Saturday, 7 November 2020

Marathi Essay on "Rewriting History", "इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज मराठी निबंध, "इतिहास लेखन म्हणजे काय" for Students

Essay on Rewriting History in Marathi: In this article "इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज मराठी निबंध", "इतिहास लेखन म्हणजे काय मराठी निबंध" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Rewriting History", "इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज मराठी निबंध, "इतिहास लेखन म्हणजे काय" for Students

इतिहास-लेखनाचा हेतू काय? इतिहासाच्या ज्ञानामुळे आपण काही शिकतो काय? शिकतो की नाही? याबद्दल मतभेद असेल; पण 'शिकावे' हा हेतू मात्र त्यामागे असतो. मानवजात त्यामुळे अधिकाधिक लबाड्या करायला शिकत असेल, सत्ता कशी व कोणत्या मार्गाने लवकरात लवकर हस्तगत करावी हेही शिकत असेल. कदाचित एखादा महात्मा मानवजातीच्या चुकांसाठी त्यांना क्षमा कर' म्हणून हसत हसत फासावरही जाताना दिसत असेल. पण एक निश्चित 'पुढच्यास ठेच, मागला शहाणा', असे काही शहाणपण यावे हा हेतू इतिहास-लेखनास कारण असतो.

इतिहास म्हणजे राजकीय इतिहास. हा घटनांची साखळी गुंफत आपल्यासमोर उलगडत जातो. या घटना व त्या ज्यांच्या संदर्भात घडतात त्या राजकीय व्यक्तिरेखा, राजेरजवाडे, सम्राट यांच्या हर्षामर्षाच्या, रागालोभाच्या, रणांगणातील पराक्रमाच्या आणि राजवाड्यातील खलबतखान्यातील राजकारण-नैपुण्याच्या कथाच असतात; पण या कथा केवळ मनोरंजनासाठी रचलेल्या नसतात. त्या प्रत्यक्षात पृथ्वीच्या पाठीवर घडलेल्या असतात. या घडलेल्या कथा मराठीत बखरीच्या रूपाने अवतरलेल्या आहेत. पानिपतची बखर, भाऊसाहेबांची बखर, मल्हारराव होळकरांची बखर इत्यादी बखरींतून मराठ्यांच्या इतिहासातील पानिपतच्या संग्रामाचे चित्रण आलेले आहे. हा इतिहासच आहे; पण एकाच घटनेवरचा हा इतिहास, तीन भिन्न दृष्टींनी सांगितलेला आहे. पानिपतावर काय घडले हे सांगतानाच भाऊसाहेबांनी (म्हणजे सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी- सेनापतींनी) केलेला पराक्रम एका बखरीला महत्त्वाचा वाटला, तर मल्हारराव होळकरांसारख्या पेशव्यांच्या सरदारांच्या कार्यकर्तृत्वावर दुसऱ्या बखरीला लक्ष द्यावेसे वाटले. याचा अर्थ लक्षात घ्यायचा तर स्पष्टच आहे. इतिहासकार कुणाच्या तरी आज्ञेने व 'कुणासाठी तरी' इतिहासलेखन करीत असतो. शिवाय घडलेल्या घटनांकडे बघण्याची त्यांचीही खास दृष्टी व भूमिका असते; यामुळे ते रंग वास्तवामध्ये मिसळून इतिहासलेखन होत असते.

आजही आपण जो इतिहास शिकतो आणि शिकवितो तो अशा घटनांना विशिष्ट तर्कसंगत साखळीत गुंफून सांगितला जातो. तो गतकाळाचा आलेख आहे. बखरी गेल्या तरी सत्ताधीश आहेतच. या सत्ताधीशांच्या दृष्टिकोनांचे रंग इतिहासाच्या घटनांवर चढाओढीने असतातच. तत्कालीन समाजातील सत्ता गाजवणाऱ्या मान्यवर वर्गाच्या कर्तबगारीचा हा इतिहास असतो. ऐतिहासिक घटनांचा अन्वयार्थ लावताना त्या वर्गाची सजग दृष्टी व संस्कृती त्यामधून प्रकटत असते. आज कदाचित ते अन्वयार्थ गैरसमजुतीवर आधारलेले व मुद्दाम पसरविलेले वाटत असतीलही. उदाहरणार्थ- ब्रिटिशांच्या राज्यातील पारतंत्र्याच्या काळात भारतीय इतिहासलेखन कसे व कोणत्या दृष्टीने झाले आहे, हे पाहण्यासारखे आहे. भारतातील राज्यकर्त्यांना राज्य करण्याची व राजकारणाची काहीच समज नव्हती. त्यांच्यामध्ये ना कोणी राजकारणी, ना कलासक्त सम्राट, ना स्वसंरक्षणाची बलदंड सेना, असे चित्र ब्रिटिशांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या इतिहासातून वाचायला मिळते. नवल म्हणजे हे इतिहासलेखन करणारेही भारतीयच आहेत. पण ते ब्रिटिशांच्या वैशिष्ट्यांनी भारावलेले आणि दिपून गेलेले आहेत. म्हणून १८५७ चे झांशीच्या राणीचे ब्रिटिश सत्तेविरुद्धचे युद्ध हे ब्रिटिशांनी 'बंड' म्हणून रेखाटले. तेच 'बंड' भारतातील स्वातंत्र्यवीरांना 'लढा' वाटले. आज स्वतंत्र भारताचा इतिहास पाहताना त्याच घटना स्वातंत्र्याच्या म्हणून किती व कशा महत्त्वपूर्ण आहेत, हे सांगण्याची गरज इतिहासकारांना वाटत आहे. विजयनगरचे साम्राज्य असो, नाहीतर (दिल्लीच्या तख्तावरच्या मोगल साम्राज्याच्या रक्षणासाठी) पुण्याहून पानिपतावर लढण्यासाठी आलेले पेशव्यांचे मराठी सैन्य असो, त्यांचे हेतू ब्रिटिशांनी सांगितलेल्या हेतूंपेक्षा आज स्वातंत्र्योत्तर काळात वेगळे आहेत, हे जाणवायला लागले आहे. चंद्रगुप्त मौर्यांचे साम्राज्य ज्या चाणक्याच्या बुद्धिमत्तेने उभे केले, त्याचे राजकारणातील स्थान आज महत्त्वाचे वाटते आहे. घडून गेलेल्या घटना त्याच असतात; पण ज्या कालखंडात त्यांच्याकडे पाहिले जाते तो कालखंड, त्या कालखंडाची गरज व तेव्हाचा सत्ताधीश वर्ग यांचा प्रभाव त्या इतिहास-लेखनावर पडलेला असतो; म्हणून इतिहासाकडे पुनःपुन्हा वळून पाहण्याची गरज असते. त्याच घटनांचे वेगळे अन्वयार्थ, वेगळ्या कालखंडांत उलगडायला लागतात; वेगळ्या जाणवायला लागतात. पूर्वी जाणवलेल्या इतिहासापेक्षा 'नवा' इतिहास जाणवायला लागतो. अशी ऐतिहासिक कालखंडामध्ये पुनःपुन्हा वळून पाहणारी दृष्टी इतिहासाच्या पुनर्लेखनाला प्रवृत्त करीत असते.

औरंगजेबाने मराठ्यांच्या राजाला संभाजीमहाराजांना, कपटाने पकडल्यानंतरच्या इतिहासाकडे बघण्याची अशीच नवी जाणीव, त्या इतिहासाचे पुनर्मूल्यमापन करणारी आहे. या काळात 'राजारामाला' जिंजीला ठेवून मराठी सरदारांनी एक प्रमुख नेता नसतानाही औरंगजेबासारख्या बलाढ्य सम्राटाशी झुंज दिली आणि मराठी राज्य वाचविले, असे इतिहास सांगतो. ते खोटे नाही. पण याच काळात 'राजारामा'सारखा राजा जिंजीला असला तरी त्याची पत्नी राणी ताराबाई राजकारणधुरंधर होती. तिच्या मार्गदर्शनाखाली मराठी सैन्याने आपली गनिमी नीती अवलंबून राज्यरक्षण केले. तिच्या नेतृत्वाखाली 'गवताला भाले फुटले'. शिवाजीमहाराजांच्या धाकट्या सुनेचा, ताराबाईचा हा पराक्रम इतिहासाच्या जेव्हा लक्षात आला तेव्हा या कालखंडात मराठी सैन्यास नेतृत्व नव्हते हे म्हणणे सोडून द्यावे लागते.

तीच गोष्ट मल्हाररावांच्या सुनेबद्दलची, अहिल्याबाई होळकरांबद्दलची. तिच्या राजकारण-कर्तृत्वापेक्षा तिने ठायी ठायी भारतभर बांधलेल्या पाणपोया व मंदिरांचे जीर्णोद्धार यांवर लक्ष केंद्रित केले जाते व तिला धर्मभोळी ठरविली जाते; पण त्याचबरोबर तिच्या काटेकोर हिशेबीपणाचे कौतुक होत नाही. राज्याचे सर्व आर्थिक व्यवहार तिने पूर्णपणे आपल्या हातात ठेवले होते. तिचा कारभार अत्यंत पारदर्शी होता, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. "दौलतीच्या जमेतील एक कवडी मजकडे हिशेबी लागली तर एका कवडीच्या पाच कवड्या देईन." या उल्लेखावरून तिच्या आर्थिक व्यवहाराची कल्पना येते. विशेषतः त्या काळातील आर्थिक भ्रष्टाचाराचे चित्र शिंद्यांकडे असलेल्या फ्रेंच अधिकाऱ्यांच्या पत्रावरून जे व्यक्त झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर अहिल्याबाईंचा हा आर्थिक स्वच्छपणा लक्षात घेण्यासारखा आहे. सर्वच प्रश्न युद्धाने सुटत नसतात, ही दृष्टी असल्याने चंबळखोऱ्यातील रामोशी-गोंडांचा त्रास तिने कसा कमी केला हेही तिच्या राजकारणी दृष्टीचे द्योतक आहे.

ऐतिहासिक घटनांकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची ही प्रवृत्ती पुनर्लेखनास प्रवृत्त करते. हे पुनर्लेखन म्हणजे 'वास्तवतेचा, खऱ्या इतिहासाचाच शोध असतो. राजकारणी सत्ताधीशांना ज्या गोष्टी लोकांसमोर यायला नको असतात, त्या सफाईने डावलण्याची, नाकारण्याची प्रवृत्ती सत्ताधीशांच्या आज्ञेने लिहिलेल्या इतिहासाची असते; पण जेव्हा सत्ताधीश बदलतात तेव्हा त्यांनी दडवून ठेवलेल्या घटना लक्षात घेण्याची दृष्टी व स्वातंत्र्य इतिहासकारांजवळ येते. या दृष्टीने ब्रिटिशांनी मराठ्यांचा पराभव करताना दडवून ठेवलेल्या काही घटनांवर आजचे इतिहासकार प्रकाश टाकू शकतात. पुण्याजवळच्या वडगाव-मावळच्या लढाईत महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली सन १७७९ सालच्या मकर-संक्रांतीच्या दिवशी ब्रिटिश फौजांचा पराभव करून मराठ्यांनी ब्रिटिशांना लेखी शरणागती पत्करण्यास भाग पाडले. मराठ्यांनी, टिपू सुलतानांनी आणि रणजितसिंगांनी ब्रिटिशांचा दणदणीत पराभव करून त्यांना शरणागती पत्करायला लावली होती. हे कर्नल (निवृत्त) अनिल आठल्ये यांचे संशोधन ब्रिटिशांनी भारतीयांसमोर रेखाटेलल्या भारतीयांच्या इतिहासापेक्षा वेगळे आहे. नुसतेच वेगळे आहे असे नाही तर वास्तव आहे. पण हा स्फूर्तिदायी इतिहास तेव्हाच्या भारतीयांसमोर येणे ब्रिटिशांना परवडणारे नव्हते; म्हणून कोणतेही जेते राष्ट्रजित्यांचा जिताजागता इतिहास जसा दडपून टाकू पाहतो, तसेच ब्रिटिशांनीही केले. त्यातल्या त्यात ब्रिटिशांनी गुरख्यांच्या व शिखांच्या शौर्याचे कौतुक केले; पण ज्या मराठ्यांना हिंदवी स्वराज्याची व भारतीय राष्ट्राची संकल्पना साकार करायची होती, त्या मराठी सत्तेच्या शौर्याचे कौतुक ब्रिटिश सत्तेने करणे सुतराम शक्य नव्हते.

ब्रिटिश सत्तेने जमविलेल्या माहितीशिवाय इतिहासविषयक वेगळे संदर्भ आपल्याकडच्या इतिहासकारांजवळ 'फारसे नव्हते. पोर्तुगीज, डच यांच्या दफ्तरांच्या अभ्यासाकडे आपल्या इतिहासाने नजर वळविली नाही; म्हणूनच जेव्हा आपण पेशवे-दफ्तरादी त्या काळातील अन्य दफ्तरांचा सखोल अभ्यास व संशोधन करू लागतो तेव्हा ब्रिटिश सत्तेने उजेडात न येऊ दिलेला इतिहास उलगडू लागला आहे. शिंदेंच्या सैन्यात सर्व जातिजमातींचे सैनिक होते. त्यांना युद्धकाळातील त्यांच्या टेहळणीविषयक कामगिरीमुळे खास वतनेही दिली गेली होती.

लष्करी तंत्रज्ञानात होत असलेला बदलही महादजी शिंदेंनी ओळखला होता. आपले सामर्थ्य ओळखून महादजींनी बोरघाटातील युद्धामध्ये वेगळी युद्धनीती अनुसरली. मराठ्यांनी वापरलेल्या रॉकेट्सचा उल्लेख ब्रिटिश कागदपत्रांत तर आहेच, पण ब्रिटिशांनी याच रॉकेट्सचा अभ्यास करून त्यांचा वापर अमेरिकनांविरुद्धच्या सन १७८० च्या लढाईत केला होता, हेही स्वतः ब्रिटिशांनीच लिहून ठेवले आहे; त्यामुळे सर्वच तंत्रज्ञान पाश्चात्त्यांकडून आपण आयात केले आहे, हा आपला न्यूनगंड कमी व्हायला हरकत नाही. ही रॉकेट्स बनविण्याचा कारखाना पुण्यात होता. शिंदेंनी अशा रॉकेट्सचे महत्त्व ओळखून त्यांचे कारखाने उज्जैनी, ग्वाल्हेर अशा ठिकाणीही काढले होते. अशा रॉकेट्सचा उपयोग करून, बोरघाटाच्या भौगोलिकतेचा अभ्यास करून अवलंबिलेल्या युद्धनीतीने ब्रिटिशांना महादजींनी जर्जर करून सोडले. त्या वेळी भारतात अधिक सैन्य पाठविण्याची ब्रिटिशांची ताकदही नव्हती. त्यात वडगावहून पुढे जाऊन मुंबईपर्यंत धडक मारली असती तर कदाचित मराठ्यांचा व देशाचाही इतिहास बदलला असता,' ही गोष्ट जेम्स् डग्लसने सन १८०९ मध्ये लिहून ठेवली आहे. इतिहासाला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या या वडगावच्या पराभवाची स्मृतीही राहू नये, म्हणून स्टुअर्टचा उदोउदो करण्यावर ब्रिटिशांनी भर दिला.

इतिहासाचा हा अपलाप करण्यामागे जेत्यांची भूमिका जितांना सर्वतोपरी नाउमेद करण्याची असते; आपले वर्चस्व वाढविण्याची दृष्टी असते. सत्तेच्या जोरावर 'सत्य' लपवून ठेवण्याचा हा प्रयत्न पुनर्लेखनाने उधळून लावता येतो.

इतिहास घडविणारे समाजातील सर्व लोक असले तरी इतिहास घडविण्याचे श्रेय प्रामुख्याने अभिजनांकडे, समाजातील वरिष्ठ-सुसंस्कारितांकडे जाते. इतिहास-लेखनाचे व त्याचा अन्वयार्थ लावण्याचे कार्य हाच बुद्धिमान वर्ग करीत असतो. शिक्षणाचे वा सुसंस्कार करण्याचे कार्य हा वर्ग करीत असतो. पुष्कळदा, समाजाची जडणघडण ठरविण्यामध्ये या उत्तम वर्गाचा महत्त्वाचा सहभाग असतो; त्यामुळे लिहिल्या गेलेल्या इतिहासामध्ये या वर्गाच्या चालीरीती, श्रद्धा-समजुती, रहनसहन यांचेच चित्रण असते. पण कोणत्याही काळात सर्व थरांतील चांगले-वाईट, गरीब-श्रीमंत, भले-बुरे, सालस-दुष्ट अशा सर्व प्रकारचे लोक असतात; म्हणूनच इतिहासात त्यांचे प्रत्यक्ष चित्रण नसले तरी त्यांचे अस्तित्व असते आणि त्यांच्या जीवनाचा व जीवनसरणीचा प्रभाव इतिहासातील घटनांवर पडलेला असतो. राजमहाल एकदम उभे राहत नसतात आणि एकाएकी कोसळतही नसतात. त्या घटनांमागे समाजातील या विविध थरांमधील ज्ञात-अज्ञात घटना कारणीभूत असतात. पण पुष्कळदा याचे भान इतिहासकारांना येत नाही. हे भान जेव्हा येते तेव्हा इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज भासते.

इतिहासाचा नव्याने अर्थ लावताना कधी कधी त्याचे उदात्तीकरण करण्याकडे असलेला कलही घातक असतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. आज 'हिंदुत्वा'चे असेच उदात्तीकरण होत आहे. मुद्दाम केले जात आहे, असे काही राजकीय पक्षांना वाटत आले. भारतीयांच्या एकत्रीकरणासाठी कधी कधी अशा भूतकाळाच्या उदात्तीकरणाची गरजही असते. पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काल।' अशा श्रद्धा भारतीयांच्या पराक्रमाला जागृती आणण्यासाठी उपयुक्त ठरत असतील तर ते उदात्तीकरण व्यर्थ नाही, असे म्हणावे लागते. उदात्तीकरण वास्तव की अवास्तव यापेक्षाही त्यामागचा उद्देश कोणता ही गोष्ट तितकीच महत्त्वाची असते. उदाहरणार्थअनेक रजपूत राजांनी राजकीय फायद्याकडे लक्ष ठेवून धर्मांतर केले; आपल्या घराण्यातील राजकन्या मोगलांच्या घराण्यात दिल्या. अशा वैयक्तिक फायद्याकडे पाहूनही काही घटना घडत असतात. त्यांना किती महत्त्व द्यायचे हे लक्षात घ्यायला पाहिजे. कधी कधी अशा घटनांचे वेगळे अर्थही लावले जातात. पुष्कळदा इतिहासातील 'सत्य' प्रत्यक्ष इतिहासातील घटनांपेक्षा त्यामागील प्रवृत्तीवरून कळत असते.

आज राजघराणी राहिलेली नाहीत. त्याऐवजी लोकसत्ताक राज्यपद्धती रूढ झालेली आहे. याचा इतिहास लिहिताना तरी घराणेशाहीचा पराक्रम सांगण्याची इतिहासाची पद्धती बदलून घ्यायला पाहिजे. हा इतिहास त्या समाजाच्या सर्व घटकांना कवेत घेणारा असला पाहिजे. राजकीय घटनांना केंद्रिभूत ठेवून रचलेल्या इतिहासातही सामाजिक यंत्रणा, विविध धर्मसंप्रदायांचा आणि विविध वंशजातींचा सहभाग कळू शकला पाहिजे. विशेषतः भारतासारख्या अनेक संस्कृतींनी घडवलेल्या संस्कृतीच्या देशात तर सर्वधर्मीय सहिष्णुतेचा मूलगामी दृष्टिकोन बाळगून इतिहासाकडे बघण्याची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणावर आहे. जातिजातींमधील विसंगती, विसंवादी सूर व एकमेकांवर केले जाणारे अन्याय याचा अर्थ व उगम कशात आहे, याचे आकलन त्याद्वारा होऊ शकेल आणि त्यामुळे कदाचित ही समस्या सोडविण्याचा मार्गही दिसू शकेल. मार्ग अनुसरण्यातील अडथळे काही प्रमाणात तरी दूर करता येऊ शकतील; पण पुष्कळदा राष्ट्रवादी आणि जातिवादी नेमके उलट दिशेला जाऊन समस्या अधिक जटिल व बिकट करून टाकतात.

भारताचा इतिहास लिहिणे हे अत्यंत अवघड काम आहे. आर्य, अनार्य, आदिवासी, मुस्लिम, मोगल, अहिर, पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश अशा अनेकांनी इथे राज्ये केली आहेत. महाभारताच्या काळात तर यक्ष, किन्नर, गंधर्व, असुर, दस्यू, राक्षस, देव अशा अनेकांच्या एकत्र वसाहतींनी भारताचा राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी प्रकारचा इतिहास घडविलेला आहे. जातिजमातींनी निर्माण केलेला दृष्टिकोन आणि इतिहासाचा नेमका अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वसमावेशक व्यापक दृष्टी व उदारवादी भूमिका ठेवून इतिहासातील घटनांकडे बघता आले पाहिजे. भारतीय समाजाचा आर्थिक पातळीवरचा इतिहास लिहायचा असेल तर त्यासाठी धार्मिकतेच्या आघाड्यांना शह द्यावा लागतो; कारण अर्थदृष्टी धर्म, पंथ, संप्रदाय यांच्यात गुंतलेली आहे. व्यवसाय कोणता करायचा, हे जातीशी संबंधित होते. पोशाख, चालीरीती यांचा संबंध धर्मजातींनी बंदिस्त केलेला होता. हे 'अठरापगड जाती' (म्हणजे अठरा जातींच्या अठरा प्रकारच्या पगड्या होत्या.) या शब्दप्रयोगावरून स्पष्ट होत होते. राजवटीच्या संदर्भात पाहता राज्यकर्ते हिंदु असोत किंवा मुस्लिम, गरीब प्रजेच्या स्थितीत फारसा बदल नव्हता. मग ती प्रजा हिंदू असो किंवा मुसलमान असो. भारताचे राजकारण धर्मावर अधिष्ठित आहे असे वाटत असले तरी त्याची बैठक आर्थिक आणि राजकीय फायद्यांशी अधिकतेने निगडित आहे; म्हणून पूर्वी सांस्कृतिक-सामाजिक दृष्टीने भारतात हिंदु-मुस्लिम एकत्र नांदताना दिसतात. ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक मुस्लिमांना त्यांच्या वेगळेपणाची जाणीव करून दिल्याने व त्यांना अल्पसंख्याक म्हणून वेगळी वागणूक दिल्याने आज ते स्वतःला हिंदूंपासून भिन्न मानतात. पण अजूनही कोकणात हिंदूंच्या घराला लागून मुस्लिमांची घरे आहेत. एकमेकांत सलोख्याचे संबंध आहेत. एवढेच कशाला मुस्लिमांच्या पीराला हिंदू भजतात, नवस करतात. शहाजी व शरीफजी यांचा जन्म पीराला नवस करून झालेला आहे. शिवाजीमहाराजांच्या अंगरक्षकांमध्ये एका मुस्लिमाचा समावेश होता. अहमदनगरसारख्या राजकीय दृष्टीने नेहमी महत्त्वाचे स्थान असलेल्या मुस्लिमांच्या राजधानीच्या शहरात हिंदूंची देवळे, मुस्लिमांच्या मशिदी आणि आता ख्रिश्चनांची प्रार्थनामंदिरे (चर्च) एकमेकांना लगटून उभी असलेली दिसतात. भारताचा इतिहास पाहताना ही समन्वयाची दृष्टी समजून घेऊन नव्या भूमिकेतून व नव्या दृष्टीने इतिहासातील घटनांकडे बघण्याची आज खरी गरज आहे. शीख, पंजाबी, बंगाली, कन्नड, गुजराती यांनी पूर्वी देशाची संस्कृती घडविण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तसेच प्रत्येक भागातील जाती व उपजाती यांच्यामध्ये स्पर्धा व विरोध असला तरी त्यांच्यातील एकसंधता जपणे भारताच्या संस्कृतीच्या उत्कर्षासाठी आवश्यक आहे; कारण घडलेल्या इतिहासातून भविष्यकाळाच्या यशाची व एकतेची वाटचाल नजरेसमोर ठेवून भारताचा इतिहास पुनर्लिखित करता आला पाहिजे.

आज भूगर्भशास्त्र, भूचिकित्साशास्त्र विकसित होत आहे. वेगवेगळ्या प्रदेशांतील उत्खननाच्या आधारे अनेक नवे शोध लागत आहेत. मोहेंजोदडोचे उत्खनन असो किंवा नेवाशाचे उत्खनन असो, यांमध्ये मिळालेल्या विविध प्रकारच्या वस्तूंमुळे तेव्हाच्या जीवनमानावर प्रकाश पडत आहे. उदाहरणार्थ- राजस्थान हा प्रदेश वैराण वाळवंटाचा समजला जातो; पण नुकत्याच तिथल्या उत्खननामध्ये जमिनीच्या कितीतरी खालच्या भागामध्ये पावसाच्या प्रदेशात आढळतो तसा दगड आढळला आहे. याचा अर्थ, पूर्वी या प्रदेशात पावसाचे प्रमाण चांगले होते. कोणत्या तरी भौगोलिक कारणाने हा प्रदेश आज मात्र कमी पावसाचा बनला आहे. उत्खननामुळे अशा रूढ व प्रचलित समजुती बदलाव्या लागतात. सिंधू, गंगा, गोदावरी या नद्या अनेकदा प्रवाह बदलतात; त्यामुळे त्यांच्या किनाऱ्यावरील शहरे पाण्याखाली गेलेली आढळून येतात. गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या पैठणात (पूर्वीचे प्रतिष्ठान) अशीच एकाखाली एक सात शहरे दडपली गेलेली आढळून आलेली आहेत. या शहरांच्या घेतल्या गेलेल्या शोधांमधून सर्वसामान्य माणसाच्या चालीरीती, आवडीनिवडी, छंद, फॅशन्स या गोष्टी कळू शकतात. त्यातही लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा कळणारा इतिहास समाजातील सर्व थरांचा असतो. केवळ राज्यकर्ते, केवळ समाजातील उत्तम वा अधम वर्ग यांच्यापुरता सीमित नसतो. उत्खननशास्त्राच्या आधारे केवळ घटनात्मक इतिहासच कळतो असे नाही, तर इतिहासातील अनाकलनीय वाटणाऱ्या त्रुटीही कधी कधी त्यांनी भरून निघतात; समाजातील तत्कालीन व्यापार-उदिमाबद्दल कल्पना येते. कोणकोणत्या जातिजमाती, वंश,घराणी यांचे ताफे इथे येऊन हा नवा एकसंध समाज घडला आहे, याचा तपास लागू शकतो.

इतिहासात सारखी भर पडत आहे. नवे नवे शोध लागून ऐतिहासिक घटनांचा वेध घेण्याची माणसाची शक्तीही विकसित होत आहेच. या नव्या दृष्टीने दाखविलेली जुनी सृष्टीही वेगळी असू शकते. याचा प्रत्यय रामायण किंवा महाभारत, पुराणे यांच्यासारख्या साहित्याच्या संदर्भातही घडत आहे. रामायणातील रामाचा वनवास म्हणजे आर्यांचा जाणूनबुजून केलेला दक्षिणेतील प्रवेश आहे. आधी ऋषि-मुनी जातात, आश्रम उभारतात, मग त्यांच्या रक्षणाच्या निमित्ताने क्षत्रिय येतात; तेथील छोट्या वानरांसारख्या जमातींची मदत घेतात आणि बलाढ्य रावणाला पराभूत करतात. हा इतिहास रामायणामधून कथेच्या माध्यमातून सांगितलेला दिसून येतो. हे साहित्यातून जाणवणारे स्वरूपही इतिहासाला नवी दृष्टी देते व अशा सूचना लक्षात घेऊन इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता स्पष्ट होते.

कथा-कादंबरीसारखे ललित साहित्य हे व्यक्तिसापेक्ष असते; पण इतिहास-भूगोलासारखे शास्त्रीय लेखन हे विषयनिष्ठ असते, असावे अशी भूमिका इतिहास-लेखनामागे असते. 'जे जसे घडते ते तसतसे सांगणे' म्हणजे इतिहास, हे मान्य केले तरी शेवटी लेखन करणारी, तपशील गोळा करणारी, त्याचा विशिष्ट परिस्थितीमध्ये अन्वयार्थ लावणारी, एक संशोधक वृत्तीची चिकित्सक दृष्टी बाळगणारी व ज्ञानाची व्यापक बैठक असलेली व्यक्तीच असते. इतिहासकार राजवाडे, इतिहासकार सरदेसाई इत्यादी अलीकडच्या इतिहास-लेखनाची विषयनिष्ठता जाणणारी व जपणारी इतिहासतज्ज्ञ माणसेही शेवटी शास्त्राभ्यासाने जाणवलेले स्वतःचे मत आपल्या इतिहासलेखनाद्वारे मांडत असतात. ते त्यांचे मत एकाच घटनेने ठरलेले नसते. अनेक घटनांच्या संशोधनाने ते मत त्यांच्या मनात सिद्ध झालेले असते. उदाहरणार्थ- मराठ्यांच्या पराभवाची मीमांसा करताना कुणाला त्यांच्यातील फंदफितुरी हे कारण वाटले, तर काहींनी वारकरी समाजाने आध्यात्मिकतेच्या नावाखाली समाजाला निष्क्रिय बनविले, त्याचा हा परिणाम होय, असा निष्कर्ष काढला.राजवाडेंसारख्या भाषाशास्त्र, समाजशास्त्र, संतपरंपरा, महाराष्ट्रातील विविध संप्रदाय, वैदिक साहित्य इत्यादींचा व्यासंग असलेल्या इतिहासलेखकाला वारकऱ्यांबद्दल जाणवणारे मत नंतर संशोधनाअंती बदलावेसे वाटले. या घटनेमागची कारणमीमांसा करताना नव्या अभ्यासाने व इतिहासाव्यतिरिक्त इतर शास्त्रांच्या अभ्यासाने नवी दृष्टी येते व इतिहासातील घटनांचे स्वरूप बदलूनही टाकते, हे स्पष्ट होते.

ज्या समाजाचा व ज्या देशाचा इतिहास लिहावयाचा त्या समाजाविषयी व त्या देशाविषयी इतिहासलेखनाची वृत्ती शत्रुत्व-ममत्व यांपैकी एकीकडे झुकलेली असेल तर घटनांचे रंग त्या त्या भावनेने माखलेले असतात. रामदास-शिवाजीमहाराजांच्या भेटीबद्दल मतमतांतरांमध्ये असाच ब्राह्मण-मराठा (त्यातही क-हाडे-कोकणस्थ) जातीच्या अभिमानाचा भाग उगाचच संशोधनावर वेगवेगळे रंग उमटविताना दिसतो. अर्थात, यावरून इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या काळातील समाजदृष्टीही कळते. 

भाषाशास्त्रविषयक अभ्यास किंवा लोकसाहित्याचा प्रभाव यांमुळेही इतिहासातील घटनांचे स्वरूप बदलत जाते. भाषासंशोधनाच्या आधारे आर्यांच्या मूळ वसतिस्थानाचा शोध किती वेगवेगळी स्थाने सुचवितो हे पाहण्यासारखे आहे. कुणी उत्तर ध्रुव, कुणी मध्य आशिया तर कुणी सरस्वती नदीचे तीर. तीच गोष्ट लोकसाहित्याच्या संदर्भातही! औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेले शिवाजीमहाराज कसे पळाले हे इतिहासाला ज्ञात नाही. 'पेटाऱ्यातून पळाले' ही लोकसाहित्याने प्रचलित केलेली गोष्टच वास्तव म्हणून धरली जाते. एवढेच कशाला, 'रामायण' हा इतिहास आहे; पण या रामायणात नसलेल्या 'सीतास्वयंवर' व 'अहिल्याशिळा राघवे उद्धरिली' यांसारख्या घटना रामायण-लोककथेने रूढ केल्या आहेत.

इतिहास एकदा सांगितला म्हणजे तो तसाच्या तसा न बदलता स्वीकारणे योग्य नसते; तर त्याच्या पुनर्लेखनाची गरज प्रत्येक काळात, वेगवेगळ्या कारणांनी जाणवत असते, हे यावरूनच स्पष्ट होते. कधी त्या घटनाच काल्पनिक आहेत असे नवे संशोधन सांगत असते, तर कधी त्या घटनांमागची कारणमीमांसा वेगळी आहे, हे जाणवते. कधी कालमानाप्रमाणे इतिहासाकडून नवे आदर्श हवे असतात; कधी जुने प्रघात नष्ट करायचे असतात; कधी इतिहासकाराला स्वजाती-वंशाचा अभिमान त्यातून जाणवत असतो. इत्यादी अनेक कारणांनी इतिहास हा पुनर्लेखन करायला माणसाला प्रवृत्त करीत असतो. कधी कधी बखरीसारखा वाङ्मय-प्रकार इतिहास-कथन कथा-कादंबऱ्यांसारखे रंगवून सांगण्याची प्रथा पाळत असतो. लालित्याच्या पसाऱ्यातून नेमके इतिहासदर्शन घडविण्याची बखरकारांची प्रतिभा तेव्हाच्या वाचकांना- हा वाचकवर्ग प्रामुख्याने दरबारीच आहे- उलगडत असेल. (आजच्यासारखा इतिहास हा सर्वसामान्यांचा विषय पूर्वीच्या काळी नव्हता.) तोच इतिहास आजच्या पद्धतीने सांगताना बखरीपेक्षा थोडा बदलतही असेल. कालपरत्वे इतिहास-पुनर्लेखनाची पद्धती व गरज बदलती असू शकते; पण इतिहास घडत असतो. त्याचे अन्वयार्थ असे सुचत असतात; म्हणून इतिहास-पुनर्लेखन फायद्याचे ठरते. राष्ट्र व समाज यांच्यासाठी ते उपयुक्त असते. 

सारांश

घडलेल्या राजकीय घटनांची व व्यक्तींची अन्वयार्थ लावत केलेली जंत्री म्हणजे 'इतिहास' होय. घडलेल्या घटनांकडे बघण्याचे दृष्टिकोन जितके वेगवेगळे, तेवढे त्या घटनांचे अन्वयार्थ लावले जातात. भारताच्या विशेषतः मराठ्यांच्या इतिहासाला सत्ताधीश ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक कमीपणाचा रंग दिलेला आढळतो. जित राष्ट्राकडे पाहण्याची जेत्या राष्ट्राची दृष्टी त्यामुळे प्रकर्षाने ज्यांना जाणवली त्यांनी त्या घटनांचे पुनर्मूल्यमापन करून व नवे संशोधन करून इतिहासलेखन नव्याने केले. पुनर्लेखन हा वास्तवाचा शोध असतो. त्याला कधी कधी उदात्तीकरणाची दृष्टीही कारणीभूत झालेली असते. इतिहासाकडून वर्तमानातील वर्तनात सुधारणा होऊन भविष्य घडविण्याचाही प्रयत्न पुनर्लेखनामागे असू शकतो. . भारताच्या इतिहासलेखनाचे काम अवघड आहे. इथे अनेक संस्कृती राज्य करून गेलेल्या आहेत. सर्वसमावेशक भूमिका घेऊन व उदारमतवादी दृष्टीने इतिहास लिहितानाही धार्मिकतेचा अर्थकारणावर व राजकीय घटनांवर असलेला प्रभाव विसरता येत नाही. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन इत्यादींचे नेमके संबंध कोणत्या काळात कसे होते, हे घटनेच्या आधारे उलगडून सांगताना संशोधनाची अधिक गरज आहे हे जाणवते. उत्खनन, भूगर्भशास्त्र वा अन्य क्षेत्रांतील संशोधनाने इतिहासाला नवे वळण मिळत असलेले दिसून येऊ लागले आहे. कोणत्याही मार्गाने नवी दृष्टी आली की जुनी सृष्टी वेगळीच दिसायला लागते; म्हणून पुनर्लेखन आवश्यक ठरते.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: