Saturday, 3 August 2019

शब्द हरवले तर मराठी निबंध - Shabd Harvale Tar Marathi Nibandh

शब्द हरवले तर मराठी निबंध - Shabd Harvale Tar Marathi Nibandh

बरेच दिवस फोन न केल्याने दादा माझ्यावर रागावला. मला म्हणाला, “कारणे देऊ नकोस. गप्प बैस एक शब्दही बोलू नकोस माझ्याशी?” आणि त्याने फोन ठेऊन दिला. मला वाईट वाटले; पण त्याचे शेवटचे वाक्य मला त्यावेळी अगदी मजेशीर वाटले. खरेच एकही शब्द न बोलता माणूस कसा राहिल? हे शब्दच जर हरवले तर .....

शब्द हरवले असते तर एक फार चांगला परिणाम घडला असता तो असा की, शब्द नसल्याने माणसाला हावभाव, हातवारे करून बोलावे लागले असते. त्यामुळे रस्ता, बाजार इत्यादी ठिकाणी, गोंगाटाने होणारा त्रास झाला नसता. ध्वनिप्रदूषणापासून माणसाची सुटका झाली असती; पण शब्द नाही, म्हणजे आपल्याला हावभावांच्या माध्यमातून आशय व्यक्त करावा लागेल व यामुळे आपल्या अवतीभवती विनोदी प्रसंगांचा देखावाच जणू बघायला मिळेल.
शब्द हे दुधारी शस्त्र आहे. कटू शब्दांच्या वापराने माणसे एकमेकांपासून दूर जातात. एकवेळ शस्त्रापासून होणारी शारीरिक जखम लवकर भरून येईल; पण कटू शब्दांनी हृदयावर झालेला आघात माणसामाणसांत कायमचे वैर निर्माण करतो.

पण शब्द नसते, तर आपण खूप काही गमावले असते. शब्द ही मोठी निर्मिती आहे. शब्दांच्या साहाय्याने आपण आपल्या भावना, विचार व्यक्त करू शकतो. 'वाणी'ची अमूल्य देणगी केवळ मानवाला मिळाली आहे. मानवाच्या विकासात वाणीच्या असणाऱ्या शक्ती सामर्थ्यामुळेच माणूस श्रेष्ठ प्राणी आहे.
आज आपण भ्रमणध्वनीवर बोलतो, मग ते । कुटुंबातील सदस्य नातेवाईकांशी असो, मित्रमंडळींशी असो वा इतर काही कामासंदर्भातले बोलणे असो. जर शब्दच नसते तर आपण कसे बोललो असतो? विचारांचे आदान-प्रदान कसे झाले असते. दूरदर्शन, चित्रपट हे मूकपटच बनले असते. मुख्य म्हणजे शब्द नसते, तर लेखनकला निर्माण झाली नसती. छपाई कारखान्यांचा शोध लागला नसता. जगातील सर्व भाषांत लिहिल्या गेलेल्या थोर लेखक, कवींच्या साहित्यकृती अस्तित्वातच आल्या नसत्या. भगवद्गीता, रामायण-महाभारत, इसापनीती, अकबर-बिरबल कथा, इत्यादी साहित्यांचा, धर्मग्रंथांचा आस्वाद घेता आला नसता. ज्ञानाचा प्रचंड महासागरच जणू या शब्दांअभावी आटला असता.
हजारो वर्षांपूर्वीचा मानवाचा इतिहास शब्दांमुळे तर कळतो. शब्दांमुळे तर मानवाला आपल्या ज्ञानाचे, अनुभवाचे जतन पुढच्या पिढीसाठी करता येणे शक्य झाले आहे.

इतर अनमोल रत्नांप्रमाणे शब्द सदधा अनमोल रत्न आहे. लोकांची मने जिंकायची असतील, तर सभास्थानी मान मिळवायचा असेल, तर शब्दांची साथ-संगत हवीच हवी. आई-वडील, गुरुजनांकडून केले जाणारे कौतुक, प्रसंगी करण्यात येणारा उपदेश हे सर्व शब्दातच असते. काही कलाकृती जशा अजरामर ठरतात. तसेच काही शब्दांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला उंची प्राप्त करुन दिली. 'वंदे मातरम' 'चलो दिल्ली', 'करेंगे या मरेंगे' यांसारख्या घोषणांनी भारतीयांची अंत:करणे पेटून उठली, म्हणून शब्द हे केवळ ध्वनी नसून त्यात माणसाची सारी शक्ती सामावलेली आहे. अशा शब्दांना माणूस नाहीसे कसे होऊ देईल?

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: