या या धर्मानुयायांना एकमेकांच्या विरुद्ध झुंजविण्याचे धोरण राबविले. भारतातील अज्ञान, दारिद्र्य, धर्माचरणाचा पगडा व लोकांची परंपराप्रिय प्रवृत्ती यांचा फायदा घेऊन त्यांनी अगोदरच वाढत असलेली धर्माधर्मातील (व जातींमधील) तेढ वाढती ठेवण्याचे प्रयत्न केले. व्यक्तिस्वातंत्र्याचा झालेला उदयही धर्माला व समाजनैतिकतेला बाधक ठरला; यामुळे आधुनिक कालखंडात भारतात (विशेषतः महाराष्ट्रात तरी) सनातनी व पुरोगामी या दुहीमुळे समाजावर धर्मकारण व राजकारण ही दोन्ही क्षेत्रे आपापले मध्यवर्ती स्थान मिळविण्याचा प्रयत्न करू लागले.
ब्रिटिश सत्ता येण्याआधी भारतात हिंदू, मुस्लिम यांच्या राजवटी वेगवेगळ्या प्रदेशांवर अंमल गाजवीत होत्या. राजसत्ता कोणतीही असली तरी प्रजा प्रामुख्याने हिंदू होती. मुस्लिमांनी जबरदस्तीने केलेल्या हिंदूंच्या धर्मांतराने मुस्लिमांची संख्या वाढू लागली. जिझिया करासारख्या हिंदू प्रजेवर लादलेल्या एखाद्या कराचा अपवाद करता सर्व धर्मानुयायांचे प्रजा म्हणून रक्षण करण्याचे कर्तव्य मुस्लिम राजसत्ताही पार पाडत होती. त्यांच्या धर्माचरणाला मर्यादित प्रमाणात मुभा होती. त्यांच्या तंटे-बखेड्यांचे निर्णयही त्यांच्या धर्मानुसार घेतले जात. जातपंचायत किंवा पंथप्रमुखाकडे हे कार्य होते. व्यवस्थापनातील विविध पदांवरही मुस्लिम राजवटीमध्ये जनार्दनस्वामी, संत एकनाथ यांना नेमल्याची उदाहारणे आहेत. संरक्षणात रजपूत, मराठे यांच्यासारख्या हिंदू सरदारांची मदत घेतली जात असे; पण एवढे असूनही ही मुस्लिम राजवट इस्लाम धर्माचेच प्रभुत्व प्रस्थापित करीत होती. राजकारभाराला पोषक असलेली धर्मसत्ता राजसत्तेने जवळ केली होती. शिवाजीमहाराजांच्या हिंदवी राज्याचाही मुस्लिम सत्तेला विरोध होता; पण मुस्लिम प्रजेला त्यांच्याही राज्यात पूर्ण संरक्षण होते. शिवाजींचा अंगरक्षक मुस्लिम होता, हे लक्षात घेतले तर त्यांच्या राज्यांमध्ये सर्व धर्म-पंथ-संप्रदायांना असलेली मोकळीक कळू शकेल.
लोकसत्ताक पद्धतीमध्ये राजकारणाची सूत्रे निवडणुकीमुळे लोकांच्या मतांवर अवलंबून असतात. ज्या धर्माची व धर्माच्या जोडीला ज्या जातिजमातींची लोकसंख्या अधिक असेल त्यांचे नेतृत्व राजकारणात प्रभाव गाजवू शकते. विशेषतः जातिजमातींमधील तेढ राजकारणाला वेगळे स्वरूप देण्यात यशस्वी झालेली आहे. निवडून आलेले नेतृत्व समाजाच्या व्यापक हितापेक्षा स्वजातीच्या हितावर लक्ष केंद्रित करणेही स्वाभाविक आहे. आर्थिक व राजकीय क्षेत्रांमध्ये अधिकारपदे मिळविणे हे त्यांचे ध्येय असते; त्यामुळे राजकारणात उतरणारे हे रंग धर्मातील नैतिकतेला पोषक ठरतात, असे नाही. निवडणुकीमध्ये निवडून आलेला विरोधी पक्षही सत्तेतील पक्षाला कसा शह देता येईल, याचाच विचार करून प्रचार करतो. या प्रवृत्तीमुळे सर्वच पातळ्यांवर देशाची होत असलेली अवनती वेळीच रोखणे सत्तेवरच्या पक्षालाही अवघड होते. यावर भारतासारख्या देशात तरी तातडीने उपाययोजना व्हायला पाहिजे.
त्यासाठी जातिजमातींच्या हातात सोपविलेले व निवडणुकीतील गैरप्रकारांनी परिपुष्ट होत असलेले राजकारण बदलण्यासाठी सर्व जातींना वेगळ्या त-हेने व्यासपीठावर येण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल. आजच्या काळात तरी प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये कलावंत आहेत; विशेषतः साहित्यिक आहेत; विचारवंत व वैज्ञानिक आहेत. कामगार व शेतकरी, व्यापारी, डॉक्टर्स, वकील, अभियंते, मजूर अशा कर्मावर आधारलेल्या नव्या जाती शिक्षणामुळे निर्माण होत आहेत. आज तर ज्येष्ठ नागरिक संघटित होऊन प्रतिनिधित्व मागायला लागले आहेत. या नव्या जातींमध्ये जन्मदत्त असलेल्या जातीच्या आग्रही वृत्तीला फारसा थारा नसतो; म्हणूनच राजकारणाचे क्षेत्र, निवडणुकीच्या वा अन्य कोणत्या मार्गाने या वर्गाच्या हाती सोपविले तर राजकारणात येत असलेली अस्थिरता कमी होऊ शकेल व जातीचे, धर्माचे अवास्तव महत्त्व कमी होऊन राजकारण हे धर्मकारणातील नैतिकता, मानवी मूल्ये इत्यादी वैशिष्ट्यांवर आधारित होऊ शकेल. कोणत्याही त-हेने असो, पण राजकारणाने धर्मकारणाची बैठक घेतली व धर्मकारणाने राजकारणास साहाय्य केले तरच राष्ट्र व समाज मानवी पातळीवर विकास साधू शकतो.
सारांश
राजकारण व धर्मकारण ही समाजजीवनातील महत्त्वाची क्षेत्रे आहेत. ती दोन स्वतंत्र क्षेत्रे असली तरी मानवी लौकिक-व्यावहारिक व आत्मिक-मानसिक जीवनाशी त्यांचा संबंध आहे; म्हणून दोघांचा एकमेकांशी संबंध असतो. राजकारणाला असलेली नैतिक बैठक व धर्मकारणाला असलेले राजकीय सामर्थ्य समाजविकासाला पोषक असते. भारतासारख्या बहुधार्मिक देशात राजकारणाला सर्वधर्मसमानता कौशल्याने हाताळावी लागते. एकतंत्री राज्यपद्धतीत धर्मगुरूंचे किंवा राजगुरूंचे स्थान राजाइतके महत्त्वाचे होते. लोकसत्ताक पद्धतीत निवडणुकीद्वारे येणारे प्रतिनिधित्व सर्व धर्मांना संघर्ष न वाढता न्याय देणारे कसे राहील, याची दखल राजकारणाने घ्यायला हवी. सध्या जातिजमातींचे सामूहिक प्रतिनिधित्व संघर्षमय होऊ देता कामा नये. त्यावरचा उपाय म्हणजे डॉक्टर, वकील, व्यापारी, कामकरी या 'नव्या जातींचे प्रतिनिधित्व विकसित करणे' हा योग्य ठरेल.
0 comments: