Bhavartha Lekhan in Marathi : In this article भावार्थ लेखन मराठी Bhavartha Lekhan in Marathi " for students of class 5, 6, 7, 8, 9, an...
Bhavartha Lekhan in Marathi भावार्थ लेखन मराठी for Students
इ. १० वी च्या कृतिपत्रिकेमध्ये उपयोजित लेखनामध्ये भावार्थ लेखन हा नव्याने वेगळा लेखन प्रकार समाविष्ट केला आहे. सारांश लेखनाची पुढची पायरी म्हणजे भावार्थ लेखन. पूर्वी परीक्षेत परिच्छेद (उतारा) दिला जायचा. त्याचे वाचन करून सारांश लेखन करा, अशी सूचना असायची. अर्थात मूळ परिच्छेदाचा अर्थ समजावून घेऊन त्या परिच्छेदाचे सार कोणते? याचा मूळ गाभा काय आहे, हे ओळखून आपल्या शब्दात एकतृतीयांश लेखन करावे, अशी अपेक्षा होती.
भावार्थलेखन हा लेखनप्रकार यापेक्षा थोडा वेगळा आहे. सारांश लेखनासारखेच त्याचे आकलन करून, सार समजून घेऊन त्या परिच्छेदाच्या लेखनातून लेखकाच्या मनातील भाव कोणता आहे हे समजून घेऊन, तो भाव आपल्या शब्दात मांडावा अशी अपेक्षा आहे.
भावार्थलेखन नमुना - 1
माणसे पैशांचा जमाखर्च ठेवतात. खर्चाचे अंदाजपत्रक तयार करतात, मात्र वेळेच्या बाबतीत हा विवेक दाखवत नाहीत. पैसा हा खर्च होतो, तसाच तो मिळतही राहतो. प्रसंगी उसना घेता येतो, परत करता येतो, शिल्लक ठेवता येतो; पण वेळेच्या बाबतीत अशी अनुकूलता अनुभवता येत नाही. गेला क्षण जातो, तो परत येत नाही. तो कोणाकडून मागून घेता येत नाही. गेलेले आयुष्यही परत मिळत नाही. काळ हा असा एकमार्गी असतो. हे विचारात घेऊन विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी आलेल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे. वेळ कारणी लावला पाहिजे. जे केलेच पाहिजे, ते वेळेअभावी करता आले नाही, अशी हळहळ व्यक्त करण्याची वेळ जीवनात यावी का? वेळेचे गणित मांडून पाहावे.
प्राचार्य शिवाजीराव भोसले.
उत्तर : जीवनात पैशाचे मूल्य आहेच, म्हणूनच माणसे पैसा खर्च करताना खूप विचार करतात; पण पैसा खर्च झाला तरी परत मिळवता येतो, वेळप्रसंगी कोणाकडून घेऊन आपली निकड भागवता येते; पण वेळेचे मात्र तसे नाही. एकदा गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणून पैशापेक्षाही 'वेळ' खूप विचार करून सत्कारणी लावायला हवा. घड्याळाचे काटे कधीच उलटे फिरत नाहीत, नंतर पश्चात्ताप करण्यात काय अर्थ?
भावार्थलेखन नमुना - 2
पाठांतराची लाज बाळगणे हे रानटीपणाचे लक्षण आहे. मानवी प्राण्याने ज्या शक्तीचा विकास जाणूनबुजून केलेला आहे त्या शक्ती वाढत ठेवणे आणि त्यांचा वापर करणे हे प्रगतीचे लक्षण आहे. जो पुष्कळ पाठ करतो त्याच्यापुढे नाना प्रकारची ज्ञाने नेहमी हात जोडून उभी असतात आणि त्याने खूण करताच ती त्याच्या सेवेला हजर होतात. जे पाठ करत नाहीत त्यांना बारीक बारीक कामांसाठी सुद्धा कोश पाहावे लागतात, संदर्भस्थळे शोधावी लागतात किंवा कोणालातरी जाऊन विचारावे लागते. हा सर्व कालाचा अपव्यय होय आणि हे जर केले नाही तर अनिश्चित ज्ञानावर विसंबून राहून त्याला आपली विधाने करावी लागतात म्हणून लहानपणीच्या काळात वस्तू स्मृती नि बद्ध करण्याची सवय वाढविली पाहिजे. स्मृती एकदा कमावली म्हणजे ती सर्वसमावेशक आणि चिवट बनते. म्हणजे तिच्या कोशात पुष्कळ वस्तू मावतात आणि त्यांचा कब्जा ती सहसा सोडत नाही. हे भांडवल माणसाला मरेपर्यंत पुरते म्हणून नमुनेदार विद्यार्थी बनू इच्छिणाऱ्याने पाठांतराचा झपाटा कायम ठेवला पाहिजे.
उत्तर : मानवाने पाठांतराच्या जोरावर आपला विकास केला. पाठांतरामुळेच त्याच्यासमोर नाना प्रकारची ज्ञाने नेहमी हात जोडून उभी राहतात. पाठांतर नसेल तर त्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोश धुंडाळावे लागतात किंवा कोणाची तरी मदत घ्यावी लागते. त्यात वेळेचा अपव्यय होतो. म्हणून लहानपणापासूनच पाठांतराची म्हणजेच स्मृती साठविण्याची सवय लावून घ्यायला हवी. स्मृती एकदा कमावली म्हणजे ती सर्व समावेशक आणि चिवट बनते. म्हणजेच तिच्या कोशात पुष्कळ वस्तू मावतात आणि त्यांचा कब्जा ती सहसा सोडत नाही. या भांडवलावर तुम्ही आदर्श विद्यार्थी नक्की बनू शकता.
COMMENTS