Saturday, 10 October 2020

Marathi Essay on "Importance of Newspaper", "वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा मराठी निबंध", "वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध" for Students

Marathi Essay on Importance of Newspaper: In this article "वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध", "वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा मराठी निबंध", "Vruttapatra Che Badalte Swarup Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Importance of Newspaper", "वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा मराठी निबंध", "वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध" for Students

Marathi Essay on "Importance of Newspaper", "वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा मराठी निबंध", "वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध" for Students

'सत्य वास्तवातले, मांडितो सकाळ 

मस्तवाल खळांना, कांडितो सकाळ 

मानसी मनांना, जोडितो सकाळ,

खळांची व्यंकटी, सांडितो सकाळ' 

नुकतीच 'कॉमन मॅन'चे निर्माते, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना देवाज्ञा झाली. सामान्य जनांमध्ये वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण करण्यात त्यांचा फार मोठा सहभाग होता. 

पूर्वी आजच्यासारखी दृकश्राव्य साधने उपलब्ध नसताना स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, लोकांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी वृत्तपत्रांतूनच विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दीर्घ लेखन केले.

एका बॉम्बने कदाचित १००/२०० माणसे मरतील; पण एका लेखणीने हजारो लोक जागरूक होतील, हा विश्वास स्वातंत्र्यवीर सावरकरांना होता. त्यांनी आपल्या लेखणीचा पुरेपूर उपयोगही केला.

वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आज दूरदर्शनवर २४ तास बातम्यांचा रतीब घालणाऱ्या शेकडो वाहिन्या असल्याने वृत्तपत्रांचा 'खप' कमी होईल का, अशी भीती निर्माण झाली होती; पण ही भीती फोल ठरली आहे.

वृत्तपत्रांचा वाचकवर्ग वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या वयोगटाचा असतो. स्वातंत्र्यपूर्व काळात, त्या वेळच्या परिस्थितीनुसार वृत्तपत्रांची जबाबदारीअन्यायाला वाचा फोडणे, जनजागृती, मुक्या संवेदनांना बोलके करणे अशी होती. त्यांची नावेही समर्पक अशीच होती. 

जसे : सुधारक, मूकनायक, शतपत्रे, केसरी, नवयुग, पुढारी. आजच्या विज्ञान युगात वृत्तपत्रे ही फार मोलाची संस्था होऊन बसली आहे. 

लोकशाहीच्या राजवटीत तर या संस्थेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादी संस्था ज्याप्रमाणे संघटितपणे कार्य करते, नावलौकिकास येते त्याप्रमाणे आजची वृत्तपत्रे संघटितपणे कार्य करू लागली आहेत. नावलौकिक मिळवत आहेत. त्यामुळे त्यांचे सामर्थ्य वाढले आहे.

वृत्तपत्रांमध्येही आपल्याला 'स्पर्धा' पहावयास मिळते. अगदी संध्याकाळी निघणारा 'संध्यानंद' हा दिवसभरातील ताज्या घडामोडी आपल्यासमोर - 'ब्रेकिंग न्यूज'ची आकर्षक डिश बनवून सादर करतो.

वृत्तपत्रांची विभागणी त्याच्या पानांनुसार होते. ठळक बातम्या, राजकीय / स्थानिक, महत्त्वाच्या वाटणाऱ्या बातम्यांना प्रथम पृष्ठांवर स्थान मिळते. व्यंगचित्रांच्या माध्यमातून वृत्तपत्रातून सामाजिक व्यंगावर बोट ठेवण्याचे सामर्थ्य व्यंगचित्रकारांमध्ये होते. म्हणूनच त्यांचे स्थानही प्रथम पानावर असायचे. आता व्यंगचित्रांची जागा वृत्तपत्रात इतरत्र हललेली दिसते. 

कोणत्याही देशाची, समाजाची वैचारिक, बौद्धिक व सांस्कृतिक पातळी शोधायची असल्यास तेथील व्यंगचित्रे पहायची असतात.

वृत्तपत्रातील संपादकीय अतिशय महत्त्वाचे! संपादक सामान्य जनतेच्या मनातल्या भावनांचे भाष्यकार असतात. लोकांच्या मनातील 'क्षोभ' राजकारण्यांसमोर अतिशय प्रभावीपणे मांडण्याचे वृत्तपत्र' हे एक हत्यार आहे.

वृत्तपत्रांचे स्वरूप हळूहळू बदलत गेले. आपल्या सभोवताली किंवा परिसरात घडणाऱ्या घटनांविषयी बातमी देताना बातमीदार आपले सर्व कसब पणाला लावताना दिसतो.

साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, वैश्विक घडामोडी, धर्मकरण, अर्थकरण, सांस्कृतिक वारसे इ. मानवीजीवनाच्या प्रत्येक दालनात 'वृत्तपत्र' डोकावते.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खास 'खस' अत्तराने माखलेले वृत्तपत्र हातात घेऊन वाचताना दिवाळीसारख्या मोठ्या सणाचा आनंद नक्कीच वाढतो.

गणेशोत्सवात दगडूशेठ गणपतीचा (पुण्याची शान!) मोठ्या आकारातील फोटो तसेच आषाढी एकादशीला पांडुरंग- रुक्मिणीचा फोटो वृत्तपत्रांतून छापून आपल्या वृत्तपत्राचा खप वाढवणारे कौतुकास पात्र नाहीत का?

वृत्तपत्रे ही खोल समुद्रासारखी असतात. पाक कौशल्य, सणांच्या (नैमित्तिक) पाककृती, रांगोळ्या, कुमारावस्थेतील मुलांच्या जडणघडणीत मोलाचे कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या कथा, डोकॅलिटी, इंग्रजी | मराठी शब्दकोडे, चित्रे, पत्रे अशा विविध गोष्टी समाजातील प्रत्येकासाठी देण्याचा वृत्तपत्रांचा प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे.

नीला सत्यनारायण, उत्तम कांबळे, द. ता. भोसले, अमृता सुभाष यासारख्या व्यक्तींच्या लेखनातून 'माणूस' घडविण्याचे काम वृत्तपत्रे करत असतात.

व्यक्तिमत्त्वविकासाची जबाबदारीच जणू वृत्तपत्रांनी पेलली आहे. निरोगी शरीर, त्यासाठी आहार, व्यायामाचे महत्त्व सांगता सांगता अनेक पैलूंचा विचार करत वृत्तपत्रांनी आपली कात टाकली आणि आपला 'चेहरामोहरा' बदलण्यात यशही मिळवलंय.

जाहिरातींच्या जीवावरच वृत्तपत्रे जगतात आणि जाहिरात ही पासष्टावी कला आहे, असं साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी म्हटले आहे. जाहिरात जास्तीत जास्त आकर्षक रीतीने लोकांसमोर मांडून आपल्या वस्तूची विक्री | खप कसा वाढवता येईल, याकडे विक्रेत्यांचा कल आज दिसून येतो. म्हणूनच आज ‘पानोपानी' मनोरंजकतेबरोबरच आकर्षक जाहिरातीदेखील झळकलेल्या दिसतात.

नोकरीविषयक एवढंच नव्हे तर 'अनुरूप' जोडीदार, जागा खरेदी-विक्री, सिनेमा, नाटक, निवेदने, जन्म-मृत्यू इ. सारख्या विषयांवरील जाहिरातींचे पेव फुटले आहे. तर असे हे वृत्तपत्राचे बदलते स्वरूप! आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या वृत्तपत्राशिवाय आपण 'सकाळ'चा चहा तरी घेणार का? एक दिवस वृत्तपत्र 'दिसले' नाही तर आपल्याला कसे चुकल्याचुकल्यासारखे वाटते पहा.

गणपती विसर्जनानंतरचा दिवस (अनंत चतुर्दशी), राष्ट्रीय सण (१५ ऑगस्ट, २६ जानेवारी ) हे दिवस आठवून तर पहा! ।

तेव्हा हे वृत्तपत्रा..., तुझ्याशिवाय आमचे 'पान'ही हालत नाही हेच खरे!


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: