Essay on Working Parents in Marathi : In this article " आई आणि बाबा, दोघांनी नोकरी करावी का मराठी निबंध ", " working parents ...
Essay on Working Parents in Marathi: In this article "आई आणि बाबा, दोघांनी नोकरी करावी का मराठी निबंध", "working parents essay in marathi" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Working Parents", "आई आणि बाबा, दोघांनी नोकरी करावी का मराठी निबंध for Students
कुटुंब म्हणजे नागरीकरणाच्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू होय.' नवजात शिशूला माणूस म्हणून घडविण्याची सुरुवात कुटुंबातून होते. प्रत्येक मूल आपापल्या कुटुंबातून कळत न कळतपणे अनेक गोष्टी घेऊन वाढत असते. घरातल्या व्यक्तींच्या संस्कारांतून मूल घडत असते. पूर्वीच्या काळात हा महत्त्वाचा संस्कार असायचा आईचा; मात्र जग जसे बदलत गेले तसे या आईच्या भूमिकेला इतर जबाबदाऱ्यांचे पदर येत गेले.
नवनवीन आव्हाने स्वीकारताना कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषांचा सहभाग नेहमीच कुटुंबकेंद्री नव्हता.
घर म्हणजे नुसत्या चार भिंती अन् छप्पर असे नव्हे! तर घर म्हणजे कुटुंबाचा बिनशर्त पाठिंबा, नात्यांची ऊब आणि आपली हक्काची जागा.
आजच्या विभक्त किंवा एकल कुटुंबात स्वतःचे करिअर, नोकरी व मुलांची जबाबदारी एकाच वेळी समर्थपणे पेलण्याचे आव्हान जोडप्यासमोर आहे. जबाबदार पालक होण्यासाठी, मुलांना देण्यासाठी, त्यांच्याजवळ असण्यासाठी जो वेळ हवा, जे संस्कार हवेत ते देण्यात आजची कुटुंबे कमी पडतात का?
आई-बाबा ऑफिसला किंवा कामाला गेल्यावर त्यांच्या अनुपस्थितीतील 'घर' मुलांना पुरेसे संस्कारक्षम वातावरण देऊ शकते का? आणि नसेल तर कोणती पर्यायी मूल्यव्यवस्था आपण समाज म्हणून उभी केली आहे?
अनेकदा मुला-मुलींना वाईट संगत लागल्यास त्यांच्या पालकांचा हमखास उद्धार होतो; पण आजच्या रॅटरेसमध्ये अडकलेले वडील व करिअर-घर यांच्या कचाट्यात सापडलेली आई आणि अति आधुनिक जगात वावरणारी मुले आणि त्यांच्या तुलनेत त्यांच्या जगाची फारशी माहिती नसलेले त्यांचे पालक हा दुसरा वर्ग. म्हणूनच आजच्या कुटुंबातील पालकांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे.
आई आणि बाबा ही संसाररथाची दोन चाकं आहेत. मध्यमवर्गीय घरातील (स्त्री) आई घराबाहेर पडली, तीच मुळी कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा म्हणून! शिक्षण असल्याने तिला नोकरी करणे जमले. आर्थिक स्तर उंचावणे, पैसा मिळवून मुलांना उच्चशिक्षण द्यावे. पैशामुळे समाजातील प्रतिष्ठा वाढावी. (या खोट्या समजुतीमुळे!) तसेच महागाईने त्रस्त झाल्याने, स्वप्नांची उंची वाढल्याने, स्वतःला सिद्ध करावे अशा अनेक गोष्टींमुळे तिने उंबऱ्याबाहेर पाऊल टाकले. प्रत्येकाला सुखी आणि आनंदी जीवन जगायचा हक्क आहे, हे मान्य!
आईची कुटुंबातील भूमिका आतापर्यंत खूप महत्त्वाची होती आणि राहणारच आहे; परंतु आताच्या या सामाजिक बदलात बाबांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. माझ्या मुलांच्या जडणघडणीत 'माझा मोलाचा वाटा असायला हवा' ही मानसिकता निर्माण होणं आवश्यक आहे. बायकोच्या जबाबदाऱ्या, तिला समजून घेणं, तिला 'स्पेस' देणं आता पुरुषाला जमायला हवं.
निम्नवर्गातील 'स्त्री'ला/ आईला तर 'चॉइस'च नाही. कारण त्यांनी काम केले नाही तर रात्री 'चूल' पेटेल की नाही, ही शंका. कारण त्यांचे पुरुष दिवसभर कष्ट तर करतात; पण बऱ्याच जणांना वेगवेगळी व्यसनेही असतात. त्यामुळे आपल्याला 'आपल्या' घरी बायको-मुले आहेत, त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे, संसार आपला आहे. याची जाणीवही नसते.
मुलांना शाळेत घालणे, त्यांचे गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या, शिकवण्या, शाळेची फी आणि घरातील सर्वांची पोटे सांभाळणे, यासाठी ती आई निरक्षर असली तरी शारीरिक कष्ट करून आपला संसार सांभाळते. तिला 'संस्कार' शब्दच माहीत नाही.
हो पण आज आपल्या पाल्यासाठी गरज नसल्यास, उच्चशिक्षित स्त्रिया आपापल्या नोकऱ्या/करिअर सोडून घराकडे लक्ष देताना समाजात आढळतात. वृत्तपत्रांतून येणाऱ्या बातम्यांचा परिणाम समाजावर होतोच. आपल्या पाल्याचे काय चालले आहे? त्याचे मित्र-मैत्रिणी कोण? तो कोठे जातो? काय पाहतो? काय करतो? यावर एक जागरूक पालक म्हणून 'लक्ष' देता यावे हीपण गरज निर्माण झाली आहे. किशोरवयीन मुलांच्या समस्यांनी तर समाज हादरून गेला आहे. कारण काय चांगलं, काय वाईट याची समज आली नसल्यानं कितीतरी चुका त्यांच्या हातून घडतात. हे सांगणं/ समजावणं/ पटवून देणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे.
म्हणूनच आई आणि बाबा, दोघांनी नोकरी करावी का, हा प्रश्न प्रत्येक कुटुंबाने एकत्र बसून, चर्चा करून (त्यात पाल्यालाही सहभागी करून) एकमुखाने सोडवावा. तरच समाधानाने भरलेलं, आनंदी, कणखर घर आपल्याला समाजात दिसेल.
COMMENTS