Friday, 16 August 2019

माझ्या मनातील झाड / माझ्या आठवणीतले झाड

Today, we are publishing माझ्या मनातील झाड / माझ्या आठवणीतले झाड निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (माझ्या मनातील झाड / माझ्या आठवणीतले झाड) in completing their homework and in competition.

माझ्या मनातील झाड / माझ्या आठवणीतले झाड निबंध मराठी

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे' असं संत तुकारामांनी जे म्हटलं आहे ते खरंच आहे. अवती-भवतीचा निसर्ग हा आपला जीवाभावाचा सखाच असतो. 'माझ्या मनातलं झाड' ही असाच माझा जीवश्चकंठश्च सखा आहे.

माझ्या लहानपणी आम्ही महानगरपलिकेच्या कर्मचारी वसाहतीत राहत होतो. त्यामुळे शहरात असूनही आमचं घर खेड्यातल्या घरासारखं टुमदार आणि कौलारू होतं. समोर अंगण, परसदार, मागे-पुढे दरवाजे असणारं ते ऐसपैस घर होतं. आजही या घराभोवती मन रेंगाळत असतं.

घरापुढे वीसेक फूट असणाऱ्या अंगणाच्या टोकाशी घरात येण्याचे मुख्य फाटक होते. मधल्या मोकळ्या भागात झोपाळा आणि आम्हा मुलांचा प्रिय बगीचा होता. बागेत पारिजातक, तगर, जास्वंद इ. देवांसाठीची फुलझाडं तर गुलाब, मोगरा, शेवंती, अनंत इ. केसात माळण्याची फुलझार्ड होती. याबरोबरच बागेत कडुनिंब आणि पेरूचं झाड होतं, शाळा सुटली की क्लासेसच्या जंजाळात न अडकलेल्या आमचा मुक्काम या बागेत असे. फुलझाडांची फुले आमचा देव्हारा सजवत आणि ती फुलं केसात माळून आम्ही ती मिरवत असू; पण आजोबांच्या अंगाखांद्यावर लडिवाळपणे बागडावं तसं या झाडांवर बागडता येत नसे. पेरूचं झाड मात्र याला अपवाद होतं.

लहानपणी आईकडून काऊ-चिऊची गोष्ट ऐकताना, पेरूच्या झाडावर काऊ, चिऊ बरोबरच 'पोपटदर्शन'ही होत असे. यातूनच पोपटाचा हिरवा रंग, लाल चोच, त्याचे आवडते खादय 'पेरू' हे समजत गेले.

शालेय जीवनाला सुरुवात झाली अन् पेरुची फोड' हा आई-मुलांतील संवाद, पाठ्यपुस्तकात आला. त्यातील 'आईची फोड फारच गोड' या वाक्याबरोबरच पेरूचं झाडही मनावर कोरलं गेलं कारण ती फोड पेरुचीच होती.

दुपारी शाळेतून घरी आल्यावर पेरुच्या सावलीत चटई किंवा सतरंजी टाकून अभ्यास सुरू होई. सहवासातून आता आमचं नातं घनिष्ट होऊ लागलं. घरात दुपारी सामसुम झाली की या झाडावर चढण्याची आमची कसरत चालू होई. मग कधी कधी पेरूच्या फांदीवर बसून आमचं वाचन होत असे. कधी फांदीला लोंबकाळन उडी मारण्याचा खेळ आम्ही खेळत असू. आज वाटतं रवींद्रनाथांचं 'शांतीनिकेतनच' आमच्या अंगणात आम्ही अनुभवलं.

झाडाखाली अभ्यास करताना पोपटांनी अर्धवट खाल्लेले पेरू, पिकलेले पेरू यांचा शोधही चालूच असे. असे हेरलेले पेरू मैत्रिणींच्या नकळत पाडून खाणे म्हणजे अवर्णनीय आनंदाची घटना असे. असं काही घडलं की आम्हा मैत्रिणींचे रुसवे फुगवे याच झाडाच्या समोर होत. दोन दिवसांनी हा अबोला याच झाडाच्या साक्षीने सुटत असे.

'मे' महिन्यात या झाडाखाली 'भातुकलीचा' खेळ रंगत असे. याच झाडाखाली एकमेकींना चिमणीच्या दातांनी खाऊची देवाणघेवाण होत असे.

आता मात्र बाबा निवृत्त झाल्यामुळे आम्हाला ते घर सोडावं लागलं. नव्या घरात मी रुळले तरी मनाच्या एका कोपऱ्यात ते पेरुचं झाड रुंजी घालत असतं आणि मग नकळत मी गुणगुणू लागते...
त्या तरुतळी मन रेंगाळते
सय तयाची येता डोळा पाणी येते.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: