Monday, 12 October 2020

Marathi Essay on "Shabd he Shastra ahe", "शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा मराठी निबंध" for Students

Shabd he Shastra ahe Marathi Nibandh: In this article "शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा मराठी निबंध", "Shabd He Shastra Ahe Essay in Marathi" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on "Shabd he Shastra ahe", "शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा मराठी निबंध" for Students

Marathi Essay on "Shabd he Shastra ahe", "शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा मराठी निबंध" for Students

"आजी, आज आमच्या मॅडमनी हे वाक्य सांगितलं मराठीच्या तासाला; त्याचा अर्थही त्या सांगणार होत्या एवढ्यात तास संपल्याची बेल वाजली. आजी, तू सांग ना गं.” अवनी लाडात येऊन आजीला म्हणाली.

“अगं लबाडे, तुला मैत्रिणीकडे खेळायला जायचं असतं तेव्हा तू आईला कसं सांगतेस?" आई, मी अनन्याकडे खेळायला जाऊ का? मी जाऊ का असं विचारते हां, म्हणजे तू परवानगी मागतेस हो ना? जाणार आहे असं म्हटलंस तर ते विधान होईल. म्हणजे जायचा निर्णय झाला आहे, असं सूचित होईल. आईला ते ऐकून वाईट वाटेल. मी अवनीला जाऊ देणार नव्हते का? अवनीने प्रेमाने माझी परवानगी घेतली असती तर मला किती बरं वाटलं असतं. असं आईला वाटेल, हो ना?" 

"दुसऱ्याकडून कोणतंही काम करून घ्यायचं असेल तर आपल्या आवाजाची पट्टी खालची हवी. आज्ञा करून चालणार नाही. बंदुकीतून सुटलेली गोळी दुखापत करणारच! म्हणून विचारपूर्वक बोलायचं. गोड शब्दात सांगितलं की, समोरची व्यक्ती रागावली असेल तरी तिचा राग शांत होईल. गोड बोललं नाही तर माणसे दुरावतात. गोड बोलणारी माणसे सर्वांनाच आवडतात; पण म्हणून खोटं खोटं गोड नाही हं बोलायचं. खोटी स्तुती करणारी माणसं पाठीमागे नावं ठेवतात. अशांपासून सावध राहायचं. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती कशा बोलतात, हे तू पाहिलंस का?" "हो... त्या शेजारच्या काकू आम्ही खेळत असताना थोडा तरी आवाज होतोच ना गं, त्यावेळी त्या आम्हाला रागावतात. म्हणून आम्हाला नाही आवडत त्या." अवनी म्हणाली; पण 'ते' काका मात्र आम्हाला समजावून सांगतात. राकेश दादाची परीक्षा असते, तेव्हा मात्र आम्ही अजिबात आवाज न करता बैठे खेळ खेळतो. 

"बघ, अवनी काकांनी समजवल्यामुळे ते तुम्हाला आवडले म्हणून आपणही दुसऱ्यांना आवडेल असंच बोलायचं. गोड बोलून काम होत असेल तर 'कठोर' का बोलायचं?" “आज्जी, मी खेळायला जाऊ?" असं म्हणत आजीच्या गळ्यात पडत अवनीनं विचारलं आणि आजीनंही तिला हसत हसत 'हो...' म्हटलं.

“तुमच्या जिभेत अमृत आहे, तसे विषही आहे. म्हणूनच ती जपून चालवली पाहिजे."

आपल्या भावना, आपले मत, आपले विचार, आपल्याला सुचणाऱ्या नवनवीन कल्पना आपण इतरांना सांगू शकतो हे आपले मोठे भाग्यच म्हणायचे. या प्रकटीकरणासाठी आपण भाषेचे माध्यम वापरतो.

हेच बघा ना, तुमच्या मित्राला उत्तम गुण मिळाले की, तुम्ही त्याचे तोंडभरून कौतुक करता. त्याला शाबासकी देता. रस्त्याने चालता-चालता एखादे वृद्ध गृहस्थ दिसले तर त्यांच्याशी बोलून, त्यांना हवी असल्यास रस्ता पार करण्यासाठी मदत करता. तसेच एखादया दुःखी मित्राचे सांत्वनही चार सहानुभूतीच्या गोष्टी सांगून त्याचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करता.

याचाच अर्थ सुखात आणि दुःखातही आपल्या मदतीला आपली जीभ म्हणजेच आपली वाचा, आपली 'वाणी' धावून येते. सुखाचा आनंद वाढवायला आणि दुःखाचे 'मोठेपण' कमी करायला आपण तिचा छान उपयोग करून घेऊ शकतो. होय ना? पण मित्रांनो, हे मी जिभेचे सदुपयोग सांगितले. आता ही बोटभर जीभ काय काय करामती करू शकते हेही पाहूया! 

भांडण मिटवणारी जीभ भांडणे लावून छान गंमत पाहू शकते. लावालाव्या करण्यासाठी पुढाकार घेते. गैरसमज वाढविण्यात तर हिचा फार मोठा वाटा असतो. ही जीभ परमेश्वराच्या नामस्मरणात जशी साथ देते तशीच शिव्यांची 'लाखोली'देखील वाहू शकते.

म्हणूनच मित्रांनो, हे दुधारी शस्त्र फार जपून वापरायला हवं. जसं एखादं फळ कापण्यासाठी सुरीचा उपयोग होतो. त्याच सुरीचा दुरुपयोग करणारीही माणसे आपल्याला अवतीभोवती दिसतात.

आता आपणच ठरवायचं, आपणच या जिभेचा संयमाने वापर करायचा. धनुष्यातून सुटलेला बाण जसा परत माघारी येत नाही, तसाच तोंडून बाहेर पडलेला शब्द गेला की गेलाच. म्हणूनच म्हणतात ना शब्दांमध्ये केवढं सामर्थ्य असते ते!

"बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावं” ही संतांची शिकवण तुम्ही लक्षात ठेवाल ना?

“बात जिसमें प्यार तो है जहर भी है!"


SHARE THIS

Author:

I am writing to express my concern over the Hindi Language. I have iven my views and thoughts about Hindi Language. Hindivyakran.com contains a large number of hindi litracy articles.

0 Comments: