Friday, 6 November 2020

Marathi Essay on "Importance of English", "इंग्रजी भाषेचे महत्व मराठी निबंध, "इंग्रजी हटाव' : आवश्यक की अनावश्यक" for Students

Essay on Importance of English in India in Marathi: In this article "इंग्रजी हटाव' : आवश्यक की अनावश्यक?", "इंग्रजी भाषेचे महत्व मराठी निबंध" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Importance of English", "इंग्रजी भाषेचे महत्व मराठी निबंध, "इंग्रजी हटाव' : आवश्यक की अनावश्यक" for Students

भारत हा बहुभाषिक देश आहे; इंग्लंड, अमेरिका यांच्यासारखा एकभाषिक देश नाही. मराठी, गुजराती, हिंदी, बंगाली, मल्याळी, उडिसा, तमिळ, कोकणी, सिंधी, नेपाळी इत्यादी भाषा भारतातील विविध प्रांतांमध्ये बोलल्या जातात. काहींच्या त्या मातृभाषा असतात, तर काहींना त्या भाषा त्या प्रदेशातील बहुवर्षीय वास्तव्याने आत्मसात झालेल्या असतात. त्या प्रादेशिक भाषांना शालेय पातळीवरील शिक्षणक्रमात स्थान दिलेले असते; त्याचे पहिले कारण म्हणजे त्या भाषा त्यांना जन्मापासून आत्मसात झालेल्या असल्याने त्या भाषांतून मिळणारे ज्ञान ग्रहण व्हायला वेळ लागत नाही. शिवाय दुसरे कारण म्हणजे त्या भाषेची मांडणी, शब्दसंपत्ती, वाक्यरचना, म्हणी, सुभाषिते, वाक्प्रचार इत्यादींच्या परिचयाने आपोआपच भारतीय संस्कृतीची व सामाजिक चालीरीतीसंस्कार इत्यादींची संस्कारक्षम वयातच ओळख होते. तिसरे कारण म्हणजे नवी भाषा शिकण्यात मुलांचे अनाठायी वाया जाणारे बौद्धिक श्रम व वर्षे वाचतात. आधी नव्या भाषेशी परिचय व नंतर त्यातून ज्ञानग्रहण यासाठी लागणारा वेळ वाचतो. भारतातील शिक्षणव्यवस्थेचा पाया घालणाऱ्या मेकॉलेसारख्या शिक्षणतज्ज्ञानेही स्वभाषेतून शिक्षण देण्याबद्दल अनुकूल मत दिले आहे.

आजच्या शालेय पातळीवरच्या शिक्षणामध्ये त्रिसूत्री भाषापद्धतीचा अवलंब केला जातो. भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये केवळ प्रादेशिक भाषेचे ज्ञान जीवनाच्या सर्व पातळ्यांवरील व्यवहारासाठी अपुरे ठरेल या भूमिकेतून तसेच व्यक्तीच्या मनात इतर भारतीय प्रदेशांतील माणसांबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी व एकराष्ट्रीयत्वाची भावना जोपासली जावी यासाठी हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून भाषाशिक्षणामध्ये समावेश केला जातो; आणि या भारतीय प्रादेशिक भाषा समृद्ध नव्हत्या तेव्हापासून भारतीय कारभाराची, भारतीय व्यवहाराची व भारतीय ज्ञान-विज्ञान-संशोधनाची भाषा म्हणून भारतीयांना इंग्रजीचा परिचय होता. हे विविध क्षेत्रांतील ज्ञान अजूनही प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित, अनुवादित स्वरूपात पुरेशा प्रमाणात आलेले नाही; म्हणूनच इंग्रजीचे महत्त्व जाणून तिचा समावेश त्रिसूत्री भाषाशिक्षणात केला गेला. एके काळी गणित, शास्त्र, इतिहास, भूगोल यांसारखे विषय तर इंग्रजीतून शिकविले जात असतच; पण मराठी, हिंदी, बंगाली इत्यादी भाषांची जननी असलेली संस्कृतसारखी भाषाही इंग्रजीतून शिकविली जात असे.

ब्रिटिश राजवटीमध्ये जशी सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी अनेक क्षेत्रांत जुनी भारतीय परंपरा जाऊन त्या जागी नव्या परंपरेची बीजे रुजवली गेली, तशीच शिक्षणाच्या क्षेत्रातही नवी दृष्टी आणली गेली. इंग्रजी भाषा आत्मसात होण्यासाठी प्रादेशिक भाषाभ्यासाचा प्रारंभ इंग्रजांनी केला. त्यापूर्वी प्रादेशिक भाषाभ्यासाची . कल्पनाही नव्हती हे मान्यच करावयास हवे. पण सर्वच विषय इंग्रजीतून शिकविले जाऊ लागल्याने प्रादेशिक भाषांचा विकास ज्ञानभाषा म्हणून होऊ शकला नाही. ज्ञानभाषा, संपर्कभाषा, व्यवहारभाषा या दृष्टीने सत्ताधीशांच्या या भाषेला शालेय पातळीपासूनच महत्त्व दिले गेले. तिचे महत्त्व भारतीयांच्या मनावर केवळ एक भाषा म्हणून न राहता सत्ताधीशांची, अधिकारीवर्गाची, प्रतिष्ठेची व सत्ताकेंद्रामध्ये स्थान प्राप्त करून देणारी म्हणून ती महत्त्वपूर्ण भाषा ठरली. 'इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध' ही तत्कालीन कल्पना हेच सूचित करणारी होती. इंग्रजी येणे म्हणजे ज्ञानी व विद्वान असणे हा समज रूढ झाला. इंग्रजी भाषा, इंग्रजी पेहराव, इंग्रजी चालीरीती यांचा भारतीयांच्या मनावर प्रथमपासूनच जबरदस्त प्रभाव पडला होता. तो स्वातंत्र्य मिळून सत्तावन्न वर्षे उलटली तरी अजूनही कायम आहे. इंग्रजीने व इंग्रजांनी भारताच्या कानाकोपऱ्यात आपल्या संस्कृतीचा हा जो दबदबा निर्माण केलेला आहे, तो खटकण्यासारखा आहे; भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने घातक आहे. 'इंग्रजी हटाव' म्हणण्यामागे ही सांस्कृतिक भूमिका असते.

ब्रिटिश सत्ता उलथवून टाकण्याचे क्रांतिकारी मार्ग अनुसरणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकीकडे इंग्रजांच्या अत्याधुनिकतेचे दोन शब्दांत, दोन संस्कृती' या लेखामध्ये गोडवे गायले आहेत. 'Up-to-date' या त्यांच्या शब्दांतून व्यक्त होणारी काळाबरोबर बदलण्याची वृत्ती भारतीयांनी आचरणात आणली पाहिजे, असे सावरकरांचे मत होते; पण त्याच सावरकरांनी भाषाशुद्धीच्या विवेकाचा विचार मांडताना इंग्रजी मराठीत सामावून घेण्यास कडाडून विरोध केला. शत्रू असला तरी त्याच्या कोणत्या गोष्टींचा स्वीकार करावयाचा व आपल्या स्वत्वाच्या दृष्टीने शत्रूच्या कोणत्या वैशिष्ट्यांना विरोध करायचा हे तत्कालीन देशभक्तांना समजले होते, हे यावरून स्पष्ट होते. मुख्य मुद्दा असा की, भाषेवर केले गेलेले आक्रमण हे निरुपद्रवी म्हणता यावयाचे नाही. उलट भाषा ही माणसाच्या वर्तनाचा व संस्कृतीचा आरसा असते. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब भारतीय प्रादेशिक भाषांमधून जाणवते. इंग्रजी भाषेच्या आरशातून आपण आपली संस्कृती जतन करू शकणार नाही. त्यासाठी भाषाशुद्धीचा विवेक महत्त्वाचा असतो. 'इंग्रजीला विरोध करण्यामागे' हे संस्कृति-जतनाचे धोरण आहे. आज जी आपली राहणी, जीवनपद्धती पाश्चात्त्य वळणावर जात चालली आहे, डॅडी-मम्मी संस्कृतीकडे झुकलेली आहे, तिचे कारण भाषेशी संबंधित आहे. इंग्रजी भाषेमागून येणारी ही पाश्चात्त्य संस्कृती तारतम्याने स्वीकारण्याची वृत्ती भारतीयांनी दाखविली नाही. याला कारण इंग्रजी ही फ्रेंच, रशियन किंवा जर्मन इत्यादी भाषांसारखी नुसती भाषा म्हणून भारतात आली नव्हती. ती जेत्यांची भाषा होती. ती साहित्य, ज्ञान-विज्ञान इत्यादी विशेषांनीही समृद्ध भाषा होती. तिच्यातील एकटा शेक्सपियरच भारतीयांना वेड लावायला समर्थ होता. तिथे त्या भाषेतील वाङ्मयसंपन्नतेचा केवढा पगडा भारतीयांवर पडला असेल ते कळू शकेल. अशी भारतीय संस्कृतीच्या तोडीस तोड असलेली ही पाश्चात्त्य संस्कृती समृद्ध व कालमानानुसार अधिकाधिक संपन्न करीत जाणारी भाषा मूलत:च प्रभावी होती व मुख्य म्हणजे ती 'जेत्यां'च्या सर्व व्यवहाराला व्यापून राहिलेली होती. म्हणूनच अशा भाषेच्या प्रभावाखाली आपण किती जायचे व किती काळ राहायचे याचे भान ठेवायला पाहिजे. शेजारी कितीही दिलदार असला तरी त्याच्या हाती घराची किल्ली द्यायची नसते.

इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा आहे. 'इंग्रजी हटाव'ने आपल्याला जगातील ज्ञानाच्या विविध क्षेत्रांपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही; हे सत्यही नाकारता येत नाही. ४४-४५ देशांमध्ये ती कार्यालयीन व राज्यकारभाराची भाषा आहे. जागतिक पातळीवरचे संज्ञापन इंग्रजीतून होत असते. जगातील एक-तृतीयांश लोकांची ती व्यवहाराची भाषा आहे. नवे संशोधनपर लेख इंग्रजीतून प्रकाशित होत असतात. उद्योगव्यवसायातील निम्म्याहून जास्त व्यवहार इंग्रजीतून चालतात. त्याचा अर्थ, भारताला जागतिक पातळीवरच्या सर्व प्रकारच्या व्यवहारासाठी इंग्रजीशिवाय पर्याय नाही.

भारतातही यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही. सुशिक्षित भारतीय व्यक्ती प्रादेशिक दृष्टीने भिन्न असलेल्या व्यक्तीशी व्यवहार साधताना इंग्रजीचा आधार घेते. राष्ट्रभाषा म्हणून 'हिंदीला' मान्यता असली व वर्तमानपत्रे, साप्ताहिके इत्यादी रोजच्या प्रसारमाध्यमांची हिंदीतील संख्या प्रथम क्रमांकाची असली, तरी या प्रसारमाध्यमांच्या संदर्भात इंग्रजीचा क्रमांक दुसरा लागतो. प्रत्येक प्रादेशिक भाषेत वर्तमानपत्रे आहेत; नियतकालिके आहेत; पण याही प्रदेशात इंग्रजी वर्तमानपत्रांचा वाचकवर्ग बहुसंख्य आहे. भावी पिढीला इंग्रजी स्वभाषेसारखी लिहिता-वाचता-बोलता येण्यासाठी 'टाइम्स ऑफ इंडिया' सारखी वर्तमानपत्रे मोठ्याने वाचण्याची फर्माइश गेल्या पिढीकडून केली जात असे. नोकरदार पेशाला तर इंग्रजीची नोकरीसाठी गरज होती. नोकरीमध्ये असल्याने मातृभाषेइतकीच इंग्रजी येण्याचा प्रयत्न करणारा मध्यमवर्ग तर अशा इंग्रजीतील सर्वच प्रकारच्या लेखनाचा भक्त झालेला होता. आजही ही स्थिती फारशी बदललेली नाही. इंग्रजीच्या संदर्भात, तिचा स्वीकार करताना किंवा तिला नाकारताना तिचे हे भारतातले कार्यक्षेत्राचे व्यापकपण नजरेआड करून चालणार नाही.

या तिच्या व्यापकतेमुळेच तिच्याबद्दल भारतीयांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. इंग्रजीच्या वातावरणात बालपणापासून श्वासोच्छ्वास करणारा हा भारतीय मध्यमवर्ग भारतीय संस्कृतीपासून दुरावत आहे. इंग्रजी माध्यमातून ज्ञानग्रहण करणाऱ्या भारतीयांना आपले सगळेच संस्कार कमीपणाचे व जुनाट वाटत आहेत. इंग्रजीचा प्रभाव असाच वाढता राहिला तर भारतीय परंपरेतील उज्ज्वल वारशाला आपण हरवून बसू. हा धोका टाळायचा असेल तर इंग्रजीला आपल्या जीवनव्यवहारात कोणत्या मर्यादेपर्यंत ढवळाढवळ करू द्यायची हे भान येऊ शकेल.

इंग्लंडच्या तुलनेत भारत देश अवाढव्य आहे. प्रादेशिक भाषा म्हणून अठरा भाषांना इथे मान्यता आहे; उपभाषा आणि बोली तर अनेक आहेत. या इतक्या बहुभाषिक प्रदेशावर राज्य करण्यासाठी सगळ्यांशी संपर्क ठेवणारी एक भाषा भारतात इंग्रज येण्यापूर्वी नव्हती. संस्कृतचा उपयोग संपर्काची भाषा म्हणून फार पूर्वी होत होता. तसेच मुसलमानांच्या व पेशव्यांच्या दरबारात पारशीचा वापर संपर्कासाठी राज्यकारभारात होत होता. पण त्यांच्या राज्यांपेक्षा इंग्रजांचे राज्य मोठे होते व त्यांच्या सर्व प्रकारच्या संपर्कासाठी इंग्रजीचा उपयोग करण्याची त्यांना आयतीच संधी मिळत होती; त्यामुळे इंग्रजीने राज्याराज्यांचा दुवा एकमेकांशी जुळविला. इंग्रजांनी त्यासाठी प्रादेशिक भाषांच्या शिक्षणाला महत्त्व दिले. प्रादेशिक भाषांच्या अध्ययनाच्या द्वारा इंग्रजीसारखी भाषा आत्मसात होणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. इंग्रजीमुळे भारतावर एकछत्री राज्यकारभार करणे इंग्रजांना सुलभ झाले.

भारत स्वतंत्र होताक्षणी भारताची राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला मान्यता मिळताच, इंग्रजीतून होणारा कारभार हिंदीतून व्हावा ही अपेक्षा चुकीची नव्हती. पण त्यासाठी हिंदीसकट सर्व प्रादेशिक भाषा समृद्ध असणे आवश्यक होते. एकीकडे इंग्रजी म्हटले की, इंग्रजी राजवट आठवत होती व हिंदी वा प्रादेशिक भाषांतून राज्यकारभार करायचा तर त्या भाषा पुरेशा समर्थ बनविण्यासाठी प्रयत्न केले गेले नव्हते. म्हणून इंग्रजीचा पर्याय स्वीकारणे भाग पडले. हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळूनही दक्षिण भारतामध्ये हिंदीला कायम विरोधच सहन करावा लागला आहे. दक्षिण भारतातील कन्नड, तमिळ, तुलू, मल्याळम् या भाषा हिंदी ज्या आर्यकुळातील भाषा आहे; त्यांमधल्या नसून द्रविड कुळातील आहेत. त्यांची लिपीही भिन्न आहे. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानातील आर्य गटातील भाषकांना हिंदी जशी सहजपणे आत्मसात करता येते, तशीच स्थिती द्राविडियन गटातील भाषकांची नाही. अर्थातच त्यांना इंग्रजीसारखी (आर्य गटातीलच) पण जेत्याची भाषा इतक्या वर्षांच्या सहवासांनी मातृभाषेसारखीच लिहिता-बोलता येते. भारताच्या जवळजवळ निम्म्याच्या आसपास असलेल्या या दक्षिणेकडच्या प्रदेशात म्हणूनच इंग्रजीचा नेहमीच्या व्यवहारासाठीही स्वीकार केला गेला. त्यांचा हिंदीला असलेला विरोध इंग्रजीला फायद्याचा ठरला.

भारतात इंग्रजी आत्मसात केलेला समाज संख्येने किती आहे, यापेक्षा महत्त्वाच्या सर्व जागांवरचा समाज इंग्रजी आत्मसात केलेला आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. कायदेकानू इंग्रजीतून आहेत. कोर्टाचे सर्व व्यवहार इंग्रजीतून चालतात. सर्व विद्यापीठांमध्ये व शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व व्यवहारांमध्ये इंग्रजी महत्त्वाची आहे. सचिवालय, मोठमोठी उद्योगधंद्यांची कार्यालये अशा सर्वच ठिकाणी इंग्रजी सफाईदार येत असल्याशिवाय भारतीयांचा निभाव लागू शकत नाही. डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांच्यावर पाश्चात्त्य पद्धतीचा, अत्याधुनिक जीवनसरणीचा प्रभाव पावलोपावली जाणवतो; त्यामुळे सर्वसामान्य माणसांना हे वातावरणच परके वाटते. इंग्रजीशिवाय आपल्या ज्ञानाला, संशोधनाला, विचारप्रगल्भतेला वाव मिळणार नाही अशी भीती इंग्रजीचा फारसा सराव नसलेल्या प्रादेशिक भाषकाला वाटते. त्याच्या ज्ञानाला-विचाराला-संशोधनाला किंमत आहे. त्याला इंग्रजी येत नाही एवढ्याच कारणामुळे प्रत्यक्ष त्याच्या भूमीतही त्याच्या विद्वत्तेचे चीज होणार नाही, या धास्तीपोटी इंग्रजीस विरोध करणारा गटही मोठा आहे.

इंग्रजी न येणारा समाज शहरात व खेड्यात विपुल प्रमाणात आहे. आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये मराठी किंवा अन्य प्रादेशिक भाषांच्या माध्यमातून शिक्षण घेतलेला हा वर्ग जसा संख्येने मोठा आहे, तसाच ज्ञानगुणसंपन्नही आहे. त्याच्या वर्तनात मात्र इंग्रजी येत नसल्याने स्वत:बद्दलची कमीपणाची भावना रुजत चाललेली आहे. इंग्रजीचे शालेय पातळीपासून शिक्षण देण्याने ती खंत नाहीशी होईलही; पण त्यामुळे इंग्रजी म्हणजेच विद्वत्ता, अत्याधुनिकता, सुशिक्षितपणा अशा वैशिष्ट्यांची त्याच्या मनात कायमस्वरूपी सांगड घातली जाईल, ते वाईट आहे. जयंत नारळीकर आदरणीय आहेत ते त्यांच्या क्षेत्रातील ज्ञानाच्या अधिकारामुळे, त्यांच्या इंग्रजीवरच्या अस्खलित प्रभुत्वाने नाही! ही समज भारतीयांना यायला पाहिजे. त्यासाठी इंग्रजीचा अनाठायी बडेजाव भारताने तरी माजविता कामा नये. पुष्कळदा केवळ फाडफाड इंग्रजी बोलता येणे (आणि ते सुद्धा चुकीचे!) एवढेच त्यांचे भांडवल असते. ही माणसेसुद्धा इतर सर्वसामान्य माणसांसारखी कूप-मंडूक, स्वार्थी, आपमतलबी, दुसऱ्यांचे चांगले न पाहवणारी, स्वत:च्या फायद्यांसाठी दुसऱ्यांचे नुकसान करणारी अशी असतात. ती सुशिक्षित असतीलही, पण सुसंस्कारित नसतात. मॉडर्न असतात, पण पुष्कळदा 'मॉडर्न'च्या नावाखाली लंपट असतात. स्वैराचार लपविण्याचा मार्ग म्हणून ते स्वतः 'मॉडर्न' असण्याचे नाटक करतात. मुख्य म्हणजे ज्या भारतात ते राहतात व त्यांचे पूर्वज राहत आलेले आहेत, ज्या देशातील सुखसोयी ते 'नागरिक' म्हणून हक्काने उपभोगतात, त्या देशाशी त्यांच्या निष्ठा बांधलेल्या नसतात; तर त्यांच्या निष्ठा इंग्लंड, अमेरिकेशी गुंतलेल्या असतात. इंग्लंड-अमेरिकेमध्येही गरिबी आहे. फसवणुकीचे विविध मार्ग तेही अनुसरतात. व्यक्तिद्वेष, काळा-गोरा भेद मानतात. पण गरिबी व जातिभेद हे फक्त भारतातच आहेत; व भारत किती अडाणी व मागासलेला आहे हे भारताचे चित्र ही इंग्रजाळलेली लब्धप्रतिष्ठित माणसे जगभर पसरवितात. हा भारत आपली मायभूमी आहे व तिचे हे चित्र बदलण्यासाठी आपण काय करू शकतो; हा विचार त्यांच्या मनात येत नाही, कारण भारतभूमीबद्दलचे जिव्हाळ्याचे संबंध इंग्रजीतून येऊ शकत नाहीत. त्याला भारतातील प्रादेशिक वा अन्य भाषांबद्दल जिव्हाळा असावा लागतो.

असा स्वभाषेबद्दलचा अंत:करणातून आलेला जिव्हाळा बंगाल, कर्नाटक, आंध्र इत्यादी प्रांतांतील जनतेमध्ये थोडा तरी आहे; म्हणूनच ते इंग्रजीही आत्मसात करतात. पण स्वभाषेतून स्वभाषकांसाठी संवाद साधताना स्वभाषेतून व्यवहार करतात. त्यांच्या मोठमोठ्या शहरांतील दुकानांवरच्या नावांच्या पाट्याही इंग्रजीच्या रोमन लिपीमध्ये आहेत. तशा त्या त्यांच्या लिपीतूनही आहेत. देव, धर्म यांच्या संदर्भात ते अत्यंत प्रतिगामी आहेत. त्यांच्या मंदिरामध्ये इंग्रजी पोषाखाने प्रवेश केलेला चालत नाही. ऑफिसर असो, नाहीतर रस्त्यावरचा रिक्षाचालक असो, लुंगी किंवा धोती या भारतीय वस्त्रपरिधानाशिवाय त्याला मंदिरात प्रवेश मिळत नाही. अशी स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा यांच्यासंबंधी निष्ठा ज्यांच्या मनात असते, त्यांनी 'इंग्रजी' भाषा आत्मसात केली तर चालेल; कारण त्यामुळे त्यांच्यावर होणारे भारतीय संस्कार इंग्रजीतून येणाऱ्या पाश्चात्त्य संस्कारांमुळे नष्ट होण्याची भीती नसते.

न्यायालयात किंवा मोठमोठ्या कचेऱ्यांमध्ये इंग्रजीतून चालणाऱ्या कारभारामुळे इंग्रजी न येणारा भारतीय माणूस बिचकतो. न्यायालयातील, प्रत्यक्ष त्याच्याच न्यायान्यायाचे काम चालू असताना, ते इंग्रजीतून चालत असेल तर त्याला त्याबद्दल काहीही आकलन होत नाही. सुदैवाने बऱ्याच प्रयत्नानंतर का होईना, तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी हे न्यायालयीन कामकाज मराठीतून वा त्या त्या प्रादेशिक भाषांतून चालविले जाते; त्यामुळे खटला कसा चालला आहे, आपला वकील आपली बाजू कशी मांडतो आहे, आपल्या खटल्याचा निकाल काय दिला आहे, याचा उलगडा प्रादेशिक भाषेमुळे त्याला होऊ शकतो.

याचा अर्थ, इंग्रजीचे महत्त्व कमी आहे किंवा तिच्यातून व्यवहार करणे पूर्णपणे सदोष आहे असे नाही. प्रश्न आहे तो हा की, प्रत्येक भारतीयाला इंग्रजी आले पाहिजे काय? शालेय पातळीवरचे सध्याचे इंग्रजीबद्दलचे सक्तीचे धोरण या दृष्टीने तपासून पाहायला पाहिजे. इंग्रजी ज्ञानभाषा म्हणून, हिंदी राष्ट्रभाषा म्हणून, प्रादेशिक मातृभाषा म्हणून, अशी कमीत कमी तीन भाषांच्या अध्ययनात मुलांची आपण किती बौद्धिक शक्ती व उमेदीचा काळ खर्च करतो आहोत, त्याचे मूल्यमापन व्हायला नको काय? हे शिक्षण देतानाही त्याला 'आपली मातृभाषा अशीच समृद्ध व संपन्न' करण्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. तशी इच्छा निर्माण होत नाही; कारण शिक्षणात किंवा व्यवहारात तसा प्रयत्न केला जात नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून तर मातृभाषा व भारतीय पोशाख यांबद्दल तिटकारा कसा निर्माण होईल असाच प्रयत्न होत असतो. कुंकू लावून येणाऱ्या विद्यार्थिनीला मारहाण/शिक्षा केल्याची उदाहरणे न्यायालयापर्यंत गेलेली आहेत. ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले भारतीय इंग्रजी रीतिरिवाज अनुसरण्याचा व भारतीय रीतिरिवाज न पाळण्याचा मुद्दाम प्रयत्न करीत असतात. इंग्रजीला विरोध होतो, तो तिचे अनुसरण स्वीकारले की या गोष्टी वाढतच राहतील यासाठी.

अशा गोष्टी टाळण्यासाठी 'इंग्रजी हटाव' हा एकमेव मार्ग आहे काय? सर्वसामान्य लोकांना कोणताही निर्णय सोपा करून पाहिजे असतो; पण भाषेसारख्या सामाजिक संस्थेच्या संदर्भात असा एकेरी निर्णय घेणे योग्य नाही व त्याचे पालन होणेही अवघडच असते. या संदर्भात इतिहासकार राजवाडे यांचे उदाहरण बोधप्रद ठरेल. राजवाडेंचे इंग्रजी चांगले होते. त्यांनी आपले ऐतिहासिक संशोधन इंग्रजीतून प्रसिद्ध केले तर जगाला त्याचा फार मोठा उपयोग होईल, असे त्यांच्या एका हितचिंतकाने सुचविले, पण राजवाडेंच्या ठिकाणचा मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान त्यांना आपले हे मौलिक संशोधन इंग्रजीतून लिहायला आड येत होता. त्यांनी उत्तर दिले की, 'माझे हे संशोधन महत्त्वपूर्ण व मूलगामी आहे असे तुम्हाला वाटते ना? मग त्यासाठी इंग्रजांनी मराठी भाषा शिकावी !' ही एक प्रकारे टोकाची भूमिका झाली. अनेक प्रादेशिक भाषांमध्ये असे मौलिक संशोधन व उच्च दर्जाचे साहित्य लिहिले जात आहे; पण त्याची जाणीव ते जेव्हा असे जागतिक पातळीवरच्या प्रवाही भाषेमध्ये येईल तेव्हाच होऊ शकेल. प्रादेशिक भाषांमधील साहित्य म्हणजे रानात उमललेले पुष्प. त्याचा सुगंध जगभर पसरविण्यासाठी ते इंग्रजी भाषेत तरी भाषांतरित व्हायला पाहिजे किंवा आपली भाषा तरी अधिकाधिक समृद्ध करण्याचे पद्धतशीर प्रयत्न व्हायला पाहिजेत. उदाहरणार्थ- इंग्रजीला मिळालेली जगन्मान्यता व जगभरातील देशविदेशांच्या संपर्कमाध्यमांचे स्थान एका दिवसात मिळालेले नाही. त्यासाठी तिने घेतलेली मेहनत, तिच्यातील साहित्य, संशोधन, इंग्रजांची जगभरातील मुलुखगिरी, दबदबा, राजकीय सत्तेच्या जोडीला अंगभूत चतुराई इत्यादी गोष्टी भारतीयांनी 'हिंदी'च्या संदर्भात जाणीवपूर्वक व योजनाबद्ध रीतीने कार्यवाहीत आणायला कोणतीच आडकाठी नाही. भाषाविकास आणि राष्ट्रविकास, भाषाविकास आणि धर्मविकास व भाषाविकास आणि संस्कृतिविकास यांचा अन्योन्य संबंध आहे. बौद्ध धर्माने आपल्या प्रसारासाठी पाली भाषा निवडली, संस्कृत नाही. वारकरी संप्रदायांचा विकास होण्यासाठी त्यांनी मराठी घडविली. भारताच्या जडणघडणीसाठी हिंदीचा असा विकास इंग्रजीच्या वाटचालीचा मागोवा घेऊन करायला पाहिजे.

आज अनेक भारतीय लेखक इंग्रजीत साहित्यनिर्मिती करीत आहेत. ते आपापल्या मातृभाषेत लिहिण्यातच का समाधान मानत नाहीत? कदाचित जगाच्या पाठीवर जिथे जिथे इंग्रजी पोहोचली असेल तिथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस असेल. त्यांची इंग्रजीतील ही साहित्यनिर्मिती श्रेष्ठ दर्जाचीही होऊ शकेल. जग जवळ येत असल्याने एकमेकांचे अनुभवही कुठेतरी मिळतेजुळते असू शकतात. पण इंग्रजीतून साहित्यनिर्मिती करून प्रसिद्धी व पुरस्कार मिळविलेल्या या लेखकांना आपल्या साहित्यिक श्रेष्ठतेचा वारसा आपल्या मातृभाषेला मिळण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करावे, असे वाटणे अगत्याचे आहे.

एक काळ असा होता की, भाषेकडे केवळ देवाणघेवाण करण्याचे, संपर्काचे किंवा व्यवहाराचे एक साधन म्हणून पाहिले जात होते. पण भाषा-वैज्ञानिकांच्या मते भाषा तेवढेच करून थांबत नाही. ती आपल्या सगळ्या जगण्याचाच एक अपरिहार्य घटक बनलेली असते. आपण ज्या भाषेतून बोलतो, लिहितो, वाचतो तिच्यातूनच मनातही विचार व चिंतन करण्याची सवय आपल्याला लागते आणि ती ज्या संस्कृतीतील शब्दधन घेऊन आलेली असते, ती संस्कृती नकळत आपल्यावर सत्ता गाजवू लागते. इंग्रजी भाषेच्या माध्यमातून आलेली पाश्चात्त्य संस्कृती आणि भारतीय भाषांच्या माध्यमातून आलेली भारतीय संस्कृती या दोन्ही संस्कृतींमधील समन्वय भारतामध्ये साधला जायला पाहिजे असेल तर इंग्रजीचा व तिच्या रोमन लिपीचा स्वीकार करताना भारतीय भाषांनाही व त्यांच्या लिप्यांनाही तेवढाच सन्मान भारतीयांच्या मनात कसा टिकविता येईल, याचा विचार व्हायला पाहिजे; आणि पाश्चात्त्य किंवा भारतीय या दोन्हींपैकी एकाच संस्कृतीचा पगडा समाजमनावर बसणार असेल तर तो भारतीय संस्कृतीचाच राहावा, केवळ पाश्चात्य संस्कृतीचा नको, या व्यापक सांस्कृतिक भूमिकेतून इंग्रजीला विरोध केला जात असतो.

इंग्रजी भाषा व तिची रोमन लिपी यांच्या आधारे रामायण-महाभारतासारखी भारतीय महाकाव्ये आम्हाला समजून घेता येतील काय? एवढेच कशाला? बालकवींची 'फुलराणी' रोमन लिपीमध्ये लिहिली तर तिचे उच्चार तरी नीट जमतील काय? आपल्या संस्कृतीमधील अध्यात्मच कशाला, पण एकत्र कुटुंबपद्धतीतील नातेसंबंधांतील भावनिकता इंग्रजीमध्ये कितपत आणता येईल? प्रत्येक संस्कृती म्हणजे जगण्याची अलग अशी पद्धती असते आणि तिच्या सर्व अंगोपांगाशी ती भाषा कर्णाच्या कवचकुंडलासारखी अभेद्यपणे एकवटलेली असते. भारतीयांची ही कवचकुंडलेच इंग्रजीमुळे काढून घेतली जात असतील, तर इंग्रजीला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही.

या विरोधाची धार कडवट किंवा टोकाची असता कामा नये, हेही विरोध करताना लक्षात घ्यावे लागते. घरात घालण्याचा पोशाख वेगळा, लग्नसमारंभाचा पोशाख वेगळा आणि ऑफिसला जाताना घालण्याचा पोशाख वेगळा. तसाच तारतम्याने विचार करून इंग्रजीचे स्थान ठरवायला पाहिजे. आजच्या भारतीयांच्या संस्कृतीमध्ये जसा पाश्चात्त्य संस्कृतीचा व सनातन भारतीयत्वाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न दिसून येतो, तसाच प्रयत्न इंग्रजीचा स्वीकार करताना साधला जावा; कारण आपला विरोध इंग्रजीला नाही; इंग्रजीतून मिळणाऱ्या ज्ञानाला नाही; पाश्चात्त्य संस्कृतीतील चांगल्या संस्कारांना तर मुळीच नाही. पण विरोध आहे इंग्रजीच्या वर्चस्वामुळे प्रादेशिक भाषांना व मातृभाषेला येणाऱ्या कमीपणाला, प्रादेशिक भाषांना ज्ञानसंचयाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या उणिवांना आणि भारतीय संस्कृतीच्या होणाऱ्या पीछेहाटीला! 'मराठी असे आमुची मायबोली । तिला बैसवू वैभवाच्या शिरी ।' ही आमची महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊनही तिच्या मस्तकावरचा काटेरी मुकुट व अंगावरची अन्य भाषांतील शब्दांची लक्तरे एखाद्या कुसुमाग्रजांना अस्वस्थ करतात! इंग्रजीचा स्वीकार करताना हे भान ठेवणे अगत्याचे आहे. 

सारांश

शालेय पातळीपासून इंग्रजीचा परिचय करून देताना विद्यार्थ्यांमध्ये त्रिभाषासूत्रीमुळे भाषा शिकण्यात श्रम उगाच खर्च होतात. इंग्रजी ही सत्ताधीशांची भाषा म्हणून भारतीयांना परिचित झालेली असल्याने पाश्चात्त्य संस्कृतीचे दडपण भारतीयांच्या मनावर राहते. त्याला विरोध केला नाही तर भारतीय संस्कृतीतील चांगल्या गोष्टी संस्कारातून लुप्त होतील म्हणून सांस्कृतिक भूमिका 'इंग्रजी हटाव' मधून व्यक्त झालेली आहे. मराठी किंवा हिंदी भाषांकडे इंग्रजीमुळे येणारे दुय्यमपण अमान्य केले पाहिजे. इंग्रजी ज्ञानभाषा, व्यवहारभाषा, साहित्यभाषा आहे. इंग्रजीचे हे महत्त्व कुणीही नाकारू नये. पण आपल्या सर्वच जीवनव्यवहारात तिला किती प्रमाणात ढवळाढवळ करू द्यावी, याचे भान आपण ठेवायला पाहिजे.

हिंदी शिकण्याला दाक्षिणात्यांचा विरोध आहे; पण त्यांनी निदान मातृभाषा-विकसनामध्ये इंग्रजीला फारशी ढवळाढवळ करू दिली नाही. आपली संस्कृती व आपली भाषा याबद्दलची त्यांची निष्ठा इंग्रजीमुळे विचलित झाली नाही; हे लक्षात घ्यायला पाहिजे. इंग्रजी म्हणजेच केवळ ज्ञान, मॉडर्नपणा हा समज नाहीसा व्हायला पाहिजे. भारताबद्दलचे जिव्हाळ्याचे संबंध प्रादेशिक भाषांतून जपले जातील, इंग्रजीतून नाही. त्यासाठी न्यायालयात, कचेऱ्यांमध्ये प्रादेशिक भाषांना व हिंदीला महत्त्व यायला पाहिजे. हिंदी व स्वभाषा किंवा मातृभाषा विकसित कशी होईल यासाठी इंग्रजीचा अभ्यास उपयुक्त ठरू शकेल. मराठीमध्ये इंग्रजीसारखी ज्ञानभाषेची व साहित्यभाषेची क्षमता आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज इंग्रजीच्या व्यासंगाने व संशोधनाने निर्माण झाली पाहिजे.


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: