Sunday, 23 February 2020

कथापूर्ती लेखन मराठी Marathi Katha Purti Lekhan Writing

Marathi Katha Purti Lekhan Writing : Today, we are providing कथापूर्ती लेखन मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Marathi Katha Purti Lekhan Writing  to complete their homework. 

कथापूर्ती लेखन मराठी Marathi Katha Purti Lekhan Writing

एखाद्या काल्पनिक वा वास्तविक प्रसंगाला रोचक, मनोरंजनात्मक पद्धतीने प्रस्तुत केलेल्या वर्णनाला कथा असे म्हणतात. कथेची भाषा ही साधी, सरळ; पण मनोरंजकपूर्ण असायला हवी.
कथा सांगणे ही एक कला आहे. साधी, सोपी, सरळ आणि मनोरंजक भाषा कथेला परिणामकारक बनवते. एकामागोमाग एक येणाऱ्या वाक्यातून कथेला गती प्राप्त होते.
अद्भुत कथा, रहस्यकथा, विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा, पंचतंत्रातील कथा, इसापनीतीच्या कथा असे कथांचे प्रकार सांगता येतील.
फार पूर्वी मनोरंजन करण्याच्या हेतूने कथेचा जन्म झाला असे म्हणता येईल. लहान मुले ‘कथे'मध्ये रमतात. परीकथा त्यांना वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. कथेमध्ये पुढे काय घडणार? ही उत्सुकता टिकवून ठेवणं, हे कथाकारांच्या कथनाचं यश असतं. कथाकाराला मूळ घटनाक्रम लक्षात ठेवून त्याच क्रमाने कथा सांगता आली, तरच ऐकणाऱ्यांच्या मनावर योग्य तो परिणाम होतो.
काही काही कथा तात्पर्यही सांगतात; याचाच अर्थ कथेतून बोधही मिळतो. कथा मनोरंजक बनविण्यासाठी कधी अवास्तवाचाही आधार घेतला जातो.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार कथा रचावी, त्यांना कथा हा लेखनप्रकार माहीत व्हावा म्हणून नवीन अभ्यासक्रमामध्ये कथापूर्तीचा समावेश करण्यात आला आहे.
कथापूर्तीसाठी कथा
नमुना :
एक राजा-प्रजाहितदक्ष म्हणून दूरवर कीर्ती - राजमहालाबाहेर मोठी घंटाराज्यात दवंडी-“कोणासही न्याय हवा असेल तर दोर ओढून घंटा वाजवावी" - एके दिवशी चरत चरत एक गाढव राजमहालाबाहेर - गवत चरताना दोर ओढून घंटेचा आवाज - राजा महालाबाहेर - "गाढवाच्या मालकाला बोलवा" राजाची आज्ञा...
न्यायी राजा
फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे; पण आजही ती तुम्हा सर्वांना नक्की आवडेल अशीच आहे.
एक राजा होता. आपल्या प्रजेची खूप काळजी घेणारा! म्हणूनच प्रजाहितदक्ष राजा, असा त्याचा नावलौकिक होता.
आपल्या प्रजेला त्यांच्या समस्या, अडचणी, गाहाणी न घाबरता सांगता याव्यात म्हणून राजाने आपल्या राजमहालाच्या बाहेर एक मोठी घंटा बसवली आणि गावात दवंडी पिटवली की, “ज्यांना आपल्या राजाला काही सांगायचंय त्यांनी राजमहालाबाहेरचा दोर ओढून घंटा वाजवावी."
एके दिवशी गंमतच झाली. एक गाढव चरत-चरत राजमहालापाशी येऊन गवत खाऊ लागले. चरता-चरता त्याच्या तोंडात घंटेला जोडलेला दोर अडकला. तो काही त्या गाढवाला तोंडातून सोडवता येईना. दोर ओढला गेल्याने घंटा जोरजोरात वाजू लागली. घंटेचा आवाज ऐकून राजमहालातील चौकीदार, खुद्द राजाही धावत बाहेर आला. पाहतो तर काय? गाढवाच्या तोंडात दोर अडकलेला. ते पाहून राजाने तो दोर अलगदपणे सोडवला आणि आपल्या चौकीदाराला, "हे गाढव कोणाच्या मालकीचे आहे, त्याला शोधून माझ्यासमोर हजर करा," असे फर्मान काढले.
चौकीदारानेही लगेच गावात जाऊन माहिती मिळवली आणि गाढवाच्या मालकाच्या मुसक्या बांधूनच त्याला राजासमोर हजर केले. गाढवाचा मालक खूप घाबरला होता. तो राजासमोर गयावया करू लागला. म्हणाला, “महाराज, माझे हे गाढव गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. माळरानावर, इकडे-तिकडे मी त्याला खूप शोधले; पण मला ते सापडले नाही. माफी असावी, महाराज."
राजा त्याला म्हणाला, “तुझी तक्रार घेऊन तुझे हे गाढव माझ्याकडे न्याय मागायला आले आहे. त्यानेच मला सांगितले की, माझा मालक दिवसभर खूप काम करून घेतो. आणि रात्रीच्या वेळी दुसऱ्याच्या शेतात चरण्यासाठी सोडून देतो; पण सगळ्याच शेतामध्ये ‘राखण' करणारे रखवालदार असल्याने मला 'उपवास' घडतो. गेले दोन दिवस गवताच्या शोधात भटकत भटकत मी इथपर्यंत पोहोचलो. महाराज मला न्याय द्या.” राजाचे बोलणे ऐकून गाढवाचा मालक खजील झाला. “महाराज, माझी चूक मला समजली. आता माझ्याकडून पुन्हा असं होणार नाही. या गाढवाच्या जिवावरच माझा संसार चाललाय. याचे माझ्यावर खूप उपकार आहेत. हा ओझी वाहतो म्हणून तर मला बाजारात माल नेता येतो आणि विकता येतो.”
आपल्या मालकाचे बोल ऐकून गाढवाने मान हलवली आणि न्यायी राजाने न्याय दिल्यावर गाढव मान खाली घालून आनंदाने आपल्या मालकाच्या मागोमाग चालू लागले.
‘नमुन्यादाखल येथे अपूर्ण कथा पूर्ण करण्यासाठी दिलेली आहे.
एक होती चिमणी - एक होता कावळा- चिमणीचं घर होतं मेणाचंकावळ्याचं घर होतं शेणाचं - एके वर्षी काय झालं? - सूर्य देव कोपलापृथ्वीवर सगळीकडे ऊनच ऊन पडलं - चिमणीचं घर वितळून गेलं...आणि...

दिलेली कथा पूर्ण करा.
१) एक लाकूडतोड्या होता. रोज जंगलात जाऊन झाडे तोडून, त्यांच्या फांद्याची मोळी बांधून गावातील लोकांना विकायचा. एके दिवशी अद्भुत घटना घडली. त्याने नेहमीप्रमाणे झाडाच्या बुंध्यावर कु-हाडीचा घाव घातला आणि झाडातून चिकाऐवजी रक्त ओघळू लागले. तो घाबरला. त्याने आपल्याबरोबर काम करणाऱ्या अनेक लाकूडतोड्यांना हाका मारून बोलावले. सगळेजण आश्चर्याने झाडाकडे पाहू लागले आणि झाड बोलू लागले...
२) रोज आईच्या मदतीला धुणी, भांडी करायला जाणाऱ्या सुमतीला राधाकाकूच्या घरी जायला आवडे. राधाकाकू आपल्या दोन्ही मुलांना घेऊन अभ्यासाला बसलेल्या असायच्या. चटईवर दोन्ही मुलांच्या रंगीबेरंगी चित्रे असणाऱ्या पुस्तकांचा पसारा पसरलेला असायचा. निमूटपणे काम करत असताना तिचे लक्ष मात्र त्या मुलांकडेच असायचे. एके दिवशी राधाकाकूनी तिच्या आईच्या हातात एक पावती दिली आणि उद्यापासून सुमतीला इकडे कामाला आणायचं नाही असं बजावलं आणि आतून एक आकर्षक खोकं आणून सुमतीच्या हातात दिलं. ते खोकं उघडल्यावर सुमतीचे डोळे चमकले त्यामध्ये...
३) सात जूनच्या आसपास एक पाऊस झाला. त्यामुळे त्यांनी धूळपेरणी केली. नंतर पाऊस गायब. मृग नक्षत्र कोरडं गेलं. आर्द्रा नक्षत्रातही पाऊस नाही. सगळी पेरणी वाया गेली. बी, खत महागलं. पुन्हा विकत घेण्याची हिंमत होत नाही. लेकीचं लग्न दिवाळीनंतर करायचंय; पण...

SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 comments: