स्वामी विवेकानंद निबंध मराठी मधे - Swami Vivekananda Essay in Marat चार जुलै ही स्वामी विवेकानंदाची पुण्यतिथी. 1902 मध्ये स्वामी निजधामास गेले. चाळिश
स्वामी विवेकानंद निबंध मराठी मधे - Swami Vivekananda Essay in Marathi Language
"हिंदुधर्म विश्वधर्म होऊ शकेल; कारण तो माझ्यातच सत्य आहे असे मानीत नाही तर इस्लाम, ख्रिश्चन धर्म, सर्वांमध्ये सत्यता आहे असे तो मानतो. सत्याचे बाह्य आविष्कार निराळे. आतील गाभा एकच. हिंदुधर्म ही गोष्ट ओळखतो."
स्वामी विवेकानंद निबंध मराठी मधे - चार जुलै ही स्वामी विवेकानंदाची पुण्यतिथी. 1902 मध्ये स्वामी निजधामास गेले. चाळिशी संपली तोच हा महापुरुष आपला दिव्य संदेश सांगून पडद्याआड गेला, विवेकानंदांचे मूळचे नाव नरेंद्र. विवेकानंद हे नाव त्यांनी पुढे घेतले. ते लहानपणापासून विरक्त वृत्तीचे, त्यांनी नवीन धोतर भिकाऱ्याला दिले. अति बुद्धिमान नि खेळकर, तालीम करायचे, उत्कृष्ट गाणारे नि वाजविणारे. तरुणांचे पुढारी असायचे. कॉलेजमध्ये सारे ग्रंथ वाचून काढले.
मंडळी होती. त्यांची व्याख्याने विवेकानंद ऐकत. त्यांनी या दोघांना, “तुम्ही देव पाहिला आहे का?" म्हणून विचारले. दोघांनी नकार दिला आणि याच वेळेस स्वामी रामकृष्ण परमहंसांची नि त्यांची गाठ पडली. नरेंद्राला बघताच रामकृष्णांची जणू समाधी लागली. “तुम्ही देव पाहिला आहे?" या प्रश्नाला “हो पाहिला आहे. मी तुझ्याजवळ बोलत आहे त्याहूनही अधिक आपलेपणाने मी त्याच्याजवळ बोलतो, "असे रामकृष्णांनी उत्तर दिले. विवेकानंद आरंभी पक्के नास्तिक, "Let Mr. God come and stand before me . तो राजश्री ईश्वर कोठे असेल तर त्याने यावे माझ्यासमोर. "असे ते म्हणायचे; परंतु रामकृष्णांनी त्यांच्या जीवनात क्रांती केली. निराळी साधना सुरु झाली. पुढे रामकृष्ण परमहंस देवाघरी गेले. मरावयाच्या आधी ते विवेकानंदास म्हणाले, “माझी खरी साधना मी तुला देत आहे." महापुरुषाने जणू मृत्युपत्र केले.
रामकृष्णांच्या साधनेला तुलना नाही. देव मिळावा म्हणून त्यांची केवढी धडपड! अहंकार जावा म्हणून भंगी बनले, स्त्री-पुरुष भेद जावा म्हणून स्त्रीचा पोशाख करून वावरले. एक दिवस गेला की रडत रडत देवाला म्हणायचे, "गेला एक दिवस नितू आला नाहीस." धनाची आसक्ती जावी म्हणन एका हातात माती नि एका हातात पैसे घेत नि म्हणत हीही मातीच आहे आणि गंगेत फेकीत. अशी ही अद्भुत साधना अनेक वर्षांची. परमेश्वराचा साक्षात्कार सर्व धर्माच्या द्वारा रामकृष्णांनी करून घेतला. मशिदींतही त्यांना प्रभू भेटला. चर्चमध्येही भेटला. सर्वधर्मसमन्वय त्यांनी केला. सर्व धर्म सत्य आहेत, ईश्वराकडे नेणारे आहेत, तसे त्यांनी अनुभवून सांगितले. स्वामी विवेकानंद रामनवमी, गोकुळाष्टमी या दिवशी उपवास करीत; त्याप्रमाणे पैगंबराची जयंती, पुण्यतिथी या दिवशीही उपवास करीत, हिंदुधर्म सर्व धर्माना आदरील, अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेतते म्हणाले, “हिंदुधर्म सर्व धर्माना आदरील. अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेंत ते म्हणाले, "एकं सत् विप्रा बहुदा वदंति" हे महान ऐक्यसूत्र हिंदुधर्माने शिकविले. जगात सर्वत्र द्वेषमत्सर. एकीकडे दुनिया जवळ येत आहे. तर हृदये मात्र दूर जात आहेत. अशावेळेस तुमचा सर्वांचा आत्मा एकच आहे अशी घोषणा करणारा प्रबळ पुरुष हवा होता. ही घोषणा अमेरिकेत शिकागो येथे स्वामींनी केली. या सर्व धर्म परिषदेत स्वामींची आधी दाद लागेना; परंतु एके दिवशी त्यांना संधी मिळाली.
भगव्या वस्त्रातील ती भारतीय मूर्ती उभी राहिली आणि 'माझ्या बंधू भगिनींनो." असे पहिलेच शब्द त्या महापुरुषाने उच्चारले आणि टाळ्यांचा गजर थांबेना. का बरे? त्या दोन शब्दांत कोणती जादू होती? त्यांच्या आधी जे जे व्याख्याते बोलून गेले ते सारे "Ladies and Gentlemen- सभ्य स्त्रीपुरुष हो". -अशा शब्दांनी आरंभ करीत; परंतु ही विश्वैक्याची मूर्ती उभी राहिली. सर्वत्र एकता अनुभवणारे ते डोळे, आपलीच आत्मरुपे पाहणारे ते डोळे. प्रेमसिंधूत बुचकळून वर आलेले ते शब्द! त्या दोन शब्दांनी अमेरिकन हृदय जिंकून घेतले आणि मग ते अपूर्व व्याख्यान झाले. स्वामीजी विश्वविख्यात झाले.
आणि भारताचा विजयी सपुत्र घरी आला. मायभूमीने अपूर्व स्वागत केले. विवेकानंद धर्ममूर्ती होते; परंतु त्यांचा धर्म रानावनात जा असे सांगणारा नव्हता. सभोवती दुर्दशा असताना हिमालयात कोठे जायचे? महान फ्रेंच साहित्यिक रोमारोला याने विवेकानंदांवर एक ग्रंथ लिहिला आहे. त्यांत तो म्हणतो, "Vivekanand was first a nation builder then a religious reformer" विवेकानंद हे आधी राष्ट्रनिर्माते होते, मग धर्मसुधारक होते. विवेकानंदांचा धर्म राष्ट्राची उभारणी हा होता. भारतावर त्यांचे अपार प्रेम. ते म्हणतात, "माझ्या बालपणाचा पाळणा म्हणजे ही भारतभूमी, माझ्या तरुणपणातील उत्साहाची, आशा आकांक्षांची कर्मभूमी म्हणजे भारतभूमी आणि माझ्या उतारवयातील मोक्षाची वाराणसी म्हणजे हीच भारतमाता. तिचे सारे सारे मला प्रिय आहे. ये पंडिता, तू मला प्रिय आहेस; कारण तू भारताचा आहेस आणि ये अज्ञानी बंधो, तूही ये, मला प्रिय आहेस कारण तू भारताचा. सुष्ट वा दुष्ट, ब्राह्मण वा चांडाळ, सारे सारे मला प्रिय. सर्वांना मी हृदयाशी धरीन, सर्वांवर प्रेम करीन."
भारताची दुर्दशा पाहून ते कासावीस होत. एकदा अमेरिकेत कोट्यधीश कुबेराकडे ते होते. रात्री सुंदर पलंगावर ते निजले होते. तेथले ते वैभव तो थाटमाट आणि स्वामीजींना झोप येईना. त्यांना सारखे रडू येत होते. उशी भिजून गेली. तो पलंग त्यांना निखान्याप्रमाणे वाटू लागला. ते जमिनीवर झोपले. सकाळी मित्राने विचारले, "उशी ओलीचिंब कशाने?" "मी रात्रभर रडत होतो. अमेरिकेत केवढे वैभव आणि भारतात पोटभर खायलाही नाही." ते एका पत्रात लिहितात. "आपण हिंदुस्थानात पाप केले. त्या पार्थसारथी गोपालकृष्णाच्या भूमीत स्त्रियांची, अस्पृश्यांची पशहनही वाईट स्थिती आपण केली आहे."
मागरिट ई. नोबल इंग्रजीबाई विवेकानंदांना लंडनमध्ये भेटल्या. "मी तुमच्या देशासाठी काय करु शकेन?" असे त्या ब्रह्मचारिणी विदुषीने विचारले. विवेकानंद म्हणाले, “माझ्या देशातील मायभगिनीस शिकवायला या. कलकत्यात एखादी स्त्रियांची शाळा काढा." आणि निवेदिता देवींनी कलकत्यास येऊन शाळा काढली. विवेकानंदांनी 1899 मध्ये रामकृष्ण मिशन संस्था काढली. स्वत:च्या मोक्षासाठी व जगाच्या हितासाठी ही संस्था होती. किंबहुना जगाच्या हितातच स्वत:चा मोक्ष असे ही संस्था सांगत आहे. विवेकानंद बेलूर मठात सेवेच्याद्वारा त्यांना मोक्ष हवा होता. निरपेक्ष, निरहंकारी सेवा. एकदा एक ममक्ष त्यांच्याकडे येऊन म्हणाला, “मी दारे खिडक्या बंद करतो. जप करतो. तरी देव भेटत नाही." तेव्हा ते म्हणाले, “दारे खिडक्या सताड उघडी टाक. तुझ्या खिडकीखालून रोज शेकडो प्रेते जात आहेत बघ. शहरात रोगी आहेत. त्यांची सेवा करायला जा. औषध दे. रस्ते, गटार स्वच्छ कर." स्वत: स्वामी प्लेगच्या नि कॉलयाच्या दिवसात कलकत्यात मित्रांसह सेवा करीत होते. कोणी विचारले, “पैसे खुंटले तर?" स्वामी म्हणाले, “बेलूरचा मठ विकीन. तेथील जमीन विकीन." त्यांना आसक्ती कसलीच नसे. महात्माजींनी हरिजनांनाही आश्रम देऊन टाकला. महापुरुष वृत्तीने मुक्त असतात, अनासक्त असतात, दरिद्री नारायण, हा महान शब्द प्रथम विवेकानंदांनी उच्चारला. “नारायण हवा असेल तर दरिद्र बांधवांची सेवा कर, आज नारायण दरिद्री आहे. जा त्याला सुखी कर.'
महात्माजींनी हा शब्द सर्वत्र नेला. ते जेव्हा दानार्थ हात पसरीत तेव्हा “दरिद्री नारायण के वास्ते" असे म्हणत. विवेकानंदांना रडगाण माहीत नव्हते. ज्ञान-वैराग्याचा, अगाध ब्रह्मचर्याचा तो अद्भुत पुतळा! सामर्थ्याचे ते सिंधू होते. ते सिंहाच्या छातीचे होते. ते नेहमी म्हणत, "मला एक हजार माणसे द्या. ती सिंहाच्या छातीची मात्र असू देत. मग भारताचा कायापालट करीन." "वेदांत तुम्हाला सांगतो की, तुमच्यात तो परमात्मा आहे. त्याची चित्कळा, त्याचा अंश तुमच्यात आहे. मग तुम्ही खाली मान घालून का बसता? उठा नि पराक्रम करा. हिंदुधर्मात नाना भ्रष्ट गोष्टी शिरल्या. आपण पापी पापी म्हणत बसलो. हिंदुधर्माने हे दुबळेपणाचे तुणतुणे कोठून आणले? ते मोडून तोडून फेका. 'चिदानंदरूप शिवोऽहम' ही तुमची घोषणा असू दे. नायमात्मा बलहीनेन लभ्य: दुबळ्याला कोठला आत्मा? उपनिषदांचा अभ्यास तेजस्वी बनवितो. नेभळट नाही बनवित. तुमचा स्वत:वर विश्वास आहे की नाही बोला. ज्याचा स्वत:वर विश्वास नाही त्याचा देवावर तरी कोठून असणार? रडक्या-दुबळ्या आस्तिकापेक्षा स्वत:च्या कर्मशक्तीवर जगणारा नास्तिक बरा!"
स्वामींची अशी जळजळीत वाणी आहे. ते एकदा बंगाली तरुणास म्हणाले, "तुम्हाला देव पाहिजे? जा फुटबॉल खेळा. बलवान बना, उत्साही बना. लाथ मारीन तेथे पाणी काढीन ही शक्ती हवी." स्वामीजींनी मृतवत पडलेल्या राष्ट्राला वीरवाणी ऐकवली. त्यांची कीर्ती जगभर गेली. कलकत्यात त्यांचे अपार स्वागत झाले. हत्तीवरून मिरवणूक. तो गर्दीत त्यांना बालपणाचा लंगोटी मित्र दिसला. एकदम खाली उडी मारली नि त्या मित्राला कडकडून भेटले. भारताचा मोठेपणा कशात आहे यासंबंधी ते म्हणतात, “या देशाने कधी कोणावर आक्रमण केले नाही हा या देशाचा मोठेपणा असे मला विचार करता वाटू लागते." सर्व धर्माचा, संस्कृतीचा मेळ घालणे, जगाला प्रेमधमनि राहायला शिकवणे हे भारताचे कर्तव्य आहे.
ते म्हणतात, “समता उत्पन्न करायची असेल तर विशेष हक्क नाहीसे व्हायला हवेत. हे विशेष हक्क नष्ट व्हावेत म्हणून व्यक्तीनेच नव्हे, एखाद्या राष्ट्रानेच नव्हे तर साऱ्या जगाने खटपट केली पाहिजे. पैशाचे दोन पैसे कसे करावे ही अक्कल एखाद्याच्या अंगी उपजत असणे स्वाभाविक आहे; परंतु तेवढ्याने गोरगरिबांस खुशाल तुडवण्याचा हक्क त्याला प्राप्त होतो की काय? श्रीमंत आणि गरीब यांच्यातील तेढ विकोपास जाऊ पाहत आहे.
COMMENTS