Marathi Essay on "Dr. Jayant Narlikar", "डॉ जयंत नारळीकर निबंध मराठी" for Students
तेजाच्या पोटी तेजच जन्माला येतं म्हणतात ते काही खोटं नाही. करवीर नगरीमध्ये १९ जुलै १९३८ रोजी विष्णुपंत नारळीकर यांच्या घरी पुत्ररत्न जन्मास आले. विष्णुपंत नारळीकर हे विद्याव्यासंगी होते. बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक असणारे विष्णुपंत हे रँगलर म्हणून ओळखले जात. त्यांच्या मातोश्री सुमती या संस्कृत विदुषी होत्या. उभयतांच्या विद्वत्तेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव छोट्या जयंतवर झाला नसता तरच नवल!
स्वतःच्या अलौकिक कर्तृत्वाने विश्वाच्या नभांगणावर आपल्या तेजाने तळपणारा हा तेजस्वी तारा म्हणजे डॉ. जयंत नारळीकर.
'ज्ञान हे पुस्तकात असते; पण त्याचा प्रत्यय प्रत्यक्ष जीवनात घ्यायचा असतो' या विचारावर श्रद्धा ठेवून त्यांचे आई-वडील त्यांचे आणि त्यांचे बंधू अनंतराव यांचे लालन-पालन करत होते. वेगवेगळे अनुभव देत होते. कागदाचे पतंग बनवून मुलांचे आकाशाशी नाते जोडत होते...
जयंतरावांना खेळापेक्षा अंकगणिताची गोडी जास्त होती. मोरूमामा घरातल्या फळ्यावर कठीण गणिते त्यांच्यासाठी घालून ठेवत. शाळेत सातत्याने प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या जयंतने गणितात संशोधन करायचं ठरवलं. गणिताप्रमाणेच त्यांना संस्कृतमध्येही रस होता.
आईकडून वेगवेगळी स्तोत्रे, गीता ते शिकले. लहान असताना जयंता आणि अनंता यांनी शंकराचार्यांची दशश्लोकी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ऐकवून आश्चर्यचकित केले होते.
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ते बी.एस्सी. झाले आणि वडिलांसारखेच केंब्रिजला गेले. हा ज्ञानवंत गणितज्ञ वयाच्या एकोणिसाव्या वर्षी रँगलर झाला. डॉ. फ्रेड हॉएल केंब्रिज विद्यापीठात खगोलशास्त्र आणि प्रायोगिक तत्त्वज्ञान हे विषय शिकवू लागले. त्यांच्या बरोबरच त्यांनी विश्वरचनेसंबंधात संशोधन केले.
गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धान्त या गुरू-शिष्यांनी ११ जून १९६४ रोजी इंग्लंडमध्ये मांडला, त्यावेळी नारळीकरांचे वय अवघे पंचवीस होते.
उभयतांनी आपला खळबळजनक सिद्धांत फळ्यावर गणिताच्या महागूढ समीकरणाच्या रूपात मांडला, तेव्हा सारे सभागृह आश्चर्यचकित झाले. भारतीयांना अभिमान वाटला. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी भारत सरकारने त्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘पद्मभूषण' किताब देऊन गौरविले.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत १९७२ साली प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर १९८३ पर्यंत ते तिथेच होते.
खगोल भौतिकशास्त्राचे संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची 'आयुका' ही संस्था त्यांनी उभारली. तिथल्या झाडाच्या पुनःरोपणांपासून ते इमारतीच्या रचनेपर्यंत सगळे या खगोलशास्त्रज्ञाने अत्यंत कुशलतेने साकारले. खगोलविज्ञान हाच त्यांचा ध्यास होता.
शालेय विद्यार्थ्यांनी, युवकांनी विज्ञानात रमावे म्हणून त्यांनी आयुकामध्ये 'विज्ञानवाटिका' निर्माण केली. नाना प्रकारच्या प्रतिकृतींद्वारे विज्ञानाचे नियम मुलांसमोर यावेत, हा उद्देश.
मुलांच्या विज्ञानविषयक प्रश्नांना आपल्या व्यस्त कार्यातूनही वेळ काढून स्वतःच्या हस्ताक्षरात उत्तरे पाठवतात.
वैज्ञानिक आणि वैचारिक असे विपुल लेखन, विज्ञान कथालेखन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, देशपरदेशात व्याख्याने, संशोधन असे उदंड कार्य ते करत आहेत. पद्मविभूषण कलिंगा, फाय फाउंडेशन, बिर्ला, इंदिरा गांधी अशा जवळजवळ ६५ पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे “या ब्रह्मांडा मिठी मारू पाहणाऱ्या मानवाचं बुद्धिबळ केवढं असेल!” अशा शब्दांत त्यांचं कौतुक करतात.
आकाशाशी नाते जोडणारा हा 'अलौकिक प्रज्ञावंत' / 'विज्ञानातील ध्रुवतारा' आहे.
0 comments: